'Cooking demands attention, patience, and above all, a respect for the gifts of the earth.'
अगदी असंच मानून वाटचाल करणार्या सोलापूरच्या अनघा गोडबोलेने सॅन फ्रान्सिस्कोपासून मास्टरशेफ इंडियाच्या ५व्या भागात सेमी-फायनलपर्यंत मजल मारली! सेलिब्रिटी होऊनही जमिनीवर पाय असणार्या अनघाने खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि स्वतःचे अनुभव, विचार, आणि फोटोही आनंदाने या मुलाखतीसाठी दिले.
प्रश्नः अनघा, नमस्कार. सर्वात आधी, मास्टरशेफमधल्या तुझ्या कामगिरीबद्दल अभिनंदन! तू अनाहिताच्या या अंकासाठी मुलाखत द्यायला राजी झालीस आणि वेळ दिलास त्याबद्दल खूप आभार. आमच्या वाचकांसाठी तुझी ओळख करून देतेस का?
अनघा: माझा जन्म मुंबईचा आणि मी सोलापुरात वाढलीये. इंजीनिअरिंग करून लग्नानंतर मी इथे आले १९९५मध्ये. तेव्हापासून मी मुख्यत्वे फ्रिमाँटमध्ये राहत आहे. मला दोन मुलं आहेत, एक कॉलेजमध्ये, एक लवकरच कॉलेजमध्ये जाणार आहे. सुरुवातीला मी नोकरी करत नव्हते. मुलं थोडी मोठी झाल्यावर मग मी काम सुरू करायचं ठरवलं. मी इथे MBA केलं आणि मग प्रॉडक्ट मार्केटिंग इंजीनिअर म्हणून नोकरी सुरू केली. हे झालं माझ्या करिअरबद्दल.
माझी आई अतिशय चांगला स्वयंपाक करते. शिवाय, आम्ही फार सुदैवी होतो, की माझे बाबा शिक्षणासाठी यू.के.मध्ये आणि कामानिमित्त यू.एस.मध्ये होते, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाता आले आणि भारतात परतल्यावरही आईला ते बनवायला प्रोत्साहित करायचे. त्यामुळे आईने मला लहानपणापासून वेगवेगळे प्रकार खायची सवय लावली. तर तिथूनच ही आवड निर्माण झाली. माझा नवरा आणि माझी मुलंही खवय्ये आहेत. (हसून) मी पूर्वजन्मी नक्की काहीतरी चांगलं केलं असेल, त्यामुळेच माझी मुलं इतकी गुणी आहेत. माझ्या मुलांनी कधीही कशालाही नाकं मुरडली नाहीत. ती लहान असतानाही असं कधी झालं नाही की त्यांना भरवायला मी त्यांच्या मागे धावतीये. तर, हे सर्व जण आवडीने खातात, म्हणून नवीन पदार्थ बनवायलाही उत्साह येतो, म्हणून मी खूप नशीबवान आहे.
मला स्वतःला पेंटिंग, डान्स करायला आवडतं. मोना खानच्या 'बाँबे जाम' या वर्कआउट विंगमध्ये मी इन्स्ट्रक्टर आहे. आयुष्य फार लहान आहे, म्हणून मला खूप काय काय करावंसं वाटतं. कधीकधी जरा ताण पडतो, पण मी ते आव्हान समजून नियोजन करायचा प्रयत्न करते.
प्रश्नः लहानपणापासून वेगवेगळे पदार्थ बनवलेले पाहतानाच तुला पाककलेची आवड निर्माण झाली का?
अनघा: खरं तर मी इथे आल्यावर जास्त पदार्थ बनवायला लागले. मी तिथे असताना मला खाण्याची हौस होती, पण आमच्या घरी मदतीला खूप जण होते. त्यामुळे आई आम्हाला अभ्यासावर लक्ष द्यायला प्रोत्साहित करायची. खूप मुलींना कणीक भिजवायला, निदान कुकर लावायला शिकवतात, तसं मला काही यायचं नाही. (हसत) भात कसा लावायचा ते मला इथे आल्यावर माझ्या नवर्याने शिकवलं. इंजीनिअरिंग झाल्यावर मी उत्सुकता म्हणून एक-दोन पदार्थ बनवून पाहिले होते, पण त्यापलीकडे फार स्वयंपाक केला नव्हता. पण इथे आल्यावर लक्षात आलं की आईने चांगलीही सवय लावली आणि वाईटही, कारण मी आईच्या हातचं खाणं फार मिस करायचे. 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' तसंच झालं होतं. मी स्वतःच बनवलं नाही तर मला तसं जेवण मिळणार नाही. तर स्वयंपाकाला अशी सुरुवात झाली. आणि हे ९५मध्ये! तेव्हा इंटरनेटचा तर प्रश्नच नव्हता, पण फोनलाही दर मिनिटाला २ डॉलर्स लागायचे. त्यामुळे आईला रेसिपी विचारायची असली, तरी काय काय विचारायचं आहे ते मी आधी लिहून ठेवायचे. मग लायब्ररीतून पुस्तकं आणून, कुकींग शोज बघून मी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायला लागले. बर्याच जणांना आता माहीतही नसेल - 'Galloping Gourmet' म्हणून Graham Kerrचा एक शो होता, तो बघायचे. काय करायचं, कसं करायचं याची तिथून सुरुवात झाली.
ब्लॉग खूप एवढ्यातला आहे, तीन वर्षंच झाली असतील. शिवाय कधीकधी मी फार पटपट लिहिते, कधी बरेच दिवस लिहीतही नाही. मला त्यातून पैसे कमवायचे नाहीत, तर मी बनवलेलं माझ्यासाठीच लिहून ठेवायचं आणि माझ्या मुलांना पुढे वापरता येईल. शिवाय, माझी कल्पकता व्यक्त करता येते. त्यासाठी मी फोटो काढते आणि लोकांच्या, मी बनवल्यावर मला काय शिकता आलं त्या टिप्स शेअर करते.
प्रश्नः तुझा ब्लॉग इतका नवीन आहे, पण कुकिंगच्या क्षेत्रात तू इतकी प्रसिद्ध आहेस, ही ओळख कशी निर्माण करता आली? शिवाय मास्टरशेफमध्ये गेलीस, ती संधी कशी मिळाली?
अनघा: मी पाककृती लिहायला लागले आणि पोस्ट करायला लागले ते फेसबुकमुळे. यावर वेगवेगळे ग्रूप्स आहेत, ज्यांमध्ये मी रेसिपीज शेअर करायचे आणि मी खूप भारी आहे असं मला प्रामाणिकपणे वाटलं नाही. कारण मला असं वाटायचं की असे खूप लोक असतील. पण मला शेअर करायला आवडायचं, म्हणून मी शेअर करायचे. मला लोकांचा अभिप्राय मिळायला लागला की हे खूप नावीन्यपूर्ण आहे. मला एक वाटतं, की माझी एक जमेची बाजू आहे, ज्याबद्दल मास्टरशेफमध्येदेखील शेफ विकास खन्नांनी खूप कौतुक केलं होतं - मला वेगवेगळे फ्लेवर्स कसे एकत्रित करायचे त्याची समज चांगली आहे. शिवाय, इथे बे एरियामध्ये किती प्रकारचे लोक राहतात, किती प्रकारचे पदार्थ असतात. ते पाहून, मी वेगवेगळं काही करू लागले. समजा, काही केलं की मी त्याला थोडा मेक्सिकन किंवा थोडा लेबनीज 'टच' देईन. हे मी जसं शेअर करायला लागले, तर लोक कृती विचारू लागले. आधी मी लिहायचेही नाही, पण मग लिहायला लागले. त्याला प्रतिसाद चांगला मिळायला लागला. मग असं वाटलं की जितक्या रेसिपीज महत्त्वाच्या आहेत, तितकेच फोटोसुद्धा. आता मध्यंतरी मी एक तिळगूळ घालून इस्राइली ब्रेड बनवला. ती रेसिपी जर मी पोस्ट केली नाही, तर मला ते लोकांना इतक्या तपशिलासहित समजावणं शक्य नाही. या कारणासाठी मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. ब्लॉग लिहिण्याआधी या ग्रूप्समुळे लोक मला ओळखायला लागले होते.
मला वाचायलाही फार आवडतं. मी खाद्यपदार्थ फक्त पाककृती याच दृष्टीकोनातून नाही, तर मला तो पदार्थ, त्यांचा उगम, थोडक्यात खाद्यसंस्कृती हे जाणून घ्यायलाही फार आवडतं. मला त्या बाबतीत फार ज्ञान आहे असं मला वाटलं नाही, पण शेअर करायला लागले तेव्हा खूप लोकांना काही काही गोष्टी माहीत नसतात हे मला जाणवायला लागलं, आणि मी शेअर करत आहे याचा आनंद वाटायला लागला. असा हा प्रवास सुरू झाला. मी घरी बरंच काही बनवते, त्यामुळे घरी येणार्या स्नेह्यांना ते माहीत होतं आणि मी खूप छान बनवते असं ते सांगायचे.
मास्टरशेफची इथे ऑडिशन असणार आहे हे मला माहीतही नव्हतं. अशाच एका ग्रूपमधली माझी मैत्रीण आहे, तिने मास्टरशेफसाठी 'तुम्ही लोकांनी प्रयत्न करायलाच पाहिजे' असं 'टॅग' केलं होतं. त्यात माझंही नाव होतं. मीही आदल्या रात्रीपर्यंत दुसर्या कुठल्यातरी व्यापात असल्यामुळे 'जायचं की नाही' अशाच मन:स्थितीत होते. तिथे गेल्यावरही मी लोकांच्या गोष्टी पाहिल्यानंतर माझं त्यांना फार आवडेल असंही वाटलं नाही, कारण तिथे आलेले सगळेच चांगलेच होते. ८५ लोक होते, त्यातून १४ आणि त्यातून एक जण ते निवडणार, त्यामुळे मला फार अपेक्षा नव्हती. खरं तर त्या सर्वांत माझं नक्की स्थान कुठे आहे हे मला माहीत नव्हतं.
प्रश्नः अरे वा! नक्कीच तुझा हा अनुभव खूप समृद्ध असणार. मी एके ठिकाणी वाचलं की तू मास्टरशेफमध्येही कसे वेगवेगळे फ्लेवर्स एकत्र करून डिशेस बनवायचीस. उदा. तू मिरची-कोथिंबीर वापरून आइसक्रीम बनवून त्यावर ऑरेंज सॉस घालून ते सर्व्ह केलंस. याची जाण तुला नैसर्गिकतःच आहे, की तू असे बरेच प्रयोग करून पाहिले आहेत?
