अनुक्रमणिका | इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब
आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *
पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.
मग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपये किंमतवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.
तिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........
मित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का? अंहं ! हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल.
या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.
MI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.
तर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.
मग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण? नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते?
पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे. या विषयाचे चार भागात विभाजन करतो:
१. ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
२. ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
३. ट्रोपोनिनच्या मर्यादा आणि
४. MI च्या रक्तचाचण्या : आढावा
ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:
• skeletal muscle = हाडस्नायू ( म्हणजे biceps वगैरे)
• cardiac muscle = हृदयस्नायू आणि
• smooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)
यापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.
या ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.
ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
करोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा
वरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.
सध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.
ट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:
१. रुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.
२. थोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.
वरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.
ट्रोपोनिनच्या मर्यादा
एखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते? तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.
तसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.
MI च्या रक्तचाचण्या : आढावा
१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे.
गेली सुमारे २५ वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून नक्की काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.
*****************************************************************************
प्रतिक्रिया
17 Jan 2018 - 12:19 pm | पगला गजोधर
मला (म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला), समजा आजची /वर्तमानाची (धिस पॉईंट इन टाईम),
हार्टची प्रत्यक्ष स्थिती (आरोग्य , ब्लॉकेज , स्थिती/कंडिशन ) रिलायएबली जाणून घेण्यासाठी , कुठल्या टेस्ट असतात/ वेळ / खर्च काय साधारणपणे ?
.
माझ्या एका नातेवाईकाला (वय ३०), दुसऱ्या नातेवाईकांच्या लग्नाच्या कार्यक्रमात पित्ताचा खूप त्रास होतो म्हणून
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तिथल्या डॉ नी इसीजी वै काढून तो चेक करून घरी जायचा क्लिअरन्स दिला ( पित्ताचे औषध देऊन),
घरी आल्यावर साधारणपणे रात्री परत त्रास होऊ लागल्यावर हॉस्पिटल मध्ये ते रिक्षा करून गेले,
रेसिडेंट डॉ च्या बेडवर असतांनाच गेले, शॉक देऊन रीसॅसीटेंट करण्याचा डॉ नि खूप प्रयत्न केला पण उपयोग नाही झाला.
म्हणून माझं मत झालं की फक्त इसीजी रिजल्टवर विसंबून राहता येत नाही.
17 Jan 2018 - 12:44 pm | कुमार१
म्हणून माझं मत झालं की फक्त इसीजी रिजल्टवर विसंबून राहता येत नाही.>>>>> अगदी बरोबर. आता ईसीजी तितकासा संवेदनक्षम समजला जात नाही. अर्थात प्रत्येक चाचणीचे आपापले महत्व आहे.
तुमच्या हृदय-चाचण्यांसंबंधीच्या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर हृदयरोग तज्ञ देऊ शकतील
24 Jan 2018 - 8:09 pm | Dr Ravi Prayag
मला लिखाणआवडलं! लोकशिक्षणाच्या द्वारे
24 Jan 2018 - 10:37 pm | Dr Ravi Prayag
काही वेळेस काही लक्षणे विकारासारखी वाटतात. अशा वेळेस या प्रकारच्या रोगनिदानाचा खूप उपयोग होऊ शकतो.
17 Jan 2018 - 1:04 pm | अनिंद्य
@ कुमार१,
ही मालिका नियमित वाचत आहे, उत्तम माहिती.
ह्यानिमित्ताने एक प्रश्न मनात आला :-
मोठी कॉर्पोरेट रुग्णालये देतात ते डझनावारी चाचण्यांचे एकत्रित पॅकेज रोगनिदानासाठी कामाचे असते का? विशेषतः रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे नसतांना?
