ब्रेक के बाद - एक डोके उठवणारी ब्याद

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
27 Nov 2010 - 8:32 pm

काल मोठ्या उत्साहाने 'ब्रेक के बाद' हा अत्युच्च दर्जाचा सिनेमा बघण्याचा योग जुळून आला. संध्याकाळी साडेसहाचा 'लक्ष्मीनारायण'चा खेळ होता. दिवसभर थकवा आल्याने थोडा हलका-फुलका चित्रपट बघावा म्हणून आम्ही (म्हणजे मी आणि माझ्या बायकोने) 'ब्रेक के बाद' या सिनेमाची निवड केली. चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याने मल्टीप्लेक्सनामक नोटा खाणार्‍या राक्षसाकडे न जाता आम्ही लक्ष्मीनारायणच्या मॅजेस्टी वर्गाचे तिकीट काढून सिनेमा सुरु होण्याची वाट बघत बसलो. कमी गर्दी, पार्किंगचे पाच रुपये, आणि मॅजेस्टीचे ऐंशी रुपयांचे तिकीट असे खर्चाचे योग्य माप निवडल्यामुळे मी खुशीत होतो. ऐश करण्याचा 'फील' यावा म्हणून फारतर मध्यंतरात दोघात मिळून एक पॉपकॉर्न घेऊन टाकू असा व्यवहारी विचार मी केला...अर्थात ते ही वीस रुपयांना होते ही गोष्ट वेगळी.

इम्रान खान ('जो जीता वही सिकंदर' मधला बाल आमिर) आणि दीपिका पदुकोन हे अनुक्रमे नायक आणि नायिकेच्या भूमिकेत होते. आधी इम्रान खानचा 'जाने तू या जाने ना' हा सिनेमा पाहिला होता आणि तो छान करमणूक करणारा वाटला होता. तशीच थोडी चुरचुरीत कथा आणि खुमासदार पटकथा असणारा हा चित्रपट असेल अशी अटकळ बांधून आम्ही आमच्या मॅजेस्टी वर्गाच्या आसनावर स्थिरावलो. नायक आणि नायिका लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि दोघांना सिनेमाचे खूप वेड असते. त्यांच्या सिनेमा बघण्याच्या दृष्यांवरून चित्रपट सुरु होतो. श्रेयनामावली देखील थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. सिनेमा आणि तो ही चित्रपटगृहात बघायचा म्हणजे मी माझी दुनिया, माझे दर्द-ओ-गम विसरून जातो आणि चित्रपटगृहातल्या त्या जादुई अंधारात माझे भान हरपून जाते. बाहेर पडून खायला दोन घास नसतील तरी त्याची चिंता मी दरवाज्याबाहेर ठेवून चित्रपट एंजॉय करू शकतो. असो. नावे संपली. मी एकाग्र चित्ताने पडद्याकडे बघू लागलो. एवढ्या एकाग्रतेने मी कधी अभ्यास देखील केला नव्हता.

नायकाच्या बहीणीचं लग्न असतं. दीपिका आपली कंबर मागच्या बाजूने साधारणतः मॅक्सिमम ५% झाकू शकेल असा ड्रेस घालून उभी असते. समोरच्या बाजूने प्रेक्षक भक्तीभावाने पोट, बेंबी, दंड, गळा वगैरे अवयवांचं दर्शन घेण्यासाठीच आलेले आहेत अशी ठाम समजूत झाल्याने दीपिका या सगळ्या अवयवांचं मनसोक्त दर्शन देत शरीराला असंख्य आचके देत इम्रानशी अगम्य भाषेत बोलत असते आणि खळखळून हसत असते. नायिका सुंदर, तरूण, अवखळ, अल्लड, निरागस (अनुक्रमे खूबसूरत, जवान, अल्हड, मासूम, किसी झरने जैसी हँसती-खेलती वगैरे वगैरे) अशी असल्याने दीपिका दर वाक्यागणिक एका अल्हड झरन्यासारखी सगळे दात दाखवत हसत असते. इम्रान एखाद्या किल्ली दिलेल्या खेळण्यासारखा बडबड करत असतो.... दीपिकाचा अर्थातच लग्न वगैरे गोष्टींवर विश्वास नसतो. ती नव्या युगाची, स्वतःच्या पायावर उभी राहण्याची महत्वाकांक्षा बाळगणारी नायिका असते. त्यामुळे ती नायकाला त्याच्या आडनावाने हाक मारत असते.