अनघा: जेव्हा तुम्ही फार वाचता, तेव्हा त्याचा कुठे ना कुठे कळत-नकळत प्रभाव पडतच असणार. त्याशिवाय, कधी कामानिमित्त कुठे जावं लागलं, तर - समजा, मी ग्वाटेमालाला गेले, तिथे माझे कान-डोळे नेहमी उघडे असतात, मला काय नवीन ऐकायला, शिकायला मिळत आहे. ही समज अनुभवांतून आहेच, पण मला वाटतं की ती माझ्या बाबतीत काही प्रमाणात हे नैसर्गिकतःच आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा शेफ विकास खन्ना या शब्दांत म्हणाले, की "आत्तापर्यंतच्या पाचही सिझन्समध्ये ज्याची फ्लेवर्सवर प्रचंड पकड आहे आणि काय कशाबरोबर चांगलं लागेल हे ज्याला पक्कं माहीत आहे अशा उमेदवाराचं नाव घ्यायचं, तर मी अनघाचं नाव घेईन." ती माझ्यासाठी मोठीच शाबासकी होती. सादरीकरण नक्कीच महत्त्वाचं आहे, कारण ते आकर्षक दिसायला पाहिजे; पण समजा, वरणभात प्रेझेंटेबल नसला, तरी आपण तो खातो, कारण आपल्याला ती चव आवडते. चवीवर माझा भर कायमच जास्त असतो, बहुतेक त्यामुळेच ही जाण आली असावी.
प्रश्नः विकास खन्ना, झोरावर कालरा, कुणाल कपूर यांसारखे मोठे शेफ्स, अगदी दिग्गज मंडळी - यांच्यासमोर परफॉर्म करताना दडपण जाणवायचं का? तुझा या सर्वांबरोबरचा अनुभव कसा होता?
अनघा: तू म्हणालीस ते बरोबर आहे, दिग्गज लोकच आले होते. फक्त हेच तिघे नाही, तर नंतरही शेफ श्रीजीत आणि अतुल कोचर अशी खूपच महान मंडळी आली होती या क्षेत्रातली. पण हे इतके विनयशील लोक आहेत, की मी खूप मोठा आहे, माझं तुम्ही सगळं ऐकलं पाहिजे असं दडपण तुम्हाला अजिबात जाणवू देत नाहीत. उलट 'आज मला हे नवीन शिकायला मिळालं' अशीच वृत्ती असायची. जोधपूरच्या पहिल्या फेरीत मी जेव्हा 'सावजी टॅको' बनवला, तेव्हा शेफ विकासचं वाक्य होतं की 'सच अ ग्रेट आयडिया! मैंने पहेले कैसे सोचा नही इसके बारे मे?' म्हणजे इतकी प्रतिष्ठा मिळवूनही नवीन शिकण्याची त्यांची तयारी मला फार आवडली. आपली तर वाटचाल अजून सुरूच होत आहे, पण जर या लोकांना असं वाटतं की त्यांना अजून शिकायचंय, तर आपल्यालाही खूप काही शिकायचंय अशी एक भावना त्यांच्यामुळे यायची. हे सगळे जण खूप चांगले आहेत.
प्रश्नः तुझं इतकं कौतुक झालं असा तू आधी जो उल्लेख केला आहेस, आणि तिथे स्पर्धा चालू आहे, कॅमेर्यावर रेकॉर्ड होत आहे अशा वेळी शांत, स्थिरचित्त राहणं अवघड होतं का? तू फार भावुक होत आहेस असं तुला वाटलं का?
अनघा: मी खूप 'कंपोज्ड' व्यक्ती आहे असं मला खरं तर वाटलं नव्हतं, पण मला ते जमलं. बहुतेक माझ्या नोकरीमधल्या अनुभवांचा हा फायदा असेल. कामाच्या ठिकाणी मी एक्झिक्युटिव्ह्जना बर्याचदा प्रेझेंट करते; कधी तुम्हाला चांगला शेरा मिळते, कधी टीका होते; पण ते सकारात्मक वृत्तीने घ्यायची एक सवय होते. शिवाय, इतक्या मोठ्या लोकांनी आपलं कौतुक करणं हा त्यांचा मोठेपणा आहे आणि मला अजून फार मोठा पल्ला गाठायचाय, माझ्याबरोबर उभे असलेले १५ लोकही तेवढेच चांगले आहेत हे माहीत असणं आणि ते कौतुक डोक्यात न जाऊ देणं हेही महत्त्वाचं होतं. भावुक होणं साहजिकच आहे. आईच्या-आजीच्या रेसिपीबद्दल बोलताना, माझ्या मुलांबद्दल बोलताना मी भावुन व्हायचे. चूक काढली म्हणून वाईट वाटणं किंवा हिरमुसणं आणि कौतुक केलं म्हणून हवेत जाणं असं दोन्हीही मी होऊ दिलं नाही. बहुधा माझं व्यक्तिमत्त्वच तसं नाहीये. मला नंतरही बरेच जण भेटले की सांगतात, 'तू किती कंपोज्ड होतीस, टीम लीड होतीस आणि टीममधल्या लोकांकडून चुका झाल्या तरी भांबावून जाणं, गोंधळून जाणं असं कधी झालं नाही का?' आणि मी त्यांना सांगते की खरंच असं नव्हतं झालं. बर्याच जणांचा हा मोठा प्रश्न असतो आणि माझ्या फेसबुक पेजवरही मी जेव्हा या प्रवासाबद्दल लिहिलं, तेव्हा 'तू स्वतःला खूप छान 'कॅरी' केलंस' हीच सर्वात मोठी प्रशंसा होती. ते माझ्यासाठी खूप एन्करेजिंग होतं.
