'सामान्यातले असामान्य' हा विषय महिला दिनानिमित्त मिळाला नि खूप साऱ्या व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. कोणाची बरे मुलाखत घेऊ या? या विचारात असतानाच महालक्ष्मी सरस २०१७च्या तारखा जाहीर झाल्या. महिला बचत गटाचे शासनातर्फे भरणारे हे प्रदर्शन सामान्यातून असामान्यत्वाचेच दर्शन घडवीत असते. सरससाठी एखादा दिवस पुरात नाही. किमान तीनचार फेऱ्या तर कराव्याच लागतात. त्यातून २००७पासून या प्रदर्शनात भेटणाऱ्या सख्या आठवल्या. अतिशय कठोर परिश्रमाने आपल्याबरोबर इतरांचीही परिस्थिती पालटणाऱ्या आणि थोडे मार्गदर्शन मिळाले की कमी शिकलेल्या आणि निरक्षर बायका काय करू शकतात, याची ही छोटीशी कहाणी त्यांच्याशी बोलून इथे मांडत आहे.
या कर्मनायिकांपैकी एक आहेत श्रीमती शांताबाई चिंधू वरवे. तिकोना गावात राहणाऱ्या, सातवीपर्यंत शिक्षण झाल्या झाल्या चौदा वर्षांच्या शांताबाईंचे, श्री. दत्तात्रेय शिंदे (व्यवसायाने शेतकरी) यांच्याशी लग्न झाले. सासरी खूप काम. दळण, कांडण, सारवण, धुणे, भांडी, चुलीवरला स्वयंपाक आणि नवऱ्यासह सासरच्या इतर लोकांनी केलेला छळ, यात छोटी शांता पिचून निघाली. छळ असह्य झाला की ती माहेरी येई, पण पुन्हा तिची रवानगी सासरी होई. अशी उमेदीची तीन-चार वर्षे गेल्यावर तिने सांगून टाकले की, मी काही सासरी जाणार नाही आणि घटस्फोट झाला. सासरी नामधारी का होईना, शेताची मालकीण असलेल्या शांतला दुसऱ्याच्या शेतात राबायची पाळी आली. कामाला सुरुवात केली, तेव्हा मजुरीचा दर दिवसाला १५ ते २० रुपये असे. कालांतराने दोनशे पेंढ्या गवत कापले की शंभर रुपये मिळत. पण कष्ट करून स्वाभिमानाने जगायला तिची काहीच हरकत नव्हती.
पवना धारणाखाली गेलेल्या सतरा गावातील लोकांसाठी श्री. जगदीश गोडबोले यांनी जीवन या संस्थेमार्फत पाणी वाचवा मोहिमेत काम करण्यासाठी तिथल्या प्रत्येक गावातून एका बाईला आपल्या संस्थेत घ्यायचे ठरवले, पण सगळ्यांसारख्याच नाही म्हणणाऱ्या शांताबाई वडलांच्या आग्रहामुळे तयार झाल्या. त्या वेळी त्यांना ५० रुपये मानधन मिळत असे. गावकऱ्यांचा उद्धार करायला गावाबाहेरून प्रत्यक्ष परमेश्वर अवतरला तरी गावकरी त्याला सहसा जुमानत नाहीत. त्यामुळे स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय कोणतेही सुधारणेचे काम करता येत नाही. मग शांताबाईंमुळे हळूहळू इतरही बायका संस्थेत काम करायला तयार झाल्या. पाणी परिषद मोहिमेतून या सतरा गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. गावांमध्ये दवाखाने नव्हते. जीवन संस्थेच्या दवाखान्यात जायला रोगी तयार नसत. लसीकरणाचे कार्यक्रम राबविण्यात शांताबाईंच्या ओळखीचा फायदा गावाला झाला. संस्थेतून त्या आनंदवन, हेमलकसा, मेळघाट, दिल्ली इथेही फिरून आणि तिथले जनजीवन जवळून पाहून आल्या. हळूहळू लोकांच्या ओळखी वाढू लागल्या. इंडो-जर्मन कपार प्रकल्प, नाझारे प्रकल्प अशा प्रकल्पांवर काम केले. पाणलोट कमिटीत काम केले. आताही त्या अंगणवाडीत काम करतात, स्वत:ला मूल नसले तरी गावाच्या मुलांना आपले मानून सांभाळतात. लसीकरणाबाबतची कारवाई स्वत: जातीने उभ्या राहून करवून घेतात.
