रानवाटा शोधतांना
रानवाटा शोधतांना हरवले माझे मन ||धृ||
हरवले मीच मला, गेलो तुला सापडून
सोनसकाळी एकेदिनी | एकांती रानीवनी
नजरेच्या टापूमधे | अथांग निळे पाणी
डोळा हलकेच दिसे | मुर्ती साजरी छान ||१||
गंध शोधीत जाता | रुप समोर येई
वाटेतून चालतांना | शब्द सलज्ज होई
अलगद थरथर | ओठी आली दिसून ||२||
चालतांना दशदिशा | मला न उरले भान
आभाळाने धरतीस | दिले भरून दान
सावलीत उन्हाच्या | तळपती जिव दोन ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०८/२०१०
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 11:00 pm | रश्मि दाते
छान आहे
7 Aug 2010 - 11:17 pm | अर्धवट
आवडली
7 Aug 2010 - 11:37 pm | आनंदयात्री
मस्त रे पाषाणभेदा. आवडली.
8 Aug 2010 - 6:39 am | सहज
हे तर टिपीकल मसाला तमीळ सिनेमातील शोभेलसे चित्रण. आधी बेफिकिर, बेदरकार हिरो, कुठल्याश्या एका बहुदा हाणामारीच्या प्रसंगातुन हिरोईन अय्य्यो करुन हिरोच्या प्रेमात, तो काही केल्या लक्ष देत नसतो, ती मात्र ड्रीम सिक्वेन्स वर ड्रीम सिक्वेन्स परदेशात गाणी गाउन घेते. शेवटी मग एकदाचा हिरो हो म्हणतो. की तो शेवटचा एक लाँग शॉट - सावलीत उन्हाच्या | तळपती जिव दोन
8 Aug 2010 - 8:23 am | पाषाणभेद
अय्यो हे क्काय? तुमी तर सहज बोलून आमच्या चंद्रकांतला प्पार रजनिकांत क्येलं बघा. :-)
8 Aug 2010 - 5:16 pm | पॅपिलॉन
कवितेचा छंद आगळा आहे पण बाकी नाविन्य काहीही नाही.
आभाळाने धरतीस | दिले भरून दान
हे तर अगदी, महानोरांच्या ह्या नभाने ह्या भूईला दान द्यावे याचे रूपांतर वाटले.
8 Aug 2010 - 7:46 pm | पाषाणभेद
कवितांमध्ये प्रयोग करून करून प्रेम, निसर्ग, ज्वलंत समस्या, भावूकता आदींबाबत दोन कविंचे एकमत होवू शकते. अगदी एकाच विषयावर सारख्याच अर्थाची कविता येवू शकते किंवा अगदी विपरीतही होवू शकते. एवढेच नव्हे तर एकाच कविच्या दोन कवितांमध्ये काही कल्पना, ओळी किंवा शब्दरचना एकाच अर्थाची येवू शकते. अर्थात तो माझा अभासाचा विषय नाही.
माझ्या दोनएक कवितांमध्ये मी उसाला पाणी (बारं) देण्याबाबत तसेच विहीरीला पाणी आल्याबाबत उल्लेख आलेला आहे. सदरहू घटना निसर्गात एकाच प्रकारे होत असल्याने कुणाही लेखक कविला ती सारखीच भासू शकते. फक्त शब्दरचना काही ठिकाणी कमीजास्त होवू शकते. याचा अर्थ त्या कविंनी एकदुसर्याची कॉपी केली आहे असे होवू शकत नाही.
तुम्हास ती ओळ माहीत असल्याने ती ओळ जुळते असे वाटणे शक्य आहे. मी महानोरांची तुम्ही उल्लेखलेली कविता वाचलेली नाही अन ती ओळ कुठल्या कवितेतील आहे हे मला माहीत नाही.
आभाळाचे भुईस दिलेले दान हि कल्पना अर्थातच आधी लिहीलेल्या काव्यावरून आलेली नाही.
माझी कविता स्वतंत्र आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
9 Aug 2010 - 8:20 am | निरन्जन वहालेकर
छान कविता ! ! !
तुमच्या " कवितांमध्ये प्रयोग......." सहमत ! !