ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २

नीधप's picture
नीधप in जनातलं, मनातलं
16 May 2010 - 12:01 pm

गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मिसळपाववर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मिसळपाववर लिहिणार्‍यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे. त्यामुळे हे इथल्यांपर्यंतही पोचवावे असे वाटले.
तर असो....
कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी या तिघांनी अतिशय उत्तमपणे या मेळाव्याचे संयोजन (आर्थिक बाजूसकट) उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांचे आभार. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या ब्लॉगर्सनी लिहिलंच आहे. कोण कोण आले होते पासून काय काय खाल्ले इथपर्यंत सगळंच बहुतेक ब्लॉगपोस्टस मधे आलेलं आहे. तेव्हा मी त्यावर काय बोलणार अजून!
मेळाव्यानंतर घरी गेल्यावर लगेच लिहिले गेले असते तर नक्कीच सरळसोट वृत्तांतापलिकडे मीही लिहिलं नसतं आणि कदाचित ज्यांनी लिहिलंय त्यांच्याइतकं चांगलं मला लिहिताही आलं नसतं. आणि माझा आळशीपणाही होताच त्यामुळे मेळावा झाल्या झाल्या लिहायचं राहूनच गेलं.
तेव्हा आता वृत्तांतापलिकडे जाऊन मेळाव्यासंदर्भाने पुढे आलेल्या आणि मला महत्वाच्या वाटलेल्या काही गोष्टींबद्दलच मी लिहेन म्हणते.
मेळावा छान पार पाडण्यासाठी संयोजकांचे कष्ट होतेच यात वाद नाही पण त्यांनी जे ठरवलंय ते योग्य रितीने पार पडावं याची जबाबदारी आपली सगळ्यांची म्हणजे जमलेल्या सगळ्या ब्लॉगर्सची आहे. हे अर्थातच ब्लॉगर्स मेळावाच नव्हे तर कुठल्याही सभासंमेलनाच्या बाबतीत खरं आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपण ते पाळतो का? संयोजकांनी मेळाव्याची एक रूपरेषा ठरवलेली आहे. ती इमेलमधून पाठवलेलीही आहे तर त्या रूपरेषेनुसार कार्यक्रम व्हावा ही जबाबदारी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नाही का? जर पहिलं सेशन, पहिला कार्यक्रम हा केवळ ब्लॉगर्सनी स्वतःची थोडक्यात ओळख करून देण्याचा आहे तर आपण किती वेळ बोलायचं याला मर्यादा आपण घालायला नको का? की थोडक्यात या शब्दाची व्याख्या/ अर्थ आपल्याला माहीत नाहीयेत? जे सगळे विस्ताराने बोलले त्यांचं म्हणणं महत्वाचं होतं हे निश्चित. पण थोडक्यात ओळख च्या ऐवजी नंतरच्या सेशनमधे ते केलं गेलं असतं तर विस्तृत भाषणांनंतर ज्या ब्लॉगर्सच्या ओळखी झाल्या त्यांच्या ओळखींमधे आणि नंतरच्या सेशनमधेही लोकांना इंटरेस्ट राह्यला नसता का? संयोजकांनी ठरवलेल्या रूपरेषेला धाब्यावर बसवण्यात आपल्याला काय भूषण वाटतं? की हा पण एक मराठी बाणा आहे?
देवनागरी लिखाणाचे तंत्र यावर आपण सगळ्यांनी भरपूर किंवा सगळ्यात जास्त उहापोह केला. काहींना मुळाक्षरांच्या सेटसप्रमाणे किबोर्ड असल्यामुले लिखाण सोपे वाटत होते. काहींनी फोनेटिक किबोर्ड जवळ केला होता. स्पेलचेक, शुद्धलेखन इत्यादींच्या अनुषंगाने काही मुद्दे मिळाले. ते जामच तांत्रिक असल्याने माझ्या अर्थातच लक्षात राह्यले नाहीत. आणि मुळात ओळख प्रकरणांमधे खूप वेळ गेलेला असल्याने तोवर काही ऐकण्याचा पेशन्स बहुतेक संपला होता. तिथे दिली गेलेली तांत्रिक माहिती कुणी एकगठ्ठा आपल्या ब्लॉगमधे टाकली तर नीट समजून घ्यायला फार आवडेल.
पुढचा मुद्दा कॉपीराइट इश्यूचा. आपण आपल्या लेखात फोटोग्राफ्स कुठून उचलून वापरत असू तर ते तसे वापरणे हे मुळात violation आहे. तसे करणे चुकीचे आहे हीच गोष्ट बहुसंख्य ब्लॉगर्स किंवा इतरांच्या गावी नसते. फॉरवर्ड पाठवणारे किंवा काही ब्लॉगर्स हे केवळ मला आवडलं मी शेअर केलं असा सूर लावतात, त्यापुढे जाऊन आम्ही प्रसिद्धी देतोय या गोष्टींना अशी शेखीही मिरवतात. ही वृत्ती मोडण्यासाठी मुळात काहीतरी करायची गरज आहे. मराठी ब्लॉगर्स म्हणून आपण आपलं अस्तित्व उभं करत असताना या काही मुद्द्यांकडे आपण जायला हवे. कॉपीराइट संदर्भातले तांत्रिक ज्ञान महत्वाचे आहेच पण अ‍ॅटिट्यूड, वृत्ती याबद्दल पण आपण जबाबदार मराठी ब्लॉगर्स म्हणून आपल्या ब्लॉग्जमधून भाष्य करायला हवे. निदान काही ढापू लोक जे अनभिज्ञ आहेत ते तरी सुधारतील. स्मित
अर्थात ह्या झाल्या तांत्रिक गोष्टी. संपूर्ण कार्यक्रमात या तांत्रिक गोष्टींपलिकडे कोणी बोलायलाच तयार नाही की काय असं वाटलं. ब्लॉग्ज मधून येणारे विषय, लिखाण यांचा मर्यादित स्कोप यावर प्रसन्न जोशीने खूप महत्वाचे मुद्दे मांडले. मराठी ब्लॉग्ज मधे मराठीपण हे ज्ञानेश्वर-तुकाराम, वपु-पुलं, गणपती-दिवाळी, वडापाव यापलिकडे जातच नाही. मराठी ब्लॉग्जमधे या पलिकडचे विषय फारसे येत नाहीत. मराठी बाहेरचं इतर साहित्य मराठीत आणलं जाणं असं फारसं काही घडत नाही. ब्लॉगला मराठी शब्द शोधण्यापुरताच आपला मराठीचा अभिमान असतो. हा असा अट्टाहास योग्य आहे का? असं काहीसं त्याचं म्हणणं होतं. मुद्दा महत्वाचा होता. पण कदाचित खूप वेळ भाषणबाजी झाल्यामुळे असेल त्या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली गेली आपण सगळ्यांकडूनच. माझ्या आसपासच्या खुर्चीवरून कशासाठी जायचं या पलिकडे? कशासाठी पहायचं यापलिकडे? अशी कूपमंडूक प्रतिक्रियाही खुसखुसताना मी ऐकली.
मुद्दा मला महत्वाचा वाटला. मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय इत्यादी. मराठी भाषेबाहेरचं काहीतरी मराठीत आणणं सोडाच महाराष्ट्रातल्याच आयुष्याबद्दल बरंच काही आपल्यापर्यंत सर्वांगाने पोचत नाहीये. आपल्याला ते शोधावसं, लिहावसं वाटत नाहीये. मराठीपणाच्या कक्षा आपल्या बुद्धीत रूंदावत नाहीयेत आणि त्यामुळे मराठीपणाचे बरेचसे पैलू आपल्याला दिसतच नाहीयेत.
आता याची कारणं म्हणायची तर मला सापडलेली ही काही कारणं...
१. इंटरनेट हा प्रकार उपलब्ध असणं, तेही अश्या प्रकारच्या लिखाणासाठी मुक्तपणे उपलब्ध असणं हे अजूनही ठराविक व्यवसायांपुरतंच आणि शहरांपुरतंच मर्यादित आहे.
२. उपलब्धता असली तरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट या संदर्भातली भीड चेपली जायला अजून वेळ आहे. हे इतर व्यवसाय आणि लहान गावे यांच्यासंदर्भात
या दोन कारणांमुळे खूप ठराविक लोकच लिहिणारे आहेत आणि त्यामुळे निश्चितच वैविध्याची कमतरता आहे.

