पालट

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
25 Jun 2010 - 3:33 pm

पावसाची रिपरिप सुरूच होती. हे असं एकसारख रिपरिपणं मग हळुहळू तुमच्या गाभ्या पर्यंत उतरत जातं. सकाळ तशी झालीच नव्हती. वेळेनुसार डोळे उघडले, तर बाहेर हे रिपरिपणं ! सूर्याला सुद्धा कंटाळा आला असावा. दर्शन देण्याचीसुद्धा तसदी न घेता त्यानंही "दिवस सुरू" असं घोषित करून परत कूस बदलली असावी.

पाऊस असो वा नसो; डोळे उघडायची तुमची इच्छा असो वा नसो, घड्याळ कधी कुणासाठी थांबलय? मग घड्याळ्याकडे पाहत पाहत, सगळ्यांच्या आंघोळी, दोघांची दुधं, आमचा चहा. हाताला चक्र बांधल्यागत झर झर कामं हातावेगळी केली. तिघांचे टिफिन, मुलांचे ब्रेकफास्ट सारं पॅक करून अगदी धाकट्याला स्कूल मध्ये सोडून सुद्धा आले.

आई झालं की स्वत:च असं काही उरतच नाही. घरातल्या सर्वांच्या वेळा सांभाळणं, त्यांच सर्व व्यवस्थित करणं, या पुढे स्वत:चा मूड वगैरे अगदी नगण्य!

स्कूल मधून मागे फिरताना मात्र मग ही रिपरिप परत जाणवायला लागली.

दिवस मोकळा नव्हताच. साडे अकरा पर्यंत client ला गाठायची होती. दोन customer ची पेमेंट अजून ही अकौंट मध्ये का दाखवली जात नाही आहेत ते जाऊन बँकेत विचारून यायचं होतं. पण आता मनात कुठ तरी खोलवर ही रिपरिप पोहोचली होती.
वयोवृद्ध जसे पावसाळ्यात जुनी हाडं कुरकुरू लागतात म्हणून सांगतात; तस मनाचंही असावं. पाऊस आपल्या मूडवर, निदान माझ्यातरी, खूप परिणाम करतो. वळीवाच्या सरीनं मला शांत, सुगंधित वाटतं. जोरदार सरीनं सारं मळभ सरल्यासारखं वाटतं. रिमझिम उन्हापावसाचा खेळ खोडकरपणा जागवतो.

पण ना जोराचा, ना थांबलेला; असा नुसता ढगाळ एक सारखा रिपरिपणारा हा पाऊस मात्र हृदयातलं ठसठसणं जाणवून देत राहतो. कुठं तरी खोलवर गाडून ठेवलेल्या, न भरणाऱ्या जखमा प्रत्येक श्वासाबरोबर ठसठसत, ठणकत राहतात.
खूपदा ,आपल्या काडीमात्रही चुकी शिवाय आपण दुस-यांच्या बरोबर फरफटत जातो. कधी कितीही स्वत्व राखावं म्हटलं तरी आपला बाजार मांडला जातो. कधी एखादा निरागस शब्दसुद्धा उलटून आपले खरके काढून जातो. नशिबाच्या बस मध्ये आपण कुठलं तिकीट काढून बसवले गेलोय, हे जर आधी कळलं तर निम्मे लोक प्रवासच नाही करणार. हा असला पाऊस मला माझं पोरकंपण अगदी ठसठशीत जाणवून देतो. लादल्या गेलेल्या जखमा ताज्या करून जातो. कुठंतरी खोल वाळूखाली शहामृगासारखं डोकं खुपसून पडून रहावं ही एकच भावना वारंवार उफाळत राहते.

दिवसा कडून फारशी अपेक्षा नव्हतीच. client ओके ओके. बँकेत मला सपोर्ट करणारी लीजा गायब! कसंबसं सारं पूर्ण करेतो साडेतीन होत आलेले. म्हणजे पिलं घरी पोहोचे पर्यंत मी नाही पोहोचू शकणार. धावत पळत स्टेशन गाठलं पण डोळ्यासमोर ट्रेनची दारं बंद झाली. आणि सहा मिनिटं उशीर, पुढं बस..म्हणजे चार सव्वाचारची खात्री. धडधड करत घरी पोहोचले. पिलं कधीची पोहोचली होती, भुकेले चेहरे घेऊन दोघंही टीव्हीसमोर बसून होती.

