नाल….
आमच्या इंजिनिअरींग कॉलेजमधे आमच्या टोळीत एकाहून एक नवरत्न होती. त्यातील एक राजघराण्यातील रत्न म्हणजे राजे मालोजीराजे पवार. गंमत म्हणजे आम्ही होतो ही नऊ जण. आता हॉस्टेलवर काय काय चालते याबद्दल मी काही सांगायला नको आणि विशेषत: इंजिनीअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर. त्या काळात इंजिनिअरींगच्या मुलांना जरा अवास्तव महत्त्व मिळायचे ही वस्तुस्थिती आहे. त्यातून आमचे राजे म्हणजे राजघराण्यातील. त्या काळात साहेबांकडे निळाशार रंगाचा ब्लेझर इत्यादी.. कपडे असायचे. खाली पांढरी शुभ्र, कसल्या तरी सिल्कची पँट वर पांढरा, वर एकही ठिपका नसलेला पांढरा शर्ट, त्याची अत्यंत छोटी पण चांदीची बटणे, तसलीच कफलिंक्स. त्यातील एक मला त्याने कॉलेज सोडताना भेट म्हणून दिली होती. आजही ती माझ्याकडे आहेत. पण त्या चांदीच्या कफलिंक्सला मी नंतर सोन्याचे प्लेटींग करून घेतले. पण शेवटी चांदीवरील सोन्याचा असला तरी मुलामाच तो. कितीही मुलामा चढवला तरी मध्यमवर्गीय विचार आणि राजांच्या दिलदारीत फरक राहणारच. तसा तो आमच्या स्वभावातही राहिलाच. संध्याकाळी हे कपडे घालून राजे डोळ्यावर रेबनचा ॲव्हिएटरचा गॉगल चढवून बाहेर पडले की आम्ही समजायचो, आज कुठेतरी पार्टी असणार. फायद्याचा विचार करून दिलदारी दाखवणार आम्ही…
मालोजी राजे धारच्या कुठल्यातरी पातीचे एकुलते एक राजकुमार. एकत्र कुटुंब. चुलत्यांची आणि यांची मिळून बक्कळ जमीन, जमीनजुमला, दोन तीन वाडे. शेती म्हणजे दोन डोंगरांमधून पसरलेली. राजांनी ती कधी पूर्णपणे पाहिली असेल की नाही याची मला शंकाच आहे. राजे स्वभावाने दिलदार, मदतीस तत्पर. म्हणजे उसनी दिलदारी नव्हं बरं. म्हणजे कोणी मदत मागितली तर करायची आणि ती आयुष्यभर काढायची असला फालतूपणा राजांकडे नव्हता. अख्ख्या हॉस्टेलचा राजांच्या ब्लेझरवर अधिकार असायचा. सिनियर मुले तो हक्काने मुलाखतीसाठी घालायची. म्हणजे ते मागण्यास येत नसत तर राजेच त्यांना स्वत:हून देत असत. खरे तर त्यांच्या सगळ्याच कपड्यांवर त्यांनी मित्रमंडळींना अधिकार देऊन टाकला होता. कधी कधी मालोजीलाच घालायला कपडे उरायचे नाहीत मग तेव्हा स्वारी खोलीत स्वत:ला कोंडून घ्यायची. ही वेळ शेवटच्या वर्षाचा निकाल लागला की हमखास यायचीच. त्यावेळी दिलखुलास हसत त्यांचे हे वाक्य ठरलेले असायचेच. ‘‘अरे बामना, आमची लंगोटी तरी ठेवतील कारे आमची ही मंडळी. तू एक बामन आणि तो एक साठ्या, साल्यांनो तुम्ही जाम हट्टी.. काही घे म्हटले तरी घेणार नाही.’’ पण आम्ही अभिमानी म्हणून त्याच्याकडून काही घेत नाही याचे त्याला वैषम्य वाटत नसे पण आम्ही जे आहे त्यात भागवत असू याचे त्याला मनापासून वाईट वाटे.
‘‘अरे लेको, लागले तर घ्या ना पैसे. नंतर नोकर्या लागल्यावर द्या परत. मी कुठे तुम्हाला फ़ुकट वाटतोय ?” पण आम्हाला माहीत होते की ते पैसे तो परत घेणार नाही आणि म्हणून आम्ही त्याच्याकडून काही घ्यायचो नाही.
मालोजीरावांना ब्राह्मणांचा अत्यंत द्वेष वाटे पण त्यांना ब्राह्मणांचे भयंकर कौतुकही वाटे. ते तसे उघडपणे बोलूनही दाखवत. त्यांचा या बाबतीत वैचारिक गोंधळ भयंकर होता. पण त्याने आमच्या मैत्रीत कधी बाधा आली नाही. यामागचे कारण एकच, माणूस सरळ साधा व दिलदार होता. राजांचे इतिहासावर मनापासून प्रेम.
‘‘ चायला लाईन चुकलीच बरं का आमची. आम्ही खरं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करायचा.’’ तो म्हणे.
‘‘चला मालोजी, आता इतिहास घडवण्यापासून वाचण्यापर्यंत पाळी आली म्हणजे तुमच्यावर ’’ आम्ही त्याला चिडवत असू.
‘‘आता साल्याहो, इथे कसला इतिहास घडवू !’’
मालोजीराजे उखडायचे. कधी कधी वादाला कडवट वळण लागायचे पण मालोजीराजांमुळेच वाद मिटायचा हे सांगण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही. तो माणूसच तसा होता, उमदा. सडसडीत बांधा उंची जवळजवळ सहा फूट आणि त्या काळातील राजेराजवाड्यांचे खेळ तो खेळायचा म्हणजे क्रिकेट व टेनिस. खेळताना पाहत रहावे असे त्याचे एका हाताने मारलेले बॅकहँडचे फटके किंवा केसाची झुल्फे उडवीत गोलंदाजी करतानाची त्याची लकब भल्याभल्यांना घायाळ करून जायची. सगळी व्यसने करणे शक्य असूनही कुठलेही व्यसन नसलेला हा मुलगा काहीच काळात सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला नसेल तर नवलच. तीन वर्षे होत आली आणि आम्ही मध्यमवर्गीय मुलांनी त्याचा पूर्ण पराभव केला. म्हणजे हळूहळू तोही आता आठवड्यात एकच जिनची पँट घालू लागला. तीच पँट परत पुढच्याच महिन्यात धुण्यासाठी टाकायची. वरती कुठलातरी एखादा टी-शर्ट अडकवायचा आणि पायात स्लिपर्स सरकवून बाहेर पडायचे. आम्हाला वाटले आमच्यामुळे मालोजी बदलला. एक दिवस आम्ही गप्पा मारताना म्हटलेही,
‘ शेवटी ज्या समाजात आपण राहतो त्याची ताकद फार मोठी असते. मालोजीचेच पाहाना, त्याला आता कोणी घरात तरी घेईल का ?’’
‘‘ कोणाला बोंबलायला जायचंय घरी ?’’ मालोजी कडवटपणे म्हणाला. त्याचा असा स्वर आजतागायत आम्ही ऐकला नव्हता.
‘‘ का रे ! ’’ आम्ही विचारले.
‘‘ जाऊ दे रे ! ’’
त्याच्या खनपटीला बसल्यावर त्याने सगळे सांगितले. त्यातील त्याचा काही खाजगी भाग गाळून जेवढे लिहिता येईल तेवढे लिहितो. मालोजी राजांचे गावी एका मुलीवर प्रेम होते. मुलगी हुशार, दिसायला सुंदर, व ग्वाल्हेरला उच्चशिक्षण घेत होती. पण होती बिचारी खालच्या जातीतील. घरच्यांनी नेहमीप्रमाणे निर्वाणीचा इशारा दिला. पण मालोजीने ऐकले तर ते राजे कसले ? त्यांनी सगळे इशारे धुडकावून लावले व लग्न करेन तर हिच्याशीच इ. इ. नेहमीची टेप वाजवली. पण पुढे झाले ते वेगळेच झाले. मालोजीरावांची घरातून हकालपट्टी झाली व इस्टेटीच्या वाटणीतून नाव उडाले. घरच्यांनी व भाऊबंदांनी फसवले आमच्या मालोजीला. मालोजीनेही फक्त एकच अट घातली. माझे शिक्षण होऊ देत. शिक्षण झाल्यावर मला उचल म्हणून एक लाख रुपये द्यावेत, माझे संग्रहालय मला द्यावे, मी परत तुमचे तोंड पाहणार नाही. हे सगळ्यांना सहज मान्य होण्यासारखे होते. त्या जुन्या पुराण्या वस्तूत तसाही कोणाला रस नव्हताच. थोडक्यात एका वाटेकऱ्याचा काटा निघाला म्हणायचा. खरे तर मालोजीला कोर्ट कचेऱ्या सहज करता आल्या असत्या. पण त्याला विलायतेला जाण्याचे वेड लागले होते. (त्याचा पुढचा प्रवास मी अगदी जवळून पाहिलाय. तो आता अब्जाधीश आहे.) थोडक्यात काय आम्ही त्याचा पराभव केला नव्हता तर त्याच्या घरच्यांमुळे त्याच्यावर अशी परिस्थिती आली होती. अशाही परिस्थितीत या माणसाचा चेहरा कधी दुर्मुखलेला आम्ही पाहिला नाही. त्याच्या डोळ्यातून कधी पाणी तर येणे शक्यच नव्हते.
मालोजीला इतिहासाचे भयंकर वेड होते हे वर सांगितलेच आहे. आम्ही त्याची चेष्टाही करत असू,
‘‘ मालोजीराजे जर शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्ही काय केले असते रे?
त्याच्या जोडीला घराण्याचा भयंकर अभिमानही होता. थोडासा दुरभिमान होता म्हणा ना !. त्याच घराण्याने त्याला समजून न घेता घराबाहेर काढले हे त्याच्या मनाला लागले होते. अर्थात ते तो चेहर्यावर दिसू द्यायचा नाही ना त्याच्या बोलण्यात परत त्या गोष्टीचा कधीही उल्लेख झाला. पण या आमच्या मित्राच्या डोळ्यात एकदा पाणी तरळलेले पाहणे आमच्या नशिबी होते. प्रसंग विनोदी होता पण इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असणार्या आमच्या मालोजीराजांच्या ह्रदयाला घरे पाडून गेला.
शेवटची परीक्षा झाल्यावर आम्ही सगळ्यांनी कुठल्यातरी सहलीला जाण्याचे ठरवले. मालोजीचा आग्रह होता कुठल्यातरी किल्ल्यावर जाऊ. शेवटी नांदोसला जायचे व नंतर खालून कोकणातून रांगणा चढायचा असा बेत ठरला. एकत्र अशी ती आमची शेवटचीच सहल असणार होती. पुढे कोण कुठे जाईल हे त्या परमेश्र्वरालाच माहीत. थोडेसे भावूक होत आम्ही निघालो. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. नांदोसला पोहोचेपर्यंत पाऊस चांगलाच कोसळू लागला. रांगण्याला जाणे होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मालोजीने हार मानली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही रांगण्यासाठी घर सोडले. कट्ट्यावरून सायकली भाड्याने घेतल्या व निघालो.
