चिंतू-३

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
28 May 2010 - 7:25 pm

चिंतू-३

संध्याकाळी अंधेरीच्या रेल्वे स्टेशनावर उतरून जिना चढणार्‍या गर्दीत जिन्याच्या पायर्‍या दिसेनाश्या होतात, आणि एकेका पायरीने वर चढणार्‍या त्या गर्दीची डोकी, खालून, काळ्या लाटांसारखी हिंदकळताना दिसतात...
... मध्येच एका पायरीवर मात्र, या लाटा भोवयासारख्या दुभंगतात...
घाईघाईने जिने चढणारी ती पावले, मधल्याच एका पायरीशी थबकतात, आणि बाजूला होऊन पुढे सरकतात.
आपोआपच, त्या पायरीवर एक पोकळी तयार होते.
आणि लाटेतले प्रत्येक डोके खाली वळते...
... त्याला मात्र, त्या गर्दीचे, तिच्या दुभंगण्याचे आणि पुढे सरकण्याचे काहीही भान नसते.
हाताच्या तळव्यावर मावतील, एवढ्या लहान, खेळण्यातल्या दोनचार मोटारी त्याच्या पायांच्या चपळ हालचालींनी मिळणार्‍या वेगामुळे त्या मोकळ्या जागेतून इकडून तिकडे सरसरत असतात...
... आणि तो, त्या खेळात मस्त दंगलेला असतो.
गर्दीची पावलं क्षणभरासाठी थबकतात. कारण, त्या गर्दीची माणुसकी पायाशी असलेल्या त्या लहानग्याची काळजी घेत असते.
कुणीतरी खिशात हात घालून, त्या घाईतही, एखादं नाणं त्याच्यासमोर टाकतो, आणि पुढ्यातली पळती गाडी झटक्यात पायात पकडून थांबवत तो खाली वाकून तोंडानं ते नाणं उचलतो... खिशात टाकतो...
पुन्हा पायात गाड्या पकडून त्यांना वेगानं पळवण्याचा त्याचा खेळ सुरू होतो.
आपल्या पुढ्यात नाणं टाकणार्‍याकडे मान वर करून पाहाण्याचंही भान त्याला नसतं.
कदाचित, मान वर करेपर्यंत, गर्दीची दुसरी लाट आलेली असते, हे त्याला अनुभवानं माहीत झालेलं असावं.
तो पुन्हा आपल्या पुढ्यातल्या त्या गाड्या पळवायच्या खेळात रंगून जातो.
... अलीकडे तो रोज दिसत नाही.
तो जेमतेम साताआठ वर्षांचा असेल.
त्याला हात, म्हणजे, दंड, मनगटं, आणि पंजे नाहीत.
त्याचे पायच त्याचे हात आहेत.
उत्सुकता वाटावी, इतक्या सफाईनं तो आपल्या पायाच्या इवल्या तळव्यांनी पुढ्यातल्या खेळण्यातल्या मोटारी हाकत असतो.
... शरीराचा एखादा अवयव दुबळा किंवा निकामी असेल, तर काम करण्यास सक्षम असलेला दुसरा अवयव आणखी कार्यक्षमतेने काम करतो आणि दुबळ्या अवयवाची क्षमतेची उणीव भरून काढतो, असे म्हणतात. अपंगांना त्यांच्या दुबळेपणावर मात करण्याची शक्ती मिळावी, म्हणून कदाचित निसर्गच ही योजना करत असावा...
पायात पेन पकडून परीक्षेचे पेपर लिहिणार्‍या, तोडात ब्रश पकडून निसर्गाचे सुंदर रंग कागदावर उमटविणार्‍या, प्रकाशाच्या किरणांचे सौंदर्य कधीच न पाहू शकणार्‍या अनेक अपंगांच्या कर्तबगारीचं कौतुक धडधाकटांच्या दुनियेत होत असतं. अशा कौतुकामुळे त्या अपंगत्वालाही, जगण्याची नवी उमेद मिळते...
... आणि अपंगत्वावर मात करून कुणी एखादा एव्हरेस्टदेखील सर करून जातो...
----- ---------- ---------
