कोड मंत्र - अत्यंत प्रभावी सादरीकरण

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
10 Jan 2017 - 3:00 pm

लष्कराचे सैनिकांसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू आहे. मराठा रेजिमेंटच्या सैनिकांची एक मोठी तुकडी अत्यंत कठोर प्रशिक्षणाची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवित आहे. परंतु या तुकडीतल्या रवी शेलार नावाच्या प्रशिक्षणार्थीला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाहीय्ये. इतरांच्या तुलनेत तो मागे पडतो. त्यांच्या अधिकार्‍याला, कर्नल प्रतापराव निंबाळकरांना त्याचे मागे पडणे अजिबात सहन होत नाही.ते स्वतः अत्यंत कर्तव्यकठोर आहेत. नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढताना स्वतःला गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केलेला आहे. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना जिवंतपणीच परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान जाहीर झालेला आहे. आपल्या पथकातील कोणी असा मागे कसा पडू शकतो हेच त्यांना मान्य नाही. प्रत्येकाने हे प्रशिक्षण पूर्ण केलेच पाहिजे, त्यासाठी कोणतीही सबब चालणार नाही, दुबळेपणा दाखविलेला मान्य नाही अशी त्यांची अत्यंत कडक शिस्त आहे. पथकात एखादा कमी पडायला लागला किंवा एखाद्याने अगदी किरकोळ शिस्तभंग केला तरी 'कोड मंत्र' या नावाने ओळ्खली जाणारी परंतु अनधिकृत असलेली अत्यंत कठोर शिक्षा ते त्या सैनिकांना भोगायला लावतात. ज्याला कोड मंत्राची शिक्षा होते त्याला अनेक दिवस अन्नपाण्याविना उपाशी ठेवणे, कठोर मारहाण करणे, बंदुकीच्या दस्त्याने फटके मारणे अशा स्वरूपाची कठोर व वेदनादायी शिक्षा देऊन त्याला पथकातील इतरांच्या बरोबरीने आणले जाते. 'कोड मंत्र' या शिक्षेला लष्कराची अधिकृत मान्यता नाही. त्यामुळे अशी शिक्षा देऊ नये यासाठी त्यांना पूर्वीच वॉर्निंग देण्यात आली आहे. परंतु अत्यंत कर्तव्यकठोर असलेल्या कर्नल प्रतापराव निंबाळकरांना आपल्या पथकातील कोणत्याही सैनिकात काहीतरी कमतरता असू शकते हे मान्यच नाही. त्यामुळे वरीष्ठांची आज्ञा धुडकावून ते ही शिक्षा देतच राहतात.

______________________________________________________________________________________________________


(नाटकातील एका प्रसंगात वकील अहल्या (मुक्ता बर्वे) आणि कर्नल प्रतापराव निंबाळकर (अजय पूरकर))

______________________________________________________________________________________________________

रवी शेलारला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाही. आपण आजारी असल्याने आपली बदली करावी किंवा सेवामुक्त करावे अशी विनंती त्याने पूर्वी अनेकदा केली आहे. परंतु प्रशिक्षण झेपत नाही म्हणजे काय या मानसिकतेतून कर्नल प्रतापराव निंबाळकर त्याची विनंती धुडकावून त्याला जबरदस्तीने प्रशिक्षण देतच राहतात. त्यांच्याच पथकातील विक्रम नावाचा एक सैनिक सीमेवर हालचाल दिसल्याने गोळीबार करून सीमेपलिकडील दोघा जणांना मारतो. त्याच्या म्हणण्यानुसार ते नागरी वेषात असलेले अतिरेकी होते. परंतु त्याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने या प्रकरणात मानवी हक्क उल्लघनाची भानगड होऊ शकेल हे ओळखून हे प्रकरण बाहेर येऊन दिले जात नाही. हे प्रकरण समजल्यावर रवी शेलार लष्कराच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना गुपचुप पत्र लिहून आपली बदली करावी अशी मागणी करतो. तसेच नुकत्याच झालेल्या सीमेवरील गोळीबाराबाबत आपल्याकडे गुप्त माहिती आहे असेही तो लिहितो.

