मदत हवी आहे - बाल्कनीतील शेती (फोटोंसह)

मोदक's picture
मोदक in कृषी
2 Jun 2017 - 12:20 am

नमस्कार मंडळी,

शहरातील फ्लॅटला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये मिपाकरांनी शेतीचे प्रयोग केले आहेत का..? केले असल्यास आपले अनुभव कृपया या धाग्यावर द्या.

**** माझा अनुभव ****

फ्लॅटला जोडून दोन मोठी टेरेस मिळाल्याने.. चाफा, भरपूर प्रकारचे गुलाब, तगर, मोगरा, अनंत, जुई, पारिजातक, तीन प्रकारची आबोली, शेवंती वगैरे वगैरे वेगवेगळी फुलझाडे.. तुळस, कोरफड, कोथिंबीर, पुदीना, ओवा, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, गवती चहा आणि ऑलस्पाईस वगैरे झाडे लावली. मोठ्या आकाराच्या कुंड्या आणून त्यामध्ये पपई, लिंबू अशी झाडेही लावली. नीट जोपासना केल्याने ही झाडे अपेक्षेनुसार वाढत आहेत आणि उपयोगात येत आहेत.

नंतर टेरेसमधील एका भिंतीच्या आधाराने भोपळा, काकडी, दोडका, कारले, घोसावळे, पडवळ, दुधी, श्रावणघेवडा, साधा घेवडा, तूर, चवळी, मूग असे वेलही चढवले.

- या सर्व झाडांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या मातीच्या कुंड्या वापरल्या.
- कुंडी विकणार्‍याकडे असते तीच माती वापरली.
- खत म्हणून सोसायटीने केलेले कंपोस्ट खत आणि एक प्रकारचे शेणखत वापरले
- कुंड्यांमध्ये मातीसोबत कोकोपिट वापरले.
- पाणी नियमीतपणे घातले जाते.
- झाडांना आणि वेलांना भरपूर ऊन मिळते.
- दुकानातून आणलेले बियाणे वापरले.

तर मला मदत पुढील बाबींमध्ये हवी आहे.

१) फुलझाडे आणि इतर झाडे नीट वाढत आहेत मात्र वेल एका सायकल नंतर मरून जातात. म्हणजे बियाणांपासून वेल तयार होतो, फुले आणि बर्‍यापैकी शेंगा लागतात. त्या शेंगा काढण्याची वेळ आली की वेलच मरून जातो. म्हणजे एकदा लावलेल्या बियाणांमधून एकदाच शेंगा / फळे मिळतात.
असे होण्याचे कारण काय असावे..?

२) टेरेसचा आकार पुढील प्रमाणे
टेरेस नंबर १ - १००० ते १२०० स्क्वेअर फूट - व्यवस्थीत ऊन येते आणि पाण्याचा निचरा होण्याची सोय आहे.
टेरेस नंबर २ - १०० ते १५० स्क्वेअर फूट - ऊन येत नाही आणि पाण्याचा निचरा होण्याची सोय आहे.

..तर या टेरेसवर माती, कोकोपिट आणि अन्य पूरक पदार्थ वापरून मी दिड ते दोन फुट शेतजमिनीसारखा थर तयार केला व वांगी, भेंडी, गवार अशी झाडे लावली तर काय काय काळजी घ्यावी लागेल..? (टेरेसमधून खाली पाणी गळणे थांबवण्यासाठी फ्लेक्स प्रिंटींगवाल्या शीटचा सर्वात खालचा थर देऊ शकतो.)

३) ऊन न येणार्‍या टेरेसवर कोणत्या प्रकारची झाडे लावावीत..? सध्या कोरफड लावली आहे. पण अगदीच कमी प्रमाणात.

४) टेरेसवरील शेतीची अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत - त्यांचा कितपत उपयोग होतो..?

५) मातीचा पोत सुधारावा यासाठी काय उपाययोजना करावी..? (वेली मरण्यामागे कदाचित हे कारण असू शकते, पण नक्की कल्पना नाही)

***** फोटो *****

भिंतीला मोठे मोठे खिळे मारून नायलॉनची दोरी बांधली आहे आणि त्याच्या आधाराने वेलीचा मांडव करायचा प्रयत्न सुरू आहे.

.

