रात्रीच्या जेवणाआधी युवराज काहीतरी सटरफटर खात सोफयावर पसरले होते. तेवढ्यात त्यांच्या व्हाट्स ऍप्पवर काहीतरी मॅसेज आला. सोफ्यावरूनच हात लांब करून युवराजांनी समोरच्या टीपॉयवरचा मोबाईल घेतला. त्यांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आलेला मॅसेज त्यांनी वाचला.
"रात्री ८ वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करणार."
ते वाचल्यावर युवराजाच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते मनात म्हणाले,
"तेच्यायला..आता परत हा काहीतरी बोलणार. आणि मला त्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यावी लागणार. दिवसभरात का बोलत नाही हा माणूस? ही कोणती वेळ आहे भाषणं ठोकायची?"
मॅसेजकडे दुर्लक्ष करून युवराज सरळ जेवायला गेले. जेवण करून आल्यावर परत त्यांनी मोबाईल हातात घेतला. त्यांच्या फोनवर ४८ मिस कॉल दिसत होते. त्यापैकी १८ त्यांच्या मातोश्रींचे होते, १०-१२ त्यांच्या सेक्रेटरीचे आणि उरलेले पत्रकारांचे होते. युवराजांनी लगबगीने त्यांच्या आईला फोन केला.
"काय झालं आई?"
"कुठे आहेस बाळा? किती वेळ झाला फोन करते आहे तुला?"
"मी घरी आहे. झालंय काय पण ?"
"पंतप्रधानांचे भाषण ऐकलंस का? कोणाचे फोन आले का तुला प्रतिक्रिया मागायला?"
"नाही ऐकलं मी भाषण. पत्रकारांचे फोन आलेले दिसतायेत."
"चला..भाषण नाही ऐकलंस ते चांगलंच झालं. हे बघ कोणाचेही फोन उचलू नकोस मी येईपर्यंत."
"काय झालंय पण ?"
"अरे पंतप्रधानांनी नोटबंदी जाहीर केलीये रात्री बारा वाजेपासून."
"नोटबंदी?? हे काय असतं?"
"मी आल्यावर सांगते. हे बघ या निर्णयावर काहीही प्रतिक्रिया देऊ नको. टिका तर मुळीच करू नको."
"बरं."
युवराजांनी फोन ठेवला. त्यांच्या डोक्यात नोटबंदी हा शब्द फिरत होता. ते स्वतःशी बोलू लागले.
"आता हे नोटबंदी म्हणजे काय असते? या पंतप्रधानाचं काही कळतंच नाही. मागे काय तर म्हणे सर्जिकल स्ट्राईक केली. अरे काहीतरी समजेल असं करावं ना!! नोटबंदी ??? म्हणजे नोटा बंद केल्या ?? आता काय वापरायची ??चिल्लर ?? आम्ही काय पिशवीभर चिल्लर घेऊन फिरायचं आता रोज ? पण कश्यासाठी?"
युवराजांनी न राहवून एका मित्राला फोन केला.
"अरे ते पंतप्रधानांनी नोटबंदी केल्याचं ऐकलं. म्हणजे काय केलंय नक्की?"
"पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यात त्यांनी. नवीन नोटा येणार आता बाजारात."
"अच्छा..म्हणजे एवढंच ना! मग कशाला बोंबाबोंब एवढी? नवीन नोटा देतायेत तर चांगलंय ना"
"असं नाही युवराज. याचा अर्थ आपल्याजवळ असलेला सगळा पैसे वाया जाणार आता. जुन्या नोटा बदलताना आपली ओळख सांगावी लागणार. म्हणजे आपण अडकणार त्यांच्या जाळ्यात. काळा पैसे बाहेर काढण्यासाठी त्यांनी असं केलंय"
"ह्याला काय अर्थ आहे? काळा पैसा तर स्विस बँकेत आहे ना! तो आणायचा सोडून हे काय भलतंच? मी बदलतच नाही म्हणावं नोटा. बसा बोंबलत ?"
युवराजांनी फोन ठेवला. नोटबंदी हा निव्वळ मूर्खपणा असल्याची त्यांची खात्री पटली. पत्रकार मित्राला फोन करून ते प्रतिक्रिया देणार होते पण त्यांनी मातोश्री येईपर्यंत वाट पाहण्याचं ठरवलं. तेवढ्यात घामाघूम झालेल्या मातोश्री त्यांना येताना दिसल्या. युवराज लगबगीने त्यांच्याजवळ गेले.
"बाळा कुठे काही बोलला नाहीस ना रे अजून?"
