मेघनादरिपुतात
मागे काही दिवसांपूर्वी " हराच्या हाराचा.."नावाचा एक शाब्दिक खेळ दिला होता. त्याला बर्यापैकी वाचकांनी पसंती दिली व काहींनी आणखी असेच काही लिहा असेही म्हटले. आज तसाच एक, पण जरा सोपा खेळ देत आहे.
उद्यानात एक राजकन्या आपल्या सख्यांबरोबर बसली असताना तेथ एक राजपुत्र आला. त्याचे राजकन्येवर प्रेम बसले. पण पुढे काही विचारण्यापूर्वी तिला आपणाबद्दल काय वाटते हे जाणून घ्यावे म्हणून त्याने तिला विचारले "मी तुला कसा काय वाटतो ?" तिने उत्तर दिले
मेघनादरिपूतात वधी ज्या नराला
ते नाव आहे द्वादशात पाचव्याला !
सरता तयासी दिन अस्तमानी
ज्या नर पूजिती (तैसा) दिसतोस नयनी !!
काय बरे सांगितले राजकन्येने ?
( मागच्या सारखीच एक विनंती. जरा सर्वांना वेळ मिळावा म्हणून एका दिवसानंतर उत्तर द्या.
शरद
प्रतिक्रिया
11 Apr 2017 - 6:37 pm | एस
पहिल्या दोन ओळी झाल्या. तिसऱ्या व चौथ्या ओळीपाशी अडकलो आहे! :-(
11 Apr 2017 - 7:39 pm | प्रचेतस
मला बहुधा शेवटच्या दोन ओळीही सुटल्यात असे वाटते
12 Apr 2017 - 3:33 am | अनन्त अवधुत
तिसरी झालीय. पण तिसरी आणि चौथीची सांगड लागत नाहीय. :(
11 Apr 2017 - 6:47 pm | एस
डुप्लिकेट प्रतिसाद काढून टाकला आहे. (डुप्रकाटाआ).
12 Apr 2017 - 4:25 am | स्रुजा
पहिल्या तीन ओळी सुटल्या पण चौथी वर अडकले आहे.
12 Apr 2017 - 4:32 am | स्रुजा
आय थिंक सुटली चौथी पण ओळ :)
12 Apr 2017 - 5:45 am | रुपी
बहुतेक जमले.. :)
आधीच्या धाग्याचा दुवापण द्या शक्य असेल तर ..
12 Apr 2017 - 10:54 am | शरद
http://www.misalpav.com/node/15849
12 Apr 2017 - 8:23 am | आषाढ_दर्द_गाणे
काहीच कळले नाही. उत्तराच्या प्रतीक्षेत.
- आपला नम्र दगड
12 Apr 2017 - 8:46 am | पैसा
:) उत्तर सांगू का?
12 Apr 2017 - 9:03 am | वेल्लाभट
रोचक
12 Apr 2017 - 9:17 am | प्रीति सखि
Uttar sangu ka?
12 Apr 2017 - 10:56 am | शरद
सांगा की .
12 Apr 2017 - 11:03 am | पैसा
मेघनादाचा रिपु लक्ष्मण, त्याचा तात दशरथ. त्याने मारला तो नर श्रावण. तो १२ मधला पाचवा महिना. त्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी ज्याची पूजा करतात त्या बैलासारखा तू दिसतोस.
12 Apr 2017 - 11:53 am | चित्रगुप्त
व्वा. असे आहे होय? कमाल आहे. हे रचणार्याच्या प्रतिभेला, हे इथे आणणार्या धागाकर्त्याला आणि अर्थ उलगडून सांगणारीस त्रिवार कुर्निसात.
या प्रकाराला काय म्हणतात ? असे आणखी कुठे वाचायला मिळतील ? काही म्हणा, जुन्या साहित्यात असे अनेक खजीने दडलेले असतात. ते सर्व पुन्हा उपसून वर काढले पाहिजेत.
12 Apr 2017 - 12:25 pm | शरद
कोडे तसे सोपे आहे. मेघनाद=इंद्रजीत,त्याचा शत्रु= लक्ष्मण, त्याचे वडील= दशरथ, त्यांनी मारलेला न्रर = श्रावण, तोच बारा महिन्यांमधला पाचवा. त्यात पूजेचे तीन सण, नागपंचमी, जन्माष्टमी व बैलपोळा. नागाची पूजा संध्याकाळी नसते. तेच कृष्णाबाबत..तेव्हा उरला बैलपोळा. बैलाची पूजा संध्याकाळीच होते. आणि सणही श्रावण सरतांना, त्याच्या शेवटच्या दिवशी येतो. राजकन्या सुसंस्कृतपणाने त्याला बैल न म्हणता काव्यात उत्तर देत आहे.
आपल्याकडेही श्री. प्रचेतस व श्री. रूपाताई यांनी हे उत्तर कालच व्यनीवर कळवले होते. इतरांना वेळ मिळावा याची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद.
(थोडा खवचटपणा : पुढील कोडे संस्कृतमधील देऊं कां ? )
शरद
12 Apr 2017 - 12:34 pm | चित्रगुप्त
...... पुढील कोडे संस्कृतमधील देऊं कां ?
अवश्य द्यावीत आणि मराठीतीलही द्यावीत. विविध वृत्तांमधील खास चमत्कृतीपूर्ण रचनाही द्याव्यात. असे विविध प्रकार असलेला कुणाचा ब्लॉग वा साईट आहे का ?
12 Apr 2017 - 3:17 pm | नंदन
उत्तम रचना!
चित्रगुप्त यांच्या प्रश्नावरून साने गुरुजींच्या लेखनातला हा भाग आठवला:
12 Apr 2017 - 11:10 pm | रुपी
छान आहेत या रचनाही.
