लोणावळ्याच्या दक्षिणेला पवना नदीच्या काठी दुतर्फा उंच उंच डोंगररागा पसरलेल्या आहेत. त्यात प्राचीन काळापासून मानवाच्या वावराची खूण सांगणारी बेडसे, भाजे लेणी आहेतच शिवाय लोहगड विसापुरसारखे बलदंड किल्लेही आहेत. या शिवाय तुलनेने दुय्यम असलेले तिकोना, मोरगिरी असेही काही किल्ले आहेत. असाच एक सुळका आकाशात झेपावलाय. त्यावर तटबंदीचे पागोटे चढवलय आणि नाव दिलय "तुंग".तुंग म्हणजे उत्तुंग किंवा उंच. शिवाजी महाराजांनी त्याचे चढण्याचे कठीणपण ध्यानात घेउन नाव दिले "कठीणगड".पवन मावळाचा आणखी एक रक्षक. (प्रकाशचित्र आंतरजालावरून)
आणखी एक १५ ऑगस्ट, कुठेतरी ट्रेक जमविण्याचा मेसेज मित्रांनी केला. एकूणच सोयिस्कर म्हणून तुंगला जाण्याचा बेत आखला. तुंगला जाण्यासाठी बरेच पर्याय होते.
१) घुसळखांब फाट्यामार्गे :-
गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहोचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एसटी पकडून २६ किमी अंतरावरील घुसळखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ किमी अंतरावरील तुंगवाडीत पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात. लोणावळ्यापासून थेट तुंगवाडीला जाण्यासाठी एकच मुक्कामी बस संध्याकाळी ५ वा. सुटते जी सकाळी ६.०० वा. तुंगवाडीतून परत येते.
२) ब्राम्हणोली - केवरे
अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोना पेठेत उतरावे आणि काळे कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लाँच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.
३) तुंगवाडीच्या फाट्या मार्गे :-
जर लाँचची सोय उपलब्ध नसेल तर, तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एसटी महामंडाळाची कामशेत - मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहोचतो.
४ ) स्वताची गाडी असेल तर पुणे -पिरंगुट- जवणवरुन तुंगवाडीकडे फाटा फुटतो. या रस्त्याने थेट पायथ्याशी पोहचता येईल.
तुंग परिसराचा नकाशा.
लाँच बेभरवश्याची आणि बहुतेकदा पावसाळ्यात बंद, म्हणजे एस.टी. बस शिवाय पर्याय नव्हता. सकाळी लोणावळ्याला तिघे एकत्र आलो. तिघेही तीन दिशानी आल्याने गाडी कोणीच आणु शकले नाही. थेट एस. टी. नाही हे तर स्पष्टच होते. साहजिकच नाष्टा करुन आंबवड्याला जाणारी बस पकडली. वाटेत भुशी डॅमवरची पारंपारिक जत्रा आणि लायन पाँईट येथे नव्याने सुरु झालेली जत्रा दिसली. या गर्दीतून वाट काढताना बराच वेळ गेला. अखेरीस घुसळखांब फाटा आला आणि एकदाचे पायउतार झालो. रस्त्याच्या सुरवातीलाच पाण्याचे तळे साठले होते. कसेबसे त्यातून पार होत तुंगवाडीच्या दिशेने निघालो. सबंध वाटेत धमाल गप्पा सुरु होत्या, त्यामुळे चालण्याचा कंटाळा बिलकुल आला नाही.
अचानक मला हे महशय रस्त्यावर दिसले. मिपावर जॅक डॅनियल्स यांची सर्प मालिका वाचल्याने, माहिती नसलेल्या सापाला हाताळायचे नाही हे पक्के होते. तसेही ट्रेक करताना मला अनेकदा साप दिसले असल्याने भीती चेपली होती. नीट पाहिल्यानंतर त्याचे डोके गोल आहे याचा अर्थ बिनविषारी साप होता हे नक्की. एखाद्या गाडीखाली बिचारा सापडू नये यासाठी रस्त्यावरून बाजुला करणे आवश्यक होते. पण धोका नको म्हणून एका लांब काठीने त्याला उचलले आणि रस्त्यापासून थोडे आत झाडीत सोडून दिले. नंतर सापावरचे पुस्तक वाचताना मला कळाले हा साप "खापरखवल्या" होता. हा बिनविषारी असून सह्याद्रीत दुर्मिळ झाला आहे. याचे शेपुट तुटल्यासारखे असते. अतिशय शांत स्वभावाचा हा साप छोटे किडे, प्राणी खाउन जगतो.