पण धडधाकट, शरीराचे सगळे अवयव मजबूतपणे काम करण्याइतके ठाकठीक असतानाही, कधीकधी आपण अपंग, दुबळे होऊन जातो, तेव्हा निसर्ग आपल्याला ती सवलत देत नाही!!
... मग आपण कृत्रिम मदतनीसांचा सहारा घेतो.
आपल्या दुबळेपणावर मात करण्यासाठी, आजूबाजूला यंत्रांची दुनिया उभी करतो. आणि, ही दुनिया आपल्या सेवेसाठी हात जोडून उभी रहिली, की आपण आणखी दुबळे, परावलंबी, अपंग होऊन जातो...
... आता मोबाईलमुळे, मेंदूतल्या डिरेक्टरीची पानं पिवळी पडलीत...
मेंदू वापरायची सवय यंत्रांमुळे कमी झाली, आणि आपणच यंत्र झालो.
यंत्र हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग झालाय.
... माझा एक मित्र, समोर बसून अगदी सहज बोलू लागला, तरी त्याचा डावा तळवा नकळत डाव्या कानावर जातो...
मध्येच कधीतरी तो भानावर येतो, आणि आपण मोबाईलवर बोलत नाहीये, हे लक्षात येऊन ओशाळून जातो...
आपण `यंत्रावलंबी' झालोय.
म्हणजे, अपंग होतोय?
... आपल्याला निसर्गानं दिलेलं शरीर, आपल्या कामाच्या गरजा भागवण्याकरता अपुरं पडतंय?
... माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात, नको असलेले, गरज नसलेले अवयव गळून पडत गेले, असं म्हणतात.
नाहीतर, आज आपल्यालाही शेपूट असती!!...
... आणि ज्या अवयवांची गरज वाढू लागली, ते आणखी ताकदवान होत गेले...
.. म्हणून माणसाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा तल्लख होत गेला!!
... आता, पुढे काय होणार???...
आता मेंदूचा, हातांचा वापर कमी झालाय. यंत्रे आलीत...
शरीराकडून करून घ्याव्या लागणार्‍या अनेक कामांसाठी आपण यंत्रे तयार केलीत.
---- --------- --------
आत्ताच वाचलेल्या एका बातमीमुळे, हे सहज आठवून गेलं.
लंडनमधल्या, युनिवर्सिटी ऒफ रीडिंगमधल्या डॊ. मार्क गॆसन नावाच्या सायबरनेटिक्स एक्स्पर्टला कॊम्पुटर व्हायरसचा संसर्ग झालाय....!!!
संगणक विषाणूचा संसर्ग माणसाला होण्याचा जगातला हा पहिलाच प्रकार आहे! मार्क गॆसन हा संगणक विषाणूचा संसर्ग झालेला जगातला पहिला मानव ठरला आहे.
प्रयोगशाळेचे दरवाजे उघडण्याची सिक्युरिटी सिस्टीम असलेला प्रोग्राम सेट केलेली चिप मार्कने मनगटात बसवून घेतली होती. मोबाईल फोन त्याच्याव्यतिरिक्त दुसरा कुणीच चालू किंवा बंद करू शकणार नाही, असा प्रोग्रामही त्यात सेट केलेला होता.
एका नव्या प्रयोगाच्या हव्यासापोटी मार्कने म्हणे, या चिपमध्ये जाणूनबुजून व्हायरस घुसवला. नंतर त्यामुळे आपोआपच प्रयोगशाळेच्या सिक्युरिटी सिस्टीमवरही परिणाम झालाय.
कॊम्प्युटरच्या विषाणूचा संसर्ग माणसाला झाला...
म्हणजे, कॊम्प्युटर हा माणसाच्या शरीराचा भाग होतोय??
बर्‍याच दिवसांनी,
.... पुन्हा `चिंतू'नं डोकं वर काढलंय...
---------------------------
http://news.yahoo.com/s/livescience/20100526/sc_livescience/maninfectshi...
-----------------------------
http://zulelal.blogspot.com/search/?q=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

