(प्रस्तुत लेखात मांडलेले विचार हे प्रातिनिधिक नसून माझे वैयक्तिक विचार आहेत. इतर कुणी महिला त्यांच्याशी असहमत असू शकतील.)
महिला दिन. मीडियाचा महिला-कळवळा-दिन. सोशल मीडियाचा महिला शुभेच्छा दिन. फेसबुक-व्हॉट्स अॅिप-ट्विटरवर संदेशांना, शुभेच्छांना उधाण. सरकारी खात्यांमध्ये महिलांसाठी एक(तरी) दिवस सगळ्या जाच-काचातून सुटकेचा दिन. सार्वजनिक समारंभांना प्रसिद्धीचा दिन. एकूणच, 'महिला महान' हे एक(च) दिवस मान्य करण्याचा दिन. याव्यतिरिक्त इतर ३६४ दिवस मग काहीही धुमाकूळ घाला. महिलांना मुलींना हवे तसे, किंवा नको तसे छेडा, अत्याचार करा, अपमान करा, त्यांच्या सामान्य हक्कांवर अतिक्रमण करा आणि मुख्य म्हणजे हे सगळे होत असताना हात जोडून बघत बसा! महिला दिन साजरा करताना या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी काही करण्याची गरज नाही का?
१९१० साली कोपेनहेगन येथे सुरुवात झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाने जगभरातील महिलांना मानाचे स्थान, दर्जा देण्याचा उपक्रम सुरू केला. १९७५मध्ये युनोने जागतिक महिला वर्ष साजरे केले आणि ८ मार्च हा महिला दिन जाहीर केला. आणि तेव्हापासून महिला चळवळ जोर धरू लागली. १९७५पासून युनोने स्त्रियांच्या जागृतीसाठी, कल्याणासाठी, महिलांना स्वतंत्र आणि सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या थीम्स घेऊन राबवल्या आणि या उपक्रमाला जागतिक महत्त्व प्राप्त झाले. महिला दिनाची आजवरची वाटचाल म्हणजे एकामागोमाग एक मैलाचे दगड ठरावेत. पण अजूनही जगभरातल्या महिला पुरेशा सक्षम आणि स्वतंत्र नाहीतच.
गेल्या सात-आठ वर्षांतच भारतात महिला दिन वैयक्तिक आणि सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे प्रमाण ठळकपणे दिसून येते आहे. म्हणजे, त्याआधीही साजरा होत असे, पण इतकी ग्लोबल प्रसिद्धी तेव्हा मिळत नव्हती. नुसत्या शुभेच्छा देण्यावर भागत असे. तेही महिलाच महिलांना देत. निदान माझ्या भागात तरी! महिलांविषयक काहीकाही कार्यक्रम करण्याविषयी सार्वजनिक सरकारी खात्यांमधून फतवे निघत. पण मोठी शहरे सोडली, तर इतरत्र ते कागदावरच राहत. तरीही महिलांचा सन्मान अन सुरक्षितता यांना कुठे बाधा येत नसे.
महिलांवर अत्याचार तेव्हाही होत. पण आतासारखे उद्दामपणे अन राजरोस नव्हे. पीडित महिला आणि अत्याचार करणारे दोघेही तोंड लपवीत. आता फक्त पीडित महिलाच तोंड लपवत असते. महिलांना - विशेषत: सुशिक्षित महिलांना आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक वागवले जाई. ऑफिसात महिलांना वेळेनंतर काम सांगायला वरिष्ठ लोक बिचकत असत. सवलती जरी नसल्या, तरी महिलांच्या नैसर्गिक मर्यादांकडे न सांगता अवधान दिले जाई. पेट्रोलपंपावर किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी महिलांची स्वतंत्र रांग असे. ऑफिसच्या कामानिमित्त वाहनाने प्रवास करायचा झाला, तर महिलांना तो प्रवास धोक्याचा, अडचणीचा होणार नाही ना, याची ऑफिसातील बुजुर्ग लोक घरच्यासारखी काळजी घेत. म्हणजे त्या अंधार पडण्यापूर्वी घरी किंवा गावात पोहोचू शकतील ना? जिथे जायचे आहे, ते ठिकाण एकाकी, असुरक्षित नाही ना? तिथे त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नसेल, तर इतर काही घरगुती सोय आहे का? याचा विचार त्यांना बोलावण्यापूर्वी केला जाई. इतकेच नाही, तर त्यांना प्रवासात त्यांना व्यवस्थित बसायला मिळते आहे ना, हेही पाहिले जाई. मुख्य म्हणजे कोणाही अपरिचित स्त्रीलासुद्धा धक्काबुक्की, विनयभंग असे काही होताना दिसले, तर आजूबाजूचे लोक त्वरित हस्तक्षेप करून त्रास देणाऱ्यांची धुलाई करत असत. रस्त्यावरून जाताना महिलांची छेड काढणार्यांची खैर नसे. हे सामाजिक भान साधारण दोन दशकांपूर्वी सहसा दिसत असे. तेव्हा काही ‘महिला दिन’ साजरा होत नव्हता!
