जुन्नर तालुका म्हणजे प्रचंड टोलेजंग शिखरांचे भरलेले संमेलनच जणु. यात काही दुर्ग आहेत, पर्वतांचे पोट पोखरून तयार केलेली काही लेणी आहेत.नाणेघाटासारखे प्राचीन घाटमार्ग आहेत, कुकडेश्वरासारखी जागती देवालये आहेत, तर कड्याकपार्यात वसलेले लेण्याद्री पर्वतात वसलेले अष्टविनायकापैकी एकमेव स्थान आहे. या सर्वांचे रक्षण करण्यासाठीच ईथे नांदलेल्या सत्तांनी बळकट डोंगरी किल्ले बांधले, शिवरायांच्या जन्माच्या आठवणीत हरवून गेलेला शिवनेरी, शहाजी राजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे जीवधन, हडसर, सातवहानांचा वारसा सांगणारा चावंड, ईतिहासाबध्दल मुग्ध असणारा निमगिरी या सर्व दुर्गश्रॄंखलेत अजून एक काहीसे उपेक्षित किल्ला आहे, दुर्ग आणि कातळमाथ्याची गांधी टोपी घालून मिरवणारा ढाकोबा. सरत्या पावसात ईथे जाण्याची गंमत वेगळीच. आजची भटकंती ईथेच करुया.
दुर्ग, ढाकोबा परिसराचा नकाशा
सह्याद्रीच्या एन धारेवरचा मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा प्रदेश. ईथे उभा राहिले कि विस्तृत मुलुख नजरेच येतो.
(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)
नाणेघाट, आंबोली घाट, त्रिगुणधारा घाट,आंबोली घाट, खुटेधारा घाट, रिठ्याचे दार, पोशिशी आणि माडाची नाळ अश्या अनेक वाट एकापाठोपाठ एक कोकणात उतरतात.कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे.
(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)
या घाट मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे , त्यावर नजर ठेवणे.या सर्व वाटांवरचे पहारेकरी म्हणजे दुर्ग किल्ला आणि ढाकोबा. पैकी ढाकोबा हे फक्त गिरीशिखर आहे, चुकीने त्याचा किल्ला म्हणून उल्लेख होतो, पण त्याला काही एतिहासिक आधार नाही.
हि दोन्ही गिरीशिखरे एका दिवसात पाहून होतात. यालाच जोडून जुन्नर परिसरातील ईतर ठिकाणेही पहाता येतात. या परिसरात येण्यासाठी जुन्नरहून आंबोली किंवा ईंगळून बस सोयीची पडते.बहुतेकदा आधी दुर्ग पाहून ढाकोबाला गेलेले बरे पडते. आधी ढाकोबा बघून दुर्ग पहाण्याचे नियोजन केल्यास बराच चढ चढावा ( साधारण अडीच तास) लागतो आणि वेळही वाया जातो. दुर्ग मुळात उंचावर आहे आणि पायथ्याच्या दुर्गवाडीपर्यंत खाजगी वाहन जाउ शकते तसेच हातवीजला जाणारी बसही सोयीची पडते. आपणही आधी 'दुर्ग' यात्रा करुन ढाकोबाच्या दर्शनाला जाउ या.
हा सगळा प्रदेश दुर्गम तर आहेच पण येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते, तर वीज, शिक्षण तर दूरच राहीले. येथील मुख्य व्यवसाय शेती तर काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पणा केला जातो.
