शनिवार : दिनांक १९/१२/२००९
सौभाग्यवती गुरूवारीच सोलापूरी, माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या विकांताचे आमचे प्लानिंग सॉलीड ठरवले होते. म्हणजे शनिवारी पहाटे १० वाजता उठायचे. मग चहा करुन घ्यायचा. त्याप्रमाणे उठलो. चहाचा (करायचा) कंटाळा आल्याने नुसतेच थंडगार दुध घशाखाली उतरवले.
नाष्ट्याला काय बनवावे बरे? :/
पोहे, उप्पीटाचा कंटाळा आलाय. मॅगी नावाच्या शेवया मला आवडत नाहीत. घरातली पास्त्याची पाकीटे संपलेली. आधी विचार आला की पनीर पकोडे वगैरे काहीतरी मस्त चमचमीत करुन खावे. पण फ्रीज उचकला तेव्हा लक्षात आले की फ्रीज मध्ये पनीरच काय, साध्या हिरव्या मिरच्याही नाहीत. :T . मग शेवटी वैतागुन टोमॅटो ऑम्लेट (मिरचीशिवाय) आणि ब्रेड फ्राय वर भागवले. आधीच ठरवले होते की हा शनिवार दाढी करणे, आंघोळ करणे असल्या किचकट आणि घाणेरड्या कामांना सुट्टी द्यायची. (शिव्या घालायला घरमालकिण नव्हती ना! ;-) ) . मग चहा- नाष्टा झाल्यावर शांतपणे दात घासायला म्हणुन ब्रशवर पेस्ट घेतली. (केवढे उपकार कोलगेट वाल्यांवर), दात घासत घासत खिडकीपाशी आलो आणि खिडकीबाहेर लक्ष गेले. रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यात कबुतरांची मस्त आंघोळ चाललेली होती.
ते बघितले आणि माझी मलाच लाज वाटली. म्हटले लाजेकाजेस्तव का होइना दोन तांबे अंगावर ओतुन घेणं मस्ट आहे आता. ती कबुतरे बघुन मला आमच्या घरातल्या नुकत्याच बाळंत झालेल्या माहेरवाशीणीची आठवण झाली. मग तिचे हाल हवाल विचारण्यासाठी हलकेच तिच्या खोलीत डोकावलो. बाईसाहेब शांतपणे बाळोबांच्या आगमनाची वाट पाहात बसल्या होत्या.
आमच्या स्वयंपाकघराच्या मागच्या बंद बाल्कनी कम अडगळीच्या जागेत, अगदी दाराच्या मागेच या बाईसाहेबांच्या मिस्टरांनी आपले घर बांधलेले आहे. त्यामुळे गेले जवळ जवळ एक महिना माझे - आमचे त्या खोलीत / बाल्कनीत जाणे बंदच आहे. कारण दारच उघडता येत नाही.
बाप्पांना मात्र आज आंघोळीला सक्तीची सुट्टी दिली. खारघरमध्ये आजकाल केवढी थंडी पडतेय. म्हटले उगाच रोज रोज स्नान करुन सर्दी व्हायची बाप्पाला. तो सगळ्या विश्वाची काळजी वाहतो. त्याची कोण वाहणार? आपणच ते करायला हवे? एवीतेवी अंगावर दोन तांबे ओतुन घेतलेच होते, मग नुसताच बाप्पापुढे दिवा लावुन घराबाहेर पडलो.
आता निरुद्देश्य भटकंती. गळ्यात माझा नेहमीचा सोबती कॅनन A550 (7.1 mp) अडकवला. त्याच्या पाउचमध्ये एक छोटीशीच पाण्याची बाटली टाकली आणि घराबाहेर पडलो. कुठे जायचे ते ठरवले नव्हतेच. खाली उतरलो आणि बाईकला चावी लावली. नेमका तेव्हाच विचार आला, आज "बैकपोळा" साजरा करायला काय हरकत आहे? बिचारी दररोज मुकेपणाने सेवा करते आपली, चलो आज उसको भी छुट्टी !
आजची भटकंती सार्वजनिक वाहनाने. बिल्डिंगच्या बाहेर येवुन खारघर स्टेशनला जाणारी बस पकडली ...
