पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!

Primary tabs

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
10 Mar 2011 - 10:55 am

पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!

या उपांत्य सामन्याच्या चारच दिवस आधी भारतीय संघ पाकिस्तानबरोबरच्या तंग आणि उत्कंठावर्धक उपांत्यपूर्व सामन्यात विजयी झाला असला तरी त्याची शारीरिक आणि मानसिक थकावट झाली होती. लंकेबरोबरच्या उपांत्य सामन्यातील विजयाबद्दलच्या फाजील आत्मविश्वासामुळे विश्वचषक स्पर्धेतील विजयोत्सवाची सुरुवातही झालेली होती. पाकिस्तानच्या आमेर सोहेलने स्वतःच्या संघाच्या पराजयानंतरच्या पत्रकारपरिषदेत तर भारताला लाहोर येथील अंत्य सामन्याबद्दल आधीच शुभेच्छाही देऊन टाकल्या होत्या.

तसे पाहिले तर विश्वचषक स्पर्धा चालू व्हायच्या आधीपासूनच लंकेच्या जयसूर्या आणि कालुवितरणा या दोन फलंदाजांनी आपल्या तुफानी, झंझावाती फलंदाजीने एक तर्‍हेचा दरारा निर्माण केला होता आणि दिल्लीच्या साखळी-सामन्यात त्याची थोडीशी प्रचीती, थोडीशी झलक भारताला दिसलीही होती. त्या सामन्यात (बिचार्‍या) मनोज प्रभाकरच्या पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे ११ व २२ धावा ठोकण्यात आल्या होत्या. जयसूर्याने त्या सामन्यात ७९ धावा केल्या होत्या. त्या मानाने कालुवितरणाची बॅट मात्र या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत फारशी तळपलेली नव्हती. केवळ १२ धावांच्या सरासरीने त्याने या स्पर्धेत एकूण ७३ धावाच काढल्या होत्या आणि तो फक्त दोनदाच २० पेक्षा जास्त धावा करू शकला होता.
या पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे होते.
१३ हा आकडा अशुभ मानला जातो. १९९६ सालच्या विश्वचषक स्पर्धेतील हा उपांत्य सामना खेळला गेला १३ मार्च १९९६ रोजी!! आणि हा १३ आकडा भारताला अशुभच ठरला.
नाणेफेक जिंकून भारतीय कप्तान अझारुद्दीनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊन श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. समोरील लक्ष्य माहीत असताना त्याचा पाठलाग करणे श्रीलंकेला जास्त पसंत असल्याचे त्यांनी केलेला दिल्लीतील सामन्यातील यशस्वी पाठलागावरून उघड झाले होते व या अप्रिय आठवणीचा अझारुद्दीनवर परिणाम झाला असावा. कालूवितरणा आणि जयसूर्यासारखे तडाखेबंद फलंदाज पहिल्याच षटकाच्या पहिल्या चार चेंडूत तंबूत परतले होते हे त्याचा हा निर्णय योग्य असल्याचेच सूचित करत होते. भोपळा फोडायच्या आधीच श्रीनाथच्या चेंडूवर मांजरेकरने कालूवितरणाला टिपले (१-१). त्याच्या जागी गुरुसिंहा फलंदाजीला उतरला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवर जयसूर्याला वेंकटेशप्रसादने टिपले. (१-२)! दोघेही श्रीनाथच्या चेंडूंवर बेजबाबदारपणे फटका मारण्याचा प्रयत्न फसून ’थर्ड मॅन’च्या जागी टिपले गेले होते! श्रीलंकेला हे दोन्ही धक्के प्रचंडच होते. ईडन गार्डन्सवरील एक लाख प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले. इथवर सारे भारताच्या दृष्टीने झकास चालले होते.
