"पृथ्वीवर परग्रहवासीयांचे आगमन (म्हणजे जवळपास आक्रमणच), मग अमेरिका (इक्वल टू आख्ख जग) यांना खतरा!! मग त्यांच्याशी युद्ध आणि शेवटी त्यांची कुठली ती मदरशिप फोडून मिळवलेला जबरदस्त विजय" एवढ्या कथेमध्ये इकडे तिकडे थोडा तडका मारून तयार केलेले अनेक हॉलिवूड चित्रपट आपण पाहिले आहेतच पण सुदैवाने Arrival हा यांपेक्षा वेगळा आहे...
चित्रपटाचा ट्रेलर पहिला असेल तर लक्षात येत कि एका भाषातज्ज्ञाच्या आजूबाजूला हे कथानक फिरते.
चित्रपटातील प्रमुख पात्रे:
लुईस : भाषातज्ज्ञ (हि नायिका आहे, Amy Adams ने छान केलीये भूमिका)
इयान : भौतिक शास्त्रज्ञ(याची डिग्री जरा तपासावी लागेल! )
Abott आणि Costello : परग्रहवासी(हि नाव इयान त्यांना देतो)
तर सुरु करूया, खरतर सुरुवात किंवा शेवट या खूपच गोंधळात टाकणाऱ्या संकल्पना आहेत. एखाद्या कथेची सुरुवात कुठून होते किंवा तिचा शेवट कुठे होतो हे कसे ठरवायचं? सगळंच अस्पष्ट आहे! काळजी करू नका, हि माझी वाक्य नाहीत! चित्रपटाची सुरुवात अश्याच वाक्यांनी होते.
फ्लॅशबॅक ची काही दृश्य सुरु होतात तेव्हा लुईस तिच्या लहान मुलीसोबत खेळात आहे, मजा करत आहे. हळूहळू मुलगी मोठी होत आहे पण मुलीचे वडील त्या दोघींबरोबर दिसत नाहीत. वाढत्या वयासोबत आई आणि मुलींमध्ये थोडा तणाव देखील दिसतो. त्यातच एका दृश्यात समजते कि मुलीला कॅन्सर आहे आणि तिचा मृत्यू अटळ आहे. लुईस खचून जाते आणि पुढच्याच दृश्यात मृत्यूशैय्येवर तिची मुलगी दिसते. हे सगळं पहिल्या ५-७ मिनिटात होत...
आता आजचा दिवस: लुईस कॉलेज मध्ये चालली आहे अर्थातच शिकवायला! ती भाषातज्ज्ञ आहे. ती थोडी उदासच दिसते. वर्गात शिकवत असताना काही मुलांचे फोन वाजू लागतात आणि "ती" बातमी समजते... ते आल्याची! पृथ्वीवर १२ ठिकाणी UFO उतरल्याची बातमी येते. सगळीकडे सावधानीचा इशारा म्हणून आणीबाणी जाहीर केली जाते.
दुसऱ्याच दिवशी लुईस कडे US मिलिटरी ऑफिसर येतो याच नाव फॉरेस्ट. याला लुईस ने आधीही एकदा भाषातज्ज्ञ म्हणून मदत केलेली आहे. तो तिला अलिएन्स ची भाषा समजून घेण्याचं काम देतो. इथून लुईस चा प्रवास सुरु होतो.
तिला UFO लँडिंग साईटवर नेण्यात येत. इथली सिनेमॅटोग्राफी कहर आहे. खूपच सुंदर!
आणि हो तिच्यासोबत या प्रोजेक्टवर एका भौतिकशात्रज्ञ देखील असतो. तोच तो इयान! (Jeremy Rener , अव्हेंजर मधला बाणवाला! आता होकायं? असे नका विचारू)
लुईस आपले काम सुरु करते. हा भाग खूप भारी आहे. एका नवीन प्रजातीशी पहिल्यांदा होणारे संवाद!
aliens ठराविक वेळेच्या अंतराने (१८ तासांनी बहुतेक ) माणसांना यानात प्रवेश करून देत असतात. या वेळेत त्यांच्याशी संवाद साधला जाऊ शकत असतो.
