||कोहम्|| भाग 3

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जनातलं, मनातलं
19 Mar 2017 - 9:06 pm

Part 1

Part 2

कोहम्

भाग 3

मागच्या भागात आपण होमो या मानवाच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती घेतली आणि त्याच बरोबर त्यांची थोडीशी वैशिष्टही समजून घ्यायचा प्रयत्न केला.

पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती अशी की या प्रजातींना जरी आपण वेगवेगळ्या स्पिसीज म्हणत असलो तरी याचा अर्थ हा नाही की त्या गाढव आणि घोड्यासारख्या, बऱ्याचश्या मिळत्या-जुळत्या दिसणाऱ्या पण जनुकीय दृष्ट्या पूर्ण वेगळ्या प्रजाती होत्या, आणि असाही नाही की त्या कुत्र्याच्या जातींसारखे फक्त दिसायला वेगळे पण सहजपणे संकर होऊ शकणारे प्राणी होते. उत्क्रांतीच्या पट्टीवर हे सगळे जीव आणि समुदाय कुठेतरी मध्ये उभे होते. कसे? सांगतो,

एकत्र कुटुंबातून जेंव्हा एखादं जोडपं वेगळं निघून स्वतःच घर करतं, तेंव्हा त्याचे काही टप्पे असतात, सुरवातीला झोपायची खोली वेगळी होते, मग वस्तू वेगळ्या होतात, हळूहळू चूल वेगळी होते आणि मग ते कुटुंब वेगळं घर म्हणून ओळखलं जातं. निसर्गात जेंव्हा एखादी नवीन प्रजाती तयार होते, तेंव्हा अर्थातच ती एकदम अवतीर्ण होतं नाही. तिचे कुणीतरी पूर्वज असतात, या पूर्वजांपासून एकाच वेळी अनेक प्रजाती फुटून जगात येण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थातच या सगळ्या प्रजाती आपल्या पूर्वजाशी आणि एकमेकांशी अत्यंत सारख्या असतात. त्या एकमेकांशी सहजपणे संकर करू शकतात, त्यांना अपत्य होऊ शकतात आणि त्या अपत्यांनाही पुढे संतती होते. उत्क्रांतीचा हा प्रवाह असा एखाद्या पाण्याच्या अनिर्बंध लोंढ्यासारखा ज्या दिशेने वाट मिळेल तिकडे सुसाटत पुढे जात असतो. ज्या प्रवाहात जास्त पाणी असेल तो इतरांना आपल्याकडे खेचतो आणि मग त्याची नदी बनते, तसंच ज्या प्रजाती जास्त अपत्य जन्माला घालून त्यांना जगवू शकतात त्या प्रजाती यशस्वी होतात आणि इतर त्यांच्यात विलीन होतात किंवा संपून जातात. उत्क्रांतीच्या पट्टीवर असा एक बिंदू येतो, ज्याच्या मागे या सगळ्या प्रजाती एकमेकांशी मिसळू शकत असतात आणि ज्याच्या पुढे त्यांच्यातील संकर अयशस्वी ठरतो. मानवी इतिहासात हा बिंदू साधारण 50000 वर्षांपूर्वी आला असं मानलं जातं.

हे अजून नीट समजून घेण्यासाठी आपल्याला, उत्क्रांती कशी होते आणि सजीव आपल्या पर्यावरणाला प्रतिसाद देतं स्वतःला कसे बदलतात, हे समजून घ्यावं लागेल. यासाठी आपण एक साधं उदाहरण घेवू, DDT आणि डासांचे..

Dichlorodiphenyltrichloroethane किंवा मराठीत DDT हे एकेकाळी रामबाण कीटकनाशक समजलं जायचं. हे कीटकांच्या मज्जातंतूतले सोडियम आयन चॅनेल ओपन करतं आणि मज्जासंस्था विस्कळीत करतं, विस्कळीत झालेल्या मज्जासंस्थेसह कोणताही कीटक जास्त काळ जगू शकत नाही, पुनरुत्पादन करू शकत नाही, तो मरतो. पण काही कीटक मात्र या DDT ला दाद देतं नाहीत, का? कारण त्यांच्या जनुकात जरासं वेगळेपण असतं. हे वेगळेपण म्युटेशन नावाच्या एका अपघाती जनुकीय बदलामुळे येतं. या बदलामुळे हे कीटक इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारची प्रथिनं तयार करतात आणि हि प्रथिनं असल्याने DDTचा त्यांच्यावर परिणाम होतं नाही. साहजिकच इतर कीटक जेंव्हा DDT ने मरत असतात तेंव्हा हे मात्र सुखनैव वाढतात, त्यांची संतती वाढते, त्यांच्यातील ते जनुकीय वेगळेपण असलेलं म्युटेशन सगळ्या किटकांमध्ये पसरतं आणि हळूहळू हि कीटकांची संपूर्ण जात त्या DDT ला दाद देईनाशी होते. हल्ली डास DDT ने अजिबात मरत नाहीत याचं कारण हे आहे. हि आहे डासांची उत्क्रांती.. जया पद्धतीने साध्या डासांपासून DDT प्रूफ डास तयार झाले, साधारण त्याच पद्धतीने लांब मानेचा जिराफ, सोंड असलेला हत्ती, नखं असलेला सिंह आणि दोन पायांवर चालणार माणूस तयार झाला.

