आनंदी 'आनंद' गडे!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
7 Jun 2010 - 8:59 am

७ मे ला टोपालोवने १० वा डाव बरोबरीत सोडवला आणि ५-५ अशी गुणांची बरोबरी झाली. पुढचे दोन डाव बघायला मिळणार नव्हते कारण मी प्रवासात असणार होतो. चुटपुट लागून राहिली की काय होणार ते लगोलग समजू शकणार नव्हते.
अकरावा डाव जिंकण्याची निकराची धडपड आनंद करणार असा कयास होता कारण आनंदसाठी पांढरी मोहोरी असणारा तो शेवटचा डाव होता. झालेही तसेच आनंदने कराराने खेळ केला परंतु एकदोन छोट्या चुकांमुळे टोपालोवने डावाचा समतोल साधला आणि आनंदला पुन्हा बरोबरीच पत्करावी लागली, आता गुणसंख्या होती ५.५ प्रत्येकी! शेवटच्या डावात आनंदकडे काळी मोहोरी होती आता तो धोका पत्करणे शक्य नाही असाच सार्‍यांचा कयास होता, सामना ब्लिट्झ स्पर्धेकडे हमखास जाण्याची लक्षणे दिसत होती. पण तसे झाले नाही आनंदने काळ्या मोहोर्‍यांनी खेळूनही डाव जिंकला आणि चौथ्यांदा विश्वविजेतेपदाचा मुकुट धारण करण्याची असामान्य कामगिरी केली!
----------------------------------------------------------
बारावा डाव इथे प्रत्येक खेळी करुन खेळून बघता येईल.
----------------------------------------------------------

आता शेवटच्या सामन्याआधीच्या दोघांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊयात. शेवटचा डाव बरोबरीत सोडवायला आनंदची तशी हरकत असायचे कारण नव्हते कारण जलदगती बुद्धीबळात त्याचे वर्चस्व हे वादातीत आहे. त्यामुळे पुढे जलदगती स्पर्धेत सामन्याने प्रवेश करणे त्याच्या एकप्रकारे पथ्यावरच पडले असते. उलट हा डाव जिंकून जगज्जेतेपदाचा मुकुट डोक्यावर चढवायला टोपालोव आतुर झाला होता. सहाजिकच त्याच्यावर दबाव जास्त होता.

शेवटल्या काट्यावरल्या डावात तरी टोपालोव कुठले निराळे ओपनिंग करेल असे वाटत होते पण पुन्हा एकदा सुरुवात वजिराचे प्यादे दोन घरे टाकूनच झाली. (एकप्रकारे हा मानसिक युद्ध जिंकण्याचा प्रयत्न मलातरी वाटला नाही. 'एलेमेंट ऑफ सरप्राईज' मुळे प्रतिस्पर्ध्याच्या मनात तुम्ही काही क्षण जरी खळबळ माजवलीत तरी तुम्हाला मानसिक स्तरावर त्याचा फायदा मिळू शकतो ती संधी टोपाने गमावली असे मला वाटते.)
१ - डी४ - डी५ आनंदनेही वजिराचे प्यादे सरकवले
२ -सी४ - ई६ पांढर्‍याने वजिराच्या बाजूचे देऊ केलेले प्यादे नाकारुन खेळणे म्हणून 'क्वीन्स गँबिट डिक्लाईन्ड' असे ह्या ओपनिंगला म्हणतात.
३ - एन एफ ३ - एन एफ ६
४ - एनसी३ - बीई७ अशाप्रकारे मोहोर्‍यांची प्रगती साधणे सुरु होते
५ - बीजी५ पांढरा उंट घोड्यावर चाल करुन गेला. इथे सर्वसामान्यपणे काळा आधी कॅसलिंग करुन घेतो आणि मग उंटाकडे बघतो
एच ६ - आनंदने हत्तीचे प्यादे उंटावर घातले. आक्रमक खेळी करुन आनंदने आपले इरादे दाखवून दिले. टोपालोव तसा आक्रमक स्वभावाचा आहे त्याच्या मानसिकतेला हे आव्हानच होते!
६ - बीएच ४- टोपाने उंट मागे घेतला
सातव्या खेळीला आनंद खेळला एन ई ४- ह्याला लास्कर डिफेन्स असं म्हणतात (इमॅन्युएल लास्कर ह्या जगप्रसिद्ध जर्मन गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि बुद्धीबळ जगज्जेत्याने हा प्रसिद्ध केलेला आहे.)