३. आपली (माझ्यासकट आपली सगळ्यांची) कवाडं अजून बर्‍याच अंशी बंद आहेत. यापलिकडे आहेच काय/ गरजच काय याप्रकारची मानसिकता आपली सगळ्यांचीच आहे कमी अधिक प्रमाणात.
४. ब्लॉग लिहिणे हे अजूनही आपल्या ओळखीच्यांपुरते लिखाण, गंमत म्हणून लिखाण इतपतच आहे. त्याचे ते स्वरूप जोवर बदलत नाही (आपल्याकडून आणि इतर अनेक तांत्रिक पातळ्यांवर सुद्धा) तोवर त्यात गांभीर्याने दखल घ्यावी असे थोडेसेच असणार.

अर्थात ही सगळी 'कारणे' झाली. स्वतःच्या, स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!!

या मर्यादित विषयांच्या पार्श्वभूमीवर मला काही जणांचं लिखाण महत्वाचं वाटतं. त्यातले आत्ता आठवणारे हे दोन.
१. झुलेलाल उर्फ दिनेश गुणे http://zulelal.blogspot.com - दर वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जगण्याबद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या जगण्याबद्दल एक काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. एखादा प्रश्न, समस्या, नवी वाटचाल, एखादा तिढा असं काहीतरी नेहमीच्या चक्कीपेक्षा वेगळं, काहीतरी खूप महत्वाचं आणि आपल्या आयुष्यांशी अप्रत्यक्षपणे का होईना निगडीत असणारं प्रामाणिक लिखाण. परत भाषाशैली अप्रतिम आहेच.
२. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com - सुरूवातीला मायबोलीवर याचं काही वाचलं तेव्हा ब्राह्मणविरोधी/ ब्राह्मणद्वेष्ट्या विचारांपलिकडे काही दिसलं नाही. रागही आला. पण मग त्याने त्याच्या भामरागडबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, तिथल्या चालीरितींबद्दल लिहायला सुरूवात केली तेव्हा सुखद धक्का होता. सहज, उस्फूर्त आणि वेगळ्या आयुष्याबद्दलचं लिखाण. पण तरी मराठीपणातलंच(भाषा वेगळी असली तरी ते मराठीपणच), महाराष्ट्रातलंच. आपल्यापेक्षा वेगळा समाज आपल्यापुढे उभा करणारं आणि पर्यायाने आपल्याला विचारात पाडणारं.

अजूनही बरेच आहेत पण सध्या पटकन हे दोन आठवतायत.

तर असो.. मर्यादा तोडण्याच्या नावाने चांगभलं करून सध्यापुरती माझ्या किबोर्डाला विश्रांती देते. तुम्हीही थकला असाल तर उतारा म्हणून वरचे दोन ब्लॉग्ज नक्की वाचा. याला आमच्या मायबोलीवर रिक्षा फिरवणे म्हणतात. म्हणोत म्हणतात तर. मेरेको क्या!!

- नी

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

16 May 2010 - 12:47 pm | प्रमोद देव

नीरजा,एका वेगळ्याच दृष्टीकोनातून मांडलेला तुझाही वृत्तांत आवडला.

इतर भाषांतून इथे काही भाषांतर करून आणायचं म्हटलं तर त्यासाठी आधी त्या भाषेचा व्यवस्थित अभ्यास हवा, वाचन हवं..तरच पुढे काही करता येईल.
पण बहुसंख्यांकांचा कल हा सहजप्रवृत्तीवर असतो..ज्यामुळे ते आपल्या कोशातून बाहेर पडू शकत नाहीत....माझ्यापुरतं सांगायचं तर माझं तसंच आहे..मी तसा कूपमंडूक वृत्तीचा ,अल्पसंतूष्ट माणूस आहे...म्हणून माझ्या लेखनाला मर्यादा ह्या येणारच..... इथे मी हा प्रातिनिधिक आहे!!!

नीधप's picture

16 May 2010 - 12:57 pm | नीधप

काका या 'मी' मधे मी स्वतः पण समाविष्ट आहेच.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

16 May 2010 - 4:48 pm | प्रकाश घाटपांडे

मी तसा कूपमंडूक वृत्तीचा ,अल्पसंतूष्ट माणूस आहे.

