- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
प्रस्तावना:
रवींद्रनाथ ठाकूर लिखित 'राजर्षी' या हिंदी कादंबरीचा भावानुवाद करण्याचा हा छोटासा प्रयत्न. मायबाप रसिक वाचकांनी तो गोड मानून घ्यावा ही कळकळीची विनंती. रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहिलं आहे त्या योग्यतेचं लिहिणं आपल्याला शक्य नाही ही मर्यादा माहीत असूनही हे वेडं दु:साहस करतीये. ही कथा वाचताना वाचकांना काही त्रुटी जाणवल्या तर तो सर्वस्वी माझ्या लेखणीतला दोष आहे.
लिहायला सुरुवात केल्यानंतर आठवलं की, इथे मिपावरच एका धाग्यात त्रिपुराच्या इतिहासाबद्दल थोडंस वाचायला मिळालं होतं. त्याचा शोध घेतल्यावर समर्पक यांचा त्रिपुरा भटकंतीचा हा धागा सापडला.
या कादंबरीचे नायक म्हणजे वरील लेखात उल्लेखलेल्या त्रिपुराच्या माणिकय राजवंशातील महाराज गोविंद माणिकय. या राजवंशाचा इतिहास फार मोठा. साधारण तेराव्या शतकापासून ते अगदी अलीकडे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत त्रिपुरावर माणिकय घराण्याची सत्ता होती. १९४९ साली त्रिपुरा भारतात विलीन झाले. गोविंद माणिकय हे पुण्यवान, प्रजाजनांचे हित पाहणारे म्हणून प्रसिद्ध होते. हातात सत्ता असूनही त्या सत्तेचा कोणताही मोह नसलेले ते राजवंशातील संन्यासीच होते. या कादंबरीत अजून एक महत्वाचं पात्र आहे, ते म्हणजे भुवनेश्वरी देवीचं मंदिर. या मंदिराचे निर्माण सोळाव्या शतकात गोविंद माणिकय यांच्या कालखंडात झाले.
मंदिराच्या परिसराची झलक असलेला हा व्हिडिओ युट्युबवर सापडला.
आतासुद्धा जर इतक्या सुंदर हिरव्यागार वृक्षराजीने सजलेला हा परिसर असेल तर कादंबरीत वर्णन असल्याप्रमाणे त्याकाळात तर इथलं निसर्गसौंदर्य शब्दातीत असेल. इतर सर्व गोष्टींप्रमाणे बदलत्या काळाच्या काही खुणा या परिसरावर आता दिसत आहेत. कादंबरीतल्या वर्णनाशी शक्य तेवढं प्रामाणिक राहून हा परिसर, निसर्ग आपल्यापर्यंत पोचवायचा नक्कीच प्रयत्न करेन.
वाचकांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या प्रोत्साहनासाठी अत्यंत ऋणी आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
राजयोग - १
गोमती नदीच्या किनारी भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर संगमरवरी पाषाणांनी बांधलेला घाट आहे. या घाटाने गोमतीच्या आत दूरवर प्रवेश केला आहे. ग्रीष्मातल्या एका सोनेरी सकाळी त्रिपुराचे महाराज गोविंद माणिक्य तिथे स्नान करण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ नक्षत्र रायदेखील होता.
त्याचवेळेस एक छोटीशी मुलगी तिच्या भावाबरोबर घाटावर आली. त्या मुलीने येताच राजाचे वस्त्र खेचून विचारले, "तू कोण आहेस?"
राजाने हसून उत्तर दिले, "देवी, मी तर तुझेच बाळ आहे."
मुलगी म्हणाली, "मला पूजेसाठी फुलं आणून दे ना."
राजा म्हणाला, "हो तर, चला!"
राजाच्या सेवकांमध्ये हे दृश्य पाहून चुळबुळ सुरु झाली. ते राजाला म्हणाले, "महाराज तुम्ही कशाला जाता? आम्ही आणून देतो फुलं."
राजा म्हणाला , "नाही नाही. तिने मला सांगितलं आहे, फुलं मीच आणणार."