आता पांढर्‍या उंटावर काळा उंट आणि वजीर असा दुहेरी जोर आहे. उंटाला हुसकावून लावल्याने माघार घेऊन फायदा नाही टोपालोव उंटांची मारामारी करतो. आणि पुढच्या खेळीला आरसी१ असा हत्ती सी स्तंभात आणून तिथे दबाव वाढवायला सुरुवात करतो.
सी६ आनंद मध्यवर्ती प्याद्याला जोर लावतो. पुढे १३ व्या खेळीपर्यंत माफक मारामारी वगैरे होऊन स्थिती अशी आहे -
पटाच्या मध्याचा ताबा टोपालोवकडे जाऊ शकेल अशी स्थिती आहे. त्याची दोन प्यादी मध्यभागी, एक उंट आणि घोडा चांगल्या जागांवर स्थानापन्न आहेत. हत्ती सी स्तंभात येऊन तिसर्‍या पट्टीत सरकलाय, राजा कॅसल होऊन सुरक्षित आहे.
उलट आनंदचा पांढरा उंट अविकसित आहे. हत्तींचा समन्वय अजून झालेला नाही, पटाच्या मध्यावरचे नियंत्रण बर्‍यापैकी आहे पण ते जाऊ नये ह्याची काळजी घ्यायला हवी अशी स्थिती.
पुढल्या दोन खेळ्यात टोपाने उंट ई४ आणि -वजीर सी २ मध्ये आणून ती अशी जोडी बी१-एच७ अशा कर्णात बसवली. पटाच्या मध्यावरचा मुख्य कर्णातला उंट त्रासदायक ठरणार ह्याचा वास लागताच एनएफ६ असे खेळून आनंदने दोन गोष्टी साधल्या एकतर त्या मध्यावरच्या उंटावर हल्ला आणि एच७ वरती येऊन राजाला शह देण्याची धमकी फेटाळली.
पुढच्या खेळीला टोपा सी५ चे प्यादे मटकावतो. इथे आनंदने संधी साधली. मध्यावरचा त्रासदायक उंट त्याने घोड्याने मारलान आणि नंतर सी ५ मधले पांढरे प्यादे घेतले. ह्याने काय काय झाले?
आनंदची ए आणि सी पट्टीतली प्यादी 'आयसोलेटेड पॉन्स' झाली. ह्यांचा तोटा असा की ह्यांना सतत कोणीतरी जोर देत बसावे लागते. पण दोन महत्त्वाचे फायदेसुद्धा झालेत - सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदकडे अजून पांढरा उंट आहे जो पटाच्या मुख्य कर्णावर बसून प्रभावी ठरु शकतो. आणि त्याला विरोध करणारा टोपाचा उंट आता नाहीये. दुसरे असे की बी स्तंभ मोकळा होऊन तिथे हत्ती बसला आहे.

पुढल्या खेळीत आनंदने उंट मुख्य कर्णात आणला पांढरा घोडा डी२ मधे मागे जाताच डी स्तंभात आनंदने दुसरा हत्ती आणून बसवला. एफ३ प्यादे पुढे टाकून टोपाने कर्णातल्या उंटाची चाल सीमित केली.
(इथे सी५ वरचे प्यादे टोपाला खाता येत नाही कारण जर
आर x सी५?? आर x डी२!!
क्यू x डी २ क्यू x सी५ - काळ्या प्याद्याच्या बदल्यात पांढर्‍याचा घोडा मरतो! अर्थात असल्या लुटूपुटू चुका विश्वविजेतेपदाच्या सामन्यात संभवत नाहीत म्हणा पण प्रत्येक खेळी कशी डावाचा नूर पालटू शकते ह्याची एक चुणूक!!)
बी ए ६ - एफ१ मधल्या हत्तीवर आनंदने उंट घातला
आर एफ २ - हत्ती दुसर्‍या पट्टीत सरकवून टोपाने त्याच्या घोड्याला जोर लावला.
आर डी ७ - डी स्तंभात हत्ती दुहेरी करायचे आहेत
जी ३ - प्यादे पुढे सरकवून टोपाने राजाला एक घर सुटकेसाठी करुन ठेवले, जर मारामारी होऊन शेवटच्या पट्टीत हत्ती आलाच तर असावे!
आर डी ८ - आनंदचे हत्ती दुहेरी झाले
के जी २ - हलवूनच टाकला राजा दुसर्‍या पट्टीत भानगडच नको!
बी डी ३ - हत्तीच्या जोरात वजिराला धमकावले उंटाने
क्यू सी १ - जातो बाबा जातो मागे वजीर सी१ मधे गेला
बी ए ६ - पुन्हा उंट आपल्या स्थानी परत आला. (इथे टोपाने बरोबरीसाठी प्रस्ताव ठेवला होता. पण आनंदने तो फेटाळला. वरकरणी पाहता ह्या खेळ्यात तसे फार काही दिसत नाही पण ह्या खेळ्या सायकोलॉजिकल असतात - उंट त्या कर्णात त्रास देऊ शकतो एवढे समजले आणि पुढे पांढर्‍याचा आक्रमकपणा चालू राहणार असेल तर तशाच खेळ्या येणार. अन्यथा बरोबरी कडे सामन्या नेण्याची इच्छा असली तर तशा खेळ्या येणार. ह्याचे आडाखे अशा खेळ्यांमधून बांधले जातात. बरोबरी नाकारुन आनंदने एकप्रकारे टोपाला डिवचलेच की तुला दिसत नसले तरी मला पुढे आक्रमक खेळण्याच्या जागा दिसत आहेत!)