28 May 2010 - 7:40 pm | शैलेन्द्र

छान लेख... रॉबीन कुकने नविन कादंबरी सुरु केली असावी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 7:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फारसं नाही पटलं. स्मरणशक्ती असलेली चांगली म्हणून २९ चा पाढा, पावकी, चंद्रमस् शब्द कसा चालतो, पहिलं महायुद्ध कधी सुरू झालं ती तारीख या सगळ्या गोष्टीच लक्षात ठेवायच्या का?
स्वतःचा मोबाइल नंबर, जे फोन नंबर नेहेमी सांगावे लागतात ते, लक्षात रहातातच ना!!

अर्थात डॉ मार्क गॅसनची बातमी अंमळ विचित्र आहे हे मान्य!

अदिती

शैलेन्द्र's picture

29 May 2010 - 10:48 am | शैलेन्द्र

असही म्हणता येइल की बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती व कौशल्य यातली गल्लत हळुहळु दुर व्हायला लागलीयं. ज्या गोष्टीसाठी निखळ बुद्धिमत्ता लागते, अशा अनेक गोष्टी आहेत आणी आजचा मानव त्या करत आहे, त्यामुळे मेंदुचा विकास थांबेल अस अजीबात वाटत नाही ,उलट पुढची पिढी जास्त चलाख होतिये(हा बुद्धीचा विकास की एक्स्पोजरचा परिणाम हा वादाचा मुद्दा)

शैलेन्द्र's picture

29 May 2010 - 11:00 am | शैलेन्द्र

अजुन एक,

डॉ मार्क गॅसनची बातमी तितकी विचीत्र वाटत नाही, कारण जो संसर्ग झालाय तो चिपला झालाय, जि त्याच्या शरिरात असली तरी त्याच्या शरीराचा भाग नाही. त्याच्या शरिराला संसर्ग करण्यासाठी DNA coding असलेला व्हायरस हवा. जोवर आपण DNA coding असलेले कॉम्प्युटर बनवत नाही तोवर व्हायरल ट्रांसफर शक्य वाटत नाही. अर्थात, मानवाने बनवलेले अनेक खरे व्हायरस अस्तित्वात आहेत, आणि त्यांनी अनेक रोगही पसरवलेत अशी वंदता आहे(एच ५ एन १ हे एक उदाहरण).

स्पंदना's picture

29 May 2010 - 8:30 am | स्पंदना

हम्म...

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मदनबाण's picture

29 May 2010 - 11:01 am | मदनबाण

छान लेख... :)
चार्ली ने या विषयावर केलेला विचार आणि अभिनय...

मदनबाण.....

Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower

अर्धवटराव's picture

31 May 2010 - 3:09 am | अर्धवटराव

स्मरणशक्ती म्हणजे बुद्धीमत्ता नाहि हे जरी खरे, तरी बुद्धीगम्य कर्मांचा डोलारा सांभाळणारा स्मरणशक्ती हा एक अत्यंत आवश्यक खांब आहे. अनावश्यक गोष्टी स्मरणशक्तीतुन कमी करायला काहि हरकत नाहि, पण या आवश्यक-अनावश्यकाचि सीमा जशी जशी आवश्यकाचा आवाका कमी करेल (आणि हे आपल्याला कळणार देखील नाहि), मनुष्याचि जैव अवलंबिता कमी होइल आणि यांत्रीक अवलंबता वाढेल... ही गोष्ट नक्कीच घातक ठरेल. अर्थात, हे ढोबळ मानाने कधी दिसणार नाहि, आणि हे टाळणे पण शक्य नाहि.

(अर्धवट स्मरणशक्तीचा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक