हे एक आमचे संशोधन, खास जनहितार्थ. गाणी, संवाद वगैरे ऐकताना लोकांना असे प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.
तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्या शब्दांच्या व्याख्या.
फूटी कौडी:
प्रत्यक्षात जी देणार्याकडे नसते. घेणार्याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट. लोक एकतर फूटी कौडीही देत नाहीत, नाहीतर सगळी जायदाद देतात. पण जायदाद पैकी फूटी कौडीही न दिल्याने गेली अनेक द्शके पिक्चर्स मधे झालेला झालेला हिंसाचार केवळ एखादी फुटकी का होईना कवडी देऊन थांबवता आला असता का यावर संशोधन व्हावे. म्हणजे जाउ दे त्याच्या/तिच्या बापाने किमान एक फुटी कौडी तरी दिली आहे तेव्हा आपण जायदाद हस्तगत करण्याचे प्रयत्न शांततामय/संवैधानिक मार्गाने करू असे ते चित्रपटातील व्हिलन-मामा वगैरे म्हंटले असते का वगैरे. त्रिशूल मधे संजीवकुमार ने रिसेप्शनिस्ट ला कोणी चिडलेला चेहरा घेउन भेटायला आला तर जरा त्याला आधीच ४-५ फूटी कौडियाँ देउन मगच आत पाठव अशी एक जनरल प्रोसेस सेट करून ठेवली असती, तर तो त्या भारी सीन ला अमिताभची 'आज मै आपसे पाँच लाख का सौदा कर रहा हूँ, और मेरे जेब मे पाँच फूटी कौडियाँ भी नहीं है' वगैरे डॉयलॉगबाजी टोटली नलीफाय करू शकला असता. तेव्हा भावी जायदाद होल्डर लोकांनी हे लक्षात ठेवावे की घरात लॉजिकल कारण नसताना बायकोचा भाऊ, मामा किंवा भाचा उगाच ये-जा करत असेल तर त्यांना अधूनमधून काही फूटी कौडिया देत राहावे.
मौला:
हे लोक प्रेमात पडलेल्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात."ती" ने एकदा हसून बघितल्यावर जर पुढच्या वेळी तिने बघितले नाही तर डायरेक्ट एकदम "मेरे मौला मेरे मौला, देदे कोई जान..." वगैरे विव्हळणारे प्रेमी जीव असतात त्यांच्यासाठी फॅमिली मौला नावाची संस्था आस्तित्वात येणे आवश्यक आहे अशा प्रसंगी कन्सल्ट करायला. प्रत्येक जण "मेरे मौला" म्हणत असल्याने प्रत्येकाचा एक स्वतंत्र मौला असावा. फॅमिली डॉक्टर, टॅक्स कन्सल्टंट, लीगल अॅडव्हायजर असतात तसे. मग लग्नाच्या आदल्या दिवशी याचा मामा तिच्या मामाला भेटून ओळख करून घेतात तशी दोघांकडचे मौला एकमेकांना भेटवत असतील. तसेच सगळे मौला या कामाला लागले तर जागतिक शांतताही होउ शकते हा दुसरा फायदा. मात्र यांनी अनेक शतके धर्माच्या बाबतीत जे केले त्यावरून आता प्रेम ही संस्था धोक्यात आहे हे नक्की
सजदे:
अस्सल मराठी लोक प्रेमात पडले की "ती"ला मिळवण्याकरिता हे करतात. उदा: 'खट्टा मीठा' मधे टिचकुले आडनावाचा मुलगा व गणपुले आडनावाची मुलगी प्रेमात पडतात तेव्हा सजदे करतात, दुवाँ मागतात. मात्र प्रदक्षिणा जशी एखादी घालून चालते तसे याचे नाही. हे एखाद्या किंमत कोसळलेल्या चलनाप्रमाणे एकदम लाखो मधे करावे लागतात.
दुनियावाले:
सरकारच्या 'वजने व मापे' विभागाकरता प्रेम मोजण्याचे काम हे लोक करतात. कसे कोणास ठाउक पण जगात सर्वात जास्त प्रेम कोणी केले हे यांना कळते. एरव्ही हे प्रेमी लोकांना विरोध करणे, त्यांच्यावर जळणे, त्यांची अनावश्यक खाजगी चौकशी करणे ई. कामे करतात. गजलयुक्त गाण्यांमधे 'वो'/'उनको' वगैरे उल्लेख आले आणि ते लीड पेअर पैकी कोणाला चपखल बसले नाहीत, तर नक्कीच यांच्याबद्दल असतात.
