[नीळकंठेश्वर] - नव वर्ष, नवी जागा

पारा's picture
पारा in जनातलं, मनातलं
3 Jan 2011 - 11:45 pm

आमचा रायगडला जाण्याचा बेत रद्द झाला, आणि मी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी एकटा पडलो. सगळे मित्र कुठे कुठे गेलेले होते. त्यामुळे शनिवार फारच कंटाळवाणा गेला. तेंव्हा मी असा विचार केला की किमान रविवार तरी असा काहीच न करता वाया घालवायला नको. मग मी माझ्या पुण्यातल्या मित्रांना SMS केले की सिंहगडावर जायचं का हे विचारायला, कोणीच मला फारशी उत्साहपूर्ण उत्तर दिली नाहीत. मग मी एकट्यानेच कुठेतरी जायचं ठरवलं. बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करावा, आणि अस्मादिकांची स्वारी एकटीच निघाली, नीळकंठेश्वराला.

नीळकंठेश्वर हे शंकराचे मंदीर पुण्यापासून अवघे ६० किलोमीटर दूर आहे, पानशेत वरून थोडे पुढे गेले की वरसगाव लागते, आणि वरसगावला वळसा घालून अजून पुढे गेलात की आलंच हे मंदीर. तसे तिथे जाण्याचे दोन रस्ते आहेत, एक होडीने वरसगावच्या अगदी जवळ आणि दुसरा गाडीने, ज्याने मी गेलो. हा गाडीचा रस्ता तुम्हाला अगदी पायथ्यापर्यंत नेऊन सोडतो. माझ्या मित्रांनी मला रस्ता खराब असल्याने आधीच सावध केले होते, पण तेवढ्या कारणाने थांबणारयातला मी नव्हतो. पानशेतपर्यंत रस्ता फार सुरेख आहे, म्हणजे गावाचा विचार करता, तुम्ही ६०-७० च्या वेगात बर्याच अंशी जाऊ शकत असाल, तर तो रस्ताच चांगलाच म्हणायचा. पानशेत आणि वरसगाव हे नेहमीच्या वापरातले रस्ते असावेत, कारण त्या नंतर जे दुर्दैवी रस्ते सुरु झाले त्याला हद्द नाही.

वरसगाव वरून पुढे जवळ जवळ १० किलोमीटर नंतर तुम्हाला डावीकडे निलकंठेश्वराचा फाटा दिसतो. त्यानंतर जे चाकाखाली असते त्याला रस्ता म्हणावे का हा प्रश्न पडल्याखेरीज राहवत नाही. तसे तिथे पोहोचेपर्यंत, तुम्ही डांबराला कधीच रामराम ठोकलेला असतो, निव्वळ एका पट्यावर खडी पसरलेली असल्याने त्याला रस्ता म्हणायचे इतकेच, मंदिराच्या फाट्यानंतर तर तेही हळूहळू दिसेनासे होते, उरते ते माळरान, जमिनीतून वाट्टेल तसे डोकावणारे दगड, निसरडी कोरडी माती, आणि हे सगळे कमी की काय, म्हणून चढ. ह्या सर्वांची जरी मला कल्पना होते, तरी अपेक्षेपेक्षा नक्कीच प्रकरण मोठे निघाले. असो. मजल दरमजल करत मी एकदाचा मंदिराच्या पायथ्यापाशी पोहोचलो. आणि गाडी तिथे ठेवून पुढचा प्रवास सुरु केला.

नीळकंठेश्वराला फार पायऱ्या नाहीत, मात्र चढ व्यवस्थित आहे. थोडं अंतर जाताच, मला माझ्या शारीरिक हतबलतेचा अंदाज यायला लागला, आणि नवीन वर्षानुसार व्यायामाचा संकल्प आपणही 'सोडला' पाहिजे अशी जाणीव होऊ लागली. तसाच मी स्वतःला पुढे रेटत होतो. मात्र रस्ता सुंदर असल्याने शारीरिक अपेष्टांवर मानसिक आनंद फुंकर घालत राहिला. तसा रस्ता बराच मोठा आहे. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर, मध्ये दुतर्फा फुलझाडे. निवांत छायाचित्रण करता करता मी देवळापाशी पोहोचलो.