आणखी एक फोटो...

.

फुलझाडे

.

फुलझाडे आणखी एक व्हू..

.

रिकामी जागा..

.

**** अनुभव समाप्त ****

पुनश्चः - शहरातील फ्लॅटला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये मिपाकरांनी शेतीचे प्रयोग केले आहेत का..? केले असल्यास आपले अनुभव कृपया या धाग्यावर द्या.

आणखी एक - हे प्रयोग शेतीतील अज्ञानी आणि अडाणी माणसांनी केले आहेत त्यामुळे "आक्षरास हासू नये." ;)

प्रतिक्रिया

झाडे किंवा वेली वगैरे मरण्याचे सर्वात मोठे कारण हे जीवाणू किंवा बुरशीसंसर्ग हे असते. वेलींना पाणी घालताय ते गरजेपेक्षा जास्त नाही ना हे तपासा. तसेच कुंडीवाल्यांकडील मातीत ऑलरेडी बुरशी असू शकते. तेव्हा अशी माती उन्हात पसरवून, सुकवून घेणे इष्ट. तसेच तुम्ही जर शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरत असाल तर कुंड्यांमध्ये घालण्याआधी ते पूर्णपणे कुजलेले आहे की नाही हे तपासा. खत कुजण्याच्या प्रक्रियेत खूप उष्णता निर्माण होते. वेलवर्गीय झाडे तशी नाजूक असल्याने त्यांची काळजी जास्त घ्यावी लागते.

>>>मात्र वेल एका सायकल नंतर मरून जातात. >>

- कुणी सांगितलं? वेल बारमाही शेंगा ,फळे देतात?

२)>>खत म्हणून सोसायटीने केलेले कंपोस्ट खत आणि एक प्रकारचे शेणखत वापरले>>

वेलांना ओला कचरा मानवतो. अगदी बुंध्याजवळ नाही द्यायचा चारपाच इंच दूर पुरायचा.

३) >>दुकानातून आणलेले बियाणे वापरले.>>

बाजारातल्या भाजीवाल्याकडे मिळणाय्रा वातड,जून शेंगातले बी वापरा. - घुवडा,फरसबी

इरसाल कार्टं's picture

2 Jun 2017 - 10:32 am | इरसाल कार्टं

मीही हेच मुद्देदे मांडणार होतो.
बारमाही फळे देणारी एकाच वेळ मला माहित आहे ती म्हणजे तोंडली.

कंजूस's picture

2 Jun 2017 - 1:50 am | कंजूस

४)>>मातीचा पोत सुधारावा यासाठी काय उपाययोजना करावी..>>

दुधी,कारली नंतर चवळी,घेवडा असा पालट करावा लागतो. माती उन्हात तापवून परत वापरावी.

५) वेल कुजू नये म्हणून उंचवट्यावर लावावा. भिंती कडेला लावल्यास अर्धा दिवसच ऊन मिळेल.

६) उन न येणाय्रा जागी काहीही लावू नये.

लिओ's picture

2 Jun 2017 - 7:03 am | लिओ

आपल्या प्रयोगाला यश लाभो

तुमचे जे प्रयोग यशस्वी झाले आहेत, त्या झाडांचे फोटो पहायला आवडले असते.

क्रुपया सद्यस्थितीतले फोटो इथे डकवा.

इरसाल कार्टं's picture

2 Jun 2017 - 10:30 am | इरसाल कार्टं

+1

गौतमी's picture

2 Jun 2017 - 11:51 am | गौतमी

मी पण असंच (ठरवुन नाही) कुंडीमध्ये कलिंगड आणि लिंबाच्या बिया रुजवल्या होत्या, त्याला आता वेल आणि रोप आलं आहे. मी कुंड्या खिडकीत ग्रिलमध्ये ठेवल्या आहेत. आता ती रोपं कितपत जगतील माहित नाही पण रोज सकाळी उठल्यावर ती इवली इवली रोपं बघुन खुप मस्त वाटतं. :)

आनंद's picture

2 Jun 2017 - 2:36 pm | आनंद

>>मात्र वेल एका सायकल नंतर मरून जातात.

टरमिनेटर बियांणा सारखा काही प्रकार आहे का काय?

