आपण स्वप्न का बघतो.

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
19 Jul 2017 - 10:16 pm

फार पुरातन काळा पासून माणसं त्यांना पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आलेत. स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत, पूर्व सूचना मिळतात असे मानले जाते. माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांचे रूप घेऊन येतात किंवा ईश्वर बऱ्याचदा आपल्या भक्तांशी संवाद साधायला स्वप्न एक माध्यम म्हणून वापरतो असेही मानले जाते. अनेक कवी, लेखक, नाटककार, चित्रकार आदींना त्यांच्या कलाकृती साकार करण्याची प्रेरणा स्वप्नातून मिळाल्याचे सांगितले आहे. रामानुजम हा प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ असे मानत असे कि जेव्हा त्याला गणितातील एखादा प्रश्न/ प्रमेय सुटत नसे तेव्हा त्याच्या स्वप्नात त्याची कुलदेवता-नम्मागिरी देवी येऊन त्याला उत्तर सांगत असे. असे म्हणतात कि फ्रेडरिक केकुल ह्या जर्मन शास्त्रज्ञाला स्वप्नात बेन्झीन च्या रेणूची रचना कशी असेल त्याचे उत्तर मिळाले. अशा अनेक कथा आख्यायिकांमुळे स्वप्न आणि त्यांच्या दुनिये भोवती गुढतेचे आवरण तयार झाले.
असे असले तरी स्वप्नांचा अभ्यास म्हणजे शास्त्रीय अभ्यास पूर्वी कुणी केला असल्याचा फारसा पुरावा नाही.स्वप्नांचा शास्त्रीय किंवा मानस शास्त्रीय अभ्यास २०व्य शतकातच सुरु झाला. स्वप्नांच्या अभ्यासाला ओनायारोलॉजि असे नाव आहे. (Oneirology- हा ग्रीक शब्द आहे oneiron म्हणजे स्वप्न तर logia म्हणजे अभ्यास- स्वप्नांचा अभ्यास) १९५२ साली शिकागो युनिवार्सिटीच्या शास्त्रज्ञांना माणसाच्या झोपेचा अभ्यास करताना एक विचित्र गोष्ट आढळली. तेव्हा मानवी इंद्रियांचे विद्युत आलेखन करण्याचे तंत्र नुकतेच विकसित झाले होते. त्याप्रमाणे त्यांनी मेंदूचे निरनिराळी कामे करताना विद्युत आलेख काढायला चालू केले.असेच प्रयोग करताना त्यांनी माणूस झोपलेला असताना त्याच्या मेंदूचा विद्युत आलेख काढला असताना त्यात त्यांना हे सापडले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
ह्या आलेखात ज्या लाल रंगाच्या आलेख रेषा आहेत त्यात साधारण दर तासा नंतर मेंदूत काहीतरी प्रक्रिया होत असल्याचे दिसून आले. जेव्हा झोपलेल्या व्यक्तीला बरोबर ह्याच वेळी उठवून विचारले गेले तेव्हा सर्वांनी आपण तेव्हा स्वप्न बघत असल्याचे सांगितले. शिवाय ह्याच वेळी झोपलेल्या माणसाच्या बुब्बुळांची झपाट्याने हालचाल होत असल्याचे हि आढळून आले. ह्यालाच REM Sleep ( Rapid Eye Movement) असे संबोधले जाते. म्हणजे माणूस झोपेत असला आणि त्याचे डोळे मिटले असले तरी एखाद्या जागृतावास्थेतल्या माणसाप्रमाणे त्याच्या डोळ्यांच्या बुब्बुळांची झपाट्याने हालचाल होते. रेम झोपेच्या काळातील मेंदूच्या विद्युत आलेखाचा आणि जागृतावास्थेतल्या मेंदूच्या विद्युत आलेखाचा तौलनिक अभ्यास केला असता, दोन्ही अगदी सारखे आढळले. म्हणजे रेम झोपेत माणूस किंवा त्याचा मेंदू तांत्रिक दृष्ट्या जागाच असतो फक्त जागृतावस्थेत मेंदू नोरेपिनाफ़्राइन ,सेराटोनीन, आणि हिस्टमीन ह्या संप्रेरकांचे उत्पादन करीत असतो, ते उत्पादन ह्या झोपेच्या काळात पूर्ण पणे बंद असते. हि सम्प्रेरकं स्नायूच्या हालचालीला कारणी भूत असतात.