आणि याचं पद्धतीने साधारण 50000 वर्षांपूर्वी मानवी वंशात असा एक बिंदू आला की त्याच्या पुढे होमो सेपियन हा इतर सगळ्या होमो प्रजातींपासून पूर्ण वेगळा झाला, त्यापुढे त्यांच्यात यशस्वी संकर घडले नाही.

इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे म्युटेशन हे अपघाती असतं. निसर्गात होणारे जनुकीय बदल हे अपघाती आणि दिशाहीन असतात. आपण अमुक बदल केला तर DDTचा आपल्यावर परिणाम होणार नाही हे कोणत्याही डासाला माहीत नसतं. त्याच्या शरीरात तो बदल अपघाताने होतो आणि जर तो फायदेशीर असेल तर तो डास जास्त जगतो. जास्त जगल्यामुळे त्याला पुनरुत्पादनाच्या जास्त संधी मिळतात आणि त्याचा फायदा आपोआप त्याच्या वंशजांना मिळून संपूर्ण प्रजातीत त्यांचे प्राबल्य वाढते. आपल्या हाताच्या अंगठ्याचे बोटं इतर चार बोटांपेक्षा दूर असले तर आपली पकड अजून मजबूत होईल हे आपल्या पूर्वजाला माहीत नव्हतं, पण अपघाताने असा एखादा जन्माला आला, मग या सोयीमुळे तो जास्त जगला, त्याला जास्त मुलं झाली आणि हळूहळू आपल्या सगळ्यांचे अंगठे माकडांना ठेंगा दाखवण्या इतपत बदलले. थोडक्यात, Nature is enormous but not intelligent. मानव मात्र फार पूर्वीपासून स्वतःला हवे ते जनुकीय बदल असलेले सजीव वाढवतोय, हल्ली तर तयार सुद्धा करतो.

उत्क्रांती आणि तिच्या कारणांबद्दल हे सगळं जाणून घेतलं कि आपण परत एकदा 2 लाख वर्षा पूर्वीच्या त्या पृथ्वीवर परत येऊ, जिथे एकाच वेळी अनेक मनुष्य जाती वसत होत्या, टोळ्या करून राहत होत्या. होमो इरेक्टससारख्या काही तब्बल 18 लाख वर्ष स्वतःला घडवत होत्या तर होमो सेपियन हे नुकतेच आपल्या पितामहांपासून वेगळे निघाले होते. अजूनही अनेक ठिकाणी, खास करून आफ्रिकेत नवीन नवीन प्रजाती जन्माला येतं होत्या आणि काही नाहीशा होतं होत्या.

अशा परिस्थितीत असं काय घडलं, असा कोणता बदल पुढे आला की होमो सेपियनने इतर सगळ्या प्रजातींना मागे सारून या पृथ्वीवर एकछत्री अंमल सुरु केला? त्याच्यापेक्षा जुना होमो इरेक्टस किंवा अत्यंत बलवान आणि मोठा मेंदू असलेला निण्डेरथल इथून कसा नाहीसा झाला?

बघूया पुढच्या भागात..

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

19 Mar 2017 - 9:17 pm | जव्हेरगंज

मस्त!!

शैलेन्द्र's picture

19 Mar 2017 - 10:13 pm | शैलेन्द्र

धन्यवाद

अनन्त अवधुत's picture

19 Mar 2017 - 11:35 pm | अनन्त अवधुत

प्रत्येक भाग वाचनीय आहे.

अनन्त अवधुत's picture

19 Mar 2017 - 11:35 pm | अनन्त अवधुत

प्रत्येक भाग वाचनीय आहे.

ज्योति अळवणी's picture

20 Mar 2017 - 12:13 am | ज्योति अळवणी

अप्रतिम सुंदर माहिती. प्रत्येक भाग उत्कंठा वाढवतो आहे आणि तुमची भाषा सायंटिफिक असली तरी ओघवती आणि सहज समजेल अशी आहे.

पुढचा भाग टाकाच लवकर

एस's picture

20 Mar 2017 - 1:03 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

झिंगाट's picture

20 Mar 2017 - 8:13 am | झिंगाट

एवढा किचकट विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची पद्धत आवडली.....
पु. भा. प्र.

