लट उलझी सुलझा जा बलमा
बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.पंडित भीमसेन यांचे गायन ऐकावयास गेलो होतो. त्यांनी सुरवात केली "चतुर, सुदरा बालमवा " . म्हटले "वा, हा चतुर बालम काय करतो ते कळले तर आपल्याला थोडे मार्गदर्शन होईल." पण कसले काय, तानांच्या जोरदार मार्यात पंडितजी काय म्हणत आहेत त्याचाच पत्ता लागेना.,बलमा राहिला बाजूलाच ! मग एकदा छॊटा गंधर्व यांची "न च सुंदरी करू कोपा" ची तबकडी ऐकत होतो. नारी मज बहु असती येथ पर्यंत गाडी ठीक चालली होती पण पुढे तानांच्या भेंडोळ्यात शब्दच कळेनात. पण आता ठरवले चतुर बलमा ची चीज शोधणे आपल्याला शक्य नाही पण नाट्यगीत तर मिळेलच की. मिळाले. "कुचभल्ली वक्षाने टोचुनी दुखवी मजला" वाचले आणि कळले की छोटा गंधर्वच चतुर. ताना ऐका, शब्द नकोत. श्री. छोटा गंधर्व ताना-आलापांच्या भेंडोळ्यात तुम्हाला शब्द कळणारच नाहीत याची काळजी घेत
तर काय सांगत होतो.
. बर्याच गायकांच्या गायनात हे असे नकळत का होईना घडते व श्रोत्याला चीजेचे शब्दच कळत नाहीत. हे खरे की बर्याच वेळी त्याने काही फरक पडत नाही. पण हे ही तितकेच खरे की काही सुंदर भजने व ललितरम्य काव्य यांचा आस्वाद घेण्याची संधीही हुकते. कित्येक वेळीं अस्थाई (चीजेचा पहिला भाग, !!धृ!!) कळते व अंतरा (पुढचा भाग, कडवे) कळत नाही वा गायक गातच नाही. आता सामान्य श्रोता या चीजा कोठून मिळवून वाचणार ? कित्येकवेळी ते गायकांनाही दुरापास्त असते. पं. भातखंडे वा पं. कुमार गंधर्व याची पुस्तके ही सहजासहजी मिळणारी पुस्तके नाहीत. सहज मिळणारी म्हणजे पं.विनायकबुवांची परिक्षेची टेक्स्ट बुके. बरेच होतकरू नवशिके त्या चीजा वाचून गायचेच सोडून देतात ! ते असो.(आपले भाग्य!.)
तर एकदा काय झाले, एक चीज कानावर पडली, " लट उलझी, सुलझा जा बलमा " पुढचे ऐकावयाचा प्रयत्न केला पण काही उमगले नाही. फार हळहळ वाटली. काय situation आहे बघाना. ती म्हणते आहे, " प्रिया, केसांचा गुंता झाला आहे, बघ ना. जरा गुंता काढून, विंचरून, सरळ करून दे ना !" बस, एवढेच कळले. केस कशामुळे गुंतले, प्रियकराने नंतर काय केले, कशाचाच उलगडा नाही. म्हणजे जवळ्जवळ सगळा कॅनव्हास मोकळा, रंग तुम्हीच भरावयाचे. दोन दिवस विचार करून लक्षात आले की " गड्या, हे काम तुझे नाही, योग्य माणसालाच विचार."
आमच्याच कंपूतल्या एका कवीला फोन मारला. त्याला सांगितले, " ही ओळ, कवितापूर्ती कर " आता आमच्या कंपूतल्या कवीच्या हातात हे कोलीतच दिले असे म्हणा ना. त्याने एक लावणीवजा कवीताच आमच्या तोंडावर फेकली. काल रात्री तूच एवढा गोंधळ घातलास, सकाळी केसांची ही गत ! आताच तूच निस्तारले पाहिजेस. गोंधळाचे अंमळ जास्तच वर्णन होते व आमच्या कंपूतला म्हटल्यावर राम जोशी, वसंत बापट पाठच होते. त्यामुळे रंग जरा गडदच होते. असो. ती कविता आता देता येणार नाही, पण माझी आजचे मिपावरील नवीन कवीमित्र यांना विनंती आहे की त्यांनी ही कवितापूर्ती करून दोन पिढ्यांमधील कवींमध्ये काही फारसा फरक नाही हे दाखवून द्यावे. आशा आहे की ते उपकृत करतील व आपणास एक छान कविता/लावणी वाचावयास मिळेल
यथावकाश हिन्दी चीजही मिळाली. नर्म शृंगाराचे एक सुरेख प्रदर्शन त्यात घडते. मराठमोळा रोखठोक शृंगार नाही तरी भावनांची एक छान रंगरेखा समोर उभी रहाते, चीज आहे
लट उलझी, सुलझा जा बलमा, मेहंदी हात लगी !!
माथेकी बिंदिया बिछड पडी है, अपने हात लगा जा !!
हाताला मेंदी लावल्यानंतर तिच्या लक्षात आले की, केस विंचरावयाचे राहिलेच आहेत व कपाळाची बिंदी, तीही खालीच पडलेली दिसते. आता ओल्या मेंदीच्या हाताने हे निस्तरणे तर शक्यच नाही. तेव्हा थोड्या लाडीगोडीने ती विनंती करते आहे, लट उलझी. आता जवळच्या माणसाने इतके जवळचे काम सांगितल्यावर कोण बलमा नाही म्हणणार आहे ?
आणखी एक चीजेतील पाठभेद म्हणजे
" माथेकी बिंदिया गिर गयी शेजपे "
च्या... आता रात्री शेजेवर ही बिंदी का व कशी पडली ह्याचा शोध घेणे आले कां ?
