सर्वांना नमस्कार!
एक नवीन सोलो सायकल मोहीम करणार आहे. त्यासंदर्भात आपल्याशी बोलेन. गेल्या वर्षी सातारा परिसरात योग- ध्यान हा विषय घेऊन एक छोटी मोहीम केली होती. ह्यावेळी सुद्धा 'योग प्रसारासाठी सायकल यात्रा' अशी एक मोहीम करतो आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' व त्या संस्थेच्या विस्तारलेल्या कार्यासंदर्भात हा प्रवास असेल. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग कार्यकर्ते व योग शिक्षक ह्यांना ह्या प्रवासात भेटेन.
परभणीमध्ये गेल्या चार दशकांपासून निरामय संस्था काम करते आहे. १९७० च्या दशकामध्ये काही जणांनी एकत्र येऊन योग शिकण्यास व शिकवण्यास सुरुवात केली. नंतर अनेक कार्यकर्ते सहभागी होत गेले. काम पुढे वाढत गेले. योग साधना व योग शिकवण्याबरोबरच योगामध्ये संशोधन, योग परिषदांमध्ये सहभाग, योग प्रसार, योग शिक्षकांना शिक्षण अशी कामे वाढत गेली. नंतर ह्याचा विस्तार परभणी जिल्ह्यातली इतर गावांमध्ये व नंतर अनेक जिल्ह्यांमध्येही झाला. तिथेही कार्यकर्त्यांच्या टीम्स उभ्या राहिल्या. हे सर्व काम कार्यकर्ते स्वत:च्या योगदानातून निरपेक्ष वृत्तीने करत राहिले. आज जेव्हा बहुतांश संस्था प्रोजेक्ट किंवा फंडिंग असतानाच काम करतात, तेव्हा अशा वेळी अशा प्रकारचं निरपेक्ष काम फार महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हे काम लोकांसमोर आणणं गरजेचं आहे, असं वाटत होतं. मी लहानपणापासून हे काम बघितलं आहे, कारण परभणी माझं गाव आहे व माझे बाबा ह्या कामातले एक कार्यकर्ते आहेत.
कोणाला असा प्रश्न नक्कीच पडू शकतो की, आज मध्य महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची समस्या आहे, पाणी, ग्राम विकास व शेतीशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. तेव्हा अशा विषयांना धरून सायकल मोहीम करण्याऐवजी मी योग प्रसारासाठी सायकलिंग कसं करतोय. प्रश्न स्वाभाविक आहे आणि बरोबरही आहे. सध्या अनेक जण पाणी व शेतीवर काम करण्यासाठी पुढे येत आहेत व ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. पण मला वाटतं की, प्रत्येक प्रकारचं काम गरजेचं असतं. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार व आपल्या विचारांप्रमाणे अशा कामात सहभाग घेत असतो. तसंच असंही वाटतं की, योगाचा संबंध संपूर्ण व्यक्तिमत्वासोबत असतो. जर कोणी योगाच्या दिशेने पुढे गेला, तर तो/ ती आपल्या सर्व समस्यांवर मात करण्याच्या दिशेनेही एक पाऊल नक्कीच पुढे जातो. आजवर मला समजलेला योग, मी केलेला योगाभ्यास, सायकलिंगमधून मला सापडलेल्या गोष्टी असा माझा अनुभव असाच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नसेल कदाचित पण अप्रत्यक्ष प्रकारे योग प्रसारसुद्धा सामाजिक समस्या सोडवण्याच्या दिशेने जाणारं एक पाऊल आहे. असो.
हा पूर्ण प्रवास मध्य महाराष्ट्रातील अतिशय उष्ण भागात होईल. दररोज सुमारे ५५- ६० किलोमीटर सायकल चालवेन. ह्या भागात दोन- तीन शहर सोडून बाकी गावंच आहेत. जेव्हा जेव्हा मी गावांमध्ये सायकल चालवली आहे, तेव्हा तेव्हा लोक हेच म्हणतात- अरे, गेअरची सायकल ना, मग लय पळत असनार, मोटरसायकलला मागं टाकीत असनार! त्यामुळे ह्या वेळी अगदी साधारण असलेल्या सायकलवर (दुधवाला सायकलवर) हा प्रवास करेन. म्हणजे लोकांना असे म्हणताच येणार नाही आणि सायकलबद्दल मला जे प्रश्न विचारले जातात, त्यापासून माझी सुटकाही होईल! लोकांनाही हे कळेल की, अगदी ते वापरतात तीच सायकल इतकी पळू शकते. लोकांना कदाचित माहिती असेल किंवा नसेल की ही दुधवाला सायकल इतकी पळते, पण मला नक्कीच माहिती नव्हतं. जेव्हा मी अशा सायकलने ५०, ६० किलोमीटर सायकलिंग केलं, तेव्हा मला फारच शिकायला मिळालं. ह्या सायकलिंगची योजना साधारण अशी आहे: ११ मे ला परभणीपासून सुरुवात करेन. दररोज सकाळी ४-५ तास सायकल चालवेन व रोज ५५- ६० किलोमीटर दूरी अंतर पार करेन. त्यानंतर रोज लॅपटॉपवर माझं रूटीन कामही करत राहीन. रूट असा असेल- परभणी- जिंतूर- नेमगिरी- परतूर- अंबड- औरंगाबाद- देवगिरी किल्ला- औरंगाबाद- जालना- सिंदखेड राजा- देऊळगांव राजा- चिखली- मेहकर- लोणार सरोवर- मंठा- मानवत- परभणी. सुमारे १२ दिवसांमध्ये ६०० किलोमीटरपेक्षा जास्त सायकल चालवण्याची योजना आहे. योग कार्य विस्तार व योग- शिक्षक आणि केंद्र ह्यानुसार हा रूट ठरवला आहे.
