माझा जन्मच डोंगराळ भाग आणि समुद्र याच्या आसपास झाल्याने लहानपणी टेकडी चढणे मला काही नवीन नव्हते. आमची शेती आणि माझे आजोळ हे अगदीच डोंगरालगत होते. त्यामुळे लहानपणी आजोळी गेले की जवळची टेकडी चढणे नेहमीचेच असे. त्या टेकडीचीही खासियत अशी की थोड्या अंतरावर अरुणा इराणीचे फार्म हाउस असल्याने कोणे एके काळी तिथे जुन्या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. त्या काळी गॅस गावात पोहोचले नसल्याने चुलीसाठी लागणारे सरपण गोळा करण्यासाठी बायका लांबवर मोठ्या डोंगरावर जात असत. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भावंडेही आजी अन् माम्यांबरोबर जाऊन लाकूडफाटा जमा करायचो व छोटी मोळी बनवून डोक्यावर घेऊन यायचो. विरारच्या जीवदानीचा डोंगर तर लहानपणी कितीतरी वेळा चढले असेन. चढताना पायवाटेने चढायचे आणि उतरताना पायर्यांवरून उतरायचे हे ठरलेले असे. लहान असल्याने भरभर चढता यायचे, तेव्हा असे वाटायचे की ही मोठी माणसे इतकी कशी थकतात बरे!!! आमची कुलदेवता कार्ल्याची एकविरा देवी असल्याने लहानपणी तिथेही जाणे व्हायचेच. एकदा हाजी मलंगगडला रात्री चढलो होतो, पण अंधार असल्याने आणि लहान असल्याने कसे चढलो, ते आठवत नाही. तर अशी माझी नाळ डोंगरांशी घट्ट जुळली गेली होती. पण जसजशी मोठी होत गेले, तसतसे शिक्षण आणि नोकरी यामुळे डोंगर चढणे हे जवळजवळ बंदच झाले. तरीही प्रत्येक ठिकाणी डोंगर साथ द्यायला उभेच असत. खूप वर्षांनी 'जीवदानी' डोंगर चढण्याचा मोह झाला आणि अचानक लहानपणी आपण भराभर चढलो तरी मोठी माणसे दमून, थकून हळूहळू का चढतात, याचे उत्तर मिळाले. थोडे अंतर असूनही इतकी दमछाक झाली की आता असे धाडस पुन्हा होईल की नाही याची शाश्वती नव्हती. डोंगर उतरल्यावर पाय आहेत याची जाणीवही होईना. पण धाडस करून नंतर १ वर्षाच्या अंतरावर अशा २-३ फेर्या केल्या. २००९पासून मी शिर्डी पदयात्रेला जायला लागले. सुरुवातीच्या ५ दिवसांचा रस्ता हा डोंगरातूनच असल्याने घर जवळच आहे असे वाटते. जव्हारचे घाट, मोरचोंडी घाट सगळे आपलेच वाटतात. पण एकदा का नाशिक आले की घरापासून लांब आल्याची जाणीव होते.
८ मार्च २०१५च्या जागतिक महिला दिनानिमित्त सह्याद्री ग्रूपतर्फे आजोबागडला महिला विशेष ट्रेक जाणार आहे, असे माझी मैत्रीण कविता नवरे हिने कळवले. मी लगेचच माझे नाव नोंदवले. आजोबागडला जाण्यासाठी आसनगाव स्टेशनच्या बाहेर सकाळी ८ वाजता भेटायचे ठरले होते. मला त्यासाठी बोईसरहून आदल्या दिवशीच निघावे लागले. ८ तारखेला एकूण ५३ महिलांनी ट्रेकला हजेरी लावली. गडावर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यँत जाऊन परतायचे होते. तिथे पोहोचल्यावर सह्याद्री ग्रूपच्या मॅनेजमेंट टीमने समाधी, वीरगळ याबद्दल माहिती सांगितली. नंतर विरंगुळा म्हणून छोटे खेळ घेतले गेले. जेवून परतायला सुरुवात झाली. निसर्गाच्या सान्निध्यात दिवस खूपच छान गेला. ट्रेक मॅनेजमेंट टीमने ट्रेक खूप छान अरेंज केला होता. मुख्य म्हणजे ही टीम 'नो प्राॅफिट नो लाॅस' बेसिसवर ट्रेक अरेंज करते, हे या ग्रूपचे वैशिष्ट्य आहे. परतताना संपूर्ण खर्चाचा हिशेब करून उरलेले पैसे प्रत्येकीला परत दिले गेले. टीमचा प्रत्येक सदस्य सर्वाँची अगदी व्यवस्थित काळजी घेत होता. हे सर्व पाहून आता सर्व ट्रेक मी याच ग्रूपबरोबर करायचे ठरवले. पण हा ग्रूप दर महिन्याला ट्रेक अरेंज करतो हे माहीत नसल्याने मी पुढल्या महिला दिनाची आतुरतेने वाट पाहू लागले. ८ मार्च २०१६ला सोमवार असल्याने ७ मार्चला महिला विशेष ट्रेक 'वन ट्री हिल पाॅईंट माथेरान'ला जाणार असे कळले. या वेळी मिपाकर अजयालाही येण्याचे सुचवले. अजयाला जास्त चालण्याची सवय नसल्याने ती घाबरतच हो म्हणाली, पण शेवटच्या दिवसापर्यंत तिचे हो-नाही चालले होते. ट्रेकला जायचे म्हणजे मला नेहमीप्रमाणे बोईसरहून आदल्या दिवशी निघावे लागले. कविता नवरे हिच्या घरी ६ तारखेला मुक्काम करून ७ मार्चला ट्रेकला निघाले. मजल-दरमजल करत आणि अजयाला जोडीला घेऊन हा ट्रेक पूर्ण केला. वर चढल्यावर अजयाला जो काही आनंद झाला, त्याने सर्व शीण निवळला.
त्या ट्रेकमध्ये कळले की हा ग्रूप नाइट ट्रेकही अरेंज करतो. दरम्यान एप्रिलमध्ये माझी शिर्डी पदयात्रा झाली. २१ मेला पनवेलपासून काही अंतरावर असलेल्या दोढणी या गावातून ट्रेक सुरू होऊन माथेरानच्या सनसेट पॉईंटपर्यंत पोहोचायचे आहे. मी अगदी उत्साहात तयारी सुरू केली. रात्री १०ला पनवेल स्टेशनला पोहोचलो. तिथून जीपने दोढणी या गावी येऊन रात्री १ वाजता चढायला सुरुवात केली. अतिशय उन्हाळा असल्याने चढतानाही त्रास जाणवत होता. पण चांदण्या रात्रीत ट्रेकिंगची मजा काही औरच. वर आसमंतात विखुरलेले चांदणे आणि तसाच काहीसा नजारा पनवेल नगरीचा - खाली दूरवर चांदणे विखुरणारे चमचमते दिवे. रात्र असल्याने किती उंचावर चढलो आहोत हे समजत नव्हते. मजल-दरमजल करत आमचा शेवटचा ग्रूप पहाटे ४ला सनसेट पॉईंटला पोहोचला. तिथेच सर्व जण झोपलो. थोड्या दिवसांत जूनमध्ये मृगगडची घोषणा झाली. पुन्हा मिपाकर अजयाशी संगनमत करून ट्रेकला जायची तयारी केली. नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी प्रवास करून दादरला पोहोचून ट्रेकच्या दिवशी दादरहून सेंट्रल रेल्वेने कर्जत स्टेशनला पोहोचून तिथून खोपोली ट्रेन पकडली. लाउजे स्टेशनला उतरून चहापाणी करून मग गड चढायला सुरुवात केली. नेहमीच्या मानाने मृगगड थोडा कठीण वाटला चढायला. वर जाऊन सर्व पाहून खाली उतरायची वेळ आली, तेव्हा कळले - जिथून वर चढलो होतो, तिथूनच खाली उतरायचे आहे. आता झाली ना पंचाईत! माथेरानच्या दोन्ही ट्रेकना फक्त एका वेळी चढायचे होते आणि दुसर्या बाजूने गाडीने खाली यायचे होते. पण मृगगडला तसे नव्हते. मला जास्त उंचावरून खाली उतरताना भीती वाटते. मृगगडावरचा सर्वात उंचावरचा पॅच मला कठीण वाटत होता. सर्व जण एकेक करून उतरत होते आणि माझी धडधड वाढत चालली होती. तेवढ्यात पाऊसही सुरू झाला आणि मला उतरणे कठीण वाटू लागले. ग्रूपचे व्हॉलेंटियर्स सर्वांना उतरायला मदत करत होते. सर्वांच्या मदतीने कसाबसा तो कठीण पॅच उतरले आणि जी काही सुसाट पळत सुटले ती खाली उतरेपर्यंत काही थांबले नाही. पुन्हा दुसर्या ट्रेकची वाट पाहू लागले. जुलैमध्ये आडोशी धबधबा घोषित झाला आणि ग्रूपचे मुख्य - ज्यांना आम्ही कॅप्टन म्हणतो, त्यांनी मला आडोशी धबधब्याच्या अरेंजमेंट्स पाहण्यास सांगितले. पण नेमकी तापाने आजारी झाल्याने मला काहीही करता आले नाही आणि जाताही आले नाही, म्हणून ती संधी हुकली. त्यानंतर ऑगस्ट... वडाप धबधबा घोषित झाला, त्या वेळीही वडिलांच्या मोठ्या आजाराच्या धावपळीमुळे मला वडाप धबधब्याला जाता आले नाही.
त्यानंतर ऑक्टोबर २०१६मध्ये उंबरखिंडची घोषणा झाली. ग्रूपचे मुख्य कॅप्टन यांनी मला पुन्हा फोन करून ट्रेकच्या अरेंजमेंटस पाहण्यास सांगितले आणि ही संधी मात्र मला सोडायची नव्हती. कॅप्टन थोड्या दिवसांकरता हिमाचल प्रदेशला जाणार होते, त्यामुळे त्यांना अरेंजमेंट्स पाहणे जमण्यासारखे नव्हते. सगळ्या ट्रेकर्सकडून खर्चाचे पैसे घेणे, हिशेब ठेवणे वगैरे. ट्रेक लोणावळ्याच्या कुरवंडे गावापासून सुरू होऊन खाली चावणी गावात संपणार होता. सकाळचा नाश्ता, लोणावळ्यापासून कुरवंडे गावापर्यंत जीपची व्यवस्था, दुपारचे जेवण, चावणी गाव ते कर्जत रेल्वे स्टेशनपर्यंतची बस अशी सर्व व्यवस्था केली व लोणावळ्याला पोहोचून कुरवंडे गावापासुन ट्रेक सुरू केला. पावसाळ्यातले मनमोहक वातावरण, रिप रिप पाऊस, आजूबाजूला उतरलेले ढग पाहत पाहत डिसेंडिंग ट्रेकला सुरुवात केली. खाली चावणी गावात पोहोचायचे होते. या जागेवर शिवाजीराजे आणि त्यांचे मावळे थांबले होते या कल्पनेनेच अगदी भारावून गेलो होतो. सह्याद्रीवर ८ वर्षांनी कारवी फुलली होती. सर्व नजाराच अदभुत वाटत होता. सर्व जण अगदी भारावल्यासारखे चालत होते. पावसामुळे काही ठिकाणी निसरडे झाले होते. साधारण २ तास चालल्यानंतर एका निसरड्या जागेवर पाय घसरला आणि मी आदळलेच. फ्रॅक्चर नव्हते म्हणून हायसे वाटले, पण गुडघ्याला दुखापत झाली होती आणि चालताना लंगडू लागले. बर्याच ठिकाणी खाली उतरताना एक पाय खाली टाकून दुसरा दुखरा पाय हाताने उचलून खाली ठेव असा पुढचा प्रवास सुरू झाला. रमतगमत साधारण ५ तासांत चावणी गावी पोहोचलो. गावाच्या थोड्या आधी एक ओढा लागला आणि आपला शीण घालवायला सर्व पाण्यात भिजू लागले. कॅप्टनच्या मदतीने सर्व व्यवस्था अगदी चोख झाली होती. कर्जत स्टेशनला पोहोचेपर्यंत अगदीच लंगडत चालू लागले. नेहमीच्या ट्रेकर्सनी मला ट्रेनमध्ये चढायला आणि उतरायला मदत केली, तसेच कविता नवरेच्या घरी नेऊन पोहोचवले. पुढे १२ दिवस मी लंगडतच चालत होते. शेवटी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांच्या मते नी लॅटरल लिगामेंट स्प्रेन झाले होते. अॅलोपथी औषधे घ्यायचा कंटाळा, म्हणून मला जवळजवळ १ महिनाभर लंगडावे लागले.
पुढे नोव्हेंबरमध्ये बालदिन विशेष दोन दिवसीय लोहगड-विसापूर ट्रेक घोषित झाला. लहान मुलांना घेऊन लोहगड-विसापूर केले. तंबूत राहण्याची मज्जा अनुभवली. थोडा आत्मविश्वास वाढला, तसा मी या ग्रूपसाठी लोहगड लेडीज ट्रेक घोषित केला. पहिल्यांदा मॅनेजमेंटचे स्वयंसेवक घेऊन न जाता एकटीने ५५ बायकांना सुखरूप नेऊन सुखरूप आणण्याचे आव्हान मी पेलले. या ट्रेकमध्ये मला बरेच काही शिकायला मिळाले. अनुभवांची खाणच जणू. त्यानंतरचा मी अरेंज केलेला ट्रेक म्हणजे २९ जानेवारी २०१७चा कळसूबाई. कळसूबाई हे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर. ३५ जण गेलो होतो या ग्रूपमध्ये. खूपच छान झाला हा ट्रेक. आत्मविश्वासही वाढला, कारण मला स्वतःला उंचावर गेल्यावर भीती वाटते आणि कळसूबाई म्हणजे उंचच उंच शिखर. आता कुठे प्रवासाला सुरुवात झालीये आणि माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी आणि माझा आत्मविश्वास वाढवणारी माणसे म्हणजे आमच्या सह्याद्री ग्रूपचे कॅप्टन - मला माझ्याबद्दल जितका विश्वास नाही, तितका कॅप्टनचा माझ्यावर आहे, ते सदैव पाठीशी असतात; माझी मैत्रीण कविता नवरे - तिच्याकडे मी तिच्या घरातलीच एक या हक्काने राहते, कारण बोईसरसारख्या ठिकाणाहून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, एका दिवसात तर शक्यच नाही; आणि माझ्या या हौसेला पाठिंबा देणारी माझी मैत्रीण मिपाकर अजया या सगळ्यांमुळे माझी ट्रेकची हौस पूर्ण करू शकले. मला 'ट्रेकहिता' ही आणखी नवी ओळख मिळाली आहे. सह्याद्री ग्रूपमध्ये सतत माझी ओळख वाढत चालली आहे.
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 4:07 pm | कंजूस
>>'ट्रेकहिता' ही आणखी नवी ओळख मिळाली आहे. सह्याद्री ग्रूपमध्ये सतत माझी ओळख वाढत चालली आहे.>>
वा! असाच विश्वास वाढत जावो.
8 Mar 2017 - 5:18 pm | पूर्वाविवेक
शाब्बास ट्रेकहिता !
तुझा हा लेख समस्त मिपाकरांसाठी मार्गदर्शक ठरो. तुला तुझ्या पुढच्या चढाईसाठी शुभेच्छा.
8 Mar 2017 - 5:31 pm | प्रसाद_१९८२
अतिशय सुंदर लेख. खुप आवडला.