आम्ही पुण्यातून रात्रीच निघून पहाटे दुर्गवाडीला पोहचलो. गावातच प्रशस्त मारूती मंदिर आहे. या ठिकाणी मुक्कामाची सोय होउ शकते. पहाटे उठून झक्कास पोहे आणि गरम चहाचे ईंधन टाकल्यानंतर शरीराची गाडी दिवसभराच्या पायपिटीसाठी तयार झाली. ग्रुप लिडरन पुरुषोत्तम ठकारने आधीच श्री. मुकेश गवळी ( मो- 7387188436 ) व श्री. सागर विरजक( मो-9860073004 ) या भिवडी गावच्या दोन युवकांना सांगून ठेवल्याने ते दोघे दुर्गवाडीत आम्हाला जॉईन झाले. या परिसरात असलेल्या असंख्य ढोरांच्या वाटा आणि मधेच दाट कारवीची झाडी आणि मधेच मोकळवण अशी विचित्र रचना असल्याने वाटा चुकण्याची दाट शक्यता असते. उत्तम म्हणजे वाटाड्या घ्यावा, कारण आधल्या वर्षी ह्याच ग्रुपचा ट्रेक ढाकोबाला आलेला असताना, शेवटच्या ट्प्प्यात वाट चुकून एका डोंगरधारेवरून कसाबसा तो ग्रुप आंबोलीत उतरला होता. यावेळी मात्र स्थानिक वाटाडे असल्याने काळजीचे कारण नव्हते.
सगळ्यांचे आवरल्यानंतर दुर्गवाडीतून निघालो. डांबरी रस्ता पुढे हातवीजला जात असल्याने गाडी जिथं पर्यंत जाउ शकते तिथंपर्यंत गाडीतुन जाण्याचा निर्णय घेतला, कारण नंतर बरीच पायपीट करायची होती.
अखेरीस दुर्गवाडीच्या माळावर उतरलो आणि गाडी मागे वळाली.ड्रायव्हर काका आमची वाट आता आंबोली गावात पहाणार होते. एरवी रखरखीत असणारा दुर्गवाडीचा माळ नुकत्याच सरत आलेल्या पावसाने हिरवागार झाला होता. एका बाजुला हातवीजची घरे दिसत होती.ईथूनच खाली कोकणात, म्हणजे ठाणे जिल्ह्यात त्रिगुणधारा घाट,पोशिशी आणि माडाची नाळ या तीन वाटा खाली उतरतात. या वाटांचा थरारही जबरदस्त असल्याने ज्यांना घाटवाटांचा आनंद घ्यावयाचा आहे त्यांनी एका घाटाने खाली उतरून दुसर्या वाटेने वर चढावे. अंगातील रग जिरवणारा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहिल असाच आहे.
हिरव्या हिरव्या हरित तृणांच्या गालिच्यावरुन आम्ही दुर्ग किल्ल्याच्या दिशेने निघालो. दुर्ग किल्ला समुद्र्सपाटीपासून जरी ३८५५ फुट उंच असला तरी प्रत्यक्षात पायथ्यापासून केवळ एक टेकडी आहे. याच माळावर एक दगड आहे,त्यावर दुसर्या दगडाने आघात केल्यास त्यातून घंटेसारखा आवाज येतो,त्याला स्थानिक लोक "दुर्गादेवीचा थाळा" म्हणतात. बरोबर एखादा माहितगार असेल तरच हा दगड सापडू शकतो. अशाच प्रकारचा मेटालिक साउंड देणारा दगड मी खांदेरी किल्ल्यावर पाहिल्याचे आठवले. किल्ला समोर दिसत असला तरी वर जाण्याची वाट मात्र मागून म्हणजे पश्चिमेकडून आहे. पायथ्याशी काही नवीन बांधलेल्या ईमारती दिसल्या. त्यावर 'दुर्ग किल्ला हा पर्यटनस्थळ म्हणून जाहीर झाला असून या ईमारती पर्यटक निवास म्हणून बांधल्याचे वाटाड्यांनी सांगितले. सध्या मात्र येथे दारु पार्ट्या होत असल्याचे समजले. सरळ जाणारी वाट खाली कोकणात 'खुटेधार घाटाने' उतरते (खुटेधार घाट म्हणजेच खुंटीधार घाट, हा घाट थोडा अवघड आहे, वाटेत आधारासाठी खुंटी मारल्या आहेत म्हणून खुंटीधार ).
