काळ्या डागांनी गालबोटलेल्या सूर्याने फुंकलेले वारे
भन्नाट भिरभिरतात पृथ्वीच्या चुंबकीय भोवर्यात
मग उभं राहातं ध्रुवप्रदेशात अरोरा बोरिआलिसचं अद्भुत प्रकाशशिल्प,
न्हाऊ घालत घनतिमिर थंडगार प्रदीर्घ रात्रीला
दिसतात कधी सप्तरंगाचे तुषार उडणार्या थेंबांतून निघताना
घुसमटलेल्या प्रतिभेच्या अनावर उन्मेषाप्रमाणे
आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं
प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून
कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी
चार साच्यांची विविधता व अर्धज्ञानी बोटांच्या ठशांची समृद्धता मिरवत
तोच कंटाळवाणा चंद्र जातो ठरल्याप्रमाणे लिंबोणीच्या झाडाआड,
आणि छचोर तोता मैनेच्या पिंजर्यावर सावलीचं जाळं पडतं
लाजेचं काजळ थोबाडावर पसरून मग सूर्यच काळाठिक्कर पडतो
आणि युगायुगांची रात्र निर्लज्जपणे फैलावत राहाते.
प्रतिक्रिया
30 Jun 2010 - 6:19 pm | II विकास II
वेळ काढुन वाचतो.,
30 Jun 2010 - 6:27 pm | आंबोळी
जलिंदर बाबांचा अनुग्रह हळूहळू जाणवायला लागलाय....
आंबोळी
30 Jun 2010 - 6:30 pm | शुचि
विरोधाभास रेखाटलाय कवितेत असं वाटतं.
सुंदर कविता.
ही शिल्पं, भांडी म्हणजे लहान मुलं असं रूपक घेऊन पाहीलं आणि वाईट वाटलं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
30 Jun 2010 - 6:42 pm | सहज
वाचतोय पुन्हा. पिकत तिथे विकत नाही. तेच ते फ्रॅक्टल्स तेच ते डिस्टर्बिंग लाइट्स.. डेंजर सुर्य स्किन का दुश्मन.
हा हा हा सुर्य व उत्तर ध्रुवाचे काय ते ओजस्वी, समशितोष्ण कटीबंधाचे ते भकास काय?
तूर्तास अरोरा बोरिलिसचं - अरोरा बोरिआलिस ना? च्यायला मरायच्या आधी बघायचे आहेत याची देही याची डोळा तिथे जाउन नॉर्दन लाईट्स :-)
30 Jun 2010 - 6:52 pm | राजेश घासकडवी
दुरुस्ती केलेली आहे...
30 Jun 2010 - 6:47 pm | प्रियाली
सूर्यानेच कुंभारवाड्यात प्रकाशत राहायचे ठरवले असेल तर लाजावे का बरें?
बाकी चालू द्या.
30 Jun 2010 - 6:55 pm | बिपिन कार्यकर्ते
जल्लां कायच नाय कल्ला... :(
बाकी रात्र निर्लज्जच बरी. नेहमीच लाजेकाजेस्तव समाजाला भिऊन जगण्यात मजा नाय राव...
बिपिन कार्यकर्ते
30 Jun 2010 - 7:51 pm | विसोबा खेचर
जबराच कविता..!
विलक्षण प्रभावित करणारी!
30 Jun 2010 - 7:52 pm | यशोधरा
संदर्भाविना वाचली असती तर नक्की आवडली असती, पण संदर्भ कदाचित ठाऊक आहे आणि जो ठाऊक आहे तो बरोबर आहे हे माहित असल्याने, कविता चांगली असली तरी दुर्लक्ष करावेसे वाटले... :(
>> कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी >> माती अससी, मातीत मिळसी वगैरे. माती इतकीही टाकाऊ नसावी.
कोकणाविषयी लिहिले होतेत, तसे लेख लिहिण्यासाठी शुभेच्छा. :)
30 Jun 2010 - 8:12 pm | घाटावरचे भट
ऐसेच बोल्ता...
30 Jun 2010 - 10:42 pm | चित्तरंजन भट
आवडली. कविता लिहीत राहा. चांगले लिहिता. खात्रीचे वाचक म्हणून आम्ही आहोत. मनापासून शुभेच्छा.
30 Jun 2010 - 11:02 pm | Nile
हेच म्हणतो.
-Nile
30 Jun 2010 - 11:09 pm | जयंत कुलकर्णी
\\आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं
प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून\\
फारच छान कल्पना ! फ्रॅक्टल्सचे अनंत वृक्ष आणि त्याच्या येणार्या परागात अनेक त्याच प्रतिमा. खरंच आपले भविष्य आपल्या भुतकाळावर किती अवलंबून असतं !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
1 Jul 2010 - 2:08 am | शिल्पा ब
कविता फारशी काही कळली नाही...पण छान आहे.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
1 Jul 2010 - 6:09 am | क्रेमर
प्रचंड क्षुल्लकत्वाचा अतिप्रचंड अहंकार प्रचंड प्राचंड्यासमोर चमकतो अंधार पसरवत.
मजा आली.
1 Jul 2010 - 8:07 am | sur_nair
जरा डोक्याला जड आहे पण चांगला विरोधाभास मांडला आहे.
1 Jul 2010 - 8:18 am | चित्रा
संदर्भ कळले नाहीत कारण गेले काही दिवस वावर नाहीच म्हणायला हवे, पण कविता म्हणून आवडली.
1 Jul 2010 - 8:32 am | क्रेमर
या कवितेला संदर्भांच्या (मला तरी कवितेला संदर्भ असतात हे नवीनच आहे) संकुचितपणातूनच पहायला हवे का? (वरही कोणीतरी संदर्भ असा शब्द वापरला आहे म्हणून हे लिहावेसे वाटले.)
1 Jul 2010 - 8:51 am | चित्रा
संकुचितपणा नाही, म्हणूनच म्हटले आहे की कविता आवडली.
1 Jul 2010 - 10:05 am | यशोधरा
नको, तसे पहायला नकोच, पण गेले काही दिवस इथे खुर्ची टाकून पॉपकॉर्न खात बसल्याने ते लगेच लक्षात आले एवढेच! :)
- कोणीतरी.
1 Jul 2010 - 2:42 pm | जागु
कुंभारवाडा वाचुन उघडल. कारण मी कुंभारवाड्यात राहते. पण तिथे एकही कुंभार नाही.
कविता छान.
1 Jul 2010 - 3:20 pm | भडकमकर मास्तर
काहीतरी सापडल्यासारखं वाटतं आणि परत निसटतं...
मग पुन्हा वाचावं लागतं आणि मग सापडलेलंसुद्धा निसटतं आणि निदान आधी गवसलेलं तरी शोधायला पुन्हा वाचावं लागतं आणि मग आधी कळालेलं सगळंच चुकीचं होतं असं कळून डोकं गरगरायला लागतं...
( हे असं मिपावर काही महिन्यांपूर्वी काही कविता वाचून वाचकांना होत असे) ;)