नमस्कार,,
आम्हाला गाव नाही आहे .. आम्ही मुळातच कोयना प्रकल्पग्रस्त असल्याने जी काही मजा केली ती कोकणातच .. मामाच्या गावी ... चिपळूणमध्ये ... चिपळूणमधून वर कुंभार्ली घाट चढला कि घाटमाथा चालू होतो .. तिथून थोडी गावं पार केली कि आमची ग्रामदेवता पद्मावती नव्याने बसली आहे .. तिचे दर्शन तसं म्हंटल तर वर्षातून एकदा तरी घेतो कुटुंबासमवेत ... कधीकधी मनात आलं आणि एकटाच चिपळूणला गेलो असेन तर मामेभावाची बाईक काढून देवीच्या दर्शनाला जाऊन येतो ...
कोयना एक निसर्गरम्य ठिकाण .. घनदाट झाडी ... भरपूर प्राणी आणि झुळझुळ वाहणारे अखंड पाणी ... खरंच हेवा वाटावा असं ठिकाण ... माझ्याकडे आता इथे फोटो नाही आहेत आणि कसे टाकायचे ते माहीत नाहीत .. पण जर टाकले ना तर कुठे तरी हिरव्या धुक्याच्या देशात आलो आहे असे वाटते ... हे धुकं तिथे जवळजवळ उन्हाचे दोन एक कडक महिने सोडले ना तर ठाण मांडून असते ...
एक काही वर्षांपूर्वी जवळजवळ २००९ साल असेल ते ... मी होंडा सिटी ( जुने मॉडेल ) घेऊन जायचे ठरवले .. अपेक्षित होताच पण कडाडून विरोध झाला .. सौ ने हात टेकल्यावर तिने सर्व जबाबदारी घरच्यांवर टाकली .. बाबांना कळल्यावर त्यांनी यथेच्छ समाचार घेतला .. जेव्हढा विरोध झाला तेव्हढा मी प्रतिकार केला .. कारणही तसेच होते मला माझ्या आईच्या आईला म्हणजेच माझ्या आजीला काही दिवस घरी मुंबईला राहण्यासाठी आणायचे होते .. कुणालाही ना जुमानता मी तारीख ठरवली आणि जाहीर केली .. बाबानी पण या रणसंग्रामात जाहीर करून टाकलं कि तू एकट्याने जायचं नाहीस आणि जर गेलास तर परत माघारी यायचं नाहीस तिथेच राहायचं आजीसोबत .. आली कि नाही पंचाईत ... यक्ष प्रश्न उभा होता ... मग मी तहाची बोलणी सुरु केली .. मी त्यांना विश्वास दिला कि आमच्या कंपनीतला एक ड्रायव्हर मी सोबत नेट आहे .. मिस्टर संतोष खांडेकर ... त्याच्याबद्दल आणि त्याच्या अनुभवाबद्दल त्यांनी जातीनिहाय चौकशी केली ... आधीच ते पोलीस अधिकारी .. त्यांनी व्यवस्थित चौकशी करून मग परवानगी दिली .. मी भरपूर खुश होतो .. मग बाबानी मध्येच एक घाट घातला .. तू कुणीतरी बाईमाणूस सोबत घेऊन जायचं .. आईने मावशीला आणि तिच्या मुलाला तयार केलं ... माझी त्यांच्याशी व्यवस्थित गट्टी असल्याने विरोधाचा प्रश्नच नव्हता ... झालं ठरलेल्या वेळेनुसार मी खांडेकराला ठाण्याहून उचललं आणि मावशी ठाणे स्टेशनालाच येणार असल्याने आम्ही तिची वाट पाहत होतो ..
तुम्हाला सांगू .. मावशी सकाळी ११ वाजता येणार होती ती आली दुपारी ३ वाजता .. खांडेकरांच्या नागाची संतापाने नुसती लाही लाही झाली होती .. तो जाम वैतागला होता .. एकतर मी नवीन मारुती ना आणता जुनी गाडी घेऊन आलो होतो .. इतक्या लांबचा प्रवास आणि तोसुद्धा इतक्या उशिरा ... झालं मी कसाबसा त्याला शांत केला आणि प्रवास सुरु झाला .. त्याने गाडी भर ट्रॅफिकमधून जोरात हाकायला सुरु केली ... माझ्यापण जीवाची घालमेल सुरु झाली ... मी त्याला दोन तीन वेळा बजावूनही सांगितलं कि बाबारे आपल्याला काहीही घाई नाही जरा दमाने घे ..
