अनुक्रमणिका | १. इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | २. मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | ३. कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | ४. हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | ५. रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | ६. बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | ७. युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ८. ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब | ९. थायरॉइड हॉरमोन्स आणि त्यांचा गोतावळा
शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉरमोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५०हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. यापैकी बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.
पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात आणि मग ती विविध पेशींमध्ये पोचून आपापले कार्य करतात. थोडक्यात, एखादी नदी हिमालयात उगम पावते आणि पुढे कित्येक किलोमीटर वाहत जाते, वाहताना काही ठिकाणी तिची नावे बदलते आणि मग लांबवर कुठेतरी संपते, तसाच काहीसा हा प्रकार आहे.
आता हा मुद्दा अजून स्पष्ट होण्यासाठी आपण थायरॉइडचे उदाहरण घेऊ. ही ग्रंथी आपल्या गळ्याच्या भागात असते. ती स्वतः‘थायरॉइड हॉर्मोन्स ( T४ आणि T३)’ तयार करते. पण तिच्यावरील सर्वोच्च ग्रंथींचे नियंत्रण कसे आहे बघा.
Hypothalamus मुळात TRH हे प्रवाही हॉरमोन सोडते. त्याला प्रतिसाद म्हणून pituitary ग्रंथी TSH हे ‘उत्तेजक’ हॉरमोन सोडते आणि ते थायरॉइडमध्ये पोचून तिला T४ आणि T३ ही हॉरमोन्स तयार करायला लावते.आता T४ आणि T३ ही दमदार आहेत खरी पण ती मनमानी करू शकत नाहीत; ती सतत त्यांच्या ‘वरिष्ठ नियंत्रक’ हॉर्मोन्स च्या गोतावळ्यात अडकलेली आहेत.
या लेखात आपण थायरॉइड हॉरमोन्सची मूलभूत माहिती, त्यांच्यावरील नियंत्रण आणि थायरॉइडचे काही आजार यांची माहिती करून घेणार आहोत.
लेखाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचे खालील विभागात विवेचन करतो:
• थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन
• हॉरमोन्सचे कार्य
• हॉरमोन्सवरील ‘सर्वोच्च नियंत्रण’
• थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि
• थायरॉइडचे रोगनिदानआणि रक्तचाचण्या
थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन
थायरॉइड ग्रंथीमध्ये ‘थायरोग्लोब्युलिन’ नावाचे एक भलेमोठे प्रथिन असते. त्याच्या मुशीतच थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन होते. त्यासाठी लागणारे एक महत्वाचे खनिज म्हणजे ‘आयोडिन’, जे आपल्याला आहारातून मिळवावे लागते. आयोडिनची गंमत म्हणजे ते समुद्राकाठच्या जमिनीत आणि समुद्री-अन्नात भरपूर असते पण, जसजसे आपण समुद्रापासून लांब जातो तसे जमिनीत ते आढळत नाही. पर्वतीय प्रदेशांत तर ते जमिनीत अजिबात नसते. त्यामुळे सर्वांना हे खनिज आहारातून मिळावे यासाठीच आयोडिनयुक्त मिठाची निर्मिती केलेली आहे.
तर थायरोग्लोब्युलिनमधील एक अमिनो आम्ल (Tyrosine) आणि आयोडिन यांच्या संयुगातून T३ व T४ ही हॉरमोन्स तयार होतात. T३ मध्ये आयोडिनचे ३ तर T४ मध्ये ४ अणू असतात. या दोघांमध्ये T४ हे मुख्य हॉर्मोन असून त्याचे पूर्ण नाव Thyroxine आहे. शरीरास जेव्हा या हॉर्मोन्सची गरज लागते तेव्हा थायरोग्लोब्युलिनचे विघटन होऊन ती रक्तात सोडली जातात. त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यांचे रक्तात वहन करण्यासाठी त्यांना प्रथिनांशी संयोग व्हावे लागते. तेव्हा रक्तात असताना ही हॉर्मोन्स ९९.५% प्रमाणात संयुगित असतात. पण त्यांचे जे अत्यल्प प्रमाण ‘मुक्त’ असते तेवढेच हॉर्मोन प्रत्यक्ष कार्यकारी असते.
हॉरमोन्सचे कार्य
ही हॉर्मोन्स सर्व पेशींमध्ये अत्यंत मूलभूत पातळीवर काम करतात. सर्व पेशींची परिपूर्ण वाढ होण्यासाठी आणि त्यांचा चयापचय (metabolism) व्यवस्थित होण्यासाठी ही हॉर्मोन्स अत्यावश्यक आहेत. त्यामुळे पेशींमध्ये उत्तम उर्जानिर्मिती होण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. हृदय आणि चेतासंस्थेच्या कामावरही त्याचे नियंत्रण असते.
थायरॉइड ग्रंथी ही मुख्यतः T४ रक्तात सोडते आणि मग ते सर्व पेशींमध्ये पोचते. आता इथे एक गंमत होते. प्रथम T४ चे T३ मध्ये रुपांतर केले जाते. आता खऱ्या अर्थाने T३ हेच सक्रीय हॉर्मोन बनते आणि ते पेशींमधले सर्व कार्य करते. एक प्रकारे T४ हा आदेश देणारा नेता आहे तर T३ हा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे!
पेशींमध्ये जे T४ पोचलेले असते त्यापासून काही प्रमाणात अजून एक हॉर्मोन – reverse T३ (rT३) – तयार होते. मात्र हे हॉर्मोन ‘बिनकामाचे’(inactive) असते. थायरॉइड हॉर्मोन्सच्या गोतावळ्यात ते एकाची भर पाडते, इतकेच.
हॉरमोन्सवरील ‘सर्वोच्च नियंत्रण’
आपण सुरवातीस हे पाहिले की TRH >> TSH >> T३ व ४ असा हा हॉर्मोन्सचा ‘खोखो’ सारखा पदानुक्रम आहे. मात्र एकदा पुढच्यास ‘खो’ दिला की काम संपले असे अजिबात नाही. या तिन्ही पातळींवर एक ‘negative feedback’ प्रकारची यंत्रणा अस्तित्वात असते. ती अशी काम करते:
१. जर काही कारणाने थायरॉइडने गरजेपेक्षा अधिक T३ व ४ तयार केले, तर ‘वर’ नकारात्मक संदेश पाठवला जातो आणि मग TSH सोडण्याचे प्रमाण खूप कमी केले जाते.