त्यामुळे स्वप्नात तुम्ही काहीही करत असलात, उदा. चालणे,पळणे, पोहणे, पडणे अगदी हवेत उडत असलात तरी शरीर शांतच असते. पण हे निरोगी निद्रा ज्यांना येते त्यांच्या बाबतीत होते. ज्यांचा मेंदू झोपेत देखिल काही प्रमाणात वरील संप्रेरकांचे उत्पादन करतच राहतो ते लोक मात्र झोपेत चालणे, हात पाय हवेत उडवणे, बरळणे ओरडणे अशा गोष्टी करतात. असे बऱ्याचदा आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत होते फक्त ज्या लोकांमध्ये ह्या संप्रेरकांचे उत्पादन निद्रावास्थेतही होत राहण्याची समस्या असते त्यांच्या बाबतीत हे जास्त प्रमाणात होते.त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी ते चिडचिडे, थकलेले, एकाग्रपणे काम न करू शकणारे होतात.काही लोकांत ह्याच्या उलटीच समस्या हि होते म्हणजे त्यांना झोपेतून अचानक जाग येते. ते टक्क जागे होतात पण मेंदूत नोरेपिनाफ़्राइन ,सेराटोनीन, आणि हिस्तामीन ह्या संप्रेरकांचे उत्पादन अजून सुरु न झाल्याने ते हालचाल करू शकत नाहीत. आपल्या पैकी अनेकांना हाही अनुभव आलेला असतो कधी कधी.अशावेळी आपण जागे हि असतो आणि स्वप्नही बघत असतो त्यामुळे आपण त्यावेळी निर्णयही घेतो म्हणजे मी समजा स्वप्नात गणिताचा पेपर सोडवत असेल तर चक्क ते गणित सोडवतो( उदाहरण द्यायला देखिल चांगले स्वप्न सांगू शकत नाही ना, काय करणार?) किंवा चहा पीत असेल तर उठून चहाचा कप उचलतो वगैरे. ह्याप्रकारच्या स्वप्नाच्या अवस्थेला लुसिड ड्रीमिंग असे म्हणतात.
रेम निद्रा निकोप मेंदूसाठी फार महत्वाची असते. काही उंदरांवर प्रयोग करताना त्यांना ( हो! उंदीरहि स्वप्न बघतात – सर्वसाधारण सर्व प्राणी ज्यांना मेंदू आहे ते स्वप्न बघतात) हि रेम निद्रा येणार नाही अशी व्यवस्था केली गेली. म्हणजे काय केले तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यावर उंदराला बसायला अगदी छोटी जागा दिली गेली. म्हणजे जागा असताना उंदीर त्यावर व्यवस्थित बसेल पण तो गाढ झोपला तर त्याचा स्नायुन्वरचा ताबा सुटून, तोल जाऊन लगेच पाण्यात पडेल आणि जागा होऊन त्याची झोप मोडेल. म्हणजे तो छोटी डूलकी घेऊ शकेल पण रेम निद्रावस्थेत प्रवेश करू लागला कि मात्र पाण्यात पडेल.ह्या प्रयोगातून असे लक्षात आले कि अशा प्रकारे रेम निद्र घेऊ न शकलेल्या उंदरांची निर्णय क्षमता अगदी कमी झाली. अनेक रात्री असे झाल्यावर तर त्यांना साधे सरळ चालायचे, अन्नाचा तुकडा व्यवस्थित पुढच्या दोन पायात पकडून खायचे, अशा सध्या गोष्टीही जमेनात.त्यांची स्मरणशक्ती हि अतिशय कमी झाली आणि नवीन गोष्टी शिकणे. लक्षात ठेवणे त्यांना अधिकाधिक अवघड जाऊ लागल्याचे दिसून आले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हि गम्मत इथे थांबत नाही. पुढे माणसांवर केलेल्या प्रयोगात शास्त्रज्ञांनी काय केले कि ज्यांच्यावर प्रयोग चालू आहेत त्या माणसांना झोपायच्या आधी एखादी नवीन किंवा क्लिष्ट गोष्ट शिकवली, एखादे सोल्लिड अवघड कोडे सोडवायला दिले आणि त्यावेळी त्यांच्या मेंदूचा आलेख काढला आणि तो नंतर ते झोपले असताना त्यांच्या रेम झोपेत काढलेल्या विद्युत आलेखाशी पडताळून पहिला तर दोन्ही अगदी तंतोतंत जुळले. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो कि जी गोष्ट ते जागेपणी शिकले होते त्याचीच उजळणी मेंदू रेम निद्रेत करत होता.पण सकाळी उठल्यावर त्याना स्वप्न काय बघितले असे विचारल्यावर त्यांना काही ते स्वप्न आठवले नाही. पण झोपेच्या आधी शिकलेली ती गोष्ट किंवा अवघड कोडे सोडवण्याची पद्धत बऱ्यापैकी किंवा संपूर्ण आठवली. म्हणजे हे काम त्यांचा sub conscious मेंदू करत होता तर. एवढेच नाही तर ज्या लोकांना अश्या नव्या गोष्टी शिकवल्या पण व्यवस्थित झोप किंवा रेम निद्रा घेऊ दिली गेली नाही त्यांना मात्र शिकलेल्या गोष्टी आठवणे फार अवघड होत होते. बर्याच प्रकरणात तर त्यांना ते आठवलेच नाही.
ह्याचा अर्थ असा होतो कि आपण दिवसभरात बऱ्याच गोष्टी करतो, शिकतो, त्यातल्या कितीतरी गोष्टी निरर्थक किंवा निरुपयोगी असतात. दिवसभरात असंख्य गोष्टींचा अगदी ढीगच आपल्या मेंदूत तयार झालेला असतो. रेम निद्रेत आपला मेंदू ह्या ढिगातून हव्या असलेल्या गोष्टींची स्मृती जपून ठेवतो आणि नको असलेल्या गोष्टी फेकून देतो.कुठल्याही गोष्टीचे ज्ञान आपल्याला ५ मार्गांनी होते . रूप, ध्वनी, स्पर्श, चव, गंध हे ते ५ घटक. आता हि माहिती गोळा करणारी ज्ञानेंद्रिये म्हणजे डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा ह्यांच्या कडून आलेली माहिती मेंदूच्या त्या त्या ज्ञानेन्द्रीयाच्या विभागात जाते.( तात्पुरती स्मृती) मग रेम निद्रेत असताना मेंदू हि सगळी माहिती एक एक करून काढून तिची दुसऱ्या विभागातल्या संबंधित माहितीशी सांगड घालतो आणि त्याची पक्की स्मृती करतो. हे मेंदूचे काम चालू असताना मेंदूच्या निरनिराळ्या भागातून स्मृतीचा नुसता ओघ वाहत असतो, बाजारात जसा प्रचंड गोंधळ, गोंगाट असतो पण तरी प्रत्येक जण त्याला ज्या माणसाशी संपर्क साधायचा असतो त्याच्याशी अगदी व्यवस्थित संपर्क साधत असतो तसाच. (अर्थात कधी कधी हे करताना घोळ हि होतो. म्हणजे उदा.एखादे आवडीचे गाणे ऐकताना किंवा पाहताना स्वयपाकघरातून आईने दिलेल्या खमंग फोडणीचा वास घमघमतो आणि नंतर अनेक वर्षांनी परत अचानक ते गाणे ऐकले कि नाकात तो वासही दरवळू लागतो, खरेतर ह्या वासाचा त्या गाण्याशी काही संबंध नसतो पण हा घोळ रेम निद्रेत आपल्या मेंदूकडून झालेला असतो.) थोडक्यात मोठी धमाल चाललेली असते मेंदूत त्यावेळी. ह्या सगळ्याचा साईड इफेक्ट म्हणून आपण स्वप्न बघतो असे शास्त्रज्ञ म्हणतात. अर्थात ह्याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे, स्वप्न आणि झोपच नाही तर मेंदूच्या कार्यासंबंधी नवी नवी माहिती समोर येत आहे, आपल्या मेंदूचे अनेक पैलू अजून उजेडात यायचे बाकी आहेत पण एक नक्की, सध्यातरी जी माहिती समोर येतेय त्यात स्वप्नांचा आणि भविष्य दर्शनाचा काही संबंध नसतो. जी उदाहरणे दिली जातात, त्यांना योगायोगच म्हणावे लागेल.