17 Jan 2018 - 1:15 pm | कुमार१
17 Jan 2018 - 1:15 pm | कुमार१
17 Jan 2018 - 1:26 pm | कुमार१
मोठी कॉर्पोरेट रुग्णालये देतात ते डझनावारी चाचण्यांचे एकत्रित पॅकेज रोगनिदानासाठी कामाचे असते का? विशेषतः रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे नसतांना? >>>
त्यात व्यापारी भाग जास्त आहे. प्रत्येक रुग्णाचा कौटुंबिक इतिहास, व्यवसायाचे स्वरूप इ. बघून वयाच्या ४५ नंतर कमीतकमी ‘चाळणी चाचण्या’ सुचवल्या जाव्यात असे माझे मत. तेही रुग्णाच्या नेहमीच्या डॉक्टरनेच. सामान्य माणसाने मोठ्या जाहिराती वाचून स्वतः निर्णय घेऊ नये.
रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे नसतांना? >>> हे वाक्य मात्र फसवे असते! बाह्य लक्षणे नाहीत म्हणजे शरीरात सर्वकाही निरोगी आहे असे म्हणता येत नाही.
17 Jan 2018 - 3:35 pm | अमितदादा
माहितीपूर्ण लेख...
17 Jan 2018 - 5:59 pm | मुक्त विहारि
१. ट्रोपोनिन वाढले की हार्ट अॅटॅक येतो का?
२. ट्रोपोनिन योग्य प्रमाणात राहण्यासाठी काय करावे? (औषधे घेण्यापेक्षा, काळजी घेणेच उत्तम.)
17 Jan 2018 - 6:33 pm | सूड
अमुक एक होत असेल तर तर हार्ट अॅटॅक येऊ शकेल अशी काही विशेष लक्षणं आहेत का?
17 Jan 2018 - 7:37 pm | कुमार१
ट्रोपोनिन वाढले की हार्ट अॅटॅक येतो का? >>> अजिबात नाही. जेव्हा MI होते तेव्हाच ट्रोपोनिन वाढते
निरोगी अवस्थेत त्याची रक्तपातळी अत्यल्प असते. तिची काळजी करायचे काहीच कारण नाही
17 Jan 2018 - 7:44 pm | गामा पैलवान
अवांतर :
कुमारेक,
या वाक्याशी प्रचंड सहमत. स्वानुभव आहे. मला जेव्हा पहिली व एकमेव हृत्पाशपीडा झाली ( = हार्ट अॅटॅक) आली होती, तेव्हा त्याअगोदर जाणवणारी लक्षणं जवळजवळ नव्हतीच. ऐन पीडासमयी जीव जायची वेळ आली होती. पण माझा हृदालेख अगदी सर्वसाधारण (= ई.सी.जी. अगदी नॉर्मल) होता. उपचारकास वाटलं की मला भयोन्माद ( = पॅनिक अॅटॅक ) झालाय की काय! पण रुग्णालयातल्या तत्ज्ञांच्या सूचनेनुसार पाठीवर संवेदक चिकटवला. त्यात माझी हृत्पाशपीडा सापडली.
हा सर्व घटनाक्रम माबोवर पूर्वप्रकाशित केला आहे.
आ.न.,
-गा.पै.
18 Jan 2018 - 8:05 am | आनन्दा
कृपया लिंक द्या किंवा इथेच टाका परत..
18 Jan 2018 - 1:16 pm | गामा पैलवान
https://www.maayboli.com/node/44429
भाग २ लिहायच्या आत आमचे सदस्यत्व स्वर्गवासी झाले.
-गा.पै.
25 Jan 2018 - 6:57 am | चामुंडराय
आनगापै सर,
भाग २ इथे मिपा वर लिहा, हि विनंती.
27 May 2023 - 12:29 pm | विवेकपटाईत
मला हृदयाचा झटका आला. रस्त्यावर कोसळून पडलो.हॉस्पिटल मध्ये ecg नॉर्मल. BP नॉर्मल. पण engio ४ जागी ९० टक्क्यांचावर blockages. निदान बायपास. Blockages साठी engo हाच उत्तम पर्याय.
27 May 2023 - 2:00 pm | कुमार१
बरोबर.