'गुलाटी, चलो मेरे साथ...' असे म्हणून ती नायकाला कुत्र्यासारखं फिरवत असते. ती तिच्या आईला देखील नावाने हाक मारत असते. आपल्या आईचा 'आयेशा' असा एकेरी उल्लेख करून तिचा मॉडर्नपणा वारंवार सिद्ध करत असते. बरं नायिकेला नेमकं काय करायचं आहे हे देखील कळत नाही. अशा या नायिकेचे नाव 'आलिया' तर नायकाचे नाव 'अभय' असते. आलियाची थेरं बघता-बघता आपल्याला 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणण्यावाचून गत्यंतर राहत नाही.

आलिया आणि अभय दिवसातले २०-२२ तास सोबत असतात. इकडे-तिकडे भटकणे, मनसोक्त बीअर पिणे, सिगार ओढणे या खेरीज हे दोघे काहीच (?) करत नाहीत. आपली फक्त मैत्री आहे की प्रेम आहे हे यांना कळत नाही. दिवसभर सोबत राहणे, नॉन-स्टॉप बडबड करून प्रेक्षकांना वात आणणे याखेरीज हे दोघे पहिल्या एक तासात काहीच करत नाहीत. मग अचानक आलियाला ऑस्ट्रेलियाच्या कुठल्यातरी मोठ्या विद्यापीठातून मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी प्रेमाचे आणि आग्रहाचे आमंत्रण येते. ही अभ्यास कधी करते, फॉर्म कधी भरते हे आपल्या सारख्या तुच्छ लोकांना कळत नाही. मग आलिया हा गौप्यस्फोट अभय पुरुषांच्या स्वच्छतागृहात असतांना धाडकन दरवाजा उघडून करते. बघा, आहे की नाही मॉडर्न? तिथे यांचे भांडण होते. अभय एक सरळ साधा नायक असतो. पण आलियाला मॅनेजमेंट करायचेच असते कारण तिला तिचे आयुष्य 'घडवायचे' असते. मग तात्पुरता ब्रेकप करून आलिया ऑस्ट्रेलियाला निघून जाते. आलियाचा बाप मेलेला असतो की कुठे दुसरीकडे असतो हे मला कळले नाही कारण मी त्यावेळेस मोबाईलवर गेम खेळत होतो. आलियाची आई शर्मिला टागोर दाखवलेली आहे. प्रतापगडाच्या एखाद्या कातळासारखा कोरा करकरीत चेहरा घेऊन ही आई गाडगी-मडकी रंगवण्याचा काहीतरी उच्चभ्रू व्यवसाय करत असते. असल्या सिनेमात श्रीमंत बायका मडकी, मेणबत्त्या बनवणे, चित्रे काढणे (आठवा 'दिल चाहता हैं' मधली डिंपल), हाय-फाय रेस्तराँ चालवणे (जया बच्चन 'कल हो ना हो') असल्या फालतू व्यवसायात असतात. आपण काहीतरी उच्च दर्जाचे काम करत आहोत असा भाव चेहर्‍यावर घेऊन या रंग उडालेल्या बायका आपला क्लास दाखवत असतात. असो. आलिया एकदम ऑस्ट्रेलियातल्या विमानतळावर दात काढत उतरते. मग 'जिंदगी में कुछ कर दिखाना हैं' छाप भाव घेऊन कमालीच्या आत्मविश्वासाने आलिया तिच्या कुठल्यातरी मावशीकडे येते. मावशीच्या घरी गप-गुमानं राहून कोर्स पूर्ण करावा ना? पण नाही, आलिया म्हणजे एक नमुना असते. जणू आलियाच मावशीकडे राहून मावशीवरच अनंत उपकार करतेय अशा पद्धतीने ती तिथे राहत असते. एके दिवशी आलिया रात्री उशीरा घरी आली म्हणून मावशी रागावते. माझी मावशी असती तर कानफटीत दिली असती आणि मी मुकाट खाल्ली असती; शेवटी गरज माझी असली असती. पण आलिया म्हणजे काय समजलात काय तुम्ही? ती तडक सामान घेऊन फूटपाथवर झोपते. "लडकी खुली तिजोरी की तरह होती हैं..." वगैरे फिल्मी डायलॉग तिला अजिबात आठवत नाहीत. मावशी आपुलकीने मदत करतेय हे तिच्या गावीही नसते. मग आलिया एका शॅकवर राहते. ते ही तिला १-२ मिनिटात मिळून जाते. समुद्रकिनार्‍यावरचे शॅक आणि ते ही ऑस्ट्रेलियातले म्हटल्यावर आलिया चेकाळते.