त्याने एका दुचाकीवाल्याला असे काही दाबले कि तो बिचारा पडला .. मावशीने सरळ हरिपाठ बाहेर काढला आणि वाचण्यास सुरुवात केली .. बहुधा तिला पुढे येणाऱ्या अनामिक संकटाची चाहूल लागली असावी .... गाडी १२५ च्या स्पीडने चालली होती .. मध्ये एकदा बैल गाडी डायरेक्ट आडवाटेने हायवेवर आली .. गाडी कशीबशी खांड्याने कंट्रोल केली .. पुढे जाऊन बघतो तर ट्रिपल सीट घेऊन एक फॅमिली मध्ये आली .. ती देखील कशीबशी वाचली .. मावशीने पूर्ण प्रवासादरम्यान श्वास रोखून फक्त एकाच प्रश्न विचारला .. तुझ्या कंपनीत हे विमान चालवतात का ? मी फक्त हसलो आतून जाम धास्तावलो होतो ... कोलाडच्या अलीकडे एक गाव होत .. त्या गावात पलीकडे गावकरी मंडळी कुणाला तरी सोडायला आली होती .. ते दुचाकीस्वार आमच्या रस्त्याच्या पलीकडे होते आणि हात दाखवत दाखवत अचानक गाडीच्या मध्ये आले ... खांड्याने जोरदार करकचून ब्रेक मारला .. पण फार उशीर झाला होता .. लाईफमध्ये पहिल्यांदा याची देही याची डोळा एक भीषण अपघाताला सामोरा गेलो होतो.. तो बाइक वाला अक्षरशः आमच्या गाडीच्या पुढच्या काचेवर आदळून मागे फेकला गेला .. गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत हे खांड्याने लगेच सांगितले .. लोकांनी गाडीला वेढा घातला .. मी जरा बाजूला व्हा गाडी लावायची आहे म्हणून सांगितले .. त्यांना खरे वाटले आणि त्यांनी थोडी जागा दिली .. मी खांड्याला लगेच गाडी पळवायला सांगितली ... आणि मग एक भीषण पाठलाग सुरु झाला .. आम्ही पुढे कोलाडला जाऊन एका जागी विश्रांती घेतली .. मी खांड्याला सांगितले आता काळोख झाल्याशिवाय निघायचं नाही ... खंड्या आधीच घाबरलेला होता .. थरथर कापत होता .. मी त्याला शांत केले आणि धीर दिला ... मग त्याने मला एक सत्य सांगितलं .. तो म्हणाला डॉक्टरसाहेब कंपनीत सांगू नका .. पण मला अंधारात काहीच दिसत नाही .. आता मात्र मी पुरता धास्तावलो .. सालं ज्याच्या जीवावर ब्रेकफेल गाडी हाकायच ठरवलं तोच साला फुसका निघाला .. मावशीने परत मागे फिरण्याचा घोषा चालू केला .. मी चिडून सर्वाना शांत केलं ... मी मग नेहेमीप्रमाणे संकटसमयी माझी स्तोत्रे चालू केली ... खांड्याला मी थोडा संधिप्रकाश असताना जमेल तशी गाडी हळूहळू चालवायला सांगितली ... मला का कुणास ठाऊक कोणीतरी मागावर असणार याची पुरेपूर खात्री होती .. गावकऱ्यांचे अनुभव यापूर्वीही गाठीशी होते .. पण खांड्या मात्र एकदम निवांत होता .. जणू संकटातून साहेबानी व्यवस्थित बाहेर काढल्याप्रमाणे .. जे वाटत होत तेच काही क्षणात घडलं .. जवळ जवळ पंधरावीस दुचाकी स्वारांनी आम्हाला मध्येच गाठलं .. गाडी थांबवणं आता भागच होत .. मी खांड्याला आताच बसून राहण्यास सांगितले .. तीस ते पस्तीस लोकांनी आम्हाला खाली उतरायला सांगितलं .. खांड्याला बाहेर जाऊ नको सांगितलं तरी तो त्वेषाने बाहेर गेला .. बाहेर पडताक्षणी लोकांनी त्याला तुडवायला चालू केलं .. मग मात्र मी मध्ये पडलो .. मी जोरदार आवाज चढवून म्हणालो .. जर मांडवली करायची असेल तर हाणामारी चालणार नाही आणि खपवूनही घेतली जाणार नाही ... एकदम हुकमी डाव लागला होता .. माझं हे वाक्य तो जो काळा शर्ट घातलेला म्होरक्या होता त्याने बर्रोब्बर पकडलं आणि सर्वाना शांत केलं .. आमची मांडवली झाली ती अवघ्या १५०० रुपायामंध्ये .. चला सुटलो एकदाचे म्हणून आम्ही निघालो ... खंड्याने सरळ गाडी माझ्या हातात दिली आणि म्हणाला आजचे तारणहार तुम्हीच आहात तेव्हा आता जो आपण निर्णय घेतला आहे त्याला चिकटून बसा आणि गाडी व्यवस्थित किनार्याला लावा .. मी गाडी हातात घेतली .. ब्रेक नसल्याकारणाने मी कशीबशी हँडब्रेक वापरत वापरत चिपळूणला नेली ...
मावशीच्या जीवात जीव आला पण तिने घरी गेल्यावर जो गोंधळ घातला त्याला तोड नव्हती .. मी खांड्याला दुसर्या दिवशी गाडी नीट करून आणायला सांगितली .. माझा मामेभाऊ पण त्याच्या सोबत जाणार होता ... मी अमितला (मामेभावाला ) सांगितलं आता एवढ्या लांब आलोच आहे तर पद्मावती देवीचं उद्या दर्शन करून येईन म्हणतोय आणि असं पण गाडी दुरुस्त व्हायला वेळच लागणार आहे मग निवांत निघेन परतीला .. अमितने मुकदर्शक होकार दर्शविला .. मी त्याच्याकडे त्याची बाईक मागितली दर्शनाला जाण्यासाठी .. त्याने सांगितलं बाईक आजकाल जास्त चालवली नाही त्यामुळे नीट चेक करून घायवी लागेल मगच तू घेऊन जा ... मी सकाळी उठून निघणार एवढ्यात मावशी म्हणाली मी पण तुझ्यासोबत येतेय .. एकटा जाऊ नकोस .. मी जरा निराशपणेच तिला होकार दर्शविला ... तिलाही ते कळत होतं ... झालं बाईक वर तिला घेऊन मी निघालो .. जाताना वाटेत खेर्डीमध्ये नारळ हार तुरे घेतले आणि निसर्गाचा रम्य अनुभव घेत निघालो .. थोड्याच वेळात कुंभार्ली घाट चालू झाला ... मस्त मस्त पक्ष्यांचे आवाज येत होते मध्येच मुंगुसाने दर्शन दिले ..