पोवाडा मर्द मावळ्याचा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 May 2010 - 9:55 am

पोवाडा मर्द मावळ्याचा

खण खण खणाण खण खण खण
खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार
शिवाजीचा अवतरला अवतार
शत्रूंना दिले उत्तर बाणेदार
साथ दिली मावळ्यांनी भरपूर
अशा राजा शिवाजीस करूनी नमन
शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा
मर्द मावळ्याचा
जीर हा जी जी जी जी जी
...
अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले
अनेक किल्ले राजांनी जिंकीले
अनेक शत्रू त्यांनी मारीले
मराठी राज्य त्यांनी स्थापिले
शिवाजीमहाराज छत्रपती जाहले
याकारणे साथ दिली अनेकांनी
तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी

अहा
...
{ गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले. यात त्यांना तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा अनेक ज्ञात लढावू मर्दांची साथ लाभली. परंतु सैन्यात असणार्‍या अनेक सैनिकांपैकी एक असणार्‍या एका मर्द मावळ्याची कहाणी या पोवाड्यात ऐका....}

असे एक मावळा महाराजांच्या सैन्यात
तयार होता लढाईत
पाठवूनी त्यास रणांगणात
केली शर्थ त्याने हातघाईत
कहाणी ऐका त्याची पोवाड्यात
जीर हा जी जी जी जी जी
...

अशाच एके संकटाचे वेळी
महाराजांनी आज्ञा ती केली
तयार करावे सैन्य तुम्ही
रहावे हुशार युद्धास जाण्यावरी
सरनोबत घ्या लढाईचे सुत्र
व्युव्ह रचा तुम्ही दुरूस्त
हत्ती, घोडे ठेवा चुस्त
शत्र्रूस करण्या परास्त
पाजळा सगळी आपापली शत्र
चढवा आता रणांगची वस्त्र.....जीर हा जी जी जी जी जी

अशा या समर प्रसंगी तयार मावळा हा
घरा दाराला सोडुनी आला आला किल्याला
घरधनी निरोप देई अशृ डोळ्याला
कवटाळी चिल्लेपिल्ले आपल्या उराला
धिर देवून मावळा निघे लढाईला.....जीर हा जी जी जी जी जी

नाईकास भेटूनी सांगे तयार लढाईला
जुमलेदारास सांगूनी जाई आपल्या मोक्याला
हवालदार अन बाकी मावळे असती संगतीला.....जीर हा जी जी जी जी जी

{गद्य: असा हा मावळा लढाईस तयार होवून आपल्या मोक्याला चालला गेला. अशा या वेळी किल्यावर काय वातावरण होते ते पहा...} अहा....

रात्रीचे समयी रातकिडे किरकिरती
अंधार दाटूनी आला घुबडे हुंकारती
भयवाटावे असले लक्षण आहे सगळीकडे
मेघ दाटूनी आले सहस्त्रधारा वर्षावे
त्याच समयाला शत्रू हल्ला ते करती
या अल्ला तोबा करूनी किल्यावर धडकती
हुश्शार मावळा जागा होता ढाला चढवून
हाता सुर्‍या, आडहत्यारे, धनुष्य, बरची अन पट्टा घेवून
गोलंदाजही तयार होते त्याच समयाला
गोळे घेवुनी दारूचे ते फिरवीती तोफेला.....जीर हा जी जी जी जी जी

रक्षण करण्या मावळा दक्ष असे
मुख्य गणेश दरवाजाचे
लक्ष असे त्याचे शत्रूच्या येण्याचे
ठावूक असे त्याजला काम मोर्चाचे
शिकारी शिकार ठिपण्या सावध असे.....जीर हा जी जी जी जी जी

{गद्य: शत्रू असल्या पावसात चालून आला. किल्याच्या मुख्यदरवाजाला त्याने धडक दिली अन }

चाहूल लागली गनिमाची चालून येण्याची
पावसातल्या आवाजात अल्ला अल्ला ते गर्जीती
धडक बसली गणेश दरवाजाला मत्त हत्तीची
भक्कम दरवाजा त्यास काय फिकीर करण्याची
शेवटला उपाय म्हणूनी तयारी सुरूंग लावण्याची
अशा पावसात काम करीना दारू सुंरूगाची
मग तयारी झाली तोफगोळे बरसविण्याची.....जीर हा जी जी जी जी जी

