औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
30 May 2018 - 9:48 am

मानवाच्या शरीरातील व्याधी आणि विकृती कमीत कमी वेदनामय मार्गाने दूर करून एक सुखकर, उत्साही आणि निरोगी आयुष्य त्याला द्यावे हे अंतिम ध्येय प्रत्येक औषधी चिकित्साप्रणालीचे असावे यात दुमत नसावे. कफ, पित्त आणि वात हे तीन दोष म्हणजेच त्रिदोष मानवी शरीरात संतुलित अवस्थेत असतात आणि त्यांच्या असंतुलनामुळे मानवी शरीरात विविध व्याधी निर्माण होतात. औषधयोजना किंवा/आणि पथ्य, जीवनशैली, इत्यादी आणि पंचकर्मादि विविध उपाययोजना करून वाढीव दोषांचे दमन करून दूर करून वा त्यांचा समतोल साधून व्याधी दूर करून रुग्णाला निरोगी अणि आनंदी दीर्घायुष्य मिळवून द्यावे ही एक प्राचीन आयुर्वेदिक संकल्पना आहे. वेद हे अपौरुषेय आहेत असे म्हटले जाते. चार सुप्रसिद्ध वेदांप्रमाणेच आयुर्वेद हा देखील एक वेदच आहे असे समजले जाते. त्यामुळे आयुर्वेद देखील अपौरुषेय असावा असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. तरी प्राचीन आयुर्वेदात चरक (इ.स.पू. सुमारे ८००, सुश्रुत (इ.स.पू. सुमारे ६६०), जीवक (इ.स.पू. सुमारे ५४०), वाग्भट, इ. विद्वानांनी मोल्यवान योगदान दिलेले आहे आणि त्यांच्या कार्याशिवाय आपण आयुर्वेदाचा विचार करू शकत नाही.

महाजालावर शोध घेतांना गवसले की पुनर्वसू आत्रेय या ऋषींचे सहा शिष्य होते आणि सहाही जणांनी सहा विविध वैद्यकसंकल्पना माडल्या होत्या. अग्निवेष, भेल, जातुकर्ण, पाराशर, हरित आणि क्षारपाणी अशी त्यांची नावे जालावर सापडली. यांनी लिहिलेल्या वैद्यककोषावरून त्यात आणखी सुधारणा आणि विस्तार करून मूळ कश्मीरवासी असलेल्या चरकमुनींनी आठ भागातली एकूण १२० अध्यायांची चरकसंहिता लिहिली असावी असा तर्क आहे. या आठ अध्यायांच्या नावाकडे नजर टाकली तरी हे लेखन किती मुद्देसूद, शिस्तबद्ध आणि सुसूत्र असावे याची कल्पना येते.

१. सूत्रस्थान
२. निदानस्थान.
३. विमानस्थान.
४. शरीरस्थान.
५. इंद्रीयस्थान.
६. चिकित्सा स्थान.
७. कल्पस्थान.
८. सिद्धीस्थान.

शेवटच्या तीन भागांच्या नावावरून ती फार्मायकोलॉजी, फार्मायकोथेराप्यूटीक्स आणि इन्डस्ट्रीअल फार्मसीची आद्यरूपे असावीत.