खारघर स्टेशनला आलो , तिकीट काढले आणि प्लॅटफॉर्मवर येवुन एका बाकड्यावर टेकलो. तेवढ्यात भ्रमणध्वनी बोंबलला, नेहमीप्रमाणेच मी कुणाचा आहे ते न चेकता रिसिव्ह केला आणि मग स्वत:लाच लाखोली वाहीली. पलिकडे सौ. होत्या....., पहिलाच प्रश्न ....
"निघालात का उंडगायला?"
"माझ्या प्लानबद्दल तिला कसे कळले?" हा आणि असले मुर्ख, वेडगळ प्रश्न मला आजकाल पडत नाहीत. गेल्या पाच वर्षाच्या अनुभवाने मला पक्की खात्री पटली आहे की एकतर ती सर्वसाक्षी आहे किंवा तिला एका वेळी अनेक ठिकानी गुप्तपणे हजर असण्याची विद्या तरी अवगत आहे. त्यामुळे नकार देण्याचा मुर्खपणा न करता मी होकार दिला आणि मग गॅस बंद केलास ना नीट? लाईट्स ऑफ केल्या? दाराला नीट कुलूप लावलेस? झाडांना पाणी घातलेय ना? देवापुढे दिवा लावलाय ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देताना "चहा घेतलास का? नाष्टा केलास का ?" अशा अनावष्यक आणि फालतु प्रश्नांना तिने पद्धतशीरपने फाटा दिलाय हे लक्षातच आले नाही. (ती ओळखुन आहे तिच्या नवर्याला, खाण्यापिण्याच्या बाबतीत हयगय करत नाही आपण. ;-) )
"एक्स्क्युज मी सर, यहा पर लेडीज डिब्बा आता है! "
"च्यायला हिचा आवाज एवढा गोड कसा काय झाला? " मी नकळत जरा जोराने बोललो आणि ते नेमेके सौ.ने ऐकले.
"मी नाहीय ती ! तु नेहमीप्रमाणे वेंधळ्यासारखा लेडीज ड्ब्ब्यासमोर उभा असशील, कुणीतरी समोरुन सांगतेय. पुढे बघ....." फोनमधून आवाज आला आणि मी विलक्षण आनंदलो.
नाही, नाही चुकून का होइना लेडीज ड्ब्ब्यासमोर उभा राहीलो/बसलो म्हणुन नाही आनंदलो , तर आमच्या सौ.ने "मुद्दाम साळसुदासारखा" हा शब्द न वापरता "वेंधळ्यासारखा" हा शब्द वापरला म्हणुन सुखावलो. विशालराव, प्रगती आहे; तुमची प्रतिमा सुधारतेय हळु हळू !
"बरं...बरं मी नंतर करतो फोन म्हणत मी बाकड्यावरुन उठलो आणि समोरच्या शोडषेला सॉरी म्हणत तिच्या नजरेच्या अनुरोधाने बघायला लागलो. तिच्या चेहर्यावर हास्य आणि डोळ्यात मात्र ...." मेल्यांना बोर्ड वाचायला नको, पण निदान दिसतही नाही का? " असे होते आणि नजर मात्र डोक्यावर टांगलेल्या एका बोर्डकडे लागलेली होती. मी ओशाळल्या नजरेने त्या बोर्डकडे पाहीले त्यावरील मजकुर वाचला आणि खि खि करुन हसलो..... . बोर्ड बनवणार्याने मराठी आणि हिंदी दोन्हीची वाट लावलेली होती.
डोक्याला हात लावून आलेली लोकल पकडली. तिकीट वाशीपर्यंतचे होते. म्हणलं बघु वाशीला, काहीतरी अजुन पोटपुजा करु आणि मग पुढे निघू. वाशी स्टेशनच्या बाहेरील एका फुड जॉईंटवर छोले भटुर्यांवर हात साफ केले (अक्षरशः साफ करताना नाकी नऊ आले, इतके तेल होते भटुर्यांना ;-) ) आणि वाशी डेपोकडे निघालो. डेपोच्या शेजारचा महाराजांचा रुबाबदार अवतार बघून आपसुकच हात जोडले गेले. पण त्यांच्या मागचा गर्वे (?) फडकणारा भगवा मात्र फारच केविलवाणा दिसत होता. त्याला तिथे अडकवल्यापासुन बहुदा कधी काढून स्वच्छ धुतलेच नव्हते. वाईट वाटले....
