श्री गणेश लेखमाला २०२३

1

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
30 May 2018 - 9:56 am

हिपोक्रेटस इ.स.पू. ४६० मध्ये जन्माला आला तर सुश्रुत इस.पू. सुमारे ६०० वर्षे. म्हणजे सुश्रुत हा कालक्रमाने हिपोक्रेटसच्याही अगोदरचा आहे. महाभारतातील एका उल्लेखाप्रमाने सुश्रुत हा विश्वामित्र ऋषींचा पुत्र होय. सुश्रुतसंहिता या ग्रंथाचा आजही आदराने उल्लेख केला जातो. सुश्रुतसंहितेत १८४ श्लोक आहेत . त्यात ११२० व्याधींचे तसेच ७७० औषधी वनस्पतींचे वर्णन आहे. ६४ खनिज स्त्रोत असलेल्या औषधांचे आणि ५७ प्राणीस्रोत असलेल्या औषधांचे वर्णन आहे. शस्त्राने शरीराचा छेद घेणे, टोचणे, शरीरात घुसलेली बाह्य वस्तू बाहेर काढणे, जखम चिघळू नये किंवा बरी व्हावी म्हणून रसायनांच्या साहाय्याने चटका देणे इ. शल्यक्रियांचे देखील उल्लेख आहेत. (बहुधा तलवारींच्या) लढाईत कापल्या गेलेल्या नाकावर कपाळावरील त्वचेचे रोपण ही सुश्रुताने केलेली शस्त्रक्रिया ही इतिहासातील पहिली ज्ञात शस्त्रक्रिया असे भारतात समजले जाते.

जीवक या वैद्यराजांचा जन्म मगध राज्याची राजधानी राजगृह इथे झाला. त्याच्या काळात अगोदर बिंबिसार आणि नंतर अजातशत्रू हे मगध साम्राज्याचे सम्राट होते. आसने आणि ध्यानधारणा या विषयात देखील जीवकाला गती होती. बुद्धाच्या शिकवणीमुळे जीवकाला प्रेरणा मिळाली होती असे मानले जाते. लहानपणी चांदोबा अंकात गौतम बुद्धाचा उल्लेख असलेल्या जीवकासंबंधी अनेक गोष्टी वाचलेले धूसरसे आठवते.

हिपोक्रेटसला पाश्चात्य वैद्यकातील प्रणेता मानले जाते. आयुर्वेदात जशी कफ-पित्त-वात ही त्रिदोष संकल्पना आहे तशी चतुःस्राव ही हिपोक्रेटसची संकल्पना होती. मानवी शरीरात पिवळे पित्त - यलो बाईल, काळे पित्त - ब्लॅक बाईल, कफ - फ्लेज्म आणि रक्त - ब्लड हे चार मूल स्राव आहेत. त्यांचे शरीरातील संतुलन बिघडले की व्याधी निर्माण होतात अशी त्याची संकल्पना होती. अगदी अलीकडेपर्यंत कित्येक शतके ही संकल्पना अबाधित होती. आयुर्वेदात जशी शारीरिक व्याधींची सांगड त्रिदोषांशी घातलेली आहे तशी हिपोक्रेटसने ती या चतुस्त्रावांबरोबर घातलेली आहे.

लढाईत जखमी झालेल्या शिपायांच्या जखमा हे मानवी शरीराची रचना पाहाण्यासाठी महत्त्वाचे साधन होते. उपचारांच्या प्रत्यक्ष परिणामां व्यतिरिक्त याचे दोन फायदे होते. पहिले म्हणजे उघडे पडलेले काही शरीरांतर्गत अवयव प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत असत जे एरवी पाहाता येत नसत आणि दुसरे म्हणजे त्यावर दिलेल्या उपाययोजनेची परिणामकारकता अजमावता येत असे. लढाया आणि युद्धे यांना मानवी इतिहासात अजूनही तोटा नाही. आता त्यात दहशतवादातून आणि निदर्शनांतून होणार्‍या हिंसाचाराची भर पडली आहे. परंतु प्राचीन काळात जगात कोठेही शरीरविच्छेदन, मृत शरीराचे देखील - म्हणजे महापापच होते. कर्मठांच्या दुनियेत कदाचित अजूनही असेल. कितीही लोककल्याणाचे असले तरीही.