एकदा शाळेत आम्हाला शिकवलेली एक रचना मला आठवत आहे, त्याप्रमाणे अशी -
'तो शर गरधरवरसा
रविसा, पविसा, स्मरारिसायकसा
पार्थ भुजांतरी शिरला
वल्मिकामाजी नागनायकसा'
हे अर्जुनाला लागलेल्या एका बाणाबद्दल आहे. तो बाण कसा सपकन त्याच्या हातात जाऊन घुसला त्यासाठी त्याला सूर्याची, वार्याची, वारुळात नाग घुसतो त्याची उपमा दिली आहे. पण 'गरधरवरसा' म्हणजे काय आणि स्मरारिसायकसा (स्मर ज्याचा शत्रू सायक याच्यासारखा) याचा संदर्भ माझ्या लक्ष्यात नाही.
13 Apr 2017 - 11:51 am | पैसा
स्मराच्या अरिचा सायक. कामदेवाचा शत्रु शिव. त्याचा बाण. थोडक्यात शिवधनुष्यातून सुटलेला बाण.
गरधरवर म्हणजे बहुधा विषधर वर असे असावे.
14 Apr 2017 - 10:27 pm | रुपी
अच्छा! धन्यवाद.
किती वर्षे ही रचना लक्ष्यात होती, पण या दोन शब्दांचा अर्थ विसरले होते. बरे झाले इथे विचारले :)
13 Apr 2017 - 11:42 am | सूड
मेघनादरिपुतात कळलं पण मेघनादाचा रिपु कोण इथे गाडी अडकल्याने पुढलं काही सुचेना. आणखी येऊद्या. रोचक आहे.
13 Apr 2017 - 12:05 pm | माहितगार
रोचक
13 Apr 2017 - 3:26 pm | सूड
अगदी सोपंच सुचलंय, पण राजपुत्र हजरजबाबी असता तर कदाचित हे उत्तर दिलं असतं.
रजनीवरभ्रमणीं जे पहिले नक्षत्र
त्यानामे रूढ झाला मासही सर्वत्र
नवमीसीं त्यातील रूप दितीसुत जे घेत
छबी त्याच्या जननीची गे तव रूपात
14 Apr 2017 - 5:03 pm | शरद
बहुत बढिया, श्री.सूड. माझे उत्तर
अपमानित राजपुत्राने, राजकन्येने न विचारताही, एक "मुहतोड" जबाब दिला आहे. तो म्हणतो
रजनीवरभ्रमणीं जे पहिले नक्षत्र
त्यानामे रूढ झाला मासही सर्वत्र
नवमीसीं त्यातील रूप दितीसुत जे घेत
छबी त्याच्या जननीची गे तव रूपात"
हल्ली नक्षत्र गणना अश्विनी पासून करतात ( वेदकाळात ती कृत्तिका पासून होती) तेव्हा पहिले नक्षत्र्र अश्विनी व अश्विन हा त्या नावाचा महिना. त्या महिन्यातली नवमी म्हणजे नवरात्राचा शेवटचा दिवस. दितीसुत म्हणजे असूर. त्याने महिषाचे (रेड्याचे) रूप घेऊन देवीवर हल्ला केला होता. त्याला मारले म्हणून देवी "महिषासूरमर्दिनी" तर त्याची आई म्हणजे "म्हैस". राजपुत्राला "आता"" राजकन्या तशीच काहीशी दिसू लागली आहे ! कालाय तस्मै नम: !!
शरद
14 Apr 2017 - 11:31 pm | आषाढ_दर्द_गाणे
वा-वा!
वाचायला मजा आली!
आता एकमेकाला बैल-म्हशी म्हणणं झालं,फुडे काय प्रकारचे सुसंवाद घडतील बरं?
14 Apr 2017 - 11:33 pm | रुपी
"आता" नाही, आधीच दिसली असेल. तो बैलासारखा आणि ती म्हशीसारखी म्हणूनच प्रेम बसले असेल =)
14 Apr 2017 - 5:04 pm | शरद
बहुत बढिया, श्री.सूड. माझे उत्तर
अपमानित राजपुत्राने, राजकन्येने न विचारताही, एक "मुहतोड" जबाब दिला आहे. तो म्हणतो
रजनीवरभ्रमणीं जे पहिले नक्षत्र
त्यानामे रूढ झाला मासही सर्वत्र
नवमीसीं त्यातील रूप दितीसुत जे घेत
छबी त्याच्या जननीची गे तव रूपात"
हल्ली नक्षत्र गणना अश्विनी पासून करतात ( वेदकाळात ती कृत्तिका पासून होती) तेव्हा पहिले नक्षत्र्र अश्विनी व अश्विन हा त्या नावाचा महिना. त्या महिन्यातली नवमी म्हणजे नवरात्राचा शेवटचा दिवस. दितीसुत म्हणजे असूर. त्याने महिषाचे (रेड्याचे) रूप घेऊन देवीवर हल्ला केला होता. त्याला मारले म्हणून देवी "महिषासूरमर्दिनी" तर त्याची आई म्हणजे "म्हैस". राजपुत्राला "आता"" राजकन्या तशीच काहीशी दिसू लागली आहे ! कालाय तस्मै नम: !!
शरद
14 Apr 2017 - 6:07 pm | सूड
हा हा!! वेदकाळात गणना कृत्तिकेपासून होती हे माहीत नव्हतं, ज्ञानात भर पडली.
14 Apr 2017 - 6:11 pm | सूड
आणि हो, हेच उत्तर अपेक्षित होतं.
14 Apr 2017 - 5:39 pm | पैसा
जबरदस्त!
14 Apr 2017 - 10:54 pm | स्रुजा
क्या बात क्या बात !