गेल्या अर्धशतकात आपण वाढत्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला आणि त्याबरोबर आपल्या आयुष्यातील ताणतणाव देखील वाढत गेले. एकीकडे आपला भौतिक विकास होत असतानाच आपले शरीर मात्र निरनिराळ्या आजारांची शिकार होत गेले. हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अॅटॅक ” हा होय. या विकाराचा आपल्या रक्तातील ‘कोलेस्टेरॉल’च्या वाढलेल्या प्रमाणाशी घनिष्ठ संबंध असतो हे आपण सगळे जाणतोच.
सध्या सुशिक्षित समाजात या ‘कोलेस्टेरॉल’ बद्दलचे सामान्यज्ञान खूप वाढलेले जाणवते. ‘तूप जास्ती खाउ नका’, ‘मांसाहार टाळलेला बरा’, ‘शून्य कोलेस्टेरॉल’वाले तेल कोणते’, ‘ट्रान्स फॅट म्हणजे काय’ अशा एक ना अनेक चर्चा वारंवार होत असतात आणि आपण एकमेकाला यासंबंधीचे भरपूर अनाहूत सल्ले देत असतो. त्यामुळे ‘कोलेस्टेरॉल’ हा एक लाडावलेला वलयांकित पदार्थ होऊन बसलाय! तर अशा या कोलेस्टेरॉलचा इतिहास, त्याच्या संशोधनातील प्रगती आणि हृदयविकाराशी असलेले त्याचे नाते या सगळ्याचा लेखाजोखा आपल्यासमोर सादर करीत आहे.
आपल्यातील बऱ्याच जणांना असे वाटते की कोलेस्टेरॉल हे गेल्या साठेक वर्षांत उपटलेले एक खूळ आहे. “आमच्या आजोबांच्या पिढीने हे असले काही ऐकले नव्हते बुवा. तेव्हा लोक कसे दणकून खात पीत होते आणि पैजा लावून पंगतीस बसत होते”, अशी विधानेही आपल्या कानावरून वरचेवर जात असतात. परंतु कोलेस्टेरॉलचा शोध तसा फार जुना आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
इ.स. १७५८ मध्ये Francois P. de La Salle या फ्रेंच डॉक्टरने कोलेस्टेरॉलचा शोध लावला. तेव्हा ते पित्ताशयातून बाहेर काढलेल्या खड्यांचा (gallstones) अभ्यास करीत होते. त्यातून त्यांनी एक घट्ट मेद पदार्थ शोधून काढला. पुढे १८१५ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ Michel E. Chevreul यांनी तो घट्ट पदार्थ शुद्ध स्वरूपात प्राप्त केला आणि त्याला ‘कोलेस्टेरॉल’ हे नाव दिले.
‘कोलेस्टेरॉल’ हा ग्रीक शब्द असून chole = bile =पित्त आणि stereos = solid अशी त्याची व्युत्पत्ती आहे. मग या नव्या पदार्थावरील संशोधनाने वेग घेतला.
सर्व प्राण्यांच्या पेशींमध्ये तो असतो हे लक्षात आले. पुढे १८३८ मध्ये Louis Rene Lecanu यांनी संशोधनातील एक महत्वाचा टप्पा गाठला आणि असे दाखवून दिले की कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तातही आढळतो. तरीही कोलेस्टेरॉलची ओळख अजून ‘पित्तात आणि रक्तात आढळणारा एक घट्ट मेद’ एवढीच होती. त्याचे रासायनिक सूत्र वगैरे अद्याप माहित नव्हते.
१९०३ मध्ये Adolf Windaus या जर्मन शास्त्रज्ञाने खूप प्रयत्नांती कोलेस्टेरॉलचे रासायनिक सूत्र शोधून काढले. त्याबद्दल ते १९२८ च्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले. पुढे १९३० मध्ये Heinrich Wieland यांनी Windaus च्या संशोधनातील काही त्रुटी दुरुस्त करून कोलेस्टेरॉलचे पक्के सूत्र जाहीर केले. कोलेस्टेरॉल हा ‘स्टीरॉइड’ गटातील एक मेद असल्याची नोंद झाली.
त्यानंतर आजपावेतो कोलेस्टेरॉल संबंधीचे संशोधन सतत चालू आहे. त्यातून त्याचे नवनवे पैलू समजून येत आहेत. आतापर्यंत १३ वैज्ञानिकांनी या पदार्थावरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिके प्राप्त केली आहेत. असे भाग्य शरीरातील एखाद्या घटकाच्या वाट्याला क्वचितच आले आहे.
आता आपल्या शरीराच्या दृष्टीतून कोलेस्टेरॉलकडे बघूयात. हा पदार्थ आपल्याला फक्त प्राणिज पदार्थांच्या सेवनातून मिळतो तसेच आपल्या शरीरातही तो तयार होतो. या दोन्ही स्त्रोतांचा शरीरात प्रतिदिन समतोल साधला जातो. म्हणजे, जर आपल्या आहारात त्याचे प्रमाण कमी असेल तर शरीरात तो अधिक तयार केला जाईल आणि आहारात जास्त असेल तर शरीरात कमी प्रमाणात तयार होईल. कुठल्याही वनस्पतीमध्ये कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे ‘व्हेगन’ आहारशैलीत अन्नातून ते शरीराला मिळणार नाही.
भारतात आपण जी तेले स्वयंपाकासाठी वापरतो ती बहुतांश वनस्पतीपासून केलेली असतात जसे की, शेंगदाणे, करडी, सूर्यफूल, जवस, ओलिव्ह इ. त्यामुळे या सर्व तेलांच्या जाहिरातीत “ शून्य कोलेस्टेरॉल तेल” असे जे ठळकपणे दाखविलेले असते, ती खरे तर ग्राहकांची दिशाभूल आहे (म्हणजे ‘पिवळा पितांबर’ म्हटल्यासारखा तो प्रकार आहे). कारण कुठलाही वनस्पतीजन्य पदार्थ हा “शून्य कोलेस्टेरॉलयुक्तच” असतो. त्या तेलांची एकमेकाशी तुलनाच करायची झाली, तर त्यांमध्ये कशात एकूण उष्मांक आणि संपृक्त मेदाम्ले (saturated fatty acids) कमी/जास्त आहेत, यावरून केली पाहिजे.