पण पुढील तासात जे घडले ते मात्र चित्तथरारक आणि मंत्रमुग्ध करणारे होते. कारण फलंदाजीला आलेला अरविदा डिसिल्वा एकाद्या ’अंगात आलेल्या’ आणि तंद्री लागलेल्या माणसासारखा फलंदाजी करत होता. संघाची दारुण परिस्थिती किंवा एक लाख प्रेक्षकांचा हल्लकल्लोळ या दोन्ही गोष्टी जणू त्याच्या गावीही नव्हत्या. त्याने इतक्या जलद गतीने धावा केल्या की त्याच्या पन्नास धावा ११ चौकारांच्या सहाय्याने केवळ ३२ चेंडूंत झाल्या होत्या. त्याच्या फलंदाजीला ’झंजावाती’ म्हणता येणार नाहीं कारण त्याची फटकेबाजी हिंसक किंवा माथेफिरूसारखी नव्हती. उलट त्याने कव्हर-एक्स्ट्राकव्हरमधून मारलेले फटके अतीशय रेखीव होते. त्या फटक्यात एक तर्‍हेची प्रसन्नताही होती. ते इतक्या अचूकपणे मारले होते कीं क्षेत्ररक्षक ते अडवूच शकत नव्हते. त्याची फलंदाजी इतकी कलात्मक होती कीं त्याच्या हातात जणू एकाद्या कमनीय युवतीच्या हातातला पंखाच होता. डिसिल्व्हाच्या तूलनेत दुसर्‍या बाजूला फलंदाजी करणार्‍या गुरुसिंहाने १६ चेंडूंत फक्त एक धाव काढली होती व तोसुद्धा सोळा चेंडूत केवळ एक धाव काढून संघाची धावसंख्या ३५ असताना बाद झाला होता.(३५-३) त्यावेळी डिसिल्व्हाची फलंदाजीवर इतकी जबरदस्त पकड होती कीं इतके बळी पडूनही श्रीलंकेने षटकामागे ७ या वेगाने धावा जमविल्या होत्या.
आणखी तीन चौकार ठोकून लंकेचा हा अष्टपैलू खेळाडू पंधराव्या षटकाच्या ठोक्यावर कुंबळेचा एक चेंडू आपल्याच बॅटने आपल्या यष्टीवर ओढून घेत त्रिफळाचित झाला. त्याने चौदा चौकारांच्या सहाय्याने केवळ ४७ चेंडूंत ६६ धावा काढल्या होत्या आणि लंकेला सुस्थितीत आणले होते.(८५-४). यावेळी त्यांची धावगती होती षटकामागे ५.७ धावा. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अर्जुना रणतुंगा आणि महानामा यांनी धावांचा वेग षटकामागे ५ पेक्षा जास्त चालू ठेवला होता. दरम्यान १०१ चेंडूंत ५८ धावा काढून महानामा त्याच्या पायांत येणार्‍या वांबांमुळे जखमी म्हणून तंबूत परतला होता. रणतुंगा, महानामा आणि हशन तिलकरत्ने यांनी समंजसपणे आणि संयमाने फलंदाजी करून जलदपणे धावा जमवल्या. ५० षटके संपली तेंव्हां श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या २५१ धावावर पोचली.
श्रीलंकेने भारतापुढे २५२ धावांचे लक्ष्य ठेवले. अत्यंत वेगाने चेंडू वळू देणार्‍या येथील खेळपट्टीवर ही धावसंख्या चांगली होती. पण भारताकडे असलेल्या दिग्गज फलंदाजांच्या मानाने ही धावसंख्या पार करणे अशक्यप्राय नव्हते. आणि सुरुवातही तशी चांगली झाली. भारतीय संघाच्या केवळ ८ धावा झालेल्या असताना सिद्धू ३ धावांवर चामिंडा वासच्या चेंडूवर जयसूर्याच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण सचिन आणि संजय मांजरेकर यांची जोडी जमली व त्यांनी धावसंख्या ९८वर नेली. यावेळी सचिनने ९ चौकारांच्या सहाय्याने ८८ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या (धावगती-स्ट्राइक रेट-७४). संजयच्याही २५ धावा झाल्या होत्या. त्यावेळी जयसूर्याचा एक चेंडू मारण्याच्या प्रयत्नात सचिन क्रीझ सोडून बाहेर आला व त्याचा फटका हुकला. यष्टीरक्षक कालूवितरणाने सफाईदारपणे बेल्स उडवल्या व सचिन यष्टीचित झाला (९८-२). त्या पाठोपाठ केवळ सात चेंडूंनंतर अझारुद्दीन गोलंदाज धर्मसेनाच्या हातात झेल देऊन भोपळाही न फोडता बाद झाला (९९-३). हे दोन दिग्गज फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने ’ईडन गार्डन’वरील एक लाख प्रेक्षकांत स्मशानशांतता पसरली. पण भारतीय फलंदाज एका पाठोपाठ बाद होतच गेले. प्रथम २५ धावांवर खेळत असलेला संजय जयसूर्याच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला (१०१-४). त्यानंतर श्रीनाथ धावबाद