(फळं) खा, पिऊ नका!

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
21 May 2011 - 4:02 am

'माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस.' 'दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला , तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटर चे फ्रेश ज्यूस पिते. ' ' रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड मित्रांसोबत जॉगर्स पार्क ला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!'

आहेत न ह्या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. ह्या पैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे. पण फ्रूट ज्यूस पिणे म्हणजे सर्व विकारांवरचा रामबाण उपाय किंवा आहारात आवश्यक असलेल्या फळांना पर्याय- हे कधीच होऊ शकत नाही. फळं घन पदार्थ असतात. त्याच्यातील पोषण जपण्यासाठी त्यावर एक किंवा अधिक जाड/पातळ साल असते. जेव्हा फळांचे ज्यूस काढले जाते तेव्हा ते एक किंवा अधिक प्रोसेसिंग मधून तयार होते. जरी तुम्ही ज्यूस सेंटर वरचे ज्यूस प्यायलात, तरी तिथे पण त्या फळाला क्रश करून त्यातून त्याचं रस काढला जातो आणि चोथा गाळून टाकला जातो. तुम्ही म्हणाल की मी तर्बूजाचा ज्यूस न गाळता पितो - तरी त्या तर्बूजाचे फळ, ज्यूस बनण्यासाठी प्रोसेस तर होतेच. फळ/भाजी चा रस काढायला जेव्हा ते ज्यूसर/मिक्सर मधे चिरडले जाते, तेव्हा त्याचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात हवेतला प्राणवायू (ऑक्सिजन) त्या रसातल्या पौष्टिक तत्वांवर प्रतिक्रिया करून त्यांचे स्वरूप बदलून, त्यांची पौष्टिकता नष्ट करतो. विकत मिळणाऱ्या टेट्रापॅक ची तर बातच सोडा. एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या औद्योगिक उत्पादनात, त्या फळ/भाजीच्या रसात प्राकृतिक रंग देखील रहात नाही, पौष्टिक तत्व राहणे तर जणू अशक्यच असते. म्हणूनच अश्या ज्यूस न 'फोर्टीफाय' म्हणजे वरून रासायनिक जीवनसत्व व खनिज तत्व घालावे लागतात (जे आपल्या शरीरात बहुतांश शोषले जात नाहीत). ह्या व्यतिरिक्त त्या ज्यूस मधे रंग, इतर रसायन, कॉर्न सिरप वगेरे तर असतातच.

माझं असं ठाम मत आहे की फ्रूट/व्हेजिटेबल ज्यूस पिणे हे पण एक पाश्चात्य फॅड आहे. फळ हे फळ रूपातच खावे, तरच त्यातून तुम्हाला जीवन सत्व, खनिज तत्व, फायबर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मिळतात. उगीच त्या फळाचे ज्यूस रूपी सरबत करून असा समज करून घेऊ नये की तुम्हाला फळाचे पोषण मिळत आहे. आणि, कॅलरी बघाल तर, फ्रूट ज्यूस आणि कार्बोनेतेड कोला ह्यात तुलनात्मक कॅलरी असतात. आणि साखरे व्यतिरिक्त, प्राकृतिक पोषण काहीच नाही! तरी का असावा एवढ्या लोकांचा फ्रूट ज्यूस पिण्याचा अट्टाहास? ह्यावर मला अशी काही कारणं दिली गेली-

१. फळं आणायला वेळ नसतो- फ्रूट ज्यूस आणायला वेळ काढता न?
२. फळं खायला वेळ नसतो- मला सांगा, एक केळं सोलून खायला किती तास लागतात हो?
३. फ्रेश ज्यूस तयार मिळतो, नुसतं पिऊन टाकायचा- फ्रेश फळ देखील रेडी-टू-ईट मिळतात, छान पैकी खाऊन टाकायची. ग्लास धुवत बसायला नको आणि बाहेरचे ज्यूस प्यायल्याने रोगराई ची भीती पण नको!
४. ऑफिस मधे फळं खायला लाज वाटते- जेवण जेवता न, तिथेच? तेव्हाच खायचं मग एक फळ. तुम्ही सुरुवात करा मग बघा कसं सगळेच आणायला लागतात एक फळ ते!
५. फळं महाग असतात- रोज एक ग्लास फ्रूट ज्यूस पिण्यापेक्षा, एक फळ खाणं कधीही स्वस्त असतं. करा हिशोब!

एवढं सगळं समजावून देखील जर तुम्हाला फळ प्याय्चाच असेल तर- नारळ पाणी प्या. आंबा मऊ करून तसाच त्यातला रस खा/प्या. द्राक्ष, टरबूज, खरबूज खा- केवढी छान रसदार फळं असतात ती. काय तर मग, आता नाही न पिणार? फळ हो!

जीवनमानलेखशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

छान माहिती पूर्ण लेख ...
जूस सेंटर वरची स्वच्छता बघून ..... किळसच येते :D
अक्ख फळं खाण कधीही ब्येस .

उसाच्या रसाचा विचार इथे झालेला दिसत नाह्ये पण

चिरोटा's picture

21 May 2011 - 4:26 am | चिरोटा

चांगली माहिती.उस खाण्यापेक्षा उसाचा रस प्यायला तरी हरकत नसावी. (http://cane-o-la.com/ ).

खादाड अमिता's picture

23 May 2011 - 10:57 am | खादाड अमिता

स्पा आणि चिरोटा: उस खाल्लेला चांगला असतो कारण त्याने आपल्या दातांची मजबुती वाढते. उसाचा रस म्हणजे नुसती साखर पिण्या सारखे असते कारण त्यातील बाकी पोषक तत्व सगळी ओक्सिदायीझ होतात, थोडं पण फायबर मिळत नाही. शिवाय कुठल्या हि रसवंती गृहात स्वच्छता हा खूप मोठा प्रश्न असतो. दर वर्षी उन्हाळ्यात, खूप लोकांना फूड पोइज़निन्ग, टाय्फोयीद, जोन्डीस ई. उसाचा रस पिऊन, उघड्यावरच ज्यूस पिऊन किंवा रस्त्यावर पाणी पुरी खाऊन होतो. त्यामुळे, इथे पण उस खाणे जास्त योग्य वाटते- त्याचा रस पिण्या पेक्षा.

प्यारे१'s picture

21 May 2011 - 4:26 am | प्यारे१

आमरस पुरी खायची नाही म्हणणार्‍या खादाड अमिताचा णिषेढ...

खादाड अमिता's picture

23 May 2011 - 11:01 am | खादाड अमिता

प्यारे१ : आमरस पुरी खायची नाही ? असं मी तरी कधीच म्हणत नाही. उन्हाळ्यातले सर्वोत्कृष्ट 'पक्वान्न' म्हणजे- आमरस. पण आमरस पिणे/खाणे (साखर घालून, मिक्सर मध्ये फिरवून किंवा विकतचा आमरस) हे एक आरोग्यदायी आंबा खाण्याजोग कधीच नसतं. आमरस पुरी जरूर खा- पण पक्वान्न म्हणून.

पटलं. शंभर टक्के खरं आहे.

फळ सोलणे, कट करणे ह्यामुळे बरेचजण फळं खाण्याचा कंटाळा करतात हे ही खरंच आहे. मुलंतर फार कंटाळा करतात. बाहेर एकवेळ वेफर्स, वडापाव, सामोसा, बर्गर्स, सॅण्डविच इ. खातील पण घरात आणून ठेवलेली फळं खायची नाहीत.

दररोज फळे खाल्ली आणि तासभर चालण्याचा व्यायाम केला तरी तब्येत उत्तम राहू शकते.

सहज's picture

21 May 2011 - 4:48 am | सहज

काय आहे की शास्त्रीय संगीत गात, भारतीय शास्त्रीय नृत्यातुन व्यायाम करताना हरपलेली तहानभूक मला व्यायाम संपला की जाणवते. आता भूक आधी भागवावी की तहान हा प्रश्न नेहमी पडतो.

त्यात पाश्चात्यांचे फॅड फाट्यावर मारायची अतोनात आवड. शिवाय आजच्या धकाधकीच्या जीवनात सांगा वेळ कोणाला? आहो हो वेळ कोणाला? काय आहे की गॅझेटझ्या प्रेमात पडलेल्या आम्हा व्यायामपटूंना आता थ्रीडी लॅपटॉप खुणावत असतो ना.

म्हणुन मी काय म्हणतो, तुम्ही फळ व भाज्यांच्या युतीमिश्रणाला (फ्रुट एन्ड व्हेज स्मुदी)अनुमोदन द्याल का? म्हणजे काय होईल की पौष्टीक सत्वांचा स्टॉप लॉस करुन वेळ, पोषणमुल्य यांचा सरासरी फायदा करुन आम्हा जुन्या गुंतवणूकदारांचा तन मन धन फुलोरा होईल ना!!