राजाने पुन्हा एकदा त्या छोट्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्या दिवशीच्या सुंदर प्रातः काळासारखाच तिचा चेहरा गोड होता. राजाचा हात पकडून ती मंदिराच्या बाजूने लावलेल्या बागेत फिरत होती. चहूबाजूंनी वेलींवर बहरून आलेल्या फुलांसारखेच तेजस्वी भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. जणू काही तिच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे परावर्तित होऊन ती सकाळ अजूनच सोनेरी झाली होती.
छोटा भाऊ आपल्या बहिणीची साडी पकडून तिच्याबरोबर फिरत होता. तो तर तिथे फक्त त्याच्या बहिणीलाच ओळखत होता, राजाची आणि त्याची काहीच ओळख नव्हती.
राजाने मुलीला विचारले, "तुझं नाव काय आहे?"
मुलीने उत्तर दिले, "हासि"
त्यानंतर मुलाला विचारले, "आणि तुझं?"
मुलगा आपले मोठे मोठे डोळे विस्फारून बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्यानं काही उत्तर दिलं नाही.
हासिने आपला हात त्याच्या खांदयावर ठेवून म्हणलं, "बोल ना भैय्या, माझं नाव ताता आहे."
आपल्या छोट्या छोट्या ओठांना थोडंसं उघडून मुलाने गंभीर चेहऱ्याने बहिणीनं सांगितलं ते प्रतिध्वनीप्रमाणे बोलून दाखवलं. "ताता" एवढं म्हणून त्याने आपल्या बहिणीची साडी अजून घट्ट पकडली.
हासिने राजाला समजावून सांगितलं, "हा अजून लहान आहे ना, म्हणून सगळे याला ताता म्हणतात." पुन्हा भावाकडे पाहून म्हणाली, "अच्छा मंदिर म्हण पाहू."
छोटा मुलगा गंभीर होऊन म्हणाला, "तलई."
हासि पुन्हा एकदा हसू लागली आणि म्हणाली, "ताताला आपल्या सर्वांसारखं कढई म्हणता येत नाही म्हणून तो तलई म्हणतो." एवढं बोलून तिने ताताला आपल्या जवळ ओढून घेतलं आणि त्याचे अनेक मुके घेऊन त्याला अक्षरश: लाल केलं.
ताताला आपल्या बहिणीच्या या अचानक हसण्याचं आणि इतक्या प्रेमाचं कारण काही कळलं नाही. तो फक्त आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पहात राहिला. खरंतर मंदिर, कढई अशा शब्दांच्या उच्चारांमध्ये ताताचीच चूक होती असं काही नाही. ताताच्या त्या कोवळ्या भावविश्वात हासि कदाचित मंदिराला 'मंदिल' म्हणत नसेल पण ती 'माऊ' म्हणत होती. कढईला ती तलई म्हणते की नाही हे नाही सांगता येणार पण ती 'नदी'ला 'आई' तर नक्कीच म्हणत होती. असो. ताताचे विचित्र उच्चार ऐकून जी मोठी गंमत झाली त्याहून मोठी गंमत काय असणार.
तिने नंतर ताताविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. तिने सांगितलं, एकदा एक आजोबा, मोठं घोंगडं पांघरून आले. ताता त्यांना अस्वल समजून घाबरून लपून बसला. एकदा तो सफरचंदाच्या झाडावर लगडलेल्या फळांना पक्षी समजून आपल्या छोट्या छोट्या हातांनी टाळ्या वाजवून त्यांना उडवत होता. अशाप्रकारे ताताच्या बहिणीने अनेक उदाहरणे सांगून राजाची खात्री करून दिली की तो तर तिच्यापेक्षाही निरागस लहान मुलगा आहे.
तातानेही स्वतःच्या हुशारीचे किस्से अतिशय शांतपणे ऐकले. जेवढं त्याला समजलं त्यावरून तरी त्याला रागवण्याचं काही कारण नव्हतं.
