कोणतीही गोष्ट पहिली, ऐकली, वाचली, जाणवली कि त्यावर विचार करून मनात उमटलेली प्रतिक्रिया इतरांसमोर मांडणे ही एक नैसर्गिक गरज असावी, मग ती समोरच्याला रुचणारी असो अथवा नसो पण तरी ती इतरांबरोबर share करणं मला तरी आवडतं. त्यावरची इतरांची मतंही माहिती होतात, विचारांच्या नवीन वाटा मिळतात म्हणून खरंतर हे सगळं असं लिहिण्याचा हा खटाटोप. पुस्तक परिचय लिहिण्याचा माझा हा पहिलाच अनुभव... !
पुस्तक परिचय : वनवास
फुलपाखरू जसं इकडून तिकडं सतत भिरभिरतं, वेगवेगळ्या फुलांपाशी उडत राहतं, तसं मनात चालू असलेल्या वेगवेगळ्या विचारांभोवती एका पौगंडावस्थेतील मुलाच्या कोवळ्या, नाजूक मनाचं भिरभिरणं प्रकाश नारायण संत यांनी तितक्याच ओघवत्या, सहज पद्धतीनं मांडलेलं वाचणं अतिशय आनंददायी वाटलं. काही गोष्टींशी त्या वयात जडलेलं किंवा आपणच असंच जोडलेलं एक आपलं आपलंच नातं, मग ते काही असो, झाडाचा पार, घराचं फाटक, खोलीची खिडकी, अंथरूण, वह्या पुस्तकं काहीही... त्या वयात अशा साऱ्या बद्दल वाटणारा अव्यक्त जिव्हाळा शब्दात बांधण्याचं लेखकाचं कसब याला तोड नाही. वाचताना सारे प्रसंग, चित्र अगदी डोळ्यांसमोर दिसायला लागतात. बालपणीचा निरागस, अल्लड वेडेपणा आणि तारुण्याच्या उबंरठ्यावर येऊ घातलेला कोवळा समंजस बाणेदारपणा या दोन्हीच्या मध्ये असणारी ही चंचल, मधाळ अवस्था वेगवेगळ्या प्रसंगातून शब्दात उतरवत वाचणाऱ्याला मोहून टाकते. अगदी साध्या, थोड्याशा अबोल, शांत अशा किशोरवयीन मुलाच्या मनाची त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी यांच्या सहवासात वावरताना होत असलेली कधी आनंदी, तर कधी दुखी तर कधी स्वतःलाच पार अबोध अशी अवस्था तितकीच ओघवती मांडली आहे. त्याच्या अबोल, बंद अशा ओठांमागं दडलेलं त्या संवेदनशील वयातलं त्याचं गोड़ भावविश्व् उलगडत जाताना वाचणारा प्रत्येक जण त्यात कुठेतरी स्वतःला नक्की दिसायला लागेल इतकी सहजता त्यांच्या लिखाणात आहे. क्षणात हसरं कि लगेच साध्याशा गोष्टीनं खट्टू होणारं निरागस मन, ज्याला तात्विक प्रौढत्वाचं मिसुरडं अजून फ़ुटायचंय आणि म्हणूनच ते खूप लाघवी आहे अशा सुंदर विश्वाची कधी काळी आपणही अनुभवलेली सफर लंपनच्या भावविश्वात शोधण्याचा कयास म्हणजे वाचनीय वनवास.
पुस्तक परिचय : शारदा संगीत
लंपनच्या किशोरवयीन भावविश्वाशी जोडलेल्या प्रसंगांना एका वेगळ्या शैलीत बांधत प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या पाच दीर्घ कथा वनवास नंतरच्या 'शारदा संगीत' या त्यांच्या पुढच्या कथासंग्रहात आहेत.
वनवास मध्ये लंपनच्या व्यक्तिरेखेत वाचक स्वतःच्या भूतकाळात हरवून स्वतःलाच त्यात कुठेतरी सापडत जातो. त्यातून मग तयार होत गेलेली लंपन बद्दलची प्रतिमा या पुढच्या 'शारदा संगीत' मध्ये वेगवेगळी वळणं घेत प्रत्येक कथेत हळू हळू विस्तारत जाते, प्रगल्भ होत जाते आणि वाचताना आपल्याला एकवीस वेळा मॅड करून सोडते...!