झाला (११०-५) व पाठोपाठ अजय जडेजा जयसूर्याच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला (११५-६). नयन मोंगियाने ८ चेंडूत १ धाव काढून डिसिल्व्हाच्या चेंडूवर जयसूर्याच्या हातात झेल दिला (१२०-७) आणि त्याच धावसंख्येवर भोपळाही न फोडता कपूरचा मुरलीधरनच्या चेंडूवर उडालेला झेल सीमेवर उभ्या असलेल्या डिसिल्व्हाने पकडला. जसे भारतीय फलंदाजीचे पानीपत होत गेले तसे प्रेक्षकांच्या संतापाने रौद्र स्वरूप धारण केले आणि कपूरचा झेल पकडला गेल्यावर प्रेक्षकांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि दंगलीला सुरुवात झाली. रागाने भडकलेल्या कलकत्त्याच्या मैदानावरील पेक्षकांनी फेकलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी मैदानाची सीमेलगतची जागा भरून टाकली व खेळ पुढे चालू ठेवणे अशक्य करून टाकले. त्याचवेळी स्टेडियममधील बसायच्या खुर्च्यांना आगी लावण्यात आल्या. या परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा झाल्याने सामन्याचे प्रमुख पंच क्लाईव्ह लॉइड यांनी सामना १५ मिनिटांसाठी स्थगित करून दोन्ही संघांच्या खेळाडूंना मैदानातून तंबूंत आणले व शांतता पुनर्प्रस्थापित करण्याची विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्‍यांकडे केली. पण या दंगली दिलेल्या पंधरा मिनिटांत आटोक्यात आल्या नाहींत. त्यामुळे लॉईड यांनी शेवटी हा सामना दंगलीची परिस्थिती आटोक्यात न आल्याने लंकेला ’Default’ म्हणून बहाल केला.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विनोद कांबळी ’हजरी लावून’ जाणार्‍या आपल्या सहकार्‍यांकडे हताशपणे पहात होता. लंकेच्या फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची छान साथ मिळत होती आणि त्यांचे चेंडू घातकपणे वळत होते. झंझावाती फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला विनोद कांबळीसुद्धा टुकुटुकु खेळत ४९ मिनिटात २९ चेंडूंवर फक्त १० धावा करू शकला होता आणि त्याला एकही चौकार मारता आलेला नव्हता.
खेळ बंद पडला तेंव्हां विजयाची आशा पार मावळली होती कारण या टप्प्यावर फिरकीला बेसुमार साथ देणार्‍या खेळपट्टीवर भारताला १६ षटकात षटकामागे ८.२५ धावा या वेगाने १३२ धावा करायची गरज होती आणि त्यांच्याकडे कांबळी या नावाजलेल्या फलंदाजाला साथ द्यायला उरले होते फक्त कुंबळे आणि वेंकटेशप्रसाद. एक दिवशीय सामन्यात शेवटचा चेंडू पडेपर्यंत विजय-पराभव लपंडाव खेळत असतात हे जरी खरे असले तरी भारताला विजय मिळण्याची शक्यता नगण्यच होती.
लंकेच्या फलंदाजांनी सुरुवातीला पूर्णपणे कोसळलेल्या परिस्थितीनंतर अतीशय चमकदार फलंदाजी करत २५१ ची धावसंख्या उभारली होती पण त्यांच्या या लढाऊ फलंदाजीचा पराक्रम ईडन गार्डनवरील दंगलीने झाकोळून टाकला. सर्व वृत्तपत्रांचे मथळे लंकेच्या फलंदाजीचे कौतुक करण्याऐवजी प्रेक्षकांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे सामना अचानक संपल्याच्या बातम्यांनीच भरले होते.