‘स्त्री-दाक्षिण्य’ हा शब्द अलीकडे बऱ्याच उच्चशिक्षित महिलांना आवडत नाही, असे दिसते. याचे काही ठोस कारण मला दिसत नाही. स्त्री ही नैसर्गिकरित्याच पुरुषांपेक्षा वेगळी आहे. मग तिला तशी वेगळी, आदरपूर्ण वागणूक दिली म्हणजे काही सवलत दिली असे आहे का? सार्वजनिक ठिकाणी आणि इतरत्रही त्यांच्यादेखत अशिष्ट वागू नये, औचित्यभंग होईल असे राहू नये, त्यांची शारीरिक अडचण होत असेल तर सहकार्य करावे यात त्यांना कमीपणा कसला? निसर्गत:च महिला या शारीरिकदृष्ट्या नाजूक आणि न्यायबुद्धी, चारित्र्य, करुणा, क्षमा अशा बाबतीत पुरुषांपेक्षा सहृदय असतात. यासाठी त्यांना व्यक्तिसापेक्ष सन्मानाव्यतिरिक्त एक स्त्री म्हणून योग्य तो आदर दिला जाणे हे काही चुकीचे नाही.
विशेषत: गेल्या दशकात स्त्रियांवरील सार्वजनिक जागेत अत्याचारांचे प्रमाण लक्षणीयररित्या वाढलेले दिसत आहे. आणि त्यातही, अनेक जणांच्या समूहासमोर हे प्रकार होत असताना सर्व जण मिळूनसुद्धा त्याचा प्रतिकार करताना कधीच दिसले नाहीत, हे एक धक्कादायक सत्य आहे. कित्येकदा पोलिसांच्या समक्ष विनयभंग होताना दिसत असूनही पोलीस हस्तक्षेप करत नाहीत. जो तो किंवा जी ती आपापल्या ‘ह्यात’!
का बरे आम्ही असे निब्बर कातडीचे बनलो? का आमचे रक्त सळसळून उठत नाही हे अत्याचर डोळ्यांनी पाहताना? कुठे चुकलो आम्ही स्वातंत्र्यानंतर एक सुजाण समाज घडवायला? कोणे एके काळी ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते, रमन्ते तत्र देवता:’ अशी विचारधारणा असणारी आमची संस्कृती आज कुठल्या बासनात गुंडाळून ठेवली आहे?
आज आम्ही महिला दिन साजरा करतो. समानतेचा पुरस्कार करतो. महिलांची महती एकमेकांना, एकमेकींना सांगतो. महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करतो. त्यांचे ‘एक दिवस’ मन भरून कौतुक करतो. महिलांचा सन्मान सांगणारी गीते, सुभाषिते, संदेश एकमेकांना फॉरवर्ड करतो. संध्याकाळी, आपण महिला दिन कसा सुरेख साजरा केला, याचे मनात आणि इतरांजवळ कौतुक करतो. खरोखर किती जागृत झालो आहोत आपण महिलांबद्दल?
