सुहाना सफर और ये मौसम हसी ............ हे गीत शैलेंद्रने उटी - कुन्नूर प्रवासात लिहिले असावे अशी मला दाट शंका आहे. का कोण जाणे पण कुन्नूर मध्ये हे गाणे सारखे गुणगुणावेसे वाटते.
ऊटीमध्ये २ दिवस फिरल्यावर कुन्नूरला जायचे ठरले. बराच उहापोह केल्यावर जाताना टॉय ट्रेनने जावे आणि येताना कारने यावे हा सर्वमान्य तोडगा निघाला.
हीच ती युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणुन घोषित केलेली उटी ते कुन्नूर धावणारी आगगाडी.
ही फुलराणी निलगिरीच्या रांगा चढताना समुद्रसपाटीपासुन ७७०० फूटांचे अंतर पण लीलया चढते आणि निलगिरीतल्या डोंगररांगांचे चढउतार पार करताना अशी काही दिलखेचक दृष्ये आपल्यासमोर सादर करते की त्याला केवळ नजरेच्या कॅमेर्यामधुन टिपुन केवळ मेंदुच्या मेमरी मध्येच साठवावे लागते. कुठलेही यंत्र ही दृष्ये परिणामकारकरीत्या टीपण्यास असमर्थ आहे. १९०८ साली गोर्या साहेबाने सुरु केलेल्या या फुलराणीला चालवण्यासाठी तामिळनाडु सरकारला दरवर्षी ४ कोटीचा तोटा होतो म्हणे. पण निलगिरीच्या डोंगररांगांतील अवर्णनीय निसर्गापुढे हा खर्च देखील फारसा काहीच नाही असे वाटत राहते. ट्रेनमधुन काढलेली ही काही छायाचित्रे. पण असे आवर्जुन नमूद करावे लागेल की कुठलाही कॅमेरा या प्रवासाला योग्य न्याय नाही देउ शकत. हा प्रवास डोळ्यातच साठवावा:
या प्रवासात काही क्षण असे येतात की तुम्हाला अक्षरशः विमानात बसल्यासारखे वाटते. दोन्ही बाजुला खोल खोल जाणारी दरी आणि जणु काही आकाशातुन जाणारी आगगाडी. हे क्षण आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पिऊन काढले. छायाचित्रे घ्यायचे देखील भान कोणाला उरले नाही. खालील छायाचित्र काढले तोपर्यंत तो सर्वोच्च उंचीचा पट्टा निघुन गेला होता:
टॉय ट्रेनची ही सफर साधारण तासाभरात संपते. त्यानंतर सुरु होते ती निसर्गाच्या सान्निध्यातील एक प्रदुषणमुक्त आठवण. ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या घडलेले कुन्नूरचे हे पहिले दर्शनः
कुन्नूर हे अश्या काही निवडक पर्यटनस्थळांपैकी काही आहे की जिथे जाउन आल्यावर कोणी विचारले की काय काय पाहिले की तुम्ही आपसुक सांगाल की निसर्ग सोडुन काहीच नाही. इतर कुठल्याही पर्यटनस्थळासारखे इथेही "दाखवायला" काही पॉईंट्स तयार केले गेले आहेत. परंतु ते बघितले नाहीत तरी तसा फारसा काही फरक पडत नाही. निसर्गसौंदर्य तिथे ठायीठायी भरलेले आहे. त्यासाठी वेगळ्या पोईंट्सची गरजच नाही आहे मुळात.