त्यात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीने बंद पाडल्या गेलेल्या खेळाने वैफल्यग्रस्त झालेल्या कांबळीला राहवले नाहीं व त्याचा स्वतःवरचा ताबा सुटून त्याच्या भावनांचा स्वयंस्फूर्त उद्रेक झाला आणि तो ओक्साबोक्षी रडू लागला. त्याला साथ द्यायला कुणी फलंदाजही उरले नव्हते आणि हुल्लडबाजीमुळे सामना पूर्ण व्हायच्या आतच निकालात निघाल्याची नामुष्कीही त्याला सहन झाली नव्हती. यजमान देशाच्या दृष्टीने हा फारच अपमानास्पद क्षण होता. भारतीय अधिकारी आणि प्रेक्षकांतील बर्‍याच जणांना या दंगलीमुळे अतीशय शरमिंदे वाटत होते. सामना अर्धवट सोडण्याची घोषणा होण्याच्या सुमारास अशा कांहीं प्रेक्षकांनी श्रीलंकेचे अभिनंदन करणारा फलक उभारून त्यात "Congratulations, Sri Lanka! We are sorry (श्रीलंकेच्या खेळाडूंचे अभिनंदन. आम्हाला खेद होत आहे)" अशा मजकुराचा कापडी फलकही उभा केला. हा कापडी फलक आणि कांबळीचे अश्रू या दोन गोष्टी भारताला झालेल्या अपार दुःखाचे आणि लज्जेचे प्रतीकच ठरल्या. अशाच कांहीं शरमिंदे झालेल्या लोकांनी श्रीलंकेतील वृत्तपत्रांत जाहिराती देऊन क्षमायाचनाही केली. चारच दिवसांपूर्वी पाकिस्तानी प्रेक्षकांनी जसा आपल्या खेळाडूंबद्दल उग्र संताप व्यक्त केला होता तसाच भारतीय प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंबद्दल केला आणि शेवटी एक प्रतिबंधक उपाय म्हणून अझारिद्दीनच्या घरावर पोलिसांचा पहारा ठेवायची खबरदारी घ्यावी लागली होती!
एवढे सारे रामायण झाले तरी सामनोत्तर बक्षीस-समारंभ मात्र जणू कांहीं झालेच नाहीं अशा नेहमीच्या थाटात पार पडला. फक्त पार्श्वभूमीवर दिसणारे आणि सर्वत्र पसरत असलेले धुराचे लोट मात्र काय घडले याची साक्ष देत होते. टोनी ग्रेगने सामनोत्तर मुलाखती इतक्या नेहमीसारख्या घेतल्या कीं तो सारा प्रसंग हास्यास्पदच (bizzare) वाटला होता.
४८ चेंडूंत २५ धावा काढणारा संजय मांजरेकर म्हणाला कीं सामन्याचा शेवट एक दुःखद क्षण होता. दूरचित्रवाणीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पहाणार्‍या सर्व प्रेक्षकांना एकाकी उभा असलेला कांबळी आणि त्याच्या डोळ्यातून मुक्तपणे वहाणारे अश्रू आठवतात पण कांबळीचा स्वभावच तसा आहे. आम्हा सर्वांना तितकेच दुःख झाले होते पण कांबळी आपल्या भावना लपवून ठेवू शकला नाहीं व त्या प्रकट झाल्या. या सामन्यानंतर विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द समाप्तीच्या मार्गाला झाली. तो तीसेक सामने खेळला पण त्यात तो त्याची पूर्वीची चमक दाखवू शकला नाहीं व आपली १९९३ सालची उंचीही गाठू शकला नाहीं. असामान्य कर्तृत्वाची झलक दाखविणार्‍या या तार्‍याचा आपली पूर्ण उंची गाठण्याच्या आधीच जणू उल्कापात झाला आणि १९९५ सालानंतर तो कसोटी सामनाही खेळला नाहीं.
अरविंदा डिसिल्व्हाला सामना वीर म्हणून घोषित करण्यात आले.
सगळ्यात जास्त टीका नाणेफेक जिंकूनही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या अझारुद्दीनवर झाली. पण लक्ष्य माहीत असताना त्याचा पाठलाग करणे श्रीलंकेला जास्त पसंत असून त्यांनी केलेला दिल्लीतील सामन्यातील यशस्वी पाठलागाच्या अनुभावाचा अझारुद्दीनवर परिणाम झाला असावा. पण टीकाकारांचे म्हणणे होते कीं भारतीय कप्तानाने प्रतिस्पर्धकांच्या दौर्बल्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या सामर्थ्यावर ते केंद्रित करून निर्णय घ्यायला हवा होता. पण पराभूत कप्तानाच्या अशा चुका नेहमीच काढल्या जातात, त्यात नवे ते काय?
धावफलक
सामना क्रमांकः 1081
विल्स विश्वचषक स्पर्धा, १९९५-९६, पहिला उपांत्य सामना
भारत वि. श्रीलंका
ईडन गार्डन्स, कोलकाता (दिवस/रात्र)
१३ मार्च १९९६ (५० षटकांचा सामना)
निकालः दंगलीमुळे श्रीलंका विजयी घोषित
फलंदाजी: श्रीलंका एकूण २५१/८ ५० षटकात