टर्मिनेटर बियाणे हे एकदाच वापरता येतात. टर्मिनेटर बियाण्यांपासून जे पीक घेतले जाते, ते बियाणे पुन्हा वापरता येत नाही.
तुम्हाला नवे बियाणे हे खरेदी करावे लागते.

ओके, मूळ वेलाचे आयुष्य तितकेच असते का मग..?

आनंद's picture

2 Jun 2017 - 4:26 pm | आनंद

तस वाटतय!
तुम्ही त्या आलेल्या फळाच बि परत लावुन पहा , म्हणजे खात्री पटेल.

कुंडी भरताना मी खालील क्रमाने साहित्य वापरुन कुंडी भरली:

१. सर्वात खाली विटेचे तुकडे, दगड भरले. (एक ते दोन इंच)
२. त्यावर सुकवलेले उसाचे पाचट आणि नारळाच्या शेंड्या दाबून भरल्या. (तीन ते चार इंच)
३. त्यावर एक इंच मातीचा थर (न दाबता) दिला.
४. त्यानंतर भाजीपाल्याचा सुकलेला कचरा एक इंच भरला.
५. पुन्हा मातीचा दोन इंच थर देउन बिया पेरल्या.

मोदक, तुझ्या बाल्कनीत भरपूर जागा आहे, तेव्हा तुला घरातील रोज निर्माण होणार्‍या कचर्‍यापासून कंपोस्ट डायजेस्टर बनवायला संधी आहे. २०० लिटरचा ड्रम वापरुन कंपोस्ट डायजेस्टर बनवता येईल.

बाकी बाल्कनी गार्डनचे बहारदार फोटो लवकरच येऊ दे..

उपयुक्त लिंक - धन्यवाद पिंगूशेठ..!

चार महिन्यांपैकी अडीच महिने वाढ ,अडिच ते साडेतीन पीक असा प्रकार असतो. दीड महिन्यांच्या अंतराने चारचार वेल वाढवा. कडवे वाल मात्र ओक्टोबरच्या दुसय्रा आठवड्यात लावा.

कुंदन's picture

2 Jun 2017 - 5:09 pm | कुंदन

कुंडीत कशा लावता येतील ते बघ.

जेम्स वांड's picture

3 Jun 2017 - 7:30 am | जेम्स वांड

१. वेलांच्या कुंडीत जी माती आहे ती कुंडीत भरायच्या आधी वरती खूप जण बोललेत तशी तापवून घ्याच, जमल्यास त्यात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन एखादे नैसर्गिक बुरशीनाशक घाला उदाहरणार्थ लिंबोळी अर्क (खासे बुरशीनाशक नाही, पण बरेच चांगले कीटकनाशक असते ते) किंवा किंचित प्रमाणात बोरिक पावडर (आपण वाळवणाच्या धान्यात घालतो ती) माती तापवतानाच त्यात घालून ठेवाल. इफेक्त दिसावा.

२. वॉटरपृफिंग करता फ्लेक्सचा तुकडा वापरण्यापेक्षा एक खास ताडपत्री मिळते त्याच कामाकरता ती एकदाच थोडा खर्च करून घेऊन टाका, त्याला एलडीपीई पॉलिमर शीट म्हणतात अन एका रशियन कंपनीच्या ह्या शीट प्रसिद्ध आहेत (अगदी एकर एकर दोन दोन एकरांच्या शेततळ्याच्या बुडाशी सुद्धा लोकांनी त्या शीट अंथरल्या आहेत. त्याचे व्यावसायिक नाव तर माहिती नाही पण 'रशियन एलडीपीई शीट्स फार्म पॉन्ड' असे सर्च केले गुगलवर तरी सापडावे

अभ्या..'s picture

3 Jun 2017 - 9:07 am | अभ्या..

रशियन कशाला, अगदी आमच्या बारशित तयार होतात ह्या शीट्स. आईएसओ सर्टिफाइड कंपनित. एक्सपोर्ट देखील होतात.
शांतिलेक्स अग्रो प्लास्ट.
मल्चिंग फिल्म्स, प्रोटेक्शन कव्हर, पिव्हिसि पाइप्स, वेल वनस्पतीसाठी सपोर्ट नेट, ड्रिप, फ़ाउंटेन सारे मिळते.

