१. भारतात कधी नव्हे ते सध्या घडतेय व बुध्दीजीवी लोक आयुष्यात तिशीनंतर बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या स्थिर होउ लागलेत. त्यामुळे अशा लोकांच्या बाबतीत जे घडते ते म्हणजे त्यांना त्याच्या आवडीच्या अनेक गोष्टी आयुष्यात लवकर करता येतात. असे अनेक चांगले शिकलेले लोक की ज्यांना शिकविण्याची आवड असेल त्यांना शाळांतुन Guest Teacher करुन तास घ्यावेत. ह्यासाठी शाळांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावे. वरील बदलाचा परिणाम मुलांवर तसेच शिक्षकांवर वरही पडेल व त्यांना प्रोफ़ेशन, व इतर हजारो बाबींचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
२. असेच Guest Teacher तुम्हाला निवृत्त शिक्षकांतही दिसतील. चांगल्या निवृत्त शिक्षकांना प्रत्येकी एक वर्ग द्यावा व त्यांनी आठवड्यातील २ ते ४ तास वर्गावर येउन सध्याच्या शिक्षकाला/ना व मुलांना मार्गदर्शन करावे. वर्ग-शिक्षकाने काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडावेत; ते कोणत्याही बाबींचे असावेत- मुलांचे मोजके प्रश्न, अभ्यासक्रमाच्या अडचणी, शिकवण्याचे तंत्र, ई. त्यामुळे वर्ग-शिक्षकाचा सहभाग अनेकांगी होउन तो मुलांचा खऱ्या अर्थाने एक mentor, organizer, manager होइल.
३. स्वशिक्षणाची सवय लहानपणीच लागली तर त्याचे अनेक फायदे मुलांना तसेच पालकांना होतील. ह्यासाठी, शाळांनी मुलांना किमान १ वर्ष शाळेत न येता व घरुन अभ्यास करुन परीक्षा देण्याची मुभा द्यावी. हे जितक्या कमी वयात करता येइल तितके चांगले. मुलांना कळेल की शाळा का महत्वाची, स्वत: अभ्यास कसा करावा, स्वत: वेळेचे नियोजन कसे करावे, ई.
ह्यावर्षात गुणांना महत्व न देता, इतर काही निकष लावावेत. ह्यात अनेक चांगल्या सवयीही लावता येतील. उदा. स्वत:चे कपडे धुणे, स्वत:ची भांडी स्वच्छ करणे, वाहतुकीचे नियम शिकविणे, इ. अशा सवयींना पालकांनी गुण द्यावेत व तो तक्ता पाल्यांना द्यावा. ह्या वर्षात असे सर्व विषय त्यांना द्यावेत की जे कोणतीही शिकवणी न लावता त्यांना शिकावे लागतील व एक बरा असा भारतीय नागरीक होण्यासाठी मदत होइल. ज्या पालकांना हा सर्व प्रकार एक डोकेदुखी वाटेल, त्याच्यासाठी वेगळे पर्याय शोधून मुळ उद्दीष्ट कसे साधता येईल ते पहावे.
४. Bloom's Taxanomy ही आपल्याकडे BEd च्या विद्यार्थ्यांना असते की नाही मला माहीत नाही पण, जरी असली तरी, त्याच्या कोणत्या पातळीवर आपला अभ्यासक्रम असतो, शिक्षक आहेत (त्या त्या पातळीवर जाउन शिकवणारे), ते पाहता येइल व शाळेच्या अभ्यासक्रमात बदल घडवून आणता येतील. शिक्षण Bloom's Taxanomy च्या वरील पातळींवर जाण्यासाठी Guest Teacher ची मदत घ्यावी.
५. काही विषयाच्या परीक्षा घेउ नयेत पण नुसतेच विषय शिकवावेत. उदा. इतिहास. कारण त्यामागे आपली भावना अशी असते की मुलांना आपली संस्कृती कळावी. मग ती नुसते शिकवुनही कळेलच.
त्यांना अशी पुस्तके वाचुन लेख लिहुन आणण्यास सांगावेत की ज्यामुळे त्यांचा अशा विषयांचा अभ्यास आपोआपच होइल. एकमेकांचे लेख त्यांना तपासायला देउन गुण देण्यास सांगावे. वाचलेला वेळ मुलांना softskills शिकवण्यासाठी वापरावेत, उदा presentation skills, दुकानात जाउन काम करणे.
नागरीकशास्त्र मात्र १०० गुणांचे करावे. वाहतूकीच्या नियमांबद्दल २५ मार्कांचा विषय दर वर्षी असावा.