मन फारसं थाऱ्यावर नव्हतं..पण म्हणून मुलं भुकेली ठेवणं.....शक्यच नाही.

थोडं गरम गरम पोटात पडलं, आणि दोघांच्याही टकळ्या सुरु झाल्या. शाळेतले, बाहेरचे सारे वृतांत सविस्तर बातम्यांप्रमाणे कानावर आदळू लागले. मी हताश! पण मोठ्या लोकांनी काय करावं, यापेक्षा काय करू नये हे मी जास्त शिकलेय. त्यामुळे स्वत:चं वैफल्य मी मुलांवर नाही लादत. असू दे, आपण ऐकलं; नाही ऐकलं याची त्यांना फारशी फिकीर नसते. बस आई दिसली की सारं सांगायचं ! आई च्या कुशीत निवांत राहायचं!

आज स्विमिंग! नेमकं कोचनं दुस-या पूल वर बोलावलेलं!
दोघांना तयार करून बस गाठली. निदान अर्धा तास शांतता.
"Oh! I am about to cry!" मनाच्या खोल कुठतरी शब्द उमटले.
"'Aai why do we cry?" हे माझं धाकटं ! पठ्ठ्याला जन्मून सहा वर्ष झाली, पण नाळ नाही तुटली अजून! माझ्या मनातला उमटलेला उद्गार जर यानं तसाच्या तसा नाही उच्चारला तर नवल! काय सांगू?
Why do we cry? Why do you cry darling? मी उलट विचारलं.
"I cry when I am sad. when I am hurt."
"Exactly dear! You cry when you are hurt." मी तोकडा प्रयत्न केला.
"It's bad, right? This crying thingy!" निरागस डोळे
"No dear, you cry when you are hurt, so that way you understand how other person is feeling when he is crying....at least you will be aware he is hurt or sad. It awakens empathy...makes you human." बरचसं पटलं असावं.
" I will never make you cry", त्यान डिक्लेअर केलं.
मग आईला मोठ्ठी बेअर हग द्यायची ठरवून तो माझ्या अंगावर चढला. पोटातल गरम अन्न,शाळेतला थकवा आणि आईला मारलेली मिठी! मला बेअर हग द्यायला निघालेल्या या स्वारीचे स्वत:च टेडी बेअर होऊन गेल. खांद्यावर डोकं ठेवून तो झोपून गेला. त्या जड पुतळ्याला तसाच ठेवून मी पुढची पंधरा मिनिटं शांत बसून राहिले. बसस्टॉपवर धडपडत उतरल्यावर मग हा जागा झाला.

पूल वर पोहोचलो. कोचकडे दोघांना देऊन मी ही पाण्यात उतरले. काठावर बसून रिपरिपत राहण्या ऐवजी, पाण्यात उतरून सार धुवून काढायचा एक केविलवाणा प्रयत्न! बुडी मारली अन झप झप स्ट्रोक मारत निम्म्यावर गेले. ..अन, बघता बघता पाणी सोनेरी झालं! साऱ्या अंगावर, सोनेरी लहरींनी खेळ मांडला!
वर आले, पाहिलं तर मावळतीच्या दिनकरानं शेवटी विजय मिळवला होता. पश्चिमेकडे ढगांना फट पाडून दिवसभराची सारी उब तो मनापासून सांडत होता.
काठ गाठला अन कठड्याला टेकून उभी राहिले. वर अजूनही काळे मेघ गच्च फळी धरून होते. पण त्या फळीला सुद्धा काळेपणावर जागो जागी सुवर्ण वर्ख चढला होता. पश्चिमेकडे एका विशाल दाट वृक्षाला तर दिवाळीच्या आकाशकंदिलाचं रूप लाभलं होतं. मिळेल तिथून सोनेरी किरण झाडाला जागोजागी खिंडार पाडून आरपार गेले होते. जवळपासच्या आणखी दोन चार विरळ वृक्षांनाही एव्हढा जरी शोभिवंत नसला तरी साज चढला होताच.

दिवसभर मिटल्या पंखांनी भुकेली असलेली पाखरंही भरारू लागली.