आर ए ३ - च्यायला काय कटकट आहे शिंची, हाकल पाहू त्या उंटाला म्हणून टोपाने हत्ती त्याच्या आंगावर घातलान!
बी बी ७ - पुन्हा मोठा कर्ण धरला उंटाने
एन बी ३ - सी ५ प्याद्यावर घोडा आला
आर सी ७ - हत्तीने त्या प्याद्याचे बळ वाढवले (ए ७ वरचे प्यादे टोपाला खाता येत नाही कारण मग बी xएफ ६+ शह देऊन हत्ती पडतो!)
एन ए ५ - आनंदच्या उंटाचा काही सोक्षमोक्ष लागाव ह्या हेतून टोपाने घोडा त्याच्यावर नेलान.
बी ए ८ - मला उंट ठेवायचा आहे आणि तो मुख्य कर्णातच - आनंदने जणू सांगितले ह्या खेळीने - थेट राजाकडे डोळे लावून बसलेला कर्णातला उंट ही एकप्रकारे मानसिक दडपण आणणारी गोष्ट सतत घडते आहे.
एन सी ४ - हुश्श! काळ्या सी ५ प्याद्याची वाट अडवून टोपाच्या घोड्याच्या उड्या अखेर थांबल्या.
ई ५ - आनंदच्या खेळाचे वैशिष्ठ्य असे की साधारणपणे ९०% खेळाडू जी खेळी मोक्याच्या वेळी करतील ती तो नेमकी करत नाही तितकीच ताकदवान पण दुसरी अनपेक्षित खेळी करतो आणि प्रतिस्पर्ध्याला विचारात पाडतो. आतासुद्धा ही खेळी अनपेक्षित होती.
ई४ - आनंदचे प्यादे तिथे येण्याआधीच आपण ती जागा बळकावायची म्हणून टोपाने त्याचे प्यादे रेटले (बघा सायकॉलॉजी बघा मानसिक स्तरावरचा लढा हा निकराचा होत जातो.)
एफ५! - आनंदने प्यादे देऊ केले. त्यातसुद्धा गोम अशी आहे की तू मारले नाही तर मी मारणारच आहे!
ई x एफ ५? टोपाने प्यादे खाल्ले - ही एक मोठी चूक त्याने केली आता ई प्यादाचा मार्ग मोकळा झाला. (ही चूक त्याने का केली असावी? कारण इथे एन डी २ अशी साधी खेळी प्याद्याला जोर देणारी दिसत होती. माझ्या मते मानसशास्त्रीय दबावाचा कसा सुरेख वापर आनंदने करुन घेतलाय बघा. सी ४ ह्या घरात येण्याआधीच्या तीन खेळ्यांपूर्वी घोडा डी२ मधूनच निघाला होता, आता पुन्हा तिथेच परत आणायचा म्हणजे काय? पहिल्या खेळ्या वायाच की !- आक्रमक खेळाडूच्या स्वभावतल्या किंचित उतावळेपणाचा हा तोटा झाला.)
ई ४! आनंदने प्यादे पुढे ढकलले.
एफ x ई४ ?? - दुसरी आणि शेवटची चूक!! (इथे पुन्हा एनडी २ खेळण्याची संधी होती तीही गमावली)
क्यू x ई४ + (शह) - के एच३ (पांढरा राजा शेवटच्या पट्टीत जाऊ शकत नाही कारण पांढर्‍या उंटाच्या जोरात वजीर आत घुसून मात देतो किंवा पांढरा वजीर पडतो! बघताबघता दोन खेळ्यात चित्रच पालटले!)
आर डी ४ - आनंदने हत्ती चौथ्या पट्टीत घेतला - आता क्यू जी ४ शह आणि मात अशी धमकी आहे! (ही धमकी टोपाने प्यादे खायच्या वेळी बघितली नव्हती का? नक्कीच बघितली होती पण पुढे बघा तो काय बघायचं राहिला.)
एन ई ३ - झाले घोडा ई३ मधे आणला की जी ४ घर धरले जाते आणि काळा वजीर काही करु शकत नाही ही टोपाची अटकळ!!
क्यू ई ८!! वजीर परत मागे जातो. मास्टर ब्लो असं ज्याला म्हणता येईल अशी ही मर्माघाती खेळी होती आणि नेमकी तीच टोपाच्या नजरेतू निसटली होती!! (आता क्यू एच ५ # मात अशी धमकी आहे!)
(इथे टोपाच्या चेहेर्‍यावरचे भाव गंभीर झाले. आपली चूक त्याला उमगली होती पण आता हातात फारसे काही नव्हते. अशा स्थितीत आता आनंदने काही चूक केली तरच आशा होत्या म्हणून टोपा लढत राहिला. कोण म्हणतं बुद्धीबळ हा मानसशात्रीय डावपेचांचा खेळ नाही?!)