स्त्रियांना समान हक्क दिले, म्हणजे त्यांना सन्मान देण्याची गरज नाही का? मुळात समान हक्क म्हणजे नक्की काय? पुरुष आणि स्त्रिया यांच्या शरीर-प्रकृती, स्वभाव, लैंगिकता, काही कामे, काही गोष्टी करण्याचे कौशल्य, वेगवेगळ्या परिस्थितीत तग धरण्याची क्षमता यात नैसर्गिकरित्याच मूलभूत फरक आहे. शारीरिक श्रमाची कामे आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने करतात खरेच. पण पुरुषाला ते करताना होतात त्याच्या कितीतरी पटीने जास्त कष्ट स्त्रीला होतात, हे सत्यच आहे. एखाद्या झकपक कंपनीत ऑफिसरचे काम करणे आणि शिपायाचे काम करणे यात खूप फरक आहे.... विशेषत: एका महिलेसाठी! आज माझ्या कंपनीत वीस-बावीस वर्षाच्या मुली खांबावर चढून वीज-वाहिनी दुरुस्तीचे काम करतात आणि चाळीस वर्षाचे पुरुषही करतात. यात स्त्रियांना मोठेपणा नक्कीच आहे. पण या मुलींना वयाच्या चाळिसाव्या वर्षी हेच काम जमेल का? अपवादानेच जमू शकेल. बस कंडक्टरचे काम करणाऱ्या चटपटीत दिसणाऱ्या महिलांच्या गैरसोयींना पारावार नाही, हे एका महिला कंडक्टरच्याच तोंडून ऐकले. माझ्याच नात्यातल्या एक तडफदार आणि अतिशय तत्त्वनिष्ठ असणाऱ्या एका महिला पोलीस इन्स्पेक्टरने संशयित ठिकाणी रेड टाकण्याच्या आदल्या रात्री एकाएकी आत्महत्या केली!
समानता ही कामावरून नाही, तर कौटुंबिक आणि सामाजिक अधिकारावरून, निर्णय-प्रक्रियेत सामावून घेणे, माणूस म्हणून न्याय्य वागणूक देणे यावरून ठरावी. तेव्हा समानता ही सर्वच गोष्टी बरोबरीने करण्यात आहे की एकमेकांना चांगल्या रितीने करता येणाऱ्या सर्व कामांना समान महत्त्व देण्यात आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
अर्थात अगदी असेच काही नाही की महिलांबाबत काही सुधारणा झाल्याच नाहीत. महिलांचा समाजातील सहभाग, उत्पादन आणि नियोजनातील सहभाग निश्चितपणे वाढला आहे. क्रिमी लेयरमधील महिलांना बहुतांशी निर्णयस्वातंत्र्य आहे. राजकारण, शास्त्र, संशोधन, शैक्षणिक, संरक्षण आणि इतर बऱ्याच क्षेत्रांत महिलांच्या सहभागाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. स्त्रीशिक्षण सवलतींमुळे शंभर टक्के जरी नाही, तरी सुमारे सत्तर टक्के महिला साक्षरता नक्कीच झाली आहे. हे काही फक्त ‘महिला दिन’ झाल्यामुळे नाही.
पण त्याचबरोबर महिलांच्या सामाजिक असुरक्षितता, शारीरिक असुविधा, मानसिक ताण-तणाव यात प्रचंड वाढ झाली आहे. विशेषत: करिअरिस्ट महिलांच्या स्पर्धेत टिकण्याच्या धडपडीमुळे शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम पर्यायाने कुटुंब आणि मुले यांचे आरोग्य, मानसिकता यांच्यावर होत आहे. भावी पिढी सकस, सक्षम बनण्यास हे नक्कीच मारक आहे.
कित्येकदा गवंडी, लेथ-कामगार, बॉयलर अटेंडंट अशी कामे करणाऱ्या महिलाही मी पाहिल्या आहेत. त्यांच्याशी त्यांच्या व्यवसायाबाबत बोलल्यावर काही धक्कादायक गोष्टी नजरेस आल्या. या सर्व स्त्रिया पुरुषांइतकेच - नव्हे, त्यांच्यापेक्षाही जास्त काम करत होत्या. पण त्यांना त्याच जागेवरील पुरुष कामगारापेक्षाही पगार कमी होता. बॉयलर अटेंडंट असणारी पंचावन्न वर्षांची स्त्री रात्रभर बॉयलरजवळ उभी राहून काम करत असे. तिच्या जागी जो पुरुष पूर्वी होता, त्याला आठवड्याला चार हजार मिळत. या मावशीला तितकेच काम करूनही मात्र तीनच हजार. लेथबाबतही तसेच. विशेष म्हणजे त्या महिलांना त्याचे काहीच वाटत नव्हते.
‘पुरुष माणूस म्हटल्यावर पगार जास्त असायचाच की!’ हे त्यांचे उद्गार! अशा स्त्रियांना पुरुषांइतका पगार मिळणे जरुरी आहेच, याशिवाय कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळणे हेदेखील गरजेचे आहे.
