बहिणाबाई- एक महान कवियत्री

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in जनातलं, मनातलं
5 Dec 2009 - 10:29 pm

बहिणाबाई- एक महान कवियत्री
मन वढाय वढाय....असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला,कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं , संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली ,माणूस.माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला ,वाट्च्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवियत्री बहिणाबाई’,,,,
जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा.बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागु होतात.
घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही जांना नव्हती त्यांची गाणी.कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्शक ठरणार्‍या आहेत .मळा, मोट,पाणी चूल, तवा शेतीची कामे,घरोटा या आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या साधनांचे दाखले देत बहिणाबाईंनी सार्‍या विश्वाला मोठे तत्वज्ञान सांगितले आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच भांडार खूलं झालेलं आहे.तरिही अशी वाड:मय निर्मिती झाली नाही परन्तु जीवनात जे दिसलं,जे अनुभवलं ते सहज मांडलं आणि त्यातुन बहिणाबाईंनी जबरदस्त वाड:मयाची निर्मिती केली.
आजचं युग ग्लोबलायझेशनचे युग आहे, प्रत्येकाला काही ना काही मिळ्वण्याची आस आहे.त्यातही माणूस समाधानी नाही.अशा असमाधानी वृत्तितून अनेकांची नैराश्याकडे वाटचाल चाललेली दिसते,स्व:त करत असलेल्या कामावर श्रद्धा नसल्याने काम पूर्ण केल्याचे समाधान मिळत नाही .कामाच्या समाधानापेक्षा गलेलठ पगार आज सर्वांची गरज बनत चाललीय.प्रत्येक गोष्ट सहज आणि कमी श्रमात मिळावी अशी अनेकांची इच्छा असते पण कष्टाला शाँर्टकट नसतो.श्रमाशिवाय काही नाही.हाताला चटका बसल्याशिवाय भाकर मिळत नाही हे बहिणाबाईंनी सांगितले आहे
अरे संसार संसार
जसा तवा चुल्हयावर
आधि हाताला चटके
तवा मिळते भाकर
कामाच्या ताणतणावाखाली जगणार्‍यांना बहिणाबाईंची ही कविता उत्तम मार्ग दाखवीणारी ठरेल.त्या म्हणतात
येरे येरे माझ्या जिवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीचं रूप
काम करताना देवाचं रूप पाहिलं ,कामालाच देव मानल तर काम निभावून नेण सहज शक्य होईल.मनाला समाधान न मिळाल्यानं माणूस मन:शांती ,ज्योतिषी अशा गोष्टींकडे ओढला जातो.आजकाल अनेक वाहिन्या ,ज्योतिषीच्यांचे कार्यक्रम दाखवतात.वास्तुशास्त्र ,फेंगशुइ प्रतिष्टॆचे बनले आहे.पण ज्योतिष म्हणजे काय हे बहिणाबाईंनी कित्येक वर्षापूर्वी जाणलं.दारी आलेल्या ज्योतिषीला त्यांनी परत पाठवले.माझ नशीब मला माहित आहे असं सांगणार्‍या बहिणाबाईं खंबीर महिलेचे दर्शन घडवतात.
बापा नको मारु थापा
असो खर्‍या, असो खोट्या
नहि नशिब नशिब
तय हाताच्या रेघोट्या
नको नको रे जोतिष्या
नको हात माझा पाहू
माझं दैव मला कये
माझ्या दारी नको येऊ
आजच्या काळात जी स्थिती ज्योतिषाची तीच देवधर्माची.आजकाल मंदिराचाही बाजार मांडलेला दिसतो.देवाला हिरेजडित मोबाईल,गणपतीच्या चरणी २०० कि.सोनं,देवदर्शनाला सेलिब्रेटी अशा अनेक बातम्या वृत्तपत्रात ,वाहिन्यांवर वारंवार दिसतात आणि देवाला गरीब श्रीमंत अशा भेदभावात तोलल जातय.याची जाणीव बहिणाबाईंना झाली होती.
सोन्यारूपान मढला,मारवाड्याचा बालाजी
शेतक-याचा इठोबा,पानाफूलामधी राजी
अरे बालाजी.-इठोबा दोन्ही एकज रे देव
गरीबीनं सम्रीतीनं केला केला दुजाभाव
गरीब आणि श्रीमंत अशा दुजाभावात देवाला भक्तांनी अडकवल्याचे वर्णन जितक्या प्रभावीपणे त्यांनी केलय़ तितक्याच भावपूर्ण शब्दात दर्शनाला जाऊ न शकणा-या शेतक-याची व्यथा मांडलेय.राज्यात दुष्काळ,कर्जबाजारीपणामुळे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या या काळात एखाद्या शेतक-याच्या तोंडी ही ओवी चपखल बसू शकते.
अरे पांडूरंगा तुझी
कशी भक्ती करू सांग
तुझ्या रूपा आड येत
सावकाराचं रे सोंग
बहिणाबाईंची गाणी केवळ तत्त्वज्ञान सांगणारी नव्हती तर बहिणाबाईंना विनोदाचीहि जाण होती.आज पी.जे.ग्राफिटीचं युग आहे. २४ तास टिकत नाही तिला टिकली क म्हणतात?
असा प्रश्न आजचा तरुण सहज विचारतो तसे काही प्रश्न बहिणाबाईंनीही विचारले आहेत.परंतु त्यांच्या विनोदामध्ये भावार्थ दडला आहे.ज्याच्यातून पीठ येत त्याला जातं म्हणू नये ,तसेच गुढी उभारतो त्याला म्हणती पाडवा आणि ऊभा जमिनीमध्ये आड त्याला म्हणती उभ्याले.असे गमतीदार प्रश्नही त्यांच्या गाण्यातून प्रकट्लेले दिसतात.
माणसाचं आयुष्य,मानवी मन याचा फार मोठा अभ्यास बहिणाबाईंना अनुभवातून झालेला दिसतो.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर
उतारे नसललं माणसाचं मन कालही तसच होतं आजही तसच आहे.माणूस माणूसपण विसरल्याची उदाहरणे समाजात मोठ्या प्रमाणत दिसतात .भ्रष्टाचार,अत्याचार,प्रांतिक-भाषिक वादिवाद ,बाँम्बस्फोट अशा घटनांनी माणसाचं माणूसपण हरवून गेलं आहे
मानसा मानसा कधी व्हशील मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस
इतके वर्षांनंतर आजही बहिणाबाईंनी रेखाटलेले मानवीवृत्तीचं दर्शन कुठे बदललय ?
सहज कुठेही कधीही सुचलेली बहिणाबाईंची गाणी आजच्या युगातही खूप काही सांगून जातात.ज्याला बहिणाबाईंची गाणी ज्याला कळली त्याला जीवन कळले असं म्हणावं लागेल.
बहिणाबाईंना जीवन कधीच कळलं होतं.
आला सास गेला सास
जीवा तुझं रं तंतर
असे जनम मरन
एका सासाचं अंतर
जीवनाचं अगाध तत्त्वज्ञानआपल्या सहज सुंदर कविता ,गाणी ओवी,म्हणीतून मांडणारी ही महान कवियत्री आज आपल्यात नसली तरी तिची वाड:मय सम्रृध्दी पुढ्च्या काळातही
अबाधित राहिल अशीच आहे.
...................................................................................