सध्या विविध माध्यमांतून ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या विषयावरील माहितीचा सतत भडीमार आणि काथ्याकूट चालू असतो. त्यामुळे सामान्य माणसाचा कोलेस्टेरॉलकडे पाहण्याचा एक पूर्वग्रह झालेला आहे. जसे काही कोलेस्टेरॉलला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो आणि मग पूर्वग्रहदूषित नजरेने त्याच्याकडे पाहतो. त्यामुळे सामान्य माणसाला या कोलेस्टेरॉलच्या शरीरातील उपयुक्ततेची काही जाणीवच नसते. क्षणभर आपण ‘रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे परिणाम’ हा विषय बाजूला ठेवू आणि आपल्या पेशींमध्ये जे कोलेस्टेरॉल आहे ते किती उपयुक्त आहे ते पाहूयात.
आपल्या शरीरातील पेशींमध्ये कोलेस्टेरॉलपासून कितीतरी महत्वाची संयुगे तयार होतात. त्यापैकी तीन महत्वाची अशी:
१. त्वचेतील कोलेस्टेरॉलवर सूर्यकिरण पडले की त्यापासून ‘ड’ जीवनसत्व तयार होते.
२. कोलेस्टेरॉलपासून सगळी ‘स्टीरॉइड हॉर्मोन्स’ तयार होतात. या हॉर्मोन्सचे एक मोठे कुटुंबच आहे. त्यापैकी पुरुषातील testosterone आणि स्त्रीतील estrogen ही आपल्या अगदी परिचयाची. किंबहुना या दोघांमुळेच आपले पुरुषत्व वा स्त्रीत्व सिद्ध होते आणि आपण ते मिरवत असतो!
३. यकृतात त्याच्यापासून होणारी जी आम्ले (bile acids) आहेत ती अन्न्पचनात मोलाची मदत करतात.
आपल्या रक्तातही कोलेस्टेरॉल संचार करीत असते. त्यातील काही भाग हा रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर हळूहळू साठत असतो. त्या साठ्यांमध्ये कोलेस्टेरॉलबरोबरच इतरही काही मेद असतात. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित असते तेव्हा हे साठे अतिशय मंदगतीने वाढतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह हा विनाअडथळा व्यवस्थित चालू राहतो. पण जर का रक्तातील मेदपदार्थ हे प्रमाणाबाहेर वाढले तर मात्र ही साठण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात होते. यालाच atherosclerosis असे म्हणतात. या आजाराचा सर्वप्रथम शोध Rudolf Virchow यांनी १८५४मध्ये लावला. हा आजार जेव्हा करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये होतो तेव्हा त्या आकुंचित पावल्याने किंवा ‘ब्लॉक’ झाल्याने त्या रुग्णास ‘हृदयविकाराचा झटका’ येतो. अशा प्रकारच्या ‘झटक्यांची’ वैद्यकशास्त्रात प्रथम नोंद १९१०च्या सुमारास झालेली दिसते.
आपल्या रक्तात संचार करणारे कोलेस्टेरॉल हे काही मोठ्या रेणूंच्या माध्यमातून फिरत असते. त्यातील दोन मुख्य रेणू म्हणजे LDL & HDL. LDLमध्ये जे कोलेस्टेरॉल असते त्याला “वाईट” कोलेस्टेरॉल, तर HDLमधल्याला “चांगले” कोलेस्टेरॉल असे सामान्य भाषेत म्हणतात. आता हे ‘चांगले आणि वाईट’ हे शब्द शास्त्रीयदृष्ट्या तितकेसे योग्य नाहीत. LDL मधले कोलेस्टेरॉल जर नेहमी योग्य प्रमाणात राहिले तर तसे ते आपल्याला ‘वाईट’ ठरत नाही. केवळ ‘चांगले’ चा विरुद्ध शब्द म्हणून तो प्रचलित आहे. त्याचे प्रमाण वाढते राहिल्यासाच atherosclerosis चा धोका संभवतो. तेव्हा त्या दोन्ही शब्दांचा अर्थ ढोबळमानाने घ्यायचा आहे.
आता वळूयात “कोलेस्टेरॉल आणि करोनरी हृदयविकार” या बहुचर्चित आणि वादग्रस्त विषयाकडे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून हा विषय वैद्यकविश्वात सतत प्रकाशझोतात राहिला आहे. १९५३मध्ये Ancel Keys यांनी अनेक प्रयोगांती असे मत मांडले की आहारातील मेदाचे जास्त प्रमाण आणि करोनरी हृदयविकार यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यावर वैज्ञानिकांत बऱ्याच चर्चा झडल्या आणि त्यांचे मतभेदही चव्हाट्यावर आले. त्यांमध्ये John Yudkin या मधुमेहतज्ञांचे ठाम मत होते की आहारातील मेदापेक्षाही साखर हा अधिक घातक पदार्थ आहे. मग Keys आणि Yudkin यांच्यात बऱ्याचदा वैचारिक खडाजंगी झाली. त्यात अखेर Yudkin ना नमते घ्यावे लागले आणि Keys यांचे मत वैद्यकविश्वाने उचलून धरले.
१९५६मध्ये अमेरिकी हृदयविकार संघटनेने अधिकृतरीत्या जाहीर केले की आहारात बटर, अंडे आणि बीफ यांच्या अतिसेवनाने करोनरी हृदयविकाराचा धोका वाढतो. इथपासून ‘आहार आणि हृदयविकार’ या चर्चेला एक निर्णायक वळण लागले. किंबहुना, एक प्रकारे कोलेस्टेरॉलचे 'भूत' समाजाच्या मानगुटीवर बसले! त्यानंतर रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलला जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ करून ते कमी करण्यासाठी अनेक उपचारपद्धती विकसित झाल्या. स्वयंपाकात कोणते तेल वापरायचे याच्या जोरदार प्रचारमोहीमा चालू झाल्या. एक दोन दशके तर सूर्यफुलाचेच तेल कसे सर्वोत्तम आहे हे ठसवणाऱ्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला होता.