आधुनिक पाश्चात्य औषधप्रणाली ही प्राचीन ग्रीक औषधप्रणालीपासून उत्क्रांत झाली आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. हिपोक्रेटस यांना (इ.स.पू. ४६० ते ३७०) आधुनिक पाश्चात्य औषधप्रणालीचा प्रणेता म्हणतात. म्हणूनच आधुनिक पाश्चात्य औषधप्रणालीच्या अध्ययनाच्या आरंभच हिपोक्रॅटिक ओथ या शपथेने होतो. हिपोक्रेटस यांनी ह्यूमोरल थिअरी नावाचा स्त्राव-सिद्धान्त मांडला होता आणि तो अगदी अलीकडेपर्यंत पूज्य मानला जात होता. पिवळे पित्त, काळे पित्त, कफ आणि रक्त हे चार ह्यूमर ऊर्फ स्राव मानवी शरीरात संतुलित प्रमाणात असतात अणि त्यांच्या असंतुलनामुळे विविध आजार निर्माण होतात. ढोबळमानाने असा हा स्राव सिद्धान्त आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र जसजसे उत्क्रांत होत गेले तसतसे काही जुने सिद्धान्त मोडीत निघून नवे सिद्धान्त स्थापन झाले. परंतु आधुनिक विज्ञानाचे सौंदर्य आणि मोठेपण यात आहे की पूर्वसूरींचे सिद्धान्त आज जरी मोडीत निघाले तरी त्यांचे मोठेपण आधुनिक वैज्ञानिकांनी कमी लेखले नाही. पूर्वसूरींचे मानवजातीवरचे ऋण कमी होत नाही असेच नव्या वैज्ञानिकांनी मानले. सब-ऍटॉमिक कण मिळाले तरी डाल्टनला कुणी कमी लेखत नाही. फ्लॉजिस्टॉन सिद्धान्त मोडीत निघाला तरी त्या सिद्धान्तकर्त्या जे. जे. बेकरला आजही कुणी कमी लेखत नाही. सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धान्त आला तरी कुणी ऍरिस्टॉटलचे मोठेपण नाकारीत नाही. असो. जे स्थान आयुर्वेदात चरक, सुश्रुत जीवक, वाग्भट, इत्यादींना, ते हिपोक्रेटस, हेरोफिलस, इरॅझिस्ट्रेटस, गॅलेन, व्हेसालिअस वगैरेंना ग्रीक औषधशास्त्रात दिले जाते.

आता यूनानी औषधप्रणालीविषयी. यूनान म्हणजे ग्रीस. ग्रीसमधली औषधप्रणाली ती यूनानी औषधप्रणाली. मुघल वगैरे मुस्लिम साम्राज्यात ही औषधप्रणाली विकसित झाली. असे जरी असले तरी यूनानी औषधप्रणाली मूलतः हिपोक्रेटसच्या ह्यूमोरल सिद्धान्तावरच आधारित असावी. आपल्याकडे जशी पंचमहाभूतांची सांगड तत्त्वज्ञानात आणि अन्य शास्त्रात घातली आहे तशीच काही तत्त्वांची सांगड यूनानी औषधशास्त्रात घातली आहे. पिवळे पित्त म्हणजे अग्नीतत्त्व, काळे पित्त म्हणजे पृथ्वीत्त्व, कफ म्हणजे जलतत्त्व आणि रक्त म्हणजे हवा तत्त्व अशी यात सांगड आहे. हा भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे की नाही हे सांगता येत नाही, पण तशी दाट शक्यता असू शकते. मुघल साम्राज्य भारतात उत्कर्षाला पोहोचले होते. निव्वळ यूनानी औषधे देणारे शेकडो हकीम आजही भारतात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनात तर ‘आयुर्वेद, यूनानी आणि सिद्ध’ असा स्वतंत्र ‘औषधी पाठ’ (फॉर्म्युलेशन) म्हणून मान्यता देण्याचा विभाग निदान १९९५ पर्यंत होता. अजूनही असू शकतो. अबू बकर इब्न ए झकारिया राझी आणि इब्न ए सिना ही दोन यूनानी पद्धतीतील मोठी नावे. जसे चरक, सुश्रुत आणि जीवक यांनी आयुर्वेदाला सुवर्णयुग दाखवले तसेच या दोघांनी यूनानी औषधप्रणालीला सुवर्णयुग दाखवले असे आदराने म्हटले जाते.

जखमी झालेल्या निपुण योद्ध्याच्या जखमांवर उपचार होऊन तो किती लौकर पुन्हा पूर्ण भरात रणांगणावर उतरतो याचा दीर्घ युद्धांच्या निर्णयावर नक्कीच प्रभाव पडत असावा. योद्ध्याच्या स्वतःच्या कुवतीनुसार तसेच युद्धनेतृत्वाच्या सामान्य सैनिकांवर होणार्‍या मानसिक प्रभावाचा देखील. प्राचीन महाकाव्यांत वर्णिलेल्या युद्धात दोन महत्त्वाचे उपचारक मला आठवतात. आपल्या महाभारतातील श्रीकृष्ण आणि ग्रीक इलियड आणि ओडेसीमधील अस्लेपिअस. बी. आर. चोप्रांच्या दूरदर्शन महाभारतात योद्ध्यांच्या जखमा चिखळू नयेत तसेच रक्तप्रवाह त्वरित थांबावा म्हणून श्रीकृष्ण जंतुनाशक म्हणून मोरपिसांची राख वापरतो असे दाखवले होते. दोघांनीही योद्ध्यांवरील औषधोपचारातील महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. दोघांनाही नंतर देवत्व प्राप्त झाले. अजूनही जिवावरच्या दुखण्यातून उठलेल्या भाबड्या रोग्याला डॉक्टर देवासमानच भासतो. वैद्यराज हा यमाचा सहोदर म्हणजे बंधू आहे, यम फक्त प्राणच नेतो तर वैद्यराज धनानि च प्राणानि च - दोन्ही नेतो असे संस्कृत सुभाषितातून म्हटले गेले आहे तो भाग वेगळा.