जी ४ प्याद्याने प्रतिकाराचा दुबळा प्रयत्न
एच ५ सेकंदाचाही वेळ न लावता आनंदने प्यादे आंगावर घातले
के एच ४ - राजा पुढे नेला
जी ५ + शह (इथे आता हे प्यादे खाण्याशिवाय पांढर्‍याला पर्याय नाही कारण राजा एच किंवा जी ३ मधे मागे गेल्याबरोबर दोन खेळ्यात मात आहे.)
एफ x जी ६ (एनपासंट नियमाने प्यादे खाल्ले.)
क्यू x जी ६
क्यू एफ १ - अजूनही काळ्या राजावर चालून जाता येईल अशा दिवास्वप्नात आहे की काय टोपा?
आर x जी ४ + (शह)
के एच ३ (घोड्याने हत्ती मारुन शह काढता येत नाही कारण वजिराने घोडा मारुन मात!)
आर ई ७! अप्रतिम खेळी. (आता धमकी कशी आहे बघा आर x ई३, आर x ई३ मग आर एच ४ शह , राजाने हत्ती मारावाच लागतो आणि क्यू जी ४# मात!! क्या बात है!! ऐन डावाच्या धुमश्चक्रीत आनंदला अशा खेळ्या सुचू शकताहेत!)
आर एफ ८ + (शह) हरण्यापूर्वी आनंदच्या राजाला एकदाही चेक दिला नाही असे व्हायला नको म्हणून टोपाने चेक दिला!!
केजी ७
एनएफ ५ शह
के एच ७ (आनंद टोपाला खेळवतोय.)
आर जी ३
आर x जी ३ + शह
एच x जी ३
क्यू जी ४ (शह) राजाला मागे रेटत नेलाय!
आर ई २ + (शह)
के जी १
आर जी २ + (शह) काय केविलवाणी अवस्था झाली आहे पांढर्‍या राजाची? कर्णातला उंट किती छळू शकतो बघा! आता वजिराने हत्ती मारण्याखेरीज कोणताही पर्याय नाही. ये वजीर मुझे दे दे ठाकूर!!
क्यू x जी २, बी x जी२, के x जी २ - राजाने उंट घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आता एक वजीर विरुद्ध एक हत्ती आणि घोडा असे विषम गणित आहे.
क्यू ई२ + शह , के एच ३, सी४, ए४, ए५, आर एफ ६, केजी८ आनंदने राजा आठव्या पट्टीत नेला.
वजिराकडची आधी आयसोलेटेड ठरलेली प्यादी राखून आनंद खेळतोय.
एनएच ६ + (शह) काळ्या राजाला शह. के जी ७
आर बी ६, क्यू ई ४ (इथे क्यू एफ ३ ही अधिक ताकदवान खेळी होती पण आनंद बहुदा खेळ लांबवतोय आणि टोपाला मानसिक त्रास देतोय!)
के एच २. के एच ७
आर डी ६ क्यू ई ५ - काळ्या वजिराने हत्ती, बी २ प्यादे आणि जी ४ प्यादे एकाचवेळी लक्ष्य केलेत!
एन एफ ७ हत्तीला जोर आणि वजिरावर हल्ला केला टोपाने
क्यू x बी २ + (शह) अखेरीस बी २ चे प्यादे मारुन आनंदने शह दिला
के एच ३
क्यू जी ७ - आनंदने घोड्यावर हल्ला केला.
सी स्तंभातले प्यादे आता रोखले जाणे अवघड आहे. पांढर्‍याकडे कोणताही बचाव किंवा हल्ला दोन्ही नाहीयेत. टोपालोवने डाव सोडला. आनंद चौथ्यांदा विश्वविजेता झाला!!
-------------------------------------------------------------------------------------------------
टोपाने मान हलवली आणि खुर्चीतून उठून हात मिळवला. एकमेकांच्या डावांवर सह्या होऊन कागद दिले घेतले गेले. टोपालोव झटकन तिथून निघून गेला. आनंदच्या चेहेर्‍यावर दिलखुलास हास्य मावत नव्हते. त्याच्या आजूबाजूला कॅमेर्‍यांचा लखलखाट सुरु होता. स्टेजवरुन आतल्या बाजूला जातानाच कॅमेरे त्याचा पाठलाग करत होते. आतल्या बाजूला आनंदची पत्नी आणि स्वीय सहायक अरुणा ही अतिशय आनंदून गेलेली दिसत होती. लगोलग मोबाईल फोन्स काढले गेले. आनंद बहुदा चेन्नैला असलेल्या त्याच्या मातापित्यांशी बोलला असावा.
तीन आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या एका तणावपूर्ण स्पर्धेचा असा आनंददायक निकाल लागल्याने आनंदच्या गोटात अपार खुषीचे वातावरण होते.
------------------------------------------------------------------------------------------------
ऑलिवच्या पानांची यशोमाला गळ्यात घालून फिडे प्रेसिडेंट किर्सान इल्युमझानोव ह्यांच्यासोबत हस्तांदोलन करताना आनंद