माहितगार's picture

20 Mar 2017 - 9:27 am | माहितगार

लेखन रोचक आहे वाचतो आहे. पुढील वाक्य वाचून एक शंका आली

निसर्गात होणारे जनुकीय बदल हे अपघाती आणि दिशाहीन असतात.

हे पटते पण तरीही एक प्रश्न मनात उभा रहातो. सजीवांची काही शारीरीक वैशिष्ठ्ये आणि क्रिया या भिन्न लिंगीस आकर्षित करण्यासाठी असतात असे म्हटले जाते; लांडोरीला आकर्षित करण्यासाठी मोराचे पिसारा फुलवणे हे उदाहरणा दाखल घेऊन, मग हि आकर्षित करण्यासाठीची वैशिष्ट्ये अंगिकारली जाण्यासाठी होणारे जनुकीय बदल कसे होतात ? तेही अपघाती असतात किंवा कसे ?

शैलेन्द्र's picture

20 Mar 2017 - 11:59 am | शैलेन्द्र

फार चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे, इथे एक लक्षात घ्या की हे जे शारीरिक वैशिष्ट्य असतात ते बहुदा इतर शारीरिक क्षमतांचे निर्देशक असतात, म्हणजे धष्टपुष्ट शरीर, पक्षांच्या बाबतीत चांगला पिसारा, वाघाची दात किंवा मोठा जबडा हे उत्तम आरोग्याचे पर्यायाने जगण्याच्या शर्यतीत अधिक सक्षमपणे टिकून राहण्याची शक्यता दर्शवते, त्यामुळे भिन्न लिंगी प्राणी तिकडे आकर्षित होतो. अर्थात मी हे अगदीच सुलभ करून सांगायचा प्रयत्न करतोय, हे बरंच कॉम्प्लेक्स आहे. दुसरी गोष्ट, मानवाने जेनेटिक कोड वर अंशतः विजय मिळवला असल्याने, त्याचे आकर्षण केंद्र वेगळे असतात.

शैलेन्द्र's picture

20 Mar 2017 - 12:00 pm | शैलेन्द्र

बदल अपघातीच असतात

माहितगार's picture

23 Mar 2017 - 1:46 pm | माहितगार

जवळपास पटलेच तरीही डोक्यात जरासा गोंधळ बाकी आहे.

उत्तम आरोग्याचे पर्यायाने जगण्याच्या शर्यतीत अधिक सक्षमपणे टिकून राहण्याची शक्यता दर्शवते,

आकर्षण वाटणार्‍या अंगप्रत्यंगाच्या सुबकतेचा प्रत्येकवेळी 'सक्षमपणे टिकून राहण्याची शक्यते'शी संबंध असतो का ? एखाद्या मोराचा पिसारा तेवढा डोलदार नसेल तर तो त्याची 'सक्षमपणे टिकून राहण्याची शक्यता कमी म्हणता येते का ?

शैलेन्द्र's picture

23 Mar 2017 - 2:01 pm | शैलेन्द्र

सुबकपणा हि फार सापेक्ष गोष्ट आहे, एकादी स्त्री किंवा पुरुष सुंदर आहे असं आपण म्हणतो तेंव्हा आपण त्या चेहऱ्याचे किंवा शरीराचे माप घेत नाही, एका संशोधनानुसार "मानवी सौंदर्य" हे आपण पाहिलेल्या चेहऱ्यांची सरासरी असते.
कमीत कमी प्राण्यांमध्ये तरी अवयवांचा या गोष्टी मेंदूत हार्डवेअरड असतात. प्राण्यांच्या बाबतीत हे संपूर्णपणे जनुकीय प्रेरणेने घडते, पण मानव मात्र आपल्या बुद्धिमत्तेने जनुकीय प्रेरणेच्या पुढे जाऊ शकतो.

मोर किंवा इतर पक्षांच्या बाबतीत असा पिसारा त्यांचे एकंदर आरोग्य दर्शवतो

प्रसाद_१९८२'s picture

20 Mar 2017 - 10:35 am | प्रसाद_१९८२

उपयुक्त माहीतीपूर्ण लेखमाला.

या लेखमालेच्या संबधीत एक माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी.

The Story Of Earth And Life

शैलेन्द्र's picture

20 Mar 2017 - 2:11 pm | शैलेन्द्र

मस्त

पुंबा's picture

20 Mar 2017 - 12:56 pm | पुंबा

फार मस्त लेखमालीका. अनेक क्लिष्ट गोष्टीदेखील सरल करून सांगताहात तुम्ही. पुभाप्र.