ह्या मोहीमेचे एक उद्दिष्ट योग कार्य लोकांसमोर आणणं, हे आहे. त्याशिवाय ह्या रूटवर व ह्या केंद्रांमध्ये असलेल्या योग शिक्षकांसोबत व योग कार्यकर्त्यांसोबत संवादही करणार आहे. अनेक योग कार्यकर्त्यांनी बिकट परिस्थितीत काम केलं आहे. अनेक महिलांनी अडथळ्यांवर मात करून पहिले योग शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला व नंतर तशाच कठीण परिस्थितीत त्यांनी योग शिक्षिका म्हणून काम सुरू केलं. काही कार्यकर्ते तर एखाद्या रोगामुळे योगाकडे आले व आता ते त्या रोगाला धन्यवाद देतात! असे अनेक कार्यकर्ते भेटतील व अनेक वेगवेगळी उदाहरणे ह्या प्रवासात बघायला मिळतील व त्याबद्दल मी नंतर लिहेनच.
आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.
निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. ह्या सर्व प्रवासाचे अपडेटस मी इथे व माझ्या ब्लॉगवर देत राहीन- www.niranjan-vichar.blogspot.in (इथे आपल्याला माझ्या आधीच्या सायकल मोहीमांचे वर्णन व इतर लेखही वाचता येईल). आपण माझ्याशी फेसबूकवरही कनेक्ट होऊ शकता. धन्यवाद!
- निरंजन वेलणकर
niranjanwelankar@gmail.com
प्रतिक्रिया
6 May 2018 - 9:56 pm | शाली
छानच!
शुभेच्छा!
21 May 2018 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
6 May 2018 - 11:48 pm | एस
अरे वा! स्तुत्य उपक्रम आहे. मनःपूर्वक शुभेच्छा. निरामय संस्थेच्या वेबसाईटवर पुस्तके खरेदी करता येतात का ते पाहतो.
7 May 2018 - 11:51 am | मार्गी
धन्यवाद! @ एस जी, आपण निरामय वेबसाईटवर पुस्तक निवडून दिलेल्या माहितीनुसार संस्थेच्या खात्यात पैसे जमा करू शकता. ते पुस्तक पाठवतील. धन्यवाद.
11 May 2018 - 11:44 am | मार्गी
आज ही मोहीम सुरू केली. आज परभणी- जिंतूर व नेमगिरी असं ५३ किमी सायकलिंग केलं. संध्याकाळी इथल्या योग शिक्षक व योग प्रेमींना भेटणार आहे.
11 May 2018 - 12:06 pm | जेम्स वांड
इतक्या कडक उन्हात साधी बावीस / चोवीस इंची सायकल दामटणे म्हणजे खरेच 'अग्नी दिव्य' होय महाराजा. तुमच्या कमिटमेंटला खूप खूप प्रणाम.
12 May 2018 - 2:28 pm | मार्गी
धन्यवाद जेम्स वांडजी! विशेष काही नाही हो. जमतं.
कालची जिंतूरमधली मीटिंग चांगली झाली. अनेक योगशिक्षक व वेगवेगळ्या पद्धती अनुसरणारे योग- साधक भेटले. आज जिंतूर- परतूर ६३ किमी प्रवास केला. अनेक एनर्जाल संपवूनही ऊन्हाचा त्रास झाला.
13 May 2018 - 2:35 pm | मार्गी
काल परतूरमध्ये योग साधकांच्या दमदार टीमसोबत मस्त भेट झाली. आज परतूरवरून अंबडला आलो. ६० किमी सायकल प्रवास. आज अनेक दिवसांनी 'इंडिया' ऐवजी भारतात सायकल चालवली. ढग असल्यामुळे ऊन्हाचा त्रास नव्हता.
14 May 2018 - 1:10 pm | मार्गी
आज चौथा दिवस. अंबड- रोहीलागड- औरंगाबाद अशी ६३ किमी सायकल चालवली.