बाजा:
राजा लोकांचे अत्यंत नावडते वाद्य.
प्रेमाच्या तीन लेव्हल्सः
या लेव्हलच्या नावात जितके "जा" व "ने/ना" येतील तितक्या जास्त असतात. जा चा उच्चार ज्या सारखा.
उदा: १. जा २. जानेजा ३. जानेजाना
अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी.
पुस्तकः
बापाने 'जी ले अपनी जिंदगी' म्हंटल्यावर ट्रेन ने फिरायला निघाल्यावर गाडी पकडल्या पकडल्या जराही खिडकीबाहेर सुद्धा न पाहता पहिल्यांदा उघडतात ती वस्तू. किंवा कोणाला आपले शहर दाखवायला नेताना सुद्धा बाजूला वाचत बसतात - लहान मुलाला पार्क मधे घसरगुंडी वर सोडून आपण बाकड्यावर वाचत बसावे तसे. जज किंवा प्रोफेसर चे घर असेल तर जितकी पुस्तके असतील तितकी सर्वांना सारखे कव्हर घालून मागच्या शेल्फ मधे बरोब्बर बसली पाहिजेत. पुस्तके कशाचीही असू शकतात. हीरो इंजिनिअरिंग करत असेल तर 'इंजिनिअरिंग' चे पुस्तक असते. तो शेर मारत असेल तर त्याच्या शायरीचे असते. जरा आणखी गहन काहीतरी असेल तर उपन्यास असतो. हीरो चा "कारोबार" असेल तर एकाच शेल्फ वर Principles of Physiology, Thesaurus आणि Advertising Management शेजारी शेजारी असावीत.
पियानो:
कीबोर्ड वरच्या साधारण मधल्या १०-१५ कीज वर बोटे फिरवून कोणत्याही ताला-सुरातील गाणे वाजवता येणारे वाद्य
मैफिल:
मैफिल हे साधेसुधे काम नव्हे. सर्वसाधारण मराठी स्त्रियांचे मंगळागौर, हळदीकुंकू जशा रिच्युअल असतात तशा बडे खानदान की लडकीयोंकी अशी एक रिच्युअल असते. उसकी मैफिल. "तेरी मैफिल मे..." असे स्पष्ट उल्लेख असलेली अनेक गाणी अभ्यासून हेच लक्षात येते.
लोकेशनः एक मोठा हॉल. मागे दोन्ही बाजूने वरती जाणारे जिने असतील तर उत्तम, नाहीतर किमान मधे एक मोठा जिना असावा. हॉल च्या मध्यभागी एक पियानो.
पात्रयोजना अशी हवी:
हीरॉइनः कालानुसार मेकअप, किंवा विसंगतही चालेल. गाणार्या व्यक्तीच्या समोर गाणे कळत असल्याची अॅक्टिंग करावी लागते. तसे दिग्गज गीतलेखक कधीकधी फेल-सेफ ओळी लिहीतात, म्हणजे "न जाहिर हो, तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" यात अभिनय करू शकणारी हीरॉइन ते बरोबर दाखवेल, तर न करू शकणार्या हीरॉइनला या ओळीला वेगळे काही करावेच लागणार नाही. त्यामुळे एक साधारण रडका चेहरा इतपत तयारी पुरते. दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे आधी कसमे वगैरे खाउन मग लाथाडलेल्या गरीब हीरोला स्वतःच्या मंगनीच्या मैफिलीत बोलावून त्यालाच गायला सांगणे इतकी "आ बैल" गिरी करता यायला हवी.
गरीब हीरो: हा गरीब असल्याने हीरॉइन त्याला पूर्वी दिलेल्या शपथा वगैरे विसरून दुसर्याबरोबर लग्न करणार आहे, असा त्याचा समज असतो. हा रोल करायचा असेल तर तीन गुण अत्यावश्यकः १. गरीब असणे २. पियानो फिल्मी स्टाईलने वाजवता येणे (वरती पियानोची व्याख्या पाहा) व ३. एक रडके गाणे अचानक म्हणता येणे. मैफिलीत अचानक गाण्याची ऑर्डर मिळून सुद्धा एक विरहगीत एकदम तयार असायला हवे. पेपरवाले जसे कोणी आजारी पडले की एक श्रद्धांजलीपर लेख तयार ठेवतात तसे मैफिल चे आमंत्रण आले की विरहगीत खिशात ठेवूनच निघावे. दुसरे म्हणजे "Dude, this occasion is not about you" याची अजिबात फिकीर न करता हिरॉइन चा वाढदिवस असेल किंवा मंगनी किंवा लग्न, तेथे आपली रडकथा सादर करता यायला हवी. ती कधी अगम्य भाषेत, कधी सभ्य पण थेट, तर कधी थेट आणि अपमानास्पद अशा कोणत्याही भाषेत करता यायला हवी.