आपापल्या चषकांसमवेत उपविजेता टोपालोव आणि जगज्जेता आनंद!

आनंदसमवेत गृहिणी, सखी, सचिवः अरुणा

---------------------------------------------------------------------------------------------------
(श्रेयअव्हेर - सर्व प्रकाशचित्रे www.anand-topalov.com ह्या संस्थळावरुन साभार)

बारा लाख यूरोचे (सुमारे पावणेसात कोटी रुपयांचे) घसघशीत बक्षीस पदरात पाडून आनंद अव्वल ठरला. जगात अभिमानाने भारताची मान पुन्हा एकदा उंच झाली.

ह्या अंतिम सामन्यापूर्वी कास्पारोव आणि व्लादिमीर क्रामनिक ह्यांनी आनंदची सदिच्छा भेट घेतली होती आणि त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे टोपालोवने असा आरोप केला की "आनंदने त्याच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांकडून आयत्यावेळी मदत घेतली आणि त्यात आनंदला काही कमीपणा वाटला नाही हे आनंदला शोभत नाही .."वगैरे वगैरे. ह्यावर अरुणाची प्रतिक्रिया होती की "त्याने सामना सुरु होण्याआधीपासून आमच्यावर आरोप सुरु केले होते त्याही वेळी आम्ही काही उत्तर दिले नव्हते आणि आताही त्याचे आरोप सुरु आहेत त्यामुळे ह्याही वेळी आम्हाला काही उत्तर देण्याइतके ते महत्त्वाचे वाटत नाही. आनंदला काय म्हणायचे आहे ते तो सामन्यात म्हणाला आहेच!"

आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने विमान न मिळाल्यामुळे ४० तासांचा २००० किमी चा प्रवास करुन आणि तीन दिवस सामना पुढे ढकलावा अशी विनंती मान्य न होऊन केवळ एक दिवस सामना पुढे ढकलू शकलेल्या आनंदच्या साहसी जगज्जेतेपदाच्या स्पर्धेची अखेर अशी अमाप खुषीची झाली होती. जगज्जेता असूनही आपल्या विनम्र आणि लाघवी स्वभावाने रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणार्‍या ह्या ६४ घरांच्या अभिषिक्त सम्राटाला माझे अभिवादन!!