लुईस पहिल्यांदा गडबडते. एका काचेच्या पलीकडे तिला आठ पायांचे दोन alien दिसू लागतात. इयान आणि लुईस मिळून त्यांच्याशी काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते कळत आहे कि नाही याची खात्री नसते. aliens कडून देखील प्रत्युत्तर म्हणून काही ध्वनी येतात पण त्यांना decode करणे कठीण होते.
इकडे मिलिटरी ऑफिसरवर देखील दबाव असतो कारण UFO पृथ्वीवर का आले आहेत याचे उत्तर सगळ्या जगातील सरकारांना पाहिजे असते.
जर aliens युद्ध करायला आले असतील तर... या विचाराने लोक चिंतीत होऊ लागतात आणि मग चोऱ्या लुटालूट वगैरे प्रकार वाढू लागतात.
त्यामुळे तो लुईस ला लवकरात लवकर अर्थ काढायला सांगतो.
लुईस आता लिखित पद्धतीचा वापर करायचा ठरवते आणि HUMAN हा शब्द लिहून हातवारे करून aliens ना समजून द्यायचा प्रयत्न करते. थोडावेळ सगळीकडे शांतता पसरते आणि मग अलिएन्स त्यांच्या हात/पाय मधून शाई सोडून हवेतच एक वर्तुळाकार नक्षी बनवतात! हीच त्यांची भाषा!
लुईस ने त्यांची भाषा समजून घेण्यात प्राथमिक यश मिळवलेले असते! पण अजून बराच मोठा पल्ला गाठायचा असतो आणि वेळ मात्र कमी!
याच दरम्यान लुईसला तिच्या मुलीची दृश्ये स्वप्नात वारंवार दिसू लागतात. कदाचित कामाच्या ताणामुळे! (इथे प्रेक्षक म्हणून आपण वैतागतोही काय सारखी हिला हिच्या मुलीची आठवण होतेय म्हणून)
यानंतर काही दिवस अशाप्रकारे शब्दकोश वाढवला जातो. त्यांची भाषा वर्तुळाकार आहे आणि एक वर्तुळ संपूर्ण अर्थ सांगणारे एक अथवा अनेक वाक्य असलेले देखील असू शकते हे कळू लागते. पण यात खूप वेळ जात असतो आणि आता लोकांचा संयम संपत आलेला असतो. सैनिक देखील बघ्याच्या भूमिकेत असतात आणि आता त्यांना काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी येऊ लागलेली असते!
आता फॉरेस्ट वैतागलेला असतो, तो लुईस ला Aliens ना महत्वाचा प्रश्न विचार अशी आज्ञा देतो. कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागलेली असते.
लुईस चा नाईलाज असतो, अजूनही भाषेचे ज्ञान संपूर्ण नाही त्यामुळे उत्तराचे अर्थ वेगळेही निघू शकतात असे तिचे म्हणणे कोणी ऐकत नाही.
यानामध्ये गेल्यावर ती aliens ना विचारते "तुमचा पृथ्वीवर येण्याचा उद्देश काय?"
उत्तर येते "Use Weapons "
या उत्तरानंतर सगळीकडे गोंधळ सुरु होतो काही देश युद्धाची तयारी सुरु करतात. सैनिक जमवाजमव सुरु होते. लुईस काळजीत पडते ती पुन्हा एकदा इयान सोबत यानात जाण्याची तयारी करते.
आता लुईस आणि इयान aliens शी संवाद करत असताना अचानक गोळीबाराचे आवाज येऊ लागतात. काय होतंय हे कळण्याआधीच aliens या दोघांना याना बाहेर टाकतात आणि बाहेर फेकले गेलेले असताना यांना यानाच्या आतमध्ये स्फोट झालेला दिसतो!! हा सगळं प्रकार काही सैनिकांनी केल्याचे समजते. या कृतीमुळे ते यान जमिनीपासून बऱ्याच उंचीवर जाते आणि तेथे स्थिरावते... पण निघून जात नाही!
लुईस ला या सगळ्यात देखील तिच्या मुलीची स्वप्न पडत आहेत. त्यात चीन ने आता त्यांच्या हद्दीतील UFO वर हल्ला करायचे निश्चित केले आहे आणि रशिया व पाकिस्तान देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकायच्या तयारीत आहेत. सगळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. अमेरिका देखील येणाऱ्या दबावामुळे हल्ल्याची तयारी करू लागते. सैनिकी गाड्या छावणी मध्ये येऊ लागतात.