थोड्याच वेळात पावसाने आम्हाला झोडपले. पावसाच्या तिरक्या रेषांनी एखाद्या कॅनव्हासवर शेडींग केल्या सारखे सगळे चित्र दिसू लागले. सायकल हाणता हाणता आमची पार दमछाक झाली. पूर्वीच्या गवळी सायकली त्या… नावच हर्क्युलस, ॲटलास, रॅले म्हणजे सगळ्यात भारी… सायकलीचे वजन खेचण्यातच माणसे बिचारी अर्धमेली व्हायची. त्यातच चेन मधे पँट अडकली नाहीतर देवाची कृपा… असो. मधेच पाऊस थांबायचा, वातावरण कुंद व्हायचे आणि ज्ञानेश्र्वरांनी भिंत चालवावी तसा वारा एकदम पावसाची भिंत चालवू लागायचा. विजांचा गडगडाट, वार्याचा घोंगावणारा आवाज याचा अनुभव घेत आम्ही रांगण्याच्या पायथ्याशी जे नारूर नावाचे गाव आहे तेथे पोहोचलो. तेथे तर वातावरण फारच भीतिदायक होते. गावात जाणार्या रस्त्यावरून ओढ्याचे पाणी वाहत होते व त्यातून तुटलेली झाडे, मेलेली जनावरे तरंगत होती. आमचा थरकाप उडाला पण तेथेच खाली असलेल्या एका टपरीत आम्ही शिरलो. त्यावेळी तेथे देऊळ नव्हते. एक छोटी मुर्ती उघड्यावरच ठेवलेली होती. टपरीच्या उबेत आम्ही शिरलो आणि जिवात जीव आला. जरा चौकशी करून कोणी वाटाड्या मिळतो का हे पाहिले. पोरगावकर म्हणाले,
‘‘ मिळेल पण तुम्हाला तास दोन तास थांबावे लागेल. माणसं कुठेतरी अडकली असतील येतीलच एवढ्यात.’’
‘‘ पण एवढ्या पावसात कोणी येणार का आम्हाला वाट दाखवायला ?
‘‘ अहो वरती पाऊस नसतो फक्त ढग. पाऊस इथे खाली.’’
‘‘ ठीक आहे मग आम्ही थांबतो.’’ मालोजी.
आता सगळे निश्चित झाल्यावर मग गप्पांना ऊत आला. चर्चा, वादविवाद सुरू झाले. मालोजीराजेंचे इतिहास प्रेम परत उफाळून आले. आमच्यात एक मुसलमान मित्रही होता. मालोजी नेहमी त्याच्या मागे लागायचा की तू परत हिंदू हो. नाहीतरी तुम्ही बाटलेलेच आहात. तो बिचारा नेहमी गप्प बसायचा व तो विषय हसण्यावारी न्यायचा. पण त्या दिवशी काय झाले होते कोणास ठाऊक. तो फटदिशी त्याला म्हणाला,
‘‘राजे ! उगंच बकवास नको. तुम्ही तुमची मुलगी देणार का माझ्या मुलाला ? बोला ! आहो मी जरी हिंदू झालो तरी तुम्ही आम्हाला अजून एका नवीन जातीत ढकलाल. ’मुसलमान विश्र्वकर्मी.’’
तो जातीने सुतार होता. मालोजी गप्प बसला तो बसलाच. मालोजीचा घराण्याचा इतिहास ऐकून झाला आणि त्या पोरगावकराचा मुलगा आला. घाईघाईने आम्ही जेवून निघालो. आणि खरच थोड्या उंचीवर गेल्यावर पावसाचा एक थेंबही नव्हत पण दाट धुके मात्र होते अर्थात त्याची काही आम्हाला विशेष काळजी नव्हती. वाटाड्याच्या पायाखालचा रस्ता होता. पण चढण दमछाक करणारी होती. किल्ल्याची उंची जवळजवळ ४५०० फूट असावी आणि आम्ही समुद्रसपाटीपासून चढत होतो. वर पोहोचल्यावर सगळ्यांनी शिवाजी महाराज की जय अशा आरोळ्या ठोकल्या. कुठलाही मराठी माणूस दमून भागून गडाच्या माथ्यावर पोहोचला की महाराजांचा जयजयकार करतोच.
गड हिंडता हिंडता दुपार केव्हा सरली ते कळलेच नाही, पोरगावकरांच्या मुलाने आता मात्र परतण्याची घाई करण्यास सुरुवात केली. सारखी आरतीची वेळ झाली असे त्याने पालुपद लावले होते. कसली असे विचारल्यावर म्हणाला ‘‘नालाची आरती. आम्हीही काही जास्त लक्ष दिले नाही. दमलो होतो व जाम भूक लागली होती. चटाचट पावले उचलत आम्ही पोरगावकरच्या पोराच्या आधी खाली पोहोचलो. पाऊस पूर्णपणे थांबला होता. तिन्हीसांजेला वृक्ष जास्त गडद दिसू लागले. मावळतीकडे आकाशात धुरकट ढगातून नारिंगी रंगाची लकेर दिसू लागली. खोपटात पोहोचलो तेव्हा आरतीची तयारी जय्यत सुरू होती. पोरगावकराचे हॉटेल एका पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती बांधलेले होते. त्याच बुंध्यावर एक लाकडी देवघर ठोकून बसवले होते व त्या देवघरात एक नाल ठोकला होता. त्याला फुले हार वाहिलेले दिसत होते. तेवढ्यात पोरगावकरांचे सगळे कुटुंबीय आरतीला जमा झाले. आरत्या नेहमीच्याच होत्या पण पूजा मात्र त्या घोड्याच्या नालाची होती. आम्हाला काही समजेना. सगळी पूजा व पोटपूजा उरकल्यावर आम्ही पोरगावकरांकडे हा विषय काढला.
