||कोहम्|| भाग 4

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जनातलं, मनातलं
23 Mar 2017 - 10:18 am

कोहम्
भाग 4

जर आपल्याकडे आज (किंवा भविष्यात) टाइम मशीन असेल आणि त्यात बसून जर आपण लाखभर वर्षांपूर्वीच्या पूर्व आफ्रिकेत गेलो तर आपल्याला आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवांचे अनेक समूह दिसतील, लहान लहान मुलं आईच्या कडेवर बसलेली असतील, काही मागे फिरत असतील, पुरुष शेकोटीभोवती किंवा नुकत्याच मारलेल्या शिकारीभोवती बसून तिचे वाटे करत असतील, काही तरुण तरुणी स्वतःत मश्गुल असतील तर काही वृद्ध शांतपणे हे सगळं बघत, आपलं दुखर शरीर घेऊन बाजूला बसले असतील..

पण मग अगदी असंच चित्र तुम्हांला लांडग्यांच्या, म्हशींच्या, हत्तीच्या आणि माकडांच्या कळपातही दिसेल. मानवी कळपात आणि माकडांच्या/लांडग्यांच्या कळपात लाखभर वर्षांपूर्वी फक्त एक महत्वाचा फरक होता, तो म्हणजे मानवाने आगीवर नियंत्रण मिळवले होते. एक तेवढा फरक सोडला तर मानव अजूनही अत्यंत बिनमहत्वाचा आणि सामान्य प्राणी होतो. या पृथ्वीचा राजा होण्याचं स्वप्न त्याने अजूनही पाहिलं नव्हतं, किंबहुना असं काही असतं हि जाणीवच त्याला अजून झाली नव्हती.

तरीही अग्नीवर असणारं त्याच नियंत्रण, हे त्याच्या हाती असलेल्या एका हुकुमी एक्क्यासारखं होतं. अग्निवरच्या नियंत्रणाचे अनेक फायदे होते. पहिली गोष्ट म्हणजे जवळ येऊ पाहणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांना दूर ठेवण्याची शक्ती अग्निमध्ये होती. काही काळानंतर बहुदा मानवाने स्वतःहून जंगलांना आगी लावायला सुरवात केली. जाळलेलं जंगल म्हणजे जणू मानवाचं पहिलं स्वयंपाकघर होतं. जमिनीत गाडलेले अनेक कंदमुळं, बिळात लपलेले प्राणी हे जंगल पेटताच आयती शिकार होऊन मानवाच्या हाती सापडू लागले. पण आगीने अजून महत्वाची गोष्ट केली जी अन्यथा शक्य नव्हती. जे अन्न मानव कच्च खाऊ शकत नव्हता, तेही त्याला भाजून खाणं शक्य झालं. गहू ,तांदूळ, बटाटे, अनेक कंदमुळं हि कच्ची पचायला अत्यंत कठीण असतात. झाडावरची फळ हा माकडांचा मुख्य आहार होता, मानवाचा नाही, कारण दोन पायावर चालणारा जड मानव कधीही माकडाइतक्या चपळाईने झाडावर चढू शकत नव्हता. पण कच्च अन्न खाणाऱ्या चिंपाजीला ते पाच तास चघळावं लागतं तिथे मानव अवघ्या एका तासात चर्वण करून मोकळा व्हायला लागला. तेही अग्नितून भाजून आलेलं आणि बऱ्यापैकी निर्जंतुक झालेलं अन्न..

अनेक शास्त्रज्ञांच्या मते, अग्नीने अजून एक महत्वाचा बदल मानवी शरीरात घडवला, भाजलेले आणि पचायला हलके अन्न खायला लागल्यावर मानवाला खूप मोठ्या आतड्याची गरज उरली नाही. त्यामुळे मानवाच आतडे हळूहळू आकसायला लागले. शरीरातल्या दोन अवयवांना खूप जास्त ऊर्जा लागते, एक म्हणजे आतडी, दुसरा मेंदू. आतडी लहान व्हायला लागली तशी हि वाचलेली ऊर्जा मेंदूकडे वळवली गेली, या उपलब्ध फ्री ऊर्जेमुळे हळूहळू मानवी मेंदूचा आकार वाढायला लागला. मानव एका वेगळ्या वाटेवर चालायला लागला.

