न किसी की ऒख का नूर हूं
न किसी की ऒख का नूर हूं
न किसी के दिल का करार हूं,
जो किसी के काम न आ सके
मै वो एक मुश्ते-गुबार हूं ---१.
मेरा रंग रूप बिगड गया
मेरा यार मुझसे बिछड गया
जो चमन खिजॉ से उजड गया
मै उसी की फस्ले बहार हूं ---२
पा-ए-फातहा कोई आये क्यो
कोई चार फूल चढाये क्यो
कोई आ के शम्मा जलाये क्यू
(जफर अश्क कोई बहाये क्यु)
मै तो बेकसी का मजार हूं ---३
मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा
मुझेम सुन के कोई करेगा क्या
मै बडे विरोग (विरॉन) की हूं सदा
मै बडे दुखों की पुकार हूं ---४
न तो मै किसी का हबीब हूं
न तो मै किसी का रकीब हूं
जो बिगड गया वो नसीब हूं
जो उजड गया वो दयार हूं ---५
बहादुरशहा जफर
नूर --- प्रकाश करार --- चैन, आराम, मुश्त ---मूठभर, गुबार ---धूळ, चमन ---बाग, उद्यान,खिजॉ ---पानगळ, फस्ले बहार ---वसंत ऋतू ,पा-ए-फातहा--- मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करणे, बेकसी ---दु:ख, असहायता, मजार --- कबर, समाधी, नग्मा-ए-जॉफिजा --- आल्हाददायक गीत, सदा ---आवाज, प्रतिसाद, हबीब ---मित्र, रकीब --- प्रेमातील प्रतिस्पर्धी, दयार ---घर विरॉन ---वैराण, ओसाड
आयुष्यात (बर्याच वेळी शेवटी शेवटी)हा प्रश्न पडतो कीं "अरे, मी हे आयुष्य जगलो ते कशाकरिता ? मी काय मिळवले ? ना कोणी आपल्या नेत्रात साठवले की कोणी आपल्या हृदयात मला जागा दिली. जर एवढ्या विशाल जगात एकाही व्यक्तीचे डोळे मला पाहिल्यावर चमकत नसतील वा हृदय आनंदाने भरून जात नसेल तर, तर मी म्हणजे एक मुठभर धूळच नव्हे कां ? कोणालाही नको असलेली !
माझा चेहरा-मोहरा, सौंदर्य केव्हाच बदलून गेले आहे; माझा जिवलग तर मला सोडून देऊन गेला आहे.. एखाद्या उद्यानात पानगळ झाल्यावर, सारे उझाड झाल्यावर, वसंत ऋतूने म्हणावे "मी येतो आहे, धीर धर"; तसे माझे जगणे झाले आहे
सर्वस्व गमावलेला अभागी मी. आत जमीनीत गाडला गेल्यावर कोणी येईल, मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून कुराणातल्या चार ओळी वाचेल, थडग्यावर दोन-चार फुले वाहील;एखादी पणती पेटवेल, अशी व्यर्थ आशा कां करावी बरे ?
माझे आयुष्य एखादे आल्हादकारक गाणे थोडेच आहे ? ती तर एक आर्त, विषण्ण विराणी..ती कोणाच्या ओठावर येईल आणि त्याला जरासा आनंदित करेल अशी वेडी आशा करण्यात काय अर्थ आहे. ताटातूट व दु:खाचे प्रतिसाद एवढीच तीची ओळख.
या एकाकी जीवनात मी ना कोणाचा मित्र्र ना कोणाचा प्रेमातील प्र्फ़तिस्पर्धी ! एकाद्या पडक्या, निर्जन गढीसारखा.फुटक्या नशिबाचा मी,
तर अशी ही गझल. एखाद्या काळवंडलेल्या, एकाकी संध्याकाळी दुरच्या बासरीवरचे जोगियाचे उदास स्वर कानावर पडावेत तशी. घालमेल, तळमळ, व्याकुळता यांनी भरलेली. उर्दु शब्दांचे अर्थ दिल्यावर खरे म्हणजे पुढे काहीच लिहण्याची गरज नसलेली. पण आदतसे मजबूर....
