सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-भाग २

Primary tabs

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 10:51 pm

वारंवार ’गुदमरण्या’साठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९९-उपांत्य फेरीचा सामना (एकदिवसीय सामना क्र. १४८३)
बर्मिंगहॅममधील ’एजबॅस्टन’ मैदान
बरोबरीत सुटलेला पहिला कसोटी सामना होता रिची बेनो आणि फ्रँक वॉरेल यांच्या संघातला. डिसेंबर १९६० साली ऑस्ट्रेलियात हा सामना खेळला गेला तेंव्हां मी पुण्याच्या COEP मध्ये इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो आणि हॉस्टेलमध्ये रहात होतो. सगळे विद्यार्थी रेडियोच्या भोवती गर्दी करून बसलेले. अगदी चिकटून बसलेल्यांनाच कांहीं तरी ऐकू यायचं. प्रक्षेपणही चांगलं नव्हतं. Short Wave वरचं स्टेशन सारखं जात-येत होतं. त्यात सामना संपला तेंव्हां कॉमेंट्री सांगणाराच इतका उत्तेजित होऊन ओरडत होता कीं तो काय बोलत होता तेही समजत नव्हतं. चित्रवाणी भारतात तरी अजून यायचीच होती. थोडा आरडा-ओरडा ओसरल्यावर कळले कीं सामना बरोबरीत सुटला आहे. असं होऊ शकतं? हा पहिलाच असा सामना होता.
१९९९ साली एकदिवशीय विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना झाला तोपर्यंत सामने चित्रवाणीवर पहाण्याची सोय झाली होती. त्यांचं चलच्चित्रणही खूप सुधारलं होतं. त्यामुळं बरोबरीत सुटलेल्या या सामन्याच्याबाबतीत मात्र संपता क्षणी कळलं काय झालं ते! तरी पण बरोबरीत सुटलेल्या सामन्यानंतरची अविश्वासाची भावना मात्र तशीच होती.
या सामन्यातही यशाचं पारडं सारखं एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे झुकत होतं! दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २१३ धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या २१३ ची धावसंख्या ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटच्या षटकातले चार चेंडू झाले होते, दोन उरले होते आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची जोडी खेळत होती. दक्षिण आफ्रिकेला या दोन चेंडूत एक धाव हवीच होती, बरोबरी पुरेशी नव्हती कारण त्या आधीच्या Super-Six मधील ऑस्ट्रेलियाच्या सरस प्रदर्शनामुळे बरोबरी झाल्यास ऑस्ट्रेलियाला पुढे चाल मिळाली असती. या उलट ऑस्ट्रेलियाला बरोबरीही चालणार होती. म्हणजे त्या दोन चेंडूत एकही धाव दक्षिण आफ्रिकेला काढू द्यायची नव्हती.
सामन्याचे प्रमुख आकडे
ऑस्ट्रेलिया

फलंदाज धावा/चेंडू/धावगती
गिलख्रिस्ट २०/३९/५१
मार्क वॉ ०/४/०
पाँटिंग ३७/४८/७७
लेमन १/४/२५
स्टीव वॉ ५६/७६/७४
बेव्हन ६५/१०१/६४
टिम मूडी ०/३०
शेन वॉर्न १८/२४/७५
रायफेल ०/२/०
फ्लेमिंग ०/२//०
मॅग्रा ०/१/० (नाबाद )
इतर १६
एकूण २१३
६८ धावांवर ४ बळी पडल्यानंतर बेव्हन आणि स्टीव वॉने ९० धावांची भागीदारी केली पण १५८ वर स्टीव वॉ आणि पाठोपाठ मूडी बाद झाले. बेव्हनने एकाकी किल्ला लढवला व तो शेवटी दहावा बाद झाला.
गोलंदाजी: शॉन पोलॉकने ३६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले तर अ‍ॅलन डोनाल्डने ४ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिका
फलंदाज धावा/चेंडू/धावगती