६. सर्वाना आवड्तील अशा कला शिकवाव्यात (६४ कलांपैकी), नुसत्या गायन, वादन, नॄत्य, अभिनय अशा चौकटीमधे न राहता, मुलाना जे आवडेल ते त्यांनी शिकण्यासाठी काय करावे ते पहावे. ज्यांना गायन, वादन, नॄत्य, अभिनय, चित्रकला नाही शिकायची/चा/चे, त्यांनी काय करावे? अर्थात हे ६४ शिक्षक एकाच शाळेत असणे शक्य नाही, त्यासाठी शाळांनी Resource pooling करावे.
७. Off period ला, तसेच आजारी मुलाने घरी बसुन (शक्य असल्यास) काय करावे हे नीट ठरवावे. एखादी ऐनवेळेची exam घ्यावी व त्याचे गुण द्यावेत. असे ऐनवेळेचे पेपर आधीच तयार असावेत. शिक्षक वर्षातुन सरासरी १०% वेळा सुट्टी घेत असतीलच त्यामुळे Off period भरपुर असतात. थोड्याशा अधिक चांगल्या प्लॅनिंगने अशा तासांना Guest Teacher ना बोलवुन घेता येउ शकते.
अशा सर्व activities साठे शाळेची वेब साईट वापरावी (शक्य असल्यास).
८. (निदान ५ वी पर्य़ंत तरी, नंतर कमी असे विषय असावेत) सर्व विषयांच्या कमीतकमी ३ difficulty levels असाव्यात. एखाद्याला काय झेपते आहे, त्याप्रमाणे त्याला ती पातळी निवडण्याची मुभा असावी. इथे गुणांना काहीच महत्व न देता, त्याविषयाची त्या मुलाला गोडी कशी लागेल ते पहाण्यासाठी हे करावे. अर्थात ह्यात काही नियम आणुन हे अजुन परिणामकारक करावे. म्हणजे शाळा = परीक्षा = पास/नापास असे समीकरण न राहता, शाळा = शिकण्याची संस्था असे होईल.
९. नुकताच मी माझ्या कॉलेजच्या alumini च्या कार्यक्रमाला गेलो होतो. सगळ्यांना प्रकर्षाने असे दिसले की, ८०% यशस्वी व्यावसायिक कॉलेजमधे असतांना हुषार मुलांत गणले जात नव्हते. रेटींग/measuring and assessing मधे खूप मोठी गॅप आहे हे लगेच कळते.
ह्यावर विचार व्हावा.
प्रतिक्रिया
16 Feb 2009 - 12:02 am | हरकाम्या
आपला लेख अतिशय चांगला आहे ,पण हे बदल करणार कोण ? आपले मंत्री तर मुलांना नको ते शिकवु पाहतात त्यांच्या डोक्यात
हे बदल कधी घुसणार ?या साथि कुणाला नवस करावा हे कळ्त नाही .
16 Feb 2009 - 7:05 am | त्रास
बदलांची इतक्यात घाइ नाही. प्रश्नाला वाचा फोडणे आवश्यक होते ते केले. बदल हे हळुहळू होतील पण ते कोणते असायल हवेत ते आधी ठरवणे अगत्याचे आहे.
16 Feb 2009 - 12:36 am | भडकमकर मास्तर
गेस्ट लेक्चररची कल्पना चांगली आहे...
मला तुमचे सांगणे पटते पण फार प्रॅक्टिकल अडचणी उद्भवतील असे वाटते.
अशा प्रकारचे बोलणे शिक्षकापुढे केले तर शिक्षक म्हणतात, " तुम्हाला सगळे ज्ञान शाळेत शिकवावे असेच वाटते... इथे आधीच नॉर्मल अभ्यासक्रम पूर्ण करता करता अवघड होतंय, त्यात १४ विद्या ६४ कला कशा शिकवणार? जे एवढे हौशी पालक आहेत ते स्वतः अधिक कष्ट घेऊन / शिकवणी लावून शिकवतातच ...वाहतुकीचेही नियम शाळेतच शिकवावे ? उद्या वैयक्तिक स्वच्छता , आंघोळ, दात घासणे शाळेत शिकवावे असे म्हणाल.. हल्ली पालकांना पोरांसाठी घरी वेळ द्यायला जमत नाही म्हणून शाळेत हे शिकवावे आणि ते सुद्धा शिकवावे अशी नवीन टूम निघत असते सारखी"...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
16 Feb 2009 - 7:07 am | त्रास
नॉर्मल अभ्यासक्रम शिकवण्यासाठी लागणारा वेळ तितका का लागतो?
16 Feb 2009 - 8:53 am | नितिन थत्ते
त्रास यांनी चांगला विषय मांडला आहे.
प्रतिसाद / मत नंतर देईन.