तर दुर्गवर जाणारी वाट उजवीकडे वळते. दुर्ग किल्ल्याचा माथा खडकांनी भरलेला आहे. वर अक्षरशः काहीही नाही. ना किल्लेदाराचा वाडा, ना तटबंदी. पाण्याचे टाकेही नाही. पाण्याची सोय खाली एक विहीर आहे, तिथे होते. पण त्यावेळी पावसाच्या पाण्याने तळे साचून विहीर त्यात बुडाली होती.
दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी दुर्गा देवीचे मंदिर आहे. अर्थात हि देवी म्हणजे मुर्ती नसून अनगड स्वरूपात आहे. अगदी सभोवतालच्या निसर्गाला अनुरुप.
पुर्वी हे मंदिरही अत्यंत साधेच होते.
आता मात्र परिसरात विकासकामे सुरु झाल्याने मंदिराचेही नवनिर्माण झाले आहे.
दर्शन घेउन गडावर निघालो.पंधरावीस मिनीटातच गडमाथ्यावर पोहचलो सुध्दा. लांब उत्तरेला ढाकोबा दिसत होता. अर्थात लगेचच तो ढगाच्या बुरख्याआड लपला. आग्नेयेला भीमाशंकर रांग दिसत होती. याच रांगेत वरसुबाई शिखर आहे. डोंगराच्या पलिकडे माळीण गाव आहे. त्याच पावसाळ्यात माळीणची घटना झाल्याने वाटाड्याने आम्हाला आवर्जून तो डोंगर दाखविला. नैॠत्येला गोरखगड, मंच्छिद्र्गड या जोडसुळक्यांनी दर्शन दिले. ढगाळ वातावरणाने विशेष काही दिसत नसल्याने आम्ही चटकन खाली उतरून आलो. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.
या परिसराचा विकास करताना काही चांगले उपक्रम राबवलेले दिसले. पैकी दरीच्या टोकाशी रेलिंग उभारुन छान 'व्ह्यु पॉइंट' तयार केलाय.
इथून दरीतील ठाणे जिल्ह्यातील पळू, सोनावळे गावाचा परिसर , लांबवर मुंबई -अ.नगर रस्त्यावरचा वैशाखरे गावचा परिसर दिसतो. पश्चिमेकडे म्हसा गावचा परिसर आहे. या ठिकाणि होणाऱ्या जनावरांच्या बाजारात जाण्यासाठी हे प्राचीन मार्ग वापरले जातात. आजही स्थानिक लोक कोकणात जाण्यासाठी ह्याच वाटा वापरतात. याच दुर्गच्या कड्याच्या पोटात "गणपती गडद" हि लेणी कोरलेली आहेत.
वर आकाशात स्वच्छंद फिरणारे ढग आणि त्यांची जमीनीवर पडलेली सावली सुंदर दिसत होती.
खुप वेळ हा अनोखा खेळ पाहून अखेरीस वाटाड्याने भानावर आणल्यानंतर आम्ही ढाकोबाकडे निघालो. दाट झाडीतून वाट खाली उतरली.
मधेच मोकळवण आणि खळाळणारा ओढा लागला. ईथे पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि सपाटीवरच्या वाटेने ओढा उजव्या हाताला ठेवत वाटचाल सुरु झाली.
बरीच रानफुले उमलेली दिसत होती.
खेकडोबा, यांना मी बहुतेक वामकुक्षीतून ऊठवले , रागाने माझ्याकडे बघताहेत.
छान किती दिसते फुलपाखरू.
यांची धाव मात्र कुंपणापर्यंतच काय, पण सगळ्या मैदानात होती.
एका दगडावर हि शिवपिंड कोरलेली दिसली.
फोटो काढताना मी थोडा मागे रेंगाळलो असताना मला अचानक ओढ्याच्या पलिकडच्या किनार्यावर कोरीव गुहा आणि खांबासारखे काहीतरी दिसले. मात्र ओढ्याचे खोल पात्र, वाढलेली झाडी आणि वाहणारे पाणी यामुळे पलिकडे जाउन नेमके काय आहे हे पहाता आले नाही.