जेम्स वांड's picture

3 Jun 2017 - 10:31 am | जेम्स वांड

ही प्रगती ठाऊक नव्हती, उत्तम आहे हे, स्थानिक प्रॉडक्ट असल्यामुळे स्वस्त अन किफायतशीर सुद्धा मिळून जाईल.

प्रीत-मोहर's picture

3 Jun 2017 - 9:27 am | प्रीत-मोहर

Calling मितान!!

मितानची टेरेसबाग पण खूप छान आहे. तिच्या घरी गांडूळखताचा पिंजरा पण आहे. केळी पपई भाज्या कडीपत्ता सोनचाफा वगैरे भरपूर कायकाय लावून झालय तिच!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Jun 2017 - 11:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

छ्या....तुला काय जमणार शेती. हापिसात ए.सी.त बसवुन डालरमधे पैसा मोजणार्‍यांपैकी तु एक. त्यातुन सारखे डॉम्निजमधुन पिझ्झे मागवणार ऑं.

रच्याकने, बाग पहायला आवडेल. फोटो टाक की.

तद्दन डोक्यात जाणारी जमात आहे, पण तुमच्या प्रतिसादात काही सकारात्मक दिसले नाही. (असा अंदाज आहे की) धागाकर्त्यांना लेखक म्हणून अन (खात्रीने सांगतो) मला वाचक म्हणून तुम्ही काही कामाचे इनपुट दिले असते तर जास्त आवडले असते.

राग न मानणे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Jun 2017 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वांडाण्णा, गंमतीत प्रतिसाद होता तो. मोदकाला रेफरन्स माहितीये =)) =)) =)) =)) =))

विनटूविन's picture

3 Jun 2017 - 3:12 pm | विनटूविन

फोटो पाहून छान सल्ले मिळतील आणि तुमची शेती छान वाढते आहे याची खात्री होईल.

१ ते ४ बद्दल चांगल्या सूचना दिल्या आहेतच. ५ बद्दल माझा अनुभव. नुसती खतं टाकून माती सुधारली नाही. मग आम्ही गांडूळखत तयार करण्यासाठी पिंजरा तयार करून घेतला. तो निकस अशक्त माती असलेल्या ठिकाणी ठेवला. शे पाचशे गांडुळं पाळली. ती पिंजऱ्यात आहेत आणि आता बाहेरच्या मातीत पण. माझ्या मांजरी ती मारून टाकू नयेत म्हणून पाम च्या झाडांच्या झावळ्या आच्छादून टाकल्या. त्यामुळे गांडुळं वाचली आणि वाढली, माती त पाणी जास्त टिकलं त्यामुळे खत चांगलं मुरून मातीचा पोत आपोआप सुधारला.

अजून एक - जमिनीचे टेक्स्चर तयार करण्यासाठी कोणत्याही रसवंती तुन ऊसाचा चोथा आणायचा.खाली माती विटांचे तुकडे किंवा खडी टाकून त्यावर या चोथ्याचा जाडजूड थर आणि म्ह वर तू दिलेले थर घालायचे. वजन न वाढता थर वाढतो. हा प्रयोग मी मोठ्या लिंबू चाफा शेवगा अनंत सोनचाफा यांच्या कुंड्या भरताना केला. त्यामुळे कुंडीचे वजन न वाढता कुंडी भरली. यंदा पहिल्यांदा लिंबं आलीत. शेवगा येतोच आहे.

तुमच्या शेतीचे फोटो टाका प्लीज.

मुक्त विहारि's picture

6 Jun 2017 - 3:58 pm | मुक्त विहारि

टेरेस गार्डनिंगचा स्वानुभव नसल्याने पास...

वेळेचा आणि स्व-उर्जेचा योग्य वापर करत आहात, हे जाणवते.

मोदक's picture

6 Jun 2017 - 5:06 pm | मोदक

फोटो टाकले आहेत.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

मुक्त विहारि's picture

7 Jun 2017 - 1:17 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

अजित पाटील's picture

6 Jun 2017 - 7:25 pm | अजित पाटील

चला पुन्हा निसर्गाकडे – भाग 2 - "चला पुन्हा निसर्गाकडे", खास करून फक्त शहरातील लोकांसाठी एक दिवसीय संवाद शिबिर:
1. https://www.youtube.com/watch?v=75wkk1mdHIE
2. https://www.youtube.com/watch?v=M0KCfhx5H2M Terrace Garden
3. https://www.youtube.com/watch?v=2vT5vqXcKeM
4. https://www.youtube.com/watch?v=xwe5T-N3wU0
वरील विडिओ पहा

मुक्त विहारि's picture

7 Jun 2017 - 1:18 pm | मुक्त विहारि

लिंक बद्दल धन्यवाद...