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2009 - 11:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीवनाचं अगाध तत्त्वज्ञान आपल्या सहज सुंदर कविता ,गाणी ओवी,म्हणीतून मांडणारी ही महान कवियत्री आज आपल्यात नसली तरी तिची वाड:मय सम्रृध्दी पुढ्च्या काळातही अबाधित राहिल अशीच आहे.

अगदी खरं आहे. लेख आवडला !

बहिणाबाईंची एक म्हण: मानसानं घडला पैसा, पैशासाठी जीव झाला कोयसा.

-दिलीप बिरुटे

प्रभो's picture

5 Dec 2009 - 11:07 pm | प्रभो

लेख आवडला

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धनंजय's picture

6 Dec 2009 - 12:01 am | धनंजय

या प्रतिभावंत कवयित्रीच्या कवितांची आठवण करून दिलीत - सुंदर रसग्रहण.

स्वाती२'s picture

6 Dec 2009 - 12:59 am | स्वाती२

सुरेख लेख.

क्रान्ति's picture

6 Dec 2009 - 11:03 am | क्रान्ति

मळा, मोट,पाणी चूल, तवा शेतीची कामे,घरोटा या आपल्या नित्याच्या वापरात असलेल्या साधनांचे दाखले देत बहिणाबाईंनी सार्‍या विश्वाला मोठे तत्वज्ञान सांगितले आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच भांडार खूलं झालेलं आहे.तरिही अशी वाड:मय निर्मिती झाली नाही परन्तु जीवनात जे दिसलं,जे अनुभवलं ते सहज मांडलं आणि त्यातुन बहिणाबाईंनी जबरदस्त वाड:मयाची निर्मिती केली.

१००% सहमत. अतिशय मर्मग्राही लेख.