हीरॉइनचा बापः या मैफिलीचा निर्माता. कारण ही अवस्था त्याच्यामुळेच निर्माण झालेली असते. चिरूट ओढत इकडेइकडे गर्वाने बघत फिरणे हे मुख्य काम
श्रीमंत बकरा: तो श्रीमंत आहे हे दाखवायला सूट घातला की झाले. अधूनमधून हीरॉइन वर हक्क दाखवणार्या हालचाली करणे. चालू असलेले गाणे कोणाबद्दल आहे कोणास ठाऊक असे एक्स्प्रेशन्स पाहिजेत. हीरॉइनच्या व याच्या अगदी in your face येउन बेवफाई, मेरे आँसू, गरिबी, चाँदी सोना विरूद्ध प्यार भरा दिल वगैरे गाणारा हा हिचा नक्की कोण आहे. इतक्या चांगल्या प्रसंगात हा हे काय गातोय वगैरे प्रश्न डोक्यात जराही आलेले दिसलेले चालणार नाहीत.
मैफिलीतील हुशार स्त्री: हे गाणे कोणाला उद्देशून आहे हे (फक्त) हिला समजले आहे, हे सतत चेहर्यावर दिसले पाहिजे. त्यामुळे गूढ हास्य करत एकदा हीरो कडे व एकदा हीरॉइन कडे आलटून पालटून पाहणे आवश्यक.
बाकी उपस्थित जनता: पूर्वीच्या डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस सारखे जागा मिळेल तेथे बसलेले किंवा उभे. दोन बोटांत वाईन किंवा इतर दारूचे ग्लास धरलेले, मठ्ठपणा हा मुख्य गुण. म्हणजे गरीब हीरो ने "तेरी बेवफाई का शिकवा करू तो..." हे हॉल च्या मध्यावर रडका चेहरा करून उभ्या असलेल्या हीरॉइनकडे बघत म्हण्टले तरी त्याला "कोण बरे ती इतक्या यशस्वी असलेल्या तुला दुखावणारी?" असे विचारण्याइतके अज्ञान पाहिजे. येथे हा ही लॉजिकल प्रश्न पडू नये की जर ते या हीरॉइन बद्दल असेल तर थेट बोल की. आणि या हीरॉइन बद्दल नसेल, तर तिच्या मैफिलीमधे मधेच तुझी कहाणी कशाला?
तसेच आपल्या मागच्या तीन पिढ्यांमधले टोटल उर्दू नॉलेज हे पुलं म्हणतात तसे "हमारे बगीचे मे पैदा हुआ फुलदणाणा" च्या पुढे गेलेले नसेल तरी "खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया", किंवा " एक यही मेरा इलाज-ए-गम-ए-तनहाई है" सारखी डबल-ए बॅटरी पॉवर्ड उर्दू वाक्ये आपल्याला समजली आहेत अशा थाटात माना डोलावता आल्या पाहिजेत.
यातली कोणतीही गोष्ट जमणार नसेल तर मैफिलीच्या नादी लागू नका.
प्रतिक्रिया
29 Jan 2018 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास ....! संशोधन आवडलं. :)
-दिलीप बिरुटे
29 Jan 2018 - 10:18 pm | यशोधरा
मस्त!
29 Jan 2018 - 10:23 pm | नाखु
(रडकी) गाणी डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागली.
मुळात धूर(काढे), धुवट (चेहरे), घोडनवरे हि अश्या सिनेमातील आवश्यक जंगम मालमत्ता असावी असा आमचा प्राथमिक अंदाज आहे
नितवाचक नाखु शिनेमावाला
29 Jan 2018 - 10:35 pm | गवि
फारेंडराव द ग्रेट..
29 Jan 2018 - 10:40 pm | पैसा
=)) चिरफाड!
30 Jan 2018 - 9:14 am | पगला गजोधर
मस्त...
30 Jan 2018 - 9:16 am | सुखीमाणूस
मज्जा आली वाचताना
30 Jan 2018 - 9:42 am | अभिजीत अवलिया
मस्त...