फक्त एकच ईसीजी काढणे एक चाळणी चाचणी आहे; तिला तिच्या मर्यादा आहेत.
17 Jan 2018 - 8:05 pm | कुमार१
अमुक एक होत असेल तर तर हार्ट अॅटॅक येऊ शकेल अशी काही विशेष लक्षणं आहेत का? >>>
चांगला प्रश्न.
दोन शक्यता असतात:
१. बिलकूल ध्यानीमनी नसताना अचानक झटका येतो
२. झटक्यापूर्वी काही दिवस थकवा, अस्वस्थता वा ‘छातीत कसेतरी होणे’ ही लक्षणे दिसणे.
19 Jan 2018 - 7:03 pm | सूड
हे कसंतरी होणं बर्याचदा पित्ताशी संबंधित मानून हसं होतं, त्यामुळे होत असलं तरी पित्त, अपचन असेल तर उगाच कशाला असा विचार होतो.
19 Jan 2018 - 7:16 pm | कुमार१
सहमत आहे. आपल्याला काही गंभीर होतंय हे नाकारण्याची मूलभूत प्रवृत्ती असते.
17 Jan 2018 - 8:12 pm | कुमार१
गा पै,
हृत्पाशपीडा = हार्ट अॅटॅक आणि
हृदालेख = ई.सी.जी.
या प्रयत्नपूर्वक केलेल्या मराठी शब्दांबद्दल अभिनंदन ! अर्थात ते खूपच संस्कृतच्या 'मुशीतले' असल्याने वापरात येणे कठीण .
18 Jan 2018 - 12:51 pm | वकील साहेब
नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण लिखाण.
एक नियमित वाचक.
19 Jan 2018 - 10:27 am | कुमार१
सर्व नियमित वाचक व प्रतिसादकांचे आभार.
19 Jan 2018 - 10:33 am | पगला गजोधर
MI मुळे येणारे व ब्लॉकेजमुळे येणारे अटॅक,
यातील फरकाबाबत अजून जास्त काही वाचायला मिळालं तर
जरूर पोस्ट करा सर.
19 Jan 2018 - 11:28 am | कुमार१
MI मुळे येणारे व ब्लॉकेजमुळे येणारे अटॅक,
यातील फरकाबाबत >>>>>
या वाक्यात तुमची गफलत झाली आहे. करोनरी ‘ब्लॉक’ झाल्यामुळेच MI होतो !
ठीक आहे. यानिमित्ताने MI चे २ प्रकार सर्वांसाठी लिहितो:
प्र.१ : करोनरी atherosclerosis >> गुठळी होणे >> रक्तवाहिनीत मोठा ‘ब्लॉक’ >> MI (म्हणजेच झटका/ attack). या गटाला Acute Coronary Syndrome म्हणतात.
प्र.२. हृदयस्नायूला जेवढा रक्तपुरवठा हवा असतो तेवढा न मिळणे (supply / demand mismatch). म्हणजे यात “ब्लॉक” नाही. याची काही करणे:
१. तीव्र रक्तक्षय
२. तीव्र रक्तस्त्राव
३. खूप उच्च-रक्तदाब
19 Jan 2018 - 12:08 pm | पगला गजोधर
धन्यवाद
19 Jan 2018 - 4:57 pm | चौकटराजा
आपल्या दुर्दैवाने सर्वच मृत्युकारी रोगात प्राथमिका अवस्थेत बाह्य लक्षणे वा भावना स्पष्ट होतात असे नाही. सबब मानवी अन्दाजाला मर्यादा आहेत. तुम्हाला चांगले वाटते याचा अर्थ तुम्ही निरोगी आहात असा होता नाही.पण तुम्हाला बरे वाटत नाही याचा अर्थ तुम्ही रोगी आहात हे नक्की . कार्डियो ग्राम नीट आहे याचा अर्थ समस्या नाही असा नाही पण त्यात बदल दिसतात याचा अर्थ अवस्था निरामय नाही हे नक्की.