२. याउलट जरका थायरॉइडमध्ये T३ व ४ चे उत्पादन गरजेपेक्षा कमी होऊ लागले, तर ‘वर’ तसा संदेश पाठवून TSH सोडण्याचे प्रमाण बरेच वाढवले जाते.
अशा प्रकारे रक्तातील T३ व ४चे प्रमाण नेहमी नियंत्रणात ठेवले जाते.
थायरॉइड ग्रंथीचे आजार
या ग्रंथीला अनेक कारणांनी इजा होऊ शकते. त्यातून दोन प्रकारच्या रोगावस्था निर्माण होतात:
१. थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता ( Hypothyroidism ) आणि
२. थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य ( Hyperthyroidism )
(येथे जे आजार मुळात थायरॉइडचे (Primary) आहेत, फक्त त्यांचाच विचार केला आहे. तसे Hypothalamus आणि Pituitary यांच्या आजाराचाही थायरॉइडवर परिणाम होऊ शकतो. पण, ते आजार तुलनेने कमी असल्याने त्यांचा विचार केलेला नाही.)
आता दोघांचा आढावा घेऊ.
थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता : याची दोन महत्वाची कारणे स्थानिक आहारविषयक परिस्थितीनुसार अशी आहेत:
१) जगाच्या ज्या भागात अद्याप आहारातून पुरेसे आयोडिन मिळालेले नाही तिथे ‘आयोडिनची कमतरता’ हे मुख्य कारण आहे. त्यामुळे थायरॉइडमध्ये हॉर्मोन्सचे उत्पादन अपुरे होते.
२) याउलट आहार-संपन्न भागांमध्ये वरील प्रश्न उद्भवत नाही. इथे ‘ऑटोइम्यून थायरॉइडआजार’ हे महत्वाचे कारण आहे. यात रुग्णाच्या शरीरातील काही प्रथिने त्याच्याच थायरॉइडच्या पेशींना मारक होतात आणि मग हळूहळू ग्रंथीचा नाश होतो.
वरीलपैकी किंवा अन्य कोणत्याही कारणाने थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता झाली की ‘feedback’ नुसार pituitary ग्रंथी अधिक प्रमाणात TSH सोडते आणि ते थायरोइडमध्ये पोचल्यावर तिला जास्तीतजास्त उत्तेजित करून पुरेसे T३ व ४ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या रोगावस्थेत सुरवातीस रक्तातील TSH वाढलेले असते. तर आजाराच्या पुढच्या स्थितीत T४ हे कमी होऊ लागते.
थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य
याचे मुख्य कारण आहे Graves-आजार. हाही एक ‘ऑटोइम्यून’ थायरॉइडआजार आहे. पण इथे परिणाम बरोबर उलटा होतो. ठराविक प्रथिने थायरॉइडला नको इतकी उत्तेजित करत राहतात. त्यामुळे T३ व ४ हे अतिरिक्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे त्यांच्या नकारात्मक ‘feedback’ मधून ‘वरून’ TSH सोडणे जवळजवळ बंद होते. त्यामुळे रक्तातील TSH चे प्रमाण नगण्य असते.
थायरॉइडचे रोगनिदानआणि रक्तचाचण्या
थायरॉइडच्या आजारांमध्ये रक्तचाचण्यांचे खूप महत्व आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. तसेच सर्व लक्षणे एकाच रुग्णात दिसत नाहीत. एखाद्याच्या बाबतीत फक्त वजन झपाट्याने कमी/जास्त झालेले असते तर अन्य एखाद्याला फक्त जुलाब/ बद्धकोष्ठतेचा त्रास असू शकतो. तर एखाद्याच्या बाबतीत फक्त नाडीचे ठोके जलद वा मंद होऊ शकतात. एकूणच आजाराचे स्वरूप बऱ्याचदा गूढ असते. अशा वेळेस रक्तातील हॉर्मोन्सची मोजणी हा निदानासाठी महत्वाचा आधार ठरतो.
बहुसंख्य रुग्णांचे बाबतीत मोजक्या २ चाचण्या पुरेशा असतात:
१. TSHची पातळी : ही सर्वात संवेदनक्षम आणि महत्वाची चाचणी आहे. थायरॉइडच्या कोणत्याही रोगावस्थेत सुरवातीस या पातळीत प्रथम बदल दिसतो. ही पातळी अतिसंवेदनक्षम-तंत्राने मोजली जाते.
२. ‘मुक्त (Free) T४’ ची पातळी : रक्तात जेवढे मुक्त T४ असते तेच खरे सक्रीय हॉर्मोन असते. त्यामुळे ते मोजले पाहिजे. ‘एकूण T४’ ची मोजणी काही वेळेस विश्वासार्ह नसते.
आता वरील दोन्ही पातळ्या मोजल्यावर प्रमुख रोगांचे निदान असे केले जाते:
१. थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता: यात TSH बरेच वाढलेले आणि ‘मुक्त (Free) T४’ कमी झालेले दिसते. रोगाच्या सुरवातीस फक्त TSH वाढलेले पण T४ नेहमीएवढेच असे चित्र असते.
२. थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य : यात TSH खूप कमी झालेले (कित्येकदा न मोजता येण्याइतके) आणि मुक्त (Free) T४ वाढलेले दिसते.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की ‘T३’ ची मोजणी ही अजिबात प्राथमिक चाचणी नाही. ‘कमतरते’च्या निदानात त्याची आवश्यकताच नसते आणि ‘अधिक्य’च्या बाबतीत अत्यल्प रुग्णांसाठी तिची गरज पडू शकते. अन्य काही चाचण्या थायरॉइडच्या विशिष्ट रोगानुसार (उदा. कर्करोग) केल्या जातात.
गेल्या तीन दशकांत थायरॉइडचे आजार समाजात खूप वाढत गेले आहेत. स्त्रियांमध्ये त्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. तेव्हा या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला त्रास होत नसतानाही थायरॉइडची ‘चाळणी’(screening) चाचणी करणे हितावह ठरते आहे. यासाठी फक्त TSH ची मोजणी पुरेशी असते. दोन महत्वाच्या प्रसंगी TSH मोजणे आता अनिवार्य ठरले आहे:
१. गर्भवतीची चाचणी : जरका गरोदर स्त्रीस थायरॉइड-कमतरता असेल तर त्याचा अनिष्ट परिणाम गर्भाचे वाढीवर होतो.