ट्रेनमधुन उतरल्या उतरल्या धुक्याने वेढलेल्या कून्नूरचे जे दर्शन घडले होते तेच रूप मनात भरुन राहिले आहे. कुन्नूर हे धुक्याने वेढलेले आहे असे म्हणण्यापेक्षा ते धुक्याने ग्रासलेले आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल इतके धुके आहे तिथे. हे काही पुरावे:
धुके, थंडी (परत गुलाबी - उटीसारखीच. किंबहुना थोडीशी जास्तच), नजर जाइल तिथे हिरव्या पाचुने नटलेल्या दर्या आणि चहाच्या बागा म्हणजे कुन्नूर. किंबहुना कुन्नूर म्हणजे एक मोठी चहाची बागच आहे असे म्हणता येइल. इथल्या गाईड्सना का कोण जाणे पण इथे मुमताजच्या (शहाजहानची नाही. अपराध मधली मुमताज किंवा गोरे रंग पे ना इतना गुमान कर फेम रोटीमधली) चहाच्या बागा आहेत याचे कोण मोठे अप्रुप आहे. कुन्नूरच्या चहाच्या बागांचे हे काही फोटो:
" alt=""
आम्ही कुन्नूरच्या एकुण वातावरणानेच इतके भारावुन गेलो होतो की विशेष काही वेगळे पोइंट्स बघण्यात आम्हाला फारसा रस नव्हता. उगाच इकडेतिकडे भटकण्यात आणि निसर्गाचा पुर्ण आस्वाद घेण्यात आम्हाला जास्त मजा वाटत होती. त्यात वर आमच्या ड्रायवर कम गाईडला आम्ही जेव्हा जेव्हा कुन्नूरला काय बघण्यासारखे आहे हे विचारले तेव्हा त्याने न चुकता आम्हाला "सुसाइड पॉईंट" असे उत्तर दिले होते. हे ऐकुन आम्ही एवढे वैतागलो होतो की शोले मधला "लेकीन ये अंग्रेज लोक सुसाट क्यो करते है" हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे यावर माझा पुर्ण विश्वास बसला होता. शेवटी या सुसाईड पायी या मरगठ्यांनी आपला जीव घेउ नये असा सुज्ञ विचार करुन आमच्या ड्रायवरने आम्हाला डॉल्फिन नोज आणि लॅम्ब रॉक अशी विचित्र नावे असलेल्या आणि अपेक्षेप्रमाणे जिथुन डोल्फिन नोज किंवा मेढा असे काहीच दिसत नाही अश्या पॉइंटसवर नेले. आम्हीदेखील कुठलेच पोइंट्स न बघता परत आलो असे कोणाला सांगुन त्यांच्या कुत्सित नजरांना सामोरे जायला लागु नये म्हणुन निमुटपणे त्याच्या मागोमाग गेलो. इथुन जे नजारे दिसले ते इतर कुठल्याही हिल स्टेशनवर दिसतील असेच होते. पण तरीही नेटाने आम्ही काही छायाचित्रे काढलीच. फरक काय तो इतकाच की इथे कुठेही नजर टाकली तरीही चहाच्या बागा हमखास दिसतात
मी आधीच म्हटल्याप्रमाणे शैलेंद्रने सुहाना सफर इथेच लिहिले असणार. बघा "ये आसमा झुक रहा है जमीं पे" याचा प्रत्यय देखील इथे वारंवार येतो:
अश्या या अतिरम्य गावात असेच एक सुंदरसे टुमदार घर बांधुन कायमचे वास्तव्य करावे असे राहुन राहुन सारखे वाटते आहे.
कुन्नूर खुणावते आहे. पण इलाज नाही. पापी पेट का सवाल है. इथेच काम करावे लागणार. त्यामुळे आता थांबतो.
इति मैसूर - उटी - कुन्नूर पुराण संपुर्णम.
प्रतिक्रिया
28 Aug 2010 - 3:36 pm | अमोल केळकर
मस्त वर्णन
झुकझुकगाडी आवडली :)
अमोल
28 Aug 2010 - 3:40 pm | विलासराव
फोटो छानच आहेत.
टॉय ट्रेनचा माथेरानला केलेला प्रवास आठवला.
28 Aug 2010 - 3:46 pm | प्रचेतस
फारच छान--फोटो आणि वर्णनही.
28 Aug 2010 - 5:22 pm | बाबा योगीराज
सुन्दर.....
एकदा तरी भेट द्यावी अशी जागा आहे.............!!!
28 Aug 2010 - 5:23 pm | मेघवेडा
परिपूर्ण! सुंदर फोटोज आणि वर्णनदेखील!
30 Aug 2010 - 11:32 am | विसोबा खेचर
काय बोलू?!
30 Aug 2010 - 12:20 pm | चिंतामणी
दोन्ही फारच छान.
पण " या फुलराणीला चालवण्यासाठी तामीळनाडु सरकारला दरवर्षी ४ कोटी तोटा" हे प्रकरण नाही समजले.
(रेल्वे केंद्रीय सरकारच्या अखत्यारीत आहे असे मला वाटते)
30 Aug 2010 - 12:49 pm | मृत्युन्जय
तुमचा प्रश्न बरोबर आहे. सहप्रवाश्याने दिलेली माहिती आहे ही. आम्हाला काही हा प्रश्न पडला नाही. ४ कोटी हा आकडा कदाचित जास्त महत्वाचा वाटला होता त्यावेळेस.
30 Aug 2010 - 1:58 pm | समंजस
अप्रतिम!!! आणखी काही शब्द नाहीत.