गिरिजा गोडबोले यांच्या पाणी वाचविण्यासंबंधित प्रबंधाला, जो त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून लिहिला आहे, त्याला शांताबाईंची मदत झाली आहे असे त्यांनी नमूद केले आहे. गोडबोलेंच्या ओळखी शांताबाईंना आणि शांताबाईंच्या ओळखी गोडबोलेंना परस्पर पूरक ठरल्या. शांताबाई आता सभाधीट झाल्या. आपल्या कामासाठी कुठे जायचे, कोणाशी बोलायचे? कसे बोलायचे ते निर्भीडपणे ठरवू लागल्या. यातूनच डी.आर.डी.चे श्री. विकास कुडवे भेटले. त्यांनी पुण्यात दख्खन जत्रेसाठी यायची संधी दिली. यासाठी बचत गट स्थापन करण्याची आवश्यकता होती. आतापर्यंत शांताबाईंचा आवाका लक्षात घेतलेल्या गावातील बायकांचे हात पुढे आले आणि सावित्रीबाई फुले बचत गटाची स्थापना झाली. पहिली दोन वर्षे या बचत गटाने शासनाकडून सबसिडी घेतली. नंतर सबसिडी घेण्याची वेळच आली नाही. झटक्यात या बायका दारिद्र्यरेषेच्यावर पोहोचल्या होत्या.
पहिल्या वर्षी बचत गटाच्या सदस्या ५० किलो इंद्रायणी तांदूळ विक्रीसाठी आणि खाद्यमहोत्सवासाठी चुलीवरच्या भाकरी आणि चिंचार्ड्याची भाजी, ठेचा असा तोंडाला पाणी सुटणारा बेत घेऊन या जत्रेला आल्या. तांदूळ तर हातोहात खपलाच, त्याशिवाय भाजी-भाकरी-ठेचा हा बेत तब्बल तीस हजारांचा नफा मिळवून देणारा ठरला. मग काय? पुढल्या भीमथडीला या बायका ५०० किलो इंद्रायणी तांदूळ घेऊन हजर झाल्या. सावित्री महोत्सव, भीमथडी जत्रा यानंतर महालक्ष्मी सरस २००७मार्फत त्यांनी मुंबईवर स्वारी केली. त्याच वर्षीच्या सरसमध्ये माझी नि शांताबाईंची गाठ पहिल्यांदा पडली. मुंबईच्या बिगरमराठी हिंदी बोलणाऱ्या लोकांशीही त्यांनी व्यवहार जुळवून घेतला. सुरुवातीला दोन वर्षे मसाला वांगी, मिरची ठेचा, चुलीवरच्या भाकरी न चुलीवरचेच, पाट्यावर वाटलेला मसाला घालून केलेले मटण असा बेत असे. पण तांदळाचाच व्यवहार इतका वाढू लागला की खाण्याचा स्टॉल बंद करावा लागला. शिवाय एका बचत गटासाठी दोन स्टॉल दिले जात नाहीत, हा शासकीय नियम आडवा आला. त्या जेवणाची चव अजूनही जिभेवर आहे.