आम्ही रस्त्यावरुन गप्पा मारत चालत असताना, असंख्य गाड्या आम्हाला ओलांडून जात होत्या. पण एकही आम्हाला लिफ्ट देणे शक्य नव्हते. का म्हणून काय विचारता, सगळ्या एकतर ऑडी, मर्सिडीज, बी.एम.डब्ल्यु किंवा गेला बाजार जग्वार तरी. अखेरीस एक सुमो दिसली तेव्हा किती बरे वाटले म्हणून सांगू. या रस्त्यावरुन आपल्यासारखे कोणीतरी प्रवास करते हा दिलासा वाटला. लोणावळ्याला वीक एंड साजारा करायला आलेली मंडळी भुशी डॅम , लायन पाँईट बघून या रस्त्याने पिरंगुट मार्गे पुण्याला चाललेली होती. बरीच तंगडतोड झाल्यानंतर एस्सार अॅग्रॉच्या फार्म हाउस पाशी पोहचलो. उजवा रस्ता पुण्याला जात होता, तर डावा रस्ता समोरच्या डोंगराला वळसा घालून तुंगवाडीकडे जात होता. आम्ही या फाट्यावर एक बंद दुकान होते तिथे थोडावेळ विश्रांती घेतली. जवळचा डबा सोडून अंगत-पंगत केली. पुन्हा कदमताल सुरु.
इथून समोरचा डोंगर एखाद्या किल्ल्यासारखा दिसतो. पण तो तुंग नव्हे. अर्थात हा ही एक निरीक्षणाचा किल्ला असून वर काही पाण्याची टाकी आहेत हि माहिती आम्हाला नंतर समजली.
(प्रकाशचित्र आंतरजालावरून)
अखेरीस एका वळणावर तुंगचे दर्शन झाले. लांबुन याचे दर्शन एखाद्या शिवलिंगासारखे होते. शाळुंखेसारखा दिसणारा बालेकिल्ला तर विशेष लक्षवेधी.तुंगचे कडे जवळपास ७० ते ८० अंशात उठावले आहेत.
याचा ईतिहास काय असे मित्रांनी विचारले. तेव्हा या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. तुंगचा पहिला उल्लेख निजामशाहीत मिळतो.मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.औरंगजेबाच्या द्क्षिण स्वारीच्या वेळी १२ सप्टेंबर १७०३ मधे मोगलांनी तिकोना ताब्यात घेतला मात्र तुंग ताब्यात घ्यायला त्यांना मे १७०४ उजाडावा लागला. म्हणजे तुंगने किती कडवा प्रतिकार केला पहा. या वेळी औरंगजेबाने याचे नाव ठेवले - बंकीगड! पण हा बंकीगडचा इतिहास अगदी अल्पकाळाचा, औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी पुन्हा तुंगवर भगवा फडकवला आणि पुढे तो ब्रिटिशांच्या सत्तेनंतरही भोर संस्थानच्या रूपाने अखेपर्यंत फडकत राहिला. मात्र एकूण परिसरातील सातव्या शतकातील लेणी, किल्ल्यवरची कोरीव पाण्याची टाकी पहाता हा गड प्राचीन हे नक्की. बहुधा लोहगड, विसापुर, तुंग आणि तिकोना हे एकाच कालखंडात उभारले गेले असावेत.
तुंग किल्ल्याच नकाशा.
खिंडीतून तुंगच्या पायथ्याशी दाखल झालो.
डावीकडे हिरवाई ल्यालेला तुंगचा उत्ताल कडा दिसत होता. बुरुज व महाद्वार खालूनही स्पष्ट दिसत होते.
अजुनही लक्झरियस गाड्या शेजारुन जात होत्या. त्याचे काही कोडे उलगडेना. मागे २००२ मधे मी आलो होतो तेव्हा हा रस्ता कच्चा मातीचा होता. गाव आणि एकुण परिसर साधाभोळा मावळातला वाटत होता.आज डांबरी रस्ता तर झालेला होताच, पण एकुणच पैसा आल्यामुळे होणार्या ईतर सुधारणा दिसत होत्या.
(प्रकाशचित्र आंतरजालावरून)
नंतर समजले कि तुंग ज्या पठारावर उठावलाय, तिथे पवना धरणाचा छान नजारा दिसेल अश्या रितीने क्लब मंहिद्राने रिसोर्ट उभारले आहे. ह्या चकचकीत गाड्या तिकडेच जात होत्या.एकेकाळी साध्याभोळ्या असणार्या तुंग गावाला असा शहरी स्पर्श झाला होता. कालाय तस्मै नमः, दुसरे काय?
अखेरीस तुंगच्या पायथ्याचे हे मारुती मंदिर सामोरे आले.