अर्थात वाढलेला आणि मोठा झालेला मेंदू हि काही सांभाळायला सोपी गोष्ट नव्हती, त्याचेही स्वतःचे असे खास प्रॉब्लेम होते. जितका मोठा मेंदू तितकी ऊर्जेची गळती. त्या काळात, जेंव्हा अन्नाचा प्रत्येक कण हा रक्त सांडवून मिळवावा लागायचा तेंव्हा असा मेंदू सांभाळणं हि अत्यंत जिकरीची गोष्ट होती. मानवी मेंदू हा वजनाने शरीराच्या फक्त 2-3% असतो पण अगदी विश्रांती घेत असतानाही, तो शरीरातली 25% ऊर्जा वापरतो. जर मोठा मेंदू हि इतकी चांगली गोष्ट असती आणि तिचे काहीच तोटे नसते तर संपूर्ण प्राणी जगतात मोठा मेंदू असलेल्या प्राण्यांचे प्राबल्य असते. पण तशी काही परिस्थिती नाही.

मोठ्या आकाराच्या मेंदूचे मानवाला दोन तोटे झाले, एकतर त्याला ऊर्जेची गरज भागविण्यासाठी जास्त वेळ अन्न शोधण्यात घालवावा लागला, आणि दुसरं त्याचे स्नायू कमजोर झाले. जसं एखादं लोकशाहीवादी पुरोगामी सरकार आपल्या संरक्षण खात्यातील तरतूद कमी करून ती शिक्षण खात्याकडे वळवते, तशी मानवाने स्वतःच्या स्नायूंची ऊर्जा कमी करून ती मेंदूकडे वळवली. आफ्रिकेच्या जंगलात किंवा कुरणांमध्ये हे कितपत फायदेशीर होतं माहीत नाही. एखादा गोरिला कधीही माणसाबरोबर वाद विवादात जिंकू शकत नाही पण तो त्याला हरवणाऱ्या माणसाला उभा फाडू शकतो.

मोठ्या मेंदूमुळे सगळ्यात जास्त नुकसान सुरवातीच्या काळातल्या स्त्रियांचं झालं. एकतर मनुष्य हा दोन पायांवर चालणार प्राणी, त्यामुळे गर्भाशयाचा आकार मर्यादित, त्यात लहान कटीभाग. जर आपण आपल्याच उंचीच्या माकडाचा कटीभाग पाहिला तर हा फरक लक्षात येईल. या छोट्या जागेत या स्त्रियांना अशी बाळं वाढवायची होती ज्यांचा मेंदू सतत मोठा होतं होता आणि मेंदू बरोबरच डोकं.. हे मोठं डोकं असलेली मुलं शरीराबाहेर काढणं हे मानवी स्त्रीसाठी प्रचंड कठीण काम आहे. आजही मानवी स्त्रीइतक्या प्रसववेदना प्राणीजगतातली कोणतीही मादी बहुदा सहन करत नाही. त्या सुरवातीच्या काळात बहुदा कित्येक मुलं आणि स्त्रिया बहुदा अशाच मेल्या असाव्या.

या समस्येवर उत्क्रांतीच्या चक्रात एक तोडगा मिळाला, अशा स्त्रिया, ज्यांची मुलं अपुरी वाढ झालेली असतानाच जन्माला यायचे, त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या जगण्याची शक्यता वाढली. भले अपुरी वाढ झाली असल्याने बऱ्याच मुलांचे बालमृत्यू होतं असतील पण आईचा मृत्यू होण्यापेक्षा हे चांगलं. त्यामुळेच बाळाचा मेंदू आणि डोकं लहान असतानाच मानव प्राणी त्याला जन्म देऊ लागला. आजही आपण तुलना केल्यास मानवी बाळं खूप जास्त काळ आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतं, याच साधं कारण हे आहे की ते मुळातच अविकसित अवस्थेत जन्माला येतं.

अर्थात या गोष्टीचे काही फायदेही झाले, अविकसित अवस्थेतील बालकांना सांभाळणे आणि स्वतःच, तसंच त्यांचं अन्न गोळा करणे हे मानवी आईसाठी खूप कठीण होतं, त्यातूनच हळूहळू कुटुंबसंस्था आणि समाज व्यवस्था उदयाला आली. उत्क्रांतीच्या ओघात ज्या मानवी प्रजाती असे सामाजिक बंध आणि रचना इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे विकसित करू शकल्या त्या टिकल्या, इतर नष्ट झाल्या. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे, मानवी बाळ अविकसित अवस्थेत जन्माला आल्याने त्याला साच्यात घडवणं सोपं झालं, त्याला शिकवणं सोपं झालं.

