आज खूप वर्षांनी रेनॉल्ड्सचा पेन लिहायला मिळाला. हा पेन माझ्या लहानपणी फार चालायचा. माझे बाबा तेव्हा हाच पेन वापरायचे आणि सुरुवातीला हा सोडून दुसरा कुठला पेन आम्हाला माहितसुद्धा नव्हता.
प्राथमिक शाळेत २-३ वर्षे आम्हाला पेन वापरायला चालत नव्हतं. पेन्सिलच वापरावी लागायची. लहान मुलं चुका खूप करतात, आणि त्यांना त्या खोडून सुधारता याव्यात म्हणुन पेन्सिल वापरावी असं सांगायचे. म्हणजे वहीत आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड जास्त दिसणार नाही. जेव्हा पेन वापरायला परवानगी मिळाली तेव्हा पुन्हा बजावण्यात आलं कि आता तुम्ही मोठे झालात (तिसरी का चौथीमधेच), तुम्ही खाडाखोड करू नये अशी अपेक्षा आहे.
तेव्हा रेनॉल्ड्सपासूनच पेनने लिहिण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. तेव्हापासून शाळेत असेपर्यंत आम्हा मुलांमध्ये कपड्यांसारखी पेनचीसुद्धा फॅशन यायची जायची.
बॉल पेनपेक्षा शाई पेनने अक्षर चांगले येते असा एक समज होता. म्हणून तो प्रयोग करून झाला. मग शाई पेन असेल तर शाईची बाटली बाळगणे, सांडणे, शाईचे डाग गणवेशावर पाडणे, शाई दुसऱ्यांवर उडवणे, शाई संपली म्हणून एकमेकांकडे पेन पेन्सिल मागणे असे सगळे प्रकार करून झाले.
मग चायना पेनची लाट आली. ह्या पेनला शाई ओतून भरण्याची गरज नव्हती. यांच्यात ड्रॉप/पंप लावलेला असायचा, तो दाबून शाई भरावी लागायची. त्यामुळे शाई सांडायची नाही, पण पेन बाटलीत बुडवावा लागायचा, आणि मग तो पुसायला एक कापड सोबत ठेवावा लागायचा. तो पेन तेव्हा ४० रुपयाला मिळायचा, आणि तो सगळ्यांना घ्यावा वाटायचा.
टोपण असलेल्या पेन सोबतच जेटरसारखे खटका दाबून उघडायचे पेनसुद्धा होते. टोपण पडायचे किंवा हरवायचे म्हणून हे पेन सोयीचे वाटायचे. पण ते चुकून उघडे राहिले तर खिशाला डाग लागायचे.
खटका असलेल्या पेनमधेच दोन तीन रंगाच्या रिफील असलेले पेनपण हटके म्हणून भाव खाऊन जायचे. असा पेन घेऊन मग उत्तर लिहिताना महत्वाचे मुद्दे वेगवेगळ्या रंगाच्या शाईने अंडर लाईन करता यायचे.
शिक्षक गृहपाठ आणि परीक्षेचे पेपर तपासताना लाल शाई वापरत असत, म्हणून हे रंगीत पेन त्यांच्यात विशेष लोकप्रिय होते.
काही दिवस अशा खटकावाल्या पेनमधेच बटन दाबून उघडण्याऐवजी खटका फिरवून उघडण्याचे पेन आले होते. या पेनाची शाई सुगंधित होती. अशा पेनांचा वेगळा रुबाब होता. एकाने जरी हा पेन आणला तरी हा थोडावेळ म्हणून सगळे मागून घ्यायचे. एखाद्या तासाला तो पेन वापरून परत करायचा, आणि आपल्या वहीत तो सुगंध घेत बसायचा.
हायस्कुलमध्ये पोचेस्तोवर ऍडजेलमुळे आम्हाला जेलपेनची ओळख झाली. जेल पेन मग काही दिवस भरपूर लोकप्रिय झाले. त्याने लिहिलेल्या कागदाला बॉल पेनने लिहिलेल्या कागदापेक्षा एक वेगळीच चकाकी यायची. आणि काही दिवस अक्षर सुधारल्यासारखे वाटायचे. असेच काही पायलटपेनसुद्धा उपलब्ध होते.
त्या काळात अमिताभ बच्चनने पार्कर पेनची जाहिरात करायला सुरुवात केली होती. "व्हाय अ पेन? नॉट अ पार्कर?" अशी त्याची कॅच लाईन होती. त्यामुळे आपल्या १०-२० रुपयांच्या पेन पलीकडे पेनमध्येसुद्धा प्रीमियम अशी रेंज उपलब्ध आहे हे आकलन झाले.