कोणताही प्रसंग पाहिल्यावर, अनुभवल्यावर त्यावर लगेच कोणासमोर व्यक्त होण्याआधी मधल्या काही सेकंदात आपल्या मनात आपण स्वतःशी जो अशाब्दिक संवाद करत असतो, तो शब्दांत, चपखल रूपकात बांधलेला वाचताना आपल्या खूप जवळचा वाटायला लागतो. ओघावत्या शैलीत मांडलेल्या त्या संवेदना वाचकाला मोहून टाकतात. त्यामुळंच पुस्तकात लंपनचा एकोणीसशे वेळा येणारा 'मॅड' हा शब्द या आधी कधीच इतका गोड वाटला नव्हता.
वाचनाबाबत तितकी जाण मला लंपनच्या वयाची असताना नव्हती. खरंतर त्या वयात ही पुस्तकं हाती पडायला हवी होती म्हणजे त्यावेळी कोऱ्या मनात तयार होऊ घातलेल्या कल्पनांची रोपं ती मॅड समजून मुळं धरण्याआधी स्वतःच उपटून टाकली नसती.
'वनवास' नंतरचा हा पुढचा अनेक पुरस्कार मिळालेला पाच दीर्घ कथांचा प्रकाश नारायण संत यांचा 'शारदा संगीत' कथासंग्रह, हा लंपनच्या त्याच्या आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ या कुटुंबाव्यतिरिक्त घराबाहेरील जगात कोऱ्या मनाने वावरताना, त्यात उमटत जाणारे भाव, नाजूक संवेदना आणि याची त्याला होत जाणारी हळुवार जाणीव हे सारंच वाचकाला मोहून टाकतं आणि तिथल्या भाषेची सुंदर ढब चाखत, स्वतःच्या भावविश्वात रमण्याचे काही सुखद क्षण नक्कीच देतं.
आभाळ भरून आल्यावर कसं कधी कधी खूप सुंदर वाटतं, मन आनंदानं हलकं, रितं झाल्यासारखं वाटतं, तसं काहीसं हे पुस्तक वाचून संपल्यावर वाटलं. रमण्याचा आनंद तर मिळालाच पण भिजण्याचं सुखंही अजून हवंय ही जाणीवही उत्कट वाटली. कदाचित लेखकाची हीच शैली 'पंखा' हा त्यांचा यानंतरचा पुढचा कथासंग्रह हाती घ्यायला भाग पाडतीये...!
पुस्तक परिचय : पंखा
बरीच वादावादी घालून लेक finally शांत झोपली होती. नेहमीपेक्षा जरा उशिराच. आईला आपल्या बाळाचं असं झोपलं असतानाचं निरागस रूप खूप जास्त भावतं. ती जागी असताना आपल्याशी वाद घालतानाचा तिचा तो आवेश, तिचंच कसं बरोबर आहे हे सांगण्याची तिची धडपड, तिचं म्हणणं आपल्याला पटवून देण्याची तिची उतावीळता, मग आपलं तिच्यावर जरा चिडूनच ओरडणं, या सगळ्यात तिचे बदलणारे चेहऱ्यावरचे भाव, घड्याळाच्या काट्याशी तिचं न जुळणारं गणित सोडवण्याचा आपला आटापिटा, त्यावरून नेहमीच होणारी चिडचिड, गोंधळ हे आणि असे बरेच त्राग्याचे, घाईचे, उलघालीचे, काळजीचे, घाबरण्याचे असे दिवसभरात येणारे वेगवेगळे प्रसंग हे असं तिचं झोपलेलं निरागस रूप बघताना आठवतात आणि मग अगदी कासावीस व्हायला होतं.
नऊ वर्षाची नाजूक, कोवळं मन असलेली माझी लेक, मनात हजार गोष्टीबद्दलचे प्रश्न, शंका, कुतूहल बाळगत मोघम अनुभवावर तयार करत असलेली तिची अगदी ठाम मतं, नावीन्याचं भलतं आकर्षण, वाचनावर आधारित तिच्या मनात नाचणाऱ्या कल्पना आणि त्याचा रोजच्या जगण्याशी जोडलेला भन्नाट ताळमेळ, या अशा चहू बाजूनी सळसळत असणाऱ्या तिच्या सगळ्या जाणिवा, संवेदना या अशा शांत वेळी तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडे बघून जास्त बोलक्या वाटतात. सध्या वाचत असलेलं प्रकाश नारायण संत यांच्या 'पंखा' या पुस्तकात लंपनच्या भावविश्वात हरवताना मला माझ्या लेकीच्या भावविश्वाची पुन्हा नव्यानं जाणीव होत गेली हे नक्की. तिच्याशी निगडित गोष्टींकडे माझ्यापेक्षा तिच्या दृष्टिकोनातून बघण्याचं तंत्र मी गेले काही दिवस विसरले होते, याचं भान मला हे पुस्तक वाचताना झालं.