रस्त्यापासून थोडे आत हे मंदिर आहे. आधी साधे कौलारु मंदिर गावकरी आणि सह्याद्री प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त प्रयत्नाने आता कात टाकून नवीन झालय. पण मंदिर गावापासून एका बाजूला असल्याने एकांताचा फायदा घेउन काही अनिष्ट प्रवॄत्ती इथेही असल्याचे जाणवले. मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या आवारात पसरल्या होत्या. तुंग भटकंतीत रहायची वेळ आली तर पाच सहा जणाचा ग्रुप असेल तर हे मंदिर बेस्ट.
नाहीतर एखाद्या गावकर्याला विनंती करायची, तो पडवीत नक्कीचआसरा देतो. या गावातच गडाला खेटून भैरवनाथाचे मंदिर! तुंग वारीच्या मुक्कामासाठी सोयीचे! कौलारू छताच्या या मंदिराला मोठा सभामंडप. अंगणात ओळीने कुणा अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ तयार केलेले वीरगळ! गावच्या रक्षणासाठी वा अन्य लढाईत कोणी मरण पावल्यास त्याच्या स्मरणार्थ अखंड दगडात चबुतरे (स्मारक) तयार करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. याला ‘वीरगळ’ असे म्हणतात. इथे भैरवनाथाच्या मंदिरासमोर असे दहा-बारा वीरगळ आहेत. यातील एकाला स्थानिक लोक ‘तुळाजीराव’ असेही म्हणतात. या वीरगळांसोबत काही सतीचे हात असलेल्या शिळाही आहेत. वीर पुरुषाच्या मागे त्याची पत्नी सती गेल्यास तिच्या स्मरणार्थ ही सतीशिळा! असेच काही वीरगळ या भैरवनाथ मंदिराच्या मागे एका जुन्या वृक्षाच्या पायथ्याशीही आहेत .हे तुंगवाडी गाव म्हणजे गडाची हि एकेकाळची बाजारपेठ.
मारुती मंदिराजवळच किल्ल्याचा ईतिहास सांगणारा फलक सह्याद्रीप्रतिष्ठाणने लावला आहे.
तसेच सुचना देणाराही फलक आहे. खरेच वाहून घेउन हे लोक काम करीत आहेत.यांना काही मदत सोडाच पण आहे त्याची वाट लावण्याची नीच प्रवृत्ती हल्ली सह्याद्री परिसरात दिसतात. या हनुमान मंदिराजवळ एक मातीने बुजलेले पाण्याचे टाके आहे . तसेच मागे झाडीत अस्पष्ट झालेला पार्शियन शिलालेख आहे.
मारुतीचे दर्शन घेउन किल्ल्याकडे निघालो कि दगडात कोरलेली गुहा पहाण्यास मिळते.
यात हे मारुतीराया आहेत. बहुधा पहारेकर्यासाठी असावी. गडाचे प्राचीनत्व सांगणारी हि खूण.
यानंतर कातळ कोरीव पायर्या लागतात. पावसाळ्यात गेलो तर जपुन चढणे आवश्यक. जर पाणी वहात असेल आणि शेवाळ झाले असले तर चढणे अजून धोकादायक होते. वर आलो की वाट मागे वळते आणि पहिल्या दरवाज्याच्या दिशेने जाउ लागते.
या वाटेत कातळ कड्यात अजून एक गुंफा आहे.
पायर्यापासून वर आल्यानंतर डावीकडे वळण्याएवजी उजवीकडे थोडे अंतर चालले कि एक गुहा आणि पाण्याचे कोरीव टाके दिसते, मात्र पावसाळ्यात या वाटेला न जाणेच चांगले.
यानंतर हा पुर्वाभिमुख पहिला दरवाजा येतो.
या दरवाज्यातून बरोबर समोर तिकोना दिसतो.
आत गेले कि थोडी सपाटी आहे.एकूण ईतक्या खड्या कड्यावर ज्या पध्दतीने तटबंदी उभारली आजे ते पहाता गड बांधणार्या गवंड्यांचे कौतुक वाटते, कसे ईतक्या अडचणीच्या ठिकाणी उभारून त्यांनी बांधकाम केले हा प्रश्नच पडतो.
ईथे उभे राहिले कि खाली तुंग गाव व आपण पाहिलेले हनुमानाचे मंदिर दिसते.
या दरवाजा नंतर लगेच वाट डावी कडे वळून दुसर्या दरवाज्यात पोहचते.
इथे तट्बंदीवर एका दगडावर हनुमानाची मुर्ती कोरली आहे, पण काहीशी ओबड धोबड.