आलियासोबत तिथे अजून एक भारतीय मुलगी आणि भारतीय मुलगा राहत असतात. शॅक त्या मुलीच्या मालकीचे असते. तिचं नाव असतं...काय असतं बरं.....जाऊ द्या, आपण सुशीला समजू. ही सुशीला (शहाना गोस्वामी) कपड्यांच्या बाबतीत अगदीच कंजूष असते. कमरेपासून फारतर ४-५ इंच खाली येणारी अर्धी चड्डी आणि खांद्यांवरून बेंबीपर्यंत जोमाने जाऊ पाहणारा टॉप अशी वेशभूषा करून ही सुशीला वावरत असते. मग रीतसर खाली वाकणे, व्यायामाच्या नावाखाली आजूबाजूला वाकणे असे उद्योग करून ही सुशीला प्रेक्षकांना गांधीजींच्या कमी कपडे घालण्याच्या तत्वांचे महत्व पटवून देत असते. आलिया मागे थोडीच राहणार. मग अभयला 'अपना प्यार जीतने के लिए' ऑस्ट्रेलियाला यावेच लागते. तो आलियाच्या शॅकलाच येऊन राहतो. मग बीअर ढोसणे आणि एकमेकांच्या मांड्यांवर माना टाकून झोपणे याशिवाय हे चौघे काहीच करत नाहीत. आश्चर्य म्हणजे आलियाला अभयचे येणे अजिबात आवडलेले नसते. ती त्याच्यावर खफा असते पण मांड्यांवर माना टाकणे, तासातून किमान पाच वेळा आपल्या सगळ्या अवयवांना त्याच्या सगळ्या अवयांवर घासणे हे प्रकार सर्रास चालू असतात. मॉडर्न हेट्रेड, दुसरे काय?

मग आलिया कॉलेजमध्ये एका नाटकात भाग घेते. तिथे नेमका ऑस्ट्रेलियाचा एक नामवंत चित्रपट दिग्दर्शक कडमडतो आणि आलियाला दोन मिनिटात नायिकेचा रोल बहाल करून निघून जातो. अब समझा आलिया किस चिडिया का नाम हैं? नाद नाय करायचा, बाद करून टाकीन असा आलियाचा खाक्या असतो ते उगीच नाही. अभय एक छोटे हॉटेल सुरु करतो आणि यशस्वी होतो. दोघांचं भांडण सुरुच असतं. दरम्यान दोघे २-३ वेळा पौड फाट्यावरून नळ स्टॉपला जावे इतक्या सहजतेने इंडियाला जाऊन येतात. त्यांच्या-त्यांच्या आया त्यांना लग्नाचे धडे देतात.

शेवटी आलियाला आपली चूक उमगते आणि ती अभयशी लग्न करते. दी एंड! हुश्श!

कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गाणी अशा सगळ्याच आघाड्यांवर 'ब्रेक के बाद' एक उच्च दर्जाचा सिनेमा आहे यात शंकाच नाही. पहिल्याच प्रसंगात अभय साधारण पाच मिनिटे स्वगत बोलतो. प्रेक्षकांना ते कळत नाही आणि कंटाळवाणे वाटते हा प्रेक्षकांच्या अभिरुचीहीन मानसिकतेचा दोष आहे असे म्हणायला वाव आहे. नंतर अभय आणि आलिया अशक्य बडबड करतात, हसतात आणि बीअर पितात. मध्येच आलिया बीअर पिऊन बेशुध्द होते आणि अभय तिला घरी आणून सोडतो. पलंगावर तिला झोपवल्यावर निघून जातांना त्याचा हात तिने धरून ठेवला आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग त्याचे डोळे भरून येतात. कुणी आपला हात धरला असल्यास असं शेवटी लक्षात येईल? पण सिनेमात ते शेवटी लक्षात येते. मग तो तिथेच झोपतो आणि दुर्दैवाने कधी नव्हे ते आम्हाला सेन्सॉर बोर्ड नामक संस्थेचा संताप येतो.