काही मानस शास्त्रज्ञांचा अजून एक दृष्टीकोन सांगणे इथे अगदीच अप्रस्तुत होणार नाही, आपण जी स्वप्न बघतो ती भविष्यात काय घडणार हे हे जरी सांगत नसली तरी आपल्याला ती भविष्यात येऊ शकणार्या प्रसंगांना सामोरे जाण्याकरता तयार करत असतात. अगदी उदाहरण द्यायाचे झाले तर गणिताचा आपण अभ्यास केलेला नसतो, आणि आपल्याला अंतर्मनात ते आपल्याला माहिती असते म्हणून मग रात्री गणिताचा पेपर आपण देत आहोत आणि आपल्याला एकही गणित सोडवता येत नाही असे स्वप्न पडते, आपण खडबडून जागे होतो, आणि गणिताचा अभ्यास करून संभाव्य अपयश टाळतो आणि नाही जरी टाळले तरी आपल्याला असे वाटत राहते कि देवाने आपल्याला स्वप्नात तशी सूचना दिली होती. आता हि थेअरी अगदीच चूक नाहीये, आपल्या शरीरात होणाऱ्या निरनिराळ्या बदलांशीही स्वप्नांचा संबंध असतो. मुलगा/ मुलगी वयात येताना त्यांना पडणारी स्वप्न वेगळी असतात तर दीर्घ व्याधीनी त्रस्त माणसांना पडणारी स्वप्न ही वेगळी असतात. माणूस आदिम अवस्थेत असताना असुरक्षितता आणि अनिश्चितता हा त्यांच्या आयुष्याचा स्थायीभावच होता ( खरेतर आजही आहेच ) त्यामुळे मेंदू भविष्यात येऊ समोर शकणाऱ्या अनिश्चीत अशा शक्यतांच्या प्रसंगांची मालिका तयार करून आपल्या नकळत त्यांना तोंड द्यायची आपली मानसिक तयारी स्वप्नांच्या माध्यमातून करून घेत असतो असेही काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ते काय असेल ते असो पण विशिष्ट प्रकारचीच स्वप्न पाहणे किंवा न पाहणे आपल्या खरेतर हातात (मेंदूत) नाहीये. तेव्हा पडलेली स्वप्न enjoy करणे हेच आपल्या हातात आहे. तेच करूयात .
म्हणून स्वप्न बघत रहा, स्वप्नांची मजा घेत रहा..
आता स्वप्नांबद्दल एव्हढे लिहिल्यावर DeJaVu ह्या प्रकाराबद्दल काही लिहिणे क्रमप्राप्त आहे.
काही जणांना हा दे-जा-वू काय प्रकार आहे हे माहिती नसेल. म्हणजे अनुभव बहुतांश सगळ्यांना असतो फक्त त्याला दे-जा-वू म्हणतात हे माहिती नसते. तर ह्यात होतं काय, कि एखादी घटना, अगदी साधी सुधी घटना घडताना आपण पाहत असतो आणि अचानक असं आठवायला लागतं कि हे सगळं पूर्वी कधी तरी घडलय, पूर्वी म्हणजे नक्की कधी? ते सांगता येत नाही पण असं पूर्वी नक्की कधीतरी घडलय असे वाटत राहते. अनेकांना तर हे पूर्वजन्माताल्या स्मृती जागृत झाल्याचेच लक्षण वाटते. पण आता ह्यावर मेंदूवर झालेल्या संशोधानातून काही प्रकाश पडू लागला आहे. तर होतं असं कि, आपले डोळे जे काही पाहत असतात त्या माहितीचे पृथक्करण आपल्या मेंदूच्या मागील भागात(एक्सिपेटल लोब) होत असते. थोडक्यात जवळपास अक्खा मेंदू ओलांडून हि माहिती तिथे जाते. पण डोळ्यांच्या अगदी जवळ आपण पाहिलेल्या दृश्यांची प्राथमिक छाननी करणारा विभाग-टेकटम असतो. तसा तो प्रत्येक ज्ञानेन्द्रीयाला असतो. ह्या विभागाचे महत्वाचे काम माहितीचे प्राथमिक पृथक्करण करून वरकरणी अनावश्यक वाटणारा भाग गाळूनच माहिती पुढे पाठवणे. हे अत्यंत महत्वचे अशा करता असते कि प्रतिक्षिप्त