यात शांताबाईंच्या मदतीला आल्या श्रीमती बेबीबाई बळीराम मोहोळ. शांताबाईंच्या आतेभावाने त्यांना शहाणपणाचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला, "ती एक नाचते तर नाचते. तू कुठे तिच्यासंगे निघालीस?” पण त्यांनी तो सल्ला मनावर घेतला नाही. याही २००७मध्येच पहिल्यांदा भेटल्या. गर्दीच्या वेळी हिशेब करायला मदत केली, म्हणून ”वाईच थांबा” म्हणत यांचा बचकभर ठेचा चटकन पाट्यावर वाटून माझी फी म्हणून मला दिला होता. मीही त्यांचा मान राखून ती चविष्ट फी स्वीकारली होती. यांचेही चौदाव्या वर्षीच लग्न झाले. नवरा यांचा सख्खा आतेभाऊ. घरची शेती होती. पण विसाव्या वर्षी पाच आणि दोन वर्षांच्या मुली पदरात घेऊन माहेरच्या आश्रयाला यावे लागले, कारण दुसरी बाई. एकुलती एक मुलगी असल्याने आईवडिलांकडे राहू लागल्या. शेतजमीन विकून, बक्कळ पैसा मिळवून, दुसरी बाई ठेवलेल्या नवऱ्याला तेही रुचेना. मग त्या कधी सहा किलोमीटरवर असलेल्या दुसऱ्या गावात मामाकडे, तर कधी दहा किलोमीटरवर असलेल्या मावसभावाकडे राहून जीवन कंठू लागल्या. त्या घर बांधण्याच्या कामावर काम करत, तर कधी कुणाच्या शेतात राबत. नंतर बचत गटात आल्यापासून मात्र मोलमजुरी बंद झाली. घरकूल योजनेतून कर्ज मिळवून त्यात स्वत:ची भर घालून घर बांधलं, मुलींची लग्न केली. मुलींची लग्न होईपर्यंत त्रास देणारा नवरा, जावई मदतीला आल्यावर गप्प झाला. या निरक्षर असूनही स्मरणशक्ती, गणित चांगले असल्याने तांदळाच्या नावाबरोबर दराच्या पाट्या लिहिता-वाचता येत नसल्या, तरी अक्षरांची नि आकड्यांची चित्रे लक्षात ठेवून बरोबर त्या-त्या प्रकारच्या तांदळाच्या पोत्यात घालतात.
यांच्या सोबत सुमनताईही आल्या. श्रीमती सुमन परशुराम साळुंके या दगड फोडण्याच्या कामावर मजुरी करत असत. बचत गटात आल्या नि दिवस पालटले. दोन मुले न एक मुलगी. त्यांना शिकवले. एक बारावीपर्यंत शिकला न् दुसरा तेरावीपर्यंत, मुलगी दहावी झाली. बारावीपर्यंत शिकलेला वॉचमनची नोकरी करतो आणि त्याची बायको नर्स आहे, तर तेरावीपर्यंत शिकलेला ठेकेदार आहे, त्याची बायको पोलीस हवालदार आहे. गिऱ्हाईकांशी बोलणे, माल वजन करून देणे यात शांताबाई एक्स्पर्ट. पसा, मूठ तांदूळ जास्त गेले तरी गिर्हाइक टिकले पाहिजे ही व्यवसायनीती आत्मसात केलीय. बिझिनेस मॅनेजमेंट याहून काही वेगळं असतंय का?
या वेळी त्यांच्यासोबत एक नवीन शिकाऊ कार्यकर्ती दिसली. श्रीमती गऊबाई अरुण मोहोळ. मुलगा हवा म्हणून चार मुली होऊ दिल्या. मालक चांगले आहेत, पण खाणारी तोंडे इतकी वाढली म्हणताना रस्त्याच्या बाजूला वाढणारे गवत कापणे, रस्त्याची कामे करणे या कामांवर मजुरीला जाणाऱ्या गाऊबाईंना बचत गटाचा रस्ता शांताबाईंकडून दाखवला गेला नि घराचा कायापालट होऊ लागला. त्यांच्या नाकाची एक नस चोकअप झाल्यामुळे सतत सर्दी होई आणि कानाचा पडदाही फाटला होता. शांताबाईंनी ८०,००० रुपये खर्च असलेली शस्त्रक्रिया श्रीमती गिरिजा गोडबोले यांच्या सहकार्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चॅरिटेबल ट्रस्टकडून विनामूल्य करवून घेतली. आता गऊबाईही मुलींना शिकवून मोठे करायच्या विचारात आहेत.