24 Jan 2018 - 5:36 pm | टर्मीनेटर
चांगली माहिती...
24 Jan 2018 - 7:05 pm | कुमार१
चौकट राजा व टर्मिनेटर, आभारी आहे.
25 Jan 2018 - 9:05 am | सुधीर कांदळकर
कालच या मालिकेतले सर्व लेख वाचले. आवडले.
कोलेस्टेरॉलवरचा सर्वात जास्त आवडला. संयमित, नेमके आणि वस्तुनिष्ठ लेखन. फापटपसारा अजिबात नाही. अभिनिवेश देखील अजिबात नाही. खोटेपणा अजिबात नाही.
डॉ. खरे आणि इतर अनेक प्रतिसादांमुळे मुळातच उत्तम लेखातील लज्जत वाढली.
धन्यवाद.
25 Jan 2018 - 9:30 am | कुमार१
सुधीर, आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे. सामान्यजनांना थोडक्यात पण उपयुक्त लिहावे असा माझा प्रयत्न असतो.
25 Jan 2018 - 11:22 am | सुमीत भातखंडे
उत्तम लेख. संपूर्ण लेखमालाच अत्यंत उपयुक्त आहे.
एक प्रश्नः हृदयरोगाशी संबधीत दोन प्रचलित शस्त्रक्रिया म्हणजे - अँजियो प्लास्टी आणि बायपास. MI च्या बाबतीत ह्यापैकी कुठली शस्त्रक्रिया करतात?
25 Jan 2018 - 11:37 am | Dr Ravi Prayag
करोनरी धमन्यातील अडथळा केवळ रक्त- गुठळीमुळेच असेल असे नव्हे. चरबींच्या थरांमुळेपण असू शकतो.
25 Jan 2018 - 11:54 am | Dr Ravi Prayag
Angioplasty आणि बायपास हे धमन्यांचे किती नुकसान झाले आहे त्यावर. ह्र्दयशल्यतज्ज्ञ ठरवतात.
25 Jan 2018 - 11:57 am | सुमीत भातखंडे
.
25 Jan 2018 - 12:32 pm | कुमार१
सुमीत, आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर डॉ. प्रयाग यांनी दिलेच आहे. किती रक्तवाहिन्यांमध्ये किती प्रमाणात अडथळा झाला आहे यावर ते ठरेल
25 Jan 2018 - 1:53 pm | Dr Ravi Prayag
आपली जीवनशैली या विकारांना आमंत्रण देते, उदा. अयोग्य आहार, बैठं जीवन, व्यायामाचा अभाव इ.
25 Jan 2018 - 1:53 pm | Dr Ravi Prayag
आपली जीवनशैली या विकारांना आमंत्रण देते, उदा. अयोग्य आहार, बैठं जीवन, व्यायामाचा अभाव इ.
26 Jan 2018 - 10:56 pm | Dr Ravi Prayag
माफ करा, दोन वेळेस लिहीलं गेलं!
31 Jan 2018 - 12:49 pm | कुमार१
सर्व वाचकांचे आभार.
या लेखमालेदरम्यान अनेक मिपाकरांनी वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या आजारांची माझ्याशी चर्चा केली याचे खूप समाधान वाटते. त्यामुळे मिपा हे एक कुटुंब झाले आहे हे नक्की.
1 Sep 2020 - 1:54 pm | कुमार१
भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पद्मावती यांचं १०३ व्या वर्षी निधन
(https://www.loksatta.com/desh-videsh-news/dr-padmavati-among-indias-top-...)
आदरांजली !
15 Mar 2022 - 4:45 pm | कुमार१
नामवंत हृदयरोग तज्ञ José Eduardo Sousa यांचे नुकतेच निधन झाले. ब्लॉक झालेल्या करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये औषधयुक्त stent बसवायचे तंत्र त्यांनी जगात सर्वप्रथम यशस्वी केले होते.
आदरांजली !