फलंदाज बाद झाल्याचा तपशील धावा
जयसूर्या झे. प्रसाद गो. श्रीनाथ १
कालुवितरना झे. मांजरेकर गो. श्रीनाथ ०
गुरुसिंहा झे. कुंबळे गो. श्रीनाथ १
डिसिल्व्हा त्रि. कुंबळे ६६
महानामा जखमी-निवृत्त ५८
रणतुंगा पायचित सचिन ३५
तिलकरत्ने झे. सचिन गो. प्रसाद ३२
धर्मसेना त्रि. सचिन ९
वास धावबाद २३
विक्रमसिंगे नाबाद ४
मुरलीधरन नाबाद ५
अवांतर १७

फलंदाजी: भारत एकूण १२०/८ ३४.१ षटकात

फलंदाज बाद झाल्याचा तपशील धावा
सचिन य. कालुवितरना गो. जयसूर्या ६५
सिद्धू झे. जयसूर्या गो. वास ३
संजय मांजरेकर त्रि. जयसूर्या २५
अझारुद्दीन झे. व गो. धर्मसेना ०
कांबळी नाबाद १०
श्रीनाथ धावबाद ६
जडेजा त्रि. जयसूर्या ०
मोंगिया झे. जयसूर्या गो. डिसिल्व्हा १
कपूर झे. डिसिल्व्हा गो. मुरलीधरन ०
कुंबळे नाबाद ५
अवांतर १०

गोलंदाजी
श्रीलंका
विक्रमसिंगे: ५-०-२४-०; वास: ६-१-२३-१; मुरलीधरन: ७.१-०-२९-१; धर्मसेना: ७-०-२४-१; जयसूर्या: ७-१-१२-३; डिसिल्व्हा: २-०-३-१