परत सूर मारला अन त्या सुवर्णरसात स्वत:ला झोकून दिलं. पाण्याच्या खाली तळावर सोनेरी लहरी अगदी ताल धरून होत्या.मनात परत एकदा खोल वर एक अस्पष्टशी एकतारी वाजली. निदान आत्ता तरी एखादा सूर अर्धवट नको स्मरायला. बाजूला अगदी जवळ हालचाल जाणवली. फिरून बघायची सुद्धा गरज नाही वाटली. हलकेच कमरेभवती वेढा पडला.

दोघंही वर आलो. "अरे फोन वर तर डाऊन वाटलीस? म्हणून आलो तुला गाठायला..तर इथ तू सोनसळी होऊन बसलीयस?"

बस काय हवंय आणखी? माझं झिरपणं त्याला कळावं...तेवढ्या साठी त्यानं इथवर यावं...

त्यानं परत पाण्यात खेचलं. खरंतर मला हे असं श्वास गुदमरवत पाण्याच्या तळाशी जायला नाही आवडत. पण आज तळ गाठला आणि उलटी फिरले. वरून सोनेरी रस सांडत होता...हेलकावे खात तळाशी माझ्यापर्यंत पोहोचत होता.. परत तेच एकतारी... पण आता अगदी स्पष्ट!!

टंग टंग ..अन लागोपाठ त्या दैवी स्वरातली आर्त हाक...हरी पाहिला गे...हरी पाहिला गे...अजी सोनियाचा दिनु..वर्षे अमृताचा घनु...अजी सोनियाचा दिनु !!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

sagarparadkar's picture

25 Jun 2010 - 3:53 pm | sagarparadkar

>> नशिबाच्या बस मध्ये आपण कुठलं तिकीट काढून बसवले गेलोय, हे जर आधी कळलं तर निम्मे लोक प्रवासच नाही करणार. <<

एकदम पटलं ...

मस्त कलंदर's picture

25 Jun 2010 - 4:58 pm | मस्त कलंदर

छान मुक्तक.. आवडलं!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

जे.पी.मॉर्गन's picture

25 Jun 2010 - 5:05 pm | जे.पी.मॉर्गन

खूपच छान लेख.... खूप आवडला

जे पी

satish kulkarni's picture

25 Jun 2010 - 5:25 pm | satish kulkarni

छान लेख... :)

टुकुल's picture

25 Jun 2010 - 5:28 pm | टुकुल

खुपच सुंदर मुक्तक...

--टुकुल

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरदस्त आहे ब्वॉ... खूप छान... उपमा वगैरे भरपूर आहेत पण कुठेही अंगावर आले नाही, दवणीय झाले नाही... मस्त.

बिपिन कार्यकर्ते

Pain's picture

26 Jun 2010 - 12:07 am | Pain

दवणीय म्हणजे काय ?

कवितानागेश's picture

26 Jun 2010 - 12:44 am | कवितानागेश

म्हणजे 'प्रवीण दवणे' यांच्यासारखे का?

============
माउ

Dhananjay Borgaonkar's picture

25 Jun 2010 - 6:03 pm | Dhananjay Borgaonkar

केवळ अप्रतिम :)
निशःब्द

शैलेन्द्र's picture

25 Jun 2010 - 6:05 pm | शैलेन्द्र

खुपच छान अनुभव... अगदी आपला आपला वाटावा असा... फारचं सुंदर

प्रभो's picture

25 Jun 2010 - 6:45 pm | प्रभो

खुप मस्त!!!!!

अरुंधती's picture

25 Jun 2010 - 6:53 pm | अरुंधती

सुंदर मुक्तक..... आवडलं! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

रेवती's picture

25 Jun 2010 - 7:13 pm | रेवती

छान लिहिलेस गं अपर्णा!
अजून प्रतिसाद लिहायचे मनात होते.....सध्या मुलांच्या सुट्ट्यां मुळे आयाच बिझी झाल्या आहेत.

रेवती

भाग्यश्री कुलकर्णी's picture

25 Jun 2010 - 7:14 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच .

शुचि's picture

25 Jun 2010 - 7:20 pm | शुचि

अपर्णा किती हळूवार, कोमल भावना व्यक्त करतेस ग सहजपणे : )

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

रामदास's picture

25 Jun 2010 - 7:55 pm | रामदास

दिवसभर मिटल्या पंखांनी भुकेली असलेली पाखरंही भरारू लागली. हे फारच आवडलं .