क्रिया घडताना, त्या त्या ज्ञानेन्द्रीयाच्या मूळ विभागात ती माहिती पोहोचून तिचा अर्थ लागून काही कृती होई पर्यंत उशीर झालेला असू शकतो. उदा. डोळ्याच्या दिशेने पेन किंवा तत्सम टोकदार वस्तू वेगाने येत असेल तर ह्या दृश्याचा मुख्य केंद्रात पोहोचून अर्थ लागे पर्यंत आणि डोळे मिटले किंवा मान वळली जायची क्रिया घडे पर्यंत इजा होऊन गेलेली असेल. दुसरे म्हणजे अशी गाळणी लागल्याने त्या ज्ञानेन्द्रीयाला करावी लागणारी अनावश्यक भाग वगळण्याची उठाठेव वाचते. म्हणजे हे वाचताना मी तुम्हाला विचारले कि तुम्हाला घड्याळाची टीक टीक ऐकू येत आहे का? तर हा प्रश्न विचारल्या बरोबर तुम्हाला ती ऐकू येऊ लागली असेल. (अर्थात बाजूला घड्याळ असेल तर.) ती टिक टिक तुमच्या कानावर मघापासून पडतच होती पण ती माहिती अनावश्यक असल्याने प्राथमिक केंद्रातच गाळली जात होती.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
असो तर असे प्राथमिक पृथक्करण होऊन ती माहिती मग मुख्य केंद्राकडे जाते पण कधी कधी काय होते!, इकडे प्राथमिक केंद्रात माहितीचे पृथक्करण चालू असतानाच त्या महितीची एक प्रत मुख्य केंद्रात तशीच पाठवली जाते आणि थोड्यावेळानंतर ह्या प्राथमिक केंद्रातून संस्कारित झालेली माहिती जाते, आता मुख्य केंद्र गडबडते, म्हणजे समजा तुम्ही कुणाला तरी झाडावर चढताना पाहत असता. हि माहिती चुकून आधीच मुख्य केंद्राकडे जाते आणि नंतर प्राथमिक केंद्रातून आलेली माहिती पोहचायला लागते , मग मेंदूला जाणीव होते, अरे! हे दृश्य नवीन नाही. आधीच आपण हे,अगदी असेच घडताना पाहिलंय कि! हाच प्रकार म्हणजे दे-जा-वू . तेव्हा दे-जा-वू म्हणजे पूर्वाजान्माताल्या घटना आठवण्याचा कोणताही प्रकार नाही. तर फक्त मेंदू मधला गडबड घोटाळा आहे. काही लोकांना जर काही कारणाने मेंदूतील एक्सिपेटल लोब ह्या मुख्य भागाला इजा होऊन अंधत्व आले असेल ( म्हणजे डोळे चांगले आहेत पण मेंदूत बिघाड झालाय) तर दिसत काही नाही पण त्यांना अडथळ्यांची जाणीव होते, अगदी चेहरे ओळखतं नाही आले तरी चेहेऱ्यावरचे भाव कळतात तरी ते म्हणतात कि त्यांना दिसत काहीही नाही ह्याला अंध् दृष्य (BlindSight) असे नाव आहे.
दे-जा-वू च्या काहीसा उलट असा एक प्रकार आहे “प्रेस्के वू” म्हणजे अगदी ओठावर आहे हो पण आठवत नाही! एखाद्या नेहमीच्या व्यक्ती किंवा घटनेचे घटनेचे नाव, नेहमी आठवणाऱ्या गाण्याचे शब्द अगदी तोंडावर असतात पण सापडत नाहीत, डोकच आउट होतं. होते काय कि हि स्मृती आपल्या मेंदूतून बाहेर काढली जाते आणि नेहमी प्रमाणे तिचे पृथक्करण करून ती मेंदूकडे येत असते त्यावेळी बाकीच्या अनावश्यक अशा ज्या बाबी गाळल्या जातात त्यात आपल्याला हवी असलेली माहिती पण असते त्यामुळे काही केल्या फक्त तेव्हढेच आठवत नाही बाकीची अक्खी दुनिया आठवते. गम्मत म्हणजे कधी कधी हा प्रकार संसर्गजन्यही होतो. दोघे चौघे गप्पा मारताना विषय निघतो आणि एखाद्या गायकाच्या गाण्याचे शब्द काहीकेल्या कुणालाच आठवत नाही. हे खूप खूप कॉमन आहे. आहे ना! हि सगळी आपल्या मेंदूची मजा आहे. .
---आदित्य