कधीकाळी नवीन असताना तेजस्वी भासणारा त्याचा रंग आजमात्र धुळकट, मळकट वाटत होता. मनोमन त्याला म्हणालो...
"वृथा खंत करु नकोस बाबा. अगदी महाराजांना सुद्धा वर्षातुन एक दोन वेळाच स्नान करायला मिळते, शिवजयंती आणि निवडणुका जवळ आल्या की. तेव्हा पुढच्या निवडणुकीच्या वेळी तुझ्याकडे पण त्यांचे लक्ष जाईल अशी आशा बाळग. अखेर आशेवर तर जग कायम आहे. :-(
वाशी डेपोहून बस पकडून कुर्ला गाठले, तिथुन लोकल ट्रेनने छत्रपती शिवाजी टर्मिनस ! कॅननच्या (पावभाजी) दिशेने बाहेर पडलो.... , पोटपुजा करुन (पुन्हा... (?) ) आझाद मैदानाच्या कडे कडेने रमत गमत निघालो. विद्यापिठाच्या इमारतीसमोरुन जाताना रोडच्या बाजुला एका लहानगीची पोटापाण्यासाठी नशिबाशी चालु असलेली झुंझ दृष्टीपथात आली अन राहावले नाही. मग थोडा वेळ तिथेच थांबलो. मनात विचार आला, आपण खरेच किती नशिबवान आहोत. निदान हे सगळे तरी आपल्या वाट्याला आले नाही. तुलनात्मक रित्या यापेक्षा कितीतरी चांगले आणि सहज सोपे आयुष्य आपन जगतो, तरीही येता जाता नशिबाला नाहीतर गेला बाजार सरकारला लाखोल्या वाहातच असतो. खिशात हात घातला, दहाची नोट हातात आली, ती त्या लेकराच्या हातात टेकवली आणि पुढे निघालो. (नंतर राहून राहून वाटत राहीलं की आपण यापेक्षाही मोठी नोट तीला देवू शकलो असतो. पण दहाच्या नोटेवर भागवलं :-( . आपल्या स्वभावातली ही कृपणता कधी जाणार? )
तसाच फिरत फिरत हुतात्मा चौकात आलो. जहांगीरला एक तासभर वेळ काढला. (इथे मी आर्ट गॅलरीच्या आत फार कमी वेळा जातो. गॅलरीच्या बाहेर रोडवर जे कलाकार बसलेले असतात ना; ते ही तेवढेच सरस असतात.) त्यानंतर वस्तु संग्रहालयाला भेट देण्याचा मोह आवरून गेट वे कडे निघालो. इथे चालता बोलता जिवंत वर्तमानकाळ खुणावत असताना त्या भुतकाळाच्या पुरातन थडग्यात कुणाला स्वारस्य होते. सी.पी. ऑफीससमोरुन गेट वे कडे वळताना, माझ्याकडे पाठ करुन उभ्या असलेल्या पु. शास्त्रीजींच्या पुतळ्याकडे लक्ष गेले आणि क्षणभर स्थिरावलो.... ते दृष्य बघुन हसावे की खंत करावी तेच कळेना. हे इतके पुतळे जर जपता येत नसतील तर का उभे करतात लोक?
अगदी हीच अवस्था गेट वे वरच्या महाराजांची पण होती.
इथे मात्र शास्त्रीजींच्या पुतळ्यापाशी केलेली चुक सुधारायचे मी ठरवले. पुढे होवून , जोर जोरात ओरडून त्या कावळ्यांना उठवायचा प्रयत्न केला. परत मनात आले, त्याचा काय दोष? तो बिचारा थोडावेळ आराम करु पाहतोय, तर त्याच्या आरामात विघ्न आणणारा मी कोण? मग शेवटी तो प्रयत्न सोडून दिला. बहुदा त्याला पण माझी भावना कळली की काय कोण जाणे , पण नंतर बराच वेळ तो कावळा पुतळ्याकडे आलाच नाही.