याबाबतीत हेरोफिलस (इ.स.पू. ३३० ते २६०) आणि इरॅझिस्ट्रेटस (इ.स.पू. ३३० ते २५५) हे मात्र अपवादात्मकच ठरले. हे दोघे अलेक्झन्ड्रियात इ.स.पू. २९०च्या सुमारास दाखल झाले. त्याकाळी अलेक्झान्ड्रियात वैद्यक कसे असावे याचा इतिहासकारांच्या लेखनातून अंदाज येतो. इ.स.पू. ५व्या शतकातला हेरोडोटस हा इतिहासकार लिहितो की तेव्हा अलेक्झान्ड्रियात शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी वेगळा डॉक्टर असे. असो. फाशी दिलेल्या मृत गुन्हेगारांचे का होईना पण शवविच्छेदन करण्याची परवानगी हेरोफिलस आणि इरॅझिस्ट्रेटस या दोघांना अलेक्झान्ड्रियातील सत्ताधार्‍यांकडून मिळाली. ते देखील जाहीर शवविच्छेदन. असा परवाना (मराठीतला; हिंदीतला नव्हे) मिळण्यामागे हेतू होता गुन्हेगारांस जरब आणि दहशत बसावी. परंतु हेतू काहीही असला तरी याचा मानवजातीला मात्र नक्कीच फायदा झाला. धर्मसत्तेचा राजसत्तेवर फारसा वचक नसल्यामुळेच हे शक्य झाले असावे. किंवा पॅगन धर्मगुरू विज्ञानाबद्दल उदारमतवादी असावेत वा त्यांना मानवकल्याणातले वैद्यकाचे महत्त्व पटले असावे. ते दोघे जिवंत गुलामांच्या शरीरांवर शत्रक्रिया करीत असत असा त्यांच्यावर आरोप काही ठिकाणी केलेला आहे. साधे गळू सुईने फोडणे, पायात मोडलेला काटा काढणे या देखील किरकोळ शस्त्रक्रियाच म्हणता येतील. या दृष्टीकोनातून हे आरोप ही विपर्यास करणारी वकिली विधाने असू शकतात. हे आरोप खरे वा खोटे असले तरी दैवी कोपाच्या, भुताखेतांच्या, मरणोत्तर अस्तित्त्वाच्या इ. चित्रविचित्र कल्पनांचा पगडा असलेल्या कर्मठ काळात या दोघांनी असामान्य धाडस आणि प्रतिभा दाखवून मानवी शरीरांतर्गत रचनेचा अभ्यास करून वैद्यकाला पुढे नेऊन आपल्याला उपकृत केले आहे हे खरेच. याचा थेट लिखित पुरावा आज दुर्दैवाने उपलब्ध नसला तरी क्लॉड गॅलेनच्या (इ.स. १२९ ते २१६) लिखाणातून मात्र त्यांच्या कार्याचे वर्णन उपलब्ध आहे.

त्याअगोदर इजिप्शियन राजवटीच्या काळात सत्ताधार्‍यांना देवत्त्व लाभले होते आणि त्यांची शवे मसाला भरून जतन केली जात. त्यामुळे इजिप्शियन डॉक्टर्सना मानवी देहांतर्गत रचनेची जास्त जाणकारी होती. दुसरी गोष्ट अशी की ग्रीक डॉक्टर्सना विच्छेदन करण्यासाठी जो कर्मठ धार्मिक अडसर होता तो इजिप्तमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी होता. सिकंदराने इजिप्तमध्ये ग्रीक परंपरा न लादता इजिप्शियन परंपरा इजिप्तमध्ये चालू ठेवल्या. ‘ममी’करण तज्ञांची देखील मदत या दोघांना झाली असल्याचे नाकारता येत नाही. तत्कालीन चित्रकारांना याबद्दल थोडीफार माहिती होती. परंतु वैद्यकाने मात्र यात स्वारस्य दाखविले नाही असेही काही ठिकाणी उल्लेख आहेत.