कालच माझ्या एका सहकारी स्त्रीला, जी कामात अतिशय कुशल आणि सिन्सिअर आहे, तिच्या वरिष्ठाने दुपारी चार वाजता काम देऊन सांगितले, "इतके इतके काम झाल्याशिवाय घरी जाऊ नका, आठ वाजू देत नाहीतर नऊ." या वरिष्ठाला हे काम पूर्वनियोजित वेळेत होण्यासाठी आधी सांगता आले असते. पण इतर पुरुष कर्मचाऱ्यांना सांगताना तसे करण्याची गरज नव्हती, त्यामुळे तिच्या बाबतीतही नाही असे त्याने गृहीत धरले. इथे समानता उपयोगाची आहे की मारक आहे? दुसऱ्या एका सहकारी स्त्रीला रात्री नऊ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम केल्यानंतर एकच पत्र राहिले, जे काही तांत्रिक अडचणीमुळे करता आले नाही, याबद्दल बोलणी खावी लागली. या गोष्टी एक पुरुष जितक्या सहज घेऊ शकतो, तितक्या स्त्रिया घेऊ शकत नाहीत; निदान आजच्या सामाजिक परिस्थितीत तरी, असे दिसून येते आहे.
..सुपरमॅन करोडोत एक तरी निघेल का, शंकाच आहे. पण सुपरवूमन बनण्याचा प्रयत्न मात्र आज हरघडी या करिअरिस्ट महिला करताना दिसत आहेत.
या सगळ्या गोष्टींसाठी महिला दिनाला काय करता येईल? श्रेष्ठ महिलांची महती गाणे हे स्फूर्तिदायक आहेच, पण सामान्य महिलेचे जीवन सुलभ व्हावे यासाठीही काही करण्याची गरज आहे. महिलांना एकूणच समाजाच्या सर्व स्तरांमध्ये न्याय्य, सन्मान्य आणि आदरपूर्ण वागणूक मिळेल, हे पाहण्याची गरज आहे. समानता आता जवळजवळ प्रस्थापित झाली आहे. स्वातंत्र्यही बऱ्यापैकी आहे. पण अजूनही न्याय्य विचारसरणी, कामाच्या ठिकाणच्या सोयी अन सुविधा यापासून कष्टकरी स्त्री वंचितच आहे.
सक्षमतेचे निकष लावताना ‘स्त्री’ म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि अडचणी यांचाही जेव्हा योग्य दृष्टीकोनातून विचार होऊ लागेल आणि ‘स्त्री’ म्हणून जेव्हा उचित सन्मान आणि दर्जा आणि सुरक्षा स्त्रियांना समाजाकडून मिळू लागेल, तेव्हाच एका ‘स्त्री’ला जन्म देणे हे स्त्रियांना गौरवास्पद वाटू लागेल, पुरुषांना अभिमानास्पद वाटू लागेल. आणि एकदा का स्त्री ही एक आदरणीय वस्तू ठरली, स्त्री म्हणून जगणे सन्मानाचे झाले की आपोआपच स्त्री-भ्रूण हत्या थांबतील!
'Women in the Changing World of Work : Planet 50-50 by 2030' ही या वर्षीच्या महिला दिनासाठी युनोची थीम आहे. वर्किंग विमेन्ससाठी काम करणे सोयीचे आणि सुलभ कसे होईल यासाठी आता प्रयत्नशील व्हायचे आहे. वर्किंग विमेन्सना अधिक सक्षम बनवायचे आहे. जगाच्या, तंत्रज्ञानाच्या बांधणीमध्ये त्यांना महत्त्वपूर्ण काम करायचे आहे. त्यासाठी सामाजिक विचारधारेमध्ये जे जे बदल घडवणे आवश्यक आहेत, ते प्रथम करायला हवेत. काम करणाऱ्या स्त्रीला सन्माननीय वागणूक मिळाली पाहिजे. तरच ही कामकरी स्त्री स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला आणि पर्यायाने जगाला उज्ज्वल भविष्य देऊ शकेल!
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 3:55 pm | कंजूस
सहमत.
8 Mar 2017 - 3:59 pm | पद्मावति
उत्तम लेख.
8 Mar 2017 - 4:03 pm | भिंगरी
+++++++
8 Mar 2017 - 4:24 pm | नूतन सावंत
अभ्यासपूर्ण तौलनिक लेख.
8 Mar 2017 - 4:26 pm | नूतन सावंत
अभ्यासपूर्ण तौलनिक लेख.