देवळाकडे पाहून जुन्या गावाकडच्या घराची आठवण होते. तसेच लाकडी, दगडी बांधकाम, भव्य सभामंडप, आणि शांत गाभारा. अर्थात मला गाभाऱ्यात जाण्याची अनुमती नव्हती त्यामुळे मी बाहेरून नमस्कार करून जरा वेळ सभामंडपात बसलो. मी गेलो तेंव्हा गर्दी फार नव्हती, थांबलेले सर्वजण गाभारा सर्वांसाठी खुला होण्याची वाट पहात होते. कुठलीही जागा विशेषतः देऊळ आकाराने जितके मोठे तितके चांगले. आवाजाचा आणि गोंधळाचा अजिबात त्रास होत नाही. तसही देवळातील शांतता ही कधीच कुठेच तितक्या सहजी मिळत नाही, त्या नीरवतेत एक अगम्य भावना असते, पूर्ण वातावरण ती भरून टाकते. शांत बसावे, डोळे मिटावे, आपल्या आराध्य देवतेचे ध्यान करा किंवा करू नये, फक्त शांत राहावे, हळू हळू मन:पटलावरचे तरंग शांत होत जातात, काळाचे भान हरपू लागते आणि आपण एका वेगळ्याच जगात जातो. ह्या अनुभवाला प्रत्येक जण आपापल्या नावाने संबोधत असतो, मात्र नाकारत कोणीच नाही. मीही अश्या अवस्थेत किती वेळ होतो कोणास ठाऊक. थोड्या वेळाने मात्र, घरी परतायचे असल्याने, तिथून उठलो आणि बाहेरच्या पटांगणाकडे गेलो. ह्या देवळाचे संस्थापक सर्जेमामा हे स्वतः फार चांगले मूर्तिकार. तेथे त्यांच्या हातून घडलेल्या अनेक मूर्तींचे दर्शन आपणास घडते. नवग्रह, नवनाथ, विष्णूचे अवतार, शंकर, पार्वती, ज्ञानेश्वर, तुकारामादी संत. सर्वांच्या फार सुरेख मूर्त्या तिथे आहेत, आणि त्याही अतिशय सुस्थितीत. त्यांचे बरेचसे फोटो काढून मग मी परतीच्या प्रवासाला लागलो.

त्याच भयंकर रस्त्याने खाली उतरल्यावर मला एक रस्ता लवासाकडे जाताना दिसला. तिथेच एक दोघांकडे चौकशी केल्यावर असं कळलं की लवासा जवळ जवळ २० किलोमीटर दूर आहे, आणि रस्ताही तसा बऱ्या स्थितीत आहे. ठरलं तर मग. मी सरळ गाडी त्या रस्त्यावर घातली आणि लवासाच्या दिशेने कूच करू लागलो. असा आडबाजूचा म्हणल्यावर जितका चांगला असायचा तितकाच तो रस्ता चांगला होता, मात्र एका बाजूला टेमघर धरणाचा तलाव, दुसऱ्या बाजूला उंच उंच पर्वत, ह्यातून वाट काढत जाणारा छोटेखानी रस्ता, हा हा म्हणता लवासा कधी आले कळलेही नाही. लवासाला आल्यावर मात्र माझ्या तिथपर्यंतच्या कष्टांचे चीज झाले. अतिशय सुंदर आणि वळणदार रस्ते, की तुम्ही सहज ७०-८० च्या वेगाने जात राहाल, वळणांवर सुद्धा ! :) मी अगदी आनंदात हसत खेळत लवासा पार केले आणि मग पुढे पिरंगुट वरून घरी पोहोचलो.