15 May 2018 - 1:57 am | निशाचर
उपक्रमाला शुभेच्छा!
भर उन्हाळ्यात एवढी सायकल चालवून लोकांच्या भेटी घेणे आणि इतर कामही करणे... _/\_
या यात्रेत येणार्या अनुभवांवर नंतर सविस्तर अवश्य लिहा.
15 May 2018 - 8:12 am | पैसा
तुमच्या उपक्रमाला आणि संस्थेला खूप शुभेच्छा! नंतर फोटोसहित सविस्तर वृत्तांत जरूर लिहा! उन्हापासून काळजी घ्या.
15 May 2018 - 3:43 pm | मार्गी
शुभेच्छांबद्दल धन्यवाद!!
आज औरंगाबादमध्ये सकाळी देवगिरी किल्ल्यावर सायकलने गेलो. ३७ किमी सायकल चालवली. योग साधकांच्या भेटी होत आहेत.
15 May 2018 - 8:48 pm | बाबा योगिराज
तुमची भेट झाली नाही, एका सायकलवेड्याला भेटता आलं नाही याची खंत कायम मनात राहणार.
:-(
पुढील भेटीची वाट पाहणारा बाबा.....
बाबा योगीराज
16 May 2018 - 2:38 pm | मार्गी
पुढच्या वेळी नक्की भेटूया. मी तिथे येत असतो अधून मधून. खंत ठेवू नका. :)
16 May 2018 - 2:37 pm | मार्गी
आजचं अपडेट- आज औरंगाबाद- जालना ३ तासांमध्ये सायकलीवर आलो. आज रस्ता उत्तम होता. सहावा दिवस असल्याने शरीराला सवय झाली आहे; सो आता सायकलिंग सोपं झालं आहे. योग साधकांच्या भेटी चालू आहेत.
16 May 2018 - 8:33 pm | पुंबा
वा मार्गीजी..
अत्यंत स्तुत्य उपक्रम.
खुप खुप शुभेच्छा..
16 May 2018 - 8:33 pm | पुंबा
वा मार्गीजी..
अत्यंत स्तुत्य उपक्रम.
खुप खुप शुभेच्छा..
17 May 2018 - 12:11 pm | मार्गी
@ पुंबा, धन्यवाद!
आजचं अपडेट- जालना सिंदखेडराजा ३४ किमी आरामात पोचलो. छोटा घाट हेड विंड असूनही सायकल चालवत पार केला. मातृ तीर्थाचं दर्शन घेतलं.
18 May 2018 - 1:16 pm | मार्गी
आज सिंदखेडराजावरून मेहकरला आलो. ५७ किमी. संध्याकाळी योग साधकांना भेटेन.
19 May 2018 - 3:16 pm | मार्गी
आजचं अपडेटः आज मेहकरवरून ७० किमी सायकलिंग करून मंठाला पोहचलो. लोणार- मंठा रस्ता भयाण होता. पूर्ण उखडून ठेवलेला. दुधवाला सायकलीला सॅल्यूट की ती पंक्चर झाली नाही!! मेरीडासारखी सायकल तर मी हातात धरून पायी गेलो असतो. अगदी तडप तडप के इस दिल से आह निकलती रही रस्ता होता. :) आज संध्याकाळी मंठामधल्या योग साधकांसोबत चर्चा.
20 May 2018 - 3:02 pm | मार्गी
आजचं अपडेट-आज मंठा- मानवत ५३ किमी सायकल चालवली. १० दिवसांमध्ये ५५४ किमी झाले. कालची मंठातली मीटिंग मस्त झाली.
20 May 2018 - 6:40 pm | निशाचर
अरे वा! म्हणजे उद्या शेवटचा टप्पा असेल?
20 May 2018 - 7:44 pm | एस
वाटतं तितकं हे सोपं नाहीये. तुमच्या दमसासाला सलाम!
21 May 2018 - 10:13 am | मार्गी
सर्वांना धन्यवाद!
नमस्कार. आज ही मोहीम पूर्ण झाली. परभणीला पोचलो. ११ दिवसांमध्ये ५९५ किमी झाले. योग साधकांसोबत खूप चांगल्या भेटी झाल्या. जुन्या एटलास सायकलने कमाल केली. अतिशय भयाण रस्त्यांवर ती चालली व शेवटपर्यंत नॉट आउट राहिली. तिला दंडवत!! सविस्तर वृत्तांत लवकरच.
22 May 2018 - 5:43 am | निशाचर
अभिनंदन! तुमची चिकाटी कौतुकास्पद आहे.
वृत्तांत लिहिण्याआधी थोडी विश्रांतीही अवश्य घ्या.
23 May 2018 - 10:46 pm | मार्गी
धन्यवाद निशाचर जी! :)