प्रश्नः त्यासाठी तुम्हाला खास असं काही ट्रेनिंग दिलं होतं का, की ते फक्त स्वयंपाकापुरतं मर्यादित होतं?
अनघा: हो, हे फक्त कुकिंगपुरतं होतं. 'रिअॅलिटी शो' असूनही आम्हाला कधी तुम्ही अमुक असं वाक्य बोला, अशी प्रतिक्रिया द्या, असं कधीही सांगितलं गेलं नव्हतं. मी रोज ध्यान करते, त्याचाही मला फायदा झाला असेल. मास्टरशेफच्या आधीपासूनच मी ते नियमित करते.
प्रश्नः तू इतके दिवस घरापासून लांब होतीस. मुलांकडून, नवर्याकडून, नोकरीच्या ठिकाणी तुला कशी साथ मिळाली?
अनघा: खूप साथ दिली. मी तर इतक्या घाईत गेले, माझी मुलगी माझ्यावर अवलंबून नव्हती, यासाठी मला माझ्या मुलीचा फार अभिमान वाटतो. साहजिकच तिला माझी आठवण यायची, पण 'तू इतके दिवस नाहीयेस' अशी तिने कधीही तक्रार नाही केली. माझा नवरा सध्या भारतात आहे, एका मोठ्या सोलर कंपनीचा प्रेसिडेंट आहे, पण माझ्यासाठी त्याने काही महिने यू.एस.मधून काम केलं. तो माझा आधारस्तंभ आहे, त्याच्याशिवाय हे जमणं शक्य नव्हतं. शिवाय, नुसता आधार असं नाही, पण घरचे सगळे त्यात फार रसही घ्यायचे. माझ्या कोणत्या गोष्टी आवडत आहेत, किंवा आधीच्या फेरीतून काय शिकता येईल याबाबत मीही त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. या सर्व बाबींत फार रस घेऊन ते मला प्रोत्साहित करायचे. माझ्या वाटचालीत या सर्वांचा मोठा सहभाग होता. कामाच्या ठिकाणीही मला तिथून काम करू दिलं, Leave of absence दिली, आल्यावर पुन्हा मी रुजू झाले. PayPalच्या intranetवर माझी मुलाखत प्रकाशित केली, की माझ्या या कामगिरीचा त्यांनाही अभिमान आहे. २१ फेब्रुवारीला आमच्या CEOच्या सोशल मीडियाच्या अकाउंटमधून Employee Spotlightमध्येही माझ्यावर लेख आहे. या सर्व आधारामुळे मी स्पर्धेवर लक्ष देऊ शकले, कारण मला माहीत होतं की हे सर्व जण मिळून माझ्या जबाबदार्या उचलत आहेत. 'It takes a team to make a dream' हे खरं आहे!
माझ्या घरच्यांनी साथ दिलीच, आणि मी त्यांची आपली आहे. पण ऑफिसमधल्यानींही 'हिला जितकं प्रोत्साहित करता येईल तितकं करावं' अशी जी वृत्ती दाखवली, त्यामुळे आपण सर्व एका कुटुंबातले आहोत अशीच भावना निर्माण होते. ते मला खूप सुखद वाटलं.
प्रश्नः मास्टरशेफमधल्या कुठल्याही परीक्षक शेफबरोबरच्या, तुझ्या विशेष लक्षात राहिलेल्या एखाद्या काही अनुभवाबद्दल, प्रसंगाबद्दल काही सांगशील का?
अनघा: शेफ अतुल कोचर जेव्हा आले होते, तेव्हा मी आधीच स्पर्धेच्या बाहेर गेले होते, कारण ते शेवटच्या फेरीसाठी आले होते आणि मी उपान्त्य फेरीत बाद झाले होते. मी वर बाल्कनीमध्ये होते, आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं, तेव्हा त्यांनी खास माझं नाव घेतलं. शिवाय, खाली जेव्हा आम्ही सर्व उभे होतो, तेव्हा ते म्हणाले की, 'माझा फार हिरमोड झालाय. मी आधीपासून तुला फॉलो करत आहे आणि माझी खातरी होती की तू मास्टरशेफ होशील.' एखाद्या यशस्वी शेफकडून अशी पावती मिळणं हे खूप छान होतं, आणि त्यांनी मला सांगितलं, 'तुला चार आठवडे जेव्हाही माझ्या किचनमध्ये internship करायची असेल, तेव्हा तू सांग कुठल्या ठिकाणी आणि केव्हा, आणि तुला ती मिळेल! माझ्या किचनमध्ये तू इंटर्नशिप करणं हा माझा बहुमान असेल.' हे वाक्य त्यांच्याकडून ऐकलं तेव्हा असं वाटलं की मी योग्य मार्गावर वाटचाल केली आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप सन्मानाचा होता.