मुक्त विहारि's picture

7 Jun 2017 - 1:16 pm | मुक्त विहारि

माझा "गणेशा" झाला आहे.

जागु's picture

7 Jun 2017 - 12:13 pm | जागु

छान चर्चा.

सही रे सई's picture

7 Jun 2017 - 7:45 pm | सही रे सई

हि कल्पना नुकतीच कळली आणि आवडली पण.. बघा तुम्हाला अस काही करता येत आहे का

इरसाल कार्टं's picture

8 Jun 2017 - 2:02 pm | इरसाल कार्टं

तुझ्याकडे येऊनही हि बाग पहिली नाही याची आता खंत वाटू लागलीय मला.

तेजस आठवले's picture

8 Jun 2017 - 2:59 pm | तेजस आठवले

ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर ह्या विषयावर बागकामप्रेमी ऐसीकर ह्या नावाने बरेच धागे आहेत. त्यात तुम्हाला बऱ्याच सूचना, आणि अनुभव मिळतील. अश्या प्रकारचा धागा मिपावर यावा ही फार दिवसांपासूनची इच्छा होती.
माझ्या ब्लॉकलाही एक छोटी ओपन टेरेस आहे. मी आत्तापर्यंत त्यात खालील गोष्टी केल्या आहेत. सर्व काही प्रयोग ह्या पातळीवरच आहेत त्यामुळे अनुभवी लोकांच्या सल्ल्याची गरजही आहे.. मातीमध्ये हात घालायला खूप आवडते त्यामुळे ह्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतो.
१. नर्सरी मधून मुळ्याचे बियाणे आणून ते एका उंच कुंडीत पेरले आणि साधारण २ महिन्यात त्याला अगदी लहान मुळे आले. वरच्या पानांची कच्ची कोशिंबीर करून खाल्ली. खाली आलेले मुळे इतके लहान होते कि ते नुसते मीठ लावून खाऊन टाकले.
२. कार्ले आणि दुधी ह्यांचे बियाणे पेरून वेल लावले, पण त्याला सगळी नर फुलेच आली , एकही मादी फुल न आल्याने एकही कार्ले अथवा दुधी मिळाला नाही. कालांतराने वेल वाळून गेला आणि काढून टाकला. टोमॅटो ची पण चांगली फूटभर झाडे वाढवली होती ३/४ परंतु त्याला काहीच फुले आली नाहीत. साधारण ३ महिने ह्या पिकांसाठी वाया गेले. पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखाची थोडी जाणीव तरी झाली.
३. घरात वापरतो तशी पाणी साठवण्याची एक पांढरी सिन्टेक्स ची टाकी, तिला क्रॅक गेल्याने वापरण्याजोगी राहिली नाही. मग मी ती टेरेस मध्ये आणून ठेवली आणि त्यात साधारण पाव फूट माती घातली. रोज त्यात घरातला ओला कचरा घालत असे. तसेच आमच्या बिल्डिंग खालील भाजीवाल्याला सांगून दर दोन दिवसांनी त्याच्या कडून ओला कचरा घेऊन त्या टाकी मध्ये टाकत असे. थोडे पाणी घालून ओलावा ठेवायचा, की चांगल्या बोट बोट जाडीच्या अळ्या निर्माण होतात. पावसाळा चालू झाला तशी त्यात गांडूळे पकडून आणून सोडली. साधारण ३ महिन्यात सगळे काही कुजले आणि मातीसदृश्य झाले. ही पौष्टिक माती मग सगळ्या कुंड्यात घालून टाकली.
४. होळी च्या तिसऱ्या दिवशी सकाळी होळीमधील राख आणून ती थोडी थोडी सगळ्या कुंड्यात घातली.(दुसऱ्या दिवशीच्या संघ्याकाळपर्यंत ते निखारे गरम असतात म्हणून)
५. कबुतरांचा वाढलेला उपद्रव हा सगळ्यांच्याच त्रासाचा विषय आहे. माझ्या जुन्या घरातील खिडकीखालच्या जागेचा कबुतरांनी जणू सुलभ शौचालय असल्यासारखा वापर केलेला होता. एक दिवस ते साफ करावेच लागले.तेव्हा चक्क नाकावर रुमाल बांधून झाडूने ती सगळी विष्ठा एका पिशवीत गोळा केली. सगळ्या झाडांना एक एक चमचा करून घातली आहे खत म्हणून. फारसा फरक जाणवला नाही, त्यामुळे कदाचित परत हा उपद्व्याप करणार नाही.
