१२७ अवर्स

सेरेपी's picture
सेरेपी in जनातलं, मनातलं
11 Jan 2011 - 4:23 am

एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे.

तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो. नशिबाने शीटा बर्या मिळाल्या होत्या.

पडद्यावर एक प्रचंड कॅन्यन (blue canyon), अफाट पसरलेला. त्यावर एक डोंगरात चालवायची सायकल (mountain bike) घेऊन निघालेला २५-३० मधला एक तरुण, एरन (aaron). सतत स्वतःच्या वाटचालीची कॅमेर्यातून नोंद ठेवणारा आणि मजेदार कॉमेंट्री देत पुढे जाणारा. त्याला दोन तरुण मुली भेटतात, हा त्यांना हव्या त्या 'डोम' मध्ये एका भन्नाट रस्त्याने(?) घेऊन जातो. खालच्या निळ्या-नितळ पाण्यात तिघं पुन्हा पुन्हा सूर मारत राहतात. त्याचही रेकॉर्डिंग. त्या मुली एरनला त्यांच्या घरी विकांताला पार्टीला यायचं आमंत्रण देतात आणि परत जायला निघतात. एरनचं 'एकला चालो' पुढे सुरु.

अतिशय सावधपणे प्रत्येक फांदी-दगडावर जोरजोराने लाथा मारून, खात्री करून मगच त्यावर पाय ठेवत हा एकामागून एक शेकडो फूट खोल घळी पाहत चाललेला. आता पुढे काय म्हणून आपण जरा स्थिरावतो. एरन अजून एका भल्यामोठ्या दगडावर लाथा मारून पाय ठेवत पुढे जायला निघतो.

इतक्यात प्रचंड आवाज करत तो मोठ्ठा पत्थर आणि एरन त्या घळीत शेकडो फूट खाली कोसळतात. धुरळा ओसरल्यावर दिसतं की तो दगड घळीच्या सापटीत फिट्ट जाऊन बसलाय. आणि त्या दगडात आणि घळीच्या भिंतीत सापडलेला एरनचा हात!

पुढचे १२७ तास त्या घळीत काय घडता याचं अंगावर येणारं चित्रण म्हणजे '127 hours'! आणि या अंगावर काटा आणणाऱ्या दृश्य परिणामासोबतच रहमानचे अनुरूप पार्श्वसंगीत. मध्ये वाचलं की त्याला या संगीतासाठी परत ऑस्करचं नामांकन मिळालंय आणि परत तो सगळा अनुभव आठवून गेला.

एरनचा सुरवातीचा आकांत, स्वतःच्या आयुष्यातले प्रसंग आठवुन कधी केलेला पश्चात्ताप, कधी स्वतःवरच हसणं. न जाणो आपल्या मृत्यूनंतर कोणाला आपला शोध लागला तर? अशा विचाराने रेकॉर्ड केलेली व्हिडिओ डायरी. या सगळ्यात आपल्याला कुठेही एरनविषयी 'अरेरे, बिच्चारा' असलं काही वाटंत नाही हे या चित्रपटाचं यश असावं कदाचित. उलट आपणदेखील त्या घळीत हात अडकून, वाचवायला कोणी यायची सूतराम शक्यता नसताना, एक बाट्ली पाणी आणि अगदी थोडं खायला अशा अवस्थेत सापडलोय असं वाटत रहातं.

चित्रपटाची सगळी गोष्ट सांगून मला त्याची मजा घालवायची नाही, पण व्यक्तिश: मला हा चित्रपट Danny Boyle च्या आधीच्या चित्रपटापेक्षा (slumdog पेक्षा) अधिक आवडला. Slumdog तसाही फार भावला नव्हताच, अनेक कारणांसाठी. दोन्हीमध्ये जरी Ayn Rand च्या तत्वज्ञानाचे आणि मानवी प्रयत्नवादाचे अंश असले, तरी हा अनुभव अधिक जवळून प्रतीत होतो. कदाचित सत्यघटनेवर आधारित असल्याने असेल.

असो, माझ्या तोकड्या शैलीमध्ये या चित्रपटाच्या अनुभवाचे वर्णन सार्थपणे करणे जमणार नाही, तेंव्हा ही फक्त लहानशी ओळख आहे. पण इतर कोणी हा चित्रपट पहिला असल्यास आपली मते जाणून घ्यायला जरूर आवडेल. (आणि पाहिला नसल्यास जरूर पहा...फक्त रक्त वगैरे बघून 'कससंच' होत नसेल तर :-) )

चित्रपटमतशिफारसअनुभवप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

रक्त बघून कससं होतं पण तुम्ही ओळख चांगली करून दिल्याने पहावासा वाटतोय.:)
स्लमडॉग मी अजून नाही पाहिला...... म्हणजे पहावासा वाटला नाही.