17 Mar 2022 - 12:17 am | गामा पैलवान
जोझबाबांच्या स्मृतीस वंदन. माझा जीव वाचला तो त्यांच्या तंत्रामुळेच. त्यांना शांती व सद्गती लाभो.
-गा.पै.
1 Jun 2022 - 5:22 pm | कुमार१
संपूर्ण भारतीय बनावटीचे खिशात मावणारे ईसीजी उपकरण नोएडा येथील नेहा व राहुल रस्तोगी यांनी तयार केले आहे.
अभिनंदन !
1 Jun 2022 - 7:26 pm | Nitin Palkar
नेहा व राहुल रस्तोगी यांचे अभिनंदन.
16 Sep 2022 - 10:24 am | कुमार१
मैदानी खेळाडूंमध्ये (आणि अन्य काही तरुणांत) वयाच्या तिशीच्या आत अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला तर काहीजण उपचारांनी बचावले. २०२१मध्ये डेन्मार्कचा फुटबॉलपटू Christian Eriksenला या प्रकारचा त्रास मैदानावर झाला होता. त्याला वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला.
या अनुषंगाने या प्रकारच्या आजारांचा सखोल अभ्यास झालेला आहे. हा आजार हृदयस्नायुंच्या आनुवंशिक विकारामुळे होतो (Hypertrophic Cardiomyopathy).
यामध्ये हृदयस्नायू प्रमाणाबाहेर वेड्यावाकड्या पद्धतीने thick झालेले असतात. त्यामुळे हृदयाच्या कप्प्यातून महारोहिणीमध्ये रक्त पंप करताना मोठा अडथळा येतो.
खेळाडूंमध्ये या प्रकारचा त्रास लवकर लक्षात येतो. अचानक चक्कर येणे किंवा खेळताना ताकद कमी पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. या आजारासाठी विविध प्रकारच्या हृदयाच्या चाळणी चाचण्या आणि उपचार उपलब्ध आहेत.
29 Sep 2022 - 8:28 pm | कुमार१
आज जागतिक हृदय दिन .
हृदयविकार असलेल्या सर्वांना आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा !
3 Oct 2022 - 8:15 pm | सिरुसेरि
माहितीपुर्ण लेख . अशाच प्रकारचे एक निरिक्षण असे की , जर शरीरातील रक्तामधील ACE Level ( Angiotensin Converting Enzyme ) या घटकाचे प्रमाण जास्त झाले ( ७० च्या वर ) तर ते Sarcoidosis सारकॉयडिसिस या दोषाचे लक्षण असते . यामधे दम लागणे , लगेच धाप लागणे अशी लक्षणे दिसु लागतात . स्टेरॉईड घटक असलेल्या औषधाने यावर काही अंशी नियंत्रण ठेवता येते .
14 Oct 2022 - 6:51 am | कुमार१
CPR समाज प्रशिक्षण
काही जागतिक हृदयरोग संघटना आणि भारतीय एम्स यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सुमारे दीड लाख लोकांना फक्त हाताने करायच्या
शास्त्रशुद्ध सीपीआर कृतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
चांगला उपक्रम !
18 Oct 2022 - 5:42 am | कुमार१
स्त्री आणि हृदयविकाराचा झटका : काही निरीक्षणे
पुरुषांशी तुलना करता स्त्रियांच्या झटक्यामध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतात:
1. वयाच्या 40 च्या आत स्त्री : पुरुष हे प्रमाण १ : १० असे आहे. वय 45 नंतर स्त्रियांचा धोका वाढू लागतो. वयाच्या साठीत तुलना केली तर स्त्री-पुरुष हे गुणोत्तर समान होते. त्या पुढच्या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण काकणभर अधिकच आहे.
2. लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.
3. बऱ्याच रुग्णांना झटक्या दरम्यान छातीवर मोठा धोंडा ठेवल्या इतका दाब जाणवतो. परंतु स्त्रियांच्या बाबतीत या दाबाची तीव्रता खूप कमी असते.