‘‘ हंऽऽ त्याला फार मोठा इतिहास आहे पाव्हणं ! आम्ही मुळचे गारगोटीचे. आमचे सगळे पाव्हणे मंडळी वर देशावर असतात नव्ह का...हा घोड्याचा नाल आमच्याकडे वंशपरंपरागत चालत आला आहे. असे म्हणतात आमच्या पूर्वजांची आणि पहिल्या बाजीरावाची फार दोस्ती होती. उत्तरेत मोहिमेला जाण्याआधी बाजीराव येथे आले होते त्यावेळेस त्यांच्या घोड्याला नाल ठोकले तेव्हा हे जुने नाल आमच्या पूर्वजांनी जपून ठेवले. जे काही आहे ते रावसाहेबांचीच कृपा होती व आहे असे आम्ही मानतो. लोकं हसतात आम्हाला पण त्यो नाल आमचा जीव का प्राण आहे.’’
हे ऐकल्यावर मालोजी ताडकन उठला.
‘‘ पाटील आम्ही पण जे काही आहोत ते राऊसाहेबांमुळेच. आम्ही धारचे पवार.’’
मालोजीने असे म्हटल्यावर पाटलांनी मालोजीला मिठी मारली. त्या मिठीत आम्ही प्रथम त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. नंतर रात्री बर्याच गप्पा झाल्या. पहाटे कसेबसे उठून आम्ही निघण्याची तयारी केली. पाटलीणबाईंनी फक्कड चहा बनवला तो घेऊन आम्ही निघणार तेवढ्यात पाटील आले.
‘‘ राजे थांबा. ! तुमच्या सारखी माणसे आता कुठे परत भेटायला ! नाम्या ! काढ रे तो नाल आणि दे साहेबाला’’
‘‘ अहो काय करतायसा !’’ पाटलीणबाई.
‘‘ तू गप्प बस गं जरा ! कोण आहेत माहिते हाय का तुला ? नाही ना? मग जर गप राव्हा की !’’
तेवढ्यात नाम्याने नाल काढला व मस्तकाला लावला. आम्हाला वाटलं तो आता रडणार ! पण तेवढ्यात पाटलांनी तो नाल त्याच्या हातातून घेतला. खाली ठेवला व त्याला साष्टांग नमस्कार घातला.
‘‘ घ्या राजे आमच्या दिलाचा तुकडा तुम्हाला देतूय ! तुमच्याकडंच शोभल तो !’’
असे म्हणून त्यांनी मान फिरवली. आता राजे काय करतात याची आम्ही वाट पाहू लागलो. तो सगळा प्रकार पाहून मालोजीने पाटलांना मिठी मारली व दुसर्यांदा टिपे गाळली. खिशातून त्यांनी शंभराच्या दहा नोटा काढल्या व पाटलांच्या हातात कोंबल्या.
‘‘ आवो काय , काय करताय काय तुम्ही राजे? हीच किंमत केली काय आमची?’’
‘‘ असू दे पाटील ! आम्ही असे रिकाम्या हाताने नाही जाऊ शकत.’’
मालोजीराजेंचा घराण्याचा अभिमान जागा झाला. आम्हालाही साक्षात धारचे पवार बोलत आहेत असा भास झाला. वातावरण भारून गेले होते. पाटलांचा निरोप घेऊन आम्ही सायकली काढल्या व नांदोसचा रस्ता पकडला. रस्त्यात कोणी कोणाशी फारसे बोलत नव्हते. घडलेल्या प्रसंगाने सगळेजण बहुधा भारावून गेले होते. संध्याकाळी नितीनचे (ज्यांच्या घरी उतरलो होतो त्यांचे) दाजी आले.
‘‘ कशी काय झाली सायकलची ट्रीप ?’’
‘‘ दाजी मस्तच हो !’ काय गड का काय…. फारच भारी. आणि…’’ मालोजी
‘‘ मग काय नाल मिळाला की नाही?’’ दाजी हसत हसत म्हणाले. आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो.
‘‘ मी तुम्हाला कालच सांगणार होतो पण पोस्टातून यायला उशीर झाला ना मग तसाच घरी गेलो.’’
कोणाला काय बोलावे हेच कळेना. थोड्याच वेळात सगळे जण खो खो हसत सुटले. थोड्या वेळाने त्या हास्यस्फोटात मालोजीही सामील झाला. पण त्याचा चेहरा पडलेला दिसला. दुसऱ्याच दिवशी मालोजी दाजींना घेऊन स्पेशल रिक्षा करून नारूरला सकाळी सकाळी पोहोचला. हजार रुपये म्हणजे आमची वर्षाची वर्षांची फी होती त्या काळी. रविवार होता. किल्ल्याला जाण्यासाठी रग्गड गर्दी होती. हवा मस्त होती. झाडाच्या बुंध्याभोवती पंधराएक जण तरी जमले होते. मधे पाटील उभे राहून नालावर फुलांचा ढीग वाहत होते. जमलेले सगळे आदराने नालाचे दर्शन घेऊन माथा टेकवत होते. पैसे फुले वाहत होते. दाजींनी मालोजीला जरा थांबण्याची खूण केली….सगळी गर्दी ओसरल्यावर मालोजी तावातावाने पुढे आला व त्याने पाटलाला खडसावून विचारले,
‘‘ पाटील तुम्ही मला कालच नाल दिला ना? मग आता हा कुठला आला ?’’ माझे पैसे परत द्या.
‘‘ बसा राजे ! शांत व्हा ! वाईच च्या घ्या. राजे बाजीरावाच्या घोड्याला काय फकस्त योकच नाल मारला व्हता की काय ? आणि त्याच्याकडे काय फकस्त योकच घोडा होता ? माझ्याकडे बाजीरावाच्या घोड्याचे पेटी भर नाल पडले हायती. दावू का?’’