एकाएकी मग हल्ला की हो झाला
कुलूपी गोळा दरवाजावर की हो आदळला
त्या गोळ्याने मग आपले काम फत्ते केले
भक्कम सागवानी लाकूड काम की हो तोडीले
लगबग करूनी सात वैरी मग चालूनी आले.....जीर हा जी जी जी जी जी

मुख्य दरवाजापाशी होते पाच शुरवीर दारवान
हातघाईची लढाई केली त्यांनी ताकदवान
अन मारीले सातही मुजोर हैवान.....जीर हा जी जी जी जी जी

दरवजापाशी आता आली आणीक कुमक
आपला मावळा होता त्यात एक
मागाहून शंभर पठाण आले ते अल्ला खुदा गर्जीत
दोन्ही फौजा मग तेथेच भिडल्या एकमेकांस.....जीर हा जी जी जी जी जी

हरहर महादेव, शिव हर शंभो, मारा, कापा गजर तो झाला
कोणी पट्टा चालवी, कोणी खांडा* चालवी कोणी चालवी जांबीयाला
मावळ्याने आपल्या घेतली हाती ढाल तलवारीला
त्वेशाने तुटून पडे तो गेला सामोरीला
दातओठ खावूनी गरगर फिरवी हत्याराला
तलवारीची धार तेज असे पाजली कालच्याला
घाबरूनी शत्रू मागे फिरी लांब होई पल्याला
अशा तर्‍हेचे युद्ध करीती दोन्ही त्या समयाला
वरतून पाऊस झोडी खाली मावळा झोडी गनिमाला
खंड नव्हता पडला काही त्याच्या मेहनतीला
शर्थ नव्हती पडली त्याच्या पराक्रमाला
एकट्याने बारा मोगल कापीयला
होते हत्यार बल्लम* लटकाविलेले कमरेला
तलवार लावली म्यानाला अन हाती घेतले बल्लमाला
आता तिन अरबांनी कोंडाळले त्याला
तयारी केली त्यांनी खाली पाडण्या मावळ्याला
दिन दिन खुदा खुदा करूनी घेरती पिंजर्‍यातला वाघाला.....जीर हा जी जी जी जी जी

रणमर्द तो मावळा एकटा झुंजला
वार झेलून झेलून रक्ताने तो माखला
रक्त पाहून त्वेशाने तो हल्ला परतवू लागला
सरसर सरसर तो फिरवी बल्लमाला
डोक्यात मारी वार करी, एक अरब पाडला
राहीले दोन आता खुन डोळ्यात चढला.....जीर हा जी जी जी जी जी

एक छाती पुढे येई अन एक राही पाठीला
हवालदार तो बाजूस होता पाही लढाईला
पराक्रम बघूनी मावळ्याचा तो घाली बोटे तोंडाला
"ध्यान देवूनी लढ आता" त्याने आवाज की दिला
अन बाकी मोगलांचा समाचार घेण्या तो चालता झाला.....जीर हा जी जी जी जी जी

विज चकाकली, आवाज झाला, हरहर महादेव मावळा बोलला
विजेसारखा चमकूनी त्याने जोरदार मारा केला
दोन्ही अरबांना चार वारात लोळवी धरणीला
एक बोलतसे खुदा खुदा एक बोली या अल्ला
तडफड तडफड करूनी सोडी ते प्राणांना
वेदनेने चमकूनी पाही मावळा आपल्या तुटल्या हाताला
असा हा एकटा मावळा रणात झुंजला
गनीम पंधरा लोळवीले पाठविले स्वर्गाला.....जीर हा जी जी जी जी जी

हुषार व्हा सारे! सार्‍या मोगलांचा नाश झाला
ओरडूनी सांगे सरहवालदार सगळ्यांना
आपलीही आपली तेरा डोकी फुटली गमावीले विसांना
तुम्ही बाकी सारे आता बसा पहार्‍याला
येवू नका देवू आता कोणी शत्रू दरवाज्याला
आणखी कुमक घेवोनी येतो मी तुमच्या मदतीला
"भले बहाद्दर लढाई गाजवली", शाब्बासी देती ते मावळ्याला
किल्लेदार धावत येती त्याच समयाला
सोन्याचे कडे देवूनी गौरवीती त्याला
गौरवूनी निघती ते अधिकारी, मावळा संगती उपचाराला.....जीर हा जी जी जी जी जी