माकडं तर चिक्कार होती ... कुंभार्ली घाट हे खरतर एक निसर्गरम्य ठिकाण आहे पण कोकणातून घाटावर जाण्याचा मार्ग असल्याने तिथे रहदारी फार कमी असते ... आम्ही पुढे पुढे जात होतो आणि अचानक बाईक पंक्चर झाली .. आता मात्र बिकट प्रसंग उभा ठाकला होता .. हातात पिशव्या आणि ती भली मोठी चढण ..मावशीने सरळ तोंडाचा पट्टाच चालू केला .. कुणाचं तोंड बघितलं आणि इथे आली ते कळत नाही .. निघाल्यापासून हि संकट आवासून उभी आहेत .. कुठे कोण गाडी ठोकतय तर कोण अडवतंय आणि कुत्र्यासारखं मारतंय आणि आता काय तर हे असं जंगलात येऊन माकडांच्या गराड्यात पडायचं ... मी मावशीला शांत बसायला सांगितलं .. मी तिला सांगितलं कि तू परत माघारी जा मिळेल त्या गाडीने आणि अमितला त्याची चारचाकी घेऊन पाठव .. तोपर्यंत मी हि गाडी ढकलत ढकलत वर निघून जातो .. बहुधा वरघाटमाथ्यावर कुणीतरी पंक्चर काढणारं मिळेल.. मावशी म्हणाली," हे बघ सिद्धी आपले दिवस काही योग्य जातायत असं वाटत नाही तेव्हा तू देवीला जाऊ नको हेच बरे " मी तात्पुरती मान हलवली ". बर्याच वेळाने एक गाडी थांबली आणि त्यात मी मावशीला बसवून दिली परतीसाठी .. मोबाईलला रेंजपान नव्हती नाहीतर तिथल्यातिथे सार मिटवून टाकलं असत .. असो ... मी परत वर चढू लागलो .. हळूहळू कसाबसा .. चढत होतो .. एवढ्यात पोटात काहीतरी गडबड असल्यासारखं वाटू लागलं .. आतामात्र खरेखुरे संकट आवासून उभे राहिले होते .. मी अक्षरशः स्तोत्रांचा मारा चालू केला .. कारण त्या घाटात बसायची काही सोयच नव्हती .. एका साईडला रस्ता तर दुसर्या साईडला खोल दरी.. मग मात्र मी तात्काळ मागे फिरायचा निर्णय घेतला .. लांबूनच देवीला पाया पडलो आणि खाली चिपळुणात जाण्यासाठी उताराचा रस्ता असल्याने गाडी ढकलण्याचा प्रश्नच नव्हता .. कशीबशी ती पंक्चर गाडी मी हळूहळू चालवत उतरवू लागलो .. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा कि पंक्चर गाडी चालवणं तेही उतारावर आणि अशा लक्षभेदी वेदनांमध्ये फार कठीण असत .. याची पुरेपूर जाणीव मला येत होती .. मी आपला मध्येच स्तोत्र पाठ आणि मध्येच देवाचा धाव करत करत मार्ग कापत होतो .. बऱ्यापैकी घाट उतरून आल्यावर एकाठिकाणी फार असह्य झाले इतके कि आता सर्व " संस्कार म्हशीच्या ह्याच्यात गेले म्हणून बाईक तिथेच रस्त्यावर टाकली आणि थेट खाली व्हालेत धावत सुटलो .. साल जे पण होईल आणि जे पण मिळेल त्यानेच धुवायचे ठरवले आणि बाजी मारायचीच.. "
खाली त्या निर्बीड झाडात मी आत घुसलो आणि बघतो तर काय ... तुम्हाला विश्वास बसणार नाय राव ... दोन चक्क पाण्याच्या बाटल्या .. त्याही भरलेल्या .. पुढे काय झाले असेल ते सांगायला नकोच ..
आता मला सांगा .. त्या निर्जन जागेत पाण्याच्या बाटल्या कुठून आल्या ? आल्या त्या आल्या पण योग्य वेळी माझ्याच कामाला कश्या आल्या ?
बर्याच लोकांना हे सर्व पटणार नाही .. पण मी ह्या घटनेचा साक्षीदार आहे .. आणि अशी घटना कि जिथे आपले संस्कारपण काहीही करू शकत नाहीत .. ह्या अश्या संकटाचा मुकाबला करायचा असेल तर शेवटच्या टोकापर्यंत वाट पाहावी लागते आणि मग सारी लाज सोडून द्यावी लागते .. मी पण शेवटच्या टोकापर्यंत वाट पाहिली आणि अखेर बाईकाशीच सोडून दिली रस्त्यावर आडवी आणि थेट धावत सुटलो खाली ..
शेवट असा सुखाचा असेल तर त्या अमानवीय शक्तीला प्रणाम करणे आलेच .... त्या बाटल्या तिथे कश्या आल्या .. कुणीतरी ठेवून गेलं असेल ... इथे देवाचा काय संबंध ? असे कैक प्रश्न उठू शकतात .. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही .. पण मी मात्र यातून सहीसलामत बाहेर पडलो होतो आणि जे काही घडले ते माझ्यासाठी एकदम अपरिचित होते ..
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
23 Feb 2018 - 5:41 pm | गवि
पाण्याच्याच होत्या ना बाटल्या नक्की? नंतर खूप गार फीलिंग आणि झोंबरा वास नाही ना जाणवला?
23 Feb 2018 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शक्यता क्रमांक एक : मला वाटतं लोक लपून छपुन पिण्यासाठी अशा अनवट जागेची निवड करतात, माल संपला आणि शिल्लक पाणी उरलं असावं.
शक्यता क्रमांक दोन : देवीच्या स्तोत्रांचा प्रभाव म्हणावा तर फक्त पाणीच का थोड़ा नाश्ता वगैरे किमान मिसळ पाव तरी मिळायला हवं होतं ?
समजा एखाद्या अनियमित पेग घेणा-याने जर स्तोत्र वाचलं असतं तर किमान देवीच्या प्रभावाने किमान एंटीक्यूटी १८० एम् एल मिळाली असती का ?