प्रश्नः नक्कीच! मास्टरशेफनंतर आता लोक तुला ओळखतात, तुझ्याबरोबर सेल्फी घेतात, आता तुला इतकं फॅन-फॉलोइंग आहे त्याबद्दल कसं वाटतं? विशेषतः तू घरच्यांबरोबर आहेस, आणि अचानक कुणीतरी तुला ओळखून तुझ्याशी बोलायला आलं तर तुझी प्रतिक्रिया कशी असते?
अनघा: फार छान वाटतं! मी मुळीच लाजाळू व्यक्ती नाहीये, त्यामुळे मला त्याचा त्रास वाटत नाही. लोकांनी मला ओळखलं तर मला छान वाटतं, मी जे काही केलं होतं ते त्यांच्या लक्षात राहिलंय. आणि मी रोज BARTमधून येताना कुणी ना कुणी माझ्याबरोबर सेल्फी घ्यायला येतात... यात अतिशयोक्ती अजिबात नाही. यातून पॉवर ऑफ मीडियाही लक्षात येते की टीव्हीची पोहोच केवढी आहे. माझ्या कुटुंबीयांनाही ते छान वाटतं. मध्ये असंच माझ्या बॉसबरोबर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वॉकिंग मीटिंग करताना दोन मुली माझ्या समोरून चालल्या होत्या आणि बर्याचदा वळून बघत होत्या. शेवटी त्यांनी मला विचारलंच, की 'तू अनघा ना? आम्हाला फार आवडतेस' आणि माझ्या बॉसला आमचा फोटो घ्यायला लावला. त्याचीही प्रतिक्रिया होती की, मी एका सेलिब्रिटीबरोबर चालत आहे. हे सगळं माझ्या डोक्यात गेलं नाहीये, पण मी ते एंजॉय करत आहे. मला हेही माहीत आहे की हे 'चार दिन की चांदनी'सारखं आहे. नवीन शो आला की लोक विसरून जातील हेही नैसर्गिक आहे. जेव्हापर्यंत आहे, मी याचा आनंद घेईन, त्याबरोबरच हे मर्यादित काळासाठी आहे हेही लक्षात ठेवते.
या अनुषंगाने आणखी एक आठवण सांगते. एका एपिसोडमध्ये मी आणि आणखी एक जण (अजय) 'सेफ' होतो आणि वर उभे होते. खाली जोड्यांमध्ये कुकिंग करणार होते. पण विषम संख्या असल्यामुळे एकाला जोडीदार नव्हता. शेफ कुणालनी आम्हांला दोघांना विचारलं की, 'तुमच्यापैकी कोण येईल सदफला मदत करायला?' अजय जरा बिचकला, मीही एक सेकंद विचार केला. मी शेफ कुणालला विचारलं की, 'मी जर खाली आले, तर मी सुरक्षित नसणार का?' ते म्हणाहो, 'हो. तू जर खाली आलीस तर तूही इतर स्पर्धकांप्रमाणेच या फेरीत असशील'. मी विचार केला, की 'जर मी खाली असते आणि मला मदतीला वरून कुणीच आलं नसतं, तर मला काय वाटेल?' आणि मी सदफला मदत करायला खाली गेले. मी खूप विचार नाही केला. कुणाला गरज आहे आणि तुम्ही मदत करू शकत असाल तर तुम्ही ती केली पाहिजे, हेच मी माझ्या मुलांनाही शिकवते. मीही तेच केलं. पण अक्षरशः सेटवरच्या दोनशे लोकांनी इतक्या टाळ्या वाजवल्या, कारण कुणीही असं करत नाही, आणि शेफ कुणाल मला म्हणाले, की 'मी तुझ्या कुकिंग स्किल्सबद्दल नेहमीच तुझा आदर करतो, पण यानंतर एक व्यक्ती म्हणूनही मला तुझा आदर असेल.' त्यानंतर मला सोशल मीडियावरही खूप नावाजलं गेलं.
हे सर्व ऐकून, वाचून फार छान वाटतं.
प्रश्नः अगदी. तुझ्या या विचारांतून सर्वांनाच फार शिकण्यासारखं आहे! आणखी एक महत्त्वाचं म्हणजे फिटनेस. तू त्याचा उल्लेख आधी केलास. तुला फिटनेसची आवड कशी निर्माण झाली?
अनघा: ही आवड माझ्या नवर्यामुळे निर्माण झाली. तो फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे. शिवाय, मला असं वाटतं की आपण आजकाल आहारात फॅट-फ्री अशा गोष्टींचा फार विचार करतो. मला वाटतं त्याची गरज नाहीये. मला ऋजुता दिवेकरसारखे मुद्दे आवडतात. मी सगळं खाते, पण योग्य प्रमाणात. मी आहारात त्याच गोष्टी वापरते, ज्या त्या सीझनमध्ये उगवतात. म्हणजे माझ्या घरात सध्या भेंडी, वांगी येत नाहीत, कारण ती आपल्या फार्मर्स मार्केटमध्ये मिळत नाहीत. गेली आठ वर्षं मी हे तत्त्व पाळत आहे. मी सत्त्वयुक्त अन्न खाते. माझी मुलंही कधी चिप्स खात नाहीत. माझ्या घरात सोडा येत नाहे. जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं, तर तीच भाजी चार वेळा बनवली तरी तिचा कंटाळा येत नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा खाल्लं जात नाही, पण तुम्ही एंजॉय करता. माझा नवरा (अभिजीत) आणि माझी मुलं, मी सर्वच त्या बाबतीत एकसारखे आहोत, त्यामुळे एकाचं तोंड एकीकडे आणि दुसर्याचं दुसरीकडे असं होत नाही. आम्ही सर्व एकसारखाच विचार करतो त्यामुळे ते सोपं होतं. फिटनेस हे खाण्याची आवड आहे म्हणून गरज आहेच, कारण जसं तुमचं वय वाढतं, तशी चयापचय क्षमता कमी होत जाते. पण मी एकटीच ट्रेडमिलवर चालत आहे असा व्यायाम एकटीला करायला आवडत नाही. मला लोकांमध्ये मिसळायला आवडतं, त्यामुळे मला उत्साह येतो. ग्रूप वर्कआउट असतात, तेव्हा तुम्ही एकमेकांना प्रोत्साहित करता, त्यात एक तास कुठे जातो कळत नाही. शारीरिक फायदा तर होतोच, तसंच मानसिक फायदाही खूप होतो. मी घरी आल्यावर खूश असते. म्हणून मला वर्कआउट करायला आवडतं. आणि साहजिकच इतकं काय काय बनवते तर बटर, शुगर हे जरा जातंच, थोडा बॅलन्स असायला पाहिजे.