या सदाबहार गझलेत अनेक अडचणी आहेत
. गझल कोणाची या पासून वाद. अनेक वर्षे ही गझल बहादुरशाह जफर याची मानली जात आहे. पण जावेद अख्तर यांनी ही माझ्या आजोबांनी लिहली असा दावा केला आहे. तसे पाहिले तर गझलेच्या रसग्रहणात याने काही फरक पडत नाही. पण बहादुरशाह जफर याच्या आयुष्यातील उत्तरार्धात त्याच्या वाट्याला आलेली दुर्दशा पाहता त्याचीच गझल असावी असे भासते खरे. दिल्लीचा हा बादशहा परदेशात एकाकी, दरिद्री जीवन जगत असतांना ही गझल रचली गेला नाही तर स्वत:च निर्माण झाली असावी असे वाटून जाते. खरी अडचण शब्द वा ओळच वेगळी समोर आली तर काय करावयाचे ? आपण जुन्या काव्यात पाठभेद पाह्त आलो आहोत, त्यात एक भर. मी काही भाषाकोविद नाही. त्यामुळे पाठभेद देऊन तज्ञांवर ती जबाबदारी सोडावी हे उत्तम तिसर्या कडव्यात"कोई आ के शम्मा जलाये क्यू" च्या जागी "जफर अश्क कोई बहाये क्यू ".असा पाठभेद दिसतो. कवीचे नाव येणे योग्य आहे, पण बहुधा ते शेवटच्या शेरात असते इथे ते मधेच घुसले आहे. तसेच चौथ्या शेरांत विरोग शब्द आहे. मला हिन्दी-उर्दु शब्दकोषात तो सापडला नाही. विरॉं इथे फिट बसतो. ही घूसखोरी माझी. कोणी उर्दु लिपी येणारा तीत दोनही शब्द देऊन काही मदत करेल तर उपकृत होईन. असो.
शरद
प्रतिक्रिया
18 May 2017 - 9:49 am | चित्रगुप्त
शरद राव,
आताच मी एका उर्दू लेखक मित्राला फोन करून याविषयी चर्चा करण्याचे ठरवले आहे. चर्चा झाल्यावर लवकरच प्रतिसाद देईन. आणखीही काही माहिती हवी असेल तर मला कळवावे.
18 May 2017 - 11:08 am | पैसा
उदास करणारी गझल
18 May 2017 - 12:09 pm | अमर विश्वास
अत्यंत सुंदर गझल ..
वाचलेल्या माहितीवर आधारीत :
ही गझल बहादुरशहा जफ़रचीच आहे. जेंव्हा इंग्रजानी दिल्लीवर कब्जा केला व बहादूरशहाला पदच्युत करून दिल्ली सोडुन जायला सांगितले .. या परिस्थितीत बहादुरशहाने ही गझल लिहिली.
मेरा रंग रूप बिगड गया... मेरा यार मुझसे बिछड गया .... यातील मेरा यार हे तो लाल किल्ल्याला उद्देशुन म्हणतो असेही वाचले आहे ...
आपले राज्य गमावलेल्या, आपल्या प्रिय दिल्ली व लालकिल्ला सोडुन जायला लागलेल्या पराभुत बादशहाची प्रतिमा डोळ्यासमोर आणा .. मग या गझलेचा अर्थ भावेल .
लालकिला चित्रपटात रफीसाहेबांनी ही गझल गायली आहे, कुठलेही तालवाद्य नसताना रफीच्या आवाजाची जादु या गझलेचा दर्द बरोबर आपल्यापर्यंत पोचवते .. जरूर ऐका
19 May 2017 - 3:46 pm | भीडस्त
रफीच्या आवाजात ही गझल ऐकताना दर वेळी अंगावर काटा हमखास उभा राहतो
20 May 2017 - 2:56 am | रमेश आठवले
हबीब वली मोहम्मद यांनी गायलेली हीच गझल. बहुधा देस रागात आहे. https://www.youtube.com/watch?v=TK3gv-CeGq4
मेहदी हसन यांनीही तीच गझल गायली आहे.
https://www.youtube.com/watch?v=C9xbl1GKf-8
18 May 2017 - 4:35 pm | सत्यजित...
तो शेर पुढीलप्रमाणे माझ्या वाचनात आला आहे...
मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा
मुझेम सुन के कोई करेगा क्या
मै बडे बिरोग की हूं सदा
मै बडे दुखों की पुकार हूं
'बिरोग'चा अर्थ 'वियोग(seperation)'असा दिसतो आहे!
बाकी,गझल मन हेलावणारी आहे!