टारझन's picture

11 Jan 2011 - 10:28 am | टारझन

स्लमडॉग जरुर पहावा. अमिताबच्चन प्रेमींनी तर जरूर पहावा. आहाहा , काय सिन आहे तो ? :) त्या सीन ला थेटरात मागुन कोणी तरी मिसळपाव वरच्या रेसिप्यांवरच्या प्रतिक्रीया देत होता .. 'बादली भर लाळ गळाली, विकांताचा मेनु पक्का झाला , नक्की ट्राय करिन " वगैरे .. पण नंतर इंचाइंचाने तो आवाज कमी होत गेला :)

नंदन's picture

11 Jan 2011 - 5:49 am | नंदन

एकदा पहावा असा नक्कीच आहे. युटाहमधला तो रखरखीत, पण तितकाच सुंदर कॅन्यन्सचा भाग; जेम्स फ्रँकोचा अभिनय आणि तुम्ही उल्लेखलेली शेवटची व्हिडिओ डायरी ही त्याची ठळक वैशिष्ट्यं.

सेरेपी's picture

11 Jan 2011 - 7:35 am | सेरेपी

रेवतीतै आणि नंदन - माझा इथे लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद :-)

सहज's picture

11 Jan 2011 - 7:39 am | सहज

जे लेनो द टुनाईट शोला जेम्स फ्रँको आला असताना एक सीन पाहीला होता. बघीतला पाहीजे.

निनाद's picture

11 Jan 2011 - 11:03 am | निनाद

सेरेपी चित्रपट ओळख मालिकेत स्वागत आहे.
कथा खरच छान दिली आहे. चित्रपट लगेच पाहावासा वाटला.

उलट आपणदेखील त्या घळीत हात अडकून, वाचवायला कोणी यायची सूतराम शक्यता नसताना, एक बाट्ली पाणी आणि अगदी थोडं खायला अशा अवस्थेत सापडलोय असं वाटत रहातं.
हेच चित्रपटाचं यश.

इन्द्र्राज पवार's picture

11 Jan 2011 - 12:00 pm | इन्द्र्राज पवार

सेरेपी यानी या भन्नाट चित्रपटाची थोडक्यात ओळख करून दिली ते फारच छान, कारण एरनची 'ती' १२७ तासाची अडकलेली अवस्था पडद्यावर पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे [त्या अवस्थेतीलही त्याचा खेळकरपणा, स्वतःच्या गाढवपणाचे स्वतःच व्हिडीओ चित्रण करणे, हे खासच]. मी पाहिला आहे हा चित्रपट. आपल्या ए.आर.रेहमान यांचे या चित्रपटाचे संगीत ऐकताना सातत्याने जाणवते की या गुणी कलाकाराने कथेला असलेल्या 'प्रचंड वेगा'ला किती योग्य न्याय दिला आहे. ऑस्करसाठी दावेदार ठरेल अशी ही डॅनी बॉयेलची भेट आहे.....मला खात्री आहे सिनेमा फोटोग्राफीसाठी तर मिळेलच.

[अवांतर : 'सेरेपी' ~ हे जी.ए.कुलकर्णी वाचन प्रेमाचे प्रतीक असलेले नाव आहे का?]

इन्द्रा

सेरेपी's picture

11 Jan 2011 - 9:31 pm | सेरेपी

सर्वांचे धन्यवाद.

सिनेमॅटोग्राफी मला या चित्रपटाची सर्वात महत्त्वाची बाजू वाटली (अर्थात, संगीतदेखील)

[अवांतर : 'सेरेपी' ~ हे जी.ए.कुलकर्णी वाचन प्रेमाचे प्रतीक असलेले नाव आहे का?] --> अर्थात! ;-)

आशिष सुर्वे's picture

11 Jan 2011 - 12:17 pm | आशिष सुर्वे

गेल्या रविवारीच ह्याची शीडी आणली.. चला, ४० रुपै सार्थकी लागतील आता!!

स्वतन्त्र's picture

11 Jan 2011 - 3:17 pm | स्वतन्त्र

व्हरजीनल आली असल,ते बी चाळीस रुपड्यात तर आनतो अमी बी.
लई पहावासा वाटतोया.

उत्तम चित्रपटाची उत्तम ओळख! एकदा नक्कीच पाहावासा! मजा येते बघताना!

यशोधरा's picture

11 Jan 2011 - 3:20 pm | यशोधरा

आवडलं.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jan 2011 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

ट्रेलर पाहिल होते दोनदा, पण काही ना काही कारणाने शिणिमा बघायचा राहिलाच. लगेच टोरेंट शोधतो आता.
धन्यवाद.

पिक्चर डाऊनलोड केलास की मला फ्लॉपी मधे कॉपी करुन दे बरंका रे ... पिक्चर कॉपींग बद्दल गगनबिहारी सारख्या जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा अशी जाहिर प्रतिज्ञा मी येथे करीत आहे.

- जनगन्मनारी

स्पंदना's picture

11 Jan 2011 - 8:21 pm | स्पंदना

खर तर राग आहे या बॉयल्या वर , पण सेरेपी तुम्ही छान परिक्षण केलय. मिळाला तर खरच पाहीन.

स्वाती२'s picture

11 Jan 2011 - 9:19 pm | स्वाती२

छान ओळख!