घोटाळ्यातच करिअर....

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
10 May 2011 - 5:23 am

आता आम्ही दररोज पेपर वाचतो आणि चाट पडतो. कारण फ्रँटपेजवरच्या बातम्याच तशा अचाट असतात, कोट्यावधींच्या हिशोब मांडणाऱ्‍या अन् मागणाऱ्‍याही. आम्ही चक्रावून जातो जेव्हा आमचंही नाव 'माथा बडवत्या पोज'मधील फोटोसहीत छापून येतं. आमच्या अचाट कर्तृत्वाची अनेक पाने साक्षीदार असली तर त्यातील महत्वाची पाने गायब करण्याचं कसब आमच्या अंगी बाणवल्यामुळे आमच्या कारभाराची 'गैर' गणती होऊच शकणार नाही हे आम्ही छातीठोकपणे (जाहीर सभेतही) सांगू शकतो.
तसे म्हणाल तर आम्ही मँट्रीक फेल नामक डिग्रीचे. गणितात आम्ही फार पूर्वीपासूनच आसमान से गिरे खजूर पे अटके अशा तिर्यकावस्थेत तरंगत असल्याने एक कोटी म्हणजे एकावर किती शून्ये हे सांगता तर येत नसायचेच, मोजणे तर कोसों दूरची बात असायची. आमच्या गणिताच्या उत्तर पत्रिका मात्र असंख्य शून्यांनी बरबटलेल्या असत हे सांगतांनादेखील आम्ही आजही शून्यात हरवून जातो. परंतु आम्ही उत्तर पत्रिकेतील शून्ये मोजितच ठरवले होते की कशातच हरवून किँवा हरखून न जाता निवडलेल्या कुरणात थेट चरत जायचे, फक्त चरत जायचे.. हे शिक्षण मात्र फार सोप्पं नव्हतं. त्यासाठी कितीतरी यातायात करावी लागली. मँट्रीक फेलची पुंगळी मिळाल्यावर आमचे डोळे सताड उघडले. आपण स्वतःसाठी काहीही करू शकत नाही आहोत याची खात्री पटल्यावर समाजासाठी काहीतरी करावं या हेतूने राजकारणाच्या डोहात उडी घेतली. कित्येक कालियाँना सामावून घेणारा तो डोह अथांग व गढूळलेला होता. हिरवे निळे भगवे पांढरे काळे पिवळे झेंडे घेऊन अनेक दुतोँडी सर्प आम्हांला आपल्याचकडे यावे अशा आशयाने डोळा मारीत होते. परंतु त्या प्रत्येक मांडूळाने किती रकमेचे अन् किती मोठमोठे घोटाळे करुन कात टाकलीय हे आम्हांला का ठावूक नव्हते?
अगदी सुरुवातीला आम्ही कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. तारुण्याची तडफ, बेधडक वृत्ती लोकांना भावली आणि आम्ही सर्वमान्य होऊ लागलो. काही दिवसांतच आमचं बस्तान बसलं, चौकाचौकात आमच्या सुहास्य वदनाचे भलेमोठ्ठे फ्लेक्स झळकू लागले. गणेशोत्सव, नवरात्र, नाताळ, नववर्ष, होळी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतांना आम्ही चोवास तास जनतेपुढे नकमस्तक राहू लागल्याने आमच्या शुभेच्छा मतदारांना प्रेरीत करुन गेल्या. त्यानंतर आलेल्या निवडणूकीत आम्ही अनपेक्षितपणे अपक्ष म्हणून बहुमताने आमदार झालो. आमची ही गरुड झेप अन् गारुड पाहून भल्याभल्यांची मती गुंग झाली. त्याचवेळी आमचा अपक्षांचा दबावगट आम्ही निर्माण केल्याने वैयक्तिक आमचा दबदबा वाढला. मोक्याचे खाते मिळविण्यात आम्ही यशस्वी ठरलो आणि आम्हांला आमच्या स्वप्नातले हिरवेगार कुरण गवसले. मग काय, आम्ही अधाशी जनावरासारखे बेभानपणे चरत सुटलो. आमचे कार्यकर्ते आमच्याशी इतके एकनिष्ठ होते की आमच्या विरोधी उठणारा आवाज चारभिंतीतच कोँडला जावू लागला आणि काय आश्चर्य एकाच वर्षात आम्हीही इतरांसारखे कितीतरी वेळा कोट्याधीश झालो!