9 Mar 2017 - 3:13 pm | मद्रकन्या
__/\__ +11111111111
9 Mar 2017 - 3:56 pm | कविता१९७८
छान लेख .
9 Mar 2017 - 4:37 pm | प्रीत-मोहर
सुरेख. अगदी सहमत आहे.
9 Mar 2017 - 6:49 pm | मराठी कथालेखक
एकीकडे स्त्री-पुरुष समानता, स्त्रिया कुठेही कमी नाहीत असे म्हणताना दुसरीकडे स्त्री-दाक्षिण्याची अपेक्षा करणे दुटप्पीपणाचे आहे.
स्त्रियांकरिता पेट्रोलपंपावर वेगळी रांग का हवी ? स्त्री असल्याने ती आपली दुचाकी (वा चारचाकी) घेवून रांगेत थांबू शकत नाही का ? स्त्री असल्याने तिला रांगेत थांबण्यात जास्त त्रास होतो असं काही आहे का ?मग अशा अतिरिक्त सोयींची अपेक्षा का ?
बाकी समान कामाकरिता समान वेतन मिळायला याबाबत सहमत.
9 Mar 2017 - 10:20 pm | निशिगन्ध
9 Mar 2017 - 10:22 pm | निशिगन्ध
9 Mar 2017 - 10:22 pm | निशिगन्ध
9 Mar 2017 - 10:21 pm | निशिगन्ध
9 Mar 2017 - 10:30 pm | निशिगन्ध
10 Mar 2017 - 3:28 am | सविता००१
लेख. खूप छान लिहिलं आहेस
10 Mar 2017 - 7:34 am | अत्रे
निसर्गत:च महिला या शारीरिकदृष्ट्या नाजूक
हे कितपत खरे आहे? कोणी सायंटीफिकली सांगू शकेल का?
म्हणजे स्त्रिया फिज़िकली बळकट नसतात का आपला समाज त्यांना बळकट होऊ देत नाही?
11 Mar 2017 - 12:31 am | इडली डोसा
विशिष्ट परिस्थितीमधे स्त्रीयांच्या शारिरिक बळकटीवर काही मर्यादा येऊ शकतात याबद्दल सायंटीफिक पुरावे कशाला हवेत. प्रेगंन्सी, मासिक पाळी, मेनोपॉज अश्या वेगवेगळ्या कारणाने महिलांच्या शारिरीक क्षमतांवर मर्यादा येतात.
तर याच गोष्टिंचा विचार करुन वेगळ्या रांगेचा पर्याय उपलब्ध करुन दिला असावा. अशी रांग ज्येष्ठ नागरीकांसाठीही(स्त्री - पुरुष दोन्ही) असावी आणि ज्यांना गरज नाही त्या स्त्रियांनी या वेगळ्या रांगेचा फायदा घेऊ नये.
11 Mar 2017 - 6:27 am | अत्रे
मी या विशिष्ट वेळा सोडून इतर वेळच्या शारीरिक शक्ती बद्दल बोलत होतो. म्हणजे जड सामान उचलणे, स्वसंरक्षणासाठी मारामारी करणे टाइप गोष्टीसाठी लागणारी शक्ती.
12 Mar 2017 - 1:07 pm | मराठी कथालेखक
वेगळी रांगेची गरज नेमकी कुणाला आहे हे कसे कळायचे ?
वृद्ध म्हणजे किती वयाची व्यक्ती ? रांगेत उभ राहू देताना ओळखपत्र बघून वय तपासून रांगेत उभे करावे का ?
तसेच एखादा पुरुष वृद्ध नसला तरी एखाद्या विशिष्ट वेळी त्याला रांगेत उभे रहण्याचा त्रास होवू शकत नाही का ? जसे की तो काहीसा आजारी आहे किंवा खूप जास्त थकलेला आहे ई ...मग त्याच वेळी रांगेत असलेल्या एखाद्या निरोगी वृद्द गृहस्थ वा स्त्रीपेक्षा तो जास्त क्षीणलेला असू शकत नाही का ? मग त्याची परिस्थिती समजावून घेवून त्याला मदत करण्याचा कोणताच मार्ग का नसावा ?
यापेक्षा मला वाटतं 'एक्स्प्रेस क्यू' वगैरे अशी कल्पना मांडता येइल, ज्या रांगेत पेट्रोलचे दर किंचीत जास्त असतील किंवा एका भरण्यामागे दहा रुपये वगैरे स्थिर आकार जास्तीचा घेतला जावा. अशा प्रकारे कोणीही गरजू व्यक्ती अतिअनिकडीच्या वेळी अशा सोयीचा वापर करेल.