बोटीत बसायची हुक्की आली म्हणुन तिकीट काढले आणि समुद्रावर चक्कर मारायला निघालो. साले पाऊण तास म्हणतात आणि २० मिनीटात फिरवून परत आणतात. तेवढ्यासाठी पन्नास रुपये पाण्यात ..... नव्हे बोटीत. आजुबाजुंचं सौंदर्य पाहात (सृष्टीसौंदर्य... उअगाच गैरसमज नकोत ;-) ) एकदाचा गेट वे कडे परतलो. समुद्रातुन गेट वे आणि शेजारचा ताज मोठे सुंदर दिसत होते.
ताजकडे बघताना साहजिकच २६-११ ची आठवण झाली. सगळे घाव पचवून पुन्हा ठामपणे उभ्या असलेल्या ताज कडे बघताना पुन्हा एकदा मनोमन मुंबईकरांच्या झुंझार, लढाऊ वृत्तीला आणि जिद्दीला मुजरा केला. ताजचा तो घुमट जणु जगातील समस्त खलप्रवृत्तींना आव्हान देत होता... ....!
"या कितीही वेळा आणि कितीही जण, पण भिंती पाडून घरे तोडता येत नाहीत आणि चार मुडदे पाडुन आमची हिंमत आमचा आत्मविश्वास तोडता येणार नाही."
तिथुन रस्त्याच्या कडेकडेने चालत नरिमन पॉईंटहून रमत गमत मरीन ड्राईव्हला पोहोचलो. दुपारचे चार वाजुन गेले होते. समुद्र आणि रस्ता यांच्यात अंतराय निर्माण करणार्या त्या नतद्रष्ट पॅरापेटवरुन चालत चालत गिरगाव चौपाटीकडे निघालो. नेहमीप्रमाणेच गर्दी होतीच. पण त्या तसल्या गर्दीत, रस्त्यावरच्या वाहनांच्या त्या कलकलाटातही एक आजोबा अगदी तल्लीन होऊन वर्तमानपत्र वाचत बसले होते. मला त्यांच्या एकाग्रतेचा हेवा वाटला. कसं जमत असेल हे?
परत मनात एक वेगळाच विचार आला की कदाचीत परिस्थिती काही वेगळीही असु शकेल. निवृत्तीनंतर ज्या वयात घरात आरामात दिवस काढायचे, फार फार तर सायंकाळी उन्हे उतरल्यानंतर फिरायला म्हणुन समुद्रावर यायचे त्या वयात हे असं भर उन्हात समुद्रावर येवुन बसायची वेळ का यावी या आजोंबावर? मनातल्या मनात तो त्यांच्या स्वेच्छेचा प्रश्न असावा अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतच मी गिरगाव चौपाटीला पोचलो. मला या अशा गर्दीच्या जागा खुप आवडतात. शांतपणे , तटस्थपणे अगदी अलिप्त राहून माणसांची अनेक रुपे अनुभवता येतात, अभ्यासता येतात. या ठिकाणी माणुस आपले वय विसरून जातो. आता हेच बघाना... या लहानग्याचे आत्तापासुनच घर बांधायचे प्रयत्न सुरू होते.
तर हे सदगृहस्थ आपले वय विसरून पुन्हा आपले शैशव जगण्याचा, लहान होण्याचा प्रयत्न करत होते.
इथेच अनेक कमनशिबी , आपले लहानपणच गमावून बसलेल्या, तरीही न डगमगता आयुष्याशी झगडणार्या काही लहानग्यांची भेट झाली. त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांच्याकडून काही फुगेही विकत घेतले आणि नंतर तिथल्याच बाल गोपाळात वाटून टाकले.
"क्या करे साब ! अल्लाने ऐसेइच भेजा है इधर, तो ऐसेइच जीनेका ! पर जीना हे तो काम तो करना पडेंगाच ना !" त्या दहा-बारा वर्षाच्या लेकराच्या तोंडुन जगण्याचं हे तत्वज्ञान ऐकुन सुन्न झालो. तेवढ्यात तो पोरगा.... "ए पाच रुपैय्या...पाच रुपैय्या करत तिथुन आपल्या कामावर निघाला....