'ब्रेक के बाद' गुळगुळीत एक्स्प्रेशन्सने ठासून भरलेला सिनेमा आहे. दारू पिऊन पडणार्‍या कुठल्या प्रेयसीकडे माझ्यासारखा प्रियकर "गुणाची हो प्रेयसी माझी, किती निरागस आहे...बिचारीला दु:खांचा डोंगर पेलावा लागतोय..." असे पुटपुटत भरल्या डोळ्यांनी बघेल? पण अभय बघतो. मग दर पाच मिनिटांनी अभय, आलिया, आयेशा असे सगळे एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी बघतात. मग हळूच भरल्या डोळ्यांनी मान हलवण्याचा प्रकार तर डोक्यात जातो.

साला आम्हाला शिक्षणानंतर खायचे वांधे होते; अभय आणि आलियाच्या आयुष्यात एकमेकांसोबत टाईमपास करून देखील आपले प्रेम आहे का हे ठरवण्याचे वांधे! आणि त्यांच्या या फालतूपणाचा त्रास आम्हाला! हा कुठला न्याय?

आयेशा (शर्मिला) सिनेमाभर फोनवर दिसते. अभय आणि आलिया फोनवर सहनशीलतेच्या पलिकडे जाणारी बडबड करतात. शॅकवर अभय आणि तो दुसरा पंटर हे फुल्ल पँट घालून वावरत असतात आणि आलिया आणि सुशीला मात्र जेमतेम काहीतरी घातलं आहे असा सुस्कारा सोडण्याइतपतच काहीतरी घालतात. अभय आणि तो दुसरा पूर्ण शर्ट घालतात आणि आलिया आणि सुशीला एलिजिबिलिटी असून या परीक्षेत चक्क नापास होतात. भर लग्नातून ताडताड चालत आलिया सिगारेटच्या टपरीवरून सिगारेट विकत घेते, वधूच्या खोलीत खुशाल सिगार ओढते, अभयची आई आलियाला प्रेमाने 'चुडैल' म्हणते, कधीच कॉलेजला न जाता (दिवसरात्र बडबड करून आणि बीअर ढोसून) आलियाचे कॉन्वोकेशन झोकात होते, एका क्षणात तिला चित्रपटसृष्टीचे दरवाजे सताड उघडे करून मिळतात आणि ती एक मान्यताप्राप्त अभिनेत्री बनते देखील....'ब्रेक के बाद' असल्या निरर्थक, कंटाळवाण्या, अशक्य कोटीतल्या घटनांनी भरलेला 'बिग बॉस'चा एखादा रटाळ आणि डोके उठवणारा शो वाटतो.

अभिनयात सगळ्यांनीच सुमार कामगिरीचा विडा उचलला होता. अर्थात पटकथा आणि कथाच भंकस असल्यावर कलाकर तरी काय करणार म्हणा? सुमार कामगिरीच्या शर्यतीत पहिला क्रमांक नि:संशयपणे दीपिका पदुकोनने पटकाविला आहे. ओवरअ‍ॅक्टींग म्हणजे काय याचा चालता-बोलता कोर्स म्हणजे दीपिकाचे 'ब्रेक के बाद' मधले काम!! अभिनय कसा करू नये हे धडे मिळवण्यासाठी होतकरू अभिनेत्यांनी हा चित्रपट आणि त्यातही दीपिकाचा अभिनय नक्की पहावा.

दिग्दर्शन इतके घाणेरडे आहे की 'मेला' चे किंवा 'हां मैने भी प्यार किया हैं' चे दिग्दर्शन त्यापुढे उच्चदर्जाचे वाटावे. 'खयालों में बारीश..' वगैरे सारखी रटाळ आणि तोचतोचपणाचा फील देणारी तथाकथित तरल गाणी आहेत. ठणाणा बोंबलणारे गायक आणि कानठळ्या बसवणारे संगीत चित्रपटातला नसलेला प्राण यमराजासारखा हिरावून नेतात....

असा हा 'ब्रेक के बाद' एका वेगळ्या अनुभवासाठी जरूर बघा...

चित्रपटअनुभवसमीक्षा

प्रतिक्रिया

स्पा's picture

27 Nov 2010 - 8:43 pm | स्पा

कडक, खतरनाक, चाबूक, खुस्कुशीत ...(अजून काही शब्द असतील तर ते सुद्धा )

सोलीट परीक्षण........
टांगा पलटी घोडे पसार.................. :)

प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर फुटतोय रे मी.....
काय रे देवा........