दुसऱ्या बाजूस वैज्ञानिकांचा एक गट हा सातत्याने फक्त कोलेस्टेरॉलला ‘लक्ष्य’ करण्याच्या विरोधात होता. त्यांच्या मते आहारातील साखर, रक्तातील अन्य एका मेदाचे (triglycerides) प्रमाण, जीवनशैली यासारखे इतर अनेक घटकही atherosclerosis होण्यास कारणीभूत होते. त्यामुळे निव्वळ कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय राबवणे ही त्या रुग्णांची दिशाभूल करणारे आहे, असे त्यांचे मत होते. १९७७मध्ये George Mann यांनी तर ‘आहार आणि करोनरी हृदयविकार’ हे गृहीतक म्हणजे वैद्यकाच्या इतिहासातील सर्वात मोठी बनवाबनवी (scam) असल्याचे मत नोंदवले होते.
अशा तऱ्हेने ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या वादग्रस्त विषयावरील काथ्याकूट आजही चालूच आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधात विविध वैद्यकीय संघटना आग्रही मते मांडीत आहेत. १९८७पासून रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी ‘Statins’ नावाची औषधे बाजारात उपलब्ध असून त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कोलेस्टेरॉलप्रमाणेच तीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांचे समर्थक आणि विरोधक आपापली मते सतत हिरीरीने मांडत असतात (अगदी नोटबंदी या विषयासारखी!). किंबहुना चर्चेसाठी हा विषय माध्यमांत वारंवार उकरून काढला जातो.
करोनरी हृदयविकाराच्या कारणांच्या बाबतीत अशा प्रकारचे वाद होणे अगदी स्वाभाविक आहे. मुळात हा आजार कोणत्या एका कारणामुळे होत नसतो. अनुवंशिकता, वांशिकता, जीवनशैली, व्यसने, मधुमेह आणि रक्तातील विविध मेदांचे प्रमाण असे अनेकविध घटक तो होण्यास कारणीभूत ठरतात( multifactorial disease). त्यामुळे त्यापैकी एका घटकाचा नक्की ‘वाटा’ किती हे ठरवणे खरेच अवघड असते. जेव्हा आपण आहारातील मेदांचे विश्लेषण करतो, तेव्हा फक्त कोलेस्टेरॉलकडे न बघता एकूण संपृक्त मेदांच्या (saturated fats) प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि धूम्रपानापासून अलिप्तता हेही घटक आजार प्रतिबंधाच्या दृष्टीने तेवढेच महत्वाचे आहेत.
आता एवढे सगळे पुराण सांगितल्यावर वाचक मला एक प्रश्न नक्की विचारतील. तो असा, “मग काय, रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल हा काळजी करण्याचा विषय आहे की नाही?” मी याचे उत्तर एका सोप्या उदाहरणाने देतो. समजा, तुम्ही खूप लांब पल्य्याच्या आणि बऱ्याच दिवसांच्या प्रवासास निघाला आहात. या काळात तुम्ही अंगावरती अगदी नजरेत भरतील असे काही लाख रुपयांचे दागिने घातले आहेत. आता प्रवासादरम्यान हे दागिने हमखास चोरले जातील का? इथे हो किंवा नाही अशा दोन्ही शक्यता आहेत. पण, ते दागिने तुम्ही चोरांच्या नजरेत ठेऊन एक मोठी जोखीम नक्कीच पत्करली आहेत. त्याचप्रमाणे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही एक जोखीम नक्की आहे. पण, त्यामुळे ‘करोनरी हृदयविकार होईलच’ असे विधान मात्र करता येत नाही.
....तर असा हा भरपूर संशोधन झालेला, बहुचर्चित, बहुगुणी आणि वादग्रस्त कोलेस्टेरॉल! आरोग्यविज्ञान क्षेत्राशी संबंध नसलेल्या कोणाही सामान्य माणसाला त्याची मूलभूत माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. त्यावरील प्रतिसाद आणि शंकांचे स्वागत आहे.
******************************************************
प्रतिक्रिया
8 Nov 2017 - 10:58 am | आनन्दा
मस्त लिहिले आहे
8 Nov 2017 - 11:17 am | कुमार१
तुमच्या प्रतिसादाने आनन्द झाला आहे ! आभार.
8 Nov 2017 - 11:17 am | कुमार१
तुमच्या प्रतिसादाने आनन्द झाला आहे ! आभार.
8 Nov 2017 - 11:18 am | झेन
कधीतरी या विषयी संबंध येतोच. लेख प्रामाणिक आहे पण याचं पण थोडंफार श्रद्धा अंधश्रद्धा टाईपच दिसतंय. बाजार करणा-यांचे अच्छे दीन आहेत.
8 Nov 2017 - 11:18 am | पुंबा
उत्तम लेख. खुप माहिती मिळाली.
8 Nov 2017 - 11:48 am | कुमार१
झेन व पुम्बा, आभार आणि सहमती.
8 Nov 2017 - 11:57 am | अनिंद्य
स्वतः डॉक्टरांच्या लेखातून मिळालेली उत्तम माहिती. प्रवासात घातलेले दागिने आणि कोलोस्ट्रॉलचा मॅटेफोर विशेष आवडला.
- अनिंद्य
8 Nov 2017 - 11:59 am | दीपक११७७
फारच छान माहीती
धन्यवाद!
8 Nov 2017 - 12:23 pm | अनिंद्य
पण शीर्षक असे का ते समजले नाही.
8 Nov 2017 - 12:35 pm | कुमार१
ठीक आहे. त्याचे स्पष्टीकरण देतो :
१. कुठल्याही गोष्टीचा सतत उदो उदो होत असला की ती 'वलयांकित' (सेलेब्रिटी) होते. तसेच कोलेस्टे. चे झाले आहे.