दुर्दैवाने हे पत्र कर्नल प्रतापराव निंबाळकरांच्या हातात पडते. ते संतापून आपले कनिष्ठ जाधव यांना त्याला 'कोड मंत्र' शिक्षा देण्यास फर्मावतात. जाधव विक्रमला सांगून त्याच्याकरवी ही शिक्षा अंमलात आणतात. शिक्षेची अंमलबजावणी होत असताना त्यात रवीचा मृत्यु होतो आणि आता हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार याची जाणीव झाल्यावर प्रतापराव व जाधव आवई उठवून देतात की विक्रमचेच रवीशी भांडण झाले व त्या भांडणात विक्रमच्या हातून रवीचा खून झाला.

आता खुनाबद्दल विक्रमचे कोर्टमार्शल होणार असते. लष्कर आपल्या बाजूने एका नामवंत वकीलाला उभे करतात. दुसरीकडे रवीच्या आईच्या दु:खाला पारावर रहात नाही कारण तिचा मुलगा रवी मृत्युमुखी पडलेला असतो व या घटनेतील नाट्य म्हणजे वरीष्ठांच्या सांगण्यावरून रवीला कोड मंत्र ची शिक्षा द्यायला गेलेला विक्रम हा रवीचाच मोठा भाऊ असतो. एक मुलगा गेलेला व दुसरा खुनाच्या आरोपात अडकलेला, यामुळे रवीची दु:खी आई अहल्या या नामवंत महिला वकीलाला विक्रमच्या बाजूने खटला लढण्याची विनंती करते. या केसमध्ये काहीही दम नसून विक्रमनेच रवीचा खून केला आहे व त्यासाठी मोटीव्ह आहे याची अहल्येला खात्री असते. त्यामुळे ती सुरवातीला ही केस घेण्यास नकार देते. परंतु सर्व घटनांमध्ये काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात यायला लागते. तसेच लष्कराच्या बाजूने केस लढणारा वकील तिचा प्रतिस्पर्धी असतो. त्यामुळे अधिक चौकशी करून मी ही केस घ्यायची का नाही याचा निर्णय घेईन असे ती रवीच्या आईला सांगते.

प्रत्यक्ष लष्करी तळावर जाऊन चौकशीला प्रारंभ केल्यावर अनेक लपविलेल्या गोष्टी तिच्या लक्षात यायला लागतात. जाधव व प्रतापराव बर्‍याच गोष्टी आपल्यापासून लपवित आहेत असे तिला वाटायला लागते. खुनाचा आरोप असलेला विक्रम घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही बोलायला तयार नसतो. त्याला बोलते करण्यास तिला खूप प्रयत्न करावे लागतात. प्रतापरावांचाच एक सहकारी महेश थत्ते याला कोड मंत्र ही शिक्षेची पद्धत मान्य नसते. रवी खूप आजारी आहे व त्याला हे प्रशिक्षण झेपत नसल्याने त्याला मुक्त करावे अशी विनंती तो वारंवार प्रतापरावांना करत असतो. परंतु आपल्या अहंकारामुळे प्रतापराव त्यांची विनंती देखील ते धुडकावून लावतात. शेवटी रवीच्या मृत्युनंतर महेश थत्ते निनावी फोन करून अहल्येला बरीच माहिती देतात. परंतु आपल्याला न्यायालयात साक्ष देण्यासाठी जबरदस्तीने बोलाविले जाईल व तिथे आपल्याला आपल्या वरीष्ठांच्या विरूद्ध असत्य सांगणे जमणार नाही हे लक्षात येतात ते गोळी झाडून आत्महत्या करतात.

शेवटी कोर्टमार्शल सुरू होते. त्यात अनेकांच्या साक्षीतून हळूहळू घटनेचे धागेदोरे उलगडायला लागतात. शेवटी अनेकांच्या विरोधाला झुगारून अहल्या प्रत्यक्ष कर्नल प्रतापराव निंबाळकरांना साक्षीसाठी पिंजर्‍यात उभी करते.

प्रतापराव साक्षीत काय सांगतात, रवीच्या मृत्युचे खरे कारण शोधण्यात अहल्येला यश होते का, अहल्या केस हरते का जिंकते, विक्रमवर खुनाचा आरोप शाबीत होतो का, प्रतापराव व अहल्येचा न्यायालयात सामना कसा होतो हे प्रत्यक्ष नाटकातच पाहण्यात मजा आहे. या नाटकात सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत नात्यांची गुंतागुंत दाखविली आहे. ती काहीशी अनावश्यक वाटते.