प्रश्नः तुझ्या आवडीनिवडींबद्दल बोलत आहोत, तर तुला बाईकचीसुद्धा आवड आहे, बरोबर का?
अनघा: (हसत) हे कसं कळलं? हे फार लोकांना माहीत नाहीये.. खरं तर मी फार धीट आहे! मी शाळेत असताना NCCमध्ये होते, तेव्हा गन चालवायला शिकले. शाळेत असतानाच मी मोटारसायकल चालवायला शिकले, ट्रक्स चालवले आहेत, ट्रॅक्टर चालवला आहे. लहान शहरात वाढले आणि माझ्या आईबाबांचं शेतही आहे, तर शेतावर ट्रॅक्टर, कारखान्यात ट्रक असं कायम चालवलं आहे. इथे आल्यावर मी ते फार मिस करायचे. मला गाडी आवडते. पण जितकी दुचाकी आवडते, तितकी चारचाकी अगदी फॅन्सी असली तरी आवडत नाही. दहा वर्षांपूर्वी मी विचार केला की मी आता मोटारसायकल घेऊन बघणार आहे. मग समजलं की त्यासाठी वेगळा लायसन्स लागतो. मग तो घेतला. आता मी रोज BART स्टेशनला माझी स्कूटर घेऊन जाते. याकडे मी पर्यावरणाच्या दृष्टीनेही पाहते. एका व्यक्तीला जाण्यासाठी मोठी गाडी घेऊन जाण्याऐवजी स्कूटरवर जाता येतं आणि सुदैवाने इथे बे एरियामध्ये १२पैकी १० महिने तुम्ही आरामात जाऊ शकता.
प्रश्नः मास्टरशेफ झालं, भविष्यात कुकिंगमध्ये आणखी काही करायची इच्छा आहे, की आता दुसर्या कुठल्या क्षेत्रात काही करायचंय?
अनघा: अजून माझी मुलगी जोपर्यंत कॉलेजला जात नाही, तोपर्यंत तिलाच प्राधान्य देणार आहे. तोपर्यंत रेस्टॉरंट उघडायचं डोक्यात नाही येणार, कारण मला तिला वेळ द्यायचाय. मला कुकिंग फार आवडतं. मी मास्टरशेफनंतर परत आल्यावर काही दिवस कुकिंगकडे बघणार नाही असं मला वाटलं होतं. पण एकदा ट्रेनमध्ये कुणीतरी काही बोललं आणि मी विचार केला की 'अच्छा, हेही करून बघता येईल'. तो माझ्या अस्तित्वाचाच भाग झालाय, त्यामुळे त्यापासून दूर होणं कठीण आहे. पण मला असं वाटतं, की मी रेस्टॉरंट उघडलं, तर हे रोजचं झाल्यावर माझी कल्पकता कमी होईल का? रोज सारखे पदार्थ बनवले तर मला त्याचा कंटाळा येईल का? त्यामुळे पुढचे काही दिवस इथल्या एक-दोन रेस्टॉरंट्सच्या मालकांशी बोलून सुटीच्या दिवशी त्यांच्या किचनमध्ये काम करून रेस्टॉरंट चालवणं कसं असतं हे मला पाहायचंय. रेस्टॉरंट उघडलं तरी ते आपलं ठरावीक पदार्थ देण्यापेक्षा वेगवेगळे प्रकार देईल. मी कुकिंगमध्ये खूप काही साध्य केलंय असं मला वाटत नाही, उलट मला वाटतं ही सुरुवात आहे. मास्टरशेफमुळे मात्र माझी कुवत काय आहे हे मला कळलं.
आणखी म्हणजे मला गाणं शिकायची इच्छा आहे. माझी मुलगी छान गाते, मलाही गाणं आवडतं, तर ते शिकेन. शिवाय मी फोटो काढते, पण त्यात थोडा जास्त वेळ देऊन फोटोग्राफी शिकायचं डोक्यात आहे.
प्रश्नः तू आई आहेस, नोकरी करतेस, इन्स्ट्रक्टर आहेस, कुकिंग करतेस. या सर्वांची वेळेशी सांगड कशी घालतेस?