सही रे समीर.....
मजा आली जाम हसलो....

sagarparadkar's picture

28 Nov 2010 - 10:11 am | sagarparadkar

एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो, कि तुम्ही कधी आराधना, मंझिल, अमर प्रेम असे सिनेमे पाहिले नाहीत का?

कारण तसे सुंदर सिनेमे बघितल्यानंतर ... आपल्याला 'ब्रेक के बाद' वगैरे सिनेमे पाहण्याचा पेशन्स कसा काय राहतो? तो सुद्धा संपूर्णपणे पाह्ण्याचा?

दीपिकाबद्दल बोलायचं तर मला तरी ती अत्यंत थिल्लर आणि कायम अर्धपोटी, अ‍ॅनोरेक्झिक असल्यासारखीच वाटते. पण लोकांना सारखं सारखं तेच तेच चेहरे दाखवत राहिलं कि कालांतराने लोक पण असल्या सामान्य व्यक्तीला डोक्यावर घेतात. नाही तर हे माध्यम सम्राट असतातच त्यांना प्रसिद्धी मिळवून द्यायला ...

थोडा संयम बाळगला तर असले सिनेमे केबलवर फुकट बघायला मिळतात, त्यासाठी २००-३०० रुपये कशाला घालवायचे.

माझा एक मित्र नेहेमी सांगतो कि असले फालतू सिनेमे फुकट दाखवून वर १००/२०० रुपये वाटले तरी बघू नका ...

यकु's picture

27 Nov 2010 - 9:18 pm | यकु

>>>>आलियाची थेरं बघता-बघता आपल्याला 'आलिया भोगासी असावे सादर' असे म्हणण्यावाचून गत्यंतर राहत नाही.
खी: खी: खी:
=) ) =) ) =) ) =) ) =) ) =) )

>>>आलियाचा बाप मेलेला असतो की कुठे दुसरीकडे असतो हे मला कळले नाही कारण मी त्यावेळेस मोबाईलवर गेम खेळत होतो.
हा:हा: हा:
=) ) =) ) =) ) =) ) =) ) =) )
>>> पलंगावर तिला झोपवल्यावर निघून जातांना त्याचा हात तिने धरून ठेवला आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग त्याचे डोळे भरून येतात.
ऑं? ऑं? ऑं?

रेवती's picture

27 Nov 2010 - 9:31 pm | रेवती

बापरे! मी या सिनेमाच्या वाटेलाही जाणार नाही.
बरे झाले हा धागा सुरु केलात हो समीर भौ!
मागल्यावर्षी भारतात शिनुमा पहायचा योग आला होता पण बाबांनी आधीच तिकिटे काढल्याने मल्टीप्लेक्सच्या तिकिटांचे दर समजले नाहित. ८० रू. प्रतिडोके हे बिनमल्टीप्लेक्सचे आजचे दर असतील तर फारच वाढलेले आहेत म्हणायला हवे.
लेखन अगदी मजेदार झाले आहे. मला दिपिका अज्ज्ज्ज्जिबात आवडत नाही. ती अभिनय कधीच करत नाही. चुकून एकदा तिचा एकमेव सिनेमा पाहण्यात आला त्यातही ती सैफ अली खान बरोबर दिसली व त्यातही ब्रेक अप होतो असलंच काहीतरी होतं. नक्की हेच 'प्यार' आहे कि नाही असाच आशय (?) होता वाटतं.

मदनबाण's picture

27 Nov 2010 - 9:53 pm | मदनबाण

फ़ाडु परिक्षण... :)

विलासराव's picture

27 Nov 2010 - 10:03 pm | विलासराव

>>>>>>>दिग्दर्शन इतके घाणेरडे आहे की 'मेला' चे किंवा 'हां मैने भी प्यार किया हैं' चे दिग्दर्शन त्यापुढे उच्चदर्जाचे वाटावे. 'खयालों में बारीश..' वगैरे सारखी रटाळ आणि तोचतोचपणाचा फील देणारी तथाकथित तरल गाणी आहेत. ठणाणा बोंबलणारे गायक आणि कानठळ्या बसवणारे संगीत चित्रपटातला नसलेला प्राण यमराजासारखा हिरावून नेतात.