२. नवजात बालकाची चाचणी : जन्मानंतरच्या सुरवातीच्या काळात थायरॉइड हॉर्मोन्स मेंदू व शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे त्यांची कमतरता नसल्याचे जन्मतःच खात्री करून घेणे आवश्यक आहे.
पन्नाशीनंतर सर्वच स्त्रियांनी TSH चाचणी नियमित स्वरूपात करावी असा एक मतप्रवाह आहे पण अद्याप तो सार्वत्रिक झालेला नाही.
सर्वसामान्य आकाराची आणि मोठी झालेली थायरॉइड ग्रंथी
थायरॉइड अंतःस्त्राव कमी झाल्यामुळे (हायपोथायरॉइडीझम) ग्रंथीचा वाढलेला आकार (गॉयटर)
(सर्व चित्रे जालावरून साभार)
समारोप
थायरॉइड ही एक अतिशय महत्वाची ग्रंथी आहे. तिची हॉर्मोन्स ही शरीरातील सर्व पेशींमध्ये मूलभूत उर्जेसंबंधीचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या बिघाडाचे परिणाम अनेक इंद्रिय/ यंत्रणांवर होतात. आपली जीवनशैली आणि पर्यावरण यांच्यातील बिघाडांमुळे दिवसेंदिवस थायरॉइडचे आजार वाढत आहेत. आजहॉर्मोन्स संबंधी आजारांमध्ये मधुमेह प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखालचे स्थान थायरॉइड-कमतरतेने पटकावले आहे. आयुष्याच्या कुठल्या नाकुठल्या टप्प्यावर अनेकांना थायरॉइडच्या रक्तचाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा यासंबंधीची मूलभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने हा लेखप्रपंच.
*************************
प्रतिक्रिया
5 Feb 2018 - 12:15 pm | नेत्रेश
अत्यंत चांगली माहीती सोप्या शब्दात मांडली आहे.
5 Feb 2018 - 12:16 pm | आनन्दा
अनुमोदन..
5 Feb 2018 - 1:01 pm | शलभ
+१
5 Feb 2018 - 12:22 pm | अनिंद्य
@ कुमार१
उत्तम लेख. ही पूर्ण मालिकाच माहितीपूर्ण झाली आहे.
लगे हाथो तुम्ही 'स्क्रिनिंग टेस्ट्स' साधारण कोणत्या वयात व कुठल्या कराव्यात याबद्दलही लिहावे असा आग्रह.
अनिंद्य
5 Feb 2018 - 12:25 pm | सचिन काळे
छान माहिती दिलीय. आपण थायरॉईड आजाराची एकूण तीनच लक्षणे सांगितली आहेत. ही लिस्ट अजून वाढवता येईल का?
5 Feb 2018 - 12:38 pm | कुमार१
सर्वांचे आभार.
@सचिन :
१. कमतरता : थंडी सहन न होणे, वजनवाढ, नैराश्य, सूज, नाडी मंद
२. आधिक्य : उष्णता सहन न होणे, खूप घाम, चिंताग्रस्त ता, थकवा, मासिक पाळी बिघाड. नाडी जलद.
5 Feb 2018 - 12:52 pm | सचिन काळे
धन्यवाद, सर!
5 Feb 2018 - 1:38 pm | मार्मिक गोडसे
छान माहिती.
एक महत्वाचे खनिज म्हणजे ‘आयोडिन’, जे आपल्याला आहारातून मिळवावे लागते. आयोडिनची गंमत म्हणजे ते समुद्राकाठच्या जमिनीत आणि समुद्री-अन्नात भरपूर असते पण, जसजसे आपण समुद्रापासून लांब जातो तसे जमिनीत ते आढळत नाही. पर्वतीय प्रदेशांत तर ते जमिनीत अजिबात नसते. त्यामुळे सर्वांना हे खनिज आहारातून मिळावे यासाठीच आयोडिनयुक्त मिठाची निर्मिती केलेली आहे.
ह्यावर डॉ. हिंमतराव बावस्कर यांचे संशोधन.
https://www.google.co.in/amp/s/m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai...
5 Feb 2018 - 1:55 pm | कुमार१
अनिंद्य, तुमची सूचना उत्तम आहे. प्रस्तुत माला संपल्यावर त्याचा स्वतंत्रपणे विचार करेन.
मार्मिक, आभार. आयोडिनयुक्त मीठ हा वादग्रस्त विषय आहे खरा. पर्वतीय प्रदेशात ते प्राधान्याने पोचले पाहिजे. आपणा शहरवासीयांना ते कितपत गरजेचे आहे यावर वाद आहे
5 Feb 2018 - 4:45 pm | एस
आता आयोडिनयुक्त मिठाचा वापर व्यापक स्वरूपात सुरू होऊन बरीच वर्षे झालीत. तरीही थायरॉईडग्रंथींचे आजार का वाढत असावेत या प्रश्नाणे बुचकळ्यात पडलो आहे.
5 Feb 2018 - 5:47 pm | कुमार१
थायरॉईडग्रंथींचे आजार का वाढत असावेत >>>> माझे मत :
बिघडलेली जीवनशैली व रसायनांचा धुमाकूळ > हॉर्मोन्स चा सूर बिघडणे. त्यांत थायरॉईड व जननेंद्रिये खूप संवेदनक्षम असतात.
एकूणच ऑटो इम्युन आजार याने वाढले
6 Feb 2018 - 1:34 pm | सुमीत भातखंडे
माहितीपूर्ण लेख
6 Feb 2018 - 1:40 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
6 Feb 2018 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर मालिकेतले अजून एक मौक्तिक ! या लेखमालिकेमुळे मिपाकरांना सोप्या शब्दांत उत्तम माहिती मिळून त्यांचे (असल्यास) अनेक गैरसमज दूर होतील.
पुभाप्र.
6 Feb 2018 - 2:21 pm | सूड
सुंदर माहिती.
6 Feb 2018 - 2:27 pm | कुमार१
सर्व नवीन प्रतिसादकांचे मनापासून आभार !