२. खुद्द वैज्ञानिकांनी त्याला "most decorated molecule in biology" असे प्रमाणपत्र दिलेले आहे. म्हणून 'लाडावलेला' ! त्यावरील चर्चा जरा जास्तच होतात.
३. इ-माध्यमात लिहीताना शीर्षक हे आकर्षक हवेच. "कथा कोलेस्टेरॉलची" असे मिळमिळीत असून चालणार नाही !
8 Nov 2017 - 12:38 pm | कुमार१
ठीक आहे. त्याचे स्पष्टीकरण देतो :
१. कुठल्याही गोष्टीचा सतत उदो उदो होत असला की ती 'वलयांकित' (सेलेब्रिटी) होते. तसेच कोलेस्टे. चे झाले आहे.
२. खुद्द वैज्ञानिकांनी त्याला "most decorated molecule in biology" असे प्रमाणपत्र दिलेले आहे. म्हणून 'लाडावलेला' ! त्यावरील चर्चा जरा जास्तच होतात.
३. इ-माध्यमात लिहीताना शीर्षक हे आकर्षक हवेच. "कथा कोलेस्टेरॉलची" असे मिळमिळीत असून चालणार नाही !
9 Nov 2017 - 12:57 pm | अनिंद्य
इ-माध्यमात लिहीताना शीर्षक हे आकर्षक हवेच. "कथा कोलेस्टेरॉलची" असे मिळमिळीत असून चालणार नाही !
- बरोबर ! :-)
8 Nov 2017 - 12:24 pm | कुमार१
अनिंद्य व दीपक, तुमच्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार!
8 Nov 2017 - 12:27 pm | पद्मावति
माहीतीपुर्ण लेख.
8 Nov 2017 - 1:10 pm | कुमार१
@संपादक, आज जालवेग पुरेसा नसल्याने माझे २ प्रतिसाद चुकून दोनदा पडले आहेत. क्षमस्व.
पद्मावति, आभार !
8 Nov 2017 - 2:04 pm | एस
उत्तम लेख. एक शंका : सॅच्युरेटेड फॅट्स जास्त धोकादायक आहेत की पॉलि-अनसॅच्युरेटेड फॅट्स?
8 Nov 2017 - 2:24 pm | कुमार१
एस, चांगला प्रश्न. उत्तर :
१. सॅच्युरेटेड फॅट्स चा अतिरेक झाल्यास करोनरी हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
२. पॉलि-अनसॅच्युरेटेड फॅट्स प्रमाणात घेतल्यास कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. पण, त्यांचा अतिरेकी मारा केल्यास पेशींमध्ये कर्करोग पूरक परिस्थिती निर्माण होते.
8 Nov 2017 - 4:12 pm | दीपक११७७
सॅच्युरेटेड फॅट्स व पॉलि-अनसॅच्युरेटेड फॅट्स कोण-कोणत्या पदार्थात जास्त प्रमाणात असतात.
8 Nov 2017 - 6:01 pm | कुमार१
सॅच्युरेटेड फॅट्स : तूप व इतर प्राणिजन्य पदार्थ
पॉलि-अनसॅच्युरेटेड फॅट्स : सूर्यफूल, जवस व करडई यांची तेले.
8 Nov 2017 - 3:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोप्या शब्दांत एका बहुचर्चित शारिरिक घटकाबद्दल उत्तम माहिती देणारा लेख ! वैद्यकीय विषयांवर असे अजून लिहा. मिपाकरांच्या माहितीत भर पडेल आणि गैरसमजूती दूर व्हायला मदत होईल.
8 Nov 2017 - 6:04 pm | कुमार१
डॉ. सुहास, आभारी आहे.
'इन्सुलिन' वर यापूर्वीच इथे लिहीले आहे :
http://www.misalpav.com/node/41287
अजून जरूर लिहीन.
9 Nov 2017 - 10:05 am | कुमार१
चर्चेत सहभागी सर्वांचे आभार.
आपणा सर्वांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कायम नियंत्रणात राहो, अशी सदिछा व्यक्त करतो !
9 Nov 2017 - 10:40 am | शब्दबम्बाळ
चांगले लिहीत आहात... पुलेशु!
9 Nov 2017 - 11:23 am | कुमार१
शब्द बंबाळ, तुमच्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार !
9 Nov 2017 - 2:45 pm | मीचतो
घरी केलेले साजुक तूप चालते का
9 Nov 2017 - 4:51 pm | कुमार१
प्रमाणात नक्कीच चालते. तुपात प्रामुख्याने दोन घ ट क आहेत :
१. सम्पृक्त मेदाम्ले जी काही प्रमाणात हवीच असतात.
२. कोलेसटे.
तेव्हा दिवसाकाठी दोन चमचे बिंधास खा !
9 Nov 2017 - 3:45 pm | पगला गजोधर
चाळीशी नंतर मसल ट्रेनिंग/ वेट ट्रेनिंग व कोलेस्टेरॉल नियंत्रण..
काय मत आहे ?
9 Nov 2017 - 4:55 pm | कुमार१
माझ्या मते एरॉबिक्स अधिक फायदेशीर ठरेल. अर्थात सल्ला देण्यापूर्वी खालील गोष्टी पाहाव्या लागतील :
१. या संबंधीची अनुवंशिकता
२. मधुमेह / पूर्व- मधुमेह स्थिती.
तसाही कुठल्याही व्यायामाचा तंदुरुस्तीसाठी फायदा होईलच.
9 Nov 2017 - 7:18 pm | पगला गजोधर
आणखी एक ...
योग्य आहार व व्यायाम केल्यावर, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते म्हणजे म्हणजे ?
रक्तवाहिन्यांचा डायमीटर कि जो प्लाक मुळे कमी झालेला असतो, तो डायमीटर कमी होण्याचं थांबतं ? (डायमीटर नियंत्रणात राहतो ?)
की
प्लाक कमी व्हायला सुरुवात होऊन डायमीटर परत पूर्वीच्या सारखा होतो ?(डायमीटर हळू हळू कंजेशन मुक्त होऊन पूर्ववत होतो ?)