8 Mar 2017 - 5:59 pm | प्राची अश्विनी
ट्रेकहिता नाव वाचल्यावरच ओळखलं की तुझाच लेख असणार म्हणून. छान लिहिलाय. मलाही यायचंय, बघू कधी योग येतो ते.
11 Mar 2017 - 4:06 pm | त्रिवेणी
+१११
मस्त जमलाय कविता लेख.पुण्याजवळ ही जमवा ट्रेक म्हणजे माझ्यासारखे आळशी लोक निघतील ट्रेकसाठी.
12 Mar 2017 - 11:32 am | चौकटराजा
येकच उपाय मितान व अजया ला बोलवायचे.
9 Mar 2017 - 1:22 pm | सस्नेह
लगे राहो !
9 Mar 2017 - 1:25 pm | कविन
अशीच ट्रेक करत रहा केपी. मस्त लिहीलयस.
9 Mar 2017 - 5:09 pm | प्रीत-मोहर
वाह मस्त लिहिलाय लेख
. आत्ता कुठे सुरवात आहे. असेच अजुन खूप सारे ट्रेक कर. ऑल द बेस्ट
11 Mar 2017 - 5:00 pm | पद्मावति
मस्त लेख!
11 Mar 2017 - 5:49 pm | स्वप्नांची राणी
आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्....मला माझे ट्रेकचे दिवस आठवले कवी तुझा लेख वाचून. ट्रेकर ते ट्रेक लीडर ते ट्रेक ऑर्गनायझर असा खरंच कौतुकास्पद प्रवास कवे!!!
11 Mar 2017 - 6:10 pm | आरोही
मस्त कविता ..keep it up.
11 Mar 2017 - 6:16 pm | पियुशा
आगे बढ़ो कवडी माता हम तुम्हारे साथ है:)
11 Mar 2017 - 9:07 pm | पैसा
मस्त कवे!
11 Mar 2017 - 11:57 pm | नूतन सावंत
कवी,तुझ्या प्रवासाचं सुरेख वर्णन वाचून मी श्यात काय मिस केली याची प्रकर्षाने जाणीव झाली.
12 Mar 2017 - 11:42 am | इशा१२३
छान ग कवे !आपल्याला करायचाय ह ट्रेक.तुच नेउ शकशील निट खात्री आहे.
12 Mar 2017 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख चाळला. ट्रेकहितातलं 'ट्रेक' कळलं, हे 'हिता' काय असतं ? माझ्याकडे कै. वा.गो. आपट्यांचं मराठी शब्दांचा मराठीत अर्थ सांगणारा कोश आहे. अजिबात अर्थ सापडेना पाहा. शब्दाचा अर्थ सांगता आला तर नक्की सांगा. बाकी लेखातले फोटो-बीटो ठीक आहेत. आपला अनुभव पाहता मलाही पदयात्रा करावी, असे वाटू लागले आहे. पुपट्रेशु.
-दिलीप बिरुटे
12 Mar 2017 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिर्डीचं गाव आणि साईबाबा मला आवडतात, पण ते देव वगैरे आहेत असे वाटत नाही. पण एखादी छोटेखानी पदयात्रा नक्की करीन.
-दिलीप बिरुटे
13 Mar 2017 - 9:48 pm | हाहा
लेख आवडला. पुढच्या ट्रेक्स ना शुभेच्छा!
13 Mar 2017 - 11:57 pm | इडली डोसा
तुला पुढच्या असंख्य ट्रेक्ससाठी शुभेच्छा!!
14 Mar 2017 - 2:56 pm | कविता१९७८
सर्वांचे मनःपुर्वक आभार.
14 Mar 2017 - 4:48 pm | इरसाल कार्टं
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा, माझं ध्येय काहीस हेच आहे. सध्या स्वतःच्या ओळखीच्या ट्रेकळाच नेतोय सगळ्यांना तेही जास्तीत जास्त १५ जणांचा ग्रुप. पण हळूहळू वाढवायचं आहे. अर्थात मीही ना नफा ना तोटा तत्त्वावरच हे करतोय. तुमच्या या लेखामुळे आणखी प्रेरणा मिळाल्यासारखं झालं.