डॉ सुहास, एक विनंती. आयोडीन कमतरतेमुळे होणाऱ्या गलगंडा चा एखादा फोटो इथे सर्वांचे माहितीसाठी डकवावा असे वाटते. मी अजून ते शिकलो नाही. तुम्ही हे प्रतिसादात कराल का ? धन्यवाद
6 Feb 2018 - 3:39 pm | कुमार१
डॉ सुहास यांनी उत्कृष्ट फोटो डकवल्या बद्दल दंडवत आणि आभार !
6 Feb 2018 - 4:19 pm | सस्नेह
उपयुक्त माहिती.
तथापि त्रोटक वाटली. लक्षणे आणि त्यातून उद्भवणारे धोके तसेच उपचार याबद्दल अधिक लिहावे.
6 Feb 2018 - 4:44 pm | कुमार१
धन्यवाद.
जालावरून उपचारांबाबत काही लिहायचे नाही असे माझे धोरण आहे आणि या लेखमालेत मी ते पाळले आहे.
शरीरातील काही रासायनिक घटकांची मूलभूत माहीती आणि त्यांच्या आजारांबद्दल थोडक्यात माहिती अशी या मालेची मध्यवर्ती भूमिका आहे
6 Feb 2018 - 5:10 pm | manguu@mail.com
छान
6 Feb 2018 - 8:39 pm | चौकटराजा
माझे वैद्यक विषयावर वाचन बर्यापैकी आहे. मात्र हार्मोन्स निरर्मितीचे धोरण ग्रंथीना इतर काही सेन्सर सारखी यंत्रणा परस्पर देते असे वाटत असे. सर्वच ग्रंथीना मेंदु कडून नियन्त्रित व्हावे लागते काय ? की फक्त थायराईड ला ? बाकी प्रोटीन म्हणजे शत्रू की मित्र ठरवणे अवघडच !
6 Feb 2018 - 8:59 pm | कुमार१
सर्वच ग्रंथीना मेंदु कडून नियन्त्रित व्हावे लागते काय ? >>>
थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांना व्हावे लागते.
स्वादुपिंडाला नाही.
Hypothalamus ला हॉर्मोन यंत्रणांची राणी म्हणतात !
7 Feb 2018 - 1:55 am | पद्मावति
छान लिहिता. माहितीपुर्ण.
7 Feb 2018 - 8:44 am | कुमार१
पद्मावती, आभार.
TRH >> TSH >> T4 हे नाते समजण्यासाठी एक चपखल उपमा देतो. जर T4 हा मुख्यमंत्री असेल तर वरचे दोघे पक्षश्रेष्ठी आहेत.
जर मुख्यमंत्री कणखर असेल तर पक्षश्रेष्ठीना चूप बसावे लागते. पण जर मुख्यमंत्री दुबळा असेल तर श्रेष्ठी वरचढ होतात ! ☺
7 Feb 2018 - 9:44 am | चौकटराजा
पन्चवीसेक वर्षापूर्वी माझ्या आईला हायपर प्रकारच्या थायरॉईड चे निदान झाले .आम्ही तिला घेऊन मुंबई ला "टाटा" ला घेऊन गेलो. तिला आयोडीन बहुदा रेडिओ एकटीव्ह चा एक डोस देण्यात आला . नंतर काहिही समस्या आली नाही. त्यानंतर सुमारे २३ वर्षे ती हयात राहिली.
7 Feb 2018 - 9:26 pm | गणेश.१०
समजा:
थायरॉईडचा आजार (Hypothyroidism auto -immune type) निदान झाला आहे.
डॉक्टरांनी थायरॉक्सिन गोळ्या लिहून दिल्या आहेत -- दररोज १०० मायक्रोग्रॅम
यासंदर्भात मला काही प्रश्न आहेत (कदाचित सर्व वाचकांनाही यातून बरेच शिकायला मिळेल, गैरसमज दूर होतील)
१) गोळ्या अनियमित घेतल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात?
२) किंवा सलग काही महिने गोळ्या बंद केल्यास काय होऊ शकत?
३) Auto-immune hypothyroidism कायमचा बरा होऊ शकतो का (उदाहरणार्थ : दैनंदिन आरोग्य सुधारल्यास)? की आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात?
अजून एक इंटरेस्टिंग (चांगला मराठी शब्द काय असावा इंटरेस्टिंग साठी? इथे 'मनोरंजक' शब्द वापरणं चुकीचं वाटतंय) प्रश्न आहे मनात, पण तूर्तास इथे थांबतो जेणेकरून चर्चा मुद्देसूद राहील.
धन्यवाद.
7 Feb 2018 - 9:53 pm | कुमार१
गोळ्या अनियमित घेतल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात?>>
मूळ आजाराची लक्षणे फोफावतील.
२) किंवा सलग काही महिने गोळ्या बंद केल्यास काय होऊ शकत? >> Hypothalamus - pituitary -thyroid या axis मध्ये बिघाड होतो जो हितावह नाही
३) Auto-immune hypothyroidism कायमचा बरा होऊ शकतो का (उदाहरणार्थ : दैनंदिन आरोग्य सुधारल्यास)? >>>>
नाही. कारण त्यात ग्रंथीचा नाश होत असतो. किती प्रमाणात नाश झालाय यावर गोळ्या किती काळ घ्यायच्या आणि किती प्रमाणात हे ठरेल.
8 Feb 2018 - 5:40 am | कुमार१
Auto-immune hypothyroidism कायमचा बरा होऊ शकतो का >>>>
नाही. आशा आजारांचे बाबतीत 'बरे होणे' हा प्रकार नसतो. त्यांना औषध घेऊन 'नियंत्रणात' ठेवावे लागते.
9 Feb 2018 - 10:05 pm | गणेश.१०
Hypo-thyroidism आजारात उपचार (थायरॉक्सिन गोळ्या ) घेतल्याच गेल्या नाहीत आणि रुग्ण अत्यवस्थ झाला -- उदाहरणार्थ -- आतड्यांची हालचाल (किंवा metabolism process) जवळ-जवळ पूर्ण थांबली तर गोळ्या सोडून काही इतर उपचार असू शकतात का?
कारण metabolism थांबल्यामुळे गोळ्या मधले औषध शरीरात शोषले जाणार नाही. आणि थायरॉईड शिवाय metabolism सुरु होणार नाही (कोंबडी आधी की अंडं अशी समस्या ?)
सोप्या शब्दात सांगायचे तर अशा रुग्णास revive करण्याच्या दृष्टीने थायरॉईड ट्रीटमेंट करणे शक्य आहे का?