६. सध्या कुंडीतील झाडे अशी :निशिगंध, डबल मोगरा, चमेली, कृष्णकमळ(पावसाळा ह्याचा बहराचा काळ आहे बहुतेक, आणि फुलाचा मंद गोड सुवास अतिशय स्वर्गीय असतो), भरपूर तुळस, गवती चहा, सदाफुली, पिवळी-लाल गुलबक्षी ,भरपूर निळी गोकर्ण (हिचा निळा रंग अतिशय मोहक दिसतो), एका कुंडीत गुलाबाचा वृक्ष(ह्या गुलाबाच्या झाडाने गेल्या दीड वर्षात फक्त सहा फुले दिली जेमतेम, पण त्याची उंची ५ फुटांवर गेली आहे, म्हणून मी त्याला वृक्ष म्हणतो :))
ह्याव्यतिरिक्त आंब्याची कोय लावली होती तिला छोटी पाने आली आहेत, त्यांचा कोवळा असतानाच रंग मला खूप आवडतो. तसेच ,मिरच्यांची दोन खत्रूड रोपे आहेत (उपकार केल्यासारख्या मिरच्या देतात कधीतरी :( आणि एक लिंबाचे रोप वाढते आहे, अतिशय संथ गतीने :(
गवती चहा आणि तुळस ह्यांचा काढा करतो किंवा रोजच्या चहात स्वादाला वापरतो.
७. चवळी भरपूर आली आहे, दोन माणसांना एका वेळेची उसळ होईल इतपत दाणे मिळाले, आणि आम्ही उसळ करून हादडली पण. चवळी पेरल्यावर साधारण ३/४ आठवड्यात शेंगा वाळून दाणे काढण्यासाठी तयार होतात.दर आठवड्याला कुंडीमध्ये नवी चवळी पेरायची आणि चवळीचे उत्पादन सतत चालू ठेवायचे. काहीही देखभाल करावी लागत नाही.
८. आमच्या वरच्या मजल्यावरून कोणीतरी सडलेले दोन कांदे खाली फेकले नेमके आमच्या गॅलरीत. त्याचा उद्धार करून झाला, आणि डोके शांत झाल्यावर तेच कांदे एका कुंडीत टाकले आणि वरून माती लोटून दिली. महिन्याभरात भरपूर कांदापात आली. साधारण अजून एका महिन्यांनी माझा धीर सुटला आणि मी ते सर्व उपटून काढले. लिंबाच्या आकाराचे साधारण ११ कांदे निघाले. दोन वेळा कांदेपोहे केले त्यात ते वापरले.
९. भेंडी ची साधारण ४ झाडे होती, त्याला अधून मधून एक दोन भेंड्या येत. त्या तश्याच मीठ लावून खाऊन टाकायच्या.
१०. आंब्याची लाकडी पेटी पुढीलप्रमाणे उपयोगात आणायची आहे. ह्या पेटीला सर्व बाजूने प्लास्टिक गुंडाळून(फ्लेक्स चे प्लास्टिक बेस्ट !) मग त्यात माती भरून मुळा तसेच कांदा लावायचा आहे.
११. गेल्या १० महिन्यात घरातून ओला कचरा अजिबात बाहेर जाऊन दिला नाही. चहाचा चोथा, भाज्यांची साले तसेच कलिंगड/खरबूज इ. सगळ्यांची साले कुंड्यांमध्ये जिरवून टाकत आहे. काल पाऊस पडला आणि कुंड्यांमध्ये पाणी साठल्यासारखे झाले तशी भरपूर बाळगांडूळे कुंडयांमधून बाहेर पडत होती.ती एका डिश मध्ये ठेवून माझ्या भाच्यांना दाखवली, आणि मुले पण काही वेळ त्यात रमून गेली होती .
१२.खाण्याचे पान (पानवेल) लावली होती, पण ती फारशी जगली नाही. तसेच कसे कोण जाणे एक बाजरीचे कणीस पण आले होते कुंडीत.त्यातनं मोजून ३० दाणे मिळाले असतील पण त्याने खुप आनंद दिला.
भलामोठा प्रतिसाद इकडेच संपवतो, अजून काही आठवले तर भर घालीन.बाकी पहिला पाऊस पडल्यानंतर रोपांचा टवटवीतपणा आणि उजळलेला पोपटी रंग निसर्ग काय चीज आहे हे दाखवून देतो.