हो नाही म्हणता, माझा वर्षातला पहिला रविवार नक्कीच चांगला गेला म्हणायचा. बऱ्याच दिवसांची राहून गेलेली सहल पूर्ण झाली. वेळ मिळेल तेंव्हा तुम्ही पण जरूर जा, आणि कळवा कसं वाटलं ते... :

ता. क. : बाकी बरेच फोटो तुम्ही पिकासा वर पाहू शकता

प्रवासमौजमजाछायाचित्रणशिफारसअनुभव

प्रतिक्रिया

कौशी's picture

4 Jan 2011 - 12:16 am | कौशी

पण मन्दिराचे फोटो ?????

आम्हाला पण दर्शन झाले असते.....

हेच म्हणते??
फोटोत मंदीर कुठे आहे?

अहो, मंदिराचे फोटो पिकासा वर आहेतच, आणि बऱ्याच मूर्त्यांचे देखील. आणि पिकासा चा तो कप्पा सर्वांसाठी खुला आहे.... जरूर पहा.

अतिशय छान सफर .. मला फोन झाला असता तर नक्की आलो असतो ..

असो .. येथे बाकी सर्व साईट ब्लॉक आहेत. क्रुपया येथे सगळे फोटो दिल्यावर छान वाटेल ..
आणि आपले फोटो छान आलेत आणि येथे दिसत ही आहेत्.(मला बाकी कोणाअचे फोटो शक्यतो दिसत नाहित मि.पा वर )

५० फक्त's picture

4 Jan 2011 - 6:39 am | ५० फक्त

छिद्रान्वेषी, छान लिहिलं आहेत. तुमचा कॅमेरा सोनीचा आहे का ?

आमच्या आउसाहेबांना ब-याच दिवसापासुन जायचं आहे इथे, आता पुढच्या महिन्यात जाईन. देवळापर्यंत गाडी जाईल काय आणि नसेल तर किती डोंगर चढावा लागेल याचं जरा मार्गदर्शन करावे.

एक विनंती - या पुढे मला सुद्धा विचारत जा, बहुधा मी रिकामाच असतो. दुरध्वनि खव मध्ये दिला आहे.

एक छोटीशी दुरुस्ती,

वरसगांव ते लवासा जो रस्ता आहे तो वरसगांवच्याच बॅकवॉटरच्या बाजुने जातो, टेमघर लागतं ते लवासातुन खाली उतरताना.

बाकी पिकासा चे फोटो पाहुन पुन्हा प्रतिसादेनच.

हर्षद.

पारा's picture

4 Jan 2011 - 10:59 am | पारा

धन्यवाद हर्षद, प्रतिक्रियेसाठी आणि दुरुस्तीसाठी.
गाडी मंदिरापर्यंत जात नाही. तशी परवानगीही नाही.

वाहनतळापासून मंदिर तसे फार दूर नाही, मात्र चढ अगदी व्यवस्थित आहे, आणि निसरडी माती सुद्धा. माझ्या पिकासा वरील चित्रांमध्ये तुम्हाला ते दिसून येईलच. तुमच्या मातोश्रींना सह्याद्रीची सवय असल्यास जरूर. मी काहील उतरताना बरेच लोक थकलेले मी पहिले.

आणि हो, पुन्हा बाहेर जाण्याचा योग येईल तेंव्हा जरूर फोन करेन ! :)
आपला क्रमांक टिपून घेतला आहेच ! :)

अनिल आपटे's picture

4 Jan 2011 - 12:07 pm | अनिल आपटे

फोटो छान आले आहेत
फोटो बघून आठवणीना उजाळा मिळतो तेव्हां असेच
छान फोटो काढत राहा.
अनिल आपटे

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jan 2011 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त प्रवासवर्णन. तुमच्यामुळे आम्ही पण सहल करुन आलो महादेवाची :)

तुमचा गाडीवर फार जिव दिसतोय हो ;) प्रत्येक फोटुत ती आहेच.