अनघा: मी खूप तडफदार आहे. मी खूप कमी झोपते. ध्यान करते म्हणून बहुतेक मला जास्तीत जास्त सहा तास झोप पुरते. झोपते तेव्हा मी फार गाढ झोपते, पण इतर वेळी मी एका वेळी निदान दोन गोष्टी करत असते. टी.व्ही. पाहत असेन तर मी कपड्यांच्या घड्या घालते, फोनवर बोलता बोलता झाडत असते. महत्त्वाचं म्हणजे मला काय काय करायचं आहे याचा मी आधीच विचार करून ठेवते. मला वाटतं, हे डोक्यात असेल तर तुम्ही जास्त कार्यक्षम होता. मला खरोखर असं वाटतं, की एखादी गोष्ट करायचीच असेल तर तुम्ही त्यासाठी नक्कीच वेळ काढू शकता. पण त्याच वेळी काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो. मी नुसतीच टीव्ही बघत बसत नाही, कारण मला वेळच नसतो. ज्या गोष्टींचा त्याग केलाय त्या कमी महत्त्वाच्या आहेत म्हणूनच केलाय, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवणं फार महत्त्वाचं आहे. सुट्टीच्या दिवशीसुद्धा मी लवकर उठते. आणि आवडत्या गोष्टी करून त्यातून आनंद मिळतो. मी काहीतरी बनवून, फोटो काढून पोस्ट केलं तर मी खूश असते. मी बरंच आध्यात्मिक वाचते, वाईट विचार किंवा लोकांपासून लांब राहते. जे करून आनंद मिळतो, मी त्यावर लक्ष केंद्रित करते.
धन्यवाद, तू आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास! शिवाय, काही गोष्टींशी खूपच रिलेट होता आलं - उदा., आपली आजी जे जेवण बनवायची तसं बनवा असं ऋजुता दिवेकर सांगते - हेही पटतं. इतक्या गोष्टी साध्य करणं खरंच अवघड आहे, त्यासाठी आम्हांलाही बर्याच टिप्स मिळाल्या.
अनघा: माझी मुलं लहान असताना त्यांना वेळ देणं हे माझं प्राधान्य होतं; तेव्हा घर अस्ताव्यस्त पडलेलं असलं तर असलं, कारण मला त्यांच्याबरोबर खेळणं महत्त्वाचं वाटायचं. मध्यंतरी मी ब्रेक घेतला होता, तेव्हा मी स्पॅनिश शिकले. त्यामुळे ज्यात आनंद मिळतो ते करा. मुलं लहान असताना अवघड असतं, तेव्हा स्वतःला फार त्रास करून घेऊ नका. पण जमेल तेव्हा नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्नही करा.
मला आणखी एक सांगावसं वाटतं - आत्ता जे आजीच्या रेसिपी म्हणालात, तसं भारतीय जेवण मास्टरशेफमध्ये फार कमी दाखवलं गेलं ही मास्टरशेफमधली एक गोष्ट जरा खेदजनक होती. मास्टरशेफ 'इंडिया' असूनही भारतीय जेवणाला महत्त्व दिलंच गेलं नाही. दोन जण काश्मिरी होते, त्यांना कधी काश्मिरी पदार्थ करायला मिळाले नाहीत. मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी मराठी पदार्थ बनवले. पण की भारतीय लोक आपल्या परंपरागत पदार्थांकडे दुर्लक्ष करत आहेत हे थोडं दु:खद होतं. त्यामुळे मला असे पदार्थ बनवायला आवडतात. मी उदाहरणादाखल सांगितलं की 'बबका' नावाच्या ब्रेडमध्ये चॉकलेट-हेझलनट्स भरून केला जातो, पण मी तीळगुळाच्या पोळीसारखं सारण करून त्यात भरलं होतं, ज्यातून लोकांना कळेल की असे परंपरागत पदार्थही नवीन पद्धतीने बनवता येऊ शकतात. मला असे प्रयोग करायला आवडतात.
या मुलाखतीसाठी माझा विचार केल्याबद्दल आभार. मी हे सर्व शेअर करू शकले, याचा मला आनंद होतोय.
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 3:51 pm | मंजूताई
मनमोकळी मुलाखत आवडली!
8 Mar 2017 - 3:54 pm | पद्मावति
खुप सुरेख मुलाखत.
8 Mar 2017 - 4:02 pm | मनिमौ
आहे. किती ऊत्साहाने भरलेल्या आहेत या.
8 Mar 2017 - 4:20 pm | भिंगरी
ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे यशस्वी होण्यामागे.
10 Mar 2017 - 1:23 pm | सुचेता
काय काय करते ही ,
8 Mar 2017 - 4:51 pm | अजया
मा शे इंडिया बघताना मी कायम अनघाला फाॅलो करत असे. तिच्याबद्दल फार कुतुहल होते. फार छान मुलाखत घेतली आहेस.
8 Mar 2017 - 4:55 pm | पूर्वाविवेक
व्वा! अनघा म्हणजे बहुपेडी व्यक्तिमत्व आहे. फारच छान ओळख करून दिलीस तिची.
8 Mar 2017 - 10:25 pm | सविता००१
फार छान मुलाखत आहे.