शक्यता क्रमांक तीन : क्रमश
-दिलीप बिरुटे
24 Feb 2018 - 10:04 am | बिटाकाका
मग बाटल्या कशाला, एक शौचालयच का नाही मिळालं, मग हे का मिळालं नाही, मग ते का मिळालं नाही, मग आमच्यासोबत असे प्रसंग का घडत नाहीत, मग त्यात काय एवढं वगैरे वगैरे वगैरे. हां तर मुदलात काय की अशी कुठलीही शक्ती अस्तित्वात नसते.
************************
माझ्यामते, अशा संकटाच्यावेळी सुटायची कुठलीही शक्यता दिसत नसताना, अचानक अकल्पित घटना घडतात आणि संकट टळते हा अनुभव सामान्य जणांना (सामान्य जणानंच) नेहमी येतो. मग अशा घटनांच्या मागे असणाऱ्या शक्तीला (अशी शक्ती आहे असे मानून) मानले तर त्यात बोचण्यासारखे काय आहे?
24 Feb 2018 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुदलात अशा गोष्टीच्या मागे कोणतीच शक्ति वगैरे नसते, असे म्हटले तर त्यात बोचण्यासारखे काय आहे ?
-दिलीप बिरुटे
24 Feb 2018 - 1:12 pm | बिटाकाका
अस्तिकांना नास्तिक जेवढे बोचतात त्यापेक्षा कितीतरी जास्त नास्तिकांना आस्तिक बोचत असतात असे माझे वैयक्तिक मत आहे. उदाहरणादाखल, मिपावरच बघा अस्तिकांनी नास्तिकांवर लिहिलेल्या लेखांची संख्या आणि विरुद्धपक्षी लेखांची संख्या काय दर्शवते. अशा घटनांमागे देव आहे हे मानाच असं सांगायला आस्तिक नास्तिकांकडे जाताना दिसत नाहीत (निदान मलातरी), उलट अशी घटना दिसली की देव बिव काही नाही, असे घडले असेल, तसे घडले असेल असे सांगायला मात्र नास्तिक हजर!
24 Feb 2018 - 5:01 pm | एकच वादा ओन्ली दादा
तुम्ही पण राव त्या देवेंद्र सारखं सुपीक डोक्याचे दिसता. एक प्रश्न विचारला कि भलताच तिसरीकडचा काहीतरी उगाच काढत बसायचं.
ते सर म्हणतात तसं देव नाही म्हणले तर बोचण्यासारखे कायय ? तुम्हाला दिसलाय का देव ?
अशा पद्धतीने खिलजी साहेब असे होत असते कधी कधी. परत करून बघा बरं, देव ठेवतो का बाटल्या तिथं परत.
अशा पद्धतीने उगाच आपलं काय पण बोलायचं म्हणून बोलायचं. याला काय अर्थ नाही ?
24 Feb 2018 - 5:18 pm | बिटाकाका
बर्रर्र, तुमि सांगा बरं बारामतीकर बॉरोबर उत्तर.
26 Feb 2018 - 10:03 am | एकच वादा ओन्ली दादा
तुमची एक राव कमालच झाली. म्हंटलं होतं कि नायय प्रश्न एक विचारला कि तुमचं भलतंच कायय तरी असतं. अशा पद्धतीने तुमचं सर्व चाललंय.
याला काय अर्थ नाही.
बोचण्या सारखा काय ते सांगा आधी. उगाच थापा मारू नका.
26 Feb 2018 - 10:14 am | बिटाकाका
व्हय का? जरा वर प्रश्नाचा सिक्वेन्स वाचा, मग कळतंय थापा कोण मारालंय! उगा आपलं बोल बोल नाऱ्या कशाला?
26 Feb 2018 - 10:32 am | एकच वादा ओन्ली दादा
विचारलंय तेवढं सांगा.
देव नाही हे बोचायला काय झाले ? पाहिलंय का तुम्ही देव?
देवाने आणून ठेवल्या होत्या वय बाटल्या? त्याला जणू दुसरं कामच नाही.
काय तरी बोलायचं आवाज चढवून.
ओ बारामतीकर$$$$
अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे.
तिकडे त्या ड्राइवर आणि त्याच्या मालकाने ने काय काय प्रताप केले ते दिले सोडून आणि हे बसलेत लोकांना तत्वज्ञान शिकवत.
गाडी मालक काय म्हणतोय, आमच्या पप्पानी जातीनिहाय चौकशी केली. हे काय असते बुवा?
खांडेकरचा नंतर खंड्या? लका चालय काय हे ?
अशा पद्धतीने असले तत्वज्ञान झोडून देवावर जागणाऱ्याची दुकाने बंद तर पडणार नाहीत याची काळजी लागली जणू.
26 Feb 2018 - 10:40 am | बिटाकाका
तुम्ही बारामतीकर नाही?
-------------------------------------
आपले काही स्कोअर सेटल करायचे राहिले आहेत का आधीचे? उगाच वाटून गेले.
-------------------------------------
तुम्हाला काही विचारण्यात आलेलेच नाही, तरी तुमची वचवच चाललीये. एवढीच उत्तर मागायची खुमखुमी असेल तर आधी स्वतः उत्तर द्या मग उत्तर मागा. तोपर्यंत एखाद्याने फालतू बडबड चालू ठेवली ठेवली तर माझी हरकत असण्याचं काहीच कारण नाही, धन्यवाद!
26 Feb 2018 - 11:24 am | एकच वादा ओन्ली दादा
मी म्हंटलं कि नायय तुम्हाला चर्चेत काही इंटरेस्ट नाही. कोण कुठला असली फेकाफेकी करायची.