खादाड अमिता's picture

23 May 2011 - 11:08 am | खादाड अमिता

सहज :

तुम्ही फळ व भाज्यांच्या युतीमिश्रणाला (फ्रुट एन्ड व्हेज स्मुदी)अनुमोदन द्याल का? नाही. कारण <<फळ/भाजी चा रस काढायला जेव्हा ते ज्यूसर/मिक्सर मधे चिरडले जाते, तेव्हा त्याचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात हवेतला प्राणवायू (ऑक्सिजन) त्या रसातल्या पौष्टिक तत्वांवर प्रतिक्रिया करून त्यांचे स्वरूप बदलून, त्यांची पौष्टिकता नष्ट करतो.>>

तुम्हाला तुमचा मिक्सर एवढाच वापरायचा असेल तर दुधात कॉफ्फी/व्हानीला इसेन्स घालून फ्लेवर्ड मिल्क प्या. दुधाच्या न्युत्रीयंत चे मिक्सर मध्ये प्रोसेस होऊन नाश होत नाही. फळ आणि भाज्यांचा संगम हवाय, वेळ नाही म्हणताय आणि तरी फळ/भाज्या सोलून, कापून, मिक्सर मध्ये फिरवून स्मूदी करण्यात वेळ घालवताय? आहो- त्या थ्री डी laptop वर गेम खेळता खेळता एकीकडे एक सफरचंद आणि मग एक गाजर खा कि. केवढा वेळ वाचेल आणि खूप जास्त पोषण पण मिळेल.

सहज's picture

23 May 2011 - 11:29 am | सहज

<महेश कोठारे मोड>ओह! डॅम इट <महेश कोठारे मोड> ह्या ऑक्सीजनने पार वात आणला आहे. जिथे तिथे पसरला असतो.

कोठारेंना सलाम

अमितातै...
लै भारी लेख...
आजपासुनच फळे खायला प्राधान्य...
(त्याने प्वॉट/ढेरी /घेर वाढु नये अशी इच्छा...)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 May 2011 - 11:28 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>त्याने प्वॉट/ढेरी /घेर वाढु नये अशी इच्छा..
हे तू लिहितो आहेस? वाढण्यासाठी मुळात ढेरी असावी लागते रे भाऊ.
आता हेच वाक्य स्पा ने लिहिले की आम्ही डोळे मिटायला मोकळे..............

RUPALI POYEKAR's picture

21 May 2011 - 5:01 am | RUPALI POYEKAR

छान माहिती खरच, मलाही पटल,
मला फारशी फळ खायला आवड्त नाहीत पण तुमचा लेख वाचुन खावीशी वाट्तात.
माझ्या मुलासाठी मी घेउन जाते त्याला सवय लागली पाहीजे ना.

वेताळ's picture

21 May 2011 - 5:23 am | वेताळ

आमरस खावा कि फक्त आंबे? ह्याबद्दल तुझे मत काय?

मृत्युन्जय's picture

22 May 2011 - 12:54 pm | मृत्युन्जय

एवढं सगळं समजावून देखील जर तुम्हाला फळ प्याय्चाच असेल तर- नारळ पाणी प्या. आंबा मऊ करून तसाच त्यातला रस खा/प्या.

सखी's picture

21 May 2011 - 5:02 pm | सखी

अमिता तु म्हणतेस ते पटते आहे. पण हिच गोष्ट ऑरेंज ज्युस आणि बाकीचे ज्युस जसे कि अ‍ॅपल ज्युस, क्रॅनबेरी ज्युस यांना सारखीच लागु पडते का? कारण इथे तरी मी समजत होते कि ऑरेंज ज्युस खरचं चांगला, परत तो असतोही सुपर मार्केट मधल्या फ्रिजच्या विभागात. बाकीचे ज्युस बाहेरच म्हणजे सोडा, कोक असतात तिथे असतात. मला वाटलं होतं की या बाकीच्या ज्युसमध्ये साखर वाढवलेली असते. तसेच ते बनवतानाही कॉन्सनट्रेट पासुन बनवलेले असतात अशी टीपही असते.

आणि अगदी परवाच मी ऑरेंज ज्युसची छोटी बाटली वेंडीग मचिनमधुन घेतली, तर पुढे मोठ्या अक्षरात १००% ज्युस असं लिहलं होतं, आणि मागे कॉन्सनट्रेट पासुन बनवलेले अशी टीप होतीच, मग हे लेबल फसवं नाही का? यातली कोणती माहीती नक्की खरी?

खादाड अमिता's picture

23 May 2011 - 11:14 am | खादाड अमिता

सखी: सगळे पाकेज्द जूस सारखेच असतात. ऑरेंज जूस फ्रीज मध्ये ठेवतात कारण बहुतेक बरीच मंडळी ते लगेच त्यांचा वोडका/जीन मध्ये मिक्स करायला घेतात किंवा लगेच पिण्या साठी. जरी जूस च्या पाकिटावर 'नो शुगर added' असे लिहिले असले तरी त्यात दुसरे स्वीटनर, high fructose corn syrup आणि इतर बरेच रसायन असतात. त्या पेक्षा तिथल्या फार्मर्स मार्केट मधून ताजी ओर्गानिक फळं घ्या आणि ती फळ रूपातच खा.