तर करियरचा असा परफेक्ट फॉर्म्युला आम्हांस सापडला आहे बघा...
कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायला ना शिक्षणाची अट असते ना डिग्रीची. फक्त थोडसं डोकं चालवायचं, अन् जीभ पाहिजे तिथे योग्य रितीने वळविण्याची युक्ति आत्मसात केली की झाले. खोकेच्या खोके किँवा पेट्याच्या पेट्या घरपोच झाल्याच म्हणून समजा. इतकं हे सोप्पं करियर आहे महाराजा.
तुम्ही विचाराल तुम्ही मेहनत तरी कशी केली? तुम्हांला म्हणून सांगतो, आम्ही परिक्षेचे पेपर लिहिले खूप कमी मात्र मोफत वाचनालयांत जाऊन रोजचे पेपर वाचले अधिक! त्यामुळे आमच्याही नकळत आम्ही (बि) घडत गेलो. आम्हांला सही करता येत नव्हती परंतु आम्हांला 'पेट्यां'च्या आमिषानेच ती जमू लागली. एखाद्या मोक्याच्या फायलीवरची आमची निर्णायक सही इतकी मौल्यवान असू शकेल हे स्वप्नातही आम्ही चिँतलं नव्हतं. ठरलेली खोकी योग्य ठिकाणी पोचल्याची वर्दी मिळताच याचकाच्या फायलीवर लफ्फेदार सही ठोकण्यात मिळणारा आनंद मैदानात घाम गाळून ठोकलेल्या शतकानेही मिळणार नाही असा अमोजणीय असायचा. कारण त्या सहीच्या मोबदल्यात मिळालेली सही सही रक्कम मोजायला चार नोकरही कमी पडत इतकं मोठ्ठं ते गठूडं असे. त्या पोत्यात नोटांची बंडले खच्चून भरलेली असत. कड्या कुलपे लावून त्या नोटा मोजतांना फुल्ल एसीतही अंग घामाने डबडबून जाई. नोकरलोकही वैतागून जात. म्हणून ही मोजामोजीची भानगड व जोखीमदारी टाळण्यासाठी थेट स्वीस बँकेतच खाते ओपन करुन आम्ही निर्धास्त झालो बघा. आता फक्त ऑनलाइन व्यवहार लाखोंचा, करोडोंचा...
अब्जावधींचा व्यवहार अगदी अंतिम टप्प्यात आला होता परंतु कोठेतरी माशी शिँकली अन् आमची निराशाजनक छबी मथळ्यासह फ्रँटपेजवर झळकली! योगायोग बघा याच आशयाच्या अन् विषयाच्या बातम्या पाठ करुन, त्यातील मेख शोधून आम्ही घोटाळेबाजीचे करियर निवडले होते. आणि आता आमचीच सटीप बातमी पेपराचा मुख्य विषय झाली होती. आमचं हे अल्पावधीतलं जोरकस करियर वाचून कोणाला अशा घोटाळ्यातच करियर करु वाटलं तर त्यात गैर ते काय?

अर्थव्यवहारविडंबनसमाजजीवनमानअर्थकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

10 May 2011 - 1:07 pm | नरेशकुमार

म्हणून ही मोजामोजीची भानगड व जोखीमदारी टाळण्यासाठी थेट स्वीस बँकेतच खाते ओपन करुन आम्ही निर्धास्त झालो बघा.

मला पन येथे येक अकामुंट ओपन करायचे आहे.
झिरो बॅलेन्स्, ईंटर्नेट/मोबायील बॅकिंग, सगळ्या ATM मधुन पैसे काढता आले पाहीजे.
चेक्स वगेरे बाउंस झाल्यावर कमित कमि रक्कम कापली गेलि पाहिजे.
तिस चाळीस किलो काळा पैसा आहे, तो इथंच ठेवावा म्हनतो.