13 Feb 2018 - 8:19 pm | सुबोध खरे
अशा रुग्णास revive करण्याच्या दृष्टीने थायरॉईड ट्रीटमेंट करणे शक्य आहे.
Hypo-thyroidism चा रुग्ण अत्यवस्थ झाला याला MYXEDEMA COMA म्हणतात. हि स्थिती गंभीर असते आणि ताबडतोब इलाज केला नाही तर ५० % रुग्ण दगावतात. अशा स्थितीमध्ये रुग्णाला शिरेत थायरॉक्सिन देतात तरीही रुग्ण सुधारण्यास ४-५ दिवस जातात. कारण शरीराचे तापमान कमी झालेले असते रुग्णाच्या अंगाला सूज आलेली असते. मानसिक स्थिती नीट नसते. नाडी हळू चालत असते रक्तदाब कमी झालेला असतो. पण तरीही
साधारणपणे हायपो थायरॉईडीझम मध्ये आतड्याची हालचाल पूर्णपणे कधीच थांबत नाही. त्यामुळे रुग्ण शुद्धीत असेल तर त्याला थायरॉक्सिनची गोळी देता येते. (आतड्याची हालचाल पूर्ण थांबली तर रुग्ण हायपोथायरॉईडमुळे नाही तर आतड्यातील जंतुसंसर्गामुळे दगावतो.)
10 Feb 2018 - 6:03 am | कुमार१
वरील प्रश्नाचे उत्तर अनुभवी हॉर्मोन-तज्ञच देऊ शकतील.
12 Feb 2018 - 10:26 am | अश्फाक
हाइपोथायरायडिज्म (कमी) का मुख्य आजार आहे आनी मूल झाल्यानंतर अचानक स्त्रियांचे वजन वाढणे हा मुख्य इंडिकेटर आहे
याचे कारण असे असते की प्रेग्नेंसी दरमियान काही नवीन हार्मोन शरीरात बनतात जी थायराइड हार्मोन ला विरोध करता त
किंवा त्यांच्या प्रतिद्वंद्वी सारखे वागतात
म्हणून प्रेग्नेंसी दरमियान थायराइड चेक करने जि तके जरूरी आहे तिचा पेक्षा जास्त जरूरी प्रेगनेंसी झाल्यानंतर चेक करने जरूरी है
आता उपचार संबंधी
हाइपरथायराइडिज्म हाइपोथायराइडिज्म पेक्षा मो ठा आजार आहे
हाइपोथायरायडिज्म चा उपचार करने हे जास्त सोपे आणि स्व स्त आहे म्हणून हाइपरथायराइडिज्मआजार झाल्यास रेडियोएक्टिव आयोडीन चा डोस देवुन थाइरोइड ग्लैंड नष्ट केला जातो आणि रुग्णाला हाइपोथायराइडिज्म बनवले जाते
मग आयुश्य भर टी4 दिल जाते
12 Feb 2018 - 3:30 pm | चौकटराजा
माझ्या आईला रेडियोएक्टिव आयोडीन चा डोस दिल्यावर टी४ वगैरे काही द्यावे लागले नाही. ती त्यानंतर २३ वर्षे कोणत्याही समस्येशिवाय जगली.
12 Feb 2018 - 3:50 pm | कुमार१
@ चौरा : हायपर ची 3 महत्त्वाची कारणे आहेत:
1. Graves dis.
2. Toxic MN goiter
3. Toxic adenoma
तुमच्या आईंच्या बाबतीत वरील 2/3 ची शक्यता वाटते. 1 चे खूप रुग्ण मात्र हळूहळू 'हायपो 'मध्ये जातात.
अर्थात सार्वत्रिक काहीच नसते
13 Feb 2018 - 7:46 pm | सुबोध खरे
काही गोष्टी बरोबर नाहीत. गरोदरपणामध्ये थायरॉक्सिन या संप्रेरकाची जास्त गरज भासते. ज्या स्त्रियांची थायरॉईड ग्रंथी हे संप्रेरक अधिक प्रमाणात तयार करू शकत नाही (failing thyroid) तरच गरोदरपणात हायपोथायरॉईड हि व्याधी होते परंतु बाळंतपणानंतर शरीराची थायरॉइडची गरज कमी झाल्याने परत हि स्थिती पूर्ववत होते. अर्थात काही वर्षांनी जसे वय वाढते आणि हि ग्रंथी काम अजूनच कमी करू लागते तेंव्हा परत हायपोथायरॉईड हि स्थिती येते.
मुळात थायरॉईडचे काम व्यवस्थित चालू आहे अशा स्त्रीला गरोदरपणात हायपोथायरॉईड स्थिती होत नाही.
मूल झाल्यानंतर अचानक स्त्रियांचे वजन वाढणे हा मुख्य इंडिकेटर आहे
मूल झाल्यानंतर( आणि गरोदरपणात) अतिरिक्त खाण्यामुळे बहुसंख्य स्त्रियांचे (९९%) वजन वाढते यासाठी आपल्या जुन्या गैरसमजुती कारणीभूत आहेत.
बाळंत होणाऱ्या स्त्रीचे वजन साधारण ६० किलो असते. तर बाळाचे साधारण वजन ३ किलोच्या आसपास असते. मग आता तुला "दोन जीवांसाठी खायचे आहे" हा सल्ला मुळात चूक आहे. म्हणजे ६३ किलो एकंदर वजन (१०५ %) साठी दुप्पट खाल्ले कि काय होईल. म्हणून बहुसंख्य बायकांचे वजन वाढेल. तेंव्हा गरोदरपणात ज्या स्त्रीची थायरॉईड स्थिती व्यवस्थित आहे तिला बाळंतझाल्यावर थायरॉइडची चाचणी करणे आवश्यक नाही.
13 Feb 2018 - 8:24 pm | कुमार१
मग आता तुला "दोन जीवांसाठी खायचे आहे" >>> +1
हा फार मोठा गैरसमज आहे. कित्येकांना त्याबाबत कानीकपाळी ओरडून सांगितले तरी पटत नाही
12 Feb 2018 - 10:56 am | कुमार१
म्हणून प्रेग्नेंसी दरमियान थायराइड चेक करने जि तके जरूरी आहे तिचा पेक्षा जास्त जरूरी प्रेगनेंसी झाल्यानंतर चेक करने जरूरी है>>>> सहमत.