त्याच्या जगण्याच्या धडपडीला सलाम करत मी समुद्राकडे वळलो. सुर्यास्ताची वेळ झाली होती. भास्करबुवा घरी परतायच्या तयारीत होते, म्हणलं ते पळुन जायच्या आधी त्यांना एकदा भेटून घ्यावं. संध्याकाळच्या तांबुस छटा क्षितीजावर पसरायला लागल्या होत्या. सगळं आकाश हळु हळु लालसर, सोनेरी व्हायला लागलं होतं. समुद्रकिनार्यावर संध्याछाया रेंगाळायला लागल्या होत्या. मी पुन्हा एकदा कॅमेरा सरसावला....
मावळत्या सुर्याला प्रणाम करुन पुन्हा एकदा घरच्या रस्त्याला लागलो. आता इथुन दादरपर्यंत बसने, मग दादर ते कुर्ला पुन्हा लोकल ट्रेन..... ! कुर्ला ते खारघर....... बघू जशी इच्छा होइल तसे पुढचा प्रवास. बॅक टू पॅव्हेलियन.
उद्या रवीवार....., किमान बारा वाजेपर्यंत लोळत पडायचे. उठल्यावर ठरवू काय करायचे दिवसभर ते ! शुभ रात्री ! :-)
विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
29 Dec 2009 - 4:31 pm | दशानन
मस्त लिहले आहेस !
जियो !
जा आजपासून पिकासा तुझ्या नावावर केले ;)
* सकाळीच फोटो पाहीले होते, पण त्याचा संदर्भ एवढा मोठा असेल असे वाटले नव्हते :)
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
29 Dec 2009 - 6:35 pm | टारझन
अगदी !!!
झकास लिहीतात आपण ! फोटू आवडले. ष्टाईल पण भारी :)
आमच्या एका रूममेट च्या खोलीत ते कबुतर आंडी घालून गेलं बघा.. ह्या पोंध्याच्या ध्यानात पण नाही आलं .. आणि अंडी फेकायला गेला तर हातातंच फोडली =))
हल्ली खबुतरांचा सिझन चालू दिसतोय ;)
|| लुकास ||
29 Dec 2009 - 4:40 pm | बापु देवकर
एक उनाड दिवस मस्तच गेला की. शिवाय आम्हीही फिरुन आलो तुमच्या बरोबर...आवडला हा उनाड दिवस
(च्यामरी आपला उनाड दिवस कधी उगवेल.....)
29 Dec 2009 - 4:45 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद राजे !
:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
29 Dec 2009 - 5:02 pm | प्रमोद देव
विशाल आवडली तुझी भ्रमंती.
सहजसुंदर कथन आणि जोडीला सुंदर छायाचित्र.
वा मजा आली.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
29 Dec 2009 - 7:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विशाल आवडली तुझी भ्रमंती.
सहजसुंदर कथन आणि जोडीला सुंदर छायाचित्र.
वा मजा आली.
-दिलीप बिरुटे
29 Dec 2009 - 11:09 pm | बिपिन कार्यकर्ते
हेच म्हणतो.
बिपिन कार्यकर्ते
30 Dec 2009 - 8:01 am | सहज
हेच म्हणतो.
29 Dec 2009 - 5:43 pm | स्वाती२
भटकंती आवडली.
29 Dec 2009 - 5:46 pm | कानडाऊ योगेशु
हा हा हा..
असाच काहीसा प्रकार मुंब्रा स्टेशनवर पाहायला मिळाला.
मुंब्र्याच्या स्टेशनवर असलेल्या मुतारीच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात एका बाजुला पुरुष आणि दुसर्या बाजुला महिलाए असे लिहिले आहे.
स्टेशन छोटे,मुतारी पण छोटी पण त्यावरील ते पुरुष आणि महिलाए एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिले होते कि मुंब्र्यात उतरण्यार्या वा डब्यातुन स्टेशनवर पाहणार्या व चुकुन ती अक्षरे वाचण्यार्याला लघुशंकाच करायची इच्छा व्हावी.खरी गंमत तर पुढेच आहे.