पुढे आरडाओरडा एकु आला म्हणून जाउन पहातो तो, बहुतेक मंड्ळींनी ओढ्यात बसकण मारून निसर्गस्नानाचा आनंद लुटायचा ठरविला होता. तशीही सकाळी आंघोळ झालेलीच नव्हती. आता यांचे काही लवकर आटोपत नाही हे पाहून मी फोटोग्राफी सुरु केली.
ओढ्याच्या पात्रातच रांजणकुंड तयार झालेले होते.
त्यात बरेच मजेदार आकार दिसले, हा पहा मिकीमाउस.
हा एखाद्या प्राण्याचा पावलाचा ठसा वाटतोय.
अखेरीस समस्तांची आंघोळीची हौस पुरे झाल्यानंतर ग्रुप लिडरने 'हाल्या' केले, तेव्हा कुठे नाईलाजाने मंडळी उठली आणि वाटाड्याच्या मागून निघाली.
आता वाट दाट कारवीतून चढत होती. ओली वाट आणि त्यातून सलग चढण, नवख्या मंडळींचे छातीचे भाते चालु झाले. अखेरीच पठारावर पोहचलो आणि सगळ्यांनीच बसकण मारली, तर काही जण आडवे होउन डोक्यावर हात घेउन डोळे मिटून पडले.
वाटेत झाडावर उगवलेले ऑर्किड पहायला मिळाले.
नंतर मात्र सपाटीवरून वाटचाल होती. अखेरीच एका विहीरीपाशी पोहचलो. ढाकोबाचे राउळ पलिकडे दिसत होते. जर ढाकोबाच्या देवळात मुक्काम करायचा असेल तर हा पाण्याचा एकमेव स्त्रोत.
(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)
ढाकोबाचे जुने मंदिर अतिशय साधे होते.
पण आता त्याचाही जिर्णोध्दार झाला आहे.
ढाकोबाची मुर्तीही अनगड आहे. रात्री मुक्काम करण्यासाथी योग्य असे प्रशस्त मंदिर सध्या बांधले आहे.
मंदिराच्या आवारात काही मुर्त्या आहेत.
ईथेच डबे सोडले आणि पोटपुजा केली. फार न रेंगाळता ढाकोबाकडे निघालो.
लांबवर ढाकोबाचे शिखर दिसत होते.
वाटेमधे चर खणून पाणी जमीनीत मुरण्याची व्यवस्था केली होती.
वाटेत एका कोळ्याच्या जाळ्यात थेंबाचे मोती झालेले दिसले.
पण इथे वाटाडेसुध्दा वाट चुकले आणि एका खडकाळ माळावर आम्ही पोहचलो.
इथून ढाकोबाचा कडा बेलाग वाटत होता, पण एका कोपर्यातून चढण्याची वाट आहे असे वाटाड्याचे म्हणणे होते.
पण बरेच नवखे लोक आणि दोन लहान मुले आलेली असल्याने आम्ही तो पर्याय बाद केला आणि ढाकोबाच्या आग्नेय कोपर्यात रुळलेली वाट आहे,त्या दिशेने निघालो.
डावी कडे ढाकोबाचा कडा ठेवून आमची वाटचाल सुरु झाली आणि अखेरीस एका सपाटीवर पोहचलो.
इथून वर चढणारी वाट स्पष्ट दिसत होती.
डाव्या हाताला ढाकोबाचा कडा आणि त्यात असलेल्या नैसर्गिक गुहा दिसत होत्या.
थोडी खडी वाट चढून माथ्यावर पोहचलो.
मागच्या बाजुला ढाकोबाच्या मंदिराचा परिसर आणि मागे दुर्ग दिसत होता.