सुमारे १०% बाळांतीनीना हायपो होण्याचा धोका असतो. साधारण ३ महिन्यांत त्या पूर्ववत होतात.
पण काहींच्या बाबतीत पुढच्या गरोदरपणात ही हा धोका वाढतो. तर काहींना पुढे कायमचा 'हायपो' होऊ शकतो
13 Feb 2018 - 2:51 pm | कुमार१
आपला चर्चेत सहभाग, वैयक्तिक अनुभवकथन आणि शंकानिरसन यामुळे चर्चा चांगली झाली
सर्वांचे आभार !
14 Feb 2018 - 11:04 am | कुमार१
जाता जाता ...….
थायरॉइड च्या रक्तचाचण्या करतेवेळीस एक खबरदारी घ्यायची. ती म्हणजे तेव्हा रुग्णास इतर कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग (acute infection) झालेला नसावा.
हे दुर्लक्षून जर चाचण्या केल्या तर त्यांचे निष्कर्ष विश्वासार्ह नसतात .
23 Feb 2018 - 9:45 am | कुमार१
मला या चाचण्यांसंबंधी व्यनीतून एक शंका विचारली गेली त्यातून लोकांचा एक गैरसमज जाणवला. म्हणून सर्वांसाठी हे लिहितो.
TSH, T3 &T4 यांपैकी 'एकूण' व 'मुक्त' हे प्रकार फक्त T3 & T4 लाच लागू आहेत; TSH ला अजिबात नाही.
TSH हे फक्त TSHच असते
10 Mar 2018 - 10:35 am | कुमार१
थायरॉइडचे ‘ऑटोइम्यून’ आजार वाढत चालले आहेत. त्याच्या अनेक कारणांमध्ये रसायनांचा त्रास हे एक महत्वाचे कारण आहे. त्यावर सतत संशोधन चालू आहे. बऱ्याच प्रयोगांत खालील रसायने थायरॉइडला घातक असल्याचे आढळले आहे. ती रसायने आणि त्याचे स्त्रोत असे:
१. PFCs : स्वयंपाकाची नॉन-स्टिक उपकरणे, गालिचे, फोमचे फर्निचर
२. कीडनाशके : विशेषतः ‘फंगस’ मारणारी
३. पेट्रोकेमिकल उद्योगातून बाहेर पडणारी रसायने : या प्रकल्पाच्या जवळ राहणाऱ्यांत या आजारांचे प्रमाण जास्त आहे.
10 Mar 2018 - 9:26 pm | तेजस आठवले
hand tremors चा थायरॉईडशी काय संबंध असावा ? हात थरथरणे हे चेतासंस्था आणि मज्जातंतू ह्यांच्याशी संबंधित असते, त्यावर थायरॉईड ग्रंथीचे नियंत्रण असते का? आत्यंतिक दडपण आणि मानसिक तणाव असल्याने हातापायांचे थरथरणे होऊ शकते. हे आणखीन एक कारण आहे.
आपण किंवा इतर कोणी ह्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का? धन्यवाद.
11 Mar 2018 - 9:41 am | कुमार१
hand tremors चा थायरॉईडशी संबंध समजण्यासाठी थोडी दुसऱ्या हॉर्मोन्सची माहिती देतो. adrenal ग्रंथीतून catecholamines हॉर्मोन्स स्त्रवतात.
निरोगी अवस्थेत थायरॉईड हॉर्मोन्स चेतासंस्थेवरील catecholamines चा प्रभाव वाढवतात.
आता ‘थायरॉईड-अधिक्य’ मध्ये हा प्रभाव खूप वाढतो. हातांची थरथर (आणि एकूणच hyperactivity) ही catecholamines च्या जास्त प्रभावाची लक्षणे आहेत (sympathetic hyperactivity).
11 Mar 2018 - 5:15 pm | तेजस आठवले
धन्यवाद कुमारजी.anxiety वाढणे पण ह्यांच्याशीच संबंधित असावे बहुतेक. खरंच मन (जे दृश्य स्वरूपात दिसत नाही) पण शरीरावर त्याचा प्रभाव किती असतो नाही !
11 Mar 2018 - 7:54 pm | Nitin Palkar
खूप उशिराने प्रतिसाद देतोय पण व्यवस्थित समजण्यासाठी परत सावकाशीने वाचून नंतर नेहमी प्रमाणेच छान असे म्हणतो. सामन्यांच्या दृष्टीने क्लिष्ट असणारी माहिती सहज समजेल अशा स्वरुपात लिहिण्याची तुमची हातोटी खूपच भावते.
11 Mar 2018 - 9:08 pm | कुमार१
धन्यवाद! तुम्हाला उपयुक्त वाटल्याचे समाधान आहे
16 Mar 2018 - 10:21 am | कुमार१
आतापर्यंत असा समज होता की ‘ऑटोइम्यून थायरॉइड आजार’ हा कधीही ‘बरा’ होत नाही आणि त्याचे उपचार कायम घ्यावे लागतात.
नवीन संशोधनानुसार असे आढळले आहे की या आजाराने ग्रासलेल्या ५% रुग्णांमध्ये थायरॉइडचे कार्य पूर्ववत ‘नॉर्मल’ होऊ शकते.
24 Oct 2018 - 9:57 am | कुमार१
“मोना लिसा’ या ऐतिहासिक चित्राने अनेकांना भुरळ घातली आहे. त्या चेहऱ्याची विविध विश्लेषणेही प्रसिद्ध आहेत. या संदर्भात काही डॉक्टरांनी देखील त्याबद्दल मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते चित्रातील व्यक्तीला थायरॉइड-कमतरते सारखा आजार असावा !
चित्रातील खालील गोष्टी या मताला पुष्टी देतात:
१. भुवया नसणे आणि डोक्याचे पातळ केस
२. त्वचेचा पिवळेपणा
३. चेहऱ्याचे दुबळे स्नायू
४. मानेच्या भागातील फुगीरपणा हा वाढलेल्या थायरोइडमुळे असावा.
संदर्भ: (https://www.mayoclinicproceedings.org/article/S0025-6196(18)30579-2/fulltext)
27 Nov 2019 - 12:30 pm | जॉनविक्क
यांचा कधी कशाशी संबंध जोडला जाईल ब्रम्हदेवही नाही सांगू शकणार :) अवांतराबद्दल क्षमस्व.