एका बाजुचे पुरुष आणि दुसर्या बाजुचे महीलाए हे त्यांच्या मोठ्या फाँट साईझमुळे एकमेकांजवळ आले होते आणि कुणा व्रात्य कार्ट्याने महिलाएतला "म" कोळश्याने खोडला होता.
त्यामुळे वाचताना ते असे वाचले जात असे.
"पुरुष हिलाए"
कितीही थकलो भागलो असलो तरी कामावरुन डोंबिवलीला पुन्हा घरी परतताना मुंब्र्यास्टेशनवरचा तो प्रकार पाहुन रोज हसु येत असे.
विशालभौ,तुमचा लेख वाचुन मुंबईत व्यतित केलेल्या दिवसांची आठवण ताजी झाली.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
29 Dec 2009 - 7:25 pm | शैलेन्द्र
अगदी अगदी....सेम हियर...
29 Dec 2009 - 5:47 pm | टुकुल
मस्त लिहिल आहे.. आवडल, काही काही वाक्य तर एकदम खुशखुशीत
--टुकुल
29 Dec 2009 - 5:49 pm | अमोल केळकर
मस्त छायाचित्रे आणि वर्णनही. बाकी पहिल्या फोटोवरुन मात्र तो खारघरचा आहे यावर विश्वास बसत नाही.
असो.
आपला
(शेजारी ) अमोल बेलापूरकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
29 Dec 2009 - 5:55 pm | संग्राम
खूप छान लिहीलं आहे विशालभौ ... अगदी तुमच्याबरोबर फिरत आहे अस वाटलं ....
29 Dec 2009 - 6:01 pm | विशाल कुलकर्णी
सगळ्यांचे खुप खुप आभार !
अमोलभौ, पहिला कबुतरांच्या आंघोळीचा फोटो खारघरचाच आहे, माझ्या बिल्डिंगमागेच. हॉटेल बसेराच्या गल्लीत.
हो बसचा फोटो मात्र बेलापूर स्टेशनजवळील बस स्टँडचा आहे. तो मी नेटवरून घेतलाय. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
29 Dec 2009 - 6:14 pm | परिकथेतील राजकुमार
विशालशेठ शिर्षक अगदी योग्य !!
एकदम बहारदार वर्णन केले आहेत भटकंतीचे. बरोबरची फोटो जोडणी एकदम सुखावणारी.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
29 Dec 2009 - 7:39 pm | धमाल मुलगा
केवळ क्लाऽऽसिक.... इतकंच म्हणेन :)
29 Dec 2009 - 8:31 pm | प्रभो
विशल्या, लै भारी रे..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
29 Dec 2009 - 9:07 pm | शक्तिमान
उनाड दिवस आवडला!
29 Dec 2009 - 9:24 pm | संदीप चित्रे
खूप आवडला रे विशाल !
अधूनमधून असे उनाड दिवस सुखाने भेटो ह्या शुभेच्छा.
29 Dec 2009 - 10:21 pm | मदनबाण
विशालराव मस्त लिहले आहे...फोटो सुद्धा मस्त आहेत. :)
उनाड दिवसावर सुद्धा इतकं मस्त लिहता येईल याचा कधी इचार केला नव्हता... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
30 Dec 2009 - 2:26 am | शब्देय
अनुभव खूप आवडला.फोटोंमुळे अजूनच आवडला.
30 Dec 2009 - 8:51 am | पाषाणभेद
फटू मस्त हायेत अन माला वाटल की काय फटूत बी काय रहस्य कथा हाये का काय त्ये.
------------------------
या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
30 Dec 2009 - 9:02 am | अविनाशकुलकर्णी
भौ..फोटो झकास...आवडले...
मै जिंदगीका साथ निभाता चला गया
मस्त
30 Dec 2009 - 9:27 am | प्राजु
उनाड दिवस लेखनाची पद्धत अगदी मनापासून आवडली.