मालोजीच्या डोळ्यात त्यावेळी मला वाटते तिसर्यांदा अश्रू तरळले असणार…. दाजी काही बोलले नाहीत, पण मला खात्री आहे मालोजीला तो फसला म्हणून रडू आले नसणार.
पाटलांनी इतिहासाला इतक्या हीन पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले असणार….
लेखक : जयंत कुलकर्णी.
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. सत्य घटनेवर आधारित. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.
ता. क. दाजींनी नंतर नऊशे रुपये वसूल केले ते लिहिण्यास विसरलोच.
प्रतिक्रिया
11 Sep 2017 - 11:23 pm | एस
शेवट वाचून इतिहास असा विकायला काढणाऱ्या लोकांना पाहून विषण्ण वाटलंच नाही म्हटलं तरी. छान लिहिलंय.
12 Sep 2017 - 10:53 am | संजय पाटिल
+१११
11 Sep 2017 - 11:27 pm | पैसा
मस्त व्यक्तिचित्र आणि इतिहासाचा वापर करून घेण्याची आपल्या लोकांची हिणकस वृत्ती... हिला काय म्हणावे समजत नाही.
11 Sep 2017 - 11:39 pm | अमरेंद्र बाहुबली
हा हा हा! आवडली गोष्ट.
11 Sep 2017 - 11:54 pm | पिलीयन रायडर
मस्त लिहिलंय काका!
12 Sep 2017 - 12:32 am | शलभ
काका नेहमीप्रमाणे अप्रतिम..
12 Sep 2017 - 2:43 am | स्मिता.
नेहमीप्रमाणे सुंदर लेख पण शेवटचा प्रसंग अत्यंत हीन मनोवृत्ती दर्शवतो हे लिहील्यावाचून रहावले नाही.
12 Sep 2017 - 10:10 am | प्रीत-मोहर
+११११
12 Sep 2017 - 7:05 am | यशोधरा
मस्त लिहिलं आहेत.
12 Sep 2017 - 8:54 am | योगी९००
गोष्ट आवडली..छान वर्णन केले आहे. सुरूवातीला वाटले की खरोखर मालोजी म्हणून अस्तित्वात आहे.
अशीच एक गोष्ट मिपावर वाचली होती. त्यात लेखक कोठेतरी राजस्थानला जातो. एका कोठल्यातरी दुकानात पुराणवस्तू घेत असताना एका जुन्या पुराण्या खंजराची ऐतीहासीक कथा ऐकतो आणि भारावून जाऊन चढ्या भावाने तो खंजीर खरेदी करतो आणि फसला जातो...अशी कथा होती. त्याची आठवण आली.
12 Sep 2017 - 9:33 am | प्राची अश्विनी
:):)
12 Sep 2017 - 9:47 am | सुबोध खरे
फारच सुंदर
12 Sep 2017 - 10:44 am | सस्नेह
हा: हा : !
भारी किस्सा !
12 Sep 2017 - 11:12 am | ज्योति अळवणी
जबरदस्त व्यक्तिचित्र. आवडली कथा. पण असा इतिहासाचा वापर करून पैसे कमवणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीच वाईट वाटतं
12 Sep 2017 - 11:21 am | रघुनाथ.केरकर
नेहमिप्रमाणेच छान
12 Sep 2017 - 11:24 am | अभ्या..
जब्बरदस्त
12 Sep 2017 - 11:38 am | नि३सोलपुरकर
काकानु ,मस्त एकदम .
छान लिहिलेय .
12 Sep 2017 - 11:47 am | सतिश गावडे
दोनच महिन्यांपूर्वी कट्टा, नारुर आणि रांगण्याची कोकणातील बाजू यांना भेट दिल्याने तुमचा प्रवास नजरेसमोर उभा राहिला :)
12 Sep 2017 - 12:36 pm | कपिलमुनी
* आमच्या कोकणातील
असे हवे !
12 Sep 2017 - 3:37 pm | कपिलमुनी
पात्रे , वर्णन आणि फ्लो आवडला !
12 Sep 2017 - 3:38 pm | दीपक११७७
मस्त लिहिलंय काका!
12 Sep 2017 - 4:45 pm | रेवती
कथा आवडली.
12 Sep 2017 - 5:00 pm | सिरुसेरि
छान कथा . कथेतील विचार समर्पक आहेत .
12 Sep 2017 - 5:57 pm | गामा पैलवान
पैसाताई,
मलाही काय म्हणावं ते कळंत नाही. पण ही मेकॉलेछाप शिक्षणामुळे उत्पन्न झालीये हे नक्की.
आ.न.,
-गा.पै.
12 Sep 2017 - 9:15 pm | सतिश गावडे
पण मेकॉलेछाप शिक्षण घेणे आता अपरिहार्य झाले आहे. आता तुम्हीच स्वतःच बघा ना, मेकॉलेछाप शिक्षण घेऊन मेकॉलेच्याच देशात मेकॉलेच्याच देशबांधवांची गुलामी करत आहात. तीच गत इतर भारतीयांची.
असो. जे झाले ते झाले. आता तो युरोके आणि पौंडक्यांचा (चिंचोके आणि दिडक्या सारखे) मोह सोडा, भारतात परत या आणि पुन्हा एकदा गुरुकुल शिक्षण पद्धत पुनरुज्जीवित करा. देशाला तुमची गरज आहे.