प्रचेतस's picture

22 May 2011 - 1:29 pm | प्रचेतस

ज्युस बाबत अजून एक मुद्दा म्हणजे ज्युस ला फळे जास्त लागतात. म्हणजे तुम्ही जर एक ग्लास (२००/२५० मिली)संत्रा ज्युस बनवलात तर तुम्हाला ३ ते ४ संत्री लागतात. म्हणजेच तुम्ही जर एक संत्रे खाल्लेत तर ५०/६० कॅलरीज मध्ये काम भागते पण तेच जर ज्युस वाटे प्यायले तर नाहक २००/२५० कॅलरीज वाढल्या जातात.

सांजसखी's picture

23 May 2011 - 2:17 am | सांजसखी

चांगली माहिती....
माझ्या मते केवळ फळांचा रस पिण्याने फळातील आवश्यक असेही काही घटक असतात,( उदा. फायबर,) मिळत नाही..... कारण फळे फक्त कॅलरीज साठीच खावीत असे नाही..

खादाड अमिता's picture

23 May 2011 - 11:17 am | खादाड अमिता

सांजसखी : फळे फक्त कॅलरीज साठीच खावीत असे नाही.. अगदी बरोबर. उलट इतर खाद्य पदार्थ बघता फळ/भाज्यान मध्ये कॅलरी खूपच कमी असतात. त्यामुळे फळं / भाज्या त्यातल्या जीवन सत्व, खनिज तत्व, फायबर आणि antioxidants साठी खावे.

नरेशकुमार's picture

23 May 2011 - 6:47 am | नरेशकुमार

लेख आनि प्रतिक्रिया चावता चावता...... आपलं वाचता वाचता एक सफरचंद चावुन...... आपलं खाउन झालं.

नगरीनिरंजन's picture

23 May 2011 - 1:14 pm | नगरीनिरंजन

रोज किती फळं खावीत? जास्त फळं (म्हणजे एकावेळी दोन संत्री, एक सफरचंद वगैरे) खाल्ल्याने त्रास होऊ शकतो का?

विसोबा खेचर's picture

23 May 2011 - 3:56 pm | विसोबा खेचर

पटण्याजोगे प्रकटन..!

धन्यवाद..

तात्या.

खादाड अमिता's picture

25 May 2011 - 6:45 pm | खादाड अमिता

धन्यवाद तात्या. :)

धनंजय's picture

25 May 2011 - 8:12 pm | धनंजय

छान.

फळे खायला आवडतात. फळांच्या चवीबरोबर त्यांचा पोतही आनंदाने अनुभवण्यालायक असतो.

{मात्र रम-व्होडका वगैरे घालून प्यायला फळांचे रस बरे पडतात. अपवाद : कलिंगड. याच्या मोठ्या-मोठ्या (पृष्ठाचे क्षेत्रफळ फारसे न-वाढलेल्या) फोडींवर वारुणीचे सिंचन करता येते. मग कलिंगडाच्या फोडींचा टपोरा रवाळपणाही अनुभवायला मिळतो. (ज्यूसमध्ये कलिंगडाची चव असते, पण पोत नसतो.)
आणखी एक म्हणजे आंबापोळी/फणसपोळी वगैरे करण्यासाठी रसच वापरणे अपरिहार्य असते. या मिष्टान्नांत ताज्या फळापेक्षा जीवनसत्त्वे कमी असतात, याबद्दल दुमत नाही.}

फोडींवर वारुणीचे सिंचन करता येते.

हे नवीन कळले. झकासच.. मस्त आहे आयडिया.. :)

पण कोणती वारुणी?

धनंजय's picture

28 May 2011 - 3:37 am | धनंजय

रम किंवा व्होडका.

गोगोल's picture

28 May 2011 - 5:52 am | गोगोल

अमिता ताईंना
"(दारू) प्या, सिंचू नका"
असा लेख काढू लागयची चिन्हे दिसत आहेत.

मदनबाण's picture

26 May 2011 - 9:46 am | मदनबाण

छान माहिती. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 May 2011 - 12:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे

उत्कृष्ट लेख.
बरेच लोक डाएट च्या नावाखाली स्वतःचे जास्त नुकसान करून घेत असतात असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2011 - 12:23 pm | बिपिन कार्यकर्ते

बेष्ट! माझेही ज्यूसेसबद्दल नुकतेच प्रबोधन झाले आहे.