मस्त लिहिले आहेस.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
30 Dec 2009 - 9:42 am | विशाल कुलकर्णी
केवळ यासाठीच मिपावर लिहीणे मनापासुन आवडते. इथे तुम्हाला अगदी मनापासुन खरीखुरी प्रतिक्रिया मिळते. सर्वांचे खुप खुप आभार.... _/\_
आणि हा सुंदर मंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल मालक आणि संपादकांचेही खुप खुप आभार ! _/\_
:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
30 Dec 2009 - 10:47 am | चतुरंग
अतिशय नैसर्गिक सहजपणे आलेले लेखन आणि फोटो फारच आवडले!
(माजी उनाड)चतुरंग
30 Dec 2009 - 11:13 am | प्रदीप
नव्या मुंबईतील कबुतरे आणि मुंबईचे कावळे दाखवलेत की!
लेख व छायाचित्रे आवडली.
मुंबईत सुट्टीच्या दिवशी करण्याच्या काही गोष्टी आठवल्या--- डी. एन. आणी एम. जी. ऱोड्सवरून, पुस्तके बघत भटकणे, इराण्याकडे ऑम्लेट व चहा घेत वेळ काढत बसणे.
आठवणीतील काही इराणी-- दादरचे याझदान (आता गेले, बुटाचे दुकान आलेय :( ), शिवाजी पार्कातील इराणी (दंग्यात लुटला गेला होता :( ), महेश्वरी उद्यानाचा कूलार (अजून तसाच आहे :) ), धोबी तलावचे क्यानी आणि मेर्वान (केक्स आणी खारी साठी फेमस, अजून तसेच आहेत), रूईयाच्या जवळील (ए- वन स्टोर्सच्या शेजारील) इराणी-- मला वाटते आता गेलाय. त्याच्याकडे टेबले चार, पण त्यांचे नंबर्स १, ३, ५, ७... असे काहीतरी!
30 Dec 2009 - 3:22 pm | sneharani
खरच फोटो छान आलेत.
खुमासदार लेखन झालयं
30 Dec 2009 - 5:56 pm | चित्रा
खारघरचा सध्याचा फोटो नाही रूचला :( पण ते चालायचंच.
बाकी उनाड दिवस छान, असा दिवस शोधूनही हल्ली सापडत नाही :(
पूर्वी दादरला, वांद्र्याला असे तासनतास भटकत असू ते आठवले. मॅजेस्टिकलाही कसा वेळ जायचा कळायचे नाही. दादर टी. टी. ला लहान इंग्रजी पुस्तकांचे स्टॉल असतात तेथेही भरपूर भटकायचे. माटुंगा, गांधी मार्केट अशी काही काही ठिकाणे. आणि अर्थातच बाबा बरोबर असले तर ते "फोर्ट" एरियात फिरायला घेऊन जात असत.
30 Dec 2009 - 6:30 pm | अवलिया
हाच प्राब्लेम आहे निवासी लोकांचा. फिर फिर फिरतात.. फोटो टाकतात. अनिवासी वैतागुन म्हणतात आम्ही येवढे मर मर मरतो पण कदर नाही.
--अवलिया
31 Dec 2009 - 9:53 am | अवलिया
अनिवासी लोकांचा नाही, (काही) निवासी लोकांचा दिसतोय!
टिपण्णीबद्दल धन्यवाद
आणि हा उनाडपणा न करता येण्याचे दु:ख बर्याच लग्न झालेल्या निवासी/अनिवासी स्त्री-पुरूषांचे असावे, असा आपला माझा समज आहे. असो.
तुमचे मत विचार करण्यालायक आहे.
वरिल ओळी अवांतर आहेत. त्या संपादित केल्या जाव्यात अशी मी संपादन मंडळास विनंती करतो. तरी त्वरित कारवाई करावी.
--अवलिया
30 Dec 2009 - 8:27 pm | देवदत्त
मस्त कथन, छान प्रकाशचित्रे.
एकंदरीत उनाड दिवसाचे वर्णन आवडले. :)
31 Dec 2009 - 9:41 am | विशाल कुलकर्णी
धन्यु नानासाहेब आणि चित्राजी ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"