चतुरंग

क्रीडाअभिनंदनआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

7 Jun 2010 - 7:57 pm | श्रावण मोडक

'चतुरंग लेख'.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jun 2010 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

वाह ! वाटच बघत होतो शेवटच्या डावाच्या रसग्रहणाची ;)

नेहमीप्रमाणेच रसाळ व सुबोध.

फोटु आडवे-तिडवे पसरल्याने डोळ्याच्या कडा फारच फाकत आहेत.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

7 Jun 2010 - 12:53 pm | विनायक पाचलग

लेख कधी येणार याची वाट बघत होतो.............
एक्सलंट
इतके शास्त्रीय उल्लेख असुनही लेख एक सेकंदही बोअर होत नाही..
लय भारी..
बाकी आनंदला सलाम आहेच..

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2010 - 2:49 pm | भडकमकर मास्तर

मस्त लेख...
टोपाचे शेवटचे बोंब मारणे आणि कांगावा गंमतीदार वाटला...

विकास's picture

7 Jun 2010 - 8:25 pm | विकास

असेच म्हणतो!

टोपाचे शेवटचे बोंब मारणे आणि कांगावा गंमतीदार वाटला...

पण शेवटी "रडीचा डाव खडी" म्हणतात तसेच झाले. :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

आनंद's picture

7 Jun 2010 - 4:56 pm | आनंद

अतिशय मस्त रसग्रहण, वाटच पहात होतो.
हा सामना वरच्या साइट वर लाइव बघितला होता. एखाद्या २०-२० क्रिकेट सामन्या पेक्षाही जास्ती थरार त्या दिवशी आमच्या घरी सगळ्यांनी अनुभवला होता.
नावबंधु-आनंद

समंजस's picture

7 Jun 2010 - 5:07 pm | समंजस

छान लेख!
विश्वविजेत्या आनंदचे अभिनंदन!
हा खेळ विशेष कळत नाही(कंटाळा येतो बघायला आणि खेळायला (|: ) तरी सुद्धा भारतिय खेळाडु ने जिंकल्यामुळे 'आनंद' वाटला :)

[गॅरी कास्पोरोव्ह एवढा आनंदचा सुद्धा दबदबा निर्माण झाला तर नक्कीच मजा येइल]

प्रभो's picture

7 Jun 2010 - 7:20 pm | प्रभो

मस्तच!!

रामदास's picture

7 Jun 2010 - 7:56 pm | रामदास

आनंद मानसीक दृष्ट्या कायम संतुलीत असतो.
आक्रस्ताळेपणा करत नाही.
सामन्यातून बाहेर पडल्यानंतर गरळ ओकणे -अवास्तव विधाने करणे असे काहीही करत नाही.
कदाचीत या मानसीक बळानेच त्याला विश्वविजेता बनवले आहे.
या डावाचे निरुपण उत्तम झाले आहे.
गरीबांच्या संजय लिला भन्साळींनी आतापर्यंत पुस्तक करून टाकले असते.
पण मलाही मनापासून वाटते की ह्या सर्व भागांचे इ-पुस्तक व्हावे.

चतुरंग's picture

7 Jun 2010 - 8:08 pm | चतुरंग

मानसिक संतुलन नीट असणे हा लांब पल्ल्याचा मामला आहे हार वा जीत ही चालतेच.
मानसिक संतुलनाने त्याला विश्वविजेताच नाही तर लोकप्रिय विजेता बनवले आहे. (कास्पारोवसुद्धा विजेता होताच की पण भडक विधाने करणे प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे असे प्रकार त्याने सर्रास केले. रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणे ह्याकरता चांगला माणूस असणे हे आधी महत्त्वाचे आहे हे सचिन आणि आनंदसारख्या विजेत्यांनी सिद्ध केले आहे.)