अशा प्रकारे अग्नीचे नियंत्रण करू शकणारा मानव आणि इतर प्राणी यांच्यात हळू हळू एक दरी तयार होतं गेली. बहुतेक प्राणी त्यांच्या जीवितासाठी स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात पण मानव मात्र बाहेरची साधनं वापरू लागला, अगोदर अग्नी आणि मग हत्यारं..

तरीही, इथे हे लक्षात घ्यायला हवं, कि हि सगळी उत्क्रांती सगळ्या मानव वंशात होतं होती, फक्त होमो सेपियन मध्ये नाही. पण मग फक्त होमो सेपियनच का शिल्लक राहिले? इतर वंश कुठे गेले?

या बद्दल अनेक शक्यता आणि वाद आहेत पण बहुदा या यशाचं कारण तेच आहे, जिच्यामुळे हे वाद घालणं शक्य होतंय…
ते कारण आहे होमो सेपियनची बऱ्यापैकी खास आणि अनोखी असलेली भाषा..
कसं ते पुढच्या भागात बघू..

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

इतके सोपे विवेचन आणि उत्तम उदाहरण, सुंदर लेखमाला.

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2017 - 11:20 am | टवाळ कार्टा

अप्रतिम माहिती

हा भाग तर भन्नाटच झालाय

पुंबा's picture

23 Mar 2017 - 11:31 am | पुंबा

जबरदस्त.. पुभाप्र.

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2017 - 12:00 pm | मराठी कथालेखक

होमो सेपियन शिवाय इतर होमो स्पेसिजची भाषा नव्हती का ?
शब्दांबद्दल आणि भाषेबद्दल अधिक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

शैलेन्द्र's picture

23 Mar 2017 - 1:47 pm | शैलेन्द्र

होमो स्पिसीजचं सगळेच प्राणी कुठली न कुठली प्रकारे साधतात. पण फक्त संवाद साधने इतकीच त्यांची भाष्य मर्यादित राहते , आपली भाषा मात्र इतरही अनेक गोष्टी करू शकते,
कसे ते पुढच्या भागात येईल.

शैलेन्द्र's picture

23 Mar 2017 - 1:49 pm | शैलेन्द्र

होमो स्पिसीजचं नव्हे तर

शैलेन्द्र's picture

23 Mar 2017 - 1:50 pm | शैलेन्द्र

होमो स्पिसीजचं नव्हे तर सगळेच प्राणी कुठली न कुठली भाषा वापरतात . पण फक्त संवाद साधने इतकीच त्यांची भाष्य मर्यादित राहते , आपली भाषा मात्र इतरही अनेक गोष्टी करू शकते,
कसे ते पुढच्या भागात येईल.

ज्योति अळवणी's picture

23 Mar 2017 - 1:45 pm | ज्योति अळवणी

खूप मस्त, माहितीपूर्ण तरीही सोप्या भाषेत लिहिता तुम्ही.

++११

सरल पण सोपेकरण न करता..

प्रत्येक भाग उत्तम व संग्रहणीय!

केदार-मिसळपाव's picture

23 Mar 2017 - 2:24 pm | केदार-मिसळपाव

खुप नविन ग्रहतीकं आहेत.

सुंदर माहिती मिळतेय..

दीपक११७७'s picture

23 Mar 2017 - 11:52 pm | दीपक११७७

अप्रतिम माहिती

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2017 - 3:36 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे मालिका. पुभाप्र.

लोनली प्लॅनेट's picture

25 Mar 2017 - 11:50 am | लोनली प्लॅनेट

पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली असेल तीवर सजीव कसे निर्माण झाले असतील, डायनॉसॉर सारख्या महाकाय प्राण्यांचा काळ, त्यांचे नष्ट होणे नंतर मानव कसा निर्माण झाला असेल त्याने संपूर्ण पृथ्वी कशी पादाक्रांत केली असेल.. विश्वाबद्दल प्रचंड कुतूहल असल्यामुळे मी या गोष्टींची सतत माहिती मिळवत असतो
तुमची लेखमाला वाचताना माहितीचा खजिनाच गवसल्याचा आनंद होतो आहे..
सुंदर लेखमाला

पद्मावति's picture

25 Mar 2017 - 7:46 pm | पद्मावति

+१
खरोखर सुंदर लेखमाला.

निशाचर's picture

26 Mar 2017 - 5:45 am | निशाचर

माहितीपूर्ण लेखमाला

प्रमोद देर्देकर's picture

27 Mar 2017 - 5:42 am | प्रमोद देर्देकर

माहितीपूर्ण मालिका आहे. सगळे भाग आत्ताच वाचून काढले. येवू द्या अजून.