धन्यवाद समीरशेठ.

३००-४०० वाचवले तुम्ही आमचे. वरुन डोक्याला कल्हई झाली असती ती वेगळीच.

काय लिहिलाय......... सॉल्लिड. मजा आली.

आत्मशून्य's picture

27 Nov 2010 - 10:42 pm | आत्मशून्य

आहाहा, सून्दर परीक्षण... मन अगदी हेलावून सोड्ले

नावातकायआहे's picture

27 Nov 2010 - 11:06 pm | नावातकायआहे

बघितलाच पायजे (कुणालातरी मुंड्क्यावर टाकुन)

स्टार कास्ट बघूनच तो काही फार चांगला असेल असे वाटत नव्हतेच..
बरं झालं! आता नकोच बघायला.

आमोद शिंदे's picture

27 Nov 2010 - 11:25 pm | आमोद शिंदे

एकतर इतका रटाळ चित्रपट पाहिला त्यात त्यावर इतके डिट्टेल लिहिण्यासाठी इतका वेळ घातलात हे पाहून तुमचे कौतुक वाटते.

मिपावर आजपर्यंत हा प्रांत श्री. परा ह्यांचाच होता.

शिल्पा ब's picture

28 Nov 2010 - 12:37 am | शिल्पा ब

बिचारे इतकी लोकसेवा करताहेत तर बघवत नाही का तुम्हाला? स्वतः तर काही करणार नै...असो,
अजून काही प्रश्न: हि दीपिका पदुकोन कोन? तो कायसासा हिरो तो कोन?
फार काही नै तर ऑस्ट्रेलिया कसं आहे ते बघायला या पिच्चरला जायला हरकत नाही (दुसर्याच्या पैशाने) किंवा एखाद्यावर कशाचा सूड उगवायचा असेल तर त्याला घेउन जावे असा एक फुकट सल्ला

समीरसूर's picture

28 Nov 2010 - 1:43 am | समीरसूर

मधली शाहरुखची नायिका म्हणजे दीपिका. तसे नंतर तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत. 'लव आज कल' आणि 'लफंगे परिंदे' थोडे चालले; बाकी सगळा आनंदीआनंद. 'बचना ए हसीनो' थोडा चालला. अभिनयाच्या बाबतीत ती ठणठणपाळ आहेच... :-)

लोकसेवा? :-) हम्म...कुणीतरी मिपावासीयांचे पैसे वाचवायला हवेत ना? आणि वाचतांना थोडी मजा यायला पाहिजे, चित्रपट बघून जरी नाही तरी त्या चित्रपटाचे परीक्षण वाचून जरी मिपावासीयांची थोडी करमणूक झाली तरी लोकसेवा करण्याचे पुण्य लाभते असे म्हणतात. ;-)

समीरसूर's picture

28 Nov 2010 - 1:37 am | समीरसूर

उडवण्यासाठी परीक्षण लिहिले. :-)

मजा असते असले लिहिण्यात आणि मित्रांसोबत गेल्यास असले चित्रपट मनोरंजन देखील करू शकतात. :-)

--समीर

सूर्यपुत्र's picture

27 Nov 2010 - 11:38 pm | सूर्यपुत्र

इतके सुंदर वर्णन वाचल्यानंतर पिच्चर बघावास्सा वाटतो....

>>एकतर इतका रटाळ चित्रपट पाहिला त्यात त्यावर इतके डिट्टेल लिहिण्यासाठी इतका वेळ घातलात हे पाहून तुमचे कौतुक वाटते.

एकदम सहमत.

मी-सौरभ's picture

27 Nov 2010 - 11:47 pm | मी-सौरभ

लै भारी काम केलस... :)

सद्दाम हुसैन's picture

28 Nov 2010 - 1:57 am | सद्दाम हुसैन

सुंदर चित्रपट .... उद्याची तिकीटे बुक केली आहेत. धन्यवाद.

इंटरनेटस्नेही's picture

28 Nov 2010 - 4:39 am | इंटरनेटस्नेही

आलियाचा बाप मेलेला असतो की कुठे दुसरीकडे असतो हे मला कळले नाही कारण मी त्यावेळेस मोबाईलवर गेम खेळत होतो.

=)) =))

अवांतर: आजच्या जमान्यातली एकमेव आयटम म्हणजे दिपीका.