"नाही"
"चांगलं केलंस..आजकाल पंतप्रधानांच्या भाषणापेक्षा तुझ्या प्रतिक्रियेचं जास्त टेन्शन येतं मला. आणि आज तर हद्दच केलीये पंतप्रधानांनी"
"हो ना..कसला मूर्खपणा करून ठेवलाय"
"गप्प बस..कुठे बोलू नकोस असं."
"का? मी तर स्पष्ट बोलणार"
"अरे तुला कळलंय का त्यांनी काय केलंय? नोटा रद्द केल्यात पाचशे-हजाराच्या. आता काय करायचं आपण?"
"हो माहितीये मला. आपण जायचंच नाही ना नोटा बदलायला. मी तर म्हणतो जाळूनच टाकू. ठेवून तरी काय करायचं आहे. होळीचं करू आपण उद्या पंतप्रधानांच्या घरासमोर! असहकाराची परंपरा आहे आपली !
मातोश्रींना भोवळ यायची बाकी होती.
"अरे अख्ख्या राज्याचं आकाश काळं होईल रे आपण नोटांची होळी केली तर !!!"
युवराजांना हे काहीतरी गंभीर प्रकरण आहे ह्याची हळूहळू जाणीव होऊ लागली. पण नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी ओळखीतल्या अर्थतज्ञ काकांना फोन लावला. काका मुळातच शांत स्वभावाचे होते. ते नेमक्या शब्दात बोलायचे.
युवराजांनी विचारले,"काका..हे नोटबंदी चांगली कि वाईट?"
"हजारो जवाबो से मेरी खामोशी अच्छी..न जाने कितने सवालो की आब्रू रखी !!", एवढं बोलून काकांनी फोन ठेवला.
युवराजांना एकही शब्द कळला नाही. तसंही ह्या काकांचं बोलणं त्यांना फार कमी वेळा कळायचं.
थोड्या वेळाने युवराज आपल्या एका व्यापारी मित्राकडे गेले.
त्यांनी मित्राला विचारलं," सगळीकडे नोटबंदी नोटबंदी सुरु आहे. आहे तरी काय हे नेमकं?"
"हे बघ युवराजा, ते काय आहे हे तर मलापण पूर्णपणे माहिती नाही. एवढं नक्की की, त्यामुळे काळा पैसा अर्थव्यवस्थेबाहेर तरी जाईल किंवा आत तरी येईल."
हा तर युवराजांसाठी कम्प्लीट बाऊंसर होता. पण बाऊंसरवरच तोंड फोडून घ्यायची युवराजांची जुनी खोड!
ते म्हणाले,
"अरे आतबाहेर करायला अर्थव्यवस्था म्हणजे काय राजकीय पक्ष आहे का ? आणि काळा पैसा म्हणजे राजकारणी? आणि तसं असलं तरी रंग बदलणं आमच्या रक्तातंच आहे. आम्ही काय काही दिवस पांढरे होऊ मग परत काळे!!!"
"युवराज हे असं बोलणार आहेस का तू जनतेसमोर?"
"अर्थातच..सरकारचा बुरखा फाडणारच मी.भूकंप येणार आता भूकंप !!"
"युवराजा शांत बस...नाहीतर भूकंप सोड, तुलाच पळता भुई थोडी होईल. आणि तुझ्या मातोश्री म्हणतील, हे धरणीमाते मला पोटात घे."
शेवटी हिम्मत करून युवराजांनी एक निर्णय घेतला. उद्या सकाळी सरळ बँकेत जाऊन काही नोटा बदलायच्या. आणि तिथल्या जनतेला नोटबंदीविषयी विचारायचं.
सकाळी लवकर उठून युवराज बँकेत गेले. पण बँक साडे दहा वाजता उघडते हे माहितीच नसल्यामुळे तीन वेळा जाऊन ते वापस आले. अखेरीस बँक उघडली. बँकेसमोर एवढी गर्दी बघून ते थोडे घाबरले खरे पण हिम्मत करून ते लायनीत उभे राहिले. एवढ्या गर्दीत त्यांना कोणी ओळखलंच नाही.
युवराजांनी लायनीत समोर असलेल्या माणसाला विचारलं,
"एवढी गर्दी कश्यासाठी ?"
"नोटा बदलण्यासाठी."
"मिळतील का बदलून?"
"माहिती नाही. बघू."
"किती नोटा आणल्यात तुम्ही?"
"पाचशेच्या चार.तुम्ही?
"माहिती नाही. गाडीत ठेवल्यात पेट्या !!!"
त्या उत्तराने अवाक झालेल्या त्या माणसाने युवराजांकडे बघितले. आणि तो उद्गारला,
"युवराज तुम्ही इथे काय करताय?"