यानातून बाहेर फेकल्याच्या धक्क्यातून सावरून लुईस जागी होते. युद्ध होणार हे दिसत असते आणि आता aliens हि आवाक्याबाहेर गेलेले असतात अशात तिला पुन्हा तिच्या मुलीची स्वप्ने पडतात. आपल्यालाही थोडं गोंधळायला होत. लुईस पुन्हा यानाच्या दिशेने चालू लागते. ती काय करू शकणार हा प्रश्न इयान ला पडलेला असतानाच यानामधून एक छोटी कॅप्सूल निघते आणि लुईस ला घेऊन यानाकडे जाते.
लुईस खूपच गोंधळलेली असते. यावेळी ती Costello ला यानात समोरासमोर भेटते आणि एक प्रश्न विचारते, "माझ्या स्वप्नात येणारी ती मुलगी कोण आहे?"
इथे प्रेक्षकपण हादरतात! म्हणजे हिला नक्की काय म्हणायचंय? असा प्रश्न कुठून आला?
मग या आणि इतर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे पुढच्या काही वेळात मिळू लागतात!
चित्रपट स्पून फिडींग अजिबात करत नाही त्यामुळे लक्ष विचलित झाल्यास अजिबात कळू न शकण्याचीही शक्यता आहे. म्हणून लक्ष देऊन पाहावा.
कथेमध्ये नावीन्य आहे. चित्रपटाचा टोन थोडा डिप्रेसिंग आहे पण ती कथेची गरजच आहे.
ज्यांना मेंदूला खुराक आवडतो आणि विज्ञान कथा आवडतात त्यांनी बघावाच असा हा चित्रपट आहे!
हा खरतर चर्चा करण्यासारखा चित्रपट आहे पण spoiler टाकायला नको म्हणून आवरते घेतो.
जर कोणाला चित्रपटाचा शेवट त्याचे अर्थ आणि स्पॉईलर्स वर चर्चा करायची असेल तर मग करू शकतो... :)
प्रतिक्रिया
15 Jan 2017 - 10:23 pm | एस
मस्त परीक्षण. चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाटत आहे.
15 Jan 2017 - 10:59 pm | टवाळ कार्टा
+१
15 Jan 2017 - 11:05 pm | संदीप डांगे
तुमच्या लेखातल्या पहिल्या परिच्छेदातून चित्रपट नेहमीपेक्षा वेगळा असल्याचे समजल्याने लेख पुढे वाचला नाही, आता चित्रपट बघितल्यावर वाचेन. उगाच स्पॉइलर नको.
16 Jan 2017 - 10:19 pm | शब्दबम्बाळ
ओक्के! पाहिला कि सांगा इथेच कसा वाटला ते!
16 Jan 2017 - 1:04 am | ज्योति अळवणी
तुम्ही लिहिलेलं परीक्षण वाचलं. हा सिनेमा नक्की बघणार
16 Jan 2017 - 4:45 pm | अस्वस्थामा
चित्रपट पाहिलाय आणि चर्चा करायला मजा येईल खरंतर. स्पॉइलर डिस्क्लेमर टाकून वेगळा धागा होऊ शकतो त्यासाठी.
16 Jan 2017 - 10:21 pm | शब्दबम्बाळ
चर्चा करायला आवडेल पण तितक्या लोकांनी पहिला असेल तर मजा येईल प्रत्येकाचे दृष्टिकोन ऐकायला!
आता पर्यंत फक्त तुम्ही आणि मीच दिसतोय ज्यांनी पाहिलाय... काउन्ट बढने दो थोडा! ;)
16 Jan 2017 - 7:18 pm | प्रचेतस
हा चित्रपट पाहायच्या आधीच दंगलच्या शोजमुळे थिएटरमधून निघून गेला.
परीक्षण छानच.
17 Jan 2017 - 12:49 am | nanaba
Kuthe milel baghayala theater madhe nahiye.
20 Jan 2017 - 11:14 am | एमी
छान परिचय.
मला इंग्रजी चित्रपटांतील अक्सेंट अजीबातच कळत नाही. कुठे स्क्रिप्ट मिळाली तर वाचेन.