दोघांचं भांडण सुरुच असतं. दरम्यान दोघे २-३ वेळा पौड फाट्यावरून नळ स्टॉपला जावे इतक्या सहजतेने इंडियाला जाऊन येतात.

चिगो's picture

28 Nov 2010 - 10:28 am | चिगो

फाडलाय... ;-)
>>.....जाऊ द्या, आपण सुशीला समजू.
काय झ्याक नाव निवडलंय राव !?
>>आलियाचा बाप मेलेला असतो की कुठे दुसरीकडे असतो हे मला कळले नाही कारण मी त्यावेळेस मोबाईलवर गेम खेळत होतो.
भोत बढिया..
च्यायला, एक तरी चांगला पिक्चर आहे का हो येवढ्यात आलेला?

समीरसूर's picture

28 Nov 2010 - 1:09 pm | समीरसूर

अनस्टॉपेबल खूप रोमहर्षक आहे. नक्की बघा आणि मोठ्या पडद्यावर बघा.

मला आवडलेले काही अलिकडच्या आणि पलिकडच्या काळातले बघण्यासारखे चित्रपट: आमिर, अ वेनस्डे, जॉनी गद्दार, ९९, पारध (मराठी), रॉकेटसिंग-सेल्समन ऑफ द इयर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, लालबाग परळ (मराठी), दिल विल प्यार व्यार, शिखर, परवाना (अमिताभचा), खोज (ऋषि कपूर, किमी काटकर), पुलिस पब्लिक (राजकुमार), ऐतबार (डॅनी, राज बब्बर, सुरेश ओबेरॉय, डिंपल), इन्साफ का तराजु (राज बब्बर, झीनत अमान), किरायेदार, हमारी बहु अलका, खूबसूरत (रेखाचा), दो अंजाने इत्यादी इत्यादी.....

ही यादी फार जास्त न चाललेल्या चित्रपटांची आहे. बाकी ३ इडियट्स, लगे रहो मुन्नाभाई, मुन्नाभाई एमबीबीएस, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता हैं, बाजीगर, डर, सरफरोश, हमराज, दीवानगी, शोले, मुघल-ए-आझम, हाफ टिकट, महल, वह कौन थी, डॉन, सत्ते पे सत्ता, शराबी , वक्त, दो रास्ते, दो बिघा जमीन, कारवाँ, गोलमाल (जुना), चुपके चुपके, छोटी सी बात, चष्मेबद्दूर, कथा, अशी ही बनवाबनवी, सिंहासन, सामना, मुंबईचा फौजदार, अमरप्रेम, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, अरे संसार संसार, आप की कसम, पाठलाग, पिंजरा, मुक्कामपोस्ट ढेबेवाडी, साजन (माधुरीचा), गोंधळात गोंधळ, तेजाब आवडत्या इत्यादी हिट चित्रपटांची यादी आहेच.

थोडे संथ परंतु इंटरेस्टिंग चित्रपट आवडत असतील तर सिर्फ तुम, तुम बिन, मेरा पहला पहला प्यार, हीरोज, हल्ला हे चित्रपट बघण्यास हरकत नाही.

प्युअर मनोरंजक मसाला चित्रपट आवडत असतील तर दबंग सारखे चित्रपट देखील चांगले मनोरंजन देऊ शकतात. मला बदमाष कंपनी हा चित्रपट देखील तसा बरा वाटला.

माझा ऑल टाईम फेव चित्रपट अर्जुन कालच पाहिला. विषयाची हाताळणी, दणकट पटकथा आणि चित्रपटाला शोभेसा सनी देवलचा अभिनय यामुळे हा चित्रपट कधीच कंटाळवाणा वाटत नाही. असो.

अरे वा !!
माझेही काही आवडते चित्रपट या तुमच्या यादीत आहेत. बरे वाटले.

उदाहरणार्थ...
अ वेनस्डे, जॉनी गद्दार, रॉकेटसिंग-सेल्समन ऑफ द इयर, खोज (ऋषि कपूर, किमी काटकर), पुलिस पब्लिक (राजकुमार), ऐतबार (डॅनी, राज बब्बर, सुरेश ओबेरॉय, डिंपल).
लगे रहो मुन्नाभाई, मुन्नाभाई एमबीबीएस, बाजीगर, डर, सरफरोश, हमराज, दीवानगी, डॉन, दो बिघा जमीन, कारवाँ, गोलमाल (जुना), चुपके चुपके, छोटी सी बात, चष्मेबद्दूर, अशी ही बनवाबनवी, पाठलाग, पिंजरा, गोंधळात गोंधळ, तेजाब.