लगेच युवराज तिथे आल्याची बातमी बँक मॅनेजर पर्यंत पोहोचली. तो लगबगीने बाहेर आला.
"युवराज आत चलावे?"
"नाही मी इथंच थांबणार. मला जनतेशी बोलायचं आहे."
"असं करू नका युवराज. तुमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तुम्ही आत चला."
"मग आधी सांगा..नोटबंदी चांगली की वाईट?"
"मी ड्युटीवर आहे युवराज. मी ह्याविषयी बोलू शकणार नाही. तुम्ही आत चला."
"मी सांगतो..नोटबंदी हा मूर्खपणा आहे. नोटा बदलून जर भलं झालं असतं तर आम्ही त्या परदेशात कशाला नेल्या असत्या !!!!"
मॅनेजर दचकला. त्याने युवराजांना अक्षरश: ओढत बँकेच्या आत नेले.
"युवराज तुम्हाला नोटा बदलून हव्या आहेत का?"
"हो"
"किती?"
"माहिती नाही..सध्या माझ्या खिशात नाहीयेत."
"हरकत नाही. मी तुम्हाला नवीन नोटा देतो. त्या घेऊन आपण घरी जावे. जुन्या नोटा नंतर दिल्यात तरी चालेल."
"एक करू शकाल का?”
"सांगा युवराज."
"बाहेर गाडीत पेट्या आहेत. ते पैसे थेट माझ्या अकाउंट मध्ये भरा. उद्या आणखी पेट्या पाठवतो."
"नक्की युवराज. पण आपलं अकाउंट आहे का आमच्या बँकेत?"
"नाही"
"मग कुठे आहे?"
"स्विस बँकेत !!"
मॅनेजर जागच्या जागी कोसळला. इकडे युवराजांनी मातोश्रींना फोन करून त्यांचा पराक्रम सांगितला.
मातोश्री किंचाळल्या,
"हे धरणीमाते मला पोटात घे”
प्रतिक्रिया
20 Feb 2017 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
मधमाश्यांचा मोहोळावर दगड मारला आहात. आता तुमच्यावर घणाघाती हल्ले होणार ! :) ;)
20 Feb 2017 - 12:27 pm | प्रसाद_१९८२
मस्त लिहिलेय, =)) =))
20 Feb 2017 - 12:27 pm | मराठी कथालेखक
मस्त...
20 Feb 2017 - 3:23 pm | मार्मिक गोडसे
छान लिहिलंय. परंतू, सोशल मिडियावरील युवराजांच्या मुर्खपणाचे किस्से वाचून हसू येणेही बंद झाले आहे आणि युवराज कीव येण्याच्या पलिकडे गेले आहेत. दुसरं ,नोटाबंदीच्या फार्समुळे पंतप्रधानांपासून ते RBI Governor पर्यंत सगळेच युवराजांशी स्पर्धा करताहेत असे वाटू लागले आहे.
20 Feb 2017 - 5:46 pm | अभिजीत अवलिया
नावाप्रमाणे मार्मिक प्रतिक्रिया :)
20 Feb 2017 - 4:03 pm | पैसा
=)) =))
20 Feb 2017 - 5:48 pm | अत्रुप्त आत्मा
=))
20 Feb 2017 - 6:18 pm | चष्मेबद्दूर
ठीक ठीक जमलंय.
20 Feb 2017 - 7:09 pm | अभ्या..
मस्तंय डोक्युमेंट्री
21 Feb 2017 - 4:30 am | सचु कुळकर्णी
हजारो जवाबो से मेरी खामोशी अच्छी..न जाने कितने सवालो की आब्रू रखी !!
ज ब रा ट
आता युवराज अखिलेश च्या सायकल वर जाउन बसलेत, थोडेफार चान्सेस वाटत होते अखिलेश पुन्हा येण्याचे पण..... ह्या बुहार्यान नाट लावली* :)
*सांभाळुन घ्या लेको हे तर लय लाईट व्हर्शन झाल वर्हाडि भाषेच.
21 Feb 2017 - 11:46 am | दिलीप सावंत
मस्त लिहिलंय. माझ्या मते जे होते ते चांगल्या साठीच होते आटा पहा ना नोटबंदीवरून विरोधकांना या मुलीने दिले कडक उत्तर.
21 Feb 2017 - 3:41 pm | संजय पाटिल
आमच्या युवराजांचा मजाक उडवता?........ एकवेळ आमच्या युवराजांना पंतप्रधान होउदे मग बघतो तुम्हाला....