आधीच्या वनवास आणि शारदा संगीत या नंतर क्रमशः येणारी ही पुढची कादंबरी 'पंखा'. अकरा छोट्या कथांमध्ये गुंफलेलं लेखकाच्या वेगळ्याच शैलीत मांडलेलं लंपनचं कोवळं भावविश्व् आधीच्या दोनही पुस्तकांप्रमाणेच वाचणाऱ्याला बांधून ठेवतं. साधेपणा भावणं हा तो किती सहज आणि सुंदर पद्धतीने समोर येतो त्यावर अवलंबून, पुस्तक वाचताना हे सारखं जाणवत राहतं. शांत, समंजस पण येत जाणाऱ्या अनुभवातून जे काही वाटतं त्याबद्दल मात्र अनभिज्ञ असणारा लंपनचा कोवळा साधेपणा वाचताना खूप भावतॊ. पुस्तकातल्या गोष्टींबद्दल इथे लिहून त्यातलं औत्सुक्य घालवणं मला पटत नसल्यानं मी ते इथे टाळलेलं आहे. केवळ इतकच म्हणता येईल कि, आधीच्या पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात, मनाची संवेदना, त्यावर आधारित स्वभाव वैशिष्टये आणि त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन ओघवत्या शैलीत मांडत लेखकानं लंपन बरोबरच इतरही व्यक्तिचित्रे खूप सुरेख पद्धतीने उभी केली आहेत. त्यामुळं त्यातल्या गोष्टी वाचणाऱ्याला त्याच्या भूतकाळात रमायला मदत करतात आणि वाचन आनंददायी करतात हे नक्की.
यानंतरचे झुंबर हे चौथे पुस्तक सध्या लगेच वाचणं शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळं त्या बद्दल लिहिलेले नाही.
---- अश्विनी वैद्य
१९.७.१७
प्रतिक्रिया
19 Jul 2017 - 9:11 am | हर्मायनी
असंच कधीतरी शारदा संगीत हाती पडलं. आणि झपाटल्यासारखी बाकीची पुस्तकही वाचून काढली. लंपनचं कथानक लेखकाच्या व्यक्तिगत आयुष्याशी बरंचसं मिळतं जुळतं.. त्यामुळेच कि काय त्यात खरेपणा आहे.
20 Jul 2017 - 3:43 am | अश्विनी वैद्य
अगदी खरंय... त्यात खरेपणा आहेच आणि ते लिहिण्याची शैली फार सुंदर वाटते वाचायला.
19 Jul 2017 - 9:23 am | वैनिल
लंपनच्या भावविश्वात तो आपल्याला अलगद ओढूनच नेतो. त्या कथा एकोणीसशे पंच्याहत्तर वेळा वाचल्या तरी प्रत्येक वेळेला मॅड करतातच.
19 Jul 2017 - 9:38 am | पिशी अबोली
मस्तच लिहिलंय..
20 Jul 2017 - 3:44 am | अश्विनी वैद्य
धन्यवाद पिशी अबोली
19 Jul 2017 - 12:22 pm | मितान
लंपन खूप लाडका आहे आमचा :)
चांगला पुस्तक परिचय !
19 Jul 2017 - 12:54 pm | सानझरी
+१.. असेच म्हणते..
19 Jul 2017 - 1:10 pm | दुर्गविहारी
मलाही या लंपन कथा खुप आवडतात. प्रकाश नारायण संताचे घर माझ्या घरापासून केवळ पंधरा मिनीटांवर आहे त्यामुळे त्यांच्याशी एकदा यावर गप्पाही मारता आल्या. त्यांच्या सौ. नी लिहीलेले "अमलताश" ही वाचा.
20 Jul 2017 - 3:47 am | अश्विनी वैद्य
अरे वाह... हे किती छान. आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबद्दल त्या लेखकाशी बोलता यावं... खूपच नशीबवान आहेत. 'अमलताश' मिळवून नक्कीच वाचेन.
19 Jul 2017 - 1:38 pm | पद्मावति
वाह! उत्तम परिचय.
19 Jul 2017 - 1:51 pm | एस
सुरेख परिचय.
19 Jul 2017 - 10:05 pm | मनिमौ
हजार सातशे चौतीस वेळा जरी वाचल्या तरी सगळ्या गोष्टी ताज्या टवटवीत वाटतात.
20 Jul 2017 - 3:50 am | अश्विनी वैद्य
धन्यवाद पद्मावती, एस. खरंय मनिमौ...!
20 Jul 2017 - 10:50 am | पैसा
छान लिहिलं आहे
20 Jul 2017 - 11:15 am | पैसा
छान लिहिलं आहे