बाबांना कोणाकडून तरी हा पेन भेट म्हणून आला होता. तो मीच वापरला. आणि तिथून पुढे काही दिवस वाढदिवसासारख्या प्रसंगी पार्करचे पेन भेट म्हणून देण्याघेण्यात दिसु लागले.
एकीकडे हे उच्च श्रेणीतले पेन येत असताना बाजारात २ रुपयाचे वापरून फेकून देण्याचे पेन यायला लागले. १० रुपयाचा पेन घेणं जमत असतानासुद्धा मुलं सगळे वापरतायत म्हणून हे २ रुपयाचे पेन वापरायला लागले. तेव्हापासून हे पेन, ऑफिसमध्ये वाटप करताना, सेमिनारमध्ये, ट्रेनिंगमध्ये असा सर्व ठिकाणी वापरात दिसत आहेत.
नऊवी दहावीच्या वर्षात दहाविची महत्वाची परीक्षा जवळ येत होती. आमच्या आवडीनिवडी पक्क्या होत होत्या. आणि त्याचबरोबर शिक्षकसुद्धा सांगायचे कि आता एकाच पेनाने लिहिण्याचा सराव करा. त्या पेनची सवय झाली पाहिजे, हात बसला पाहिजे, म्हणजे अक्षरात सातत्य येईल.
माझ्या वर्गातल्या बऱ्याच जणांचा सेलो ग्रीपर हा पेन आवडता होता. मला स्वतःला सेलोचाच सेलो पिनपॉईंट हा पेन आवडता होता. आणि त्याच प्रकारचा सेलो टेक्नोटीप हा पेन मला जास्त आवडला, आणि तोच मी आजतागायत वापरतोय.
पण शिक्षण संपलं कि लिहिण्याची सवय सुटली. आता ब्लॉगसुद्धा संगणकावर लिहितात लोक. त्यामुळे आजकाल मला लेखनाची आवड आहे म्हणण्यापेक्षा टंकनाची आवड आहे म्हटलेले जास्त बरोबर ठरेल. :D
असो. तर माझा आवडता टेक्नोटीप घरी विसरल्यामुळे मला सहकाऱ्याकडून रेनॉल्ड्स पेन मागून घ्यावा लागला. तो पेन पाहून पेन या विषयावर गप्पा झाल्या, आणि हे स्मरण रंजन झाले.
टीप : मला स्वतःला सर्व प्रकारच्या गोष्टी करून बघण्याची, वापरून बघण्याची आवड असल्यामुळे मी एवढे पेन वापरले. त्यासोबतच काही केल्या अक्षर चांगले येत नव्हते हे हि एक कारण होते. सर्वांनी एवढे पेन वापरले असतील असे नाही.
काही जणांचे एका पेनने अक्षर चांगले यायला लागले, किंवा अक्षर चांगलेच होते, ते कुठल्या पेनमुळे छान दिसायला लागले कि त्यांचा शोध संपला. अस्मादिकांचे अक्षर ह्या जन्मात कधी कुठल्याही पेन अथवा पेन्सिलीमुळे चांगले आले नाही. त्यामुळे हा फक्त लहानपणात वापरलेल्या पेन्सबद्दल स्मरणरंजनाचा लेख असून कुठल्या अमुक पेनमुळे अक्षर चांगले येते असा लेखकाचा दावा मुळीच नाही.
प्रतिक्रिया
30 Dec 2016 - 2:00 pm | एस
आमचं काळे कंपनीचं फाउंटन पेन पेटंट असे. आता काळ्यांनी पेन बनवणं बंद केलंय! फक्त शाई विकतात. :-(
3 Jan 2017 - 3:33 pm | स्वधर्म
मी अजूनही काळे पेनच वापरतो. त्याच्याइतकं दुसरं चांगलं शाईपेन माहिती नाही. फक्त १५ रूपयांत अगदी ६-८ महिन्यांपूर्वी घेतलेलं अाठवंतंय. माझं लहानपण पुण्यात गेलं नाही, पण गेली काही वर्षे मी हे पेन वापरतोय. काळे यांनी हे उत्पादन बंद केलं असेल, तर खूप वाईट झालं असं म्हणेन.
30 Dec 2016 - 2:08 pm | औरंगजेब
मी दाहावीचे 045रेनोल्ड आणी १२वी चे रेनोल्ड रेसर जेलने पेपर लिहिलेले आठवतात.
30 Dec 2016 - 2:30 pm | तुषार काळभोर
पहिली दुसरीला तुमच्याप्रमाणेच 'शिसपेन्सिल' होती. टोकयंत्र व खोडरबरासहित.