9 Nov 2017 - 7:43 pm | कुमार१
नाही! आधी झालेला damage पूर्ववत नाही होणार. कोले. ला नियंत्रणात ठेवल्यास पुढील थर साठणे कमी होऊ शकेल.
पुन्हा लक्षात घ्या की तो आजार multifactorial आहे.
उपाय करायचे पण खात्री देता येत नाही
9 Nov 2017 - 8:03 pm | गामा पैलवान
कुमारेक,
अहो हे काय बोलताय. शांतम पापम!! इथले नास्तिक धावून येतील अंगावर अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून ओरडंत !
आ.न.,
-गा.पै.
9 Nov 2017 - 8:34 pm | कुमार१
अहो, जो धावून येईल त्याचे कोलेस्टेरॉल नक्की वाढेल!
मला नाही काही फरक पडणार ☺
9 Nov 2017 - 9:45 pm | पगला गजोधर
आणि सो कॉल्ड नॉननास्तिक, एखाद्या बाबाने पाणीपुरी खा..
तुमचं कोलेस्टेरॉल प्रॉब्लेम नष्ट होईल... तुम्हाला अमरत्व लाभेल... असं म्हटलं की आधुनिक उपचार सोडून.. श्रद्धेपोटी पाणीपुरी खातील...
10 Nov 2017 - 10:26 am | भ ट क्या खे ड वा ला
अशा प्रकारचे अजुन लेख येउद्यात ..उदाहरणार्थ
साखर (रक्तातली व आहारातील ) या विषयी
जीवनशैली व आरोग्य
इत्यादी
10 Nov 2017 - 1:33 pm | कुमार१
आभारी आहे.
तुम्ही माझा खालील लेख वाचू शकता
इन्सुलिन' वर यापूर्वीच इथे लिहीले आहे :
http://www.misalpav.com/node/41287
10 Nov 2017 - 1:41 pm | सांरा
दशकात कोकाकोला आणि पेप्सी वगैरे कंपन्यांनी मुद्दाम कोलेस्ट्रॉल मुळे हृदयविकार आणि रक्तदाब होतो ( आणि साखरेमुळे होत नाही ) हे लोकांवर ठसवण्यासाठी शास्त्रज्ञ लोकांना फार पैसे वाटले होते असे नुकतेच समोर आले आहे.
10 Nov 2017 - 4:47 pm | कुमार१
हा प्रश्न बरेच जण विचारत असतात.
त्याचा जरा उहापोह एका भारतीय पाठ्यपुस्तकातील संदर्भांनुसार करतो :
तेलांमध्ये जी fatty acids (FA) असतात ती ३ प्रकारची असतात:
१. Saturated FA (SFA) = सफा
२. MonoUnsaturated FA (MUFA) = मुफा
३. PolyUnsaturated FA (PUFA) = पुफा
आता भारतीयांना सुयोग्य अशा तेलात वरील तिन्ही घटक १:१:१ अशा समप्रमाणात असावेत.
बर मग, असे बाजारातले तेल कोणते? उत्तर : एकही नाही !
यावर तज्ञांचा सल्ला असा की २-३ प्रकारच्या तेलांचे मिश्रण वापरल्यास वरील तिन्ही घटक मिळतील.
आता हा ‘मिश्रण’ प्रकार प्रत्येकाला चवीच्या दृष्टीने आवडेलच असे नाही. तसेच २ तेले मिसळल्यास त्यांच्या रासायनिक गुणधर्मात काही बदल होउ शकतील.
त्याऐवजी असे करता येईल :
दिवसातील तिन्ही वेळेचा स्वयंपाक करताना तीन ( किंवा निदान २) वेगळी तेले वापरायची.
मी असे करतो: एका महिन्यात शेंगदाणा + सूर्यफूल ,
तर पुढच्या महिन्यात शेंगदाणा + जवस /करडी .
15 Nov 2017 - 8:32 pm | तेजस आठवले
जवसाचे तेल सहज उपलब्ध होते ? मला बरीच शोधाशोध करून मिळाले नाही. एखादा चांगला ब्रँड असेल तर सांगा. मी ऍमेझॉन वरून २०० ml ची एक बाटली मागवली. चमचाभर रोज कच्चे खातो, चटणी वर वगैरे टाकून. पण त्याची फोडणी कशी होईल आणि पदार्थाला त्याचा वास कसा लागेल माहिती नाही म्हणून कच्चेच वापरतो. बाकीची तेले (राईस ब्रान, मोहोरी/सूर्यफूल, खोबरेल ) जितकी सहज दिसतात बाजारात तितके हे दिसत नाही. मुंबईत एखादे घाऊक दुकान कोणाला माहित असल्यास सांगा.
15 Nov 2017 - 8:48 pm | कुमार१
बरोबर, सहज मिळत नाही
निमशहरी भागात ग्रामोद्योग मध्ये मिळते
16 Nov 2017 - 8:13 am | शेखरमोघे
जवसाचेच नव्हे तर इतर कुठलेही तेल कच्चे असतानाचे त्याचे गुणधर्म आणि तापल्यानन्तरचे (उदा. फोडणीकरता) गुणधर्म यात बराच फरक असू शकतो. तापल्यानन्तरचे (उदा. फोडणीकरता किन्वा तळणाकरता) वापरलेले तेल "जळल्या"मुळे त्याचे आरोग्यदायी गुण (किती "जळेल" म्हणजेच विघटन पावेल त्या प्रमाणात) नक्कीच कमी/नाहिसे होतात. कुठले तेल किती पट्कन/कमी तपमानाला जळेल/ विघटन पावेल हे त्याच्या smoke point तसेच इतर तत्सम गोष्टीवरून ठरते. olive oil कितीही " चान्गले" असले तरी तळण्याकरता वापरले तर त्याचा "चान्गले" पणा कमी/नाहीसा होइल. फोडणी/तळण्याकरता बराच उच्च smoke point असलेले तेल वापरल्याने त्याचे विघटन कमी प्रमाणात होईल. म्हणजेच "कुठले तेल चान्गले" हे त्या तेलाचा कशा तर्हेने वापर करायचा आहे (उदा. मोहन म्हणून की जिथे ते फारसे जळणार नाही, किन्वा फोडणी करता किन्वा तळण्याकरता जिथे ते वेगवेगळ्या प्रमाणात विघटित होईल) यावर अवलम्बून असेल. आणखी माहिती करता पहा : https://jonbarron.org/diet-and-nutrition/healthiest-cooking-oil-chart-sm...