फूटी कौडी तर लाजवाब.
30 Jan 2018 - 11:02 am | ss_sameer
30 Jan 2018 - 11:02 am | ss_sameer
30 Jan 2018 - 11:02 am | ss_sameer
.
30 Jan 2018 - 11:30 am | चित्रगुप्त
वाहवा.
30 Jan 2018 - 11:49 am | अनिंद्य
@ फारएन्ड
काय तो व्यासंग :-) :-)
गीतकरांच्या फेल-सेफ ओळी
पियानो (याचा उच्चार 'प्यानो' असाच करावा लागतो - उदा. ये मेरी माँ का प्यानो है)
वजने व मापे विभागाचे प्रेम मोजणारे, दोन्ही बाजूने वरती जाणारे जिने असलेला मैफिलीचा हॉल आणि ते बत्थड चेहऱ्याचे मैफिलवाले .... खूप हसलो.
अब ऐसी फिल्मे क्यों नही बनती यार?
30 Jan 2018 - 12:27 pm | विशाल कुलकर्णी
जबरी राव फारेण्डा ;)
उदा: १. जा २. जानेजा ३. जानेजाना
यापुढची लेव्हल बहुदा "जानेजाना, जा बाई एकदाची" ही असावी. ;)अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी.
30 Jan 2018 - 1:08 pm | आनन्दा
जाने-जनाना कसं वाटतं?
30 Jan 2018 - 12:59 pm | SHASHANKPARAB
जबराट एक्दम
30 Jan 2018 - 12:59 pm | चांदणे संदीप
फिदीफिदि हसून घेतलं. बऱ्याच दिवसांनी.
Sandy
30 Jan 2018 - 1:10 pm | पुंबा
मौल्यांविषयी वाचूनच वारलो.
तसंच प्यार मे जोगी/जोगन बननार्यांविषयीसुद्धा लिहा.
30 Jan 2018 - 1:57 pm | टवाळ कार्टा
कहर आहे =))
30 Jan 2018 - 2:15 pm | गवि
लगी, दिल्लगी, दिल की लगी..
फर्क है बहुधा.
१. लगी लगी है ये दिलकी लगी, न समझो इसे दिल्लगी.
२. चाहने जब लगे दिल किसीकी खुशी
दिल्लगी है नही है ये दिल की लगी.
30 Jan 2018 - 3:12 pm | मित्रहो
मस्त खुशखुशीत लेख
ते मैफिल प्रकरण जुन झाल आता, हल्लीची मैफिल सरळ व्यासापीठावर असते तेही हातात गिटार घेउन. सारा राग गिटारच्या तारांवर काढला जातो. केस लांब असेल तर राग त्याच्यावरही निघतो. मला पडलेला प्रश्न लांब केस नसतील गिटारच्या क्लासला प्रवेश मिळत नाही काय. गाणे ऐकायला आलेले अशा रडगाण्यालाही हात डोलवत असतात. एक हसीना थी किंवा क्या हुवा तेरा वादा किंवा अब तेरे बिन जी लेंगे हम.
मला वाटत हेही थोड जुनच झाल. गाणे शोधतो पण हल्लीच्या चित्रपटात सार आउटसोर्स असत म्हणजे ब्रेकअप झाला तरी हिरो किंवा हिरोइन नाही तर कोणी भलता तिसराच गळे फाडत असतो.
30 Jan 2018 - 5:20 pm | मराठी कथालेखक
पण हे जास्त योग्य वाटत नाही का ? प्रत्येक काम हीरो हीरोईननेच केलं पाहिजे वा त्यांना करता आलं पाहिजे असं नाही. गाता न येणारा नायकही प्रेमात पडू शकतो आणि त्याचंही ब्रेकाप होवू शकतं
30 Jan 2018 - 3:36 pm | ज्योति अळवणी
आवडेश
30 Jan 2018 - 4:26 pm | मराठी कथालेखक
भरपूर मालमसाला जमवून एक संशोधनपर लेख लिहिला आहे...लय भारी..
30 Jan 2018 - 5:38 pm | निशाचर
मस्तच!
30 Jan 2018 - 10:18 pm | चित्रगुप्त
जाने चमन (ओ जानेचमन तेरा गोरा बदन)
जाने तमन्ना (जाने तमन्ना क्या कर डाला आचल मे मुस्का के)
जाने जिगर (दिल जाने जिगर तुझ पे निसार)
जाने बहार (... हुस्न तेरा बेमिसाल है)
जाने मन (जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी)
31 Jan 2018 - 2:03 am | वीणा३
धमाल लेख. ओ फारएंड दादा, जरा जास्त लिहीत जा की ओ . सगळ्या मारामारीवाल्या राजकारणी लेखांपासून तेवढीच सुटका.