27 Nov 2019 - 1:15 pm | कुमार१
अवांतर नाही ; अगदी योग्य बोललात !
27 Nov 2019 - 10:14 am | कुमार१
एका वाचकाने व्यनितून TSH चाचणी बद्दल एक प्रश्न विचारला. हा मुद्दा सर्वांसाठी उपयुक्त असल्याने थोडे लिहितो.
या गृहस्थांच्या मोबाईलमध्ये एक जाहिरात येऊन आदळली ती अशी:
“ फक्त ४९ रुपयांत TSH करून देणार – ते पण तुमच्या घरी येऊन रक्त घेऊन जाणार !”
या गृहस्थांना थायरॉइड संबंधी कुठलाच त्रास नाहीये. मग आता यांनी ही चाचणी ‘सहज’ करावी का?
प्रौढांमध्ये एक गरोदर स्त्री वगळल्यास ही चाचणी कुठल्याच निरोगी (लक्षणे नसलेल्या) व्यक्तीने करायची गरज नाही. ५०+ स्त्री आणि ६०+ पुरुषांनी ही चाळणी चाचणी करावी का, यावर गेले दशकभर उहापोह चालू आहे. तज्ञ संघटनांचीही मते उलटसुलट आहेत. परंतु, अलीकडील विचारानुसार खालील मुद्दे सुचविले आहेत:
१. थायरॉइड आजारासंबंधीची कॉमन लक्षणे ही असतात : थकवा, वजन घटणे, थंडी वा उष्णता अजिबात सहन न होणे, नाडीचे अनियमित ठोके. जर यापैकी काहीही नसेल, तर अशा लक्षणविरहित व्यक्तींनी सहज म्हणून ही चाचणी करू नये.
२. अन्य काही आजारांसाठी विशिष्ट औषधे घेत असलेल्यांनी ही जरूर करावी. यात मानसोपचारासाठीचे ‘लिथियम’ आणि हृदय- अतालबद्धतेसाठी दिले जाणारे amiodarone यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
३. जे रुग्ण अशी औषधे घेत असतात, त्यांचे डॉ. त्यांना ही चाचणी करण्याचा सल्ला देतातच.
४. सारांश: जे लोक वरील कुठल्याच गटांत मोडत नाहीत त्यांनी स्वताच्या मनाने ही चाचणी करू नये.
12 Aug 2020 - 1:35 pm | कुमार१
Noel Rose या ९२ वर्षीय संशोधकांचे निधन झाले.
ऑटोइम्युन आजार या संकल्पनेचे ते जनक.
त्यांनी संशोधनाची सुरवात थायरॉइड पासून केली होती.
आदरांजली !
18 Aug 2020 - 7:36 pm | कुमार१
कोविडने बाधित काही स्त्रियांमध्ये थायरॉईड-दाह झाल्याचे आढळून आले आहे.
एकंदरीत हा विषाणू शरीरातील बऱ्याच अवयवांचा दाह घडवून आणतो असे दिसते आहे.
अर्थात त्या आजाराचा थायरॉईड वर होणारा परिणाम सध्यातरी अल्पकालीन वाटतो आहे. या रुग्णांचे पुढील काळात बारकाईने निरीक्षण केल्यावरच अधिक प्रकाश पडेल.
1 Jan 2021 - 12:27 pm | कुमार१
थायरॉईड न्यूनता आणि आहारातील कोबी व तत्सम भाज्या वर्ज्य करणे, याबद्दल बराच वाद आहे; काही गैरसमज देखील पसरलेले आहेत.
नुकत्याच यासंदर्भात झालेल्या नव्या संशोधनामुळे यावर अधिक प्रकाश पडला आहे.
Brassica या वनस्पतींच्या गटामध्ये कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर, सलगम, Brussels sprouts, kale इत्यादी भाज्या येतात. त्यांच्यामध्ये glucosinolates ही रसायने असतात आणि त्यामुळे थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनात बाधा येते, अशी मूळ थिअरी आहे.
अलीकडे एका प्रयोगात निरोगी व्यक्तींना भरपूर ब्रोकोलीचा रस तब्बल चार महिने प्यायला देऊन त्यांच्या थायरॉइड चाचण्या केल्या गेल्या. तेव्हा त्या चाचण्यांच्या निष्कर्षावर कोणताही अनिष्ट परिणाम झालेला दिसला नाही. या सर्व भाज्या थायरॉईड रुग्णाने वर्ज्य कराव्यात याला पुरेशा शास्त्रीय आधार किंवा पुरावा नाही.
एखाद्या कुटुंबात जेव्हा या भाज्या जेवणासाठी केल्या जातात तेव्हा एका व्यक्तीच्या वाट्याला जेवढे काही येते, तेवढे जरूर खावे.
सारांश : या भाज्या जर आवडत असतील, तर थायरॉइडचा विकार आहे म्हणून त्या जाणीवपूर्वक वर्ज्य करण्याची काही गरज नाही. तारतम्य महत्त्वाचे.
9 Apr 2022 - 9:50 am | कुमार१
थायरॉईड ही अतिशय संवेदनाक्षम ग्रंथी आहे. अनेक जंतुसंसर्ग आजारांचा ही तिच्यावर काही प्रमाणात परिणाम होत असतो. कोविड महासाथीच्या दोन वर्षानंतर यासंदर्भातील काही संशोधनाचा आढावा :
अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले की covid-19 झालेल्या रुग्णांना कालांतराने थायरॉईडच्या काही समस्या उद्भवल्या आहेत. त्या साधारण तीन प्रकारच्या आहेत :
१. थायरॉइड दाह : अशा रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. विशेषता जे रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होते त्यांच्या बाबतीत ही अधिक जाणवली आहे. अशा रुग्णांच्या प्रयोगशाळेचे रिपोर्ट T4 अधिक्य आणि TSH न्यूनता दाखवत आहेत.
२. ज्या रुग्णांना थायरॉईड अधिक्याचा Graves-आजार पूर्वी होता आता तो पुन्हा डोके वर काढत आहे.
३. अल्प रुग्णांना थायरॉईड न्यूनतेची समस्या जाणवली आहे.
एकंदरीत पाहता अशा सर्व रुग्णांचे दीर्घकाळ निरीक्षण करावे लागणार आहे.