(त्यातपण फॅन्सी आयटम म्हणजे पेन्सिलच्या मागच्या टोकाला खोडरबर.)
तिसरीला बॉलपेन वापरायला लागलो.
चौथीला शाळा बदलली. या शाळेत चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा असल्याने शाईपेनाला प्राधान्य दिलं जायचं. मग एअरमेल व हिरोचे ३३२ पेन्स वापरले.
आठवीपासून परत बॉलपेन - जेटरची हौस ५४५ रेनॉल्ड्सवर भागवायची.
मध्ये मध्ये झीचे खुशबूवाले पेन होते, अजून एक सोनेरी रंगाचा रोलर बॉल असलेला ५०-६० रुपयांचा पेन होता.
पण आम्हाला २ रुपयांचा स्टिक चा पेन आवडयचा. कारन त्याचा खटका वापरून आम्ही खडूचे तुकडे उडवायचा खेळ खेळत असू.
कॉलेजला गेल्यापासून मात्र अजूनपर्यंत जेल पेन आवडतात.
30 Dec 2016 - 2:33 pm | सांरा
मी दहावीत राईटोमीटर जेल वापरायचो आणि प्रत्येक पेपर नंतर रिफील बदलवायचो.
30 Dec 2016 - 3:16 pm | आकाश खोत
या पेन ची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद.
ह्याची जाड रिफील खूप दिवस चालायची. एका रिफील मध्ये तुम्ही १०००० मीटर, म्हणजेच १० किमी म्हणजेच माउंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता असा त्यांचा दावा होता. त्या रिफील वर एक स्केलसुद्धा होती, १०००० मीटर दाखवणारी. म्हणूनच नाव रायटोमीटर. तोसुद्धा मी वापरून पाहिला. आणि खरंच एकच रिफील काही महिने चालली. त्या पेनचा रंग उडाला, टोपण तुटलं, पेन लूज झाला, तरी ती रिफील संपेना. शेवटी कंटाळून मी तो फेकून दिला. कदाचित नोट्स वगैरे काढून लिहून अभ्यास करण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्याकडून लवकर संपला असता.
30 Dec 2016 - 2:33 pm | जव्हेरगंज
मस्त लेख!
हे सगळे प्रकार करुन बघितलेत!!
30 Dec 2016 - 3:14 pm | आकाश खोत
धन्यवाद :)
30 Dec 2016 - 3:12 pm | कपिलमुनी
रोटोमॅक : लिखते लिखते लव्ह हो जये ! बरेच दिवस वापरला ,
नंतर जेटर आणि सेलो ग्रीपर वापरले , सेलो ने सुरुवातीला खुप शार्प लिहिला जायचा म्हणून जुन्या ' रूळलेल्या ' रीफीलचा पॉईंट काधून लावायचो.
काळे , हीरो चाईना , जेल पेन यासोबत पायलटचा पेन सुद्धा फेव्हरीट होता
30 Dec 2016 - 4:07 pm | संजय पाटिल
आमच्या लहानपणी सुरवात पाटी पेन्सिलने झाली. नंतर वहि पेन्सिल; त्यानंतर दुरेघी, तिरेघी आणि चार रेघी वहि व त्यासोबत बोरू वापरायला लावला होता शाळेत. त्यानंतर दऊत व टाक व शेवटी फाउंटन पेन वापरायला देत. यामुळे अक्षर वळणदार होत असे. बॉलपेन वापरायला दहावी पर्यंत सक्त मनाइ होती
बॉल्पेन वापरला तो पहिल्यांदा कॉलेजात गेल्यावरच. आमच्या वेळी विल्सनचा जॉटर रिफीलवाला बॉलपेन फेमस होता.
30 Dec 2016 - 8:41 pm | मदनबाण
सुरेख लेखन... :)
रेनॉल्ड पेनची जाहिरात त्यांच्या सुंदर जिंगल प्रसिद्ध झाली होती ! :)
मध्यंतरी असं जेल पेन आल होतं { आत्ता मिळतं की नाही, ते ठावूक नाही. } कि ज्याच्या रिफिल मध्ये शाईच्या मागे थोडस पारदर्शक केमिकल असायच, शाई संपत गेली कि शाई पाठोपाठ ते केमिकल देखील खाली उतरायचे... शाई संपल्या नंतर त्याचा एक कणही त्या केमिकलमुळे दिसायचा नाही ! :)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punk
30 Dec 2016 - 10:07 pm | मदनबाण
त्या काळात अमिताभ बच्चनने पार्कर पेनची जाहिरात करायला सुरुवात केली होती. "व्हाय अ पेन? नॉट अ पार्कर?" अशी त्याची कॅच लाईन होती.