अशा अनेक मीं चा समुह मराठी कक्षा रुंदावु देत नाही. यात मी देखील समाविष्ट आहेच.
'मी' नी 'तुम्ही' मिळून 'आपण' जेव्हा होउ तेव्हा या कक्षा नक्कीच रुंदावतील. किमान तशी आशा करु यात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

रामदास's picture

16 May 2010 - 9:26 pm | रामदास

पण दिनेशचा फॅन आहे.
वृतांत स्फूर्तीदायक वाटला.

नीधप's picture

17 May 2010 - 1:04 pm | नीधप
पक्या's picture

17 May 2010 - 9:47 pm | पक्या

वृत्तांतातले मुद्दे पटले.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

टुकुल's picture

17 May 2010 - 10:40 pm | टुकुल

व्रुतांत पटला आणी आवडला पण.

--टुकुल

आमच्या संकुचित विश्वाचा आणि अतिसामान्याने संतुष्ट होण्याच्या वृत्तीचा आजकाल सगळीकडे फार उदोउदोही होतो आहे, असे वाटते. आभासी विश्वाच्या पलीकडची उदाहरणेही पुष्कळ आहेत. महाराष्ट्र टाईम्स वा सकाळसारख्या वृत्तपत्रांनी आजकाल सर्वसामान्य माणसाच्या लिखाणाला प्रसिध्दी देण्याच्या बहाण्याने दर्जात्मक, विचारप्रधान, प्रगल्भ साहित्यास पार अडगळीतच टाकले आहे. सर्वसामान्य माणसांच्या अतिसामान्य लिखाणास अक्षर साहित्य मानले की काय होते, ते पाहाण्यास सकाळचे 'मुक्तपीठ' हे साप्ताहिक सदर वाचावे.

बहुसंख्य माणसे अतिसामान्य असणार, हा निसर्गनियमच आहे; पण त्यात हुरळून जाण्यासारखे मात्र काही नाही, एवढे जरी लक्षात घेतले, तरी पुष्कळ होईल, असे खेदाने म्हणावेसे वाटते.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

ब्लॉगिंग सारख्या गोष्टीमधे असामान्य प्रतिभेच्या दर्शनाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? ब्लॉगिंग या संकल्पनेचे यशच मुळी, साधनाच्या आणि वाचकांच्या सहज उपलब्धतेमुळे सामावलेले आहे. आता याला "यश" न म्हणणे हा देखील एक दृष्टीकोन असू शकतोच. अनेक पारितोषिकप्राप्त ब्लॉग्ज चे स्वरूप हे काही नवनिर्मिती घडवण्याचे नसून आपला दृष्टीकोन मांडण्याचे किंवा जुनी संशोधने लोकांसमोर आणण्याचे असते. (उदा, खट्टामिठा ब्लॉग. एक उत्तम ब्लॉग. पण त्यात जी माहिती आहे ती धनंजय कीर, रा चि ढेरे यांच्यासारख्यांच्या लिखाणातून आली आहे. तरीही . ब्लॉग म्हणून तो उत्तमच आहे. ) अनेक ब्लॉग्जचे स्वरूप रसग्रहणात्मक असते. (उदा. गणेश मतकरींचा चित्रपटविषयक ब्लॉग)

हे झाले "वैचारिक" किंवा"माहितीपूर्ण" लिखाणाबद्दल. ललितकृतींबद्दल उपरोक्त मत ग्राह्य धरले जाऊ शकेल कदाचित. त्यातल्या दर्जाचा विचार खुद्द लेखकांनी कितपत केलाय ही शोचनीय बाब असते ही गोष्ट खरी आहे. इथे मुद्दा संप्रेषणाचा आहे. व्यक्त होण्याचा आहे. चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळींनंतर आलेली चारोळींच्या चोपड्यांची लाट आठवा. यातली अनेकानेक पुस्तके कविमहाशयांनी आपापल्या खिशाला चाट देऊन छापली होती. आता तर काय , हाताशी एखादा आय एस पी असण्याची खोटी आहे.