प्राचीन काळी औषधोपचार आणि अन्य उपाययोजना करून रुग्णाला व्याधिमुक्त करणे हा मूळ हेतू असावा. त्यानंतर लक्षणांवरून विविध व्याधींचे बारसे झाले असावे. नंतर रोगनिदान - डायग्नॉस्टीक्स, शरीररचनाशास्त्र - ऍनाटॉमी, शरीरक्रियाशास्त्र - फिजिओलॉजी, औषधशास्त्र - फार्मायकॉलॉजी आणि औषधचिकित्सा - फार्मायकोथेरपी, औषध निर्मितीशास्त्र - इन्डस्ट्रीअल फार्मसी इ. चा विकास झाला. या कालक्रमाने नसले तरी एकाच काळात थोडेफार पुढेमागे.

औषधयोजनेतील मोराचे रक्त, वटवाघळाचे वीर्य, अशा चित्रविचित्र पदार्थांचे वर्णन ‘सार्थ वाग्भट’ या मराठी ग्रंथात अनेक वर्षांपूर्वी वाचलेले आठवते. सध्या ‘भावप्रकाश’ची खिल्ली उड्वणारे खट्टरचाचा हे पात्र चर्चेत आहे. पण हे काही रचनात्मक नाही. असो. वामन गणेश देसाई हे आधुनिक युगातीलच शंभरेक वर्षापूर्वींचे एक डॉक्टर. एम. बी. (लंडन) ऑनर्स, बी.एस.सी.(लंडन), एल एम ऍन्ड एस(मुंबई) अशा तत्कालीन आधुनिक पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील तत्कालीन मान्यवर पदव्या घेतलेले डॉक्टर असूनही त्यांनी आयुर्वेदात विशेष स्वारस्य दाखवले आणि आयुर्वेदात उल्लेख केलेल्या अनेक औषधी वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा आधुनिक वैद्यकाच्या दृष्टीकोनातून, उपलब्ध आधुनिक विज्ञानाची मदत घेऊन ‘औषधी संग्रह’ हा ग्रंथ लिहिला. दोन भागांच्या या ग्रंथात त्रिदोष इत्यादी गोंधळात टाकणार्‍या संज्ञा जास्तीत जास्त टाळून पहिल्या भागात ५१७ आणि दुसर्‍या भागात ९६७ वनस्पतींचे आधुनिक वनस्पतीशास्त्रानुसार (फॅमिली, सबफॅमिली, स्पीशी वगैरे) ओळख, वर्णन आणि औषधी गुणधर्म दिलेले आहेत. मुख्य म्हणजे एखाद्या वनस्पतीत कोणते औषधी तत्व आहे आणि औषधाची मात्रा वा डोस किती असावा हेही दिलेले आहे. पित्तदोष म्हणजे पचनसंस्थेसंबंधित दोष, कफदोष म्हणजे श्वसनसंस्थेसंबंधित दोष, आणि वातदोष म्हणजे मज्जासंस्थेसंबंधित दोष अशी ढोबळमानाने वर्गवारी त्यांनी केली होती व त्यानुसार आयुर्वेदाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पठडीतील संभ्रमात टाकणार्‍या संज्ञा टाळून मूळ संकल्पना उपलब्ध आधुनिक विज्ञानाच्या पायावर समजून घेण्याचे हे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