विज्ञानमाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

19 Jul 2017 - 11:52 pm | ज्योति अळवणी

खूपच चांगली माहिती दिली आहात. स्वप्न आणि त्यावरून होणाऱ्या चर्चा त्याचे काढलेले अर्थ यामुळे हा विषय गूढ आणि तरीही रम्य वाटतो

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 12:13 am | सौन्दर्य

खप छान विश्लेषण. माझ्या मनात काही प्रश्न आहेत, लवकरच ते विचारीन.

अनुप ढेरे's picture

20 Jul 2017 - 10:49 am | अनुप ढेरे

मस्तं!

उत्तरा's picture

20 Jul 2017 - 10:53 am | उत्तरा

खुप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत. खासकरुन दे-जा-वू...
मस्तच माहिती....

अभ्या..'s picture

20 Jul 2017 - 11:26 am | अभ्या..

मला हा धागा आधी कुठेतरी वाचल्यासारखा वाटतोय. ;)
मस्त लिहिलेय हे मात्र खरं.

पैसा's picture

20 Jul 2017 - 12:53 pm | पैसा

लेख आवडला

पिशी अबोली's picture

20 Jul 2017 - 12:57 pm | पिशी अबोली

छान माहिती. शास्त्रीय माहितीही खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे.

मला प्रत्येक परीक्षेच्या वेळी ज्या पेपरकडून सगळ्यात अपेक्षा असतात, त्याची परीक्षा चुकली, किंवा मी फेल झाले असं स्वप्न न चुकता पडतं. आणि अंधश्रद्धा म्हणा हवं तर, पण या अशा स्वप्न पडलेल्या पेपरमध्ये नेहमी सगळ्यात चांगले गुण मिळतात. याची मी लावलेली संगती अशी, की त्या पेपरकडून भरमसाठ अपेक्षा असल्याने त्यात काही गडबड झाली तर काय, अशी भीतीही असते. आणि ती भीती कदाचित स्वप्नात रिफ्लेक्ट होत असावी..

रामपुरी's picture

20 Jul 2017 - 9:30 pm | रामपुरी

"ह्या सगळ्याचा साईड इफेक्ट म्हणून आपण स्वप्न बघतो असे शास्त्रज्ञ म्हणतात"
नुकतेच जन्मलेले मूल सुद्धा स्वप्न बघत असते. नुकतेच म्हणजे अगदि काही तासांचे. ज्या मेंदूने अजून काहिही पाहिलेले नाही, कसलाही अनुभव घेतलेला नाही असा मेंदू काय स्वप्न बघत असेल? कसला विचार करत असेल?

आईच्या पोटात असताना अनुभवलेले आवाज व इतर गोष्टी याचा काहीतरी संबंध असावा.

हे अगदी खरे आहे ... READERS DIGEST मधील खूप पूर्वी वाचलेल्या लेखानुसार याच्या पुढचे सत्य हे आहे की गर्भावस्थेत देखील सात महिन्याच्या पुढील गर्भाला स्वप्ने पडतात. अनेकदा ही स्वप्ने स्तनपानाची असतात, ज्या गर्भाला स्तनपान अद्याप माहित नसते....

गामा पैलवान's picture

22 Jul 2017 - 11:05 pm | गामा पैलवान

रामपुरी,

ती स्वप्नं पूर्वजन्मांची असू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2017 - 2:21 pm | अभिजीत अवलिया

चांगले लिहिलेय.
मला एक प्रश्न आहे. मला इंजिनीअरिंग पूर्ण करून १० वर्षे झाली. तरी देखील अजून इंजिनीअरिंग संदर्भात भयानक स्वप्ने पडतात. म्हणजे मी अ विषयाच्या पेपरला गेलोय आणि कळले की पेपर ब विषयाचा होता. किंवा परीक्षा २ दिवसावर आलीय आणि अजून मी एकही विषयाचा अभ्यासच केलेला नाही. अशी स्वप्ने पाहून मी मध्यरात्री झोपेतून उठून बसलेलो आहे. पण अशी स्वप्ने शाळेतल्या विषयांबद्दल पडत नाहीत. इंजिनीअरिंग पूर्ण करून १० वर्षे होऊन गेल्यावरही अशी स्वप्ने का पडत असावीत ?

स्मिता.'s picture

23 Jul 2017 - 2:23 am | स्मिता.

असंच माझ्यासोबतही होतं. एवढ्या वर्षांनंतरही अशी स्वप्न पडून मनावर ताण येतो. मुख्य म्हणजे परीक्षा देतांना उत्तरं येत नाही असं स्वप्न एकदाही नाही, दरवेळी केवळ आधीचाच ताण!!

मनीं वसे ते स्वप्नी दिसे...
असे म्हटले जाते. मला स्वतःला अनेकदा माझे सोडून गेलेले वडील, आई आणि अगदी अलीकडे सोडून गेलेला धाकटा भाऊ स्वप्नात दिसतात. स्वप्नात कुठच्या तरी प्रसंगी आम्ही भेटत , गप्पा मारत किंवा काही हास्य विनोद करत असतो. याचा कार्यकारणभाव मी शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु काही धागा मिळत नाही. मात्र सकाळी उठवल्यावर FRESH/ आनंदी नक्की वाटते....