इथेच पहारेकरी बसण्याची जागा ,देवड्या आहेत.
या दरवाजाच्या वर उभारले कि गडावर येण्याचा पुर्ण मार्ग दृष्टीपथात येतो. त्यामुळे येणार्या जाणार्यावर लक्ष ठेवणे सहज शक्य होते.
यानंतर गडाच्या थोडक्या उपलब्ध सपाटीवर बांधलेल्या माचीवर आपण येतो.
या माचीवर एक चौथरा (बहुधा किल्लेदाराचे निवासस्थान किंवा सदर ),
गणपती मंदिर
आणि एक चौकोनी मोठे टाके पहाण्यास मिळते. या टाक्याचे पाणी सध्या खराब झाल्याने तुंग भटकंतीसाठी पाणी गावातूनच भरून घेतलेले चांगले.
या पुढचा भाग खड्या चढणीचा आहे. अक्षरश: सुळक्यासारख्या भागावर बालेकिल्ला आहे.
पहिली सपाटी आली कि पुन्हा दोन वाटा फुटतात. डावी वाट वळसा घालून बालेकिल्ल्याकडे जाते, तर उजव्या वाटेने थोडे पुढे गेल्यास कड्यात खोदलेले पाण्याचे टाके दिसते. २० x ३० चे हे मोठे खांब टाके गाळ व पालापाचोळा याने भरले आहे. इथे जाण्याची वाट मात्र डोळे फिरवते.
वळसा घालून सर्वोच्च माथ्यावर पोहचल्यावर काय दॄष्य दिसते म्हणून सांगु. समुद सपाटीपासून ३५८० फुट उंचीवर आपण उभे असतो.
पवना जलायशाच्या पाण्याने वेढलेला तुंग एखाद्या जलदुर्गासारखा भासतो. एखाद्या उंच कड्यावर बसून गरुडासारखे पुर्ण ३६० अंशातील दृष्य आपण पाहु शकतो.
खाली सपाटीवर मंहिद्रा क्लब रिसोर्टच्या ईमारती दिमाख दाखवीत असतात. (प्रकाशचित्र आंतरजालावरून)
तर अगदी समोरच एखाद्या पिरॅमिडसारखा तिकोना दिसत असतो.
उत्तरेला लोहगड, विसापुरची बलदंड जोडी एखाद्या मल्लांच्या जोडीसारखीच वाटते. रात्री ईथे मुक्काम केला तर पवनानगर चे दिवे आणी मुंबई-पुणे एक्प्रेस हायवेवर धावणार्या गाड्यांच्या दिव्याची लपाछपी पहाण्यास मिळू शकते.
तुंगचा माथा एखाद्या मोठया खोलीएवढाच जेमेतेम क्षेत्रफळाचा आहे.
पुर्व कोपर्यात गडमाता "तुंगाई" देवीचे मंदिर आहे. मंदिर जीर्ण अवस्थेत आहे.
जवळच ध्वजस्तंभ आहे. त्यावर भगवा डौलाने फडकत होता.
शेजारी तटबंदीत एक कोरीव टाके आहे.
त्याला तळाशी मोठे भगदाड पडले आहे. बहुधा एखाद्या युध्दात तोफगोळा लागून हे भगदाड पडले असावे. हे टाके दगडाच्या आतून कोरल्यामुळे वरचा थोडा भाग दगडाने बंदिस्त आहे, त्यामुळे काही जण त्याला धान्याचे कोठार मानतात. पण मला हे पटले नाही. एकतर गडावरच्या मोजक्याच ईमारती खाली माचीवर असताना फक्त धान्य इतक्या वर कशाला साठवतील? शिवाय या भागात पडणारा पाउअ आणी धुके विचारात घेता, इतक्या उंचावर आणि उघड्या कोठीत धान्य साठविले तर ते खराब होण्याचाच धोका. असो.
प्रख्यात साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो.नि.दांडेकर तथा आप्पा यांनी कर्नाळा, राजमाची, राजगड, जननीचा दुर्ग अशी किल्ल्यांची पार्श्वभुमीवर पुस्तके लिहीली आहेत. तुंगच्या पाश्र्वभुमीवर त्यांनी "पवनाकाठचा धोंडी" हि कांदबरी लिहीली, ज्याच्या पार्श्वभुमीवर त्याच नावचा चित्रपट निघाला, ज्या मधील उषा मंगेशकर यांनी गायलेले "काय बाई सांगु, कसं गं सांगु" हे गाणे लोकप्रिय झाले.
बालेकिल्ल्यावर मनसोक्त भिजून थोडावेळ थांबून आम्ही खाली निघालो. खाली उतरताना थेट कोसळणारी दरी भयाभया करीत होती. पण दिड दोन तासातच गडफेरी उरकून आम्ही तुंग गावात दाखल झालो.