सोपं विचारलं तुम्हाला, *कोणती शक्ती त्यामध्ये नाही असं म्हणल्यावर बोचायला काय झालं*. कि लगेच तुम्ही उत्तर द्या. बारामतीकर तुम्ही उत्तर द्या. सिक्वेन्स का काय वाचा. अशा पद्धतीने तुम्ही दबाव आणू शकत नाही. उगाच पन्हाळ लावायचे अन जिकल्याच्या अविर्भाव आणायचा.
काटेवाडी आणि बारामतीमध्ये २० कमी च अंतर आहे आणि मी बारामतीत राहत नाही. तरी आपलं ओ बारामतीकर. सोडा लका जळायचं.
हे स्कोर सेटल काय असतं, आपलं काहीतरी नावं देत राहायचं. तुमची माझी ओळख किती दिवसाची? १ महिना झालाय तुम्हाला. मी इथे गेली १५ वर्ष मिसळपाव हादडतोय. चड्डीत राहावा.
अशा पद्धतीने वचवच कोण करतंय बघा. आता आम्ही प्रश्न विचारायचा का नाही? का तुमचं च भजन ताल घेऊन ऐकत बसायचं?
आमच्या खुमखुमीच्या नादी नका लागू काका, तुम्हाला नाही झेपायच.
लय शुद्ध मराठी पाजळली म्हणजे जगाचं सगळं कळलायला लागला अशा भ्रमात नसावं माणसानं. २ मिनटात जमिनीवर याल.
तेवढं सांगा
*शक्ती त्या पाठीमागे नाही, यात बोचण्यासारखं काय आहे?*
जमत नसेल तर सोडून द्या.
26 Feb 2018 - 12:00 pm | बिटाकाका
अवांतर धमकीवजा पर्तिसाद फाट्यावर मारण्यात आलेला हाये.
---------------------------------------
१ महिना झालाय तुम्हाला. मी इथे गेली १५ वर्ष मिसळपाव हादडतोय. चड्डीत राहावा. -- हाहाहाहा!
--------------------------------------
*अशा घटनांच्या मागे असणाऱ्या शक्तीला (अशी शक्ती आहे असे मानून) मानले तर त्यात बोचण्यासारखे काय आहे?* याचं उत्तर येईपत्तुर आसले समदे पर्तिसाद फाट्यावर मारण्यात आपल्याला काय बी आडचण नाय बगा काटेवाडीकर (ता. बारामती)!
23 Feb 2018 - 7:43 pm | उपेक्षित
बाब्बो :) :)
23 Feb 2018 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या सोबत इतक्या घटना घडूनही सहीसलामत राहिलात याचा खूप आनंद झाला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!!
-दिलीप बिरुटे
24 Feb 2018 - 10:05 am | बिटाकाका
छान वाटले वाचताना. जसा घडला तसा लिहिल्यामुळे अजून जास्त भावला लेख!
24 Feb 2018 - 11:12 am | चांदणे संदीप
त्या बाटल्या मीच ठेवलेल्या तिथे... माझ्यावर जी वेळ आली ती तशी कुणावरही येऊ नये म्हणून मी अशा दोन-दोन बाटल्या कुठेही ठेवत असतो. ;)
Sandy
24 Feb 2018 - 12:49 pm | गवि
ज्याने बाटल्या ठेवल्या आणि भजी वगैरेचा इंतजाम करायला जर्रासा दूर गेला त्याचा परत आल्यावर देवावरचा विश्वास उडाला असणार..
कृ ह घे.
24 Feb 2018 - 5:03 pm | एकच वादा ओन्ली दादा
मग काय
24 Feb 2018 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) हहपुवा झाली. मेलो. वारलो. खपलो. उचला आता, सर्व आले.
-दिलीप बिरुटे
26 Feb 2018 - 12:00 am | दीपक११७७
@गवी
किंवा त्याने केलेल्या एखादया अपराधामुळे देवाने शिक्षा केली असे वाटुन देवावर विश्वास अजुन गाढा झाला असेलं
असे होऊ शकते त्या इसमाने मित्रांच्या चोरुन बेत आखला असेल. मग मित्रांना दगा़, म्हणून बाटल्या गायब.
26 Feb 2018 - 10:12 pm | जव्हेरगंज
=))
24 Feb 2018 - 1:01 pm | अभिजीत अवलिया
तात्पर्य - इथून पुढे प्रवासात किमान टिश्यू पेपर जवळ बाळगत जा.
बाय द वे - हात धुवायला साबण न्हवता तिथे. बरोबर?
त्यामुळे ह्यात काही दैवी असेल असे वाटत नाही. बिरुटे सरानी सांगितलेली शक्यता क्रमांक एक असेल.
24 Feb 2018 - 1:21 pm | अमितदादा
अवघड आहे..रात आंधळा ड्राइवर, 125 स्पीड, कार ला विमान समजून उडवणे, दोन तीन जणांना ठोकरणे, अपघाताच्या ठिकाणावरून पळून जाणे...या अनेक गोष्टी पेक्षा तुम्हाला बाटल्या महत्वाच्या वाटतात...
मला नक्कीच यामागे दैवी शक्ती आहे असे वाटते तुम्हाला बाटल्या मिळाल्या नसत्या तर तुम्ही वेदनेच्या भरात आणखी दोन तीन जणांना उडवले असते.
24 Feb 2018 - 3:40 pm | प्रसाद_१९८२
त्या बाटल्या तिथे नसत्या, तर फारच पंचाईत झाली असती तुमची. :)
24 Feb 2018 - 6:12 pm | हतोळकरांचा प्रसाद
आवडला लेख! पोटाची परिस्थिती खराब चा प्रसंग फारच बाका ! बाहेर असताना आला की अशी अवस्था होते काय विचारू नका! रंगवलाय लेख तुम्ही.