कर्स्टन १८/४२/४३
गिब्ब्ज ३०/३६/८३
कलिनन ६/३०/२०
क्रोन्ये ०/२/०
कॅलिस ५३/९२/५८
र्‍होड्स ४३/५५/७८
पोलॉक २०/१४/१४२
क्लुसेनर ३१/१६/१९३ (नाबाद)
बाउचर ५/१०/५०
एल्सवर्थ १/१/१००
डोनाल्ड ०/०/-
इतर ६
एकूण २१३
गोलंदाजी: वॉर्नने चार बळी घेतले, मॅग्रा, फ्लेमिंग आणि रायफेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला तर ३ खेळाडू धावबाद झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची सुरुवात बरी होती. ४८ धावांच्या सुरुवातीनंतर मात्र ६१ धावा होईपर्यंत त्यांचे चार बळी-कर्स्टन, गिब्ब्ज, कलिनन आणि कप्तान क्रोन्ये-पडले होते. त्यानंतर कॅलिस आणि जाँटी र्‍होड्स यांनी डाव सावरला. र्‍होड्स १४५ वर तर कॅलिस १७५ वर बाद झाला. त्यानंतर मात्र एकट्या क्लुसेनरने किल्ला लढवत पोलॉक, बाऊचर यांच्या बरोबर भरभर धावा काढत २१३ पर्यंत धावसंख्या आणली. दोन चेंडूत एक धाव हवी असताना पाचव्या चेंडूवर क्लुसेनरने मारलेल्या फटक्यावर एक अशक्य धाव घेण्याचा कांहींसा अनावश्यक प्रयत्न करताना अ‍ॅलन डोनाल्ड धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत जायचा मार्ग मोकळा केला.
२४ चेंडूत १८ धावा करणारा आणि चार बळी घेणारा शेन वॉर्न सामनावीर निवडला गेला.
अ‍ॅलन डोनाल्ड आजही म्हणतो तो कधी-कधी रात्री दचकून उठतो आणि असा मूर्खपणा आपल्या हातून कसा झाला याबद्दल हळहळ करत रहातो.
ऋणनिर्देश: माझे सहकारी श्री. नाफडे यांचे आकडे आणि इतर माहितीबद्दल आभार

क्रिकेट

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Feb 2011 - 5:14 pm | पैसा

या सामन्यातला थरार!

मला अजूनही डोनाल्ड धावबाद झाल्यावर मिड विकेट आणि मिड ऑन च्या आसपास एकमेकांना विळखा घालून विजय साजरा करणारे वॉर्न, वॉ वगैरे ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि पिचच्या मधोमध भडकलेला क्लुसेनर यांच्या छब्या डोळ्यासमोर आहेत.......
त्यादिवशी चषक जवळ-जवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हातातून निसटलाच होता!

चिंतामणी's picture

20 Feb 2011 - 6:05 pm | चिंतामणी

त्या बरोबरच पुढील वाक्यानेसुद्धा आठवणी जाग्या झाल्या.

बरोबरीत सुटलेला पहिला कसोटी सामना होता रिची बेनो आणि फ्रँक वॉरेल यांच्या संघातला.

त्या काळात बघायला मिळणे ही दुर्मीळ गोष्ट होती. पण कालांतराने आमच्या शाळेतील एका शिक्षकांनी "त्या" कसोटी सामन्याची चित्रफीत आणून शाळेत दाखविली होती. त्याच्यासुध्दा आठवणी जाग्या झाल्या.

सुधीर काळे's picture

20 Feb 2011 - 8:09 pm | सुधीर काळे

शिक्षक असावेत ते असे! नशीबवान आहात!

थोडे विषयांतर होत आहे. पण सांगायलाच पाहीजे म्हणून लिहीतो.

त्यांनी आम्हाला फक्त शिकवीण्याचे काम केले नाही तर, इतर अनेक गोष्टी शिकवील्या. त्यातील मैदानावर खेळाचा आनंद लुटणे, चांगले संगीत ऐकणे, समुहगान इत्यादी गोष्टी या नक्कीच काळाच्या पुढच्या नसतील कदाचीत पण नक्कीच वेगळ्या होत्या.