या नाटकात जवळपास ४० कलाकार काम करतात. नाटकातील लष्करी तळाचे नेपथ्य, सैनिकांची परेड, युद्धप्रसंगातील सायरन व गोळीबाराचे आवाज इ. अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले आहे. रंगमंचाच्या ५० फूट मर्यादेत इतक्या सर्व गोष्टी दाखविणे हे एक मोठे आव्हान होते व ते यशस्वीपणे पेलले गेले आहे. आजवर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर लष्कराशी संबंधित विषय केन्द्रस्थानी असलेले नाटक सहसा आलेले नाही. मिलिटरी कोर्टमार्शलवर आधारीत हे नाटक असून, लष्करी जवानांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहायचे की लष्करी शिस्तीच्या कर्तव्यकठोर भूमिकेतून, हा विवाद्य विषय या नाटकात प्रभावीरीत्या हाताळण्यात आलेला आहे. विषय, आशय, मांडणी, सादरीकरण, अभिनय, तांत्रिक बाजू अशा सर्वच पातळ्यांवर हे नाटक नित्याच्या पठडीबाज नाटकांपेक्षा अत्यंत आगळेवेगळे असे आहे. जवळजवळ चाळीसेक कलाकारांच्या संचातील हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करणे हे एक मोठेच आव्हान होते. मुक्ता बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सहजगत्या आणि यशस्वीरीत्या पेलले आहे.

मुक्ता बर्वेने वकील अहल्येची भूमिका अत्यंत समर्थपणे पेलली आहे. कोर्टमार्शलमध्ये एखाद्या कसलेल्या वकीलाप्रमाणे ती साक्षीदारांना बोलते करून त्यांच्याकडून सत्य वदवून घेते. तिच्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका अजय पूरकरने केली आहे. अत्यंत कडक शिस्तीच्या, कठोर कर्नल प्रतापराव निंबाळकरांची भूमिका त्याने व्यवस्थित पेललेली आहे. त्याचा अहंकार, जबरदस्त आत्मविश्वास, सहकार्‍यांवरील हुकमत, आवाजातील जरब इ. सर्व गोष्टींचे त्याने प्रभावी सादरीकरण केले आहे.

अमेरिकी लष्करातील एका घटनेवर आधारीत ‘अ फ्यू गुड मेन’ हे नाटक अ‍ॅरॉन सॉर्किन या अमेरिकी लेखकानं १९८९ साली लिहिले आणि पुढे ते ब्रॉडवेवर सादर झाले. त्यावर नंतर याच नावाचा सिनेमाही निघाला. 'अ फ्यू गुड मेन' हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात लष्करी अधिकार्‍याची जबरदस्तभूमिका प्रख्यात अभिनेता जॅक निकोल्सनने केली होती. मुख्य वकीलाच्या भूमिकेत चॉकलेटबॉय टॉम क्रूझ व त्याची सहाय्यक म्हणून 'घोस्ट' फेम डेमी मूर होती. तो चित्रपटसुद्धा अत्यंत प्रभावी कोर्टसीन्समुळे गाजला होता. ‘कोड मंत्र’ हे नाटक ‘अ फ्यू गुड मेन’वर आधारीत असले तरी ते मराठीत आणताना त्याला भारतीय लष्कराची पाश्र्वभूमी दिली गेली आहे. हे मूळ नाटक प्रथम गुजराती रंगभूमीवर आले. नाटककार विजय निकम यांनी ‘कोड मंत्र’चे मराठी रूपांतर केले आहे. दिग्दर्शक राजेश जोशी यांनी लष्करी पेशातील बारीकसारीक तपशील, अस्सल वातावरणनिर्मिती, कर्तव्यपूर्तीच्या ध्यासात कधी कधी लष्कराकडून घडणारे अमानुष वर्तनव्यवहार, त्याची होणारी भयावह परिणती, तसेच गोपनीयता आणि कडक शिस्तीच्या नावाखाली त्यावर घातले जाणारे पांघरुण, त्यातून दडपली जाणारी मानवी मूल्ये असा सारा पट अत्यंत रेखीवपणे नाटकात साकारला आहे. यथार्थ पात्ररेखाटन हे या नाटकाचे आणखीन एक वैशिष्टय़. अभिनेत्री मुक्ता बर्वे यात प्रमुख भूमिकेत असून, त्यांना अजय पूरकर, मिलिंद अधिकारी, अतुल महाजन, उमेश जगताप आदी कलाकारांनी तोलामोलाची साथ दिली आहे. रसाद वालावलकर यांनी उभारलेला सरहद्दीवरील लष्करी तळाचे वास्तवदर्शी नेपथ्य हे या नाटकाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्टय़. सचिन जिगर यांचे संगीत, भौतेष व्यास यांची प्रकाशयोजना आणि अजय खत्री यांच्या वेशभूषेने ‘कोड-मंत्र’च्या निर्मितीमूल्यांमध्ये मोलाची भर घातली आहे.