10 Mar 2017 - 8:21 am | पैसा
अपेक्षा आणि वस्तुस्थिती यात पदोपदी जाणवणारा फरक छान शब्दबद्ध केला आहेस.
10 Mar 2017 - 9:21 am | अजया
लेखाच्या आशयाशी सहमत.
10 Mar 2017 - 1:12 pm | पूर्वाविवेक
अभ्यासपूर्ण लेख ! बऱ्याच अंशी सहमत.
याचे खरेच फार वाईट वाटले. आणि चीडही आली.
10 Mar 2017 - 1:29 pm | गिरिजा देशपांडे
लेखातल्या बऱ्याचश्या विचारांशी सहमत पण ते स्त्री म्हणून वेगळ्या रांगाचं पटलं नाही.
एकदा का स्त्री ही एक आदरणीय वस्तू ठरली >>>>>>इथे व्यक्ती म्हणायचं आहे का?
10 Mar 2017 - 11:47 pm | गामा पैलवान
स्नेहांकिता,
ही हत्या आहे हे शेंबडं पोरंही सांगेल. :चीड:
आ.न.,
-गा.पै.
11 Mar 2017 - 12:33 am | इडली डोसा
बर्याच गोष्टींशी सहमत
12 Mar 2017 - 12:57 pm | मराठी कथालेखक
मुद्दा योग्यच आहे...पण माझे २ प्रश्न आहेत :
१) पण किती स्त्रियांना आवडेल की त्यांच्या सोबत असलेल्या पुरुषाने (पती/भाऊ /मुलगा) अनोळखी स्त्रीच्या मदतीसाठी मध्ये पडलेलं ? माझ्यामते बहूतेककरुन स्त्रियांना त्यांच्यासोबत असलेल्या पुरुषाने कुणाशी भांडण केलेले, कोणा तिर्हाइतांच्या भांडणात मध्ये पडलेले आवडत नाही. इथे असलेल्या स्त्रियांनी प्रामाणिक उत्तर द्यावे ही अपेक्षा.
२) एकूणातच स्त्रिया अनोळखी व्यक्तींच्या खासकरुन पुरुषांच्या मदतीला किती तत्पर असतात हा ही एक प्रश्न आहे. इथे भांडण किंवा मारामारीतली मदत अभिप्रेत नसून एकूणातच कोणत्याही विषयातली मदत. अगदी एखादी माहिती देणे वगैरे देखील. माझ्यामते अनेकदा स्त्रिया समोरचा व्यक्ती , खासकरुन पुरुष अपरिचित किंवा अल्पपरिचीत असेल तर त्याच्या कोणत्याही गोष्टीत मदतीला लवकर पुढे येत नाहीत. अगदी समोरचा अज्ञानामुळे खड्ड्यात पडत असेल तरी बहुधा स्त्रिया बघून न बघितल्याप्रमाणे 'मला काय त्याचे' अशा अर्थाने तिकडे दुर्लक्ष करतात. अर्थात याला अपवाद असतीलच. पण स्त्रियांच्या या स्वभावामुळे पुरुषांची मानसिकता सुद्धा अनोळखी स्त्रियांच्या संकटाबाबत 'मला काय तिचे' अशी होवु शकते. एक सहज आठवले. आमच्या कंपनीत एका विशिष्ट टेक्नॉलॉजीवर काम करणार्यांचा एक फोरम किंवा ग्रुप आहे. या ग्रुपमधले लोक अनेकविध प्रोजेक्ट्सवर काम करतात. सगळे एकमेकांना ओळखत असतीलच असे नाही. पण काम करताना काही तांत्रिक अडचण येत असल्यास फोरमवर त्याबद्दल प्रश्न विचारतात/अडचण मांडतात आणि ज्यांना त्याबाबत ज्ञान आहे असे लोक त्यावर आपली उत्तरे देतात. मी सहज एकदा बघत होतो. प्रश्न विचारणार्यांत अनेक स्त्री आणि पुरुष दिसलेत. तर उत्तरे देण्यात स्त्रिया केवळ अपवादानेच दिसून आल्यात. ..इथेही दुसर्याला आलेल्या अडचणींबद्दल उदासिनता असू शकेल काय हा प्रश्न माझ्या मनात आला.