सुरुवातीला ३६ रुपये किलो असणारा इंद्रायणी तांदूळ आता ९० रुपये किलो झाला आहे. त्याशिवाय आंबेमोहोरही जोडीला आला आहे. सर्व तांदूळ हातसडीचा असतो. त्यात पॉलिश्ड आणि अन्-पॉलिश्ड असा दोन्ही प्रकारचा तांदूळ असतो. सुरुवातीला ५० किलोने सुरू झालेला व्यापार आता दोन टनांवर पोहोचला आहे. इतका तांदूळ येतो कुठून? सुरुवातीला बचात गटातल्या बायकांच्या शेतात होणारा तांदूळ विकत घेऊन तो सडला जात असे. आता सगळ्या गावातल्याच जमिनीतला माल घेतला जातो, शेतकरीण बचत गटाची सभासद होते. दोन बायकांच्या उपस्थितीत माल मोजून घेतला जातो. आता सदस्यसंख्या १५०च्या आसपास असणाऱ्या या बचत गटाची 'अस्मिता भुवन' नावाची स्वत:ची इमारत आहे, त्या इमारतीत दोघांचे गट करून, भात कांडून तांदूळ बनवला जातो. रोखीचा मामला असल्याने काही अडचण राहत नाही. आलेल्या नफ्यातून बचत गटाच्या सदस्यांचा वर्षभराचा किराणा, तेल, कडधान्य, डाळी, तांदूळ, भरून दिला जातो. एकदम घेतल्याने तिथेही पैशाची बचत होतेच. मग उरलेले पैसे वाटले जातात. इतके करून उरलेला तांदूळ पवनानगर परिसरात येणारे पर्यटक आणि प्रवीण मसाले, डॉ. मेहता आयुर्वेदिक हॉस्पिटल, कविता कौशिक यांचा मैत्री ग्रूप इथे ठोक भावाने दिला जातो.
यंदाच्या सरसमध्ये पाहिलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शांताबाई paytmही सराईतपणे वापरताना दिसल्या. त्यांचा आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींचा पुढचा विचार आहे 'मावळ स्वाभिमानी प्रॉडक्ट' या नावाखाली व्यवसाय सुरू करायचा. पण, प्रॉडक्ट नेमके काय असावे हे अजून विचाराधीन आहे. त्यांच्या या नव्या साहसाला शुभेच्छा देऊन ही साठा उत्तरांची सुफळ कहाणी संपूर्ण करते.
कामाला सुरुवात करण्यापूर्वीचे निवांत क्षण आणि गिऱ्हाइकांशी आत्मविश्वासाने बोलणाऱ्या बेबीबाई आणि सुमनताई.
सफलतेचा आनंद मिरवणारे चेहरे - श्रीमती बेबीबाई, गऊबाई, शांताबाई आणि सुमनताई.
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 8:00 pm | प्रीत-मोहर
सरस!! खरच आदर्शवत बायका आहेत या.
धन्यु ताई यांची ओळख करून दिलदयाबद्दल
9 Mar 2017 - 5:43 am | रेवती
कर्तबगार महिलांची ओळख आवडली.
9 Mar 2017 - 9:03 am | पलाश
परिस्थितीशी दोन हात करून आयुष्य सावरणार्या बायकांची ही सत्यकथा खूप काही शिकवून जाते. छानच लिहिलं आहे.
9 Mar 2017 - 10:10 am | अजया
फार छान ओळख या स्वयंसिध्दांची.
9 Mar 2017 - 8:36 pm | आरोही
+1 ... लेख आवडला ताई ..
10 Mar 2017 - 12:24 pm | सुचेता
आवडला ग लेख
9 Mar 2017 - 4:53 pm | सस्नेह
अस्सल स्वयंसिद्धा !
9 Mar 2017 - 5:10 pm | गिरकी
काहीतरी करण्याची जिद्द खरी !!
9 Mar 2017 - 8:40 pm | मीता
स्वयंसिद्धांची ओळख आवडली ..
9 Mar 2017 - 9:22 pm | पद्मावति
क्या बात है. खरोखर स्वयंसिद्धा!
10 Mar 2017 - 3:30 am | सविता००१
या खर्या स्वयंसिद्धा.