13 Sep 2017 - 2:09 am | गामा पैलवान
हे सतिशवत्सा,
मेकॉलेछाप शिक्षणाचा छाप पुसण्यासाठी त्याच्या निर्मितीस्थानी जाऊन कठोर साधना करावी लागते हे तुजला अद्यापि ठाऊक नाही वाटते. अरे, खोलवर उमटलेल्या संस्कारांचे ठसे पुसून काढण्यासाठी तितकाच वेळ देणे आवश्यक नाही काय? तू हल्ली फार घाई करावयास लागला आहेस. म्हातारा होत चाललास की काय? यथोचित औषध सत्वर घे पाहू. बघ तुझ्या दृष्टीस एक वैश्विक परिमाण लाभेल आणि तुला तुझ्या प्रश्नांची आपोआप उत्तरे मिळू लागतील. मग तुझी मेधा प्रगल्भ व भारदस्त होऊन ती पौंडक्या आणि दिडक्या वगैरे अपरिपक्व निष्कर्षांवर धांदरटासारख्या उड्या मारणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
13 Sep 2017 - 8:16 am | सतिश गावडे
तुमचे पितळ उघडे पडल्यामुळे तुमचा ट्रोल मोड ऑन झाला.
असो. या चांगल्या धाग्यावर अधिक अवांतर नको.
12 Sep 2017 - 6:34 pm | बाजीप्रभू
मस्त लिहिलं आहे... मजा आली शेवट वाचतांना..
12 Sep 2017 - 7:44 pm | रमेश आठवले
रोचक लेख , शेवटी छान कलाटणी .
12 Sep 2017 - 7:51 pm | अजया
अतिशय सुरेख व्यक्तिचित्रं रेखाटले आहे.
13 Sep 2017 - 4:07 am | इडली डोसा
मालोजीचे व्यक्तिचित्र छान उभे केले आहे.
13 Sep 2017 - 9:17 am | मंजूताई
मस्त व्यक्तिचित्र आणि इतिहासाचा वापर करून घेण्याची आपल्या लोकांची हिणकस वृत्ती... हिला काय म्हणावे समजत नाही.>>>> +१
13 Sep 2017 - 9:34 am | सुनील
कथा मस्त!
अवांतर - कुठल्याशा म्युझियममध्ये, कुठल्याशा राजाच्या म्हणे दोन कवट्या आहेत - एक लहानपणची आणि दुसरी मोठेपणची!
13 Sep 2017 - 11:09 pm | सांरा
असावा
13 Sep 2017 - 10:09 am | अद्द्या
तेवढीच लायकी राहिलीय तशीही आपल्या लोकांची, इतिहास विकणे
मस्त लिहिलंय.
13 Sep 2017 - 12:21 pm | नाखु
भारीच
वाचलेला नाखु
13 Sep 2017 - 12:48 pm | गामा पैलवान
वत्सा,
मलाही तुझ्याबद्दल अगदी हेच म्हणावंसं वाटतं. भारताच्या हितास क्षुद्र मानणारी शिक्षणपद्धती आहे हे तर तू देखील मान्य करशील. मग माझ्या पौंडक्या कशास बरे काढिल्यास?
मी केलं तर ते ट्रोलिंग नाही, पण तू केलंस तर ते ट्रोलिंग आहे. लक्षात घे, I am holier than thou!
तु.न.,
-गा.पै.
23 Sep 2017 - 6:23 am | सोमनाथ खांदवे
अवांतर थांबवल्या बद्दल आभारी हाये , पुलाव खाताना मदिच कच लागत व्हती . हलक घ्या ही इणांति हाये .
13 Sep 2017 - 1:11 pm | Naval
खूप ओघवतं वर्णन ! शेवट एकदम अनपेक्षित होता. तीर्थक्षेत्रांना गेल्यावरही वस्तूंचा असा बाजार पाहून फार किळस येते. हॉस्टेलमधलं वातावरण एकदम फक्कड उतरलंय .
13 Sep 2017 - 1:42 pm | चांदणे संदीप
जयंतकाका,
कथा आवडली ती तुमच्या लिहिण्याच्या आणि खुलवण्याच्या हातोटीमुळे.
Sandy
13 Sep 2017 - 2:56 pm | कोंबडी प्रेमी
फार पूर्वी गजरा कार्यक्रमात हे असे एक कथानक होते ते आठवले ...खेडे -परदेशी पाहुणे-एतिहासिक तलवार- मिनतवारी ने विक्री - पाहुणे गेल्यावर तो गाववाला बायकोला सांगतो आग नवीन ढाल तलवार लाऊन ठेव ...
13 Sep 2017 - 3:45 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
13 Sep 2017 - 11:11 pm | सांरा
मालोजी खरा कि खोटा ?
14 Sep 2017 - 2:20 am | विशाखा राऊत
भारी आहे
14 Sep 2017 - 5:55 pm | दुर्गविहारी
जबरदस्त व्यकिचित्रण, मालोजींना पाठवून द्या या कथेची लिंक.
बाकी मी हि रांगणा नारुरमधूनच चढलो होतो, मि.पा. वर लिहीलेलेच आहे. बाकी त्या गावामधे झालेल्या संभाषणात कोकणी हेल हवा होता असे वाटते. काहीसा पु.ल.च्या अंतु बर्वासारखा.
हे वाक्य जास्त खटकेल.
14 Sep 2017 - 7:34 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
तुम्ही, नाहीतर कोणीतरी हे कोकणी भाषेत किंवा तसा हेल काढून कसे म्हटले असते हे इथे लिहिलेत तर मी जरूर दुरुस्त करेन
:-)
14 Sep 2017 - 7:35 pm | सूड
मलाही तेच वाटलं, कोकणात ही घाटवळणाची हेल कुठून आली. पण म्हटलं आधीच भाषानाझी म्हणून शिक्का लागलाय, आता परत कशाला!! =))
पण कथा नुसती उघडली ती शेवटपर्यंत वाचून काढली.