मात्र, या "चोपडे"कारांना कुणी धोपटण्याइतके , त्यांची दखलही घेण्याइतपत कष्ट कुणी घेतल्याचे स्मरत नाही. मग ब्लॉग्जवरच हा दांत का ? की "ऑनलाईन" लिखापढीचा पन्हाच इतका अरुंद आहे की , जे आहे त्यावरच आपण टीका करणे भाग आहे ? तसे असल्यास , "ऑनलाईन लिखाणाला, छापील लिखाणाच्या तुलनेने अजून पुष्कळ पल्ला गाठायचा आहे. अजून हे बाळ रांगते आहे. " हा मुद्द्दा मान्य होण्याजोगा आहे काय ?

चिंतातुर जंतू's picture

18 May 2010 - 10:25 am | चिंतातुर जंतू

६०-७०च्या दशकांतील हौशी मराठी रंगभूमीचे उदाहरण यास समांतर म्हणून घेता येईल. लहान-लहान, हौशी, स्वखर्चाने चालणार्‍या अनेक संस्थांनी दखलपात्र अशी कामगिरी त्या काळात केली. त्यामागे उत्साही तरुण मंडळी होती. व्यावसायिक नाटकांच्या तुलनेत हे एक प्रकारचे लोकशाहीकरण होते. ब्लॉगर्सनी मनात आणले तर आजही असे लोकशाहीकरण कदाचित होऊ शकेल. टी. आर. पी. नसणार्‍या विषयांची हेतुपुरस्सर हेळसांड करणार्‍या व्यावसायिक प्रसारमाध्यमांची वाटचाल आणि साहित्य संमेलनांत पाककृती आणि व्यवस्थापनाची पुस्तके विकून व्यावसायिक प्रकाशनांनी घातलेले घातक पायंडे अशा गोष्टींना ब्लॉग्जच्या माध्यमातून छेद देता येईलही, पण त्यासाठी मुळात आपल्याच अतिसामान्यत्वाविषयी असणारा वृथा अभिमान सोडून द्यावा लागेल. 'हौशी' म्हणजे 'सकाळ मुक्तपीठ'च्या पातळीचा आविष्कार की 'रंगायन', 'थिएटर अ‍ॅकॅडमी' अशा पातळीचा आविष्कार हे ब्लॉगर्स स्वतःचे स्वतःच ठरवू शकतील, पण त्यासाठी आत्मसंतुष्टता सोडून थोडा त्रास घ्यावा लागेल.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नीधप's picture

18 May 2010 - 1:19 pm | नीधप

हौशी, व्यावसायिक, समांतर/ प्रायोगिक रंगभूमी आणि ब्लॉग्जची तुलना पटली. आवडली. मला ज्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचंय ते या तुलनेतून थोडं जास्त स्पष्ट होतंय.
धन्यवाद.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

18 May 2010 - 4:43 pm | मुक्तसुनीत

व्यावसायिक, समांतर/ प्रायोगिक रंगभूमी आणि ब्लॉग्जची तुलना आवडली.
हेच म्हणतो.

प्रस्तुत कल्पना खरोखरच विचार करण्याजोगी. यामुळे विद्वानांच्या वर्तुळातल्या आवडत्या एका संज्ञेची तीव्रपणे आठवण झाली :-)

माझ्यामते संघटित होण्याचे प्रयत्न हे कमीअधिक प्रमाणात चालले आहेतच. त्यांचे स्वरूप पुंजक्यांचे आणि तात्कालिक आहे. समविचारी किंवा समान-प्रकृती ब्लॉग्जची ऑनलाईन कंपायलेशन्स काढली जातात. यातून आजवर व्यक्त न होऊ शकलेल्या वर्गामधून काहीतरी जोमदार आविष्कार निघावा ही सदिच्छा.

प्रकाश घाटपांडे's picture

18 May 2010 - 5:40 pm | प्रकाश घाटपांडे

विद्रोही साहित्य संमेलनातील परिसंवादात अतुल पेठे यांनी ही तुलना पर्यायी माध्यमे व प्रायोगिक रंगभुमी अशी केली होती.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नीधप's picture

18 May 2010 - 1:17 pm | नीधप

ब्लॉगिंग सारख्या गोष्टीमधे असामान्य प्रतिभेच्या दर्शनाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? <<
थोडसं कन्फ्युजन होतंय का? असामान्य प्रतिभेचं दर्शन अपेक्षित नाहीये. विषयांचं वैविध्य अपेक्षित आहे. थोडं आपल्या नजरेच्या टप्प्याबाहेर काय आहे याचा शोध घेणं अपेक्षित आहे. दर्जा थोडा उपजत, थोडा सरावाने येईलच की.