शरद
प्रतिक्रिया
28 May 2017 - 4:52 pm | पद्मावति
लेख आणि लेखाचा विषय आवडला.
कवितापुर्तीची कल्पना छानच
28 May 2017 - 10:55 pm | सुखी
मी मझ हरपून बसले, आठवलं
29 May 2017 - 12:26 am | अंतु बर्वा
क्लासिकल मधलं एवढं कळत नाही पण रेहमान ने युवराज सिनेमात हीच चिज का काय म्हणतात ते वापरलयं:
https://youtu.be/5Fg76v0bf5I
29 May 2017 - 5:47 am | रमेश आठवले
ही लोकप्रीय बंदिश बर्याच जणांनी गायली आहे.
त्यातील बिंदिया जागेवर नसण्याचे कारण प्रत्येक गवयाचे पेशी मध्ये वेगळे आहे.
वर शरद यांनी बिछड असे लिहिले आहे. भीमसेन यांनी बिसर असे गायले आहे तर बडे गुलामअलींच्या गाण्या प्रमाणे
ती सुद्धा उल्झ गयी है. जसराज यांच्या मते ती सेज पर गिर गयी असे आहे, बिखर गयी है असे ही ऎकलेआहे.
मला स्वतः:ला आवडलेले बिंदिया जागेवर नसण्याचे सुरस आणि चमत्कारिक कारण एका दुसर्या बंदिश मध्ये वसन्तराव यांनी गायले आहे . ती बंदिश अशी -
बिंदिया ले गई हमार रॆ मछलियां
जाय कहो छोटे देवरको
गंगामे नाव डलावो
https://www.youtube.com/watch?v=gRQ8g97HbB8 jasraj
https://www.youtube.com/watch?v=SX1rPJQrn_k gulamali
https://www.youtube.com/watch?v=86yxE40Ecno bhimsen
https://www.youtube.com/watch?v=fxoRUQA118A vasantrao
29 May 2017 - 7:51 am | दशानन
आह हा!
अतिशय सुरेख लेख.
ठार ठार झालो, खूप वर्षाने असे काहीतरी हृदयाला
29 May 2017 - 10:32 am | रश्मिन
छान लेख !
एका मित्राला हि बंदिश ऐकायला सांगितली होती , भीमसेन जोशींच्या संतवाणी चा पंखा असलेल्या त्याला पंडित जी अस काहीतरी एकदम शृंगारिक गातील आणि इतकं छान रंगवतील ,याचा जबर धक्का बसलेला आठवतोय !!
29 May 2017 - 11:00 am | मराठी_माणूस
मागच्याच शनीवारी फोर्ट मधे झालेल्या एका गाण्याच्या कार्यक्रमात राजा मिया यांनी हीच चीज गायली होती.
29 May 2017 - 11:36 am | वरुण मोहिते
ते माथेकी बिंदिया बिछड पडी हे ...वाचून काही आठवणी आठवल्या
29 May 2017 - 7:53 pm | समाधान राऊत
+1
30 May 2017 - 12:04 am | अनुप ढेरे
अश्विनि भिडे देशपांडे यांनी गायलेलं ऐकलं आहे. त्यात शब्द सगळे स्पष्ट समजतात.
31 May 2017 - 12:56 am | मिसळपाव
... "नवीन" नाही, "कवीमित्र" नक्कीच नाही आणि "दोन पिढ्यांमधला कवीतला" फरक मी कसला डोंबल्याचा दाखवणार? पण "
....म्हणजे जवळ्जवळ सगळा कॅनव्हास मोकळा, रंग तुम्हीच भरावयाचे. ...
." असं तुम्हीच परमिट दिलंत म्हणून हा माझा प्रयत्न :-)डोळ्यांवरती बट ओघळली,
सांग सख्या तुज पाहू कशी मी,
हाती असे ही मेंदी रेखिली,
... थांब सख्या क्षण थांब
उचलून ठेवी केसांवरती,
भाळी अशी का दृष्टि खिळविसी,
कुंकूमरेखा नसे तिथे ती,
... थांब सख्या क्षण थांब
हस्ते तुझिया तूच रेखिसी,
अलगद नयनी नयन मिळविसी,
भान नुरे मज का रे छळीसी,
... थांब सख्या क्षण थांब
मेंदी हातीची विस्कटली,
तुझिया गाली कशी रे आली,
काया अवघी मोहरली ही
... थांब सख्या क्षण थांब
प्रीतीचा हा खेळ रंगला,
मनात अत्यानंद उसळला,
राहूदे आता ईथेच मजला,
क्षणा, थांब रे क्षणा थांब...
"लट उलझी" म्हणजे बिहाग रागाची 'सिग्नेचर बंदिश'. बिहागमधली अजून एक सुरेख बंदिश - "देखो मोहे रंग मे भिगोये डारी...". शब्द थोडेफार वेगळे असतील, याना मी बंदिशी म्हणतोय, या 'चीजा' असतील पण जे काही आहे ते फार छान आहे, मनाला मोहवणारं आहे हे महत्वाचं.
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
31 May 2017 - 4:55 pm | सचिन काळे
@ मिसळपाव, आपने तो हमारा दिल चुरा लिया!
31 May 2017 - 12:03 pm | शरद
दोहों मधील प्रेमभाव छान पकडला आहे.
(आठ वर्षंत दोनच कविता हे प्रमाण फारच कमी वाटते. प्रतिसाद कमी झाले तरी चालतील पण स्वतःचे लेखन वाढवावे ही आग्रहाची विनंती.)
शरद
31 May 2017 - 6:58 pm | पिशी अबोली
अहाहा, काय ओळी आहेत!
खूप आवडला लेख.