4. प्रत्यक्ष झटका येण्याच्या एक-दोन महिने आधी शरीरात ‘काहीतरी बिघडले किंवा बिनसलेय’ अशी एक भावना बऱ्यापैकी येऊन जाते.
5. पहिल्या झटक्यात मृत्यूचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे.
1 Dec 2022 - 11:03 am | कुमार१
भारतात थंडी पडू लागलेली आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. जेव्हा चोवीस तासातील तापमान एकदम तीन अंश सेल्सिअसने खाली जाते तेव्हा ही शक्यता अधिक वाढते. तसेच पूर्वी झटका येऊन गेलेला असल्यास पुढचा झटका येण्याची शक्यताही बळावते.
स्पष्टीकरण :
1. हिवाळ्यात Sympathetic चेतासंस्था अधिक कार्यरत होते >> रक्तवाहिन्या आकुंचन पावतात>> रक्तदाब वाढतो. वृद्धांमध्ये या गोष्टी अधिक प्रमाणात होतात.
2. रक्तातील प्लेटलेट्स अधिक सक्रिय होतात तसेच रक्ताचा घट्टपणा वाढतो.
1 Dec 2022 - 12:56 pm | Bhakti
+१
माहिती आणि स्पष्टीकरण!
प्लेटलेट्सचा पण रक्तदाबावर परिणाम होतो का?
1 Dec 2022 - 1:41 pm | कुमार१
प्लेटलेटचा रक्तदाबावर नाही परिणाम होत.
त्यांच्या एकत्र येण्याच्या प्रवृत्तीमुळेमुळे रक्ताचा घट्टपणा
( viscosity ) वाढतो.
24 May 2023 - 8:13 am | कुमार१
करोनरी हृदयविकाराच्या झटक्याचे अचूक निदान केवळ एका ट्रोपोनिन तपासणीवरून करता येईल काय?
या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. संभाव्य लक्षणे असलेला रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल.
त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
27 May 2023 - 4:02 pm | गवि
यात एक तार्किक अडथळा जाणवतो. विशेषत: ट्रोपोनिन हाय असेल तर लक्षणे कितीही सौम्य असोत, तीव्र असोत अथवा वेगळी असोत.. इसीजी काही म्हणत असो का नसो.. troponin high = हृ वि झ हीच शक्यता गृहीत धरून "unless proven otherwise" angioplasty सुरू केली जाते. कारण इतर काही कारण असले तरी ते थोडे नंतर बघितले तरी चालणार असते.
याउलट troponin सामान्य आहे किंवा किंचित बॉर्डर लाईन आहे.. पण एक तरी लक्षण आहे (छातीत दुखणे) .. तरी त्या टेस्टवर न विसंबता हृ वि झ गृहीत धरून उपचार सुरू होतात.
म्हणजे इथे एक जरी निरीक्षण positive असेल तरी कोणीही जराही रिस्क, चान्स घेऊ इच्छित नाहीत. अशा वेळी AI वर कोणी अवलंबून राहू शकेल असे वाटत नाही.
27 May 2023 - 4:12 pm | कुमार१
सध्या तो प्रकार संशोधन अवस्थेत आहे.
जिथे हृ वि झची शक्यता कमीतकमी वाटते आहे अशाच रुग्णांचे बाबतीत त्याचा उपयोग होईल असे वाटते
सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे स्वतःचे अनुभवावर आधारित मानवी मत हे कधीही अधिक महत्त्वाचे राहील.
मागे मी अन्यत्र म्हटले तसे, कृत्रिम बुद्धिमत्ता हे ज्यूरीसमान आहे. अंतिम न्यायाधीश हा मानवी डॉक्टरच असेल.
बाकी, हृ वि झ
हे लघुरुप अत्यंत आवडले आहे. इथून पुढे नियमित करण्यात येईल ..
27 May 2023 - 4:23 pm | कुमार१
इथे आहे.
पूरक मदत. अंतिम निर्णय नाही.