>>अनेक पारितोषिकप्राप्त ब्लॉग्ज चे स्वरूप हे काही नवनिर्मिती घडवण्याचे नसून आपला दृष्टीकोन मांडण्याचे किंवा जुनी संशोधने लोकांसमोर आणण्याचे असते.<<
ब्लॉग्जनी नवनिर्मिती करायलाच हवी असे नाहीच पण लोकांसमोर आणायच्या गोष्टींच्या याद्या थोड्या विस्तारल्या तर बरे नाही का? निदान आत्ता फारच मर्यादित गोष्टी समोर येतायत हे तरी मान्य व्हावं.

>>मात्र, या "चोपडे"कारांना कुणी धोपटण्याइतके , त्यांची दखलही घेण्याइतपत कष्ट कुणी घेतल्याचे स्मरत नाही. मग ब्लॉग्जवरच हा दांत का ? <<
त्या फालतू चोपड्या आणि ब्लॉग यांच्यात फरक आहेच की. ब्लॉग या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे. मी माझा टाइपच्या चोपड्या दुर्लक्ष करून सोडता येण्याजोग्याच. ब्लॉग हे एक संपूर्ण माध्यम आहे. एक ठराविक तथाकथित काव्य प्रकार नव्हे. आणि त्या चोपड्यांना धोपटले नाही म्हणून ब्लॉग्जबद्दल काहीच म्हणायचे नाही याचे लॉजिक समजले नाही.

>>"ऑनलाईन लिखाणाला, छापील लिखाणाच्या तुलनेने अजून पुष्कळ पल्ला गाठायचा आहे. अजून हे बाळ रांगते आहे. " हा मुद्द्दा मान्य होण्याजोगा आहे काय ?<<
याबद्दल वाद नाही पण रांगत्या मुलालाही कसे वाढवायचे हा विचार आईबाप करतातच की.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

आनंद घारे's picture

18 May 2010 - 6:53 pm | आनंद घारे

ब्लॉग्जनी नवनिर्मिती करायलाच हवी असे नाहीच पण लोकांसमोर आणायच्या गोष्टींच्या याद्या थोड्या विस्तारल्या तर बरे नाही का? निदान आत्ता फारच मर्यादित गोष्टी समोर येतायत हे तरी मान्य व्हावं.
या दृष्टीने मी एक अल्पसा प्रयत्न चालवला आहे. चंद्रमापासून सुरुवात करून विमानांचे उड्डाण, अवकाशात भ्रमंती, पंपपुराण आदि वेगळ्या विषयांवर मी अनेक भागांमध्ये विस्तृत लेखमाला माझ्या ब्लॉगवर दिल्या आहेत.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

शुचि's picture

18 May 2010 - 5:14 am | शुचि

>> पण थोडक्यात ओळख च्या ऐवजी नंतरच्या सेशनमधे ते केलं गेलं असतं तर विस्तृत भाषणांनंतर ज्या ब्लॉगर्सच्या ओळखी झाल्या त्यांच्या ओळखींमधे आणि नंतरच्या सेशनमधेही लोकांना इंटरेस्ट राह्यला नसता का?>>
माझा व्यावसायीक आयुष्यातील एक वाईट अनुभव वरच्यासारखाच - लोकांना बोलायची संधी दिली की ते जाम सोडत नाहीत माईक. मी आणि माझा सहकारी अम्हाला समसमान संधी होती बोलायची एका महत्त्वाच्या व्यक्तीपुढे पण या सहकर्‍यानेच इतक म्हणजे अक्खा वेळ खाल्ला वर त्याला त्याची बोचही नव्हती.मी धडा शिकले की वेळ पडेल तेव्हा व्यत्यय आणून आपला हक्क घ्यावा लागतो.

लेख आवडला. विचार नीट समजले.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||