21 Nov 2017 - 4:21 pm | चिगो
जर कुठली तेलघाणी अजून जिवंत असेल, तर तिथे विचारून बघा किंवा निमशहरी/ ग्रामिण भागातून आणा.. 'फ्लॅक्ससीड ऑईल' झाल्यापासून ऑनलाईन किंवा मॉल्समधे भरमसाठ महागलं आहे जवसाचं तेल.
आणि जास्त साठा करून ठेऊ नका. चिकट होतं.
10 Nov 2017 - 10:34 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेख!
स्वाती
11 Nov 2017 - 1:07 am | रुपी
मस्त माहितीपूर्ण लेख!
11 Nov 2017 - 1:45 am | अमितदादा
भारी लेख डॉक्टर साहेब, उत्तम माहिती.
तुमचा मधुमेहाबद्दल चा लेख वाचण्याअगोदर माझ मधुमेहाबाबत हे मत होत, परंतु मधुमेहाचा इतिहास जो तुम्ही सांगितला तेंव्हा असे कळाले कि अरेच्या हा तर आजार प्राचीन आहे, तसे आता वाटते कि आजचे अनेक आजार हे कदाचित जुने असू शकतात, सध्या ते आपल्या बैठी/विलासी/अधुनिक /सध्याची जीवनशैली मुळे फक्त त्याची तीव्रता किंवा ते आढळण्याचे प्रमाण वाढले असेल.
11 Nov 2017 - 7:39 am | vikramaditya
खोबरेल तेलाचा वापर आहारात करणे कितपत फाय़देशीर आहे?
11 Nov 2017 - 9:40 am | कुमार१
स्वाती दिनेश , रुपी, अमित व विक्रमादित्य : मनापासून आभार.
खोबरेल तेलाचा वापर भारतात अनेक कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केलेला आहे. त्यांच्यासाठी ते वरदान आहे. माझ्या मते खात्यापित्या उच्च / मध्यम्वर्गीय लोकांनी ते खायची गरज नाही. आपल्याला थोड्या प्रमाणात तूप पुरेसे आहे.
या विषयावर गुगलत बसल्यास अनेक मतांतरे आढळतील.
@ अमित , तुमच्यासाठी पुढचा वेगळा प्र. लिहीतो.
11 Nov 2017 - 9:53 am | कुमार१
आता वाटते कि आजचे अनेक आजार हे कदाचित जुने असू शकतात, सध्या ते आपल्या बैठी/विलासी/अधुनिक /सध्याची जीवनशैली मुळे फक्त त्याची तीव्रता किंवा ते आढळण्याचे प्रमाण वाढले असेल. >>>> काही अंशी सहमत. आता हे बघा....
Atheosclerosis या आजाराबद्दल एक मजेदार अवतरण पाठ्यपुस्तकात होते. ते आठवून लिहीत आहे:
प्रश्न : असा कोणता माणूस आहे की ज्याला Atheosclerosis होण्याची शक्यता कमीतकमी आहे?
उत्तर : तो माणूस खालीलप्रमाणे असेल :
१. १९२० पूर्वी जन्मलेला,
२. भरपूर चालणारा व फक्त सायकल हेच वाहन वापरणारा,
३. एका शांत बेटावर एका खोलीत गर्दी करून राहणारा !,
४. बेकार व भटक्या आणि ...
५. कंदमुळे खाऊन जगणारा
(अजून काही गोष्टी होत्या पण आता विसरलो).
म्हणजे आज या प्रश्नाचे उत्तर काय ???
कोणीही नाही !!!
11 Nov 2017 - 10:22 am | पगला गजोधर
तरीही यातून उपयुक्त माहिती डीराईव्ह करता येते....
धन्यवाद...
अशीच खालील हायपोथॅसिस वर माहिती देऊ शकाल का ?
असा कोणता माणूस आहे की ज्याला
{अकाली हार्ट /किडनी/लंग/लिव्हर/ पॅनक्रीया - फेल्युअर},
{अल्झायमर/पॅरालिसिस }
होण्याची शक्यता कमीतकमी आहे?
11 Nov 2017 - 10:30 am | कुमार१
अहो पगो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला एक महिनाभर तरी शांतपणे अभ्यास करावा लागेल !
बघू, दमाने मनावर घेतो!
11 Nov 2017 - 10:53 am | सुबोध खरे
ज्याचे आईवडील ७५ वर्षापेक्षा जास्त वर्षे निरोगी आयुष्य जगले आहेत ( मधुमेहासारखे अनुवांशिक आजार नसलेला), शाकाहारी( किंवा मत्स्यहारी) जेवण घेणारा, नियमित व्यायाम करणारा (रोज ४५ मिनिटे चालणारा आणि इतर दिवसभर ठोला मारून न बसणारा) , धूम्रपान न करणारा आणि मद्यपान न करणारा( किंवा माफक मद्यपान आठवड्यात जास्तीत जास्त ४ पेग) असा माणूस याला वरील आजार होण्याची शक्यता कमीत कमी आहे.
या पैकी अनुवांशिक आजार सोडले तर बाकी सर्व गोष्टी कोणत्याही माणसाला नियंत्रित ठेवणे सहज शक्य आहे.
12 Nov 2017 - 7:51 pm | कुमार१
चर्चेत सहभागी सर्वांचे आभार. सरतेशेवटी atherosclerosis बद्दलची माझी काही निरिक्षणे /अनुभव :
१. यात जनुकीय घटकांचा वाटा खूप मोठा आहे. त्यामुळे अनुवंशिकता असणाऱ्या व्यक्तींनी आहारनियमन, व्यायाम, तंबाकू पासून दूर राहणे हे जरूर करावे. फायदा होतो.