31 Jan 2018 - 2:12 am | रुपी
हा हा.. मस्तच :)
31 Jan 2018 - 4:03 am | मुक्त विहारि
"पियानो" वर फक्त रडकीच गाणी नाही आहेत.
http://www.misalpav.com/node/40067
31 Jan 2018 - 9:09 am | शेखरमोघे
आपकी महेफिलमे मझा आने लगा है.....
आणखी काही नमुने:
प्रकार १: हिरोच्या (किन्वा हिरवीणीच्या पण चालेल) हातात एक गलास द्या, त्यात कोरा च्या भरा, त्याना जरा अस्थिर चालत नश, बिशा असले शब्द असलेली गाणी म्हणू द्यात.
प्रकार २: हिरोच्या (किन्वा हिरवीणीच्या किन्वा दोघान्च्याही) सन्गतीने कसलेही शब्द असलेली गाणी म्हणत १००-१५० लोक एकासारखे एक उड्या मारत, हात पाय हलवत इकडे तिकडे पळू द्यात. मागे बाग, रस्ता, समुद्र किनारा, काहीही चालेल.
31 Jan 2018 - 1:45 pm | गामा पैलवान
फारएन्ड,
मस्त संकलन आहे. फक्त तो गाजरका हलवा / बैंगनका भरता राहिला. त्यावर अनेकांनी बरंच लिहिलंय, पण तुमच्या लेखणीतनं वाचायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
31 Jan 2018 - 3:35 pm | अमर विश्वास
स्त लेख
१. जा २. जानेजा ३. जानेजाना ... ही चढती भाजणी असलेली मुळ ग़ज़ल
रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामां हो गये
पहले जां, फिर जानेजां, फिर जानेजाना हो गये
दिन-ब-दिन बढती गईं इस हुस्न की रानाइयां
पहले गुल, फिर गुल-बदन, फिर गुल-बदामां हो गए
रफ्ता रफ्ता वो मेरे...
आप तो नज़दीक से नज़दीक-तर आते गए
पहले दिल, फिर दिलरुबा, फिर दिल के मेहमां हो गए
रफ्ता रफ्ता वो मेरे...
प्यार जब हद से बढ़ा सारे तकल्लुफ मिट गए
आप से, फिर तुम हुए, फिर तू का उनवाँ हो गए
रफ्ता रफ्ता वो मेरे...
31 Jan 2018 - 4:09 pm | चिगो
काय तो जबरा अभ्यास आणि व्यासंग..
मजा आली, फारएन्डराव..
31 Jan 2018 - 4:31 pm | सस्नेह
दिलकी गली, जिंदगीका सफर, रास्तेका हमसफर, रातकी तनहाईया, गम-ए-दिल, आवारा दिल ये भी आंदो !
31 Jan 2018 - 5:49 pm | रीडर
31 Jan 2018 - 5:49 pm | रीडर
31 Jan 2018 - 5:50 pm | रीडर
1 Feb 2018 - 8:26 pm | रंगीला रतन
लै भारी...
जरा ते जुस्तजुं, बेवफाई, शिकवां, जमिर, दीवार, इन्तेहान, ईश्क, धडकन वगैरेंवर पण येउद्यात...मज्जा आली वचायला.
20 May 2020 - 12:29 am | Prajakta२१
खूप मस्त लिहिलेय
पु ले शु
अवांतर -
गाण्यातील शब्दांबाबत -
आपकी कसम मधील करवटे बदलते रहें
आणि मेरे मेहबूब मधील याद में सारी रात करवटे -ह्या दोन्ही गाण्यात डोळ्यासमोर नारळाच्या करवंट्या बदलणारी माणसे यायची आणि हिरो हिरोईन हे काय गात आहेत असे वाटायचे कधी कधी हिरो हिरोईन करवंट्या बदलण्याचा खेळ खेळत आहेत असे वाटायचे
तसेच कटी पतंग मधील ये शाम मस्तानी बघताना कोई डोर मुझे खिंचे तेरी ओर लिये जा च्या पुढे बादशाह मसाला$$$$$$$$$ अशीच ओळ आठवते (बादशाह मसाल्याच्या जाहिरातीमुळे)