शैलेन्द्र's picture

20 Mar 2017 - 8:11 pm | शैलेन्द्र

धन्यवाद

केदार-मिसळपाव's picture

20 Mar 2017 - 5:18 pm | केदार-मिसळपाव

लै म्हणजे लै लै भारी.

शैलेन्द्र's picture

20 Mar 2017 - 8:11 pm | शैलेन्द्र

धन्यवाद

सही रे सई's picture

20 Mar 2017 - 7:52 pm | सही रे सई

वाचनीय आणि रोचक अशी ही लेखमाला आहे.. बरीच नवीन माहिती मिळत्ये आणि मनातल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं पण..

मराठी_माणूस's picture

21 Mar 2017 - 12:31 pm | मराठी_माणूस

एक असे वाचले होते की मानवाचा जन्म प्रथम आफ्रीकेत झाला आणि नंतर हा मानव इतरत्र पसरला. ह्यात 'मानव' म्हणजे कोणती प्रजाती अभिप्रेत आहे. आफ्रीकेतुन ही प्रजाती पुर्ण जगभर कशी गेली ? आणि जिथे जिथे गेली तिथे ती स्वतंत्रपणे उत्क्रांत होत गेली का ?

शैलेन्द्र's picture

21 Mar 2017 - 5:16 pm | शैलेन्द्र

आफ्रिकेला, त्यातही पूर्व आफ्रिकेतल्या इथिओपिया वगैरे देशांना मानव वंशाचा पाळणा म्हटलं जातं, या ठिकाणी मागच्या 55/60 लाख वर्षात अनेक मानव वंश जन्माला आले. मानव वंश म्हणजे ज्याला शास्त्रज्ञ "homo" ह्या जिनस मध्ये टाकतात ते सगळे.. होमो सेपियन हा त्यामानाने अगदी अलीकडचा.. त्याआधी शेकडो मानव वंश तयार झाले असतील आणि नष्टही झाले असतील.
यातले त्यातल्या त्यात यशस्वी झालेले मानव पुढे प्रवास करत जगभर पसरले. तिथे त्यांच्यात अजून बदल होत गेले, पण शेवटी होमो सेपियन या मानवाने त्यांना सामावून घेतले किंवा संपवले. अर्थात ही एक थेअरी आहे, दुसऱ्या थिअरी नुसार, मानव हा औरंगुतान पासून विकसित झाला.. विज्ञान कधीच थांबत नाही, बघू पुढे अजून काय काय पुरावे मिळतात.

लेख माहितीपूर्ण अाहे. आावडला. नंदा खरे यांचे कहाणी मानव प्राण्याची हे या विषयावरचे मराठीतले एक सुंदर पुस्तक. खूप रोचक पध्दतीने लिहीले अाहे. तसेच, सुलभा ब्रम्हनाळकर यांचे गोफ जन्मांतरीचा हे पुस्तकही उत्क्रांती या विषयाचा एका मर्यादेत (जनुकीय शास्त्र) वेध घेते. दोन्ही पुस्तके अवश्य वाचण्यासारखी अाहेत.

शैलेन्द्र's picture

21 Mar 2017 - 5:17 pm | शैलेन्द्र

धन्यवाद, वाचतो

वाचूका's picture

21 Mar 2017 - 2:04 pm | वाचूका

पल्या हाताच्या अंगठ्याचे बोटं इतर चार बोटांपेक्षा दूर असले तर आपली पकड अजून मजबूत होईल हे आपल्या पूर्वजाला माहीत नव्हतं, पण अपघाताने असा एखादा जन्माला आला, मग या सोयीमुळे तो जास्त जगला, त्याला जास्त मुलं झाली आणि हळूहळू आपल्या सगळ्यांचे अंगठे माकडांना ठेंगा दाखवण्या इतपत बदलले. हाहाहा.... विज्ञान इतके विनोदी प्रकारे संगता येते हे आता समजले...

पैसा's picture

21 Mar 2017 - 4:34 pm | पैसा

फारच सुरेख! प्रतिसादही छान वाचनीय येत आहेत.

पद्मावति's picture

21 Mar 2017 - 6:21 pm | पद्मावति

फार माहितीपूर्ण मालिका. खूप आवडतेय.

सविता००१'s picture

22 Mar 2017 - 4:42 pm | सविता००१

खूप माहितीपूर्ण मालिका आहे. आणि तुम्ही सांगताय पण अतिशय चांगल्या प्रकारे. आजच सगळे भाग वाचले. मस्तच. कुतूहल वाढलंय याविषयी.
छान, नवीन असं काहीतरी गवसल्याचा आनंद झालाय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

अध्यात्मिक असेल म्हणून धागा उघडला नव्हता. पण हे माहितीपर आहे. बरं चाललय.