24 Feb 2018 - 8:16 pm | सुबोध खरे
रात आंधळा ड्राइवर, 125 स्पीड, कार ला विमान समजून उडवणे, दोन तीन जणांना ठोकरणे,
एवढे असून बरीच माणसे मेली नाहीत याचा अर्थच देव आहे असा होतो.
बाकी हि स्टोरी रोमांचक असण्याऐवजी अत्यंत बेजबाबदारपणाची वाटते.
24 Feb 2018 - 8:38 pm | अमितदादा
अगदी अगदी..
माझा प्रतिसाद देव आहे की नाही ह्या मुद्यापेक्षा इतर मुदयवार आहे फक्त तो sarcastically लिहलाय.
24 Feb 2018 - 9:40 pm | सतिश म्हेत्रे
एवढे असून बरीच माणसे मेली नाहीत याचा अर्थच देव आहे असा होतो.
बर्याच वेळा अपघातातून लोक वाचतात, त्याचा संबंध थेट देव असण्याशी कसा काय?
25 Feb 2018 - 12:42 pm | manguu@mail.com
मेलेत की जगलेत हे बघायला हे थांबलेच नाहीत .
नंतर मेली असतील कदाचित .
24 Feb 2018 - 8:34 pm | जेम्स वांड
जगातल्या सगळ्या पनवत्या आमच्या मागेच लागलेल्या असतात अशी आम्हाला एक बोंबलभिकी शंका कायम ग्रासून असे, तुमचे तर्कट वाचले अन आपल्यापेक्षाही भिकारबम्बू नशीब घेणारा मिपाकर हयात आहे हे वाचून, मिपाकर वगैरे असल्याचा अभिमान वाटला, झालं.
बाकी काही लोक म्हणतायत तसं इतर लोक हवेत उडवले अन वाचलात तेव्हा देव आठवले नाही पण हागाय बसायला गेल्यावर लगीच बाटल्या (ली नव्हे ल्याच) घावल्या तेव्हा देवाचा महिमा पटला हे गैर असू शकतं, पण जेव्हा प्रेशर येतं तेव्हा काही खरे नाही हे पण मंजूर, त्यामुळे तुम्ही तुमच्या कथनात, उडवलेली माणसे वाचली/मेली तरी १५०० मध्ये सौदा पटला, ड्रायव्हर रातांधळा असला तरी झोपेत बडबडणार, चालणारा नव्हता, मावशीने तुम्हाला जिवंत सोडला, अन मग हागायला लागल्यावर दोन बाटल्या पाणी मिळाले , ह्या बद्दल त्या अज्ञात शक्तीला घाऊक आभार प्रदर्शन करावेत , अशी नम्र विनंती.
26 Feb 2018 - 11:45 am | मराठी कथालेखक
तो बाईकवाला हवेत उडून जगला की मेला ते माहीत नाही पण धुवायला पाणी मिळालं याचाच मोठा आनंद..
25 Feb 2018 - 1:56 am | नेत्रेश
ज्या प्रसंगाची जाहीर कबुली दीली आहे त्यात तुम्ही दोघांनीही कित्येक नियम व कायदे मोडले आहेत, गंभीर गुन्हेगारी वर्तन केले आहे. भारतात कदाचित काही होणारही नाही पणअमेरीके सारख्या ठीकाणी अत्तापर्यंत गुन्हा दाखल होउन दोघांनाही नक्कीच जेलची हवा खायला लागली असती, जरी ज्याला उडवले त्याची काही तक्रार नसेल तरीसुद्धा. (भारतातही ते कायदे आहेत, जर त्यावर कुणी अंमलबजावणी करायची ठरवली तर ईथेही तुरुंगवारी होउ शकते. त्या साठी हे लेखन हा मजबुत कबुलीजबाब आहे.)
25 Feb 2018 - 9:32 am | जेम्स वांड
हे लेखन कसे काय कबुलीजबाब झाले म्हणे?
25 Feb 2018 - 3:03 pm | नेत्रेश
ही सत्य घटना असेल तर, किंवा या घटनेचा पोलीस रीपोर्ट झाला असेल तर हे लेखन कबुलीजबाब म्हणुन मानला जाउ शकतो.
25 Feb 2018 - 12:44 pm | manguu@mail.com
१५०० रु मांडवलीला १५ बाइकवाले पाठलागावर .... १५०० चे पेट्रोल त्यानाच लागले असेल.
26 Feb 2018 - 11:35 am | विशुमित
हाहाहा...!!
25 Feb 2018 - 4:01 pm | बबन ताम्बे
कोणती तरी अमानवीय शक्तीच तुमच्या मदतीला आली. मला पण एकदा पुणे बोरीवली शिवनेरी बस मध्ये प्रचंड जोराची एक नंबरला लागली. ईस्टर्न एक्सप्रेस हाय वे ला गाडी हळू हळू चाललिहे , बोरीवली काय लवकर येईना. काय करावे सुचेना. शेवटी काय होईल ते होईल असा विचार करून मालाडजवळ रस्त्यावर उतरलो आणि समोर पहातोय तर बियर बार. गेलो आतमध्ये आणि पहिले टॉयलेट गाठले . आता तुम्ही सांगा मला तेथेच उतरायची बुद्धी का झाली आणि लगेच बियर बारची पण सोय कशी काय झाली ? कुणीतरी शक्तीच असावी. फक्त ती शक्ती अशी अडनिड्या वेळेला प्रेशर का आणते कळत नाही.
25 Feb 2018 - 5:56 pm | चौथा कोनाडा
:-)))
आयला, हे बी भारीय, पुढं काय झालं ? शिवनेरी बस सुखरूप होती ना ?
25 Feb 2018 - 7:20 pm | बबन ताम्बे
अजून थोडा वेळ थांबलो असतो तर दैवी शक्तीने बस मधेच बांध फुटला असता अन मग नसती पंचाईत झाली असती.☺
तात्पर्य : एसी बसमध्ये जास्त पाणी पिऊ नये.
26 Feb 2018 - 11:33 am | एकच वादा ओन्ली दादा
तवा मी हेच सांगत होतो कि कमी पाणी प्या म्हणून. सपशेल माफी मागून पण अजून लोक तोच विषय राहून राहून काढतात.
जाऊ द्या मी सगळं ते विसरून गेलोय. आता फक्त हल्लाबोल.
एका गावात तर पोरांनी माझ्या मिरवणुकीसमोर बुल्लेटचाच ताफा लावला. संपता संपेना राव.
त्यांना म्हंटले तुम्हाला मस वाटत असल आपल्या नेत्यासाठी काय करावं अन काय नकु ते पण जनतेसमोर चुकीचा संदेश गेला नाही पाहिजे. तसं पडला सगळं कार्यक्रम व्यवस्थित.
26 Feb 2018 - 11:37 am | विशुमित
दादा लक्ष असू द्या.
26 Feb 2018 - 11:48 am | एकच वादा ओन्ली दादा
तुला तर झेड पी चच तिकीट देतो. माउली आलेले काल भेटायला.
म्हातारपणी कसं पायाला भिंगरी लावून पळतंय. त्यांच्याकडून शिका जरा.
आजकाल लय मावळ झालाय. कौतुक करताय आपल्या विरोधी पार्टीचं. मोठ्या साहेबांना करू द्यात कौतुक. तुमचं जरा रक्त खवळू द्या.
26 Feb 2018 - 2:56 pm | बबन ताम्बे
तुम्ही म्हणले व्हते पाणीच नाही धरणात तर कुठून आणायचं. त्यात काय ......यचं ? बरं पाणीच नसल्यामुळे ...यला पण होत नाही असं म्हणले व्हते तुमी . हां पण तुमी आत्म्क्लेश/आत्मचिंतन का काय म्हणत्यात ते केले होते ह्ये आठवतंय .
26 Feb 2018 - 3:18 pm | एकच वादा ओन्ली दादा
मी काय म्हणालो हे मला पण आठवत नव्हता. कोणत्या बहाद्दरान क्लिप काढली कायय माहित. जे मनात येईल तसं आधी बोलायचो. बरं असायचे. काही राजकीय अर्थ बिर्थ निघत नसायचं. आता लयच अवघडल्यासारखा होतं.
26 Feb 2018 - 11:43 am | मराठी कथालेखक
बसने (त्यातही एसी बसने) प्रवास करायचा असल्यास दोन-चार तास आधीपासूनच पाणी पिण्यावर नियंत्रण ठेवावे तहान लागेल तसे फक्त घोट घोट पाणी प्यावे. प्रवास एकदाचा संपला की मग लावा बाटली तोंडाला !!
26 Feb 2018 - 11:35 am | कंजूस
चानचान .☺
26 Feb 2018 - 11:35 am | कंजूस
चानचान .☺
26 Feb 2018 - 2:31 pm | खिलजि
नमस्कार वाचकमंडळी ...
मी आपले अभिप्राय वाचले ... बहुतेक अभिप्राय हे वाचनाला धरून नव्हते असे मला खेदाने नमूद करावेसे वाटते ... त्याच काय आहे .. वादळाचे , ते येऊन गेल्यावर विश्लेषण करणे अत्यंत सोपे काम असते ...
कुणी पंधरा वर्ष जुनं असूनही नवीन असल्यासारखं वागतं... तर कुणी स्वतःला भिकारबाम्बू समजतं.. गोचीड हि जरी दुभत्या गायीच्या आचळाला चिकटली तरी ती दूध नाही पीत , रक्तच शोषते ... तसं आपल्या विचारांचं झालेलं आहे ...
मला एक मात्र पटले , कि हे सारे माझ्यासोबत घडलेले तुम्हाला आवडले दिसत नाही अथवा रुचले दिसत नाही ... माणसाने हागाय झाल्यावर हागू कि नये याची मक्तेदारी मोदींनी तुम्हा सर्वावर सोपवलेली दिसतेय ...
बरं जे जे लिहिलंय ते तिखट मीठ लावून असल्यागत वाटलं तरी ते घडलंय ... मला एक सांगा, जर चालकाने राग राग करून गाडी चालवली आणि ठोकरली तर आम्ही सार्यांनी तिथे काय मार खायला थांबायचं का ? त्या दोन्ही व्यक्ती जिवंत होत्या आणि ते पाहून आम्ही तिथून सटकलो .. मला तरी वाटतं , मोबसायकॉलॉजि त्यावेळेस एकदम तापलेली होती तेव्हा तिथून काढता पाय घेणं कधीही योग्यच ... तुम्ही काहीही म्हणा .. नुसतं " दादा " विशेषण लावलं कि कुणी दादा होत नाही .. वेळ मारून नेणाराच खरा दादा असतो ...
१५०० मांडवली बद्दल = १०००० रुपयांवरून १५०० रुपयावर येणं आणि सर्व निस्तरणं याला कौशल्य लागते .. एकंदरीत काहींच्या अभिप्रायावरून असे वाटते कि असा प्रसंग त्या लोकांवर ओढवला तर त्यांना शौचालयाची किंवा अनवट जागेचीपण गरज भासणार नाही .. सर्व विधी तिथल्या तिथेच .. कुठला टिश्यू आणि कुठलं काय ?