एस's picture

8 Jun 2017 - 3:45 pm | एस

वा! टाळ्या…!

इरसाल कार्टं's picture

8 Jun 2017 - 4:24 pm | इरसाल कार्टं

काही फसले तरी काही प्रयोग यशस्वी झालेलाच कि.

दशानन's picture

8 Jun 2017 - 4:46 pm | दशानन

वाह, भले शाब्बास!!!

मोदक's picture

8 Jun 2017 - 5:12 pm | मोदक

धन्यवाद...

मी ही भविष्यात असा प्रतिसाद देईन अशी खात्री देतो. ;)

तुमच्या बागेचे फोटो द्या की..!

मुक्त विहारि's picture

8 Jun 2017 - 5:17 pm | मुक्त विहारि

कुणाच्या बागेचे?

मी माझ्या बागेचा पाठवू का रे ;)
अल्बम आहे :P

बाग असली तर दे... तुझ्यामुळे डवरलेली झाडे असतील तर फोटो नकोत. ;)

गावाच्या बागेबद्दल म्हणतोय मी :P

शलभ's picture

8 Jun 2017 - 6:11 pm | शलभ

सही..

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2017 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रतिसाद !

सौन्दर्य's picture

18 Feb 2022 - 12:31 am | सौन्दर्य

"उपकार केल्यासारख्या मिरच्या देतात कधीतरी" - ठठो हसलो.

कमळ आणि कोरफड याविषयी दोन व्हिडिओ सापडले.
1)कमळ
ABC Gardening Australia 2014 - Blue Lotus Water Garden ( 5:30, 19 MB )

Link:https://youtube.com/watch?v=xxO0ezsm80o

-------------------------------
कोरफड
2)Gardening Australia ABC - Aloe Aloe segment
5:45 , 24 MB

Link:https://youtube.com/watch?v=e3gjxLsgZ6o

हे टबात लावून पाहता येईल. मी कमळ लावलेले पण बाल्कनित वरचे उन मिळत नाही. टेसवर शक्य आहे.

कंजूस's picture

30 Jun 2017 - 8:45 am | कंजूस

*टेरेसवर*
पिंपरी-चिंचवड मेन रोडवरच्या एका लान्ड्रिवाल्याने छपरावर टबांत पंचविसेक कमळे लावली आहेत त्याचा एकदा पेपरात लेख वाचल्याचे आठवतय.

पिलीयन रायडर's picture

17 Aug 2017 - 10:21 pm | पिलीयन रायडर

फेसबुकवरचे हे पेज उपयोगी पडु शकेल. खफ वर आजकाल मध्ये बरीच चर्चा होतेय ह्या विषयावर.

अवांतर - हा धागा मोदकच्या ट्रॅक मध्ये दिसत नाही. गुगल करुन शोधला. ह्या धाग्याला खाली कॅप्चा कोडही दिसत आहे. धागा "कृषी"ह्या विभागात आहे म्हणुन का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2017 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांगतो, गड़बड़ असेल तर...

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

18 Aug 2017 - 5:48 pm | रेवती

एक्काकाकांनी पद्धत सांगितल्याप्रमाणे मेथी पेरली त्याला तीन दिवस झाले. बेताने पाणी घातले. कोंब दिसायला लागलेत.

मोदक's picture

18 Aug 2017 - 10:54 pm | मोदक

काय पद्धत आहे म्हणे..?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2017 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

घरातल्या-घरात मेथी पिकवायची सरळ सोपी पद्धत.