क्रान्ति
अग्निसखा

शुचि's picture

12 Apr 2010 - 5:56 am | शुचि

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर

सुंदर!!!!!!!!!!!!!!!!
लेख आवडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे ’' .. अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.

बहिणाबाईंच्या कवितेला एक खास रंग आहे. मातीचा, पानाफुलांचा, ग्रामीण जीवनाचा, खानदेशी वऱ्हाडी भाषेचा गंध आहे. कुठल्याही पढीकपणाचा तिला पुसटसाही स्पर्श नाही.

धरणी, वारा, आभाळ, पाऊस, ऊन यांच्या आधाराने वाढलेली बी, बियाणे, मोट, नाडा, शेत, खळे, बैल, नांगर, वखर, बोरी, बाभळी, निंबोणी, चूल, तवा, भाकरी, भाजी, विस्तव, फुंकणी, पाखरे, झाडे, वेली, देव... या साऱ्यांशी रक्ताच्या, हाडामांसाच्या नात्याने बांधलेली त्यांच्या अस्सल देशी कविता !!

आधुनिक जीवन जाणिवांचा, यंत्रादी साधनांचा तिला स्पर्शही नाही. बहिणाबाईंनी प्रेमकवितेची एक ओळही लिहिली नाही; पण जे लिहिले, ते अतिशय मौलिक लिहिले

लिहीता न येणार्‍या बहिणाबाई 'अहिराणी' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.

त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.
पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली. "कष्टातच देव पाहिला पाहिजे,' हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांच्या कविता इतक्या श्रीमंत, आशयगर्भ, सफाईदार आणि मधुर आहेत, की भल्याभल्यांनी तोंडात बोट घालावी.

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं!

मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना

अप्रतिम !!

बहिणाबाईंविषयी "पुलं'नी म्हटलं आहे, की "कवितेचं दळण अनेकांनी मांडलं; पण सुख- दुःखाच्या जात्यात स्वतःचं जीवन भरडलं जात असताना, त्या श्रमांचं सामवेद करून गाणारी बहिणाबाई एखादीच."

~ वाहीदा

शुचि's picture

12 Apr 2010 - 7:49 pm | शुचि

वाहीदा छान प्रतिसाद दिलास ग :) .... केवढी मोलाची भर घातलीस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

मनिष's picture

15 Apr 2010 - 10:06 pm | मनिष

वहिदा....उत्तम प्रतिसाद! :)

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2010 - 4:42 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला.
स्वाती

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 4:48 pm | अरुंधती

बहिणाबाईंचे अभंग, गाणी पुढील साईटसवर उपलब्ध आहेत.

http://www.aathavanitli-gani.com/Lists/Sant%20Details/Bahinabai.htm

http://www.khapre.org/portal/url/keywords/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0...

''अरे संसार संसार'' गाणे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात यूट्यूबवर ऐका :
http://www.youtube.com/watch?v=9Pr21rLr90o&feature=PlayList&p=B60ED1E6B7...

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

राघव's picture

13 Apr 2010 - 9:33 am | राघव

खूप सुंदर लेख. :)
मला वाटतं त्या काळी बर्‍याच माईंना जात्यावर ओव्या म्हणायची सवय होती. आणिकही काही बहिणाबाई असतील.. फक्त आपल्याला माहित नाहीत.

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इंचू साप बरा
त्याले उतारे मंतर

मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना

किती सहज, उत्स्फूर्त पण तेवढंच गहिरं लिहिलेलं.. खूप सुंदर. बहिणाबाईंना दंडवत!

राघव

विशाल कुलकर्णी's picture

15 Apr 2010 - 12:29 pm | विशाल कुलकर्णी

सुरेख लेख ! खरोखर बहिणाबाई म्हणजे विदर्भाला पडलेलं एक नितांत सुंदर स्वप्न होतं.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रकाश घाटपांडे's picture

15 Apr 2010 - 3:33 pm | प्रकाश घाटपांडे

अतुल पेठेंचा बहिणाबाईंच्या जीवनावर दिग्दर्शित एक उत्त्तम लघुपट आहे. मला, मुक्त सुनीत व बिका ला त्यांनी त्याची प्रत भेट दिली होती
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मितभाषी's picture

15 Apr 2010 - 7:00 pm | मितभाषी

सुरेख लेख ! खरोखर बहिणाबाई म्हणजे विदर्भाला पडलेलं एक नितांत सुंदर स्वप्न होतं.

=)) :)] :T ~X( X(

इशाल्भौ काय हे???????????

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\