मी जे घडलं त्याबद्दल त्या अनामिक शक्तीचा ऋणी आहे .. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर मी " आस्तिक " आहे ... मी मानतो त्या शक्तीला .. विश्व् सोडाच पण त्या बाहेरील अनंत कोटी विश्वाचा नुसता विचार मनात येताच माझा मानवी अहंकार गलितगात्र होतो ..आपल्यापुढील दिसत असलेल्या या जगातील काहीही आपण निर्माण करू शकत नाही .. ईश्वर नाही असे म्हणणे म्हणजे पाण्यातील एका बुडबुड्याने पाणीच नाही असे म्हंटल्यासारखे होईल ...
या वैचारिक महासागरात , ठीकठिकाणाहून मोठ्या पवित्र नद्या येऊन मिळतात ,, कधी खळाळून वाहणारे ओढेही ... लक्षात असू द्या ती वाहणारी गटारही.. तर सर्व सर्व .. त्या महासागरात विलीन होतं... हाताची बोट पाच ( सारखी नसली तरी ) , इंद्रिय पाच , पंचमहाभूत ती पण पाच ( सारखी नसली तरीही ) ... विचारांची देवाणघेवाण तर होताच राहणार ... कुणी काही आचरट बोलेल तर कुणी पटण्यासारखं .. कुणी समजून घेईल तर कुणी कथा वाचल्यासारखं सोडून देईल ...
एकंदरीत अभिप्रायावरून असं वाटतं कि तुम्ही फार शांत आयष्य जगला आहात ... वादळी नाही .. माझ्यासारखं ... मी दोन दिवसांचा प्रवास वर्णन केला तर हे एव्हढे अभिप्राय .. बेचाळीस वर्षांचा प्रवास .. कसा मांडू त्यावर विचार करतोय ... भूकंप येण्याची दाट शक्यता आहे .. मोर्चे निघतील .. चळवळी होतील .. न्यायव्यवस्थेला दोष द्याल .. शिक्षण क्षेत्राचे वाभाडे काढाल .. काही जणांच्या अभिप्रायावरून तर असं वाटतंय कि ते जातीनिहाय चौकशी करतील .. हे खरंच घडलंय कि नाही याची ... कारण त्यांचा हे असं पण होऊ शकत यावर विशवासच बसणार नाही .. पण माझा आहे .. आज मी जो कुणीही आहे तो या स्तोत्रांमुळेच आहे .. आणि आतातर म्हणेन त्या सर्वशक्तिमान शिवामुळेच आहे ...
खरंतर माझी अभिप्रायांची गतपार्श्वभूमी पाहता .. मी खूप खुश झालो होतो ... भरपूर संधी होती ... उच्च दर्जाचा शिकारी बनण्याची .. एव्हढी सावजे आणि तीही अशी समोर ... पण ते त्या शिवलीलामृत ग्रंथामधल्या व्याधासारखं झालं .. मनाच्या उन्मनी अवस्थेत जाण्याचा सध्या प्रयत्न करतोय ... त्यामुळे मानाचं ऐकायचंच नाही असं सध्या ठरवलंय .... किती खुश झालो होतो सांगू तुम्हाला .. हे तुम्ही असे एकापाठोपाठ गळाला लागत गेलात .. मला थोडावेळ वाटलं कि सालं आज लॉटरीचं लागलीय ...
पण मला या संस्थळावर राहायचंय .. किमान पंधरा वर्ष तरी ... परत माफीनामा नाही मागायचाय ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर
26 Feb 2018 - 3:05 pm | एकच वादा ओन्ली दादा
तुमचं त्या मानगुटीवारच्यासारखा झाले राव. घसा बसल. दमानं!
थोडे पाणी प्या. दुपारचा आराम घ्या. आपण नंतर निवांत बोलू . काळजी करायची कारण नायय. मजे मधे राहायचं. काय होतं नाही.
ह्या वेळेस बाटल्याचं सापड्ल्याना, देव कृपा करून अजून चांगलं काहीतरी ठेवायला लावल कोणाला तरी.
अन कुठं जायचं नाही अज्याबात मिसळपाव वरून, इथंच राहायचं हक्कानं.
26 Feb 2018 - 2:59 pm | मराठी कथालेखक
धागाकर्त्याचा वरील प्रतिसाद बघता आपण इतर सामान्य वाचक प्रतिसादकर्त्यांनी अजून 'ती' उंची गाठलेली नाहीये हे स्पष्ट आहेच. आपल्या सगळ्यांची आयुष्ये शांततेत गेलीय कारण आपण १२५ च्या वेगाने गाडी चालवून लोकांना हवेत उडवलं नाहीये...
तर असो.. आपण आता इथूण काढता पाय घेवू या. ..
धागाकर्त्याला बेचाळीस वर्षांच्या वादळी आयुष्यातील प्रवास (त्यातल्या मलमूत्रविसर्जनाकरिता कराव्या लागलेल्या संघर्षासहीत) नीट मांडता यावा म्हणून पूढील लेखनाकरिता माझ्या (मोर्चे न काढता, चळवळ न करता (बाकी शांत आयुष्य जगलेल लोक काही लेख वाचून चळवळ करतील का हा प्रश्न बाजूला), भूकंप होण्यास हातभार न लावता) वाचनमात्र राहून शुभेच्छा.
26 Feb 2018 - 8:52 pm | प्रमोद देर्देकर
सं. मं. विनंती हा धागा उडवावा अगदी आयडी सकट.
अशा लोकांमुळे मिपाची प्रतिमा डागाळते.
27 Feb 2018 - 7:29 am | उपयोजक
तिथं पाण्याची किंवा कुठल्याच सोशिक रसायनाची बाटली नसती तर तसेच येणार होतात का? तिथे पडलेला एखादा कागद, झाडाची पाने जे मिळेल ते वापरलंच असतंत ना?
27 Feb 2018 - 7:44 am | विशुमित
दादा कोंडकेंच्या भाषेत वापरलेला दगड..
27 Feb 2018 - 8:41 am | जेम्स वांड
त्या अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात व्हय! मला वाटलं वेगळंच.