10 Mar 2017 - 4:34 am | जुइ
या स्वयंसिध्दांची ओळख आवडली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही डगमगुन न जता आपले आणि आपल्यासारख्या इतरांचे जीवन पुन्हा वसवले!
10 Mar 2017 - 8:57 am | पैसा
नतमस्तक आहे! शिक्षण सुद्धा नसताना एवढे मोठे काम!!!
सुरन्गी, हा लेख कसाही त्यांच्यापर्यंत पोचव. त्यांचं आम्ही कौतुक केलंय हे त्यांना कळू दे!
13 Mar 2017 - 10:32 am | नूतन सावंत
नक्कीच पैताई.
10 Mar 2017 - 4:20 pm | कपिलमुनी
ओळख छान !
( अवांतर : ३६ रुपये किलो असणारा इंद्रायणी तांदूळ आता ९० रुपये किलो झाला आहे ! फारच महाग आहे हो )
13 Mar 2017 - 10:31 am | नूतन सावंत
मुनिवर,त्यांचे कष्ट पाहता हा दर कमीच आहे,हाताने उखळात सडतात या बायका.आणि दीडशे बायका दोन टनांपेक्षा जास्त तांदूळ सडतात.शिवाय उत्पादनही त्यांचेच असते.तिथेही त्या स्वत:च राबत असतात.
10 Mar 2017 - 11:15 pm | इशा१२३
अशा कष्टकरी स्वयंसिद्धा पाहिल्या कि _/\_
छान लेख ताई. अशा कष्टकरि महिलांची दखल घ्यायच तुला सुचल हे विशेषच.
10 Mar 2017 - 11:24 pm | स्वाती दिनेश
ह्या कर्तबगार स्वयंसिध्दांची ओळख आवडली,
स्वाती
11 Mar 2017 - 10:58 am | पियुशा
वाह !! कर्तबगार स्वयंसिध्दां खरच :)
11 Mar 2017 - 2:23 pm | Maharani
फारच छान ओळख करून दिली. जिद्दी बायका खरच
11 Mar 2017 - 5:16 pm | मोनू
खरोखर स्वयंसिद्धा...करीअरीस्ट बायका म्हणजे फक्त उच्चशिक्षीत या कल्पनेला छेद देणार्या स्त्रिया... त्रिवार वंदन !
सुरंगीताई खूप खूप आभार.
11 Mar 2017 - 9:44 pm | मोक्षदा
फारच सुंदर लेखपुढच्यावर्षि घेतेच तांदूळ
11 Mar 2017 - 10:22 pm | जव्हेरगंज
लेख आवडला!!
13 Mar 2017 - 10:41 am | मोदक
__/\__
14 Mar 2017 - 12:17 am | इडली डोसा
बेबीबाई, गऊबाई, शांताबाई आणि सुमनताई यांच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम. सुरंगीताई अश्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अफाट कार्यशक्ती असलेल्या स्वयंसिद्धांची ओळख करुन दिल्याबद्दल खूप खूप आभार!
14 Mar 2017 - 1:44 am | राघवेंद्र
लेख आवडला !!!
खूपच प्रेरणादायी !!!
14 Mar 2017 - 12:02 pm | रागिणी९१२
मुलाखत फार आवडली.
15 Mar 2017 - 12:23 pm | भुमी
या स्वयंसिद्धांची छान माहिती दिलीस सुरंगीताई...
18 Mar 2017 - 11:42 am | पूर्वाविवेक
मुलाखत/ओळख आवडली, सुरंगी ताई. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःला सिद्द करणाऱ्या या स्त्रिया आहेत. _^_
19 Mar 2017 - 3:50 am | प्रश्नलंका
मस्तच लेख!! स्वयंसिध्दांची ओळख आवडली.
23 Mar 2017 - 6:34 pm | एमी
वा!! मस्त लेख!!
अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही डगमगुन न जता आपले आणि आपल्यासारख्या इतरांचे जीवन पुन्हा वसवले! >> +1 __/\__
6 Apr 2017 - 4:37 am | रुपी
छान लेख. ओळख आवडली.