नाटकप्रेमींनी एकदम वेगळ्या विषयावरील हे नाटक एकदातरी पहावेच. सध्या मराठी रंगभूमीवर खूप चांगली नाटके आली आहेत. 'साखर खाल्लेला माणूस', 'एक शून्य ती', 'तीन पायांची शर्यत', 'अमर फोटो स्टुडिओ इ. नाटके गाजत आहेत. एक महिन्यापूर्वी 'अमर फोटो स्टुडिओ' पहायला गेलो होतो. नाटक पहायला खूप मजा येत होती. दुर्दैवाने मध्यंतरानंतर काही वेळाने घरी काही इमर्जन्सी आल्याचा फोन आल्याने रंगलेले नाटक अर्धवट सोडून जावे लागले. आता वेळ मिळाला की हे नाटक पुन्हा बघणार आहे.

कलानाट्यआस्वादसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

खेडूत's picture

10 Jan 2017 - 3:09 pm | खेडूत

या वेगळ्या अन चांगल्या नाटकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद.
हा विषय रंगभूमीवर आणणे हेच धाडस आहे. शिवाय ते नेपथ्य अणि ४० कलाकार म्हणजे सोपे काम नाही.
नक्की पहाणार...!

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2017 - 3:36 pm | संजय क्षीरसागर

नाटक किंवा सिनेमा हे जीवनातले निखळ मनोरंजनाचे विषय आहेत अशी भूमिका असल्यानं या नाटकाला जाणार नाही. तरी गुरुजींमुळे मराठी नाट्यभूमीशी अपडेट राहायला मदत होते हे नक्की.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2017 - 2:48 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! निखळ मनोरंजन हवे असेल तर 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक बघावे. एका फिक्शनवर आधारीत हे धमाल नाटक आहे. सर्व तरूण कलाकारांमुळे (सुव्रत जोशी, सखी गोखले, अमेय टिळक इ.) नाटक ताजेतवाने वाटते.

संजय क्षीरसागर's picture

11 Jan 2017 - 3:44 pm | संजय क्षीरसागर

नक्की पाहीन.

तुषार काळभोर's picture

10 Jan 2017 - 3:59 pm | तुषार काळभोर

परमवीरचक्र / महावीरचक्र / वीरचक्र युद्धातील शौर्यासाठी दिले जाते, शांतताकालीन अंतर्गत शौर्यासाठी (उदा अतिरेक्याविरोधातील कारवाई, नक्षलवाद्यांविरोधातील शौर्य, इत्यादी) अशोकचक्र / कीर्तीचक्र/ शौर्यचक्र दिले जाते.

नाटकाचा परिचय आवडला. नाटकाची कथावस्तूही खिळवून ठेवणारी आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

नाटकातच आसामच्या जंगलातील नक्षलवादी कारवायांविरूद्ध केलेल्या कामगिरीमुळे परमवीर चक्र जाही झाले असा उल्लेख आहे. नाटककाराची ही तांत्रिक चूक दिसते.

पगला गजोधर's picture

10 Jan 2017 - 6:11 pm | पगला गजोधर

परीक्षण छान.

पण... फ्यु गुड मेन, या इंग्रजी चित्रपटाची कॉपी टू कॉपी माशी टू माशी नक्कल आहे हे नाटक, असं वाटतंय हे परीक्षण वाचून

fgm

अनुप ढेरे's picture

10 Jan 2017 - 6:33 pm | अनुप ढेरे

नाटक ठीक आहे पण नक्कल नीट जमलेली नाही. पात्रांमध्ये बळच नाती जोडलेली आहेत. गोष्टीशी आणि विषयाशी काहीही संबंध नसताना, मूळ गोष्टीत नसताना उगाच काही पात्रांना एकमेकांचं नातेवाईक दाखवलेलं आहे. या बदलांनी गोष्टीच्या प्रभावात अजिबात फरक पडत नाही. उलट उगाच पायात पाय होतात. ( हेच शौर्य सिनेमातपण केलय, राहुल बोसने जावेद जाफरीचं लग्न लावणे वगैरे भंकस...)