एखाद्या सुपासारखा उतरता ढाकोबाचा माथा समोर होता. याच्या सर्वोच्च टोकाकडे निघालो. ढाकोबाचा सर्वोच्च माथा समुद्र्सपाटी पासून ४१४८ फुट आहे. सह्याद्रीच्या एन रांगेत फक्त पाच शिखरे चार हजार फुटापेक्षा जास्त उंच आहेत, ढाकोबा त्यापैकी एक. हवा स्वच्छ असताना या ठिकाणी उभारल्यानंतर प्रंचड मोठा मुलुख ध्यानी येतो. थेत उत्तरेला शिखरसाम्राज्ञी कळसुबाई, अलंग,मदन्,कुलंग हे दुर्ग त्रिकुट ( अलंगच्या पठारावरून ढाकोबा मी पाहिला होता), हरिश्चंद्रगड्,जीवधन, नाणेघाट, ईशान्येला चावंड, हडसर, दक्षिणेला दुर्ग, नैऋत्येला गोरखगड आणि मच्छिंद्रगडाचे सुळके, पश्चिमेला माहुली आणि पायथ्यातून उतरणारा आंबोली घाट( दार्या घाट) असा फार मोठा परिसर दिसतो. एकंदरीत मोक्याचे स्थान, जवळून उतरणार्या दोन घाट वाटा पहाता ह्या शिखराचे रुपांतर किल्ल्यात का झाले नाही याचे आश्चर्य वाटते. बहुधा पाण्याची अडचण असावी अशी एक शक्यता.
ह्या ढाकोबाचा कडा सुळके आणि हिमालयातील शिखरे पादाक्रांत करणार्या क्लांयबरसाठी आदर्श असाच आहे. एव्हरेस्ट्वीर श्री.सुरेंद्र चव्हाण यांनी ढाकोबावर सराव केल्याचे वाचले होते.
ढाकोबाच्या माथ्यावर क्लायबिंगचा दोर अडकवण्यासाठी चोक मारलाय. तो झाडीत लपला होता. तो शोधुया असे पुरुषोत्तम मला म्हणाला, पण एकुण वाढलेली झाडी आणि टोपली कारवी पहाता मला उगाच झाडीत शिरणे धोक्याचे वाटत होते. आमचे हे बोलणे चालु होते तोपर्यंत नेमके आम्हा दोघांच्या मधून एक फुरसे वेगाने झाडीत गायब झाले. आम्ही कड्याच्या टोकाशी उभे होते. तेव्हा फार ईकडे तिकडे हलण्यासाठी जागा नव्हती. बाकीच्यांना आम्ही पाय आपटत येण्यास सांगितले. धोका थोडक्यात टळला होता. अर्थात डोंगरात जायचे म्हणजे आपण साप, विंचवांच्या घरात जात असतो, तेव्हा ते भेटणारच असे गॄहित धरुन सदैव सावध असणे चांगले.
नवख्यांना डोंगर रांगाची आणि किल्ल्यांची माहिती देउन आम्ही खाली उतरायला सुरवात केली. एक दोन ठिकाणी वाटाडेही चुकले. अर्थात लगेचच वाट सापड्ली. यावरून या परिसरात फिरण्यासाठी वाटाड्यांची किती गरज आहे हे लक्षात येईल. थोडेफार गुराखी सोडले तर दुर्ग्,ढाकोबा परिसरात स्थानिक गावकरी भेटने सुध्दा कठीण.
या परिसराची रचना काहीशी विचित्र आहे. मधेच थोडे मोकळवण, मधेच गच्च कारवी यामुळे मोकळवणात आल्यानंतर कारवीत हरवलेली वाट अक्षरशः शोधावी लागते. उतरायला सुरवात केल्याबरोबर ढाकोबा निरनिराळ्या कोनात अफलातून दिसत होता.
निम्मे उतरल्यानंतर कातळातील नैसर्गिक गुहा समोर आली.
त्यावरून धबधबा वहात होता. या गुहेत एका कुटूंबाने घर केले होते. अश्या अडचणीच्या ठिकाणी रहाणारे लोक पाहून आपण किती सुखात जगतो ते पटते.
कातळावर उमलेले हे फुल.