अशाप्रकारे त्यादिवशी सकाळी फुलं तोडण्याचं काम पूर्ण झालं. ज्याक्षणी राजाने त्या छोट्या मुलीचा पदर फुलांनी भरून दिला त्याक्षणी त्यांना वाटलं, पूजा पूर्ण झाली. या दोन निष्पाप मनांचे प्रेम अनुभवणं, पवित्र अशा या हृदयांची फुलं तोडून देण्याची अपेक्षा पूर्ण करणं हीच जणू काही त्यांच्यासाठी सर्वात सुंदर देवपूजा होती.
क्रमशः
प्रतिक्रिया
22 May 2018 - 8:59 am | manguu@mail.com
छान
22 May 2018 - 9:00 am | प्रचेतस
मस्त सुरुवात.
पण कथा वाचण्याआधीच संपून गेली. जरा मोठे भाग लिहा ना.
22 May 2018 - 11:51 am | सस्नेह
भाग थोडे मोठे हवेत.
22 May 2018 - 9:27 am | माहितगार
मस्तचं भावानुवाद सहज सुंदर झाला आहे. अजून नक्की येऊ द्यात. असेच छोटे छोटे भाग. आपण कोणत्या भाषेतून वाचून अनुवादीत करत आहात आणि बंगाली ते मराठी करत असल्यास कोणत्या शब्दांना कोणते शब्द योजले याची त्रोटक यादी दर कथे सोबत द्यावी असे वाटते .
22 May 2018 - 9:34 am | ज्ञानोबाचे पैजार
वाचतोय...
पैजारबुवा,
22 May 2018 - 9:42 am | टवाळ कार्टा
गोग्गोड
अवांतर - पाणी वाहते झाले म्हणायचे का?
22 May 2018 - 9:54 am | शाली
छान वाटतय वाचताना. भाग जरा छोटे होताएत असं वाटतय.
लिहा अजुन.
22 May 2018 - 12:30 pm | manguu@mail.com
इतके छोटे भाग झाले तर कादंबरी संपणार कधी ?
22 May 2018 - 12:05 pm | एस
'राजयोग' इथे मिपावरही वाचण्याचा योग आम्हां वाचकांना आला ह्याबद्दल अनेक आभार. पुभाप्र. लिहीत रहा. आम्ही वाचत राहू.
22 May 2018 - 12:32 pm | अभ्या..
सुरेख.
भाषा छान जमलीय.
22 May 2018 - 1:54 pm | कोण
खूप छान. मस्त.
22 May 2018 - 5:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुरवात तर छानच झालिये.
अवांतरः फार कठीण कार्य हाती घेतलयस.. शुभेच्छा!
22 May 2018 - 6:18 pm | यशोधरा
वाचते आहे...
"या घाटाने गोमतीच्या आत दूरवर प्रवेश केला आहे" - हे जरासे शब्दशः भाषांतर वाटले, त्याऐवजी नदीपात्रात आतपर्यंत घाट बांधून काढला आहे/ बांधलेला आहे, असे काही म्हणता येईल का?
23 May 2018 - 11:03 am | रातराणी
खरंय ग यशोताई, पहिल्यांदा खूप अडखळायला झालं मला लिहिताना. पुढच्या भागांमध्ये अजून सफाई आणण्याचा प्रयत्न करते.
23 May 2018 - 7:42 pm | आनन्दा
मला तर तो एक अलंकार वाटतो..
22 May 2018 - 6:52 pm | प्राची अश्विनी
सुरेख.
23 May 2018 - 11:04 am | रातराणी
सर्वांना अनेक धन्यवाद. :)
23 May 2018 - 3:20 pm | सिरुसेरि
छान . बहीण भावाचे निर्व्याज प्रेम सुरेख रंगवले आहे .
27 May 2018 - 10:03 am | मनिमौ
सुरेख सुरूवात. पुढचे भाग लौकर येऊ देत.
28 May 2018 - 2:06 am | रातराणी
http://misalpav.com/node/४२६६९ हा चौथा भाग आहे, यात आधीच्या तीन भागांच्या लिंक आहेत. पाचवा भाग आज टाकणार आहे.