30 Aug 2010 - 6:41 pm | अरुंधती
सुंदर फोटोज..... वर्णनही आवडले! एकदा भेट द्यायलाच हवी.
30 Aug 2010 - 6:55 pm | रेवती
कोणत्या फोटोचं कौतुक करू? असं वाटतय.
तरी वरून चौथा फोटो आवडला.
ट्रिप भारी झाली तुमची!
धुक्याने ग्रासलेले कुन्नुर फार आवडले.
30 Aug 2010 - 7:39 pm | परिकथेतील राजकुमार
ज ह ब र्या !!
30 Aug 2010 - 8:26 pm | निखिल देशपांडे
सुरेख फोटो
30 Aug 2010 - 10:31 pm | मस्त कलंदर
या ठिकाणापर्यंत गेले.. पण तिथे जायचा योग नेमका आला नव्हता. :(
तीनेक वर्षांपूर्वी कॉलेजच्या सहलीसोबत उटी-म्हैसूरला गेले होते. एका सकाळी कुन्नूरला निघालो खरे, पण वाटेतच एका मुलीला हीव भरले म्हणून मग तिला घेऊन मला परत उटीला डॉक्टरकडे+ हॉटेलात परत यावे लागले.. आज कळतेय केवढ्या मोठ्या आनंदाला मुकले मी ते.
अवांतरः त्या मुलीला हीव भरण्याचे कारण आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होते, त्यांचे गैरव्यवस्थापन होते. म्हणजे, डिसेंबराच्या थंडीतही गरम पाणी न मिळणे, फ्लश न चालणे, बेसीन तुटके-फुटके असणे, हीटर्स्/पांघरूणांची कमतरता आणि असेच काही. आम्ही साधारण दीडेकशे लोक गेलो होतो आणि हे हॉटेल आमच्या टूर ऑपरेटरने बुक केले होते. आणि आधीच पैसे भरले असल्याने काहीच करू नाही शकलो. नंतर त्या ऑपरेटरचे पैसे मात्र आम्ही त्यापायी कापले. पण एकंदर प्रकरणात तीन चार मुली आजारी पडल्या. आणि त्यांचे हे आजारपण पुढे म्हैसूरलाही पुरले. दोन बसेस आणि एक सुमो होती. त्या सुमोची पार अॅम्ब्युलंस झाली होती, आणि परत आल्यावर सगळे मला नाईटिंगेल म्हणून चिडवत होते. अर्थात हा तीन वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. आता परिस्थिती बदलली असण्याची शक्यता आहे. तरी जाताना जर तुम्ही निलगिरी हेरिटेज ला जात असाल तर एकदा नीट चौकशी करा आणि मगच जा.
31 Aug 2010 - 2:08 am | सुनील
फोटो झक्कास! वर्णन अजून चालले असते!
मला वाटते, उटी-कुन्नूर गाडी जशी हेरिटेज म्हणून गणली गेली आहे, तशीच दार्जिलिंगची गाडीसुद्धा आहे (मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू ह्या गाण्यात दिसणारी). पण आपली नेरळ्-माथेरान आहे किंवा नाही, हे ठाऊक नाही.
सुहाना सफर और ये मौसम हसी ............ हे गीत शैलेंद्रने उटी - कुन्नूर प्रवासात लिहिले असावे अशी मला दाट शंका आहे
शंका रास्त!
पण तुम्हाला "श्रावणात घन निळा बरसला" हे गाणे पाडगावकरांना कुठे सुचले ते ठाऊक आहे? ऐन मे महिन्यातील मुंबईतील लोकल प्रवासात!
31 Aug 2010 - 11:02 am | मृत्युन्जय
पण तुम्हाला "श्रावणात घन निळा बरसला" हे गाणे पाडगावकरांना कुठे सुचले ते ठाऊक आहे? ऐन मे महिन्यातील मुंबईतील लोकल प्रवासात
श्रावणात बरसणारा निळा घन आणि मुंबईच्या लोकलमध्ये अनुभवता येणारा ऐन मे महिन्यातील घामाचा वर्षाव यात बरेच साम्य आहे तसेही. ;)
बाकी माथेरानची फुलराणी माझ्या मते वर्ल्ड हेरिटेज साइट नाही आहे.
31 Aug 2010 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रवास आणि त्याचं वर्णन आवडलं. केरळमधल्या चहाच्या बागाही अशाच दिसतात, फक्त तिथे ही फुलराणी गाडी नाहीये.