धसरड्या दगडांमुळे उतरताना नवख्या मंडळींची चांगलीच तारांबळ उडत होती. काही जणांनी लोटांगण घातले. मी आणि नयन चटकन उतरून आंबोली गावात पोहचलो तरी अजून डोंगरतून उतरणार्या लोकांचे आवाज येत होते. आंबोली गावाच्या अलिकडे डावीकडे वाट फुटली होती, ती आंबोली घाटाकडे जात होती. तसा पाटीही लावलेली आहे.
आंबोली गावाच्या अलिकडे असलेला हा सुळका, ह्यावर प्रस्तरारोहणाच्या मोहिमा निघतात.
भरपुर वेळ हाताशी असल्याने आंबोलीगावा शेजारी मीना नदीवरच्या धरणात मस्त आंघोळ केली आणि ट्रेकचा सगळा शीण घालवला. तोपर्यंत सगळे उतरून आले आणि गाडीत बसून आम्ही जुन्नरकडे निघालो.
जुन्नर आपटाळे रस्त्यावर एक उच्छल नावाचे लहानसे खेडे आहे. १९३४ ते १९४४ या स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात कोंडाजी नवले नावाचा भारतीय रॉबिनहूड राहत असे. तो आणि त्याचे साथीदार अन्यायी श्रीमंत जमीनदारांना लुटून त्यांची संपती गरीब जनतेत वितरित करत असत. त्याची तक्रार जमीनदारांनी ब्रिटिश राजवटीकडे केली होती. पण सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे तो पकडला गेला नाही. आजही स्थानिक जनतेत त्याची स्तुतिपर कवने गायली जातात. ढाकोबाच्या वाटेवर या गावातील त्याच्या घरीदेखील भेट देता येते.
(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)
जाता जाता ढाकोबासंदर्भात माझ्या मित्राना आलेला एक अनुभव लिहीतो. सहा जणांचा हा ग्रुप आंबोलीतून ढाकोबाला गेला होता. आंबोलीतच उशिर झाल्याने ढाकोबाला वर पोहचायला रात्रीचे आठ वाजले. आधी या परिसरात कोणीच आलेले नव्हते, त्यामुळे ढाकोबाचे मंदिर कोठे आहे ते कोणालाच माहिती नव्हते. त्यात उंच वाढलेल्या कारवीमुळे दिशेचा काही अंदाज येत नव्हता. दुरवर एक दिवा टिमटिमताना दिसत होता. थोड्या अनुभवी असलेल्या दोघांनी जाउन तिथे मंदिर किंवा काही झोपडी आहे याची खात्री करण्याचे ठरविले. टॉर्च घेउन ते प्रकाशाच्या दिशेने निघाले. साधारण तो प्रकाश जिथून येतो आहे त्या अंतरापर्यंत पोहचल्यानंतर तो प्रकाश थोड्या लांब अंतरावर दिसु लागला. त्या दिशेने गेल्यानंतर पुन्हा तो प्रकाश लांबवर दिसायला लागला. हा प्रकार पाहून दोघेही निमुटपणे मागे वळाले आणि ती रात्र त्यांनी उघड्यावरच आळीपाळीने जागून काढली. अर्थात हा गुढ अनुभव थेट मला आलेला नसल्याने याची सत्यासत्यता मी सांगु शकत नाही.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१) पुणे जिल्हा गॅझेटियर
२) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) सांगाती सह्याद्रिचा-यंग झिंगारो ट्रेकर्स.
प्रतिक्रिया
29 Sep 2017 - 12:51 pm | प्रसाद_१९८२
सुंदर ट्रेक वृतांत.
प्र.के. घाणेकर यांच्या एका पुस्तकात या दुर्गम दुर्गजोडीबद्दल सविस्तर लिखाण वाचले होते मात्र इतरत्र कुठेही ह्या दुर्गम किल्ल्याबद्दल वाचलेल्याचे आठवत नाही. तुम्ही ह्या दुर्गम किल्ल्यांची माहिती एकत्रीत लिहित आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
29 Sep 2017 - 1:04 pm | कंजूस
मजेदार आहे.