11 Apr 2022 - 12:53 am | तर्कवादी
डॉक्टर
मलाही याचा अनुभव आला/येत आहे. पण मला कोव्हिड झाला होता की नाही ते माहित नाही सप्टेंबर २०२० मध्ये तशी शंका आली होती पण टेस्ट केली नाही, अँटीबायोटीक वगैरे घेवून तीन चार दिवसांत बरा झालो. पण खूप अशक्तपणा , अंगदुखी जाणवायची बीकोस्युल्स ही कॅप्सुल घेतली की अंगदुखी अगदी जादूई तर्हेने कमी व्हायची ..काही दिवस ही समस्या होती. मग पुन्हा गाडी रुळावर आली. पुढे जुन व जुलै २१ मध्ये कोव्हिड प्रतिबंधक लशीची अनुक्रमे पहिली व दुसरी मात्रा घेतली. त्यानंतर मात्र झपाट्याने प्रकृती बिघडली... सतत अशक्तपणा, थकवा, अंगात दाह (बारीक ताप असल्याप्रमाणे ) जाणवत होता. एक किमी चालणेही खूप कठीण वाटे. अंग दुखायचे , गुडघे दुखायचेत.. अगदी मी नी कॅपही विकत घेतली होती. दिवसभरात अनेकदा झोपावेसे वाटे (घरुन काम असल्याने वेळेचे जमवत २-३ वेळा किमान १५-२० मिनटांची तरी झोप घेत असे) मग ऑगस्टमध्ये आधी अॅलोपथी डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे व्हीटॅमिन पुरके चालू केलीत .. पण फारसा फरक पडला नाही. TSH (फक्त TSH - T3, T4, नाही) ची तपासणी केली , ते ठीक होते. व्हिटॅमिन B12 , D3 यांच्या तपासण्याही केल्यात , त्यापण ठीक होत्या. सोबतच युरिक अॅसिड, ESR, RA Factor, Anti CCP ई तपासण्याही केल्यात , त्या सगळ्यांचे निकाल ठीक होते. मात्र CRP १३ पेक्षाही जास्त होते. यासर्व तपासण्या ऑगस्ट मध्य व सप्टेंबरमध्ये केल्यात.
मग पुढे सप्टेंबर अखेरीस आयुर्वेदिक उपचार चालू केली आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने T3, T4, TSH या तपासण्या केल्या तेव्हा T3 वाढलेले होते. डॉक्टरांनी थायरॉईडला सूज आली असल्याचे निदान केले आणि आयुर्वेदिक उपचार सुरु केलेत. हळूहळू माझी अंगदुखी कमी होत गेली. थकवा कमी होवू लागला. यासर्व काळात माझे वजन मात्र वाढत राहिले. फेब्रुवारी २२ अखेरीस पुन्हा काही चाचण्या केल्यात T3, T4, TSH या सर्वांचे प्रमाण आता ठीक होते. पण CRP कमी झाला तरी अजूनही ९.७ इतका होता (५ पेक्षा कमी होणे अपेक्षित होते). आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी शरीरातील दाह कमी होण्यासाठी आणखी काही औषध बदलून दिलेत. एप्रिलमध्ये CRP आणखी कमी होत ७.१ पर्यंत खाली आला. आता मी बर्यापैकी नियमितपणे २ ते ३ किमी चालतो. तरी वजन अजून काही कमी होत नाही. अंगदुखी कधी कधी होते त्यावेळी SOS म्हणून दिलेले आयुर्वेदिक औषध (संशमनी वटी) किंवा / आणि बीकोस्युल्स कॅप्सुल घेतो.
सध्या शरीरातील दाह आणखी कमी व्हावा म्हणून दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करतो.
आपण मला याबाबत काही मार्गदर्शन करु शकाल काय ? लशीकरणानंतर समस्या कुणाला अशा प्रकारच्या समस्यांचा त्रास झाला आहे का ?
11 Apr 2022 - 7:12 am | कुमार१
आता तुमची तब्येत सुधारते आहे हे छानच. पूर्ण तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा !
ज्या डॉक्टरांनी तुमची तब्येत पाहिली आहे त्यांचाच सल्ला प्रमाण मानावा.
लसीकरणानंतर काहीजणांना काही समस्या जाणवलेल्या आहेत. पण त्यात बरीच विविधता आहे.
19 May 2022 - 12:41 pm | कुमार१
अलीकडे अनेक जण आपल्या त्वचा केस आणि नखांच्या सौंदर्यवर्धनासाठी काही औषधी गोळ्या खात असतात. अशा बऱ्याच गोळ्यांमध्ये बायोटीन या ब जीवनसत्वाचे प्रमाण खूप जास्त असते (गरजेच्या दोनशे पट).
जर अशा लोकांची थायरॉईडसंबंधी चाचण्या करण्याची वेळ आली तर समस्या निर्माण होते.
या गोळ्यामधील बायोटीनमुळे थायरॉईड हॉर्मोन्सच्या मोजणीमध्ये गडबड होते. त्यांना जरी थायरॉईडअधिक्य झालेले नसले तरीही T3 , T4ही हॉर्मोन्स वाढल्याचे चुकीचे चित्र समोर येते.
म्हणून अशा लोकांनी थायरॉइड चाचण्या करण्यापूर्वी एक आठवडाभर आधी बायोटीनयुक्त गोळ्या खाणे बंद केले पाहिजे.
23 Jun 2022 - 10:51 am | कुमार१
थायरॉईड न्यूनता असलेल्या रुग्णांना थायरोक्सिनची गोळी रोज घ्यावी लागते. ती सकाळी उठल्यानंतर काही खाण्यापूर्वी एक तास आधी घेण्याची शिफारस आहे.
बऱ्याच जणांना हे नियोजन करणे गैरसोयीचे वाटते. त्यादृष्टीने आता खाण्याबरोबरच हे औषध घेता येईल का याचे संशोधन चालू आहे.
हेच औषध आता द्रव स्वरूपातही निघाले असून सध्या ते पाश्चात्त्य देशात उपलब्ध आहे. ते द्रव स्वरूपात घेतले असता त्याच्या शोषणावर जेवणाचा विशेष परिणाम होत नाही असे प्राथमिक चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. पुरेसे संशोधन झाल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.
सध्यातरी ते द्रव स्वरूपातील औषध गोळीपेक्षा बरेच महाग आहे.