भारत:
श्रीनाथ: ७-१-३४-३; कुंबळे: १०-०-५१-१; प्रसाद: ८-०-५०-१; कपूर: १०-०-४०-०; जडेजा: ५-०-३१-०; सचिन:१०-१-३४-२
मुख्य आकडे:
फलंदाजी:
श्रीलंका-अरविंदा डिसिल्व्हा ६६ (४७), महानामा ५८ (१०१), रणतुंगा ३५ (४२), तिलकरत्ने ३२ (४३) आणि चामिंडा वास २३ (१६);
भारत-सचिन ६५ (८८), मांजरेकर २५ (४८) कांबळी १० (२९)
गोलंदाजी: श्रीलंका-जयसूर्या ३-१२, वास १-२३, मुरलीधरन १-२९, धर्मसेना १-२४, डिसिल्व्हा १-३; भारत-श्रीनाथ ३-३४, सचिन २-३४
हा लेख ESPNcrickinfo च्या संस्थळावरील श्री. संबित बाळ, श्री जॉन विसडेन आणि श्री. सिद्धार्थ वैद्यनाथन यांच्या लेखांवरून संपादित केलेला आहे. इथे दिलेली छायाचित्रेही ESPNcrickinfo च्या संस्थळावरून घेतलेली आहेत.
ऋणनिर्देश: माझे सहकारी श्री नाफडे यांनी या लेखासाठी माहिती व आकडेवारी पुरविली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

क्रिकेट

प्रतिक्रिया

सुधीर काळे's picture

18 Mar 2011 - 9:42 pm | सुधीर काळे

नुकतीच दक्षिणआफ्रिकेबरोबरच्या सामन्यात इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सचिन बाद झाल्यावर इतर ८ खेळाडू ३३ धावात गारद झाले आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्याला चारी मुंड्या चीत केले!

१३ हा आकडा अशुभ मानला जातो. १९९६ सालच्या विश्वचषक स्पर्धेतील हा उपांत्य सामना खेळला गेला १३ मार्च २०११ रोजी!! आणि हा १३ आकडा भारताला अशुभच ठरला.

नजरचुकिने झाले आहे जरा स्वसंपादनाची सोय वापरून दुरुस्त करून घ्या.. बाकी लेख झकासच. हा सामना टिव्हीवर बघीतला होता!!! त्याची आठवण झाली..

आपण निदर्शनास आणलेली (नजर)चूक दुरुस्त केलेली आहे. कुणीतरी आपले लिखाण असे बारकाईने वाचत आहे हे पाहून आनंद वाटला. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
सुधीर काळे

प्राजु's picture

20 Mar 2011 - 6:12 am | प्राजु

हा सामना मी ही पाहिल होता टिव्हीवर. आठवणी सगळ्या ताज्या झाल्या.
प्रचंड शरम वाटली होती भारतीय खेळाडूंची..!

लेखाजोखा आवडला.

भारतीय खेळाडूंची शरम तर वाटलीच पण कलकत्त्याच्या प्रेक्षकांच्या अखिलाडी वृत्तीमुळेही दु:ख झाले! मलाच नाहीं तर Cricket Asso. of Bengal च्या अधिकार्‍यांनाही! कारण त्या सामन्यात श्रीलंकेला by default विजयी घोषित करण्याचा क्लाईव्ह लॉईडचा निर्णय त्यांना चांगलाच झोंबला होता. खरे तर कलकत्याचे (आणि मुंबईचेही) प्रेक्षक त्यांच्या खिलाडू वृत्तीबद्दल प्रसिद्ध आहेत, पण असे कांहीं अपवाद घडतात आणि त्याची चुटपुट लागून रहाते!

नगरीनिरंजन's picture

20 Mar 2011 - 9:03 am | नगरीनिरंजन

कलकत्त्याचे प्रेक्षक खिलाडू वृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत यावर असहमत आहे, आणि हा अपवाद कसा म्हणता येईल? खिलाडू वृत्ती तेव्हाच दाखवायची असते जेव्हा लाजिरवाणा पराभव होत असतो. सुनिल गावस्करलाही हळू खेळल्याबद्दल इथल्या प्रेक्षकांनी वाईट वागणूक दिली होती हे सर्वविदीतच आहे.

खरं तर पूर्वी भारत क्रिकेटचे सगळेच सामने हरायचा तेंव्हां आपले प्रेक्षक 'खिलाडू वृत्ती'चे होते (इलाजच नव्हात!). पण आपण जिंकू लागल्यावर मात्र आपल्या प्रेक्षकांची वृत्ती बदलली असे माझे मत झाले आहे!!!