29 Sep 2017 - 1:17 pm | उपेक्षित
अतिशय सुंदर वर्णन, जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि धोलवड आईचे माहेर असल्यामुळे (आता कुणीच नाही तिथे) हा भाग जास्ती जवळचा वाटला.
29 Sep 2017 - 2:29 pm | गौतमी
तुमची लेख मालिका अजिबात चुकवत नाही....
29 Sep 2017 - 2:37 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच, लिहीलेय.
आम्हीही ही जोडगोळी ऐन पावसाळ्यात केली होती.
कोकणातून दार्या घाटाने वरती येऊन धाकोबा मंदीरात राहीलो होतो. तेव्हा मंदीर अगदीच जुने होते. हे आणि दुर्गवरचे पण आता चांगली सुधारणा झालेली दिसतेय. धाकोबा पठार आणि परीसर अतीशय फसवा आहे. आम्हाला प्रचंड धुके लागले होते आणि धाकोबा म्ण्दीर काही केल्या सापडत नव्हते. तेव्हा खुप शोधून शोधून दमल्यावर खुप भुका लागल्यावर पठारावरच्या जांभळाच्या झाडांदरील जांभळे खाऊन दिवस घालवला, दिसस संपता संपता एका चुकलेल्या गावकर्याने आम्हाला योग्य रस्ता दाखवून धाकोबा मंदीरा पर्यण्त सोडले होते.
29 Sep 2017 - 3:04 pm | सिरुसेरि
छान माहिती आणी फोटो
1 Oct 2017 - 9:05 am | प्रचेतस
'दुर्ग'ला खूप पूर्वी गेलो होतो, तेव्हा हा परिसर खूपच दुर्गम होता. आजदेखील आहे. अर्थात रस्त्यांची परिस्थिती थोडी सुधारली आहे इतकेच. तेव्हा ढाकोबाला जाणे मात्र जमले नव्हते. जीवधन किल्ल्यावरुन ढाकोबाच्या टोपीचे अप्रतिम दर्शन घडते. ढाकोबाचा कडादेखील अद्वितीय.
ह्या परिसरातील बेलाग गिरीदुर्गांवर अवश्य लिहाच. बराच प्राचीन इतिहास आहे ह्या भागाला.
1 Oct 2017 - 4:04 pm | एस
दुर्ग ढाकोबा दऱ्या घाट वगैरे परिसर आवडीचा आहे. या भागात चकवा लागण्यासारखे काय आहे? बऱ्याचदा गेलोय, रात्रीदेखील हिंडलोय, कधीही वाट चुकलो नाही. असो.
लेख नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट. पुलेप्र.
1 Oct 2017 - 4:05 pm | एस
डुप्रकाटाआ.
2 Oct 2017 - 7:50 pm | दुर्गविहारी
सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार.
प्रसाद १९८२, उपेक्षित, गौतमी,कंजुस काका आणि सिरुसेरी सर्वांच्या आलेल्या प्रतिसादाबध्द्ल मनापासून धन्यवाद.
स्वच्छंदी_मनोज, पावसाळ्यात धुके उतरल्यानंतर हा परिसर आणखी अवघड होत असला पाहिजे. नशिबानेच तो गावकरी तुम्हाला भेटला अन्यथा त्या परिसरात वर्द्ळ फार कमी आहे.
वल्लीदा, दिवाळीनंतर हिवाळी भटकंती लिहायला सुरु करणार आहे, त्यात जुन्नर, घाटघर, भंडारदरा परिसरातील किल्ल्याविषयी लिहीणार आहे.
एस सर, पावसाळ्यात कारवी दाट वाढली कि वाटा बर्याचदा सापडणे अवघड होते, कारण गुराखी सोडले तर मानवी वावर फार कमी आहे या परिसरात.
6 Oct 2017 - 5:23 pm | arunjoshi123
फोटो, माहिती, नकाशे, अनुभव, निसर्ग, .... आप तो हमारे लिए नॅशनल जिओ वाले हिरो हो।