अशी लढाई अशी मर्दूमकी गाजवली त्या कारणाला
मारूनी शंभर शत्रू मावळ्यांनी वाचवीले किल्याला.....जीर हा जी जी जी जी जी

शुरमर्दाचा फोवाडा शुरमर्दांनी सांगावा
शुरमर्दांनी ऐकावा शुरमर्दांनी आचरणावा
असा हा पोवाडा शुरमर्द मावळ्याचा
महाराजांच्या पुराणकालीन काळाचा.....जीर हा जी जी जी जी जी

प्रस्तूत शाहिर असे नाशिक वस्तीला
सचिन बोरसे नाव ल्यालेला
लेखणी घेवून पहाटेच्या मंगल समयाला
पोवाडा पुढल्या पिढीसाठी रचिला
सत्ताविस मे २०१० सालाच्या गुरूवाराला
वेळ झाली पोवाडा पुर्ण करण्याला.....जीर हा जी जी जी जी जी

वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना
जांच्यामुळे आज आपण या वेळेला
धर्माची भाकरी खातो पोटाला
वंदन करतो शिवाजी राजांना
सत्य युगाच्या योगी पुरूषाला
भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी

* खांडा: तेगा. एक प्रकारचे कमरेचे हत्यार. पाते २, २.५ पुट. धार दोन्ही बाजूस.
* बल्लम: सांग. पोलादी हत्यार. ७, ७.५ फुट, चार धारी.

-पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०५/२०१०

वीररसरौद्ररसकविताइतिहास

प्रतिक्रिया

सुकामेवा's picture

27 May 2010 - 11:50 am | सुकामेवा

उत्तम पोवाडा

छान रचला आहे, असेच पोवाडे रचण्याकरीता स्फुर्ती मिळो.

अभिनंदन

मदनबाण's picture

27 May 2010 - 12:16 pm | मदनबाण

सुंदर पोवाडा...

मदनबाण.....

Jealousy is nothing more than a fear of abandonment.

पिंगू's picture

27 May 2010 - 12:42 pm | पिंगू

अतिशय सुंदर पोवाडा.. दफोराव धन्य जाहलो..

- पिंगू

मीनल's picture

27 May 2010 - 5:47 pm | मीनल

वाद्यांसोबत ऐकायला आवडेल.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

27 May 2010 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार

दफो 'हि' तलवार जास्त आवडली :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

27 May 2010 - 6:20 pm | धमाल मुलगा

@
^
^
^
.
.
.

वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना
जांच्यामुळे आज आपण या वेळेला
धर्माची भाकरी खातो पोटाला
वंदन करतो शिवाजी राजांना
सत्य युगाच्या योगी पुरूषाला
भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी

खल्लास! शेवट तर काळजाला भिडला.

बाकी, पवाडा वाचताना, मावळ्याची लढाई नदरंम्होरं जमली शाहीर! काटा आला वो अंगावर. वाचलं तं ही गत,
तापल्या डफावर थाप टाकत पहाडी आवाजात कुणी ऐकवला तर काय बहार!!!! :)

शुचि's picture

27 May 2010 - 7:43 pm | शुचि

आवडला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

फटू's picture

27 May 2010 - 11:02 pm | फटू

अगदी छान जमला आहे पोवाडा.

वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना
जांच्यामुळे आज आपण या वेळेला
धर्माची भाकरी खातो पोटाला
वंदन करतो शिवाजी राजांना
सत्य युगाच्या योगी पुरूषाला
भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी

अप्रतिम !!!

- फटू

मनिष's picture

27 May 2010 - 11:25 pm | मनिष

वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना
जांच्यामुळे आज आपण या वेळेला
धर्माची भाकरी खातो पोटाला
वंदन करतो शिवाजी राजांना
सत्य युगाच्या योगी पुरूषाला
भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी

अप्रतिम!!!! आव्डला :)