वजनदार ! - २

मोहन's picture
मोहन in जनातलं, मनातलं
27 Sep 2010 - 12:50 pm

वजनदार ! - १

बी.पी. नॉरमल वर येवूनही डॉ. ने वजन कमी करायचा सल्ला दिला..... आता पुढे.

त्या दिवशी ऑफीसमधून घरी येवून हुश्श करतो तर समोर पुस्तक पडलेले पाहिले. " Don't Loose....." वगैरे वगैरे. " बर का, ह्या लेखीकेने खूप सगळ्या नट्यांचा साईझ झीरो करून दिलाय. तुला १५० रूपयातले पुस्तक नक्कीच परवडेल"
" अग पण मी झीरो झालो तर तुम्हाला दिसणार कसा ?" मी पी जे मारून बघितला. वाया गेला.
" आज पासून तू ऑफीसात तीन डबे ने . प्रत्येक दोन तासाने खायला पाहिजे. उद्यापासून सकाळी चहाने सुरुवात नाही. त्या ऐवजी अ‍ॅपल किंवा दुसरे कुठले फळ खा " फटाफट फर्माने सुटत होती.
" अग पण सकाळी आवरणार कसे ?" माझ्या पोटात उद्द्याचा गोळा आजच आला. " आणि मला ऑफीसात काम करायचे पैसे मिळ्तात. माझे ऑफीस खायचे वाले ऑफीस नाही."
"काही फरक पडत नाही. हवे तर गरम पाणी पी " आमची झाशीची राणी सपासप वार करत होती. " आणि हो पहिले ते पुस्तक वाचायला घे. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील "
" हाय ! बाबा, मी आत्ताच तुमच्या करता तळवलकर जीमची मेंम्बरशीप घेउन आलो." इती आमचे चिरंजीव. " उद्द्यापासून आता सकाळी ५.३० वा. जीम मधे जा." हा पहिल्या पासूनच माझ्या मुळावर उठला आहे.
"बाबा, आदेश वरून आला होता. तुम्हाला हवे तर दयेचा अर्ज करून पाहा." माझ्या मनातले विचार ओळखून चिरंजीव करवादले.

माझी दिनचर्या आता पुर्णपणे बदलून गेली होती. आमच्या सोसायटीतली मंडळी जेंव्हा सकाळी फिरायला जात त्यावेळेला मी जीम करून परत येतांना दिसू लागलो. पहिले सोसायटी मंडळींच्या चेहेर्या वर ' तेरड्याचा रंग तिन दिवस'चे भाव होते. नंतर त्याची जागा अविश्वासानी घेतली. महिला वर्ग मात्र माझ्याकडे समाधानाने पाहू लागला होता. थोड्याच दिवसात जीमचे चार्जेस वगैरेची माझ्या कडे चौकशी होऊ लागली. आमच्या ह्यांना पण सांगायला हवे. ८-८ वाजे पर्यंत पसरलेले असतात.
जीम मधे इतक्या सकाळी चित्र विचीत्र कपडे घालून आबाल वृध्दांची गर्दी पाहून डोळ्यांचे पारणे फिटत असे. जोर जोरात लावलेल्या 'ढींग च्यांग ' संगीताने कानाचे ही पारणे फिटत होते. सकाळ सकाळ भजने, भूपाळ्या वगैरेची सवय असलेल्या माझ्या कानांना या म्युझीक मुळे छान व्यायाम होवू लागला. शरीराच्या व्यायामाची फारशी वेळ्च येत नसे. स्टार्ट विथ वार्म अप आणि एंड विथ स्ट्रेच याच्या मधे काही व्यायाम करावा तर प्रत्येक मशीन वर क्यू. त्यात आणिक स्पेशल वाल्यांचे ट्रेनर्स 'फुकट्यांनो बाजूला व्हा' टाईप लूक देत विठोबा स्टाईल मधे बाजूलाच उभे . बर फ्लोअर एक्सरसाइझ करावे, तर असेल त्या रिकाम्या जागांवर आडवे तिडवे देह आपले वेगवेगळे अवयव वर खाली करत पडलेले. ह्या सगळ्यामुळे एक मात्र झाले. फारसा घाम गाळावा लागत नसल्याने मला जीमची गोडी लागली.फक्त सकाळी उठायचाच काय तो प्रॉब्लेम होता. पण घरात आणि बाहेर माझी इमेज भराभर सुधारू लागली. प्रत्येकाला माझे वजन कमी होत असल्याचा साक्षातकार व्हायला लागला. मलाही तसेच वाटू लागले. पण जीमच्या वजनाच्या काट्यावर मात्र काही फरक दिसत नव्हता. काट्या काट्यात फरक असतो अशी भाबडी समजुत मी करुन घेतली.
एका महिन्या नंतर माझी 'मोमेंट ऑफ ट्रूथ' आलीच. आमची वरात परत विकासच्या दवाखान्यात. खुर्चीत बसायला सांगायच्या एवजी मला त्याने सरळ काट्यावरच उभे केले. " अबे तुम कर क्या रहे हो यार ! ८५ कि. !! महीन्यात एक किलो वजन वाढवून आला!!! महाभागा तुला वजन कमी करायला सांगितल होत."
" मी फार पूर्वी पासून सांगत आलो आहे की व्यायाम केला की माझे वजन वाढते. पण माझ कोणी ऐकतच नाही " आता मला चान्स मिळाला होता.
शेजारच्या खुर्चीतून एक जळ्जळीत कटाक्ष माझ्या आरपार गेला.
क्रमशः

कथाजीवनमानमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Sep 2010 - 1:12 pm | ब्रिटिश टिंग्या

:)

असे वाचले आहे की स्नायुंचे (मसल्स) वजन चरबी (फॅट) पेक्षा जास्त असल्यामुळे व्यायाम केल्यावर जरी माणुस बारीक दिसला तरी वजन फार कमी होत नाही. मला वाटले की जीम मध्ये जाऊन तुम्ही भरपुर मसल्स कमावलेले दिसता :)

माझा वजनाचा काटा म्हणतो 'मराठी पाउल पडते पुढे' :)

>" मी फार पूर्वी पासून सांगत आलो आहे की व्यायाम केला की माझे वजन वाढते. पण माझ कोणी ऐकतच नाही " आता >मला चान्स मिळाला होता.
>शेजारच्या खुर्चीतून एक जळ्जळीत कटाक्ष माझ्या आरपार गेला.

ह. ह. पु. वा.

नगरीनिरंजन's picture

27 Sep 2010 - 1:24 pm | नगरीनिरंजन

>> असेल त्या रिकाम्या जागांवर आडवे तिडवे देह आपले वेगवेगळे अवयव वर खाली करत पडलेले
:)

पाषाणभेद's picture

27 Sep 2010 - 1:29 pm | पाषाणभेद

छान सुरूवात झाली.

नावातकायआहे's picture

27 Sep 2010 - 2:11 pm | नावातकायआहे

>>माझ्या पोटात उद्द्याचा गोळा आजच आला
:-)

गांधीवादी's picture

27 Sep 2010 - 6:47 pm | गांधीवादी

'पोटात गोळा येणे' हा वाक्यप्रचार आमच्या इथे 'स्त्री गरोदर राहिली' ह्या साठी होतो.

नितिन थत्ते's picture

27 Sep 2010 - 2:19 pm | नितिन थत्ते

मस्त.

हे हे हे!
मग पुढे काय झालं?

विनोद जबरदस्त .. टाइमिंग पण झकास.

लिखान शैली जबरदस्त आणि मोकळी ढाकळी ..

लिहित रहा .. वाचत आहे...

निवेदिता-ताई's picture

27 Sep 2010 - 6:21 pm | निवेदिता-ताई

हे हे हे मस्त.....पुढे काय ..जीम चालू आहे का, बंद केली....

चिंतामणी's picture

27 Sep 2010 - 6:44 pm | चिंतामणी

=))

वाचत आहे...

लिहित रहा ..

लौकर लौकर लिहा.

अनिल हटेला's picture

27 Sep 2010 - 6:51 pm | अनिल हटेला

लेखन शैली झक्कास !!

=))

पू भा प्र..........

पैसा's picture

27 Sep 2010 - 7:41 pm | पैसा

hehe

कवितानागेश's picture

27 Sep 2010 - 7:48 pm | कवितानागेश

व्यायाम केला की माझे वजन वाढते.
अगदी माझ्या मनातले वाक्य बोललात! ;)

पुष्करिणी's picture

27 Sep 2010 - 7:53 pm | पुष्करिणी

छानच शैली आहे.

जिम लावून आणि दुपारी ३ डबे खाउन फक्त एकच किलो वाढलं? डाएटिंगची सुरूवात कधी...:)

दोन्ही भाग वाचले, नवर्‍यांची कसरत हा आमचा आवडता विषय आहे, अन तो ही साक्षात एका नवर्‍याच्या मुखातुन्...सॉरी सॉरी..कि बोर्डातुन्..अलभ्य लाभ!
इंटरेस्टिंग. पुढे काय?

Pain's picture

28 Sep 2010 - 7:47 am | Pain

हेहेहे..मस्त आहे

गांधीवादी's picture

28 Sep 2010 - 8:27 am | गांधीवादी

आमचे शरीर म्हणजे हाडांवर डायरेक्ट कातड. मध्ये मांस वगेरे काही नाही.
गेली १५ वर्षे, काहीही खा काहीही प्या, वजन न वाढते, न कमी होते. १४ kg underweight आहे.

अरे हा, विसरलोच
लेख चांगला आहे.

रक्त आटवत असता सतत मांस येणार कसे हो गांघीवादी

चिगो's picture

29 Sep 2010 - 11:30 am | चिगो

छान, वजनदार हलकं-फुलकं लिहीताय.. :-)