8 Mar 2017 - 11:43 pm | संजय क्षीरसागर
"आत्तापर्यंतच्या पाचही सिझन्समध्ये ज्याची फ्लेवर्सवर प्रचंड पकड आहे आणि काय कशाबरोबर चांगलं लागेल हे ज्याला पक्कं माहीत आहे अशा उमेदवाराचं नाव घ्यायचं, तर मी अनघाचं नाव घेईन." ती माझ्यासाठी मोठीच शाबासकी होती. सादरीकरण नक्कीच महत्त्वाचं आहे, कारण ते आकर्षक दिसायला पाहिजे; पण समजा, वरणभात प्रेझेंटेबल नसला, तरी आपण तो खातो, कारण आपल्याला ती चव आवडते. चवीवर माझा भर कायमच जास्त असतो, बहुतेक त्यामुळेच ही जाण आली असावी.
हमारे खयालात कितने मिलते जुलते है! स्वाद ही भोजनातली एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे .
9 Mar 2017 - 3:33 pm | स्वप्नांची राणी
धीट आणि धाडसी अनघाची मनमोकळी मुलाखत आवडली रुपी. तिच्या मल्टीटास्कींगच्या टीप्स आवडल्या..!!
9 Mar 2017 - 4:51 pm | प्रीत-मोहर
अरे हिला मीही खूप फॉलो करत होते. मास्टरशेफ मधे. अनघाच्या अश्या सुंदर मुलाखतीसाठी धन्यु रुपी :)
9 Mar 2017 - 5:01 pm | नूतन सावंत
मला पहिल्याच एपिसोडच्या वेळी वाटलं होतं की,अन्घानेच मास्टरशेफ व्हायलाच हवे ,पण.........
असो,तिची मनमोकळी मुलाखत आवडली.
रुपी तू छान नेमके प्रश्न विचारून मुलाखत घेतली आहेस.
9 Mar 2017 - 6:11 pm | रेवती
मुलाखत आवडली. सगळे प्रश्न व त्यांची उत्तरे अगदी जमून आलियेत.
9 Mar 2017 - 6:14 pm | पैसा
मनमोकळी, मस्त ओळख!
9 Mar 2017 - 6:58 pm | वेल्लाभट
फँटॅस्टिक !
सही मुलाखत, आणि सही व्यक्तिमत्वाची ओळख.
10 Mar 2017 - 12:21 pm | सस्नेह
सही ओळख !
11 Mar 2017 - 1:47 pm | इशा१२३
आवडत्या विषयावरची उत्तम सुगरणिचि मुलाखत आवडली.तिची स्वयंपाकघरातली जाण विशेष भावली.
धन्यवाद रुपी.
11 Mar 2017 - 1:53 pm | स्वाती दिनेश
मुलाखत आवडली.
स्वाती
12 Mar 2017 - 1:52 am | चतुरंग
एक गृहिणी किती समर्थपणे इतक्या सगळ्या क्षेत्रात धडाडीने दर्जेदार काम करु शकते हे वाचून आनंद झाला.
यशस्वी होण्यासाठी पूर्वनियोजन, कामाची आखणी आणि प्रत्येक गोष्ट झोकून देऊन करणे या बाबी किती आवश्यक आहेत याचा वस्तुपाठ.
नेटक्या मुलाखतीसाठी रुपी यांचे अभिनंदन.
12 Mar 2017 - 4:18 pm | उल्का
आवडली मुलाखत.
12 Mar 2017 - 4:31 pm | अभ्या..
बेस्टच.
सोलापूरचा झेंडा फडकला म्हणा की सातासमुद्रापार. भारीच.
ही अस्सल सोलापूरी.
12 Mar 2017 - 7:29 pm | दादा कोंडके
इंग्रजी वाक्याने सुरवात झाल्यामुळे अंदाज आलाच होता, तरीपण इंग्रजी शब्दांबरोबर कुस्ती करत कसाबसा अर्धा लेख वाचला आणि सोडून दिला.
16 Mar 2017 - 10:17 pm | आरोही
मस्त मुलाखत.
20 Mar 2017 - 1:56 pm | रॉजरमूर
छान मुलाखत ......
अनघाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू अगदी छान उलगडून दाखवलेत.
एक आर्ची आधीपासूनच होती तर सोलापुरात ...........
20 Mar 2017 - 2:52 pm | पिशी अबोली
सुरेख मुलाखत.
पहिल्या फोटोत थेट माधुरी दीक्षितचा भास झाला..
24 Mar 2017 - 4:26 pm | बरखा
मनमोकळी मुलाखत आवडली.
25 Mar 2017 - 2:14 pm | के.पी.
खुप सुंदरपणे ओळख करुन दिलीस गं, आवडली !
13 Apr 2017 - 2:21 am | रुपी
सर्वांना धन्यवाद.
ही मुलाखत घेणं हा फार छान अनुभव होता. अनघाने दिलेल्या उत्तरांतून फार काही शिकण्यासारखं आहे हे मला स्वतःलाही जाणवलं.
या मुलाखतीसाठी खरं तर सानिकाचे आभार. अनघाची मुलाखत घेण्याबद्दल मी स्वतः विचारही केला नसता. ती घ्यावी हे तिनेच सुचवलं, शिवाय प्रश्नही काढायला मदत केली. खास करुन तिच्या बाइकच्या आवडीबद्दल! तो प्रश्न ऐकून अनघाही खूप आश्चर्यचकीत झाली होती. कधी यु.के.ला जायचा योग आला तर सानिकाला भेटायला नक्कीच आवडेल असंही तिने सांगितलं.
त्यामुळे सानिकाला खूप खूप धन्यवाद :)