14 Mar 2017 - 6:26 pm | मनिमौ
कै. वा गो आपट्यांच्या काळी पुरूषांचा चौथा कोनाडा नव्हता नाहीतर तिथे बसून लिहिलेल्या शब्दकोशात ट्रेकहिता चा अर्थ नक्की सापडला असता.
बादवे कवी तुझी धडपड कौतुकास्पद आहे. पुढील सर्व ट्रेक साठी दणदणीत शुभेच्छा
ट्रेकहता होऊ ईच्छिणारी
मनिमौ
15 Mar 2017 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कै.वा.गो आपट्यांच्या काळातही कोनाडे होते आणि आताही आधुनिक काळात विज्ञानयुगातही कोनाड्यांचा हट्ट आहेच. पण शब्द लिहिला आहे तर अर्थ सांगितला पाहिजे असे वाटले. सांगितलंच पाहिजे असं काही नाही, पण उत्सुकता कशी असते नाही का ?
-दिलीप बिरुटे
14 Mar 2017 - 7:15 pm | शलभ
मस्त प्रवास..लेख पण छान झालाय..
15 Mar 2017 - 12:40 pm | भुमी
तुझ्या ग्रुपबरोबर यायचंय ट्रेकला, बघुया कधी जमतंय ते, पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !!
15 Mar 2017 - 6:57 pm | मनिमौ
साक्षात प्रा डाॅ सारख्या मराठी विद्यावाचस्पती ला सुधा मराठी शब्दाचे अर्थ विचारावे लागतात .
15 Apr 2017 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माऊ, मला सर्वच माहिती नसतं. आणि ही फ्याक्ट आहे. तुमचं आणि पैचं ठरलय ना पदयात्रेचं ? जून च्या पहिल्या आठवड्यात जाऊन या भो ? ;)
-दिलीप बिरुटे
15 Apr 2017 - 10:08 am | पैसा
तुम्ही पण येणार आहात!
16 Apr 2017 - 1:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी येऊ का नको असा विचार करतोय ? आयुष्यात पदयात्रा किती महत्वाची आहे यावर तुम्ही दोघी लेक्चर द्याल म्हणून भिती वाटते. माऊला तर आयता बकरा सापडेल म्हणून मी बकरा होणे टाळतोय. :)
(तुम्ही दोघीही मौन व्रत करणार असेल तर विचार करेन)
-दिलीप बिरुटे
15 Mar 2017 - 8:33 pm | पिशी अबोली
प्रेरणादायी लेख आहे कवे. ट्रेकहिता हा शब्द तर फारच आवडला.
तुझा आत्मविश्वास वाढत जावो यासाठी शुभेच्छा..
17 Mar 2017 - 11:16 pm | Maharani
मस्त कविता..जबरदस्त
18 Mar 2017 - 5:42 am | रेवती
लेखन फार म्हणजे फारच आवडलं. सवय नसताना हे सगळं करायचं म्हणजे धाडस हवं. तुझं अभिनंदन.
4 Apr 2017 - 11:26 am | कविता१९७८
साईबाबांच्या कृपेने यावेळी मी पदयात्रेची नववी फेरी २७ मार्च ते ३ एप्रिल ला यशस्वीरीत्या पुर्ण केली. जव्हार, मोखाडाचे घाट चढताना तापमान ४३॰ - ४५॰ असुन सुद्धा देवाच्या कृपेने पदयात्रा सुसह्य झाली.
15 Apr 2017 - 9:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूपच आनंद वाटला.
-दिलीप बिरुटे
16 Apr 2017 - 6:43 pm | चौथा कोनाडा
भन्नाट प्रेरणादायी लेख ! ट्रेककहाणीचा आलेख धडाकेबाज आहे !
पुट्रेशु !
2 May 2017 - 12:29 am | रुपी
+१
1 May 2017 - 8:01 pm | बोका-ए-आझम
मस्तच एकदम.
27 Jun 2017 - 4:03 pm | धर्मराजमुटके
मस्तच एकदम.