आता मुख्य प्रश्न होता परत जायचे कसे एव्हाना दुपारचे चार वाजले होते. गावकर्यांनी परत जायला कोणतेही वाहन मिळणार नाही हे सांगून आशेवर पाणी फिरवले होते. एक मार्ग पुन्हा आठ कि.मी.ची तंगडतोड करुन घुसळखांब गाठायचे. मात्र तिथे जायचे तर सहा तरी वाजणार, म्हणजे लोणावळ्याला जायला गाडी मिळेलच याची शाश्वती नाही. पण अश्या अडचणीच्या वेळी अचानक कुठून तरी काहीतरी मदत मिळतेच याचा अनुभव पुन्हा आला. तुंगवाडीतले तिघेजण पंधरा ऑगस्ट निमीत्ताने गावी आले होते, ते त्यांच्या ओमनीतून पुण्याला परत निघाले होते. त्यांनी आम्हाला थेट पौड फाट्यापर्यंत लिफ्ट दिली आणि या झकास ट्रेकची तितकीच चांगली सांगता रात्री दुर्वांकुरच्या जेवणाने झाली.
संदर्भग्रंथः-
१ ) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!-प्र.के. घाणेकर
४ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
प्रतिक्रिया
4 Aug 2017 - 1:34 pm | कंजूस
जरा आडबाजुलाच असल्याने मला इकडे जाता आले नव्हते. या लेखाने आणि भरपूर फोटोंनी हौस पुरली.
4 Aug 2017 - 1:43 pm | अप्पा जोगळेकर
तुंग आणि पवन मावळ म्हटले की दांडेकरांचा धोंडीच आठवतो.
4 Aug 2017 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा
मस्तच फिरवून आणलत.
5 Aug 2017 - 12:43 am | एस
काय बदललाय हा परिसर! तुंगाच्या पायथ्याचे मंदिरही नवीन बांधलेय असे दिसतेय. त्या टोकाच्या पाण्याच्या टाक्यात उतरणे हा जबरदस्त अनुभव असतो. पुरुषभर खोलीचे आहे ते टाके. छान भटकंती.
5 Aug 2017 - 9:01 am | प्रचेतस
खूपच बदललाय हा परिसर. आदल्या दिवशी तिकोना करुन दुसर्या दिवशी सकाळी पवना धरणातील लाँचने तुंगवाडी गाठली होती. खूपच दुर्गम होता हा परिसर तेव्हा. तुंगच्या उभ्या धारेवरील खडी चढाई लै भारी आहे. दरवाजा तर अक्षरशः हवेत बांधल्यासारखा वाटतो. पायथ्याचे भैरवनाथाचे मंदिर खूपच छान आहे.
5 Aug 2017 - 8:08 pm | माम्लेदारचा पन्खा
मनाचे पर्यटन . . . . उत्तम पर्यटन . . .
काय सफर घडवलीत तुम्ही . . . धन्यवाद !
6 Aug 2017 - 3:06 pm | तेजस आठवले
काय मस्त फोटो आहेत. तुमचं खरंच कौतुक आहे.
राहवले नाही पण एखाद्या छोट्याश्या युरोपीय देशात हा एकच जरी किल्ला असता तरी त्या लोकांनी त्याची ऐतिहासिक(historical aspect ), स्थापत्य (structural tour ), साहसी आव्हान (adventure tourism ) अशा अनेक अंगानी प्रसिद्धी केली असती आणि पर्यटक खेचून आणले असते. आपण लोक ह्या बाबतीत कर्मदरिद्रीपणा अगदी उदारपणे करतो :(
6 Aug 2017 - 4:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मालक, कठीणगडावरील प्रवास वर्णन आणि छायाचित्रे आवडली.
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
9 Aug 2017 - 1:32 pm | दुर्गविहारी
सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. या आठवड्यात पुन्हा अनवट किल्ल्याचा सफरीवर जाउया, किल्ले कलानिधीगड
9 Aug 2017 - 7:32 pm | चौकटराजा
आमचीही एक आठवण .
लोहगडावरून 'तुंग ' असा दिसतो. फोटो - चौरा .
यात कोणते गड दिसताहेत ? मला तर यात प्रशांत तायडे हा एक बाळसेदार गड दिसत आहे व त्यामागे काळा टी शर्ट वाला आणखी एक बाळसेदार गड. पयचान कवण ?
फोटो - चौरा.
11 Aug 2017 - 3:10 pm | मनोज डी
अचूक माहिती अणि सुंदर फोटो