भारतातल्या प्रत्येकासाठी अभिमानास्पद अशी युद्धभूमी, कारगिल. याच्या दक्षिणेला आणखी एक युद्धभूमी आहे. .... बायकर्स साठी. या युद्धभूमीवर शत्रू म्हणावे असे दोनच. एकतर आत्मविश्वासाचा अभाव किंवा अति-आत्मविश्वासाचा प्रभाव. याशिवाय धोकादायक खिंडी, हिमनद्या, उत्तुंग हिमाच्छादित पर्वत आणि या सगळ्यातून जाणारा खडकाळ, लांबच लांब आणि कधीच संपणार नाही असा वाटणारा रस्ता. ठिकठिकाणी बर्फ वितळून वाहणारे आणि आधीच न दिसणाऱ्या रस्त्याला पूर्णपणे झाकून टाकणारे दगाबाज ओढे. नुन - कुन या दोन धिप्पाड पर्वतांचे हे साम्राज्य.
कारगिलमधली आजची सकाळ प्रसन्न आहे. आदल्या दिवशी श्रीनगरहून जोझि-ला पार करताना आभाळात आणि त्यामुळे मनावर आलेले मळभ पूर्णपणे दूर झालेले आहे. पहिल्याच किक मध्ये जागी झालेली रॉली, तिच्या “धड-धड”-धाकट आवाजात अजूनच आश्वस्त करते. "सुरु"-व्हॅली पासून नुन - कुन च्या साम्राज्याला सुरुवात होते. नागमोडी सुरु नदी, तिच्या बाजूने वसलेली लहान लहान गावं,(संकू त्यातल्या त्यात मोठं गावं. संकूमधल्या लोकांचा चेहरामोहराही जरा वेगळाच, तुर्तुक मधल्या बाल्टी लोकांसारखा), हिरवीगार शेतं ,सर्वत्र फुललेले गुलाबी/पिवळे जंगली गुलाब आणि त्यामधून गेलेला काळा गुळगुळीत रस्ता. पहाटेची एखादी प्रसन्न झुळूक जशी जावी तितक्याच अलगद हा पहिला टप्पा पार होतो.
क्षितिजावर आता दोन धिप्पाड पर्वत दिसू लागतात. एखाद्या पिरॅमिड सारख्या आकाराचा आणि पूर्णपणे हिमाच्छादित, शुभ्र असा नुन आणि निमुळता काळसर असा कुन.
पाणिखर येईस्तोवर यथावकाश चांगला रस्ता संपतो. एव्हाना दुपार झालेली असते. पर्काचिक हिमनदी आता थेट रस्त्याला येऊन भिडते, सुरु नदीचा खळखळाट वाढलेला असतो. थंडीमुळे आळसावलेले लहान लहान ओढे उन्हं डोक्यावर आली की जागे होतात आणि आपापल्या कामाला लागतात. अतिशय खडकाळ असलेला रस्ता मधूनच गायब करून अगदी साळसूदपणे पलीकडल्या, सुरु नदीने खोदलेल्या दरीत उतरतात. एखाद्या वळणावर तोल जाऊन आपण लोटांगण घातलेच तर फजिती बघायला (खळखळून हसणारे) हेच ओढे, चार-दोन मर्मोट्स (मांजरीच्या आकाराचा खारी-सदृश प्राणी ) आणि या अवघड वाटांचा यत्किंचितही फरक न पडणारे पक्षी. वर्गात गुर्जींनी घातलेले एखादे अवघड गणित पटकन सोडवून हुशार मुलं ज्या अविर्भावात ढ मुलांना सुटलेला घाम बघत बसतात तसाच काहीसा भाव यांच्याही चेहऱ्यावर दिसतो.
घाटरस्ता संपून थोडी पाणथळीची जागा लागली की रस्त्याच्या बाजूची रंगसंगती जराशी बदलते. वर्षभरात जवळपास सहा महीने पूर्णपणे बर्फाने झाकलेल्या, नदीकाठच्या जराश्या सपाट जागांची एव्हाना छोटी कुरणे झालेली असतात. जंगली घोडे त्यावर यथेच्छ ताव मारत बसलेले दिसतात.
दिवस आता कलायला लागतो, रंगदुम जवळ आलेले असते. बऱ्याच वेळापासून मागावर असलेला एक भला थोरला काळा ढग खिंडीत गाठून घात करेल का काय ही भीती मनात असतानाच अचानक रंगदुमचा डाक-बंगला आणि त्याच्या आजूबाजूची तुरळक छपरं दिसायला लागतात.
लहानपणापासून मनात भीतीचे वलय घेऊन बसलेल्या "डाक-बंगला" नामक वास्तूचा या क्षणी मात्र चारही बाजूंनी अजस्त्र पर्वतांनी वेढलेल्या रंगदुममध्ये मोठाच आधार वाटतो.अतिशय जुजबी व्यवस्था असलेल्या या डाक-बंगल्यामध्ये पोटात गेलेले दोन घास आणि रमचा एक कडक पेग थकलेल्या आणि खिळखिळ्या झालेल्या गात्रांवर फुंकर घालतात आणि शांत झोप लागते.
प्रतिक्रिया
10 Dec 2017 - 12:21 am | एस
रमणीय आणि तितकेच भेदक.
10 Dec 2017 - 12:27 am | किल्लेदार
पूर्णपणे सहमत.... दैवावर हवाला ठेऊनच गेलो होतो.
10 Dec 2017 - 12:48 am | मोदक
दंडवत घ्या राजे..!!!
10 Dec 2017 - 12:53 am | किल्लेदार
हाहाहा !!!
10 Dec 2017 - 8:27 am | अभिजीत अवलिया
वा!
11 Dec 2017 - 11:42 am | दिपस्वराज
युद्धभूमीवर शत्रू म्हणावे असे दोनच. एकतर आत्मविश्वासाचा अभाव किंवा अति-आत्मविश्वासाचा प्रभाव
........क्या बात ! शंभर टक्के खरं आहे. फक्त लेह ते लामायुरू पर्यंत जाताना सुद्धा याचा प्रत्यय आला.बाकी अप्रतिम फोटो , अवर्णनीय प्रवासवर्णन ..... या गोष्टी आता नेहमीच्याच. किल्लेदारांच्या लेखात त्या नसतील तर फाऊल धरावा.
12 Dec 2017 - 8:07 am | किल्लेदार
यापुढचं प्रवासवर्णन आता फक्त चित्ररूपात लिहावं म्हणतो....
12 Dec 2017 - 9:04 am | मार्गी
अ फा ट !!!!!!!!!!! अत्युत्तम फोटोजसुद्धा!!!!
12 Dec 2017 - 10:24 pm | राघव
अ प्र ती म!! अतिशय सुंदर फोटोज...!!
लेखनही तितकंच छान!
पुढचा भाग का म्हणून फक्त चित्ररूपात? कमी असेल तरी चालेल एकवेळ.. पण लेखनासोबत चित्र बघायची मजाच निराळी! :-) लिहीच.
12 Dec 2017 - 11:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो एकदम फक्कड !!!
13 Dec 2017 - 8:39 pm | किल्लेदार
चित्ररूपात लिहितो यासाठी म्हणालो कारण वर्णनासाठी शब्दसंग्रह अपुरा पडतो.