ह्यातील काही शिक्षकांचा दरारासुद्धा होता. प्रार्थना सुरू झाल्यावर शाळेत प्रवेश केल्यास संपेपर्यन्त दरवाज्यात थांबणे, नंतर छडीचा प्रसाद देउन वर्गात पाठवणे इत्यादी गोष्टीसुध्दा होत्या. (त्या काळी पालकसुध्दा मुलाला का मारले असे विचारायला शाळेत जात नसत. आणि आलेच तर "तो चुकला असेल तर अजून दोन छड्या मारा" असे सांगत.) पण त्याचे वाईट नाही वाटले कधी.

ज्ञानेश...'s picture

20 Feb 2011 - 9:06 pm | ज्ञानेश...

खरोखर अविस्मरणीय सामना होता तो !
मला क्रिकेट थोडेफार कळायला लागले ते ९२ च्या विश्वचषकापासून. (कारण जन्म ८२चा.) आणि आजवर सर्वात जास्त लख्खपणे स्मरणात राहिलेला विश्वचषक आहे श्रीलंकेने जिंकलेला- १९९६चा. त्यात तेंडूलकरने सर्वात जास्त- ५२३ धावा केल्या होत्या. दुसर्‍या क्रमांकावर होता मार्क वॉ, पण त्याने सचिनपेक्षा एक सामना जास्त खेळला होता.

या विश्वचषकातला सर्वात अविस्मरणीय क्षण- भारत वि. पाकिस्तान मॅच. त्यात आमिर सोहेल आणि सईद अन्वरने केलेली घणाणाती सुरूवात- वेंकटेश प्रसादच्या बॉलवर आमिरने एक चौकार मारल्यानंतर त्याला डिवचण्यासाठी बॅटने बाऊंड्रीकडे निर्देश करणे, आणि पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याचा स्टंप उखडणे.. केवळ अविस्मरणीय. हा प्रसंग इतक्या लख्खपणे मनावर कोरला गेला आहे की उद्या मला स्मृतिभ्रंश झाला तरी मला तो एक प्रसंग आठवत राहील.
याच विश्वचषकातल्या आणखीही काही आठवणी आहेत- सेमिफायनलला श्रीलंकेने भारताचा केलेला पराभव ईडन गार्डनच्या जनतेला पचवता न येणे, त्यांची हुल्लडबाजी, विनोद कांबळीचे अश्रू वगैरे.

तशीच २००३ च्या फायनलमधली रिकी पॉंटिंगने झहीर वगैरे मंडळींची केलेली धुलाईही विसरू शकत नाही.
९६ चा दक्षिण अफ्रिकेचा आणि ९९ चा ऑस्ट्रेलियाचा संघ हे माझ्या मते विश्व क्रिकेटमधले सर्वोत्तम संघ होते.

२००७ चा वर्ल्डकप कधी आला कधी गेला मला काहीही आठवत नाही.

यावेळी बघू, काय होते.

ज्ञानेश...'s picture

20 Feb 2011 - 9:08 pm | ज्ञानेश...

वरचा पूर्ण प्रतिसाद गुगल न वापरता लिहिला आहे.

सुधीर काळे's picture

21 Feb 2011 - 10:36 am | सुधीर काळे

सचिनचे विश्वचषक स्पर्धेतील मला माहीत असलेले सर्व विक्रम 'मेरा सचिन महान' या माझ्या आजच 'मिपा'वर पोस्ट केल्या गेलेल्या लेखात आहेत. कांहीं भाग माझ्या आठवणीवरून तर कांहीं माझ्या सहकार्‍याने दिलेल्या आकडेवारीवर आधारलेला आहे. त्याने कदाचित 'गूगल' आणि 'क्रिकइन्फो' या दोन संस्थळांची मदत घेतली असेल. (तसा तो आमचा 'आनंदजी डोसा'च आहे!)