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2010 - 8:07 pm | llपुण्याचे पेशवेll

छान.
वैफल्य वाईट असतं. हल्ली मी का जगतो आहे हाच प्रश्न मला सतावत असतो. :(
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

रेवती's picture

25 Jun 2010 - 11:36 pm | रेवती

आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
आणि काल केलेलं विडंबन नव्हतं असं म्हणायचय का तुम्हाला पुपे? आठवा कालची 'ळ' वाली विडंबने!
रेवती

स्पंदना's picture

25 Jun 2010 - 8:50 pm | स्पंदना

आभारी आहे मंडळी. खुप दिग्गज्जांचे पाय लागले आज या लेखाला.
तुमच्या शब्दांनी उमेद दिली.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

चन्द्रशेखर सातव's picture

25 Jun 2010 - 8:58 pm | चन्द्रशेखर सातव

पण ना जोराचा, ना थांबलेला; असा नुसता ढगाळ एक सारखा रिपरिपणारा हा पाऊस मात्र हृदयातलं ठसठसणं जाणवून देत राहतो. कुठं तरी खोलवर गाडून ठेवलेल्या, न भरणाऱ्या जखमा प्रत्येक श्वासाबरोबर ठसठसत, ठणकत राहतात.

अपर्णा ताई,यातील शब्द ना शब्द खरा.अशीच न कळणारी हुरहूर लागून राहते.जवळच्या लोकांच्या अशा वेळी फार आठवण येते

शिल्पा ब's picture

25 Jun 2010 - 9:53 pm | शिल्पा ब

खुप छान लेखन...आवडलं...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मोरपिसासारखं अगदी अलगद हळूवार आलेत मनातले विचार आणि त्याला समर्पक वातावरणसुद्धा.. खास आवडलं!
उपास मार आणि उपासमार

मी ऋचा's picture

26 Jun 2010 - 12:03 pm | मी ऋचा

दोन तीनदा वाचलं!! खूपच छान...

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

अरुण मनोहर's picture

26 Jun 2010 - 12:59 pm | अरुण मनोहर

>>>नशिबाच्या बस मध्ये आपण कुठलं तिकीट काढून बसवले गेलोय, हे जर आधी कळलं तर निम्मे लोक प्रवासच नाही करणार<<<

राजेश घासकडवी's picture

27 Jun 2010 - 10:47 pm | राजेश घासकडवी

..अन, बघता बघता पाणी सोनेरी झालं!

'सांज अहाहा तो उघडे' ची आठवण झाली.
कधी कधी एखद्या जादूच्या क्षणी मळभ दूर होतं आणि सगळं सुवर्णमय होतं. तो क्षण शब्दचित्रात सुरेख पकडला आहे.

रानी १३'s picture

28 Jun 2010 - 10:54 am | रानी १३

खुप सही लेखन...खुप आवडलं...

अमोल केळकर's picture

28 Jun 2010 - 10:56 am | अमोल केळकर

सुंदर लेख

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 10:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर!

निखिल देशपांडे's picture

28 Jun 2010 - 5:50 pm | निखिल देशपांडे

छान लेख....

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

संदीप चित्रे's picture

28 Jun 2010 - 9:37 pm | संदीप चित्रे

बिका म्हणाला त्याप्रमाणे 'दवणीय' न केल्याने जास्तच भावलं.
दिवसभरातल्या प्रसंगांचे तुकडे अलगदपणे मांडत जावं आणि बघता बघता त्याचं एक सुरेख कोलाज व्हावं असं वाटलं हा लेख वाचून.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्रियाली's picture

29 Jun 2010 - 1:07 am | प्रियाली

मुक्तक आवडलं. मनाला भिडलं.

विसोबा खेचर's picture

30 Jun 2010 - 4:50 pm | विसोबा खेचर

अगदी सहमत..!

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2010 - 4:58 pm | स्वाती दिनेश

छान मुक्तक!
आवडले,
स्वाती

मीनल's picture

30 Jun 2010 - 5:08 pm | मीनल

लेखनता सहजता आहे. ती भावली.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/