15 Sep 2017 - 8:06 am | जयंत कुलकर्णी
किल्ला घाटावरचा आहे. वर गारगोटी येते. ताराबाईंचा या किल्ल्यावर वावर असे. त्यांनी नेमलेला किल्लेदार देशावरचा असणे शक्य आहे. शिवाय ही मंडळी बाजारहाट करायला वरच जात असत. तेव्हा तेच परवडत असायचे...त्यामुळे कदाचित त्यांची भाषा देशावरची असावी..... त्यामुळे जे आहे ते तसेच ठेवायचे ठरवले आहे.....
:-)
15 Sep 2017 - 10:49 am | दुर्गविहारी
किल्ल्याला घाटावरून जाण्यासाठी वाट असली तरी कोकणातून जवलपास चार वाटा वर चढतात.बाजारहाट करण्यासाठी हि मंडळी वर जात? ते सुध्दा कुडाळसारखी बाजारपेठ ईतकी जवळ असताना?
हि मी लिहीलेल्या रांगणा किल्ल्याचा घाग्याची लिंक
अनवट किल्ले १२ : स्वराज्याची कोयरी, रांगणा उर्फ प्रसिध्दगड
या सर्व परिसरावर तलकोकणच्या बोलीचा प्रभाव आहे. ईतकेच काय वर गारगोटी, चंदगड, आजरा परिसरावरही कोकणची बोली जाणवते. अगदी पाटगावमधेही आम्ही कोकणचे लोक असे आहोत, हे बोलताना एकलयं.
अर्थात तुम्ही प्रत्यक्ष गेल्यानंतर जर कथेत लिहीलेलीच बोलण्याची शैली एकलेली असेल तर मग काहीच आक्षेप घेण्यासारखे नाही. पण जे मला वाटले ते सांगितले. नवखा लेखक असता तर कदाचित ईग्नोर मारले असते, पण तुमच्यासारख्या सिध्दहस्त लेखकाकडून अपेक्षा उंचावतात, यासाठीच नमुद केले.
बाकी कोल्हापुर आणि सध्या सातारा जिल्ह्यात वास्तव्य असल्याने मी तरी वरच्या संवादाचे तळकोकण शैलीत रुपांतर करु शकणार नाही. त्या परिसरातील कोणी असल्यास हे शक्य आहे.
15 Sep 2017 - 10:59 am | जयंत कुलकर्णी
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मी स्वतः त्या भागात बराच हिंडलेलो आहे. आजकाल त्या भागात मराठीत कोकणी हेल विशेष आढळत नाही हे खरं... आजही कित्येक किल्ल्याखालील लोक वर येणे पसंत करतात... कारण त्यांनाच माहीत.. पण बहुधा देशावर माल स्वस्त मिळत असावा... मी प्रत्यक्षात काहीही ऐकलेले नाही पण त्या भागातील लोकांना मात्र रग्गड ऐकलंय..
आणि मी काही एवढा मोठा लेखक नाही त्यामुळे इग्नोर मारले तरी हरकत नाही.... :-)
15 Sep 2017 - 12:23 pm | पगला गजोधर
हे पहा भाऊ लेखकाला निर्मिती स्वातंत्रामधे बेनेफिट ऑफ डाउट दिला गेला पाहिजे.
लेखक व्यक्त होतो त्याच्या कथेमधून..
उदा काही लेखक एखादी १-२ ओळींची आयडिया /कल्पना /विनोद घेऊन,
आपल्या कल्पनाविस्ताराच्या प्रतिभेवर कथा कादंबरी लिहितात...
हायपोथेटिकली समजा कोणत्याही लेखकाला एखादा विनोद वाचनात आलेला किंवा ऐकण्यात आलेला असेल, आणि तो त्यांना खूप भावाला असेल तर ...
लेखक काय करेल ? कथाबीज त्या विनोदा भोवती पेरेल ... विविध पात्रे, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी , भाषा , मोटिव्हेशन , आस्था वैगरे स्व कल्पनेने
रचेल .... आणि मस्त संवाद वैगरे चा आपल्या जीवनातील एकूण इंटरॅक्शन वरून तडका देईल. आता या सर्व बाबींची सर्जनशीलता वैगरे सांभाळताना कदाचित काही बाबी निसटलया जातही असतील ही कदाचित ... पण वर उल्लेखल्या प्रमाणे आपण (वाचकांनी)मलेखकाला बेनेफिट ऑफ डाउट दिला पाहिजे.
जाता जाता यांचीच एक जुनी कथा मिपावर मी वाचली होती ... कदाचित ती ठग व त्यांची अन्युअल जेनेरल मिटिंग अशी काहीशी होती ....
ती कथा वाचताना मला ती, एखाद्या अमेरिकन माफिया फॅमिलीज व त्यांची अन्युअल जेनेरल मिटिंग, अशी पार्श्वभूमी असलेली एखादी इंग्रजी कथेच्या
धाटणीची वाटलेली .... पण मला वाटली तशीच लेखकाला किंवा इतरांना वाटलीच असेल असे गृहीत धरले नाही. असो ...
(माझी ही प्रतिक्रियेवरील प्रतिक्रिया कृ ह घ्या )
15 Sep 2017 - 1:35 pm | दुर्गविहारी
हे व्यक्तिचित्र काल्पनिक नसावे असे
या वाक्यावरून वाटले म्हणून मला यात जे खटकले ते सुचविले. लेखकाला स्वातंत्र्य हवे हे तुमचे मत योग्यच आहे. पण खरंच घडलेली कथा असेल तर वर्णन सत्याच्या जवळ जाणारे असावे असे वाटले. जसा पु.ल.नी अंतु बर्वा रंगवताना तो रत्नागिरीचा हेल अचुक पकडला आहे किंवा रावसाहेब वाचताना नकळत आपण बेळगावात पोहचतो ते त्या भाषेची शैली अचुक पकडल्यानेच. असो.
