पुन्हा नवी धून छेड, जुने राग गाऊ नको
वाट चुकवेल वाट, वळणांनी जाऊ नको
रानवारा अंगणात, गुणगुणेल कानात,
तुला वेळूच्या बनात बोलावेल; जाऊ नको
धुंद केवड्याचे रान, गंधमुग्ध पान पान,
हरपून गेले भान, असे वेड लावू नको
माझ्या भाळी गोंदले तू गर्द पळसाचे ऋतू
भावबंधाचे हे सेतू ओलांडून जाऊ नको
येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून?
काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको
नको घाई, जरा थांब; पावसात चिंब चिंब
ओंजळीत चार थेंब, टिपून ते घेऊ नको
प्रतिक्रिया
19 Jan 2010 - 9:14 pm | सुवर्णमयी
मस्त कविता. आवडली
19 Jan 2010 - 9:16 pm | श्रावण मोडक
दुसरी द्विपदी जमलेली नाही.
तिसरीनं वेड लावलं. गुणगुणत बसलो.
पळसाचे ऋतू, अंधारलेली सांज गंभीर मूडचे.
'नको घाई, जरा थांब...' ही द्विपदी वाचतानाच 'नको घाई, थांब जरासा' अशी वाचली. तीही आवडली.
19 Jan 2010 - 9:25 pm | प्राजु
सुरेख!
येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून?
काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको
मस्त!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/