२. जिथे अनुवंशिकता नाही, जीवनशैली काहीशी निवांत आहे, अशांनी बिंधास खावेप्यावे, वगैरे.
३. उच्च कोलेस्टेरॉल हे जर अनुवंशिक आजाराने असेल (Familial hypercholesterolemia) तर औषधांचा चांगलाच उपयोग होतो. अशा काहींमध्ये एकूण कोलेस्टेरॉलचे प्रमाण हजाराच्या घरात सुद्धा जाऊ शकते. इथे औषधे ही वरदानच आहेत.
४. “ते विज्ञान वगैरे जाउद्यात, कशात काही अर्थ नसतो, होणारे अटळ असते, आपल्या हातात काही नाही” असे निराशावादी सूर मी तरी काढीत नाही.
12 Nov 2017 - 7:59 pm | पगला गजोधर
म्हणजेच दुसऱ्या शब्दात... जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन....असंच तुम्हांला म्हणायचे होते नं ? पॉईंट ४ ...
12 Nov 2017 - 8:30 pm | कुमार१
पग, बरोबर ! तो महत्वाचा आहे
16 Nov 2017 - 1:57 pm | पाटीलभाऊ
उपयुक्त माहिती
16 Nov 2017 - 7:43 pm | कुमार१
पाटीलभाऊ, आभारी आहे. लेख तुम्हाला उपयुक्त वाटल्याचे समाधान आहे
21 Nov 2017 - 4:24 pm | चिगो
आपला लेख आवडला.. अत्यंत माहितीपुर्ण आहे. आजकाल तेला-तुपा-साखरेनंतर 'हेल्थफुड मार्केटींग'ची गाडी मिठावर घसरली आहे..
21 Nov 2017 - 4:54 pm | कुमार१
चिगो, आभार आणि सहमती !
21 Nov 2017 - 4:54 pm | कुमार१
चिगो, आभार आणि सहमती !
4 Dec 2017 - 7:51 pm | पैसा
एचडीएल व एलडीएल कोलेस्टेरॉलसोबत रिपोर्टमधे काळजी करायला लावणारा तिसरा घटक ट्रायग्लिसेराईड. त्याबद्दलही थोडे वाचायला आवडले असते.
5 Dec 2017 - 4:24 am | कुमार१
पैसा, आभार
TG हा दुसरा मेद ज्याने atherosclerosis बळावते
मधुमेहींमध्ये ते वाढते
काही अनुवांशिक आजारात फक्त cholesterol, काहींत फक्त TG तर काहींत दोन्ही वाढतात
26 Jan 2018 - 10:02 am | Dr Ravi Prayag
दररोज 45 मिनिटे मध्यम तीव्र पध्दतीचा व्यायाम आठवड्यातील बहुतेक दिवस करणे आवश्यक आहे.आहार, विहार व ताणतणावाचे व्यवस्थापन यागोष्टींकडे ब-याच जणांचे दुर्लक्ष्य होते.
26 Jan 2018 - 10:10 am | कुमार१
डॉ. रवी, सहमत आहे. सुयोग्य जीवनशैली ही महत्वाची आहे.
26 Jan 2018 - 10:17 am | Dr Ravi Prayag
धन्यवाद!
15 Mar 2018 - 11:44 am | गुल्लू दादा
माहितीपूर्ण लेख सर
15 May 2018 - 8:49 am | कुमार१
अलीकडे यावरील संशोधन जोरात चालू आहे. मध्यम वयातील उच्च कोलेस्टेरॉल पातळी मुळे मानसिक ऱ्हास आणि अलझायमर आजार होण्याची धोका वाढू शकतो ,असे एक गृहीतक आहे.
तसेच कोलेस्टेरॉल कमी करणारी statins ही औषधे दीर्घकाळ घेतल्यास आकलनावर काही परिणाम होतो का याचाही अभ्यास चालू आहे.
सध्याचे निष्कर्ष उलटसुलट आहेत. अजून संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडेल.
17 Dec 2020 - 8:46 pm | कुमार१
नुकतेच एका जाल-परिषदेत एका हृदयरोगतज्ञांचे यावरील विवेचन ऐकले. ते रोचक आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार करोनरी हृदयविकाराचा धोका वाढवणारे एकूण 60 घटक आहेत - त्यापैकी 20 प्रमुख तर 40 गौण आहेत !!
20 प्रमुखमध्ये त्यांनी वाढलेल्या कोलेस्टेरॉलला नवव्या क्रमांकावर टाकले आहे. पहिले दोन क्रमांक अर्थातच अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव हे आहेत. त्यानंतर मधुमेह, उच्चरक्तदाब ही मंडळी रांगेत आहेत.
27 Dec 2021 - 2:47 pm | कुमार१
आहारात विशिष्ट अन्नपदार्थ जास्त खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी वाढते का ? हा यक्षप्रश्न आजही वादग्रस्त आहे.
या प्रकारच्या संशोधनाचे प्रायोजक कोण असतात हे डोकावून पाहणे इष्ट.
या सर्वांचा उहापोह करणारा एक चांगला लेख इथे
एखाद्या संशोधनाचे प्रायोजक कोण आहेत याचा संशोधनांच्या निष्कर्षावर पक्षपाती परिणाम होतो हे कटू सत्य आहे.
लेखकाने असे प्रायोजक व संशोधन अभ्यास यातील विसंगती दाखवणारी तीन सुंदर उदाहरणे दिली आहेत :
१. अंडी उद्योजक प्रायोजित करतात कोलेस्टेरॉल संशोधन
२. ब्लूबेरी उद्योग >>>>> अँटिऑक्सिडंट संशोधन आणि
३. दुग्धपदार्थ उद्योजक >>>>>> अस्थिभंगाचे संशोधन ! !