15 Sep 2017 - 2:43 pm | सूड
सहमत आहे, मध्यंतरी 'घो मला असला हवा' हा राधिका आपटेचा चित्रपट पाह्यला. सगळं कथानक कोकणातलं असताना संवादात कोकणातल्या भाषाशैलीचा लवलेश नव्हता. एक ज्योती सुभाष आणि नायिकेच्या आजीचं पात्र सोडता बाकी झाडून सगळे कुठलीतरी वेगळीच बोली बोलत होते.
तोच प्रकार माजो लवतांय डावा डोळा हे सई टेंबेकर ने युट्युब वर पुन्हा गायलेल्या गाण्याच्या बाबतीत. ती डावा डोला म्हणत होती. आता त्या बाईला एवढं कळेना मालवणी किंवा कोकणीत ळ बोलतात. बाणकोटीत तो नसतो.
15 Sep 2017 - 3:48 pm | जयंत कुलकर्णी
श्री. दुर्गविहारी, श्री. सूड,
आपण कोणाची तुलना कोणाशी करताय ? ? आम्ही आपले वेळ जात नाही म्हणून लिहिणारी माणसे. द्या सोडून... परत अशी चूक करणार नाही.
शिवाय //सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. सत्य घटनेवर आधारित. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.///// आपण हे लेखाच्या शेवटी असलेले वाक्य वाचलेले दिसत नाही.
असो. परत एकदा आपल्या सर्वांची माफी मागून रजा घेतो... अर्थात या शेवटच्या वाक्यातही काही चूक असेल तर मात्र कळवा. लगेच दुरुस्त करून घेतो.
आपला,
जयंत कुलकर्णी.
15 Sep 2017 - 5:55 pm | दुर्गविहारी
तुम्ही दुखावले गेले असल्यास मनापासून क्षमा मागतो. मी आपल्या लेखनाचा अगदी वाचनमात्र असल्यापासून चाहता आहे म्हणून ईतकीही चुक राहू नये असे वाटले म्हणून लिहीले.
बाकी जाता जाता ईतकेच म्हणतो कि आपण शतकाची अपेक्षा सचिनकडून करतो, व्यंकटेश प्रसादकडून नाही. तुमच्यासारखी चार वाक्येही लिहायला आम्हाला जमणार नाहीत याचीही खात्री आहेच. पु.ले.शु.
15 Sep 2017 - 2:56 pm | पगला गजोधर
असू द्या न दुर्गविहारीजी ...
घटना सत्य असली तरी पात्र योजना सामाजिक पार्श्वभूमी लेखाकांच्या मनाजोगती असावी,
तुम्हाआम्हासारख्या वाचकांना काय, कथापात्र "मालोजी" असो वा "मंबाजी देहूकर", कथा लक्षपूर्वक रसग्रहण केली पाहिजे.
लेखकाचा कथेमागचा "कॅनव्हास" फार मोठा असावा, त्यामुळे आपल्याला हवे तसें रंग कथाचित्रात भरताना, अनावधानाने
शुल्लक त्रुटी राहुनही गेल्या असतील कदाचित ... एवढाच मला नम्रपणे नमूद करायचे होते .....
14 Sep 2017 - 7:38 pm | जयंत कुलकर्णी
यातील पाटलांचे, दाजींचे व जेवढी कोणी कोकणी पात्रे आहेत त्यांचे संभाषण कोणी लिहून दिले तर बरं होईल.
14 Sep 2017 - 10:02 pm | रमेश आठवले
मालोजीरावांनी खोट्या ऐतिहासिक नालेसाठी १००० रुपये काढून दिले यावरून - नालेसाठी घोडा विकत घेतला - या म्हणीची आठवण झाली.
14 Sep 2017 - 11:50 pm | स्वाती दिनेश
गोष्ट आवडली.
स्वाती
15 Sep 2017 - 10:50 am | दुर्गविहारी
अर्ध शतका निमीत्त जयंत कुलकर्णी यांचे नालेसकट घोडा देउन अभिनंदन करण्यात येत आहे. ( हा घोडा बाकी सध्याचाच आहे, बाजीरावचा नाही याची नोंद घेण्यात यावी).
15 Sep 2017 - 11:05 am | वरुण मोहिते
काही माणसे आठवली , कशावरून तरी सेम संदर्भ आठवले . एकंदरीत लेख आवडला हे वेगळे सांगायला नको .
15 Sep 2017 - 11:57 am | चिर्कुट
कथा आवडली. शेवट अनपेक्षित. :)
15 Sep 2017 - 4:25 pm | संत घोडेकर
+१
17 Sep 2017 - 6:14 pm | भ ट क्या खे ड वा ला
आवडला
18 Sep 2017 - 4:58 pm | अभिजीत अवलिया
कथा आवडली.
19 Sep 2017 - 9:13 pm | Abheeshek
nehami pramane rangat ali pan shevat dukhad hota
20 Sep 2017 - 4:33 pm | Duishen
तुमचे लिखाण आवडले. छान खुसखुशीत आहे. गंभीर गोष्ट पण विनोदाच्या पद्धतीने छान मांडले आहे.
20 Sep 2017 - 5:19 pm | arunjoshi123
मस्त कथा.
20 Sep 2017 - 10:01 pm | रुपी
मस्त कथा!
23 Sep 2017 - 5:09 pm | गम्मत-जम्मत
कुणाच्या तरी भावनांशी असा क्रूर खेळ का करायचा ना!! :(