अवांतरः त्रास यांच्या पूर्वीच्या धाग्यात ते आय टी क्षेत्रातले शिक्षण घेत आहेत असे म्हटले होते. पण त्यांनी आय टी बरोबरच इतरही विषयांत रस घेतलेला दिसतो. कीप इट अप. समाजाला अश्या बहुरंगी व्यक्तिमत्वांची खूप गरज असते.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
16 Feb 2009 - 1:10 pm | त्रास
सध्या बेकार असल्यामुळे कमीत कमी शिक्षक म्हणून तरी काम मिळेल का हे पाहतोय. त्यासाठी शिक्षण कसे द्यायचे हे शिकलो.
16 Feb 2009 - 8:58 am | सहज
लेख चांगला आहे. चर्चा वाचतो आहे.
16 Feb 2009 - 6:02 pm | त्रास
तुमचा प्रतिसाद वाचायचा आहे.
16 Feb 2009 - 11:33 am | फ्रॅक्चर बंड्या
Guest Teacher, गायन, वादन, नॄत्य, अभिनय ,Resource pooling हे सगळे शहरांमधे ठिक आहे..
खेड्यात हे शक्य नाहिये...
तिथे एक वर्ग = एक शिशक हेच समीकरण असते...
16 Feb 2009 - 1:09 pm | त्रास
शहरामधे जे शिकवतात ते खेड्यामधे जितके लागू होते तितकेच शिकवायला पाहिजे. खेड्यातील मुलांना त्याच्या सभोवती जे आहे त्यातच रोजगार मिळावा असेच शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यात शेती, त्यावर आधारीत व्यवसाय, त्याचे इकॉनॉमिक्स, त्याचे इंजिनीयरींग, हेच महत्वाचे आहे. त्या मुलांना शहरी मुलांसारखे शिक्षण देउन त्यांची आपण वाट लावतो आहोत.
17 Feb 2009 - 3:46 pm | घाशीराम कोतवाल १.२
एक शिक्षक ४ वर्ग आहेत बंड्याभाउ त्या शाळांच काय करणार हे?
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
17 Feb 2009 - 3:52 pm | घाशीराम कोतवाल १.२
एक शिक्षक ४ वर्ग आहेत बंड्याभाउ त्या शाळांच काय करणार हे?
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
16 Feb 2009 - 1:26 pm | पक्या
लेख छान वाटला. बरेच मुद्दे व्यवहारात अमलात आणण्याजोगे आहेत असे वाटतेय.
आपल्याकडचे शिक्षण हे खूप पुस्तकी आहे, बरीच मुले घोकमपट्टी करून पास झालेली पाहिली आहेत. पण पास होऊनही फारसे ज्ञान पदरात पडलेले नसते. कारण विषयच नीट कळलेला नसतो. शाळांमध्ये एखादा विषय शिकवताना त्या विषयाच्या संदर्भात हॅण्ड्स ऑन एक्टिव्हीटीज फारच कमी असतात किंवा नसतातच.
>>काही विषयाच्या परीक्षा घेउ नयेत पण नुसतेच विषय शिकवावेत. उदा. इतिहास
हा मुद्दा पटला. किमान १ ली ते ८ वी परिक्षाच नसाव्यात ह्या मताचा मी आहे. इतिहास सारख्या विषयाची परिक्षा घेऊन काय साध्य होते माहित नाही. उलट एखादा सर्व विषयात पास होउन फक्त इतिहासात नापास झाला तर त्या मुलाचे आख्खे वर्ष वाया जाणार.
16 Feb 2009 - 1:31 pm | त्रास
उलट एखादा सर्व विषयात पास होउन फक्त इतिहासात नापास झाला तर त्या मुलाचे आख्खे वर्ष वाया जाणार.
अगदी ह्याच मताचा मी आहे. त्यामुळेच काही विषयांची परिक्षा घेत बसत बसण्यापेक्षा त्या न घेउन जो वेल वाचतो त्या वेळेत इतर काही मुल्यवर्ध्रित शिक्षणासारख्या गोष्टी शिकवता येतील ते पहावे.
16 Feb 2009 - 7:08 pm | कलंत्री
श्री त्रास,
आपले चिंतन आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय आवडली. मात्र येथेच न थांबता आपण या सक्रियतेची जोड देउ शकता. सरळ एखादी सायकल घ्यायची आणि आपल्यासर्व मुद्द्याचे सादरीकरण बनवायचे. महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि खेड्यावजा गावात जायचे आणि यावर चर्चा, विचार मंथन घडवुन आणायचे असा घाट घाला.
अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे. सुरवात करणारा हवा.
या उपक्रमात मलाही सहभागी व्हायला आवडेल.
द्वारकानाथ कलंत्री
16 Feb 2009 - 7:17 pm | त्रास
मी सुरुवात केली आहे. सध्या माझ्या विद्यार्थ्यांना एका नवीन पद्धतीने शिकवत आहे.
सगळ्या लोकांपर्यंत असे विचार पोहोचवायचे असतील तर जी काही माध्यमे आहेत त्यातील सर्वात कमी वेळखाउ आणि स्वस्त पर्याय म्हणजे वर्तमानपत्रे. त्यांना हा लेख पाठवला तर साधी पोहोच सुद्धा मिळाली नाही. छापुन येणे दुरच.