विषय गंभीर आणि तसा नवा असल्याने या बळच गोष्टी घुसडायला नको होत्या असं वाटतं.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2017 - 2:53 pm | श्रीगुरुजी

नाटकातील भावनिक गुंतागुंत तशी अनावश्यक होती. भारतीय प्रेक्षकांना भावनिक गुंतागुंत, मेलोड्रामा इ. गोष्टी आवडतात असा नाटककाराचा समज असावा. अर्थात या गुंतागुंतीमुळे नाटकाचा सादरीकरणात व प्रभावात फरक पडलेला नाही.

नक्षलवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराला कधी उतरवले गेले? आणि सीमेपलीकडील व्यक्तींना मारल्याबद्दल मानवी हक्क आयोगाची केस कशी बनू शकते? अभिनय छानच झालाय कलाकारांचा आणि नेपथ्यही छान आहे. पण कथेतल्या असल्या कच्च्या दुव्यांमुळे विरस होतो.

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2017 - 2:56 pm | श्रीगुरुजी

नक्षलवाद्यांविरूद्ध सैन्याचा कोणतातरी विशिष्ट विभाग लढतो (Central Reserve Police Force (CRPF) )असे वाचले आहे. लष्कराच्या थलसेनेचे जवान त्यात नसावेत.

तेच. केंद्रीय राखीव पोलीस बल नक्षलवाद्यांविरुद्ध तैनात आहे छत्तीसगढ सारख्या राज्यांमध्ये. परंतु भारतीय पायदळ (army) किंवा इतर दोन सैन्यदले (नौदल व वायुदल) हे नक्षलवाद्यांविरुद्ध कधीच वापरली गेलेली नाहीत, जात नाहीत. याचे कारण म्हणजे लष्कराला परकीय शत्रूंविरुद्ध लढायचे प्रशिक्षण दिलेले असते. त्यांना आपल्याच देशाच्या नागरिकांविरुद्ध लढायला लावणे हे निष्ठेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. डॉ. खरे जास्त चांगले सांगू शकतील. पण केवळ याच कारणामुळे आत्तापर्यंतच्या सर्व संरक्षणमंत्र्यांनी नक्षलवादाविरुद्ध सैन्यदल तैनात करण्याच्या राज्यांच्या मागणीला ठाम नकार दिलेला आहे.

लेखकाची मोठीच चूक झालेली आहे.

अनुप ढेरे's picture

11 Jan 2017 - 8:24 pm | अनुप ढेरे

लष्करप्रमुखांनीदेखील हेच मत व्यक्त केलं होतं मागे.

ज्योति अळवणी's picture

10 Jan 2017 - 6:22 pm | ज्योति अळवणी

नक्की पहाणार. धन्यवाद

फेदरवेट साहेब's picture

10 Jan 2017 - 6:37 pm | फेदरवेट साहेब

ए साला, इंडियन फिल्म इंडस्ट्रीवाला पोरेलोक ने आदीच 'शौर्य' ह्या नेम ने 'फ्यु गुड मेन' पूर्ण लिफ्ट केला होता, वापस आणी एक थिएटर ने सुद्धा लिफ्ट केला? व्हेरी बॅड, व्हेर इज द ओरिजिनालिटी मेन. बाकी मिलिटरी प्रोसीजर्स अपुनला माहिती न्हाय सो नो कॉमेंट्स

, असला थिएटर परफॉरमन्स पाहन्यापेक्षा आपुन घरीच फ्यु गुड मेन चा ब्ल्यू रे कॉपी लावून बसू आपुनच्या ५२ इंचप्लाझ्मा वरती.

महासंग्राम's picture

11 Jan 2017 - 3:59 pm | महासंग्राम

ए साला फेदरवेट, तू साला बेन्सन & जॉन्सन कंपनीत मार्केटिंगला होता का रे ?? आय टेल यु झैरात मस्त ज्यमते तुला !!!

फेदरवेट साहेब's picture

11 Jan 2017 - 4:30 pm | फेदरवेट साहेब

नाय आपुन ओव्हरऑल इंचार्ज होता, तू धोंडू जोसीला ओळखते काय?

महासंग्राम's picture

11 Jan 2017 - 4:55 pm | महासंग्राम

भाऊसाहेब, नाय वळखत आपन. आपलं कसं असते आपण बरं आणि आपलं काम बरं. मग साला साऱ्यांचा घमपती बाप्पा मोर्या का होऊ दे !!!

फेदरवेट साहेब's picture

11 Jan 2017 - 5:45 pm | फेदरवेट साहेब

आय लाईक यु सन! आय लाईक युवर नो बुलशीट ऍटीट्यूड :)