बाजारात मिळणारे मेथीचे दाणे हे मेथीचे बी असते; तेच वापरून लागवड करायची असते.

ही घ्या घरातल्या मेथीच्या शेतीची संपूर्ण प्रणाली ( ;) :) )...

हे फोटो, घरातल्या एकरकंडिशन्ड वातावरणात, एक-दोन दिवसांच्या अंतराने काढलेले आहेत.

लागवडीसाठीचा कार्टन/ट्रे पुळणीच्या (बारीक) रेतीने भरावा. माती न वापरता रेती वापरल्याने चिखल होत नाही व तयार मेथी सहजपणे उपटून काढाता येते. त्याच रेतीत परत नवीन लागवड करता येते. रेतीवर मेथीचे दाणे पसरून त्यांच्यावर १-२ मिमी जाडीचा रेतीचा थर द्यावा किंवा रेतीवर मेथी पसरून ते जेमतेम रेतीखाली जातील अश्या तर्‍हेने हाताने रेती फिरवावी. मेथी पृष्ठभागाच्या खूप खाली ठेवल्यास ती रुजून वर यायला जास्त वेळ लागतो व पाण्याच्या अतिरेकाने कुजण्याची शक्यता वाढते. रेती केवळ ओली होईल पण पाणथळ होणार नाही इतपतच पाणी शिंपडावे.

दर दिवशी गरजेप्रमाणे (साधारणपणे हिवाळ्यात एकदा व उन्हाळ्यात दोनदा असे) रेती ओलसर राहील इतपतच पाणी द्यावे. रेती पाणथळ झाल्यास मेथीचे दाणे व मुळे कुजतात.

पाणथळपणा टाळण्यासाठी, मेथीच्या लागवडीसाठी छिद्रे असलेला छोटा (सुपमार्केट्समधून मिळणार्‍या फळांचा) कार्टन वापरून त्याच्या खाली घडी घातलेले वर्तमानपत्र अंथरल्यास, ते छिद्रांतून झिरपलेले पाणी धरून ठेवते. त्यामुळे, पाणथळपणा टाळून रेतीचा तळ जास्त काळ ओला राहतो. वर्तमानपत्राखाली छिद्रे नसलेला मोठा प्लॅस्टीकचा कार्टन/ट्रे ठेवल्यास झिरपणार्‍या पाण्याने होऊ शकणारी अस्वच्छता अथवा खिडकी खराब होणे टाळता येते.

ट्रे खिडकीत ठेवल्यास तडक उन (उजेड व उब) मिळाल्याने मेथीची भरकन वाढ होते व भाजीही उत्तम प्रतीची (जास्त हिरवी व चवदार) मिळते. बाल्कनी/टेरेस मध्येही ही लागवड करता येईल, पण हवामानाप्रमाणे पाण्याचे तंत्र बदलावे लागेल.

कुटुंबाला एक वेळेस पुरेल इतकी मेथी मिळेल अश्या आकारांच्या ट्रेमध्ये, चारपाच दिवसांच्या अंतराने एक ट्रे, अशी तीन-चार ट्रेमध्ये लागवड करावी. तयार मेथी काढून झाल्यावर त्याच ट्रे मध्ये लगेच परत लागवड करत राहिल्यास वर्षभर हवी तेव्हा कोवळ्या मेथीची भाजी मिळते. बाजारात मिळणार्‍या जून मेथीपेक्षा ही कोवळ्या मेथीची भाजी जास्त चवदार लागते. शिवाय, इतर भाज्यांची चव वाढवायला ताजी मेथी (ही कसुरी मेथीपेक्षा केव्हाही जास्त सरस असते) सतत उपलब्ध राहते.

धन्यवाद काका.. मी याच धर्तीवर पण एक वेगळा प्रयोग करणार आहे. लवकरच फोटो देतो.

पुळणीच्या रेतीत रोपांनी शोषून घेण्यासारखे पोषक घटक असतात का? एकामागून एक बॅचेस काढत राहिल्या तरी हे घटक टिकतात का?

की फक्त पाण्यावरच रोपं वाढतात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2017 - 4:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुळणीच्या रेतीत असणारे घटक आणि पाणी, एकामागोमाग काढलेल्या १० पिकांना तरी पुरेसे होतात असा स्वानुभव आहे.