तरीही काही नव विचारांच्या शिक्षकांपर्यंत हा लेख पाठवून त्यांची मते घेतली आहेत. बघुया काय करता येइल ते.
तुमच्या माहितीतील गुरुजनांना हा लेख दाखवू शकाल का?
16 Feb 2009 - 7:57 pm | लिखाळ
छान चर्चाविषय.
'जीवन सुखात जगण्याची कला' व 'भाजी-भाकरी मिळवण्याची विद्या' अश्या दोन पातळीवर आपले शिक्षण असावे असे मला वाटते. जीवन जगण्याच्या कलेबद्दल प्राथमिक-माध्यमिक शाळेत मुलांची मानसिकता बनवता येईल आणि त्याचबरोबर भाजी-भाकरी कमवायचे शिक्षण घेण्यासाठी पूर्वतयारी करता येईल. (हे कसे करावे याबद्दल माझ्याकडे आराखडा नाही आणि याच तत्त्वावर आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ठीक..तो प्रयत्न योग्य तर्हेने कसा करावा हे तज्ञ ठरवतीलच.)
शिक्षण म्हणजे काय? शिक्षण कसे असावे? याबद्दल जे. कृष्णमुर्तींचे विचार मननीय आहेत. त्यांचे याविषयीचे निबंध 'शिक्षण' या नावाने प्रसिद्ध पुस्तकात मराठीत अनुवादित वाचलेले स्मरतात.
-- लिखाळ.
16 Feb 2009 - 8:00 pm | त्रास
कृपया ते पुस्तक कुठे मिळेल ते जरुर कळवा
16 Feb 2009 - 8:10 pm | लिखाळ
इंग्रजीतून वाचायचे असेल तर कृष्णमुर्ती फाउंडेशनला विचारावे. पुण्यात अबक चौकात मराठी मिळावे.
मला ते पुस्तक 'पुणे मराठी ग्रंथालयात' मिळाले होते. तिथे चौकशी करुनही प्रकाशक वगैरे कळतील बहुधा.
आता गुगलवर शोधताना
एज्युकेशन अँन्ड सिग्निफिकेन्स ऑफ लाईफ या पुस्तकातला एक भाग
कृष्णमुर्ती ऑन एड्युकेशन
इथे अजुन एक इ-बुक मिळाले.
-- लिखाळ.
16 Feb 2009 - 8:28 pm | त्रास
धन्यवाद
16 Feb 2009 - 9:50 pm | प्राजु
वाचते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Feb 2009 - 3:22 pm | मॅन्ड्रेक
श्री त्रास,( छे असे कसे म्हणु?) एक सुन्दर विषय.
आपले चिंतन आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय आवडली. मात्र येथेच न थांबता आपण या सक्रियतेची जोड देउ शकता. सरळ एखादी सायकल घ्यायची आणि आपल्यासर्व मुद्द्याचे सादरीकरण बनवायचे. महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि खेड्यावजा गावात जायचे आणि यावर चर्चा, विचार मंथन घडवुन आणायचे असा घाट घाला.
अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे. सुरवात करणारा हवा.
या उपक्रमात मलाही सहभागी व्हायला आवडेल.- मलाही आवडेल
at and post : janadu.
17 Feb 2009 - 3:47 pm | त्रास
ह्या एप्रिल-मे मधे मी १५ दिवस सुट्टी घेणार आहे त्या वेळेत ४ ते ५ दिवस ह्या कामासाठी राखून ठेवण्याची माझी तयारी आहे. शाळांना ह्यादिवसात सुट्ट्या असतील व शिक्षक रिसेप्टिबल असतील.
करुया काहितरी.
मला इथे संपर्क साधा- tras.denar@gmail.com
17 Feb 2009 - 6:15 pm | उर्मिला००
तुमचे लेखातुन व्यक्त झालेले विचार आवडले.तुम्ही म्हणता ती Bloom's Taxanomy आम्ही शिक्षक लोक दैनंदिन अध्यापनात वापरतो.तुम्ही म्हणता तसे बदल होऊ घातले आहेत्.पण ते राबवणारे शिक्षक ही काही पातळीपर्यंत कमी पडतात्.सर्वस्वी शिक्षणक्षेत्रातील अपयशाचे खापर सरकार किंवा तत्सम कोणावर फोड॑ण्यापेक्षा आपणास शिक्षणप्रणालीतील १ घटक म्हणुन काय करता येईल याचा विचार सर्वार्थाने व्हायला हवा.
17 Feb 2009 - 6:49 pm | त्रास
ज्यांचा व्यवसाय शि़कवणे आहे त्यांच्यासाठी ही छोटीशी भेट