पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे
लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे.
प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे.
मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे.
प्रकाशित: १९८३
मुल्य: रू. ६५/-
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती.
या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत. त्यात इतिहासाचार्य राजवाडे यांचा उल्लेख आहे.
दिर्घ प्रस्तावनेत लेखकाने त्या पत्रांचा समावेश का केला, पत्रे लिहीण्याची पध्दती, मुसलमान कालगणना, फारसी शब्द, अधिकार्यांचा हुद्दा, शक गणना, महाराजांची दुरदृष्टी, मुद्रा, शिक्का, मोर्तब आदींचा उहापोह केलेला आहे. बरीचशी मुळ पत्र ही मोडी भाषेत होती. लेखकाने ती मराठी लिपीत लिहीली आहे. परंतू भाषा तत्कालीन आहे.
बरीचशी पत्रे ही वतनदारांच्या वतनदारीतील झगडा मिटवण्यासाठी, समझोता करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी, शिक्षा फर्मावण्यासाठी, लढाईत मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटूंबाच्या सांत्वनेसाठी, देव देवळे तसेच मशीदी/ दर्गे (होय मशीदी/ दर्गे सुद्धा!) यांचे अनुष्ठान चालू राखण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारांपैकी आहेत. त्यात राजाराम, समर्थ रामदास, मिर्झा राजे, औंरंगजेब, बाजीप्रभू देशपांडे आदिंसाठी लिहीलेली देखील पत्रे आहेत. त्यात चिंचवडच्या देवस्थानाचे भट, पर्वती देवस्थानाचे भट, पिंपरी येथील पत्रव्यवहार आदी उल्लेख आहेत. याच पत्रात दादोजी कोंडदेव यांच्याकडून शिवाजी महाराजांना शिक्षण द्यावे हा उल्लेख पुराव्यानीशी सापडतो हे महत्वाचे.
एका पत्रात शिवाजी महाराजांनी शत्रू चालून आल्यावर काय करायचे, रयतेस घाटाखाली कसे आधीच हलवायचे, गनिमाने चढाई केल्यास कसे पळायचे या सुचना आहेत, तर एक किल्ला बांधतांना पावसाळ्यात हाल होवू नये म्हणून घरांची कशी काळजी घ्यावी ते लिहीलेले आहे. दोन एक पत्रव्यवहार इंग्रजांशी केलेले देखील सापडतात.
शिवाजीराजेंचे विचार धर्मातीत होते तरीही आपले स्व: ताचे स्वराज्य उभे रहावे या मागची त्यांची तळमळ, सहिष्णू वृत्ती पत्रांमधून पुराव्यानिशी दिसून येते.
एक ऐतिहासीक ठेवा म्हणून पुस्तकाचे मुल्य अमुल्य आहे.
देवपुरूष शिवाजी राजांना वंदन!
जय शिवराय!
प्रतिक्रिया
23 May 2010 - 9:02 am | यशोधरा
नक्की घेईन हे पुस्तक. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद.
23 May 2010 - 11:06 am | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो. हे पुस्तक नक्कीच वाचायची इच्छा आहे.
बिपिन कार्यकर्ते
23 May 2010 - 11:11 am | आनंद
धन्यवाद.
हे पुस्तक कुठे मिळेल.
23 May 2010 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुस्तक परिचयाबद्दल धन्यु.......!
-दिलीप बिरुटे
24 May 2010 - 12:39 am | शुचि
चांगली ओळख.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||