अजून बरेच आहेत. त्याबद्द्ल वेळ मिळाला की.

हा हा हा

आजच पहावा म्हणतो हा पिच्चर ! तेवढीच करमणुक !!

जबरी परिक्षण !!!
बेफाम केलंय.

अजून परिक्षणं येऊद्या समीरसूर.

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2010 - 5:16 pm | अप्पा जोगळेकर

फाडू परीक्षण. पैसे वाचले.

अविनाशकुलकर्णी's picture

28 Nov 2010 - 5:36 pm | अविनाशकुलकर्णी

अफलातुन परिक्षण..ह.ह.पु.वा झाली वाचता वाचता....
अशी खुमासदार दार परीक्षणे जर लिहिणार असेल तर मि.पा तर्फे एक निधी उभारु त्या पैशातून बक्कळ सिनेमे पहा..व लिहित रहा..........

मस्तानी's picture

29 Nov 2010 - 10:07 pm | मस्तानी

असले चित्रपट पाहण्यापेक्षा त्यांची इतकी छान खेचलेली वाचायलाच जास्त आवडेल ...

स्वाती दिनेश's picture

28 Nov 2010 - 8:01 pm | स्वाती दिनेश

लै भारी परिक्षण,
मजा आली वाचताना.
स्वाती

मस्त कलंदर's picture

28 Nov 2010 - 11:04 pm | मस्त कलंदर

भारीच लिहिलेय परीक्षण.. तसंही दिपिका, ऐश्वर्या, कतरिना इत्यादींचा अभिनय म्हणजे बोलायलाच नको. आता काही लोक त्यांच्या दिसण्याकडेच लक्ष देत असतील, पण आम्हाला तर त्याच्याशीही काही देणं घेणं नाही. ;-)
तुम्ही इथे दिपिकाच्या कपड्यांबद्दल लिहिलंत. मलाही बर्‍याचदा एकदम बर्फाळ प्रदेशात तो हिरो मस्त स्वेटर्स्/पुलओव्हर्स न् काय काय घालून असतो आणि त्या हिरॉइनला समुद्रकिनारी उन्हात असल्यासारखं बॅकलेस आणि मिनिस्कर्टात का राहायचं असतं हे काही कळत नाही. मध्ये मध्ये प्रियांका चोप्राबाईंचे कपडे पाहून त्या टॉप घातल्यानंतर जीन्स घालायला विसरत आहेत का असंच वाटत होतं..

>>>>दोघे २-३ वेळा पौड फाट्यावरून नळ स्टॉपला जावे इतक्या सहजतेने इंडियाला जाऊन येतात

नेमकं हेच मला रिफ्युजीमध्ये अभिषेक बच्चनच्या भारत-पाक चकरांबद्दल वाटत होतं. फरक इतकाच की मी पुण्याची नसल्याने 'गावातून दत्ताच्या माळावर' जाऊन आल्यासारखं असं म्हणत होते!!!!

sneharani's picture

29 Nov 2010 - 10:19 am | sneharani

मस्त परिक्षण...मजा आली वाचायला!

धमाल मुलगा's picture

29 Nov 2010 - 2:02 pm | धमाल मुलगा

धर की आपट...धर की आपट!
दयामाया नावाची भानगडच नाही. :D

कुंदन's picture

29 Nov 2010 - 3:40 pm | कुंदन

आधी आवलिया वाचले.

Pearl's picture

1 Dec 2010 - 3:19 pm | Pearl

सहीच. मस्त परीक्षण. आता ही मुव्ही नक्की बघणार नाही :)

मेघवेडा's picture

1 Dec 2010 - 3:34 pm | मेघवेडा

काय तेज्यायला धुतलाय.. जोर्दार!

=)) =))

मजा आली. जरा याच इमरानखाँसाहेबांच्या "आय हेट लव्ह स्टोरीज" वगैरे वर लिहा राव! नाय्तर तो अक्षय कुमार नि ऐश्वर्याचा "याक्शन रिप्ले"..

पैसा's picture

1 Dec 2010 - 7:56 pm | पैसा

आताचा हसण्याचा अटॅक जाऊ दे मग आणखी वाचणं शक्य होईल!