अमुक एक औषधप्रणाली किंवा विचारधारा श्रेष्ठ आणि तमुक भंपक असे काही सिद्ध करणे वा कोणाचीही खिल्ली उडवणे असा या लेखमालेचा बिलकूल हेतू नाही. कोणत्याही पद्धतीतील दोष दाखवणे अणि माझे (तोकडे आणि उथळ) ज्ञान पाजळणे हा देखील माझा हेतू नाही. तशी माझी योग्यता नाही. जवळजवळ चाळीस वर्षांनंतर वैद्यकीय विषयावरील काही पुस्तके चाळतांना कुतूहल चाळवले. या शास्त्रांच्या प्रगतीतील मनोरंजक टप्पे पाहून कुतूहल जागृत होऊन गंमत वाटली पण कुतूहलाने भरपूर माकडउड्या मारल्या आणि महाजालावरच्या अलीबाबा गुहेत मनसोक्त भटकंती केली. पुस्तकांचे आणि जालदुव्यांचे ऋण आणि संदर्भ शेवटी येतीलच. जे हाती सापडले ते फारच मनोरंजक निघाले. मग ते सारे कळफलकातून उमटले. विविध विद्वान पूर्वसूरींचा अल्लेख एकेरीने केला असला तरी माझ्या मनांत त्यांच्याबद्दल पूज्यभाव आणि आदरच आहे. तो गावस्कर, तो न्यूटन वा तो वाग्भट असे माझ्या सवयीनुसार आपणच उमटते. कोणत्याही मान्यवर पूर्वसूरींचा उपमर्द वा अनादर करणे हा हेतू अजिबात नाही. कडक उन्हाळ्यात बाहेर जाता येत नाही म्हणून (कुणाचाही अनादर न करता) घरबसल्या भिंतीला लावलेल्या तुंबड्या एवढेच.

औषधोपचारमाहिती

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2018 - 10:01 am | प्रकाश घाटपांडे

संतुलित लेख. आयुर्वेदात प्रमाणीकरण करता येत नाहीत तसेच त्याच्या संख्याशास्त्रीय क्लिनिकल ट्रायल्स ही घेता येत नाहीत त्यामुळे तो विषय श्रद्धेच्या बाजूला झुकतो व आधुनिक विज्ञानापासून दूर राहतो. औषधं जान्हवी तोयम| मुळे त्यात व्यक्तीसापेक्षता येते.

आनन्दा's picture

30 May 2018 - 10:54 am | आनन्दा

वाचतोय

सुबोध खरे's picture

30 May 2018 - 11:36 am | सुबोध खरे

सुंदर लेख
रच्याकने
औषधयोजनेतील मोराचे रक्त, वटवाघळाचे वीर्य, अशा चित्रविचित्र पदार्थांचे वर्णन ‘सार्थ वाग्भट’ या मराठी ग्रंथात अनेक वर्षांपूर्वी वाचलेले आठवते.
यातील वटवाघळाचे वीर्य कसे मिळवले याबद्दल कुतूहल वाटते आहे

अगदी रानावनात, रेताड जमिनीतही भरमसाठ वाढणाय्रा झाडाझुडुपांतले औषधी गुणधर्म कसे काय शोधले ही एक गम्मतच आहे.

लेख आवडला. अजून लिहा.

कोण's picture

30 May 2018 - 4:49 pm | कोण

लेख आवडला.

वाचते आहे.. पुढला भागही येऊ देत लवकर.

सुधीर कांदळकर's picture

30 May 2018 - 7:19 pm | सुधीर कांदळकर

अनेक धन्यवाद.
@ डॉ. सुबोध खरे: हे माझ्या ध्यानातच आले नव्हते.
@ कंजूस: काही वैद्यराज औषधशास्त्राचा ध्यास घेऊन औषधी वनस्पतींच्या शोधात खडतर परिश्रम घेऊन फिरत हे खरे आहे. परंतु काही अंधश्रद्धा आणि पद्धतशीर शिक्षणाचा अभाव असल्यामुळे संशोधन फारसे झाले नसावे. काही तर आधुनिक शिक्षणाकडे उपहासाने पाहातात. डॉक्टर्सपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असा त्यांचा समज असतो. भटक्या जमातीतल्या काही लोकांना औषधी वनस्पतींची माहिती असे परंतु वैद्यकाचे शास्त्रीय ज्ञान नसे. ते विविध गावातून फिरत वैद्यराजांना काष्ठौषधी, कुळ्या वगैरे विकत, अजूनही विकतात. काही औषधी उदा. खैराचा डिंक, इ.इ. जमा करण्याचा परवाना फक्त आदिवासींना आहे.

असो. धन्यवाद. दुसराभाग https://www.misalpav.com/node/42705 इथे आहे.

दीपक११७७'s picture

4 Jun 2018 - 12:53 pm | दीपक११७७

जबरदस्त लेख मलिका

वाचतोय