अशा या काळात हेरोफिलस आणि इरॅझिस्ट्रेटस यांनी या विच्छेदनांतून मानवी देहरचनेची बरीच माहिती मिळवली. यकृत, स्वादुपिंड, बीजकोष, गर्भाशय इ. बरोबरच त्यांनी मज्जातंतू, डोळ्याचे बुब्बुळ दृष्टीपटल इ. काही भाग, धमन्यांतच रक्त असते, इ. गोष्टींवर प्रकाश टाकला. हेरोफिलसच्या कार्यातील सर्वात मोलाचे योगदान निवडायचे झाले तर मज्जासंस्थेवरील संशोधन म्हणावे लागेल. सर्व शरीरक्रियांचा कर्ताकरविता मेंदू आहे हे हेरोफिलसने मांडले. अशा तर्‍हेने जगातला पहिला शरीररचनाशास्त्रज्ञ-ऍनाटोमिस्ट म्हणून हेरो[फिलसचा गौरव केला जातो तर पहिला शरीरक्रियातज्ञ - फिजिओलॉजिस्ट म्हणून इरॅझिस्ट्रेटसचा गौरव केला जातो. आपणा भारतीयांना कदाचित हे मान्य होणार नाही. धमनी artery आणि नीला vein यातील फरक इरॅझिस्ट्रेटस याने प्रथम स्पष्ट केला असे काही ठिकाणी उल्लेख आहेत. परंतु धमन्या हवेने भरलेल्या असतात असा त्याचा दावा असल्याचे देखील उल्लेख आहेत. असो. नंतर हे कोडे इ. स. १६२८ साली हार्वेने सोडवले.

ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर पहिल्या शतकात मानवी देहाचे विच्छेदन हे महापाप आहे असे ख्रिस्ती धर्ममार्तंडांनी ठरवले. त्यामुळे विच्छेदनातून मिळणार्‍या वैद्यकज्ञानाची प्रगती खुंटली. काही विद्वानांनी अलेक्झान्ड्रियाचे खाटीक असा या दोघांचा सन्मान केलेला आहे.

शरीराचा कर्ताकरविता हृदय आहे हे ऍरिस्टॉटलचे मत मागे सारून हेरोफेलसने माडलेले मेंदूकेंद्री विज्ञान प्रमाण मानणार्‍यात क्लॉड गेलेनचे नाव घ्यावे लागेल. क्लॉड गॅलेन हे वैद्यकशास्त्रातील एक मोठे नाव. त्याने हिपोक्रेटसच्या चतुःस्त्राव संकल्पनेचा विस्तार केला. श्वसन, रक्ताभिसरण, शरीरपोषण, चलनवलन, व्याधींची लक्षणे आणि कारणे या सर्वांची त्याने एकमेकांशी सांगड घातली. असा सुसूत्र विचार पाश्चात्य वैद्यकात प्रथम मांडला गेला तो गॅलेनक्डूनच. इरॅझिस्ट्रेटसच्या लेखनात मानवी मज्जासंस्थेचे इतके तपशीलवार वर्णन आहे की ते केवळ मानवी देहाचे विच्छेदन करूनच करता येईल असे गॅलेनने म्हटले आहे.

तलवार घेऊन लढणारे ग्लॅडीएटर्स आपण चित्रपटातून पाहिले आहेत. आधुनिक युग सुरू होईपर्यंत युरोपमध्ये अव्हान वगैरे देऊन नाहीतर वैमनस्यातून तलवारीची द्वंद्वे होत. यात जखमी झालेल्या योद्ध्यांची शरीरे ही वैद्यकाच्या अभ्यासकांना पर्वणीच असे. एरवी न दिसणारे शरीरांतर्गत अवयव स्वतः विच्छेदन न करता दिसतात. शिवाय उपाययोजनेचे परिणाम प्रत्यक्ष पडताळूंन पाहाता येतात. गॅलेनने सुरुवातीला ते केले. परंतु या कामाला प्रतिष्ठा नसल्याने नंतर तो रोमला गेला. रोमच्या दरबारात त्याचा प्रवेश झाला. पण विच्छेदनापासून तो दुरावला. तरीही त्याच्या मनातले शरीररचनाशास्त्रातले स्वारस्य मात्र कायम राहिले. माणूस आणि इतर प्राणी यांत साम्य असावे या कयासाने तो नंतर इतर जिवंत प्राण्याची विच्छेदने करू लागला.

इतर शास्त्रे देखील तेव्हा प्रगत नव्हती. त्यामुळे त्याचे काही अंदाज चुकले पण काही अचूक निघाले. मेंदू आत्म्याचे आणि हृदय भावनांचे स्थान आहे. मेंदूच्या खालच्या भागातील रक्तनलिकांच्या जाळ्यात रक्त शुद्ध होते, मज्जातंतूतून इतर भागांकडे रक्तपुरवठा होतो, हृदयाच्या पडद्याला छिद्रे असतात, जबड्याला दोन हाडे असतात, यकृताला तीन भाग असतात, छातीच्या हाडाला सात भाग असतात वगैरे त्याची विधाने नंतर चुकीची ठरली आहेत. मेंदूतून चेतातंतू निघतात, धमन्यातून रक्त वहाते, मज्जारज्जूतून निघणारे चेतातंतू इतरत्र कुठे कुठे जातात इ. त्याची अनेक विधाने खरीही निघाली. शरीरचनाशास्त्रातील स्वारस्यामुळे बहुधा असेल कदाचित, त्याचा वैद्यकासमोरचा पवित्रा हा रुग्णकेंद्री नसून रोगगामी होता. रोगापासून मुक्ती झाले की रुग्णाला आपोआपच आराम मिळेल असा त्याचा तर्क असावा.