हल्ली अमिताभ पार डोक्यात जायला लागला आहे...५ पैकी ३ जाहिरातीत मला अमिताभ दिसतो ! हाजमोला पासुन च्यवनप्राश पर्यंत, नवरत्न तेला पासुन मँगी पर्यंत, टिबी दुषःप्रभावा पासुन स्वच्छ भारत पर्यंत, कार पासुन स्कुटर पर्यंत... सगळीकडे बिग बी चे दर्शन ! माझा आवडत्या अभिनेत्यांपैकी एक असणारा हा "शहँशाह " आता डोक्याला शॉट वाटु लागला आहे !
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- The Weeknd - Starboy (official) ft. Daft Punk
31 Dec 2016 - 12:32 am | ज्ञान
मस्तच !!
जुन्या आठवणी जागा केल्यात राव
अक्षर सुधारत नाही पण.
31 Dec 2016 - 4:02 am | कैवल्यसिंह
रेनॉल्ड्स कंपनीचा एक भारी पेन आहे... तो म्हणजे ' रेनॉल्ड्स ट्रायमॅक्स ' (Reynolds Trimax). एकदम भारी पेन जेल पेन आहे. पन मस्त व पटापट लिहीता येत त्या पेन ने.. पेन ४० का ५० रु ला मिळतो व त्याची रिफील २० का २५ रु ला मिळते.. एकदम स्मुथ लिहीता येत त्या पेन ने... मी आत्तासुद्धा हाच पेन वापरतोय... व जेल पेन आसुनसुद्धा पाणी पडल्यावर शाई पुसून जात नाही...
31 Dec 2016 - 4:40 am | लालगरूड
मी वापरलेले पेन
LINC ocean या पेन च्या लूक चे भारी आकर्षण होतं
चायना पेन 40rs original photo भेटला तर द्या .अशीच design होती आणि त्यावर थोडीशी वेलाची नक्षी असायची
cello gripper खूप हार्ड वाटायचा कधी वापरला नाही 7.50 Rs 2006.
reynold चं टोपण काठीवर लावून बाण बनवायचो.आणि lexi च्या टोपणाला छोटं होल होतं त्यात पेन फिरवून beyblade बनवायचो.
11वी luxor pilot वापरला आणि 12 वी ला reynold aerosoft हा मॅट finish मध्ये भेटायचा आणि खूप साॅफ्ट चालायचा .
सध्या cello butterflow वापरतो exam साठी..आणि lecture साठी engineering ला 2rs वाले परवडतात कारण कोणीही पेन घेत . मित्र पेन आणत नाहीत.सकाळचा पेन परत येत नाही :) #engineering
31 Dec 2016 - 4:43 am | लालगरूड
img src="https://c4.staticflickr.com/3/2854/9811625323_502f50ddd8_k.jpg">
31 Dec 2016 - 4:46 am | लालगरूड
raynold aerosoft
31 Dec 2016 - 4:51 am | लालगरूड
चायना fountain 2005
31 Dec 2016 - 4:55 am | लालगरूड
31 Dec 2016 - 4:58 am | लालगरूड
ajithprasad.com/wp-content/uploads/2011/05/old-hero-pen.jpg
31 Dec 2016 - 5:07 am | लालगरूड
31 Dec 2016 - 5:09 am | लालगरूड
चायना पेन silver
31 Dec 2016 - 6:19 am | तुषार काळभोर
31 Dec 2016 - 8:23 am | लालगरूड
हा असाच silver.मी फोटो टाकतोय पण दिसत नाही
31 Dec 2016 - 9:46 am | तुषार काळभोर
1 Jan 2017 - 7:28 am | लालगरूड
हो हाच.आता भेटतो का?
31 Dec 2016 - 2:13 pm | ज्योति अळवणी
मी १०वी च्या परीक्षेला पायलट पेन वापरल होत. त्यावेळी ते पेन वापरणं म्हणजे मोठी गोष्ट होती. नंतर मात्र कोणतही जेल पेन वापरायला लागले. आता इतका विचार नाही करत कोणत पेन आहे याचा. कारण आता मुद्दाम हस्तलिखित कुठे असत?
31 Dec 2016 - 2:19 pm | रातराणी
मला तर अजूनही शाई पेनने लिहायला आवडतं.
1 Jan 2017 - 8:56 pm | diggi12
Wallety pn solid pen hota
3 Jan 2017 - 1:14 pm | आकाश खोत
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी. :)
काही लोकांनी उल्लेख केलेले पेन सुद्धा मी वापरले आहेत. पण विसरलो होतो.
तुमच्या प्रतिसादामुळे ते पण आठवले. धन्यवाद. :)