3 Jan 2022 - 2:18 pm | बापू मामा
आपण तंबाकू वर्ज करा असे म्हणता. मी गेली ३९ वर्ष तंबाखू व चुना वापरतो. मला कॅन्सर झालेला नाही. तसेच धुम्रपानाने ईतरांना त्रास होऊ शकतो पण मी तिचे सेवन करुन तोंड बेसीनवर धुवतो.ईतरांना काहीही त्रास देत नाही. दररोज आठ तास तरी हे मिश्रण मुखात असते. कोणताही रोग नाही. औषधाची गोळीही घेत नाही.अनुवांशिक मधुमेह १४९/२४८ पर्यंत वाढला. लगेच सायकलवर कामावर जाण्यास सुरु करुन व आहार कमी करून १०६/१२९ आणला आहे. वय ६० उंची ५'४" वजन ६४ किलो. आपला सल्ला द्यावा.
3 Jan 2022 - 2:35 pm | कुमार१
जालावरून व्यक्तिगत सल्लामसलत नको. तो या लेखनाचा उद्देश नाही.
आता याबद्दल:
>>
कर्करोग अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून होतो. त्याचा उहापोह स्वतंत्रपणे या लेखात केलेला आहे तो वाचता येईल.
तरीही तंबाखूयुक्त पदार्थाच्या सेवनाचे समर्थन करता येणार नाही.
मधुमेह नियंत्रणासाठी एरोबिक प्रकारचे व्यायाम चांगलेच.
चालू ठेवा...
4 Jan 2022 - 11:58 am | बापू मामा
लेख वाचला.अगदी सुयोग्य आहे. धुम्रपान तर इतरांनाही कर्करोगी करू शकतो.
4 Jan 2022 - 12:03 pm | बापू मामा
लेख वाचला.अगदी सुयोग्य आहे. धुम्रपान तर इतरांनाही कर्करोगी करू शकतो.
4 Jan 2022 - 10:47 am | सुबोध खरे
मी गेली ३९ वर्ष तंबाखू व चुना वापरतो. मला कॅन्सर झालेला नाही.
मी गेली ३० वर्षे रेल्वे लाईन क्रॉस करून जातो आहे
अजून मी मेलेलो नाही.
आपले सुदैव ज्या दिवशी संपेल त्या दिवसाची वाट पाहता आहात का?
4 Jan 2022 - 12:08 pm | बापू मामा
देवाघरचे ज्ञात कुणाला| विचित्र नेमानेम||
कुणी रखडती धुळीत आणिक ,कुणास लाभे हेम||
सुबोधराव, आम्ही ९९% तौतंबाकुचे व्यसनाधीन गिरणी कामगार.
4 Jan 2022 - 12:10 pm | बापू मामा
देवाघरचे ज्ञात कुणाला| विचित्र नेमानेम||
कुणी रखडती धुळीत आणिक ,कुणास लाभे हेम||
सुबोधराव, आम्ही ९९% तंबाकुचे व्यसनाधीन गिरणी कामगार.
23 Dec 2022 - 12:14 pm | कुमार१
“नियमित ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते का ?”
या विषयावर भरपूर संशोधन झालेले आहे. या मुद्द्यात तथ्य आहे परंतु खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते :
1. ओट्स खाण्याचे दैनंदिन प्रमाण. साधारणपणे दिवसाला ३ ग्रॅम एवढे ओट्सचे ‘सत्व’ (extract) खाल्ले गेले पाहिजे. इथे आहारतज्ञांचा सल्ला महत्त्वाचा.
2. ओट्सच्या टरफलामध्ये (bran) तंतुमय पदार्थ असतात जे याबाबतीत उपयुक्त आहेत. जर का ओट्सचे पीठ केलेले असेल तर त्यातील कोंडा टाकून देता कामा नये; तो खाल्ला गेला पाहिजे.
3. ओट्सपासून बनवलेले द्रवपदार्थ (घनपेक्षा) यासंदर्भात अधिक उपयुक्त ठरतात.
23 Dec 2022 - 1:05 pm | चौकस२१२
ओट्सपासून बनवलेले द्रवपदार्थ (घनपेक्षा) यासंदर्भात अधिक उपयुक्त ठरतात.
हे कोणत्या स्वरूपात मिळतात? ओट चे दुध ?
23 Dec 2022 - 1:32 pm | कुमार१
दूध
सूप
संत्र्याच्या रसात मिसळलेले ओट्स
23 Dec 2022 - 1:32 pm | कुमार१
दूध
सूप
संत्र्याच्या रसात मिसळलेले ओट्स
26 Jan 2023 - 9:08 am | कुमार१
आपली कोलेस्टेरॉल पातळी, रक्तदाब, धूम्रपानाची सवय/ असणे नसणे, इत्यादी गोष्टींचे एकत्रीकरण करून हृदयविकाराचा धोका किती टक्के आहे हे घरबसल्या काढण्यासाठी एक संगणकीय सूत्र येथे उपलब्ध आहे.
सहज उत्सुकता म्हणून करून पाहता येईल. अर्थात जे काही आकडे येतील त्याने विचलित व्हायचे कारण नाही ! आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचे मत महत्त्वाचे
....
मी करून पाहिले. माझा आकडा 6.1% आला.
म्हणजे काठावरचा .....
24 May 2023 - 9:33 pm | श्रीगणेशा
छान, माहितीपूर्ण लेख!
थोडक्यात काय तर -- समतोल आहार, नियमित व्यायाम, पुरेसा आराम, या गोष्टी नियंत्रित केल्या, तर आपोआपच कोलेस्टेरॉल, इन्सुलिन, साखर, इत्यादी घटक नियंत्रणात राहतात. स्वानुभव.
25 May 2023 - 5:47 am | कुमार१
>>>> हे बरोबरच.
याच्या जोडीला हे एक मजेदार संशोधन पहा.
सहजीवनातील नियमित चुंबनांमुळे सुद्धा कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते !
ते संशोधन अगदी गांभीर्याने घ्यायची गरज नाही; परंतु त्याचा मथितार्थ महत्त्वाचा आहे..
:))))