ह्या स्पर्धेतल्या पहिल्या डावात तो सपाटून हरला. त्याबद्दल त्याला विश्वविजेतेपद मिळवल्यावर विचारले की तुझा २००० किमि चा प्रवास पुरेशी विश्रांती न मिळणे हे पहिल्या डावातल्या पराभवाला कारणीभूत ठरले असे तुला वाटते का?
आनंद म्हणतो "पहिला डाव मी हरलो हे सत्य आहे. कारणे देत बसणे बरोबर नाही. मी पुरेसा अभ्यास केला होता परंतु एका क्षणी माझ्या हातून खेळींचा क्रम चुकला त्या पुढे मागे झाल्या आणि अशा तीव्र स्पर्धेत तुमच्या छोट्याशा चुकीचा फायदा तत्काळ घेतला जातो. हा स्पर्धेचा भाग आहे. असे होऊ शकते. माझी काहीही तक्रार नाही."
आणि नंतरचा दुसरा गेम जिंकून आनंदने हे आधीही सिद्ध केले होतेच.

चतुरंग

चतुरंग's picture

8 Jun 2010 - 12:32 am | चतुरंग

दोन भागात आनंदची मुलाखत झाली. छोटेखानी मुलाखत आनंदच्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक दाखवणारी आहे. :)

चतुरंग

मेघवेडा's picture

8 Jun 2010 - 12:56 am | मेघवेडा

अगदी अगदी. परिमार्जन नेगी ला आवर्जून "ऑल द बेस्ट" सांगणं आणि विजेंदर सिंहच्या प्रश्नास उत्तर देण्यापूर्वी आवर्जून त्याचं अभिनंदन करणं.. मोठ्या खेळाडूची, मोठ्या माणसाची लक्षणं!! :)

जगज्जेत्यास सलाम!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

नि३'s picture

8 Jun 2010 - 12:58 am | नि३

धन्यवाद चतुरंग ...

खुप दिवसांपासुन ह्या ध्याग्याची वाट पाहत होतो.
आणी शेवटी म्हणावेच लागेल IT WAS WORTH TO WAIT..

खुप छान विष्लेशन ...

---नि३.

धनंजय's picture

8 Jun 2010 - 1:52 am | धनंजय

आनंदचे अभिनंदन!
(पटावर खेळी-खेळी बघता येते, तो दुवा देता येईल का?)
धन्यवाद चतुरंग.

चतुरंग's picture

8 Jun 2010 - 2:36 am | चतुरंग

ते ह्या लेखात विसरलोच. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद धनंजय! :)

आता पहिल्या परिच्छेदानंतर डावाचा दुवा दिलेला आहे. खेळून बघता येईल.
(सूचना - दुव्यावरचा डाव खेळून बघायला तुमच्या संगणकावर "जावा" असणे जरुरीचे आहे.)

चतुरंग

रामपुरी's picture

8 Jun 2010 - 3:30 am | रामपुरी

आर एफ ८ + (शह) हरण्यापूर्वी आनंदच्या राजाला एकदाही चेक दिला नाही असे व्हायला नको म्हणून टोपाने चेक दिला!!
केजी ७
एनएफ ५ शह
के एच ७ (आनंद टोपाला खेळवतोय.)

ही "केजी ७ " खेळी समजली नाही. त्या ऐवजी सरळ "के एच ७ " जास्त बरी वाटत आहे. "के एच ७ " नंतर फार काही खेळण्यासारखे उरत नाही. (हे माझ्या अल्पमतिनुसार. कदाचित काही वेगळा विचार या "केजी ७ "मधे असू शकेल) . सकॄतदर्शनी "केजी ७ "मुळे डाव लांबला असं दिसतंय.

चतुरंग's picture

8 Jun 2010 - 8:26 pm | चतुरंग

के एच ७ सुद्धा चालली असती मग
आरएच ८ + (शह) - के एच ८
क्यू एफ ८ + (शह) -क्यू जी ८
अशाप्रकारे खेळ सुरु राहिला असता. ती सुद्धा विनिंग लाईन आहे.

तसं बघायला गेलं तर टोपाचा डाव इतका खिळखिळा झालेला आहे की अडतिसाव्या खेळीपासून पुढे जवळपास प्रत्येक पुढच्या चालीतून विनिंग वेरिएशन निघू शकते! :)
जिज्ञासूंनी ह्या दुव्यावरती दिलेल्या विश्लेषणाचा अभ्यास करुन बघावा.

चतुरंग

सहज's picture

8 Jun 2010 - 6:06 am | सहज

नेहमीप्रमाणेच सुंदर लेख!

विनायक प्रभू's picture

8 Jun 2010 - 12:41 pm | विनायक प्रभू

आनंदी आनंद गडे