पहिले जाहीर शवविच्छेदन बोलोग्ना (बोलोना असाही उच्चार असू शकतो) विद्यापीठात इ.स. १३१५ साली झाले. इटालियन डॉक्टर मॉदिनो दे’लुईझी याने ते केले. शवविच्छेदन हे डॉक्टरने स्वतः करावे असा लुईझीचा रास्त आग्रह होता. १३१६ मध्ये त्याने ऍनातोमिया मॉदिनी हा ग्रंथ प्रकाशित केला. लॅटीन भाषेने एक महान कार्य मात्र नक्कीच केले. निदान युरोपभर बहुतेक सर्व भाषिक लोकांना ती भाषा कळत असल्यामुळे ज्ञानप्रसार जलद गतीने झाला. एका युरोपीय देशात झाले ते दुसर्‍या युरोपीय देशात कळले पण भाषेमुळे समजले नाही असे फारसे घडले नाही. आता रेनेसॉंला सुरुवात झाली होती. वैद्यकावर देखील अनेक ग्रंथ प्रकाशित होऊ लागले होते. मुख्य म्हणजे यातील बहुतेक ग्रंथ सचित्र होते. सुपरिचित समाईक लॅटीन भाषेला आता चित्रांची जोड लाभली आणि वैद्यकीय ज्ञानप्रसार आणखी सुलभ झाला. १४९१ सालच्या योहानेस द कॅथमच्या ‘फॅसिक्यूलम मेडिसीना’ मध्ये अशी अनेक चित्रे होती.

इ.स. १४८२ मध्ये पोप सिक्सटस चौथे यांनी शवविच्छेदनास मान्यता दिली. परंतु या काळात युरोपात झालेली शवविच्छेदने ही जुने सिद्धान्त न तपासता, जुन्या संकल्पनातील दोष दूर करून नवा विचार न मांडता सरकारी कामकाजासारखी वा पूजापाठासारखी यांत्रिकपणे मम म्हटल्यासारखी चालत. गॅलेनची तत्त्वे शिरोधार्थ मानून त्या तत्वांना आधारित असे निष्कर्ष काढावे लागत. नाहीतर वैद्यकाचा विद्यार्थी नव्हे तर शव नापास. म्हणजे मृत व्यक्ती पापी किंवा सैतानाचा अंश असलेले. त्यामुळे शरीर वेगळे. सगळाच विनोद. त्यामुळे शरीररचनशास्त्रात फारशी प्रगती झाली नाही. प्रश्नांमुळेच-स्केप्टीसिझममुळेच विज्ञानाची प्रगती होते हा विचार तेव्हा रुजला नसावा. ही झाली उणेची बाजू. असे जरी असले तरी या गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीनेच पाहू शकतो. कारण निदान आता शवविच्छेदने होऊ तरी लागली. ती सुद्धा त्या कर्मठ काळात. खास शवविच्छेदनासाठी सभागृहे बांधली जाऊं लागली. पठडीतील पाठांतरी पंडितांमधून वेगळ्या क्रांतिकारक विचारांचा लोकोत्तर शास्त्रज्ञ क्वचितच जन्माला येतो. त्यासाठी वाट पाहावी लागते.

आता शरीरांतर्गत भागांची चित्रातील नीरस रचनात्मक तोचतोपणा जाऊन चित्रे कलात्मक आणि यथार्थ होऊ लागली. या शास्त्रात आणि वैद्यकेतिहासातील एक मह्त्त्वाची घटना घडली. लिओनार्डो द व्हिन्सी (१४५२-१५१९) सारखे अष्टपैलू, बहुपेडी आणि बहुआयामी, असामान्य प्रतिभा लाभलेले, बडे आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आता या क्षेत्रात उतरले. आपल्याला मिळालेल्या असामान्य प्रतिष्ठेचा आणि लोकप्रियतेचा वापर त्याने या चांगल्या कार्यासाठी केला. सामान्य प्रतिष्ठेच्या नागरिकाला वा डॉक्टरला कायद्याच्या आणि सामाजिक दबावामुळे जे नक्कीच जमले नसते ते त्याने केले. त्याने थडग्यातून (बहुधा नुकतीच पुरलेली) प्रेते अवैधपणे उकरली, पळवून नेली, विच्छेदने केली अणि शरीराच्या अंतर्भागाची यथार्थ तरीही सौंदर्यपूर्ण चित्रणे केली. इथे आणखी तीन गोष्टी उपकारक झाल्या. एकतर युरोपमध्ये तेव्हा प्रेते पुरली जात. भारतात तेव्हा बह्वंशी प्रेते जाळली जात असत. दुसरे म्हणजे थंड हवामानामुळे प्रेते कुजून विघटन पावण्याचा वेग कमी असावा. त्यामुळे ती दीर्घकाळ सुस्थितीत राहात असावीत. तिसरे म्हणजे कलासक्त चित्रकार सहसा समाजाची, धर्माची, शिष्टाचारांची वा प्रथांची बंधने झुगारणारे असतात. त्यामुळे चित्रणे गॅलेनच्या तत्त्वांच्या नव्हे तर सत्याच्या निकट होती. नंतर शिल्पकार देखील शरीरांतर्गत भागांच्या शिल्पकारितेत उतरले. तरी अजून पारंपारिक वैद्यकाने मात्र गॅलेनची साथ सोडली नव्हती.

क्रमशः

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

सुरेख, रोचक आणि माहितीपूर्ण लिखाण.

शाम भागवत's picture

31 May 2018 - 8:54 am | शाम भागवत

लेखमालिका छान चालली आहे.

गवि's picture

1 Jun 2018 - 3:27 am | गवि

उत्कृष्ट.

manguu@mail.com's picture

1 Jun 2018 - 7:40 am | manguu@mail.com

छान

हा विषय घेण्याचे कसे काय सुचले? जबरी लेखन होतय सुधिरराव.

सुधीर कांदळकर's picture

1 Jun 2018 - 4:53 pm | सुधीर कांदळकर

यशोताई, भागवतसाहेब, गवि आणि manguu, अनेक धन्यवाद.

@कंजूसः विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्याबद्दल मला आकर्षण आहे. प्रतिभाशाली वैज्ञानिकांच्या उत्तुंग प्रतिभेचे मला अपार कौतुक आहे. आपल्या स्वप्नात देखील येणार नाहीत अशा भन्नाट कल्पना त्यांना सुचतात. उदा. छोट्या आईनस्टाईनने एकदा आपल्या शालेय शिक्षिकेला प्रश्न विचारला होता की आपण प्रकाशकिरणांवर स्वार होऊन जर प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू लागलो तर बाजूने जाणारी प्रकाशशलाका आपल्याला कशी दिसेल? आईनस्टाईनचे काल-अवकाश प्रारूप, बोहरचे अणुरचनेचे प्रारूप हे सारे केवळ कल्पनातीत आहे. लेखमालिकेच्या शेवटी संदर्भ येतील त्यातील काही वाचले की तुम्हाला पण अशी लेखमाला लिहावीशी वाटेल. इसवी सनापूर्वी ग्रीक गणितज्ञांनी त्सेच सातव्या/आठव्या शतकात भारतीय गणितींनी तुटपुंज्या साधनांच्या आणि माहितीच्या साहाय्याने पृथ्वीचा व्यास गणिताने कसा मोजला असेल?. असो. आपण सार्‍यांनी दाखवलेले स्वारस्य अमाप उत्साह देऊन जाते. धन्यवाद.

दीपक११७७'s picture

4 Jun 2018 - 1:10 pm | दीपक११७७

हा भाग पण मस्त!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2018 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेखमाला !

एक किंचितशी भर...

कापल्या गेलेल्या नाकावर कपाळावरील त्वचेचे रोपण ही सुश्रुताने केलेली शस्त्रक्रिया ही इतिहासातील पहिली ज्ञात शस्त्रक्रिया असे भारतात समजले जाते. सुश्रुताने जगात सर्वप्रथम केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर प्लस्टिक सर्जरीही केली आहे, हे भारतातच नव्हे तर जगभरच्या वैद्यकशास्त्रात मान्य झालेले आहे. सुश्रुताचा हा श्रेयनिर्देश आंतरराष्ट्रिय वैद्यकीय परिषदांमध्येही कधीमधी केला जातो.

सुमीत भातखंडे's picture

4 Jun 2018 - 3:23 pm | सुमीत भातखंडे

सुंदर लेख